सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

शून्यातून विश्व निर्माण करणारी आई अशिक्षित नसते.

  1. शून्यातून विश्व निर्माण करणारी आई अशिक्षित नसते.
  2.  मुलाला नऊ महिने पोटात सांभाळून जन्म देणारी आई, शून्य ते पांच,सहा वर्षे संगोपनासाठी कष्ट,त्याग करणारी आई .कधीच अशिक्षित नसते.तिला मुलं मोठी झाल्यावर त्याचं आईला अशिक्षित अडाणी म्हणतात. त्या उच्चशिक्षित मुलामुलींना सणसणीत उत्तर एका बापाने कसे दिले ते वाचा आणि इतरांना सांगा.सुशिक्षित कोण शाळांत परीक्षेत ९० टक्के गुण मिळवलेला मुलगा कि शाळा न शिकलेली आई. मध्यमवर्गीय घरातील एका मुलाला १० वीच्या परिक्षेत ९० टक्के गुण मिळाले. वडील खुशीने गुणपत्रिका (Marksheet) न्याहाळत आपल्या पत्नीला सांगतात, अग... छान लापशी बनव, तुझ्या लाडक्याला ९० टक्के मार्क्स मिळालेत शालांत परिक्षेत..!आई किचनमधुन पळत पळत येत म्हणाली, बघुया मला दाखवा...! इतक्यात,मुलगा पटकन बोलला. बाबा तिला कुठे Result दाखवताय ?. तिला काय लिहता वाचता येते का.? अशिक्षित आहे ती...! भरल्या डोळ्याने पदर पुसत आई लापशी बनवायला निघुन गेली. ही गोष्ट वडिलांना लगेच लक्षात आली. मग ते मुलाच्या संवादात भर टाकुन म्हणाले "हो रे ! ते पण खरच आहे...! आमच लग्न झाल तेव्हा तीन महिन्यातच तुझी आई गर्भवती राहिली.मी विचार केला लग्नानंतर कुठे फिरलो नाही.व्यवस्थितपणे एकमेकांना समजल पण नाही,तर ह्यावेळी गर्भपात करुन पुढे chance घेऊया.पण तुझी आई ठामपणे नाही म्हणाली. नको ते नंतर वगैरे. फिरण व समजण पण नको. आणि तुझा जन्म झाला. खरच अशिक्षित होती ना ती.तु पोटात असताना तिला दुध बिल्कुल आवडत नसताना तु सद्धृड व्हावास म्हणून नऊ महीने ती रोज दुध पित होती. कारण ती अशिक्षित होती ना.तुला सकाळी सात वाजता शाळेत जाव लागायच म्हणजे स्वतः सकाळी पाच वाजता उठुन तुझ्या आवडीचा नाष्ता आणि डबा बनवायची.ती वेडी अशिक्षित होती ना. तु रात्री अभ्यास करता करता झोपून जायचा तेव्हा येऊन ती तुझी वह्या पुस्तक बरोबर भरुन तुझ्या अंगावर पांघरुन नंतरच झोपायची.तिला पुस्तक वाचता येत नव्हती पण व्यवस्थितपणे पिशवीत म्हणजे दप्तरात ठेवणारी ती आई अशिक्षित होती ना.तू लहानपणी बहुतेकवेळा आजारी असायचास तेव्हा रात्र-रात्र जागुन ती परत सकाळी तिची सर्व काम चोख करायची.कष्टकरी आई अशिक्षित होती ना. तुला Branded कपडे घेउन द्या म्हणून माझ्या मागे लागायची आणि स्वतः मात्र एकाच साडीवर वर्षे चालवायची. मुलांच्या शिक्षणासाठी चांगल्या साड्या घालण्याची तिला आवड नव्हती तिला, परिस्थतीची जाणीव असलेली अशिक्षित आई होती ना ती. बाळा.चांगली शिकलेली लोक पहिला स्वतःचा स्वार्थ आणि मतलब बघतात.पण तुझ्या आईने आजवर कधीच तो बघितला नाही. कारण खरेचं ती अशिक्षित आहे ना.ती जेवण बनवुन आपल्याला वाढता वाढता कधी कधी स्वतः जेवायच विसरुन जायची म्हणून मी अभिमानाने सांगतो की तुझी आई अशिक्षित आहे.हे सगळ ऐकुन मुलगा रडत रडत आईला बिलगुन बोलतो. आई मी तर फक्त पेपरवर ९० टक्के मार्क मिळवलेत. पण माझ्या आयुष्याला १०० टक्के बनवणारी तु पहिली शिक्षक आहेस. आणि ज्या शिक्षकांची मुल ९० टक्के मार्क मिळवतात. त्या शिक्षकांकडे किती ज्ञान असेल ह्याचा मी कधी विचार केलाच नाही.आई आज मला ९० टक्के मार्क्स मिळवुन पण मी अशिक्षित आहे आणि तुझ्याकडे PHD च्या पण वरची Degree आहे. कारण मी आज माझ्या आईच्या रुपात डॉक्टर, शिक्षक, वकिल, माझे कपडे शिवणारी Dress Designer, Best Cook ह्या सगळ्यांच दर्शन घेतल. प्रत्येक मुला- मुलीनी जे आईवडिलांचा अपमान करतात, पाणउतारा करतात, शुल्लक कारणावरुन रागवतात. त्यांनी विचार करावा, त्यांच्यासाठी काय काय सोसलय आईवडिलांनी.तीन रुम किचनचा एखादा फ्लॅट, दोन चार एकरचे फार्म हाऊस एखादी चार चाकी गाडी आणि भौतिक वस्तूंचं प्रदर्शन मांडता आलं की आपण म्हणतो, अमक्या- तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं.म्हणजे होतंय काय की सुख मिळेल या आशेने माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय. पण सुखी काही दिसत नाही.  आपणचं म्हणतो की, आमच्या लहानपणी खूप मजा यायची. खूप करमायचं, घर भरलेलं असायचं. दिवस कधी मावळायचा ते कळायचंच नाहीमग आता काय झालं?. ती मजा कुठ गेली?. आता एकटं एकटं का वाटतं ?. आणि छातीत धडधड का होते?कशामुळे करमत नाही?.कारण विश्व निर्माण करण्याची व्याख्या कुठेतरी चुकली.विश्व निर्माण करणं म्हणजे नाती गोती जपणं,छंद जोपासणं,पाहुणे होऊन जाणं,पाहुण्यांचे स्वागत करणंखूप गप्पा मारणं,घराच्या उंबऱ्यात चपलांचा ढिग दिसणं खळखळून हसणं आणि काळजातलं दुःख सांगून मोकळेपणाने रडने.या गोष्टी आपण प्राप्त करू शकलो तर शून्यातून विश्व निर्माण केलं असं म्हणावं.तुम्हीच सांगा आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची वाढ झाली की घट झालीतुमचं खर दुःख तुम्ही मोकळेपणाने किती जणांना सांगू शकता?असे किती मित्र,शेजारी,नातेवाईक आपण निर्माण करू शकलो.  खूप कमी,किंबहुना नाहीच.मग आपण विश्व निर्माण केलं का?तर नाही मित्रानो, ते रजिस्ट्रीच्या कागदाच्या फायली विश्व व भौतिक साधनांची रेलचेल म्हणजे विश्व नाही.लॉकर मध्ये ठेवलेले हिरे मोत्यांचे दागिने म्हणजे विश्व कधीच नसते.मुखवटा घातलेल्या चेहऱ्यांची गर्दी म्हणजे विश्व नाही.हे समजून घ्यावे लागेलमोठं बनण्याच्या दडपणामुळे आणि मग कामाच्या व्यापामुळे नाती दूर जाणार असतील. इतरांना तुच्छ लेखण्यामुळे आणि अहंकारामुळे माणसं जवळ येणार नसतील दुःख सांगायला, मन हलकं करायला जागाच उरणार नसेल.तर आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं, की विश्वातून शून्य?.वाचा,विचार करा,अहंकार सोडा, माणूसकी जपा. इतरांच्या कामी या.सोबत काहीचं येत नाही. मी पुस्तकात, फेसबुक वर,वॉट्स अँप वर वाचलेले प्रेरणादायी विचार वाचकांना देण्याचा नेहमीच प्रयत्न करतो.त्यातून अनेकांना प्रेरणा मिळते, ज्यांचे दुःख ऐकणारा कोणी नसतो,त्याला ते लवकर समजते तो आवर्जून प्रतिक्रिया व्यक्त करतो.माझा मनातील भावना तुम्ही लिहल्या म्हणतो.आनंदीत होतो नियमितपणे संपर्कात राहतो.आजच्या घडीला अनेक वाचक मला वेळोवेळी त्यांच्या घरातील सुखा दुःखाच्या घटना सांगून सल्ला मागतात,त्यातील एक पंढरपूरचे संतोष भाऊ त्यांच्या आईवडिलांची करोडो रुपयांची संपत्ती वडिलांच्या भावांनी त्यांच्या मुलांनी कशी आईवडिलांना बंदिस्त करून हडप केली.ती खूप वेदनादायी गोष्ट आहे, असो सुखाच्या मागे धावणारे मुलंमुली आईवडिलांना अशिक्षित समजून शिक्षण पूर्ण करतात.पण शून्यातून विश्व निर्माण करणारी आईवडील अशिक्षित नसतात.जे आम्ही भोगले ते आमच्या मुलामुलींना भोगायला येऊ नये हीच इच्छा कायम ठेवून जगतात.सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप मुंबई,

 

 



सर्वश्रेष्ठ पदी बसलेल्या गुलामला जाणीव कशी करून देणार?.

 सर्वश्रेष्ठ पदी बसलेल्या गुलामला जाणीव कशी करून देणार?.



अन्याय अत्याचार सहन करण्याची सवय लागली की धनधाकड शरीर असलेला मानव,प्राणी चाबूकाचा गुलाम होतो. मालकाच्या हातात चाबूक दिसला की प्राणी घाबरतो तसाच माणूस पण घाबरतो. हा निसर्गाचा नियम आहे.त्याला तथागत बुद्धांनी प्रथम आवाहन देऊन मोडून काढले होते.त्यांनी शेठ सावकार शेतकरी यांच्या कडे काम करणाऱ्या गुलामांना मानवा सारखे वागविण्याची विनंती केली होती.त्यामुळे दोघांच्या वागण्यात बदल झाला आणि गुलामानी जास्त मेहनतीने काम केल्यामुळे उत्पादनात भर पडली होती. गुलाम शेतकरी, सावकार यातील भेद मिटला होता.
    भारतात आज ही मागासवर्गीय जातीच्या माणसाला माणुस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारल्या जातो.त्यावर माणुसकीहीन अन्याय अत्याचार केल्या जातात.त्यावर कडक कारवाई करणारा अट्रोसिटी हा कायदा होता. अट्रोसिटी हा एक असा कायदा आहे की ह्या कायद्यामुळेच जातीय अत्याचार थोड्याफार प्रमाणात कमी होण्यास मदत होत होती. पण दि. २० मार्च, २०१८ रोजी विद्यमान सर्वोच्च न्यायालयाने ह्या कायद्याबद्दल करून खूप चुकीचा निर्णय घेतला आहे. परत, काही धनदांडगे जमीनदार जातीयवादी सक्रिय होऊन जातीय अत्याचाराच्या घटना वाढतील आणि राजकीय आशीर्वाद असल्यामुळे गुन्हे कसे पचवायचे हे तर यांना चांगलंच ठाऊक झाले आहे. शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण नंतरचे पदोन्नती आरक्षण सर्व सनदशीर मार्गाने संपविण्याचे षड्यंत्र सुरु असतांना ही समाजातील गट-तट, राग, द्वेष, तिरस्कार, अहंकार आणि स्वार्थ काही कमी होतांना दिसत नाही.आणि सर्व मागासवर्गीय समाज एकत्र करण्याचा प्रयत्न करीत नाही.ही खुप खेदाची व क्रांतिकारी विचाराला मूठमाती देणारी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.
देशात लोकशाही पद्धतीने निवडून आलेले १३१ मागासवर्गीय खासदार आहेत.विशेष म्हणजे एक खासदार भारत देशाचा सर्वोच्च पदी म्हणजे राष्ट्रपती पदी आहे एक ओबीसी खासदार देशाचा प्रधानमंत्री आहे.तरी एस सी,एस टी, ऍक्ट आणि आरक्षणाच्या निमावली मध्ये नुसता बदल नाही तर निष्कीर्य करून टाकला. ही घटना साधी नाही तर लोकशाही ने दिलेल्या संविधानिक मूल्याचा आपल्या सोयी नुसार ब्राम्हणशाहीने केलेला सरळ खुनच आहे.तरी मागासवर्गीय खासदार,प्रधानमंत्री,राष्ट्रपती आपल्या सामाजिक जबाबदारीशी प्रामाणिक न राहता वैचारीक गुलाम म्हणून इनामदारी ने आपले कर्तव्य पार पाडत आहेत. आपण गुलाम आहोत यांची त्यांना संपुर्ण जाणीव आहे.मग या वैचारिक गुलामला जाणीव कशी करून देणार?.हा आज देशातील मागासवर्गीय समाजा समोरचा मोठा प्रश्न आहे.या मागासवर्गीय लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून कोणी निवड केली?.ब्राम्हणशाहीचे व्यवस्थापन करणाऱ्या आर एस एस च्या भटा ब्राम्हणांनीच नां?.
मागासवर्गीय बहुजन समाजातील पक्षाच्या वतीने स्वाभिमानी ओबीसी प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती झाला असता काय?.मग बहुसंख्य हिंदुत्ववादी, मनुवादी विचारधारा मानणाऱ्या पक्षांनी ओबीसी प्रधानमंत्री व मागासवर्गीय राष्ट्रपती कोणत्या गुणवंते नुसार निवडल्या गेले तर एकच गुणवत्ता आहे ती म्हणजे वैचारिक गुलाम. ही मोहनचंद गांधी यांच्या यरोडा जेल पुणे येथील आमरण उपोषणाला बसल्या नंतर झालेली उत्पत्ती आहे.त्यालाच पुणे करार म्हणतात.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या स्वाभिमानी समाजाला वाचविण्यासाठी मजबुरी मुळे केलेला समझोता होय.त्याचं गुलामांचा वापर करून आज देशातील लोकशाही संपविण्याचे काम मनुवादी करीत आहेत.
सर्वश्रेष्ठ संविधानिक पदी ओबीसी,मागासवर्गीय गुलाम बसविल्यामुळे कोणतेही मानसिक गुलाम नेतृत्व स्वतःच्या किंवा संविधानाच्या चौकटीत काम करू शकत नाही.तो गुलाम स्वतःसह सर्व ओबीसी, मागासवर्गीय समाजाला कायमस्वरूपी गुलाम बनविण्यासाठी काम करीत राहील. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी होणार नाही यासाठी प्रथम समता, स्वतंत्र,बंधुभाव, एकता सर्वधर्मसमभाव ही चौकट मोडावी लागेल.ती तोडण्यासाठी संविधानात दिलेले मूलभूत अधिकार,सनदशीर कायदे कानून,कलम बदलल्या शिवाय मनुवादी, हिंदुत्ववादी विचारांची अंमलबजावणी होणार नाही हे सर्व काम ओबीसी, मागासवर्गीय गुलामांच्या हातुन सहीने आज देशात होत आहे.त्याला सर्वच ओबीसी, मागासवर्गीय, बहुजन समाज मूक पणे साथ देतो किंवा तो ही त्यांची मानसिक गुलामी सहन करण्यासाठी तयार होत आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व नाशाला तोच जबाबदार असेल. आर एस एस प्रणित भाजपा एकमेव पार्टी नाही तर तिला ४६ छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षाचा पाठिंब्यामुळे ती मजबूत होत आहे.हे ४६ पक्ष मागासवर्गीय, बहुजन समाजाला मानसिक गुलाम बनविण्यासाठी कुराडीच्या दांड्याचे काम करीत आहेत.हे स्वार्थासाठी आंधळे, बहिरे आणि मुके झाले आहेत.त्यात रामदास,उदीतराज हे लक्षवेधी गुलाम आहेत.या गुलामला जाणीव कशी करून देणार?.आर एस एस ने सर्व साम, दाम, दंड,भेद नीती वापरून या पक्षांना सहयोगी गटबंधन, ठगबंधन आणि राजकीय सौदेबाजी केली आहे.त्यामुळे हे सर्व पक्षाचे नेतृत्व करणारे नेते गुलाम झाले आहेत.शिवसेना व शिवसेना पक्ष प्रमुख यांची एकूण भाषणे ऐकली तर मोठा प्रश्न पडतो हीच का ती वाघाचे तोंड घेऊन मराठी, महाराष्ट्र आणि महाराजांचा आदर्श सांगणारी सेना?.की मनुवादी हिंदुत्ववादी गुलाम?. मराठी माणसाला महाराष्ट्राला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना गुलाम बनविणारी सेना. ओबीसी मागासवर्गीय, बहुजन समाजाला गुलाम बनविणारे नेतृत्व मग ते कोणाचे ही असो ते गुलाम झाले आहे.त्यामुळेच असा गुलामांना गुलामगिरीची जाणीव कशी करून देणार?.
हे संत,महापुरुषांच्या,महात्माच्या क्रांतिकारी विचारावर श्रद्धा ठेवणाऱ्या संस्था, संघटना, कार्यकर्ते आणि नेते यांनी गांभीर्याने विचार करून मार्ग काढला पाहिजे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर सही केली तेव्हा जी खंत व्यक्त केली होती,जर माझा समाजाची राख रांगोळी होऊन तो जिवंत राहत नसेल तर मी जिवंत राहून काय उपयोगाचे ?.
ओबीसी,मागासवर्गीय, बहुजन समाजाची आजची परिस्थिती तशीच आहे.८५ टक्के समाज असूनही त्यांच्यावर ३ टक्के लोकसंख्या असलेला समाज त्यांना गुलाम बनवीत आहे.कारण ओबीसी, मागासवर्गीय, बहुजन समाजात एकी नाही.एकमेकांवर विश्वास नाही.म्हणून त्यांना गुलामी स्वीकारावी लागत आहे.समाजाचे किंवा देशाचे नेतृत्व करण्यासाठी वयाची अट नसते.तर वैचारिक धाडस आणि इच्छाशक्ती पाहिजे.सर्वच मागासवर्गीय समाजाच्या नेतृत्वाने ते गमावलेले दिसते.म्हणूनच ते सर्वश्रेष्ठ पदी बसलेले असतांना ही वैचारिक गुलामी स्वीकारत आहेत.मग त्यांना जाणीव कशी करून देणार?.
वाघ कधीही जंगलात शिकार एकटाच करतो, पण कळपात राहतो.माणसात जसा अहंकार, स्वाभिमान असतो तसाच प्राण्या मध्ये असतो.दोन मित्र गैरसमजा मुळे शत्रु बनतात तसेच प्राण्यात सुद्धा होते.संकट समयी माणुस जसा माणुस म्हणून धाऊन जातो तसाच प्राण्यांच्या संकट समयी प्राणीच धाऊन जातो.एकदा एक वयस्कर वाघ शिकार करण्यासाठी फिरत असतांना पंचवीस तीस कुत्रे त्याला घेरतात व त्यांच्यावर जोर जोराने भुंकून हल्ला करतात.तो आवाज ऐकून दुसरा वाघ त्या वाघाच्या मदतीला धावून जातो.तो फक्त दाहडतो तर सर्व कुत्रे पळून जातात.वयस्कर वाघ उभा राहतो आणि सावरतो तो पर्यंत मदतीला धावून आलेला वाघ निघून जातो.इतर प्राणी हे सर्व पाहत होते,त्यांनी त्या वाघाला विचारले तुम्ही एकमेकांशी बोलत नाही.मग त्यांला वाचविण्यासाठी का गेला?.तेव्हा ते वाघाने उत्तर दिले आमची आपसात नाराजी,गैरसमज जरी असले तरी एकूण प्राणी समाजात असा समज जाऊ नये की कुत्रे ही वाघाला मारून टाकतात. देशात ८५ टक्के ओबीसी, मागासवर्गीय बहुजन समाजाच्या रक्षणासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक वेळी धाऊन आले.आणि आज ही ओबीसी, मागासवर्गीय, बहुजन समाजाच्या रक्षणासाठी आंबेडकरी विचारांचे लोक परिणामाची पर्वा न करता लिहण्यासाठी, बोलण्यासाठी, लढण्यासाठी पुढाकार घेतात.गुलामला गुलामगिरी ची जाणीव करून देतात. मग आता सर्वश्रेष्ठ पदी बसलेल्या गुलामला जाणीव कशी करून देणार?.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप, मुंबई
3 Attachments