शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२

संघटित असंघटित कामगार का भरडल्या जातात?.

 संघटित असंघटित कामगार का भरडल्या जातात?.



जगातील कामगारांनो एक व्हा म्हणणारे कम्युनिस्ट मार्क्सवादी,जाती धर्माच्या नावावर होणाऱ्या शोषणाच्या विरोध बोलत नाही,गांधीवादी,गोळवलकरवादी यांना कामगार दिसत नाही. त्यांना शूद्र समाज वाटतो म्हणूनच ते मागासवर्गीय ओबीसी,आदिवासी अल्पसंख्याक समाजाला कामगार म्हणून "समान न्याय समान वेतन" मिळावे असे वाटत नाही. तरी बहुसंख्य कामगार विशेष शूद्र समाजाचे कामगार,कर्मचारी अधिकारी त्यांच्या संघटनेचे सभासद होऊन त्यांच्या उच्चवर्णीय नेतृत्वाखाली मुकाटपणे काम करतात. म्हणूनच संघटित असंघटित कामगार भरडल्या जातात?.
महात्मा ज्योतिबा फुले,रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांनी संघटित असंघटित कामगारांना मानसन्मान मिळवून दिला,त्यांची कामगार चळवळ तिला भारतीय संविधानात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी न्याय हक्क व अधिकार मिळवूण दिला.कामगार कायदे बनविले. आणि तेव्हाच त्यांनी धोक्याची सूचना दिली होती. ते म्हणजे कामगार वर्गाचे दोन दुष्मन एक भांडवलशाही दुसरी ब्राह्मणशाही हे कामगार विसरले म्हणून मोठ्या प्रमाणात सरकारी सार्वजनिक उद्योग धंद्याचे खासगीकरण होत असतांना कम्युनिस्ट मार्क्सवादी, समाजवादी,गांधीवादी,गोळवलकरवादी विचारांच्या राष्ट्रीय ट्रेंड युनियन पोटतिडकीने लढतांना दिसत नाही.एकतर सनदशीर मार्गाने दुसरे रस्त्यावर उतरून तीव्र जन आंदोलने आवश्यक असतांना गांभीर्याने कोणीच लढतांना दिसत नाही. त्यात संघटित असंघटित कामगार भरडल्या जात आहे.
देशातील विविध क्षेत्रातील कामगारांवर सरकारने सुलतानी कायदे लादले आहेत.कष्टकरी कामगारांच्या श्रमाची किंमत कमी केली आणि अन्न धान्याची किंमत वाढवली त्यामुळेच एका भाकरीचे अनेक तुकडे केले जेणेकरून कष्टकरी कामगारांना पोटभर जेवण मिळु नये किंवा तो सतत अडचणीत राहिला पाहिजे.म्हणजे तो बंड करून उठण्याची हिंमत करणार नाही. हे आर एस एस प्रणित मोदी सरकारने ठरविले आहे. त्याची अंमलबजावणी राज्य सरकार ला करावीच लागेल.सर्व प्रथम एक लक्षात घ्या कामगार कर्मचारी अधिकारी मित्रांनो सरकार कुठल्याही पक्षाचे असो गोरगरिबांना कधीही न्याय मिळणार नाही.अशी ब्राम्हणी प्रशासकीय व्यवस्था मोक्याच्या ठिकाणी बसलेली आहे. म्हणूनच संघटित असंघटित कामगार भरडल्या जातात?.
शेतकरी हा शेतकरीच असतो त्याला जात,धर्म,प्रांत राज्य नसते.पण अलीकडे शेतकरी हा जात,धर्माच्या आणि पक्षाच्या चौकटीत अटकलेला दिसतो.मग त्यामुळेच त्याच्या आंदोलनला जात,धर्म आणि पक्षाचे लेबर लागते.दिल्लीच्या सीमेवर शेतकरी जवळपास एक वर्षे आंदोलन करीत होते, त्यांची संविधानाच्या चौकटीत नोंद घेतल्या गेली नाही. मनुवादी विचारांच्या केंद्र सरकारने आणि त्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेने त्यांना देशद्रोही,अतिरेकी ठरविले.त्यांना भारतीय संविधानिक सर्वोच्य न्याय व्यवस्था म्हणजेच न्यायालयाने न्याय देण्यास असमर्थता दाखविली. म्हणजेच न्यायव्यवस्था अपंग होऊन हॉस्पिटल मध्ये विकलांग व्यवस्थेत खाटीवर पडली होती.आणि आज ही आहे. ती भारतीय संविधानाच्या चौकटीत न्याय देत नाही तर मनुवादी वर्ण व्यवस्थेनुसार न्याय देतांना दिसत आहे.म्हणूनच काही ठिकाणी शेतकरी (निवडणुकीत) शेतकरयांचा आसूड हातात घेऊन उभा राहतांना दिसत आहे.
बहुजन हिताय बहुजन सुखाय ब्रीदवाक्य असलेले एस टी महामंडळ. एसटी कर्मचारी पाच महिन्या पासून आंदोलन करीत आहेत त्यांना न्याय का मिळाला नाही?.कम्युनिस्ट मार्क्सवादी,समाजवादी,गांधीवादी,गोळवलकरवादी विचारांच्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय ट्रेंड युनियनच्या या बाबत ठोस भूमिका का नाहीत.कारण कामगारांचे नेतृत्व कामगार संघटनांनी ट्रेड युनियन यांनी केले पाहिजे असते.ज्यांचा कामगार चळवळीशी संबध नाही असे लोक कामगारांचे नेतृत्व करणार असतील तर त्यांचे उदिष्ट कामगारांना न्याय मिळवून देणे नसतेच तर खरेदी,विक्री करणे हेच असते.हे कामगारांनी लेक्षात ठेवले पाहिजे.म्हणून राजकारणी लोक कामगारांचे नेतृत्व करायला लागले तर सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी विरोधीपक्ष महत्वाची भूमिका बजावत असते.त्यांचे एकच उदिष्ट असते मी पुन्हा येईल.त्यात संघटित असंघटित कामगार भरडल्या जातात?.
कम्युनिस्ट मार्क्सवादी,समाजवादी,गांधीवादी,गोळवलकरवादी विचारांच्या राष्ट्रीय ट्रेंड युनियन शा कर्मचारी,बालवाडी कर्मचारी,अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्या करिता गेली अनेक वर्षे देशभरात आंदोलन करीत असतात. अजून पर्यंत त्यांना न्याय का मिळाला नाही.यांच्या विचारांच्या पक्षाचे आमदार,खासदार सभागृहात आवाज का उचलत नाही.कारण विषमतावादी विचारांच्या नेतृत्वाला समतावादी विचारांची न्याय व्यवस्था कशी चालेल?.म्हणूनच मनुवादी वर्णव्यवस्था यांना मरू ही देत नाही आणि जगू ही देत नाही.
बहुजन समाजाचे म्हणजेच बहुसंख्य कामगारांचे मुलमुली सरकारी शाळा महाविद्यालयात शिकत होती.जिल्हापरिषद शाळेच्या शिक्षकांना वेगवेगळी कामे लावली शाळेचे अनुदान कमी केले.परिणामी जिल्हापरिषद शाळा बंद करण्याचे नियोजन करण्यात आले.तर दुसरीकडे जात दांडगे,धन दांडगे आमदार,खासदारांना विना अनुदान शाळा महाविद्यालय काढण्यासाठी विशेष जागा,पाणी,लाईट देऊन शिक्षणाचे व्यापारीकरण करुन ठेवले. त्यामुळेच विध्यार्थी त्यांचे पालक आणि शिक्षक हे विना अनुदान दिल्या शिवाय शिक्षण व नोकरी करू शकत नाहीत. त्यामुळेच विना नुदानीत शिक्षक गेली अनेक वर्षे सरकारच्या दारात आंदोलन करीत आहेत.त्यांना न्याय का मिळाला नाही.कारण सरकार हे त्याच संस्था संचालक संस्थापक अध्यक्ष आमदार खासदारांचे आहे.ते काल विरोधी पक्षात होते,आज सत्ताधारी पक्षात आहेत.आज सत्ताधारी असले तरी येत्या पाच वर्षांनी विरोधी पक्षात असतील.त्यांना काहीच फरक पडणार नाही.कम्युनिस्ट मार्क्सवादी,समाजवादी,गांधीवादी,गोळवलकरवादी विचारांच्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय ट्रेंड युनियनच्या या बाबत ठोस भूमिका कधीच का घेत नाहीत.कारण कामगारांचे नेतृत्व कामगार संघटनांनी ट्रेड युनियन यांनी केले पाहिजे, राजकीय नेत्यांनी नाही. म्हणूनच शिक्षक संघटित असंघटित कर्मचारी म्हणून भरडल्या जातात?.
देशभरातील बहुजन समाजाचे कामगार म्हणजेच मागासवर्गीय ओबीसी,एस सी,एस टी,व्ही जे एन टी,आदिवासी,अल्पसंख्याक समाजाचे कामगार गोरगरीब कष्टकरी असंघटीत लोक गेली अनेक वर्षे कम्युनिस्ट मार्क्सवादी,समाजवादी,गांधीवादी,गोळवलकरवादी विचारांच्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय ट्रेंड युनियनच्या आंदोलने करीत आहेत.पण न्याय का मिळत नाही.कामगार,कर्मचारी अधिकारी तसेच विद्यार्थ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. परंतु लवकर न्याय मिळत नाही.असंघटीत कष्टकरी कामगारंना न्याय हक्का व प्रतिष्ठा मिळविण्यासाठी आंदोलन करावेच लागते.कारण मागितल्याने मिळत नाही आणि संघर्षा शिवाय पर्याय नाही. यात तिळमात्र शंका नाही, उतावळेपणाणे आंदोलन करता येत नाही कारण ते हानिकारक असु शकते.
कामगारांनी सकारत्मक विचारांची उर्जा कमी होऊ देऊ नये. परंतु लक्षात घ्या अतिघाई संकटात नेई असे होता कामा नये. असंघटीत कष्टकरी कामगारंना न्याय हक्का व प्रतिष्ठा मिळविण्यासाठी त्यांना त्यांच्या प्रश्नाची जाणीव करून द्यावी लागेल.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल." उठसूट बाबासाहेबाच्या नावाचा जयजयकार करणारेच कम्युनिस्ट मार्क्सवादी,समाजवादी,गांधीवादी,गोळवलकरवादी विचारांच्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय ट्रेंड युनियन मध्ये जास्त संख्येने दिसतात.घरात नगरात जयजयकार करतात आणि कामाच्या ठिकाणी आंबेडकरी विचारांच्या शत्रुना आर्थिकदृष्ट्या वर्गणी,देणगी देऊन मोठे करतात. ही खूप मोठी खेदाची गोष्ट आहे.म्हणूनच संघटित असंघटित कामगार भरडल्या जातात?.देशभरातील बहुजन समाजाचे कामगार म्हणजेच मागासवर्गीय ओबीसी,एस सी,एस टी,व्ही जे एन टी,आदिवासी,अल्पसंख्याक समाजाचे कामगार,कर्मचारी अधिकारी यांनी क्रांतिकारी आंबेडकरी विचारांच्या स्वतंत्र मजदूर युनियन (Independent Labour Union - ILU ) राष्ट्रीय ट्रेड युनियन मध्ये सभासद म्हणून सहभागी होऊन मान्यताप्राप्त झाले पाहिजे. तरच संघटित असंघटित कामगार भरडल्या जाणार नाहीत. करिता सर्व संघटीत असंघटीत कामगार,कर्मचारी अधिकारी यांनी संघटीत व्हावे हीच त्यांच्या कडून अपेक्षा.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

आंबेडकरी विचारधारेच्या ट्रेंड युनियनची बांधणी

 

तिथी नुसार शिवजयंती सन्मान की अपमान?

 (छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२ व्या जयंती निमित्याने विशेष लेख.)

तिथी नुसार शिवजयंती सन्मान की अपमान?  


भारत हा विविध जातीधर्माच्या लोक समूहाचा देश आहे,प्रत्येकाची जात,धर्म,भाषा वेशभूषा वेगवेगळी असली तरी सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि समानन्याय मिळत असतो. ज्यांना भारतीय राज्य घटना "संविधान" मान्य नाही ते वेळोवेळी मनुस्मृती नुसार आचरण करून देशाच्या सार्वभौम धर्मनिरपेक्षतेलाचा आव्हान देण्यासाठी उभे राहतात.यांचे उत्तम उदाहरण म्हणजेच तिथी नुसार शिवजयंती व सत्यनारायण महापूजा आहे.
कायदा सुव्यवस्था बिघडविणे समाजात तेड निर्माण होईल असा कार्यक्रमाचे आयोजन करणे म्हणजे कलम १४२ ते १५२ नुसार गुन्हा केला आहे. पण मुंबईसह महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन या घटना कडे संपूर्ण दुर्लक्ष करीत असते.ती धर्मनिरपेक्ष,निःपक्षपाती निर्भीड पणे कायद्याची अंमलबजावणी करीत नाही हे यावरून सिद्ध होत आहे.शिवजयंती साजरी करणारी मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोणता आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिथी नुसार जयंती साजरी करते?.म्हणूनच तिथी नुसार शिवजयंती सन्मान की अपमान?.हे मराठी माणसाना व एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या मराठ्यांना कळत कसे नाही.
 शिवाजी महाराजाच्या नांवाचा व्यापार करून काही संघटना राज्यात सत्ताधारी झाल्या पण त्यांनी शिवाजी महाराजांचा खरा आदर्श कधीच घेतला नाही,केवळ नांवा पुरती प्रतिमा आणि मूर्तीचा वापर केला.शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चरित्रावर शिंतोडे उडवण्याचे काम ज्यांनी केले त्यांच्या समर्थनात आपली शक्ती खर्च केली. त्याचं पद्धतीने शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा वाद बुद्धिजीवी विचारवंत्यांच्या समितीने सोडविल्यावर ही त्यांनी आपली भूमिका सोडली नाही. त्यामुळे राज्यात शिवरायांचे मावळे कमी आणि कावळे जास्त झाले.म्हणून त्यानी जयंती बाबत ही समाजात गैरसमज कसे निर्माण होतील यांची जास्त काळजी त्यांनी घेतली. शाळा,कॉलेजच्या विद्यार्थीदसे पासूनच त्यांना अभ्यासक्रमात एक आणि बाहेरच्या जगात एक शिवाजी महाराज दिसतात,त्यांना कोणता शिवाजी अभिप्रेत आहे हे दरवर्षी ते कायद्याला आव्हान देऊन दाखवून देतात.
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी १८६९ साली रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढली व शिवरायांच्या जीवनावर जगातील पहिला आणि प्रदिर्घ असा खरा पोवाडा लिहिला. शिवरायांचे जगविख्यात कार्य घराघरात पोहचावे यासाठी जोतीराव फुले यांनी १८७० साली शिवजयंती सुरु केली. शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. तेंव्हा पासून शिवजयंती मोठया धुमधडाक्यात सुरु झाली. याप्रसंगी टिळक १२-१३ वर्षाचे ‘बाळ' होते. शिवजयंतीचा वाढता लोकोत्सव पेशवाईच्या समर्थकांना खुपत होता. कारण पेशव्यांनी शिवशक बंद करुन मुस्लिमांचा फसली शक सुरु केला होता.म्हणून ही तिथी नुसार शिवजयंती साजरी होते. हा सन्मान आहे की अपमान?.हे मराठी माणसाना व स्वताला शिवसैनिक मनसे सैनिक समजणारयांना कळत नाही.

शिवरायांचा रायगड उध्वस्त करुन दप्तरखाना जाळला होता. त्याला पेशवाईचे समर्थन होते.म्हणुन ब्राह्मणांचे जेष्ठपुढारी बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंती बंद पाडण्यासाठी गणेशोत्सव सुरु करुन शिवभक्तात शिवजयंती बाबत संभ्रम निर्माण केला.आणि करणारे टिळक हे आद्य ब्राह्मण होते.पुढे ब्राह्मणांनी शिवजयंती निश्चित होऊ नये यासाठी ‘वाद' कायम ठेवला. कारण शिवजयंतीच्या निमित्ताने प्रजा एकत्र येईल. ख-या शिवचरीत्रातून हक्क-अधिकाराची मागणी करणारे शिवभक्त मावळे निर्माण होतील, हे रोखण्यासाठी ब्राह्मणांनी शिवजयंतीचा वाद चालू ठेवला.हा वाद संपावा यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६६-६७ साली 1) वा.सी.बेंद्रे, 2) न.र.फाटक 3) ग.ह.खरे, 4) द.वा. पोतदार, 5) डॉ.आप्पासाहेब पवार, 6) ब.म.पुरंदरे यांची एक समिती स्थापन केली.वादग्रस्त बाबीं साठी शासन समिती स्थापन करते, उदा.श्रीकृष्ण आयोग, न्या.सावंत आयोग बापट आयोग.सराफ आयोग किती तरी आयोग आहेत.त्याप्रमाणे शिवजयंतीची तारीख निश्चित करण्यासाठी शासनाने शिवचरित्र संशोधकांची समिती स्थापन केली.
इतिहास तज्ञा बुद्धिजीवी विचारवंताला या कामाला २ वर्ष लागतात, तेथे त्यांना ३० ते ३३ वर्षे लावले, म्हणजेच हा वेळकाढूपणा होता कि नाही?.यासमितीने १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख शासनाला सादर केली.१९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख जाहीर झाल्याबरोबर कालनिर्णय कॅलेंडरवाले जयंत साळगांवकर यांनी तिथि प्रमाणे शिवजयंती साजरे करावी असे आव्हान केले. त्यासाठी वर्तमानपत्रात जाहीराती दिल्या.या पाठीमागे जयंत साळगांवकरांचे शिवरायांबाबत प्रेम नसून वाद निर्माण करणे ही भूमिका होती. जयंत साळगांवकरांनी तिथीचा आग्रह धरताच त्यासाठी 1) पुरंदरे, 2) बेडेकर, 3) मेहंदळे यांनी तिथी समर्थनार्थ साळगांवकरांना पत्र दिली.
शासनाच्या समितीत असणारे पुरंदरे तिथीच्या म्हणजेच ब्राह्मणांच्या कळपात घुसले. म्हणजे पुरंदरे हे शिवाजी प्रेमी नसून जयंत साळगांवकर इतर ब्राह्मणप्रेमी व विघ्नसंतोषी टिळक प्रेमी आहेत हे सिद्ध झाले.
1) जयंत साळगांवकर, 2) पुरंदरे, 3) बेडेकर आदि ब्राह्मणांनी शिवजयंती तिथीप्रमाणे व्हावी हा आग्रह धरून आपला ब्राम्हणी कावा दाखविला,त्याला बाळ कडू आणि बाळकडू पिलेले कावळे जोमाने कामाला लागले,शासन प्रशासनाने दिलेले निर्णय आम्ही मानत नाही हे दाखवून दिले,खरे तर लोकशाहीच्या चौकटीत यांच्या वर राष्टपुरुषाचा अवमान केला म्हणुन देशदोहाचा गुन्हा दाखल होऊ शकला असता,पण राज्यकर्ते मनुवादी हिंदुत्व मानणारे असल्या मुळे कोणीच कोणावर कारवाई केली नाही,
शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद कोणत्याही राजकीय पक्षाने निर्माण केलेला नसून पुरुरंदरे, बेडेेकर आणि जंयत साळगांवकर यांनी निर्माण केलेला आहे.पण हा वाद सर्वत्र व्हावा यासाठी ब्राह्मणांनी याला राजकीय स्वरुप दिले.अनेक राज्यकर्तांना माहित नाही की हा वाद ब्राह्मणांनी निर्माण केलेला आहे.यासाठी ब्राह्मणांनी नेहमीप्रमाणे धर्म-संस्कृतीचे हत्यार पुढे केले.ब्राह्मणांनी शिवजयंतीच्या तारखेला विरोध तर तिथीचा आग्रह धरला. या मागील षडयंत्र काय? तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाली तर वाद संपून देशात व जगात शिवजयंती होईल, कारण देशातील ग्रामपंचायत, शाळा, कॉलेजेस् पासून न्यायालय, संसद इ.सर्व कारभार तारखेप्रमाणे चालतात. तारीख वर्षातून एकदाच आणि एकाच महिन्यात येते. त्यामुळे वाद संपतो. सरकारी बँका, कार्यालये,शाळा, महाविद्यालयात शिवचरित्रावर भाषणे होतात. त्यामुळे शिवरायांचे खरे शिवचरित्र जनतेला समजते. खरे शिवचरित्र समजले तर बहुजनसमाज ब्राह्मणाला माफ करणार नाही, ही भीती ब्राह्मणांना होती. म्हणून ब्राह्मण शिवचरित्रात, जयंतीत वाद निर्माण करतात. म्हणजे प्रतिक्रिया देण्यातच बहुजन समाजाची शक्ती खर्च व्हावी हा ब्राह्मणांचा ब्राम्हणी कावा आहे.
इंग्रजी कॅलेंडर म्हणून तारखेला विरोध करणारे ब्राह्मण मात्र स्वत: इंग्रजी शिकतात. इंग्रजी संगणक, मोबाईल वापरतात. जयंत साळगांवकर कॅलेंडर जानेवारी ऐवजी चैत्र (एप्रिल) महिन्यात का बाजारात आणीत नाहीत? कॅलेंडरमध्ये तारखेचे आकडे मोठे व तिथीचे लहान का टाकतात? ब्राह्मणांना आज इंग्रजी आणि पूर्वी इंग्रजांशिवाय करमत नव्हते ते आज शिवजयंतीच्या तारखेला विरोध करतात. ब्राह्मण शिवजयंतीसाठी तिथीचा आग्रह का धरतात? तिथीप्रमाणे देशातील कोणताही कारभार चालत नाही. आपले गांव, शाळा, देश तिथीप्रमाणे नाही तर तारखेप्रमाणे चालतो. मग तिथी प्रमाणे वाद कायम का राहत?. कारण तिथी कधी मार्चमध्ये तर कधी एप्रिल-मे मध्ये येते. तिथीप्रमाणे ग्रामपंचायत किंवा प्राथमिक शाळा देखील चालत नाही.शिवाजीराजे जर,राष्ट्रपुरुष, युगपुरुष आहेत.तर तिथीत अडकविण्या इतके राजे लहान का करता?. शिवरायांना लहानपण देऊन राजे कायम वादात रहावेत यासाठी जयंत साळगांवकर यांनी तारीख-तिथीचा वाद निर्माण केला.कारण तिथी आली की पंचांग आले, पंचांग आले की भटजी आला. भटजीची रोजगार हमी आली व ती चालावी या करीतच हा वाद आहे, तारीख तिथीचा वाद लावून ब्राह्मणांनी शिवभक्तात दोन गट पाडले तारखेचे आणि तिथीचे शिवभक्त असा संघर्ष ब्राह्मणांनी निर्माण केला.त्यामुळे कावळे आणि मावळे संघर्ष अटळ आहे.  त्यात हे मराठी माणस व एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या मराठे अपोआप पुढाकर घेऊन वाद पेटवितात.हेच ब्राम्हणांना चांगले कळते.
शिवरायांची दोन वेळा जयंती करुन ब्राह्मणांनी एका महान राजाची टिंगल लावलेली आहे. ब्राह्मण कधी गुरुनानक, महावीर,बुद्ध,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी तिथीचा आग्रह धरतात का?.कारण तो समाज जागा असल्यामुळे ब्राह्मण हे धाडस करत नाहीत.मग शिवरायांचे मावळे कोण?.शिवचरित्रावर विचार करण्याऐवजी जयंतीचा वाद कार्यकर्ते करत होते.यामागे बहुजनांचे अज्ञान तर ब्राह्मणांचा क्रूरपणा होता व आज ही आहे. म्हणूनच बाळकडू पिलेले जेजे कावळे आहेत ते शिवजयंती निमित्ताने सत्यनारायण महापूजा ठेवतात.ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन सन्मान करण्यासाठी नव्हे तर मनुस्मृती नुसार शूद्र राजाने शौर्य दाखवुन स्वराज निर्माण करून बहुजन समाजाला न्याय हक्क अधिकार मिळवून दिला यांचा बदला म्हणून अवतारी पुरुष बनविले.छत्रपती शिवाजी महाराजांना देवीचा आशीर्वाद होता त्यामुळेच त्यांनी लढाया जिंकल्या असा भ्रम निर्माण केल्या जातो.त्याकरिता सत्यनारायण महापूजा घातली जाते. पण हे करतांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी कोणत्या गड किल्ल्यावर सत्यनारायण महापूजा घातल्याचा इतिहास आहे काय?. मग तिथी नुसार शिवजयंती साजरी करणारी ही मंडळी महाराजांचा सन्मान करीत नसुन घोर अपमान करीत आहेत. हे मराठी माणसाना व एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या मराठ्यांना कळत कसे नाही.हा इतिहास माहिती असणारे एक मराठा लाख मराठा म्हणणारे कुठे झोपेत त्यांना हा अपमान दिसत नाही काय?.भारत सरकार व राज्य सरकार हे भारतीय राज्य घटने नुसार म्हणजेच संविधानानुसार चालविल्या जाते.आज राज्यात सत्ताधारी पक्ष शिवसेना आहे.आणि शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री आहेत.त्यामुळेच शिव जयंती कशी साजरी झाली पाहिजे.शासनाने शिवचरित्र संशोधकांची समिती स्थापन केली होती.तिच्या निर्णयानुसार कि मनुस्मृती नुसार?. हे मराठी माणसाना व एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या मराठ्यांना कळले पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२ व्या जयंती निमित्याने सर्व रयतेला हार्दिक शुभेच्छा.

सागर रामभाऊ तायडे, भांडुप मुंबई, 9920403859,

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

बाबासाहेबांचा ३१ जानेवारी १९२० चा मूकनायक १०२ वर्षाचा झाला.

 बाबासाहेबांचा ३१ जानेवारी १९२० चा मूकनायक ०२ वर्षाचा झाला.


इतिहास वाचला तर इतिहास घडविता येतो असे सांगणारा सर्वात जास्त जागृत समाज आज स्वताच इतिहासाच्या आठवणी आचरणाने मोडून काढत आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तूटलेल्या पक्षाप्रमाणे होते." हे वाक्य वापरून ज्यांनी ज्यांनी पत्रकारिता केली त्यांनी स्वताचे दुकान मांडून धंदा केला. त्यांचे क्रांतिकारी विचारांची चळवळ उभी करणे हे उदिष्ट कधीच नव्हते. तर स्वताच खूप मोठे थोर विचारवंत आहोत,ते सिद्ध करण्याचा कला कौशल दाखवण्याचा धंदा होता. म्हणूनच त्यांनी चळवळीतील नेत्यांना इतरांना कमी लेखले. त्यामुळेच बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मध्यम मार्ग त्यांनी स्वीकारत नाही.मग सर्वच विश्वरत्न सम्राट, बहुजन लोकनायक, जनतेचे महानायक बनण्याचे स्वप्न पाहता पाहता क्रांतिकारी विचारांच्या चळवळी पासून वेगळे पडले.यांच्या जन्मा पासून शेवट पर्यंत मी बिनपगारी फुल पत्र लेखक,पत्रकार ते स्तंभ लेखक म्हणून राज्यात परिचित झालो त्याकरिता मी त्यांचे जाहीर आभार मानतो. असे असले तरी माझी असंघटीत कामगार नेता म्हणून ओळख कायम आहे. असंघटित कष्टकरी नाका कामगार,घर कामगारांच्या न्याय हक्क व प्रतिष्ठेसाठी मी स्वता मासिक,पाक्षिक साप्ताहिक संपादित करून प्रकाशित केले आहेत.ते माहिती करिता सोबत दिले आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक या पाक्षिकाने अस्पृश्य वर्गात जागृती निर्माण केली व त्यांना आपल्या अधिकारांची जाणिव निर्माण करून दिली. मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर बिरुदावली म्हणून संत तुकाराम महाराजाच्या खालील ओव्या छापल्या जात असतं.

काय करुन आता धरुनिया भीड | नि:शक हे तोड वाजविले ||१|| 

नव्हे जगी कोण मुकियाचा जाण |सार्थक लाजोनी नव्हे हित ||२||

पहिल्या अंकाच्या संपादकीयामध्ये खालील जन्मप्रतिज्ञा अशी व्यक्त केली होती.

आमच्या या बहिष्कृत लोकांत होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या इतर वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हिताची त्यांना पर्वा नसते इतकेच नव्हे तर, केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा इशारा एवढाच की, कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चटका इतर जातीत बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीतून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार यात बिलकूल शंका नाही. म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करुन आपले हित करावयाचे पढतमूर्खाचे लक्षण शिकू नये.

मूकनायकाच्या पहिल्या अंकातील हा ही मजकूर पुढीलप्रमाणे होता. "हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजला होय. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, या मनोऱ्याला शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची प्रज्ञा नाही." असा हा हिंदू आणि त्याचा धर्म आहे.

मूकनायक हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईतून प्रसिद्ध होत असे.पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या महार जातीच्या शिक्षित तरुणाने या पाक्षिकाचे संपादक केले. कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते. त्यामुळे त्यांना उघडपणे संपादकपदावर कार्य करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी मूकनायकाच्या व्यवस्थापकपदी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नेमणूक केली होती. पहिल्या अंकातील 'मनोगत' नावाचा अग्रलेख डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहिला होता. पुढील तेरा अंकातही त्यांनी लेख लिहिले. मूकनायकासाठी कोल्हापूरच्या छत्रपती राजर्षी शाहूमहाराज यांनी त्याकाळी २,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली होती. ज्या समाजाच्या समस्या वेदना बाबासाहेब मांडत होते.तो समाज आजच्या सारखा सुशिक्षित नव्हता तर मोठ्या प्रमाणत अक्षर ओळख नसलेला होता.आजच्या अशिक्षित माणसांना अक्षर ओळख आहे.तेव्हा ही हा समाज असंघटीत कष्टकरी कामगार,मजूर,शेतमजूर होता.आज इमारत बांधकाम कामगार,नाका कामगार,घरकामगार,वाहन चालक,सुरक्षा रक्षक,फेरीवाला,अनेक धंद्यातील कुशल कारागीर आहे.

मुकनायक या पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित,गरीब व शोषित लोकांच्या व्यथा त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हा होता. त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालिन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी अस्पृश्यांनी राजकिय सत्ता व शैक्षणिक ज्ञान मिळवणे गरजेचे आहे, असे त्यांना नेहमी वाटत असे. ५ जुलै १९२० रोजी आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. त्यानंतर ३१ जुलै १९२० पासून मूकनायकाचे संपादक पद ज्ञानेश्वर ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे होते.सध्या मूकनायकाचे १९ अंक उपलब्ध आहेत. त्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेले वैचारिक लेख आज ही प्रेरणादायी आहेत. मूकनायक या पत्राने सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी बलवत्तर स्थान निर्माण केले पाहिजे ही जाणीव निर्माण केली होती.   'मूकनायक' पत्रात विविध विचार,वर्तमानसार,निवडक पत्रातील उतारे, क्षेम,समाचार, कुशल प्रश्न, शेला पागोटे ही सदरे होती. 'मूकनायक' एप्रिल १९२३ मधे बंद पडले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक ३ एप्रिल १९२७ ला सुरु केले होते.ते स्वतः या पाक्षिकाचे संपादक होते. दुसऱ्या‍ अंकापासून ‘बहिष्कृत भारता’ वर बिरूदावली म्हणून ज्ञानेश्वर महाराजाच्या पुढील ओव्या उद्धृत केलेल्या होत्या.

आता कोंडद घेऊनि हाती। आरूढ पांइये रथी। देई अलिंगन वीरवृत्ती। समाधाने। जगी कीर्ती रुढवी। स्वधर्माचा मानु वाढवी। इया भारापासोनि सोडवी। मेदिनी हे। आता पार्थ निःशंकु होई। या संग्रमा चित्त देई। एथ हे वाचूनी काही। बोलो नये। आता केवळ संग्राम।संग्रामाशिवाय दुसरे काहीही नाही।  

डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशी युद्धप्रेरणा अस्पृश्यांत चेतवीत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र राज्य होते आणि मराठी ही मातृभाषा लोकभाषा होती. सर्वांना माहिती आहे की, बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड पंडित विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील अस्पृश जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समजू शकत होती. मात्र त्याच वेळी महात्मा गांधी आपले एक वृत्तपत्र "हरिजन" इंग्रजी भाषेत प्रकाशित करत होते. मात्र त्यावेळी अस्पृश जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती.

डॉ.बाबासाहेबांनी जनता हे पाक्षिक सुद्धा सुरू केले होते. या वृत्तपत्राचा पहिला अंक २४ नोव्हेंबर १९३० रोजी प्रकाशित झाला होता.त्यांचे संपादक देवराव विष्णू नाईक होते. त्यानंतर गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे हे पाक्षिक जनताचे संपादक झाले. पाक्षिक जनताचे पुढे ३१ ऑक्टोबर १९३० ला जनता साप्ताहिक झाले. साप्ताहिक जनता वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून ‘गुलामाला तु गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करून उठेल’ हे वाक्य होते. या वृत्तपत्रातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व निकडीचे प्रश्न चर्चिलेत तसेच जनतेतून विशेष म्हणजे त्यांनी विलायतेहून पाठवलेली पत्रे प्रकाशित झाली होती.१९५५ पर्यंत साप्ताहिक जनता सरू होते. या वृत्तपत्राचे संपादक वेळोवेळी बदलले. कारण त्यात अनियमितपणा निर्माण झाला होता. परंतु तरीही ते खूप दिवस टिकले. ४ फेब्रुवारी १९५६ रोजी साप्ताहिक जनताचे नामकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आले होते.१४ ऑक्टोबर,१९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.  बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हे पाक्षिक बंद पडले. 




११ एप्रिल २०१७ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधीत बाबासाहेबांचे नातू प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत हे पाक्षिक नव्या स्वरूपात पुन्हा प्रकाशित करण्याचे जाहिर केले व १० मे २०१७ रोजी याचा पहिला अंक प्रकाशित झाला.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीय अस्पृश समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी अनेक वृत्तपत्रे व पाक्षिकांचे प्रकाशन आणि संपादन केले होते. त्यांना या वृत्तपत्र-पाक्षिकांनी बहुजन चळवळीला पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. खरे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच बहुजन समाजाच्या पत्रकारितेचे आधार स्तंभ आहेत.हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक संघटना,पक्षाने स्वताचे मुखपत्र प्रकशित करणे आवश्यक असते. असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तूटलेल्या पक्षाप्रमाणे होते." आज आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र नाही तर प्रत्येक संघटना, पक्षाचे मुखपत्र आहे.सर्वांची विचारधारा एक असली तरी प्रत्येकाचे धेय्य उदिष्ट वेगवेगळे आहेत.त्यामुळेच हजारो पत्रकार,संपादक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांतिकारी विचारधारा स्वीकारून एकत्र येऊन चळवळीला योग्य दिशा दाखवू शकत नाही.यांची खंत वाटते.बाबासाहेबांचा ३१ जानेवारी १९२० चा मूकनायक १०२ वर्षाचा झाला तो आज ही प्रेरणादायी ठरावा असा आहे.इतिहास वाचला तर इतिहास घडविता येतो असे सांगणारा सर्वात जास्त जागृत समाज आज स्वताच इतिहासाच्या आठवणी आचरणाने मोडून काढतात असे लिहावे लागते. 

सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.

भिमसैनिक असते तर प्रबुद्ध भारत दैनिक असते.