मंगळवार, १ जुलै, २०२५

 शिवबाने "स्वराज्य" निर्माण करावे ही जिजाऊ ची इच्छा होती.



छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना घडविण्यात राष्ट्रमाता जिजाऊ सारखी दुरदुष्टी आजच्या सर्व मातानी ठेवली तर आमच्या ही घराघरात छत्रपती शिवाजी महाराजा सारखे शूरवीर निर्माण होतील.राष्ट्रमाता जिजाऊ हि इतिहास घडविणारी एक महान स्त्री झाली होती.स्वराज्य निर्माण करण्यासाठी गोरगरिब,शेतकऱ्यावर विविध जाती धर्माच्या मराठी मावळ्यांवर दया दाखविणारी कारूण्यमूर्ती होती.त्यामुळेच शिवाजी महाराजाच्या कृतीतून कार्य सिद्धीस नेण्यासाठी लागणारी प्रेरणा मूर्ती जिजामाता होती. हे जरी शंभर टक्के सत्य असले. तरी मराठयाच्या मनावर जिजामाते पेक्षा भवानीमातेचे वर्चस्व आज ही कायम राहत असेल तर राष्ट्रमाता जिजाऊ कशा निर्माण होतील?. शिवबाने "स्वराज्य" निर्माण करावे ही जिजाऊ ची इच्छा होती.म्हणजे एका स्त्रीची इच्छा होती.परंतु गेले अनेक शतक आम्ही राज्याच्या आणि केंद्राच्या अभ्यास क्रमातील इतिहासाच्या धड्यातून "स्वराज्य" निर्माण करणे हि "श्री" ची इच्छा आहे.हे विद्यार्थी दक्षे पासुन बिंबविले जाते.त्यामुळे जिजामाते पेक्षा भवानी मातेचे भक्त होणेच मराठा समाजातील महिलांनी जास्त पसंत केले आहे.

राष्ट्रमाता जिजाऊ चा १७ जून १६७४ रोजी निर्वाण झाले होते. थोडक्यात,निर्वाण म्हणजे:दुःखातून मुक्ती:निर्वाण म्हणजे सर्व प्रकारच्या दुःखातून (शारीरिक,मानसिक, भावनिक) पूर्णपणे मुक्त होण्याची अवस्था.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन अवघे अकरा दिवस झाले होते. तेव्हा त्यांनी रायगड किल्ल्याच्या पाचाड गावात आपले जीवन पूर्ण केले होते. मराठा सेवा संघाच्या प्रबोधनाने मराठा समाजात मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे.तरी शेगांव,शिर्डी आणि पंढरपूरच्या पायी पदयात्रा निश्चित बंद झाल्या नाहीत.त्यामुळे मराठाच नव्हे तर लाखो बहुजन समाजाचे करोडो रुपयाचा होणारा खर्च वाचेल.आणि आपल्या मुलामुलींना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ समजून घेता येतील.

   भारतात मुलांना घडविताना त्यांना रामायण महाभारतातील कथा सांगून त्याच्यावर संस्कार केले जातात.त्यांना शाळा कॉलेज मधून हे शिकविल्या वर कोण कसा छत्रपती शिवाजी राजा निर्माण होईल?. स्वराज्याचे राजे असलेले मराठे आज सर्वच मनुवादी विचारधारा असलेल्या पक्षाचे गुलाम झाले आहेत.राज्यातील २८८ आमदारात १४५ मराठा समाजाचे आमदार आहेत.हे लिहतांना मला लाज वाटते त्यांना मराठा म्हणण्याची.म्हणुन त्यांना गुलामच म्हटले पाहिजे.हे बेशरम पणे मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाले होते. बहुजन क्रांती मोर्चा मुळे खरेच मराठा समाजात खूप मोठे प्रबोधन झाले ते इतिहास वाचायला लागले. आरक्षण मागायला लागले आणि शिवसेनेच्या बॅनर, पोस्टर वरून छत्रपती शिवाजी महाराज गायब झाले.का कसे माहिती नाही.मग मराठा सरदार,शिवसैनिकांवर कोणते संस्कार झाले?.

    रामायणातील संस्कार कोणाला हि शूरवीर बनण्याची प्रेरणा देत नाही.तर दुसऱ्या करीता कसे मरावे त्याची प्रेरणा रामायणात मिळते.तर महाभारताचे संस्कार अधर्माने कसे मारावे याचे अनेक उदाहरण देऊन त्याचे प्रशिक्षण दिले जाते.असे संस्कार शिवाजी महाराज यांच्यावर झाले असते तर त्यांनी मावळ्याची फौज उभी करून परकीय शत्रू आणि घरभेद्याशी लढाई केली नसती.शत्रू सर्व शक्तीने बलाढ्य आहे.हे माहित असूनही शिवाजी महाराज कधीच हिंमत हारले नाहीत.ती हिंमत लहानपणा पासून त्यांच्यात निर्माण करणारी माता जिजाऊ त्याच्या मागे सदैव उभी होती.आज कालच्या माता मुलामुलीच्या मनात हिंमत निर्माण करण्या ऐवजी प्रचंड भिती निर्माण करतात.त्याच्या पासून सावध राहण्याची सतत त्याची कान उघडनी करतात. "जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी" अशी म्हण खूप प्रसिद्ध आहे. जी माता स्वताच्या कुटुंबाची काळजी घेण्यास आपल्या मुलावर संस्कार करते.ती त्याला जगाची उगाच उठाठेव करू नको अशी सतत तंबी देते.ती जगा बाबत विचार करूच शकत नाही.त्यात एखादीच जिजामाता,सावित्रीमाता,रमाईमाता, अहिल्याबाई, ताराबाई तयार होतात. जगात आदर्श निर्माण करतात.इथे शालिनीताई, प्रतिभाताई,प्रभाताई, शोभाताई,मीनाताई,निलमताई निर्माण झाल्या.त्यांना शिवाजी जिजाऊ कधीच आदर्श नव्हता.त्या गुलामांच्या गुलाम होत्या.त्यांच्या कडून राज्याच्या रयतेने कधीच अपेक्षा ठेवल्या नाहीत.

   परकीय गुलामगिरीचे साम्राज्य पसरले असताना.जवळपास पंधराशे वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर राष्ट्रमाता जिजामातेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने बहुजन समाजाच्या प्रेरणांना,अस्मितेला जन्म दिला आज आम्ही जरी बहुजन समाज हा शब्द वापरत असलो तरी त्यावेळी दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या सर्व जाती जमाती आदिवासीना जिजामाता व शिवबांनी मावळे म्हणून गोळा केले होते.तेव्हा या सर्व बहुजनांना ज्ञानबंदी,वर्णबंदी,जातबंदी,रोटीबंदी,बेटीबंदी,शस्रबंदी,समुद्रबंदी होती. या सर्व बंदया प्रथम जिजामाताने आपल्या बाळ शिवाजीला तोडण्यास लावुन मावळ्याची मुंग्यांसारखी फौज निर्माण केली. मुंग्या कितीही छोट्या असल्या तरी त्या एकत्र एखाद्या किड्यावर तुटून पडल्यावर त्याला जिवंत मारतात.व सर्व एकत्र येऊन त्याला वाहुन नेतात.या मुंग्यांच्या एकजुटीतुन शिवाजी महाराजांनी प्रेरणा घेतली.आणि सर्व जातीधर्माच्या चौकटीत बंदिस्त असलेल्या कष्टकरी गोरगरीब पण शरीराने आडदांड असलेल्या तरुणाना मावळे म्हणून गोळा केले.सम्राट अशोकाच्या नंतर हजारो वर्षाची गुलामगिरीची व्यवस्था झुगारून छत्रपतीच्या गादीचा वारसा निर्माण केला.चंदगुप्त मौर्या,सम्राट अशोकाचा वारसा आणि रयतेच्या विचाराचे स्वराज्य निर्माण करून त्याची रीतसर स्थापना केली. जिजामातेमुळे केवळ एका मातेचा किंवा मातृत्वाचा गौरव झाला नाही.तर त्यापेक्षा आमच्या मातृसत्ताक संस्कृतीचा गौरव झाला.यांचे भान आजच्या आरक्षण मांगणाऱ्या मराठा क्रांतीची भाषा करणाऱ्यांना नाही. ५७ मोर्चे काढणारा एक मराठा लाख मराठा समाजाच्या १४५ आमदारांनी मराठा आरक्षणा करीता राजीनामा देऊन निवडणूक घेण्यासाठी राज्यपाला समोर प्रस्ताव दाखल केला असता तर राज्याचे संपूर्ण मंत्रीमंडळ मराठा समाजाचे असते. १४५ आमदार वेगवेगळ्या पक्षाचे असल्यामुळे ते सभागृहात तोंड उघडू शकत नाही.भारतीय संविधान निर्माते त्यांची ती एकजातीय दादागिरी जाणुन होते म्हणुन त्यांनी तशी तरतुद लिहून ठेवली.म्हणुन ते मोर्चात सहभागी झाले होते.छत्रपती शिवाजी महाराजाचा वारसा सांगणारे पक्ष,संस्था,संघटना जिजामाताची जयंतीदिन,स्मृतीदिन साजरा करताना दिसत नाही.पण ममता दिन मात्र मोठ्या उत्सवात गटागटाने प्रमुख गल्लीबोळात साजरा करताना दिसतात. 

   ममता,समता,करुणा यांचा थांगपत्ता नसलेल्या माताचा नऊ दिवस कडक उपवास आणि नऊ दिवस नऊ रंगाची उधळण केली जाते. ज्यांच्या आईवडीलाचा पत्ता नाही, कुठे जन्मले?.गांव,तालुखा,जिल्हा,राज्य कोणते तेच कधी कळले नाही अशा मातांना प्रिंट मीडिया,चॅनल मीडिया रात्रंदिवस दाखविते, मात्र जिजामाता,सावित्रीमाईचे जन्मा पासून मृत्यू प्रयन्त सर्व इतिहास माहित असूनही त्याबाबत लिहल्या आणि दाखविल्या जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजाना आद्यदैवत मानणारे जेव्हा त्याच्या मातोश्रीचे चरित्र हरण करून विटंबना केल्या गेली. तेव्हा एकदाही रस्त्यावर उतरून खळ्ळयाय खःटाक आवाज केला नाही.अन एका धातूच्या पुतळ्याला माती लागताच उभा महाराष्ट्र पेटविला होता. यालाच आईचे व दाई प्रेम म्हणतात.छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊचे चरित्र हरण करणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण देऊन गौरवल्या जाते. राज्यातील मराठ्यांना हे दिसते तरी पण स्वार्था करीता हे त्यांचे गुलामी स्विकारतात. छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊच्या चरित्रावर लिहणाऱ्यानां पिता समान मानुन मनसे सेवा करणारी ही औलाद मराठा समाजातील तरुण तरुणीला कशी दिसली नाही. त्यांच्या एका इशाऱ्यावर महाराष्ट्रात तोडफोड करून धुमाकुळ घालणारी ही पोर कोणत्या मातेची आहेत?. त्यांना राष्ट्रमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराजाची आई संस्कार मूर्तीची आठवण होत नाही.मग कशा राष्ट्रमाता जिजाऊ निर्माण होतील?. अशा जातीशी बेईमानी करून परकीयांची गुलामगिरी करणाऱ्या मराठी बहुजन समाजाचे अज्ञान कधी दूर होणार?.त्याने स्वजातीचा इतिहास वाचला पाहिजे,स्वता जागरूक होऊन समाजाला जागृत केले पाहिजे,म्हणुनच शिवबाने "स्वराज्य" निर्माण करावे ही जिजाऊ ची इच्छा होती.हे स्वाभिमानी मराठा बहुजन समाजाच्या घराघरात सांगितल्या गेले पाहिजे. हिच त्यांच्या ३४९ व्या स्मृती दिना निमित्त अपेक्षा. राष्ट्रमाता जिजाऊ त्यांच्या ३४९ व्या स्मृती दिना निमित्त राष्ट्रमाता  जिजाऊच्या क्रांतिकारी विचारांना आणि प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम !!!.

 सागर रामभाऊ तायडे,भांडूप,मुंबई ९९२०४०३८५९.

 बांधकाम क्षेत्रातील असंघटित आणि कायमस्वरूपी काम असलेल्या कंत्राटी कामगारांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.



    भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीने हातात हात घालून देशातील सर्व मानव जातीला आर्थिक संकटात टाकले. कष्टकरी बहुजन,मागासवर्गीय,ओबीसी,आदिवासी आणि अल्पसंख्याक मजूर,शेतमजूर,कामगार असणाऱ्यांना जगण्यासाठी पहिल्या पेक्षा जास्त संघर्ष करावा लागत आहे.कारण मुक्तपणे शोषण करणारी कंत्राटी पद्धत अंमलात आली आहे.त्यामुळे अन्याय,अत्याचारा विरोधात बोलण्याची हिंमत केली की कामावरून काढल्या जाते.न्याय मागणे गुन्हा झाला आहे.आपना सर्वांना माहीत आहे की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला हा महान संदेश आहे. "मांगीतल्याने मिळत नाही,संघर्षा शिवाय पर्याय नाही." शिका,संघटीत व्हा आणी संघर्ष करा.हा क्रम लोकांनी बदलून टाकला प्रथम आपसात संघर्ष करतात. त्यांचा फायदा दुसऱ्या समाजाने घेतला की एक दिवसा करीता संघटित होतात.किंवा एक दोन महिने राज्यभर एका जातीची जनआंदोलन होतात.मग त्यातुन काय शिकतात?. बहुसंख्येने मागासवर्गीय,ओबीसी,आदिवासी,अल्पसंख्याक समाज हा असंघटीत मजूर,कामगार आहे. तो असंघटीत मजूर कामगार म्हणून कुठे एकत्र येतो का?. जातीसाठी एकत्र येऊन लढतो तोच जर कंत्राटी मजूर कामगार म्हणून एकत्र आला तर त्याला हक्काचा रोजगार कायमस्वरूपी मिळू शकतो. त्यासाठी बांधकाम क्षेत्रातील कामगारांना आणि कंत्राटी कामगारांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.
   आरक्षणातील पदोन्नती साठी कामगार कर्मचाऱ्यांचा जो संघर्ष आज सुरू आहे.त्यांनी इतिहास वाचला असता तर ? जगातील ज्या काही क्रांत्या झाल्यात त्यामध्ये कामगारांची अहंम भूमिका होती.कामगार संघटनांनी शासनावर नियमितपणे दबाव ठेवावा,जर शासन ऐकत नसेल तर कामगारांच्या संख्येच्या बळावर सत्ता हस्तगत करावी. ही बाब बाबासाहेबांनी मुबंईच्या मील संपाच्या भाषणात प्राकर्षाने सांगितले होती. पण आम्ही या बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे याचा फायदा अनेक मनूवादी कामगार संघटनांनी उचलला.त्यांनी राष्ट्रीय ट्रेंड युनियन बनविल्या,भांडवलदार आणि सत्ताधारी पक्षाची त्यांनी दलाली सूरू केली.आणि आम्हाला असंघटित कंत्राटी कामगार,मजूर करून जात,धर्म,प्रांतात गुंडाळून ठेवले.त्यामुळेच बांधकाम क्षेत्रात असंघटीत कायमस्वरूपी कामावर कंत्राटी कामगारांच्या दरवर्षी फौजा निर्माण होत आहेत. कामगार कल्याण मंडलात सर्व त्यांचेच प्रतिनिधी (नोंदणीकृत कामगारांच्या सभासद संख्येनुसार) आहेत. त्यामुळे आजही आम्हाला minimum vej (किमान मजूरी) पूरेशी मिळत नाही. जनआंदोलनात आमची भाषा मात्र नेहमी "असा कसा देत नाही?. घेतल्या शिवाय राहत नाही!." अशी असते. त्यामुळे आपल्याला जमिनीवर उभे राहून भान ठेवून बोलले व वागले पाहिजे.राष्ट्रीय संघटन बनविले पाहिजे की नाही?.
        किमान वेतन न दिल्या गेल्यामुळे देवयानी खोब्रागडे यांना परदेशात काय भोगावं लागलं हे या देशातील प्रिंट मीडिया चॅनल मीडिया किती तरी महिने ओरडून सांगत होती. मिनीमम वेजचे इतर देशात काय महत्व आहे हे आपल्या देशातील कोणत्याच कामगारांच्या ट्रेंड युनियन व मीडियाच्या लक्षात आले नाही. त्या बाबत कामगारांना यांची साधी माहिती नाही.त्यांना कामगार,कर्मचारी म्हणून काय अधिकार आहेत यांची माहिती कोणी सांगितली पाहिजे?.जाती साठी संघर्ष करणारे हे सांगत नाही. मार्क्सवादी कम्युनिस्ट वर्णव्यवस्थेचे समर्थन करणारे फक्त वर्गव्यवस्थेवर बोलतात, जाती शोषणावर बोलत नाही.तरी बहुसंख्येने मागासवर्गीय,ओबीसी,आदिवासी अल्पसंख्याक कंत्राटी मजूर,कामगार त्यांच्याच लाल बावट्या खाली जातात.ते ही त्यांना सांगतात. बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगारांना आणि कायमस्वरूपी काम असलेल्या कंत्राटी कामगारांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.
     स्वतंत्र मजदूर यूनियन (आय एल यु) आदरणीय जे.एस.पाटील यांच्या कुश्ल,त्यागी निष्टावंत अभ्यासू नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर रेल्वे,विद्युत,बँक,खदान,कर्मचारी, शेतकरी,शेतमजूर,व सर्व संघटीत,असंघटीत कंत्राटी कामगारांच्या संघटनेचे प्रतिनिधीत्व करीत आहे.आपल्या मूलभूत हक्काची लढाई राज्य व केंद्रा सरकारच्या विरोधात संघर्ष करीत आहे.८ डिसेंबर २०१७ ला दिल्लीच्या रामलीला मैदानात लाखो आरक्षण लाभार्थी सहकाऱ्यांना सोबत घेऊन विशाल रॅली घेऊन राष्ट्रीय पातळीवर आम्ही आहोत हे केंद्र सरकारला प्रथमच दाखवुन दिले होते.त्यामुळेच केंद्र सरकारने त्यांची योग्य नोंद घेतली व आज त्या संदर्भातील पत्रव्यवहार होत आहे.म्हणजेच  
बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगारांना आणि कायमस्वरूपी काम असलेल्या  कंत्राटी कामगारांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.त्या शिवाय कोणी नोंदच घेणार नाही.
     बाबासाहेबांना मानणाऱ्या सर्व कामगार,कर्मचारी बंधू भगिनींना नम्र आव्हान आहे की "नाव भिमाचं नी काम बापूचं" सोडून द्या. "नावंपण भिमाचचं नी काम पण भिमाचंच" यासाठी स्वतंत्र मजदूर युनियनचे संघटनेचे सदस्य बनून स्वाभिमानाने जगण्यासाठी कामाला लागा. तुमच्या खात्यातील कामगार,कर्मचाऱ्यांना संघटीत करून त्यांची ट्रेंड युनियन रजिस्ट्रेशन करा त्यांचे संस्थापक अध्यक्ष तुम्हीच राहा पण ती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारधारेच्या राष्ट्रीय ट्रेंड युनियन आय एल यु शी संलग्न करा.अन्यता केवळ आरक्षणच नाही,तर भारतीय संविधान नष्ट झाल्या शिवाय राहणार नाही.राजकीय गटबाजी संपविण्यासाठी ट्रेंड युनियनलाच पुढाकार घ्यावा लागेल.राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली, दबावाखाली ट्रेंड युनियन ने काम केल्यामुळे कामगार कर्मचारी उद्धवस्त झालेत.राजकीय पक्ष हा नेहमी भांडवलदारांच्या आर्थिक मदतीने निवडणूका लढत असतो. त्याबदल्यात तो कामगार कर्मचाऱ्याच्या शोषण,अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उचलत नाही,राजकीय नेते कामगार कर्मचाऱ्यांना अपंग बनवुन ठेवतात.आता तर सर्व सरकारी उद्योग क्षेत्रात कायम कामगाराच्या जागी कंत्राटी कामगार भरण्याची अधिकृतरीत्या ठेकेदारी देऊन टाकली.म्हणजेच कोणा कोणाल गुलाम बनवायचे यांची यादी तयार आहे.म्हणूनच संविधानात लिहले आहे.जाती संघटना पेक्षा कामगार संघटना मोठया असतात.हा इतिहास सर्व कामगार कर्मचारी यांनी लक्षात घ्यावा.विशेष सर्वच क्षेत्रातील कंत्राटी कामगारांनी संघटना युनियन बनविल्या शिवाय शोषण थांबणार नाही.आताचे सरकार आर एस एस प्रणित आहे त्यांना या देशाचे संविधान नको आहे,ते नष्ट करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे त्या हिसेबानी ते कामाला लागले. आपले काय?. आंबेडकरी चळवळीतील कोणत्याही पक्ष संघटनेकडे या विरोधातील कृती कार्यक्रम नाही.आता आपण कामगार कर्मचारी गप्प बसलो तर केवळ आरक्षण नाही,तर संविधान लोकशाहीच्या मार्गानेच संपविल्या जाईल.नंतर एक होतं संविधान असे म्हणण्याची पाळी आपल्यावर यायला ऊशीर लागणारं नाही.हीच वेळ आहे निर्णय घेण्याची यांचे उत्तर बाबासाहेबांनी तेव्हा दिले होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १२ व १३ फेब्रुवारी १९३८ साली मनमाड येथे रेल्वे गँगमन कामगारांच्या दोनदिवशीय परिषद मध्ये केले होते. सर्व मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांनी स्वतःच्या ट्रेंड युनियन बनवुन स्वतंत्र मजदूर युनियन शी संलग्न करा.आज आता आरक्षण लाभार्थीची नोकरी धोक्यात आली आहे,नव्हे गेलीच आहे.पुढील पिढीचे भविष्य अंधकारमय झाले आहे. म्हणूनच सर्व आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांनी ट्रेंड युनियन मध्ये काम करणाऱ्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी आता आपली खरी ओळख दाखविण्याची वेळ आली आहे.
   भारतातील बहुसंख्येने कामगार कर्मचारी हा मागासवर्गीय शोषित,पिढीत व आदिवासी अन्यायग्रस्त असल्याने त्यांना ७० वर्षानंतर ही सामाजिक व आर्थिक न्याय मिळू शकला नाही.आताच्या आर एस एस प्रणित भाजपा सरकारने एक हजार कामगार कायदे विना चर्चा रद्द करून टाकले.शेतकरी शेतमजूर,असंघटीत कामगार यांचे प्रश्न तर संघटीत कामगारांच्या प्रश्नापेक्षा विक्राळ स्वरूपात उभे आहेत.त्यावर प्रस्थापित कामगार चळवळी कोणताच वैचारिक संघर्ष करण्यासाठी तयार नाही.त्याचे दुःख मागासवर्गीय कामगार कर्मचाऱ्यांना बिलकुल नाही.भारतात आजमितीला सात टक्के संघटीत कामगारांच्या ५५ हजार युनियन नोंदणीकृत आहेत.तर ९३ टक्के असंघटीत कामगारांच्या राष्ट्रीय युनियन नाहीत.त्यांच्या करीता वैचारीक पातळीच्या तेरा राष्ट्रीय ट्रेंड युनियन कार्यरत आहेत.त्यांची अधिकृत मान्यता ही मागासवर्गीय कामगार कर्मचाऱ्यांच्या मेंबरशिप वर अवलंबून आहे.त्या या प्रमाणे आहेत.१) ऑल इंडिया ट्रेंड युनियन काँग्रेस (AITUC ),२) सेंटर ऑफ इंडियन ट्रेंड युनियन (CITU),३) भारतीय मजदूर संघ (BMS),४)हिंद माजदूर किसान पंचायत (HMKP),५) हिंद मजदूर सभा (HMS),६) इंडियन फेडरेशन ऑफ फ्री ट्रेंड युनियन (IFFTU),७) इंडियन नॅशनल ट्रेंड युनियन काँग्रेस (INTUC),८) नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेंड युनियन (NFITU), ९) नॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (NLO), १०) ट्रेंड युनियन को-ऑडीनेशन सेंटर ( TUCC), ११) युनायटेड ट्रेंड युनियन काँग्रेस (UTUC), १२) युनायटेड ट्रेंड युनियन काँग्रेस-लेनिन (UTUC-L), १३) कॉन्फडेरेशन ऑफ फ्री ट्रेंड युनियन ऑफ इंडिया (CFTUI).यांची राजकीय विचारधारा वेगवेगळी जरी असली तरी त्यांचे सांस्कृतिक संस्कार एकच आहेत. हे आम्ही विसरतो.म्हणूनच आय एल यु ला राष्ट्रीय ट्रेंड युनियन चा दर्जा मिळू शकला नाही.असा कसा देत नाही,घेतल्या शिवाय राहत नाही!. ही भाषा आता बंद करावी,आणि भविष्य उज्वल करण्यासाठी आरक्षण लाभार्थी कर्मचाऱ्यांनी स्वाभिमानी बनावे!.संघटीत कामगार असंघटीत कंत्राटी कामगार बनत आहे.म्हणूनच 
बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगारांना आणि कायमस्वरूपी काम असलेल्या कंत्राटी कामगारांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.
    विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे मी तुम्हाला एवढं सगळं दिलं.मी संविधानात SC,ST,OBC,NT यांना आरक्षण दिलं.पण बांधवांनो तुम्ही मला व चळवळीला काय दिले?. तुम्हाला जर मला काय द्यायचं असेल तर एक काम करा.हे सर्व बहुजन मागासवर्गीय समाजातील कामगार कर्मचारी यांनी एक व्हावे. आणि शासन कर्ती जमात बना!,शासन यंत्रणेवर कायम स्वरूपी दबाव निर्माण कर. म्हणूनच तुम्ही सर्वांनी एकत्र या कारण तुम्ही जर एकत्र आलात तरच तुम्ही पुढील येणाऱ्या संकटांशी सामना करू शकाल. म्हणूनच बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगारांना आणि कायमस्वरूपी काम असलेल्या असंघटीत कंत्राटी मजूर,शेतमजुरांना कामगारांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.म्हणूनच संघटित व्हा!.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.
अध्यक्ष- स्वतंत्र मजदूर युनियन, महाराष्ट्र राज्य,
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती.

 लोकनेते दि बा पाटील आणि प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा अधिकार?



नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्याचे आंदोलन आता ऐन भरात आले आहे.आगरी कोळी कराडी ओबीसी समाजाने लाखोंचा मोर्चा काढूनही सरकारला पाझर फुटत नाही.देशातील सर्वच महापुरुषांच्या बाबतीत भाजप सरकारची भूमिका संदिग्ध स्वरूपाची राहिली आहे.मालवण समुद्र किनारी बांधलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला.यातला भ्रष्टाचार जगासमोर आला.परंतु त्यानंतर भाजपा समर्थक अनेक लोकांची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची अपमानकारक जाहीर वक्तव्ये पहिली? तर या लोकांच्या मनात एक आणि ओठात दुसरेच दिसते.अलीकडे नव्याने उभारलेल्या छत्रपतींच्या पुतळ्या जवळील जमीन खचली आहे.यामध्ये भ्रष्टाचार आहेच, परंतु छत्रपती शिवराय यांच्याबद्दल,यांना आदर का नाही? असा प्रश्न साऱ्या शिवप्रेमी महाराष्ट्राला पडला आहे.
   लोकनेते दि बा पाटील साहेब आपल्या जीप वर छत्रपती शिवरायांचा छोटा पुतळा अभिमाने मिरवीत असत.ती आगरी कोळी ओबीसी सामाजिक हक्कांच्या लढ्याची प्रेरणा होती.आता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या बाबतीत जी शासकीय भूमिका समोर आली.त्यानंतर लोकनेते दि बा पाटील यांच्या बाबतीत सरकारच्या मनात काय असावे?.असा प्रश्न आगरी कोळी कराडी बांधवांच्या मनात येत आहे.लोकसभा विधानसभा निवडणुका संपल्या.सरकारने विमानतळाचे नामकरण लोकनेते दि बा पाटील असे केले नाही.आमचे बरेचसे आमदार आणि मंत्री भाजपात आहेत.त्याचा प्रभाव कमी पडतोय का?
लोकनेते दि बा.पाटील यांनी तरुणांसाठी खूप मोठे ऐतिहासिक कार्य केले आहे.सर्वात प्रथम महाराष्ट्रातील समस्त ओबीसी तरुणांचे ते नेते आहेत."राखीव जागा"हे आरक्षणावरील छोटेखानी पुस्तक त्यांच्या ओबीसी नेते म्हणून दूरदृष्टीचे प्रतीक आहे.वर्तमान आगरी कोळी नेतृत्वाकडे ही आरक्षणाबाबत सकारात्मक दृष्टी दिसतच नाही.हिंदू वैदिक धर्माने आम्हाला मनुस्मृती,चातुवर्ण्यानुसार शिक्षण आणि नोकऱ्या, राजकारण यातील प्रतिनिधित्व नाकारले होते.लोकनेते दि बा.पाटील हे या हिंदू  धार्मिक विषमते विरोधात आमचे राष्ट्रीय नेतृत्व करीत होते.ओबीसी साठी सामाजिक,आर्थिक,राजकीय न्याय देणाऱ्या मंडल आयोगाचे ते खंदे समर्थक नेते होते.त्यानंतर आम्ही असा नेता घडवू शकलो नाही.तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या, राज्य आणि देशपातळीवर यामुळे मिळू लागल्या.ज्यांना लोकनेते दि बा पाटील यांची आरक्षण समर्थनाची भूमिका मान्य झाली नाही.ते वैदिक हिंदुत्वाचे समर्थक झाले.
    ओबीसी तरुणाईच्या उत्कर्षाच्या विरोधात गेले.त्यांचा करावा तेव्हढा निषेध कमीच आहे.आजही आरक्षणाचे जे विरोधक आहेत ते लोकनेते दि बा पाटील यांचे विरोधकच आहेत.जरी जातीने आगरी कोळी कराडी ओबीसी असले तरीही.सिडको जेएनपीटी ओएनजीसी येथे आक्रमक आंदोलने करून "प्रकल्पग्रस्त" शब्दाला छत्रपती शिवरायाच्या तलवारीची धार देणारे खरे शिवप्रेमी दि बा पाटील आहे होते.सिडको कामगार युनियनचे नेते माझे मित्र विनोद पाटील यांनी साऱ्या महाराष्ट्राला सागितले की जी प्रतिष्ठा प्रकल्पग्रस्त शब्दाला नवी मुंबई रायगड मध्ये आहे.ती देशात कुठेही नाही.यामुळेच सरकारी नोकऱ्यांच्यामुळे जीवनात प्रगती साधलेल्या सर्वच सरकारी नोकरी करणाऱ्या आगरी कोळी निवृत्त कर्मचाऱ्यांनी सरकारची भिती न बाळगता आता आंदोलनात उतरले पाहिजे.२०१३ साली लोकनेते दि बा पाटील यांचे निधन झाले.तरूणांसाठी कायद्याने लोकसभेत विधानसभेत आणि रस्त्यावर लढणारा लोकनायक हरवला.याचवेळी साडेबारा टक्के पुनर्वसन कायद्याचे विकसित रूप असलेला नवा भूसंपादन कायदा २०१३ केंद्र सरकारने आणला.सेझ, सिडको,खोत सावकार,चिरनेर जंगल लढ्यात लढणाऱ्या आगरी कोळी कराडी लोकांचा विजय या कायद्यातून दिसतो.असे असताना हा कायदा गुंडाळण्यात सरकार आणि आमच्या आगरी कोळी नेतृत्वाला विकृत यश आले.
   २०१३ या नव्या भूसंपादन कायद्यानुसार एखादा प्रकल्प आला तर त्या प्रकल्पाचा सामाजिक आघात अहवाल जिल्हाधिकारी यांनी तयार करायचा असतो.त्यानुसार प्रकल्पबाधित कुटुंबाला प्रकल्पग्रस्त दाखले आणि सरकारी नोकऱ्या मिळणे हा त्यांचा अधिकार झाला.लोकनेते दि बा पाटील.नसल्याने लोकांसाठी प्रामाणिक असलेले राजकीय नेते ,सिडकोचे दलाल झाले.त्यांनी फायद्याचा असलेले २०१३ भूसंपादन कायद्यातील सरकारी नोकऱ्यांचे अस्तित्व सापविले.हा कायदा नाकारून.आगरी कोळी तरुणाईचा घात झाला.आज साडे बावीस टक्के धोरणात प्रकल्पग्रस्त दाखले सरकारी नोकऱ्या नाहीत.तरीही यासाठी न्यायालयात लढणार नाही.असे लोकांकडून लिहून घेणारे सिडको अधिकारी,आमचे राजकीय नेते डोळे मिटून दूध पिणाऱ्या बोक्याप्रमाणे, सिडको प्रकल्पग्रस्त तरुणांच्या टाळूवरील लोणी खात होते.आहेत.
  आज विमानतळाची मालकी अदानी कडे आहे.खाजगी क्षेत्रात ओबीसी आरक्षण नाही,आणि प्रकल्पग्रस्त आगरी कोळी कराडी लोकांच्या नोकऱ्याही नाहीत.आपल्याच जात बांधवांना फसवून श्रीमंत शेठ झालेले राजकीय नेतृत्व हा आगरी कोळी कराडी समाजाला लागलेला महारोग आहे.प्रामाणिक राजकीय नेतृत्वासाठी तरुणांनी राजकारणात आले पाहिजे.आमचे नेते लोकनेते दि बा पाटील यांच्या सारखे,शिक्षण आरक्षण आणि प्रकल्पग्रस्त तरुणाच्या सरकारी नोकऱ्या.आणि व्यावसायिक अधिकारांसाठी लढले पाहिजे.आमच्या हक्कांच्या खडी,रेती व्यवसायांना संपविणारे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य राजकीय नेतृत्व स्थानिक आमदार खासदारांना घेऊनच आमच्यावर उलटले आहेत.त्यांना ओळखा.लोकनेते दि बा पाटील याचा विचार समजून घ्या.मग आंदोलन करा.वास्तव पहा.डोके गर गर फिरू लागेल.
जय दिबा.
राजाराम पाटील ८२८६०३१४६३.उरण जिल्हा रायगड.

 आंबेडकरवादी कोणाला म्हणावे..? आंबेडकरवादाची व्याख्या काय..?



   डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार म्हणजे केवळ एका समाजापुरते मर्यादित नाही,तर संपूर्ण माणुसकीसाठी प्रकाशवाट दाखवणारे विचारधन आहे. "आंबेडकरवाद" ही संज्ञा केवळ एखाद्या व्यक्तीच्या अनुयायित्वाचे प्रतिक नसून,ती सामाजिक परिवर्तनाची,समता-स्वातंत्र्य-सबंधुता या मूल्यांची प्रेरणादायी चळवळ आहे. म्हणूनच ‘आंबेडकरवादी’ कोणाला म्हणावे,याचे उत्तर शोधताना फक्त बाबासाहेबांची पूजाअर्चा करणाऱ्याना नव्हे,तर त्यांच्या विचारांची कृतीशीलता अंगीकारणाऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवावे लागते.
  आंबेडकरवादी म्हणजे काय?  जो माणूस समतेचा,न्यायाचा, बंधुतेचा आणि विवेकाचा विचार कृतीत आणतो.बाबासाहेबांनी सांगितलेला "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा मंत्र अंगीकारतो.केवळ जातीच्या आधारावर अभिमान बाळगणारा,पण आचरणात ब्राह्मणवादी रचना पोसणारा,तो आंबेडकरवादी कसा असेल? जो आरक्षण घेतो, पण समाजाच्या वंचित घटकांना सोबत घेत नाही,तो केवळ लाभार्थी ठरतो, आंबेडकरवादी नाही!
   आंबेडकरवाद ही केवळ दलित मुक्तीची संकल्पना नाही,ती मानवमुक्तीची व्यापक संकल्पना आहे.धर्म,लिंग,जात,भाषा,प्रदेश या सर्व भेदांपलीकडे जाऊन "मनुष्याला माणूस म्हणून उभं करणं" ही आंबेडकरवादाची भूमिका आहे.बाबासाहेबांनी केवळ न्यायालयीन कायदे केले नाहीत, त्यांनी सामाजिक, आर्थिक आणि बौद्धिक क्रांतीची दिशा दिली.फक्त ‘मनूवादाचा’ विरोध करने म्हणजे आंबेडकरवाद नव्हे; तर शोषणमुक्त, समतेच्या समाजाची उभारणी हा आंबेडकरवादाचा गाभा आहे.आज अनेक जण ‘आंबेडकरवादी’ म्हणून पुढे येतात,पण त्यांचा आंबेडकरवाद केवळ फोटो लावण्यापुरता,भाषण करण्यापुरता,राजकारणापुरता,आपल्या अडचणी सोडवण्यापुरता मर्यादित असतो.खरे आंबेडकरवादी तेच,जे आपल्या जीवनात प्रज्ञा (ज्ञान),करुणा (समता) आणि शील (नैतिकता) यांचा स्वीकार करतात. बाबासाहेबांनी धर्मांतर करून जे बौद्ध जीवनमूल्ये दिली,तीच आंबेडकरवादी जीवनाची खरी दिशा आहे.
  आंबेडकरवादी असणं म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहणं,वंचितांसाठी संघर्ष करणं आणि स्वतःला नैतिकतेने, ज्ञानाने,विवेकाने सुसज्ज करणं.जो वर्ग बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार होण्याऐवजी फक्त त्यांच्या नावावर राजकारण करतो,किंवा केवळ जातीचे राजकारण करतो,तो आंबेडकरवादाशी फारकत घेतो.शेवटी एवढंच म्हणता येईल की, "आंबेडकरवादी" होणं म्हणजे केवळ कोणाच्या विरुद्ध असणं नव्हे; तर सत्य, समता आणि मानवतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं होय.आणि आंबेडकरवाद म्हणजे केवळ एक विचारसरणी नव्हे,तर शोषितांच्या उद्धारासाठी चाललेली एका महामानवाची क्रांती आहे,जी आजही चालूच आहे.
रतनकुमार साळवे- 9923502320,छत्रपती संभाजीनगर 

 लोकनेते दि बा पाटील आगरी कोळी भंडारी सागरपुत्रांसाठी दीपस्तंभारखे आहेत.



     2500 वर्षाच्या लिखित इतिहासात ज्यांनी आपले सागरी अस्तित्व अखंड संघर्ष करून जपले आहे.ते आगरी कोळी भंडारी कराडी गावित हे छत्रपती शिवरायांच्या आरमाराचे लढाऊ लोक आहेत.त्यांच्या पराक्रमाचा इतिहास स्वदेशी हिंदू वैदिक इतिहासकारांनी लिहिला नाही.तो स्वतः सागरपुत्र लोकांनी लिहू नये.यासाठी मनुस्मृतीच्या माध्यमातून त्यांना लिहिण्याचा,बोलण्याचा,वेद उपनिषदे हे धार्मिक विषय ऐकण्याचा अधिकार नाकारला.तरीही परकीय इतिहासकार त्यांचा इतिहास नाकारू शकले नाहीत.शेवटी निसर्ग सागर,खाडी,नद्या,सागरी किल्ले,बंदरे यातील त्यांचे अस्तित्व कोकणचा भूगोल त्यांच्या अस्तित्वाची नोंद घेत हजारो वर्षे साक्ष देत उभा आहे.अर्थात समुद्र,वारे,भरती, ओहोटी ही कशी सातत्यपूर्ण हालचाल करतात.कधी उग्र रूपांचे दर्शन साऱ्या जगाला घडवितात.तसेच अन्यायाविरोधात बेधडक लढणारी मंडळी आमची आहेत.
मानवी गुणांचे योग्य मूल्य समजण्यासाठी स्वतःच्या जीवनात उच्च मानवी जीवन मूल्ये रुजवावी लागतात.ती केवळ उच्च कुळात,उच्च वर्णात जन्माला आल्याने वंश परंपरेने मिळत नाहीत.आपल्या कर्तृत्वाने स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांनी सागरपुत्र आगरी कोळी भंडारी कराडी या सम्राट अशोक यांच्या काळातील आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जागतिक लढाया लढणाऱ्या लोकांना ओळखले होते.
  छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर सागरपुत्र आगरी कोळ्यांचे केवळ समुद्र,जमीन,पाणी जंगल यांचेच अधिकार पेशवाईत संपविले गेले नाहीत.तर त्यांना शिक्षण,धर्म,मानवी हक्क नाकारून जन्माधारित गुलामीत टाकण्यात आले.याची साक्ष महात्मा जोतिबा फुले आपल्या गुलामी या ग्रंथातून देतात.लोकनेते दि बा पाटील यांना महात्मा जोतिबा फुले यांनी आपले गुरू मानले आहे.एकही आगरी कोळी महात्मा जोतिबा फुले यांना वैचारिक अर्थाने गुरू मानतो का? हा मोठा प्रश्न आहे.ज्यांनी कुणी आम्हाला धार्मिक अर्थाने गुलाम केले आहे.त्यांना गुरु मानून आम्ही स्वतंत्र होऊ शकतो का?.महाराष्ट्रात विचारांचा संघर्ष हा आम्हाला गुलाम करणाऱ्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्चवर्णीय विरुद्ध समस्त स्त्रिया शूद्र अतिशूद्र असा आहे.महाराष्ट्राच्या लोक सागरात पोहत असताना.आम्ही सावध,जागृत असले पाहिजे.
समुद्री जीवनात आपली बोट खडकावर आपटून सर्वनाश होऊ नये.म्हणून धोक्याची जागा दाखवण्याचे काम दीपस्तंभ करतो.हे आम्हा सर्वांना माहित आहे.परंतु देशाच्या, राज्याच्या राजकारणात,समाजकारणात,धर्मकारणात आम्हास धोका कुठे आहे? हे लोकनेते दि बा पाटील आम्हाला सांगून गेले.
     आज सर्व क्षेत्रात आमची फसवणूक,पराभव कोणामुळे होत आहे.हे आम्हास समजत नाही.कारण आम्हास दिबा समजलेच नाहीत.लोकनेते दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळास का मिळत नाही.याचे उत्तर दिबानी आपल्या सिडको विरुद्धच्या संघर्षातून दिले आहे.सात बेटांच्या मुंबईचे आम्ही आगरी कोळी भंडारी कराडी ईस्ट इंडियन आदिवासी मालक होतो.मुंबई शहराच्या विकासासाठी आम्ही आमची शेती बागायती,मिठागरे,बंदरे वीटभट्टी,रेती,सागरी व्यापार यांचे बलिदान दिले होते.स्वातंत्र्यानंतर कोणत्याच सरकारने आमचे पुनर्वसन केले नाही.अर्थात मनुस्मृतीनुसार शूद्र ओबीसी आगरी कोळ्यांची सारी संपत्ती जप्त करा.कोणतेही कारण द्यायची गरज नाही हे मनुस्मृती सांगते.पेशवाईत आलेली हिंदू धार्मिक गुलामी आम्हाला समजून आली नाही.ती महात्मा जोतिबा फुले,सावित्री माई फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समजली.त्यांच्या जीवन संघर्षाप्रमाणे आचरण करणारे लोकनेते दि बा पाटील होते.मुंबईच्या जमिनीची लूट करणारे याच देशातील ब्राह्मण मराठा वैश्य राज्यकर्ते समजून घेणे,हे जमीन हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक नेतृत्वाचे जमीन मालक,कुळ,घरमालक, गावठाणात राहणारे यांचे आद्य कर्तव्य आहे.
  महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी जमीन हवी म्हणून जमीन कसणाऱ्या शेतकरी कुळे,ताबा,कब्जा,वहिवाट दार यांचे अधिकार संपविण्यात आले आहेत.मागच्या आठवड्यात वर्सोवा कोळीवाड्यातील भंडारी समाजाचे लढाऊ नेते मनोजभाई माशेलकर यांनी अंधेरी मुंबई येथील तहसीलदार यांना ते वहिवाट अर्थात "सुप्रीम मालकीत "असणाऱ्या जमिनी बद्दल माझ्यासमोर प्रश्न विचारला.उत्तर आले अंधेरी मुंबई येथे कुळ कायदा संपला.लागत नाही.संविधानात असलेला आमच्या हक्कातील कायदा कसा संपू शकतो? अर्थात या विषयावर सोमवारी जाहीर सुनावणी आम्ही ठेवली आहे.नव्या पेशवाईची ही नांदी आहे.महाराष्ट्राचा "सातबारा जिवंत" करून वारस नोंदी करायला निघालेले माननीय महसूल मंत्री बावनकुळे यांच्या मंत्रालयाच्या मुंबईत आमची ही अवस्था असेल तर देशाचे काय?
  छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य कुणी संपविले? मुसलमानी,इंग्रज राज्यकर्त्यांनी की पोर्तुगीजांनी याचे उत्तर सातबारा आगरी कोळी लोकांच्या हातून गेल्यावर शेतकऱ्यांना कळले.इतिहासकार काहीही म्हणोत.त्यानंतर खोत सावकार या उच्चजातीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या विरोधात डॉ.बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील हे धर्माने हिंदू असून त्यांना आंदोलन का करावे लागले?. १ एप्रिल १९५७ साली आगरी कोळी भंडारी ओबीसी एससी एसटी संघर्षातून कुळ कायदा आला.पुढील तीनच वर्षात इंडस्ट्रियल झोन जाहीर करून मुंबई ठाणे रायगडात आमच्या जमिनी अक्षरशा फुकट लुटल्या गेल्या.१९७० साली सिडको आली.जेएनपीटी,नेव्ही, ओएनजीसी,सेझ,नवी मुंबई विमानतळ,नैना,एम एम आर डी,एमएसआरडी.सर्व महानगर पालिका,क्लस्टर, एसआरए यात सत्ताधारी जाती शिवाय आहे कोण? पुनर्वसन कुठे आहे.
  लोकनेते दि बा पाटील यांची साडे बारा टक्के योजना ही हुतात्म्यांच्या त्यागातून मिळालेली आहे.ती आतातरी साहेब गेल्यानंतर का होईना,पूर्ण करा.असे आमचा एकही आमदार,खासदार नुसते बोलू शकत नाही.ते लोकनेते दि बा पाटील यांचे नाव विमानतळास देतील ही अंधश्रद्धा आहे.प्रत्यक्ष देवावर श्रध्दा नाकारणाऱ्या लोकनेते दि बा पाटील यांचे आपल्या लोकांवर किती प्रेम असेल?. सिडको विरुद्ध न्यायासाठी लढणाऱ्या आगरी कोळी कराडी प्रकल्पग्रस्तावर वसंत दादा पाटील हा मराठा मुख्यमंत्री गोळ्या झाडतो.आमचे लोक त्यात बळी पडतात.यात न्यायासाठी लढणाऱ्या लोकांना जो जिवंत करू शकत नाही.त्यांना ठार करणाऱ्यांना प्रश्नही विचारू शकत नाही.असा निष्क्रीय देव काय कामाचा.मला आजही प्रश्न पडतो.लोकांना न्याय देणारा आमचा नेता आमच्याच भूमीत त्याचा हक्काचा मान सन्मान मागतोय.मग देवाचे सोडा.
दगडाच्या मूर्तीत,मातीच्या मूर्तीत प्राण प्रतिष्ठा करणारे भटजी मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेत.त्यांना क्षत्रिय एकनाथ शिंदे,अजितदादा पवार यांची सत्तेची तलवार सोबत असताना.शेतकरी न्यायाचे छोटेसे काम जमत नसेल?.ही सत्ता कोणासाठी?
   शूद्र ओबीसी लोकांच्या विरोधी असलेल्या सत्तेला दिबा ओळखत होते.म्हणूनच आमच्या आजच्या सुखाला कारण झालेल्या पाच हुतात्म्यांचे रक्त वाया जाणार नाही.जाऊ द्यायचे नसते.याचा अर्थ दहा मिनिटे डोळे मिटून अंतर्मनात जाणा.तुमचे उत्तर तुम्हाला मिळेल.मला समजले.ते तुम्हास समजावे म्हणून मी लढत आहे.संघर्ष करत आहे.लोकनेते दि बा पाटील ही आमची अस्मिता आहे.ती कुणाच्याही पायावर गहाण ठेऊ नका.लढत रहा.विजय तुमचा आहे.निसर्ग हाच साक्षीदार आहे.कुणाला माहीत आहे?. तुमच्या,माझ्यात कुणाच्याही,जीवनात आचरणात लोकनेते जेव्हा खऱ्या अर्थाने दिसतील.तेव्हा आम्ही विजयी होऊ.बाकी सोंगाड्याना भुलू नका.
जय आई एकवीरा.
राजाराम पाटील ८२८६०३१४६३,उरण जिल्हा रायगड.

 सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या बहुजन समाजाच्या नेत्यांनो 



आपलाच समाज जर आपल्यातच फूट पाडून घेत असेल तर तो कधीच सत्तेवर पोहचू शकत नाही.एकी शिवाय सत्ताधिकार अशक्य आंबेडकरी समाजातील गटबाजीचा भेद मिटवा,  आजच्या काळात आंबेडकरी समाजासाठी सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एकीचा अभाव. बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकरांनी संघटित होण्याचा मंत्र दिला, पण दुर्दैवाने आज तोच समाज शेकडो गटांमध्ये विखुरला आहे. या गटांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,मुख्य नेते, संघटक एवढेच नव्हे तर प्रत्येकाचा स्वतंत्र झेंडा,कार्यालये आणि आपापसातील आरोप-प्रत्यारोपांची साखळी पाहून कोणालाही हसू येईल,पण ही वस्तुस्थिती दु:खद आणि धोकादायक आहे,भारिप बहुजन महासंघ,वंचित बहुजन आघाडी,बहुजन समाज पार्टी,रिपब्लिकन पार्टीचे वेगवेगळे गट आठवले,कांबळे,खरात,गायकवाड,प्रेसिडियम हेच काय कमी होते म्हणून भीम आर्मी, बामसेफ,ब्लॅक पॅंथर,भीम टायगर सेना,युवा सेना असेही अनेक विंग तयार झाले आहेत.हे सर्व गट-उपगट एकमेकांवर टीका करण्यात इतके रममाण झाले आहेत की मूळ लढाई शोषितांची, वंचितांची मागेच पडली आहे, हे सत्य समजून घेतले पाहिजे पण कोणी समजून घ्यायला तयारच होत नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलाच समाज जर आपल्यातच फूट पाडून घेईल तर तो कधीच सत्तेवर पोहचू शकत नाही. कारण मतदानात मते फुटतात,नेतृत्व फुटते, दिशा हरवते. त्यामुळेच आजही आपल्या समाजाचा ‘किंगमेकर’ म्हणून वापर होतो पण आपण कधीच ‘किंग’ होत नाही! डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शासनकर्ता समाज व्हा असे सांगितले,पण आज त्यांचे अनुयायी आपापसातच ‘विरोधक’ झाले आहेत.शिक्षण, संघटना आणि संघर्ष या त्रिसूत्रीवर लक्ष देण्याऐवजी फक्त ‘स्वप्न’ पाहण्यात आपण रमलो आहोत,आता तरी हे सर्व छोटे मोठे पक्ष,संघटना आणि नेते एकत्र यायला हवे, एकच झेंडा,एकच आवाज आणि एकच संघर्ष हाच बाबासाहेबांचा खरा वारसा आहे. अन्यथा आपण सत्तेच्या स्वप्नातच आयुष्यभर फिरत राहणार! एकी हीच खरी सत्ता आहे, हे लक्षात घेऊन सर्व गटांनी एकत्र यावे, वैयक्तिक स्वार्थ,पदलालसा बाजूला ठेवावी आणि समाजहितासाठी एक दिशा घ्यावी.महत्त्वाची गोष्ट अशी आहे असे लिहून बोलून बऱ्याचदा झाले परंतु या गटातटावाल्यांच्या लक्षात ही गोष्ट का येत नाही आमच्या गटाचा त्यामुळे आमच्या मुलांचे भविष्य बरबाद होत आहे याला जिम्मेदार कोण?.

जय भीम! नमो बुद्धाय! जय संविधान! जय भारत!..
प्रशिक सम्राट 816941365,

 केंद्र व राज्य सरकारच्या असंवैधानिक आणि कामगारविरोधी धोरणांविरुद्ध ९ जुलै २०२५ रोजी 

देशव्यापी संपात स्वतंत्र मजदूर युनियन सहभागी होणार!”



 केंद्र व महाराष्ट्र सरकारच्या खाजगीकरण,निर्गुंतवणूक,कामगारविरोधी धोरण आणि संवैधानिक आरक्षणाच्या उल्लंघनाविरुद्ध स्वतंत्र मजदूर युनियनने तीव्र निषेध व्यक्त केला असून, ९ जुलै २०२५ रोजी देशव्यापी एकदिवसीय संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.स्वतंत्र मजदूर युनियनच्या युनियनच्या केंद्रीय कार्यकारिणी,राज्य कार्यकारिणी आणि संलग्न संघटनांच्या दि. १६ जून २०२५ रोजी राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. या संबंधात संपाची नोटिस स्वतंत्र मजदूर युनियन ने देशाचे प्रधानमंत्री यांना सोमवार, दि. २३ जून २०२५ रोजी दिली आहे. या संपात संघटित आणि असंघटित क्षेत्रातील केंद्र आणि राज्य सरकारच्या उद्योगातील ९२ संलग्न कामगार संघटना सहभागी होतील अशी माहिती स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र जारोंडे यांनी दिली आहे.
संविधानाचे उल्लंघन आणि कामगार अधिकारांची गळचेपी:भारतीय संविधानाच्या कलम १२, १४, १५, १६, ३८, ३९, ४१ आणि ४३ नुसार सरकारवर सामाजिक-आर्थिक समानता प्रस्थापित करण्याची आणि सर्व नागरिकांना समान संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे.तथापि, केंद्र आणि महाराष्ट्रासह विविध राज्य सरकारांनी खाजगीकरण,निर्गुंतवणूक,सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP),आउटसोर्सिंग आणि कंत्राटीकरणाच्या धोरणांद्वारे संविधानाच्या मूलभूत तत्त्वांचे आणि कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचे उल्लंघन केले आहे.
कामगार कायद्यांची गळचेपी:नवीन कामगार संहितांमुळे कामगार आणि कामगार संघटनांच्या मूलभूत अधिकारांवरच गदा आणली गेली आहे.या संहितांमधील तरतुदी कामगारवर्गाच्या हितांचे रक्षण करण्याऐवजी उद्योजकांच्या हितांना प्राधान्य देतात.यामुळे वेतनातील असमानता,रोजगाराची असुरक्षितता आणि कामगारांच्या हक्कांचे हनन होईल.
पदोन्नती मधील आरक्षण: संवैधानिक आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नसून, समाजातील सर्व घटकांना समान प्रतिनिधित्व देण्याचे धोरण आहे. परंतु, २०१२ पासून केंद्र आणि राज्य सरकारांच्या अधिकार क्षेत्रातील उद्योगात अनुसूचित जाती/जमाती कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीमधील आरक्षण पूर्णपणे बंद आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील याचिका अद्याप निकाली काढलेली नाही, आणि संसदेने यासंदर्भात ११७ वे घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी कोणताही पुढाकार घेतलेला नाही.
सन्मानजनक पेन्शन:राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि युनिफाईड पेन्शन योजना (UPS) कर्मचाऱ्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार नाकारतात. स्वतंत्र मजदूर युनियनने जुनी पेन्शन योजना (OPS) सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्याची आणि EPS-९५ मध्ये सुधारणा करून किमान १५,००० रुपये पेन्शन सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे.
प्रमुख मागण्या:
१) सरकारी उद्योगांचे खाजगीकरण थांबवा: केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शासकीय मालकीच्या उद्योगांचे खाजगीकरण तात्काळ थांबवावे.
२) वीज कायदा सुधारणा विधेयक मागे घ्या:राष्ट्रीय विद्युत धोरणाच्या (NEP) विरुद्ध असलेले हे विधेयक रद्द करावे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व इतर राज्यात समांतर वीज वितरण परवाना देऊन शासकीय वीज कंपन्यांना संपविण्याचे धोरण बंद करावे.
३) कामगारविरोधी धोरणे रद्द करा: नवीन कामगार संहितेमधील कामगारविरोधी तरतुदी तात्काळ मागे घ्याव्यात.
४) जुनी पेन्शन योजना लागू करा: सर्व कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा लागू करावी आणि EPS-९५ मध्ये सुधारणा करून किमान १५,००० रुपये पेन्शन सुनिश्चित करावी.
५) पदोन्नतीत आरक्षण लागू करा: जर्नेल सिंग विरुद्ध लक्ष्मी नारायण गुप्ता प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून अनुसूचीत जाती व जमातींच्या कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नती मधील आरक्षण लागू करावे.तसेच,नचिअप्पन समितीच्या शिफारशींनुसार OBC ना पदोन्नतीत आरक्षण लागू करावे.
६) खाजगीकरण झालेल्या सार्वजनिक उपक्रमांमध्ये आरक्षण: संविधानाच्या कलम १२ अंतर्गत परिभाषित जे सरकारी/सार्वजनिक उपक्रम खाजगी उद्योजकांकडे सोपवलेले आहेत त्या उपक्रमांमध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू करावे.
७) लॅटरल एन्ट्री बंद: उच्च पदांवरील लॅटरल एन्ट्रीद्वारे नियुक्त्या बंद कराव्यात,कारण त्या समान संधीच्या तत्त्वाविरुद्ध  व मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व डावलणाऱ्या आहेत. 
८) आउटसोर्सिंग आणि कंत्राटीकरण बंद करा: नियमित पदांवरील आउटसोर्सिंग आणि कंत्राटी नियुक्त्या थांबवून वेतनातील असमानता दूर करावी.
९) स्वतंत्र मजदूर युनियनला मान्यता: स्वतंत्र मजदूर युनियनला मान्यता देऊन आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) आणि भारतीय कामगार संघटनेत प्रतिनिधित्व द्यावे.
संपात सहभागी होण्याचे आवाहन:या संपात केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतील उद्योगांमध्ये स्वतंत्र मजदूर युनियनशी संलग्न संघटित आणि असंघटित क्षेत्रातील सर्व कामगार संघटना सहभागी होणार असून संविधानाच्या रक्षणासाठी आणि कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी या देशव्यापी संपात सर्व संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांनी सहभागी होण्याचे आवाहन स्वतंत्र मजदूर युनियनने केले आहे.

एन. बी. जारोंडे- ९८५०१९२३२९,
राष्ट्रीय उपाध्यक्ष - स्वतंत्र मजदूर युनियन

 जनसुरक्षा विधेयकविरोधी समितीच्या वतीने ३० जूनला मुंबईत विराट मोर्चा


मुंबई,ता.१ : ‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४’ हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून,जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे.त्यामुळे हे विधेयक रद्द करावे, या मागणीसाठी राज्यभर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार भाकप, माकप,भाकप माले शेकाप,सकप,लाल निशाण पक्षांसह विविध डाव्या व लोकशाहीवादी पक्ष - संघटनांनी केला आहे.याअंतर्गत २२ एप्रिल रोजी जनसुरक्षा विधेयकाविरोधात राज्यातील सर्व तहसील कार्यालये,जिल्हाधिकारी कार्यालये याठिकाणी निदर्शने करण्यात आली होती.राज्यातील सर्व‌ जिल्ह्यात व एकूण ७८ ठिकाणी या विधेयकाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
  महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ या विषयावर सविस्तर अभ्यास करून या विधेयकाला विरोध करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक विरोधी समिती  तातडीने कृती कार्यक्रम हाती घेतला. राज्यात विभागीय मेळावे घेऊन या विधेयकाला विरोध का करायचा,याबाबत जनतेपर्यंत माहिती पोहोचवून जनमत तयार करण्यात आले. 
आता ३० जून रोजी मुंबई येथे सुरू होणाऱ्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.तसेच समाज माध्यमांमधून याबाबत प्रचार - प्रसार करुन,सर्व आमदारांच्या घरावर व कार्यालयावर जाऊन हे विधेयक रद्द करावे म्हणून विधानसभा,विधान परिषदेत भूमिका मांडण्याबाबत दबाव निर्माण करण्यात येणार आहे.सदर विधेयक मंजूर करण्यापूर्वी विधीमंडळाच्या संयुक्त समितीकडे पाठविण्यात आले.या समितीने जाहीर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्या नुसार आजपर्यंत दिलेल्या तारखेला या विधेयकाला प्रत्यक्ष व दिलेल्या संकेतस्थळावर सुचना व विरोध नोंदवण्यात आला आहे.राज्य भरातून १२००० पेक्षा अधिक हरकती दाखल करण्यात आलेल्या आहेत.एवढ्या मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल होण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे.यावरून जनसामान्यांच्या मनात काय आहे हे लक्षात येते.परंतु सदर विधीमंडळाच्या संयुक्त समिती ने कोणालाही प्रत्यक्ष म्हणणे मांडण्याची संधी दिलेली नाही.हे लोकशाही प्रक्रियेला साजेसे नाही.याचा आम्ही निषेध करतो.
आमचे हरकतीचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत 
या कायद्याचे नाव “महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम” असे ठेवले असले तरी ते जनतेची सुरक्षा करण्यासाठी नव्हे तर सत्ताधा-यांची सुरक्षा करण्यासाठी आणण्यात आले आहे.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनसंघटना,कामगार संघटना यांनी भाजपच्या विरोधात भूमिका घेऊन संविधान रक्षणासाठी ज्या परिणामकारक रीतीने काम केले,त्या लोकशाही ताकदीला नेस्तनाबूत करण्यासाठी आणण्यात आलेले हे विधेयक आहे.सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करणारे व हुकूमशाही व्यवस्था मजबूत करणारे हे विधेयक आहे.या विधेयकाच्या उद्देशात अर्बन नक्षलवादाला आळा घालण्यासाठी हे विधेयक आहे असा उल्लेख असला तरी अर्बन नक्षलवादी म्हणजे कोण याची व्याख्या करण्यात आलेली नाही.हे विधेयक काही मूलभूत लोकशाही मूल्यांविरुद्ध आहे. यातील काही तरतुदीनुसार.“बेकायदेशीर कृत्य" याचा अर्थ,एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेने केलेले, –
(एक) जे सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता व प्रशांतता यांस धोका किंवा संकट निर्माण करते असे ; किंवा
(दोन) जे सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते किंवा ज्याचा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे असे ; किंवा
(तीन) जे न्यायदानात किंवा विधिद्वारा स्थापित संस्थांमध्ये व कर्मचारी वर्गामध्ये हस्तक्षेप करते किंवा ज्याचा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे असे किंवा
(चार) जे राज्य शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या दलांसह,कोणत्याही लोकसेवकाला, असा लोकसेवक आणि अशी दले कायदेशीर अधिकारांचा वापर करीत असताना, फौजदारीपात्र बलप्रयोगाद्वारे किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग दाखवून किंवा अन्यथा, दहशत निर्माण करण्यासाठी रचलेले आहे असे ;किंवा 
(पाच) हिंसाचार,विध्वंसक कृतींमध्ये किंवा लोकांमध्ये भीती व धास्ती निर्माण करणा-या अन्य कृतींमध्ये गुंतलेले किंवा त्याचा प्रचार करणारे,किंवा अग्निशस्त्रे,स्फोटके किंवा अन्य साधने यांचा वापर करण्यात गुंतलेले किंवा त्यास प्रोत्साहन देणारे किंवा रेल्वे, रस्ते,हवाई किंवा जल यामार्गे होणा-या दळणवळणांमध्ये व्यत्यय आणणारे असे ; किंवा
(सहा) प्रस्थापित कायद्याची व कायद्याद्वारे स्थापन केलेल्या संस्थांची अवज्ञा करण्यास प्रोत्साहन देणारे किंवा तसे करण्याचा उपदेश देणारे असे ; किंवा
(सात) वर नमूद केलेली कोणतीही एक अथवा अधिक बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी पैसे किंवा वस्तू गोळा करणारे असे,कोणतेही कृत्य. मग ते कृती करून केलेले असो अथवा एकतर तोंडी किंवा लेखी शब्दांद्वारे किंवा खुणा करून अथवा दृश्य सादरीकरणाद्वारे किंवा अन्यथा केलेले असो, असा आहे ;
तसेच
(आठ ) “बेकायदेशीर संघटना" याचा अर्थ, जी संघटना, कोणतेही बेकायदेशीर कृत्य करण्यामध्ये गुंतलेली आहे किंवा तिच्या उद्दिष्टांनुसार-कोणतेही माध्यम, साधन किंवा अन्यथा यामार्फत प्रत्यक्षपणे अथवा अप्रत्यक्षपणे बेकायदेशीर कृत्य करण्यास अपप्रेरणा देते किंवा सहाय्य करते किंवा मदत करते, किंवा त्यास प्रोत्साहन देते,अशी कोणतीही संघटना,असा आहे.
या विधेयकानुसार जो कोणी बेकायदेशीर संघटनेचा सदस्य असेल किंवा अशा कोणत्याही संघटनेच्या बैठकामध्ये भाग जाईल किंवा त्यांना देणगी देईल किंवा स्वीकारेल अशा लोकांना तीन वर्ष कारवास किंवा तीन लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकेल.
या विधेयकाच्या द्वारे  प्रशासनाला अतिरेकी अधिकार दिले जात आहेत. कोणत्याही व्यक्तीवर संशय आल्यास,त्याच्यावर कठोर कारवाई करता येईल,ज्यामुळे सरकारी यंत्रणा जनतेच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणू शकेल.विरोधी विचारसरणी किंवा सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांना सहजपणे 'अन्याय्य' ठरवून त्यांच्या हालचालींवर निर्बंध आणता येऊ शकतात.हा प्रकार लोकशाहीत असलेल्या वैचारिक मतभेदांचा आदर न करणारा आहे.
 काही प्रकरणांमध्ये सरकारला न्यायपालिकेच्या भूमिकेत हस्तक्षेप करण्याचेही स्वातंत्र्य दिले गेले आहे,ज्यामुळे स्वायत्त आणि स्वतंत्र न्यायपालिकेचा पाया कमकुवत होईल.सरकारच्या धोरणांवर टीका करणे किंवा शांततापूर्ण आंदोलन करणे यांना ‘अन्याय्य कृत्ये' ठरवले जाऊ शकते,जे लोकशाहीत अभिप्रेत असलेल्या खुल्या चर्चेच्या तत्वा विरोधी आहे.
 विधेयकात काही तरतुदी अशा आहेत की ज्यामुळे मूलभूत हक्क जसे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य,संघटन स्वातंत्र्य आणि न्यायसंगत सुनावणीचा अधिकार यावर परिणाम होईल
थोडक्यात म्हणजे हे विधेयक लोकशाही तत्त्वांना बाधा आणणारे आणि सत्ताधारी प्रशासनाला जास्त अधिकार प्रदान करून नागरिकांच्या हक्कांची गळचेपी करण्याचा धोका निर्माण करणारे आहे.म्हणून या विधेयकाच्या विरोधात ३० जून २०२५ रोजी मुंबई मधे जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे.त्यात जागरूक नागरिक,कामगार कर्मचारी,अधिकारी, शेतकरी,शेतमजूर सर्व भारतीय संविधान प्रेमीनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे कळकळीचे आवाहन जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती ने केले आहे.
सागर रामभाऊ तायडे यांस कडून 

शुक्रवार, ६ जून, २०२५

तळतळाट! तळतळाट!!

 तळतळाट! तळतळाट!!

गुलाम बनलेल्या कंत्राटी कामगारांनो जागे व्हा,जागे व्हा,


तुमच्या कष्टाचा,मेहनताना, पगार मागा घाणीचे काम करणाऱ्या,लाखो कंत्राटी कामगार माझ्या माता बंधू बहिणींना युवा-युवतीना किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन न देणाऱ्या,त्यांना भर पगारी चार सुट्ट्या न देणाऱ्या,त्यांचा ईपीएफ व इ एस आय सी न भरता त्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त पगार हडप करणाऱ्या त्यांना पगार स्लिप न देणाऱ्या संबंधित शेण खाणाऱ्या,त्यांच्या लेकरा बाळाचा तळतळाट घेतलेल्या,घेणाऱ्या भ्रष्टाचाराने झिंगाट झालेल्या अधिकाऱ्यांचा मी जाहीर निषेध करीत आहे,महाराष्ट्रातील कोणत्याच यंत्रणेकडे, कामगारांचे हजेरी पत्रक,त्यांना किमान वेतनानुसार बँकेतून पगार दिलेल्या बँक रिसीट,त्यांचा ईपीएफ व ई एस आय सी भरलेल्या रिसीट,नाहीत कामगारांना पगार स्लिप दिले गेले नाही,दिली जात नाही,मनुष्यबळ पुरविण्याचा व मनुष्यबळाकडून काम करून देण्याचा शासकीय परवाना नाही तसेच कंत्राटी कामगार काम करणाऱ्या यंत्रणेकडे शासकीय परवाना नाही कंत्राटी कामगारांच्या पगार हडप प्रकरणाला व त्यांच्या शोषणाला सर्व महानगरपालिकेचे आयुक्त,तथा,मुख्य नियुक्ता,व लेखा अधिकारी,व सर्व नगरपरिषद नगरपंचायत चे मुख्याधिकारी,तथा,मुख्य नियुक्ता,व लेखा अधिकारी जबाबदार आहेत मी सदरच्या पत्रात नमूद केलेली कागदपत्रे नसताना दरमहा कंत्राटदारांना बिले कोणत्या नियमातून दिलेली आहेत एकूणच वरील शासन यंत्रानेकडे ही कोणतीही कागदपत्रे नसताना सन 2015 ते आजतागायत लाखो कोटी रुपये कोणाच्या घशात गेले? याबाबत मायबाप सरकार एस आय टी स्थापन करून या कंत्राटी कामगार शोषण घोटाळ्याची चौकशी का करीत नाही? सर्वच पक्षांना राज्यकर्त्यांना कंत्राटी कामगारांची व त्यांच्या कुटुंबीयांची मते हवी असतात मते घेतात मग विधानसभेत विधान परिषदेत सरकार दरबारी या कामगारांच्या शोषणाचा प्रश्न का उपस्थित केला नाही? मायबाप सरकार या शोषणाचे निर्मूलन का करीत नाही? मा कामगार मंत्री महोदय यांच्याकडील मा कामगार आयुक्त यांची यंत्रणा वरील मुख्य नियुक्तावर,व कंत्राट दारावर फौजदारी खटले का दाखल करीत नाहीत? तसेच या संपूर्ण लाखो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार घोटाळ्यावर मा प्रधान सचिव साहेब नगर विकास विभाग-2 मंत्रालय मुंबई व मा आयुक्त व संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय बेलापूर नवी मुंबई यांनी आजतागायत वरील आयुक्त,मुख्याधिकारी, लेखा अधिकारी, यांच्यावर आर्थिक अनिमित्तते प्रकरणी फौजदारी गुन्हे का दाखल केले नाहीत? व करीत नाहीत? भारत देशातील स्त्री-पुरुष कामगारांचे शोषण होऊ नये म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कायदेच आपणास मान्य नसतील कंत्राटी कामगारांच्या शोषणाचे निर्मूलन करायचेच नसेल तर आशा राज्यकर्त्या बाबत शोषित कुटुंबीयांनीच विचार करावा हीच अपेक्षा तूर्त एवढेच...
धन्यवाद! 
जय शिवराय! क्रांतिकारी जय भिम!! जय संविधान!!! भारत माता की जय!!!!
आपला नम्र 
ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब रघुनाथ कांबळे:-9921887402
तथा संस्थापक अध्यक्ष जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) रा,भीम नगर कुर्डूवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर

सोमवार, १० मार्च, २०२५

आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी"

 आदरणीय जे एस पाटील राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु) यांच्या ६७ व्या वाढदिवसाच्या निमित्याने विशेष लेख

आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी"

मी १९८२ पासून असंघटीत नाका कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सत्यशोधक कामगार संघटनेचे काम करत आलो आहे.त्या असंघटीत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईसह राज्यातील सर्व संघटनांना अनेकदा एकत्र करून कृतिसमिती,सुरक्षा परिषद बनवल्या,इंटक आयटक सिटूच्या राष्ट्रीय नेत्या बरोबर अंतर राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली होती.त्यामुळे त्यांची आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्याची काम करण्याची पद्धत जवळून पहिल्या गेली.पण समस्या काय आहे.ते सोडविण्यासाठी काय केले पाहिजे.याचे कोणताही अभ्यासपूर्ण नियोजन न करता मोर्चा,आंदोलन करून आंबेडकरी विचारांचा जय जय कार करून स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तडजोडी करणारे सामाजिक,धार्मिक आणि राजकीय नेते पायलीचे पंधरा पाहायला अनुभवाला मिळाले.पण क्रांतिकारी विचारांची अंमलबजावणी करणारे शोधावे लागतील,संविधानाच्या चौकटीत राहून पंचशिलेचे पालन करणारे व कामगार कर्मचारी व अधिकारी वर्गाला संघटनेच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्ते पदाधिकारी बनविणारे एकमेव  आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी" म्हणजेच आदरणीय जे एस पाटील राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु) व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे मुख्य सल्लागार,मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी अहोरात्र संघर्ष करणारे नेते म्हणून राज्यातच नव्हे तर देशातील प्रत्येक राज्यात आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता अशी त्यांची लक्षवेधी ओळख निर्माण झाली आहे.
      सुरक्षित नोकरी करणारे आरक्षण लाभार्थीच नव्हे तर समाजातील सर्व क्षेत्रातील तळागळातील संघटीत असंघटीत कामगारांचे आशास्थान सन्मानीय जे.एस.पाटील साहेब आहेत. उत्तर भारतात बहुजन समाजात मान्यवर कांशीराम यांनी प्रबोधन करून प्रचंड राजकिय जागृती निर्माण केली होती.त्यामुळेच मागासवर्गीयांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय महत्वकांक्षा निर्माण झाल्या होत्या.आपल्या राजकीय मूल्यांबाबत उघडपणे भरभरून बोलणारा बहुजन समाज मुख्यतः कर्मचारी-कामगार वर्ग हा फुले-आंबेडकरवादी कामगार चळवळीच्या माध्यमातून संघटित होण्याबाबत मात्र अगदीच उदासीन असल्याचे उत्तर व दक्षिण भारतात दिसून येतो
    बहुसंख्या बहुजन समाजातील कामगार,कर्मचारी आणि अधिकारी वर्ग हा मोठ्या प्रमाणात गोळवलकर,गांधीवादी,साम्यवादी कम्युनिस्ट विचारांच्या ट्रेंड युनियन मध्ये किर्याशील सभासद असल्याचे दिसून येते.प्रत्येक कामाच्या ठिकाणी असलेली ब्राम्हणवाद्यांची मक्तेदारी,त्यांच्या प्रस्थापित संघटना व मागास-बहुजन कामगारांवर पिढ्यानपिढ्या लादलेली सामाजिक विषमतेची व्यवस्था ही बहुजन समाजामध्ये फुले-आंबेडकरवादी कामगार चळवळीत संघटित होण्याविषयी भीती निर्माण करते.ही भीतीच सर्वप्रथम दूर करण्याचे लक्षवेधी प्रबोधन आदरणीय जे.एस.पाटील यांनी केले आहे.त्यामुळेच उत्तर भारतात व दक्षिण भारतात स्वतंत्र मजदूर युनियनची पाळेमुळे घट्ट होतांना दिसत आहेत.
       भारतातील ब्राम्हणवाद दरवर्षी शोषण करण्याची माध्यमे बदलत असतो.व्यवस्थेचे परिवर्तन मान्य नसल्याने शोषितांसाठी वरवरचे बदल तो स्वतः घडवून आणतो.बहुजन कामगारांनी आपले हक्क प्राप्त करून घेण्यासाठी स्वतंत्र 'ट्रेड युनियन' स्थापन न करता ब्राम्हणवाद्यांचेच नेतृत्व स्वीकारावे म्हणूनच वेल्फेअर असोसिएशन,फेडरेशनचा फार्स ब्राम्हणवाद्यांनी निर्माण केले आहेत. हे सर्वप्रथम स्पष्टपणे मांडण्याचे काम माननीय जे.एस.पाटील यांनी केले आहे,त्यामुळेच ते देशातील आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी" म्हणून एकमेव नेतृत्व पुढे येत आहे. 
      फुले-शाहू,आंबेडकरवादी विचारांची देशव्यापी ट्रेड युनियन निर्माण होईल व ती राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन महासंघानां आव्हान निर्माण करील असे कोणालाही वाटले नव्हते, मान्यताप्राप्त प्रस्थापित ट्रेंड युनियनच्या विरोधात म्हणजेच ब्राम्हणवादाला थेट आव्हान आज आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता देत आहे.त्याला सर्व मागासवर्गीय ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक यांनी मोठ्या प्रमाणात साथ मिळत आहे.म्हणूनच  महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून सुरु झालेला हा संघर्ष आज स्वतंत्र मजदूर युनियनच्या माध्यमातून एक देशव्यापी कामगार चळवळ बनली आहे.
    आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी" जे एस पाटील यांच्या कुशल संघटक,वकृत्व आणि नेतृत्वाने,मिशनरी बाण्याने,मोठ्या जिद्दीने राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र मजदूर युनियन उभी राहत आहे.देशभरातील मागासवर्गीय,ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक समाजातील कामगार कर्मचारी जागरूक होऊन स्वतःच्या ट्रेंड युनियन स्थापन करून आय एल यु शी संलग्न करीत आहेत.एखादया क्षेत्रात करिअर करायचंय म्हणून काम करणारे अनेक इंजिनियर लोक भेटतील पण आंबेडकरी विचारांची क्रांतिकारी राष्ट्रीय पातळीवर ट्रेंड युनियन उभी करण्यासाठी जीवाचे रान करणारा इंजिनियर एखादाच भेटेल. प्रशासनाच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात कामगार,कर्मचाऱ्यांना संघटित करून संघर्ष करण्यास तयार करणारा अधिकारी कुठेही भेटणार नाही.कामगारांना संघटित करून युनियन बनविली म्हणून बदली झाली,तर सुवर्ण संधी म्हणून नवीन ठिकाणी नव्या जोमाने काम करणारा इंजिनियर अधिकारी अशी ओळख निर्माण करणारा माणूस सेवा निवृत्तीनंतर घरी बसून नातवांना खेळवत बसला असतात.पण सेवा देत असतांना कामगार कर्मचाऱ्यांचे संघटना बांधणी करून प्रशिक्षित कार्यकर्ता पदाधिकारी निर्माण करणारा माझ्या दृष्टीने एकमेव नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी" म्हणजेच जे एस पाटील साहेब असावे.
      मी अनेक राजकीय सामाजिक नेते पाहिले,जे स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघटना पक्ष बांधणी करतात,तेव्हा ते तोंडात साखर डोक्यावर बर्फ व पायाला भिंगरी लावून फिरतात.तेव्हा कुठे त्यांचे थोडे फार नांव राहते.इथे पाटील साहेबांचे उलटे आहे,पायाला जरूर भिंगरी आहे,पण तोंडात साखर नाही,रोखठोक शब्दांत शिस्तबद्ध पध्दतीने काम करण्याची तंबी आहे,डोक्यावर बर्फ नाही तर सकारात्मक विचारांची प्रचंड ऊर्जा आहे.भावनिकता बिलकुल नाही,आंबेडकरी विचारांची क्रांतिकारी भाषे सोबत सनदशीर मार्गाने आचरणाचे हमी हवी आहे. भारतीय संविधानात दिलेल्या प्रशासकीय कामाचा दर्जा वेळोवेळी दिली जाणारी जबाबदारी तिचा तिमाही,सहामाही,वार्षिक सर्वसाधारण सभेत मजूर केलेला अहवाल सादर करण्यात कोणतीही सबब चालत नाही,प्रशिक्षण शिबिरात वेळेवर न येणाऱ्याला प्रवेश नाही.म्हणजेच नाही,असे कडक शिस्तीचे आंबेडकरी विचारांचे क्रांतिकारी नेते सर्वच क्षेत्रात निर्माण झाले असते तर आंबेडकरी समाज हा शासन कर्ती जमात शंभर टक्के झाला असतात.
    हजारो लोकांना गोळा करून संघटना स्थापन करून चालविण्या ऐवजी शंभर लोक रीतसर सभासद बनवून केलेलं काम निश्चितच ध्येय गाठण्यासाठी परिपूर्ण असते.त्यासाठी क्रांतिकारी विचारांची देवाणघेवाण नियमितपणे झाली पाहिजे.समस्या निर्माण होणार नाहीत यासाठी आदरणीय जे एस पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र मजदूर युनियन काम करते. त्यात देशभरातील संघटित असंघटित कामगार संघटना संलग्न होत आहेत,राष्ट्रीय पातळीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व क्षेत्रातील कामगार,कर्मचाऱ्यांनी संघटित व्हावे आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेत्याचे हात मजबूत करावे,आदरणीय जे एस पाटील यांच्या (६ ऑक्टोबर १९५५)  वर्ष पूर्ण करून ६८ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २०१७ पासून मी त्यांचा सोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे.त्या अनुभवावर हा लेख लिहला आहे
   लाखो कामगार कर्मचारी अधिकारी वर्गाला प्रेरणा देणारे एकमेव व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची साधी राहणी,उच्च विचार आणि शुद्ध आचरण हे कौतुकास्पद आहे. कोणत्याही पोस्टरवर,होडिंग वर फोटो टाकून प्रचार प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई करणारे नेते शोधून सापडणार नाहीत,अशा कडक शिस्तीच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलेल्या शिस्तबद्ध पद्धतीने ट्रेंड युनियनचे राष्ट्रीय नेतृत्व करणाऱ्या आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी" आदरणीय जे एस पाटील साहेब यांना जे निर्माण करून ठेवले ते एकाही आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी ६० वर्षात केले नाही.त्यांनी व्यक्तिगत आर्थिकदृष्ट्या खूप प्रगती केली असेल.पण संघटनेची संस्थेची साधन संपतीचे काय?.स्वताचे मालकी हक्काचे एक कार्यालय किंवा सभागृह नाही.मात्र जे.एस पाटील यांच्या कुशल त्यागी जिद्धी नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे बांद्रा मुंबईत म्हाडा कार्यालयासमोर सुप्रभात बिल्डींग मध्ये करोडो रुपयाचे कार्यालय आहे.नागपूर मध्ये मध्यवर्ती ठिकाणी निलकमल कॉम्प्लेक्स महाजन मार्केट सीताबर्डी येथे मध्यवर्ती कार्यालय व १०० लोक बसतील एवढे सभागृह आहे.प्रेरणा नगर, हजारी पहाड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कामगार प्रशिक्षण केंद्र तीन माजली इमारत आहे.त्यात एक हजार लोकांचे सभागृह,पाचशे,तीनशे लोकांचे वातानुकूलित सभागृह आणि दोन व्ही आय पी,सूट,सहा,आठ लोकांसाठी स्पेशल खाटची व्यवस्था,पाहुण्यांसाठी दोन खाटांचे आठ रूमची व्यवस्था आहे.कामगार कर्मचारी अधिकारी नागपुरात कामा निमित्याने आला तर हॉटेल लॉज वर राहण्याची गरज नाही.असेच प्रशिक्षण केंद्र तीन माजली इमारत औरंगाबाद तयार होत आहे.एका महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या बळावर हे निर्माण झाले आहे.स्वतंत्र मजदूर युनियन संलग्न युनियनचा काही प्रमाणात त्यात सहभाग आहे.सर्व क्षेत्रातील कामगार कर्मचारी अधिकारी वर्गाने अशा पद्धतीने काम केल्यास प्रत्येक तालुक्यात,जिल्ह्यात स्वताच्या मालकीचे कार्यालय व सभागृह उभे राहू शकते.हे केवळ आणि केवळ जे.एस.पाटील रमेश रंगारी सारखी इंजिनियर प्रशासकीय अधिकारी संघटीत झाल्या मुळे शक्य झाले.त्यात अनेकांचे मोलाचे योगदान आहे.आज वयाची ६७ वर्ष पूर्ण झाल्यावर ही जे एस पाटील घरात न बसता मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी आणि विशेष असंघटीत कामगारांना संघटीत करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या कोणते ही कारण न सांगता राज्यात आणि देशात स्वतंत्र मजदूर युनियन मजबूत करण्यासाठी फिरतात. म्हणूनच मी आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी" असे लिहतो.त्यांच्या त्या जिद्धीला ६७ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मानाचा मुजरा आणि लाख लाख शुभेच्छा.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप मुंबई
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य,


चल हल्ला बोल! महाविहार ताब्यात घेवू!!

चल हल्ला बोल!

महाविहार ताब्यात घेवू!! 


   जगातील बौध्द धम्मीयांचे जागतिक विश्‍वासस्थळ (मी येथे श्रध्दास्थान हा शब्द इतक्यासाठीच वापरत नाही की श्रध्दाला पुरावा नावाचा प्रकार नसतो पण विश्‍वासाला पुरावे असतात. एखाद्या व्यक्तीवर विश्‍वास असेल तर त्या व्यक्तीचा मनोभावे आदर केल जातो. उदा.भ.बुध्द,सम्राट अशोक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर इत्यादी व अशी कित्येक. आजही हयात असणार्‍या एखाद्या व्यक्तीवर विश्‍वास ठेवला जातो.कारण ती व्यक्ती विश्‍वासाला पात्र असते.पण श्रध्देला पुरावे नसतात.आजही नालायक मधला नालायक असलेल्या राजकारणी असो अथवा अन्य कोणी किंवा दगडाची मुर्ती असो त्यांच्यावर श्रध्दा व्यक्त करणारे लोक आहेत. ही श्रध्दा पुढे अंधश्रध्दात परिवर्तीत होते. पण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीवरचा विश्‍वास उडतो तेव्हा लोक त्या व्यक्तीपासून दूर होतात.) असलेले मगध राज्यातील सद्या बिहार राज्य (विहार शब्दाचा अपभ्रंश) गया येथील महाबोधी महाविहारात घुसखोरी झालेली आहे. ब्राम्हणी तथा सनातन वैदिक धर्मियांनी महाविहार आपल्या ताब्यात ठेवले आहे. याबाबत खाली पाहूच. दोन हजार वर्षापुर्वी मगध राज्यात सम्राट अशोक राजा यानी बौध्द स्वराज्याची निर्मिती केल्यानंतर सम्राट अशोकांनी बौध्दांच्या स्वराज्याचा झेंडा अटकेपार रोवला.आफगाणिस्तानापर्यंत स्वराज्याचा विस्तार केला.आजही आफगाणिस्तान हे जंक्शन आहे.तेथून चारी दिशेला जाण्यासाठी वाटा मिळतात.कदाचित म्हणूनच धम्म प्रसाराच्या दृृष्टीने सम्राट अशोक राजा यानी आफगाणिस्तानला आपली उपराजधानी बनवले असावे.तेथे मोठ्या प्रमाणात विहार बांधली असावीत. आफगाणिस्तानमधील बामियान प्रांतामधील डोंगर उतार्‍यावरील सुळ्या दगडात कोरलेली 150 फूट बुध्द मुर्तीं (चंगेझ खान,औरंगाजेब व तालिबान्यांनी मुर्ती तोडली) आजही भग्न अवस्थेत आहे. ह्यू-एन-त्सँग (चीन) हे बुध्दांची, धम्माची व धम्म संस्कृतीची माहिती जाणून घेण्यास इ.स. 629 ते 645  या दरम्यान भारत भेटीवर आले असता त्यानी 150 फूट मुर्ती पाहिली होती. त्यावेळी मुर्तीला साधा तडा गेला नव्हता. तेथेच त्यानी एका संघारामात एक हजार फूट लांबीची महानिर्वाण मुद्रेतील भ.बुध्दांची मुर्तीसुध्दा पाहिली होती. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की त्या काळी मगध राज्यापासून ते आफगाणिस्तानापर्यंत बौध्द धम्माचे उपासिका व उपासक वास्तवाला होते. 
   सम्राट अशोक राजा यानी 84 हजार बौध्द स्तूप बांधले. त्यातील एक बौध्द स्तूप म्हणजे महाबोधी महाविहार होय. बुध्दांच्या जीवनात जी चार ठिकाणं अविस्मरणीय ठरली ती चार ठिकाणं म्हणजेच 1.बुध्दांचे जन्म ठिकाण 2.बुध्दांना ज्या ठिकाणी बुध्दत्व प्राप्त झाले. 3.बुध्दांनी ज्या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन केले. म्हणजेच एक प्रकारे बौध्द धम्म स्थापनचे ठिकाण व 4.बुध्दांना महानिर्वाण प्राप्त झाले ते ठिकाण. या चारी अविस्मरणीय ठिकाणांवर सम्राट अशोक राजा यानी बौध्द स्तूप बांधली. त्यापैकीच बुध्दांना ज्या ठिकाणी बुध्दत्व प्राप्त झाले त्या गयातील महाबोधी महाविहार एक होय. सम्राट अशोक राजा हे कोणी ब्राम्हण किंवा ब्राम्हण्यवादी किंवा ब्राम्हणी धर्मातील सदस्य नव्हते. ते बौध्द होते. त्यानी बौध्द धम्माची दीक्षा घेतल्याचे भक्कम पुरावे आहेत. जगाने मान्य केले आहे की, महाबोधी महाविहार हे बौध्दांचे जागतिक वंदनास्थळ आहे. म्हणूनच जगातील बौध्द तथागतांच्या मुर्तीला पंचाग प्रणाम करायला येतात.जगात कुठेही बौध्द जन्माला येवो तो म्हणतो मला एकदा का असेना बुध्दांना ज्या ठिकाणी बुध्दत्व प्राप्त झाले तेथे सम्राट अशोक राजा यानी उभारलेल्या महाबोधी महाविहारात जावून वंदना व महाविहारातील बुध्द मुर्तीसमोर पंचाग प्रणाम करण्यास गेलेच पाहिजे. 
     महाविहार उभारल्यापासून ते आजवर तेथे जगातील बौध्द हे वंदनासाठी येत आहेत. त्यात खंड नाही. जगात प्रामुख्याने तीनच धर्माचे जागतिक धार्मिक स्थळ आहेत. 1.ख्रिश्‍चन धर्मियांचे व्हॅटकिन सिटी (रोम, इटली) 2. मुस्लीमांचे मक्का मदिना (सौदी अरेबिया) व तिसरे बौध्द धम्मीयांचे बुध्दगया (बिहार राज्य, भारत). या तीन धर्मिंयांचीच लोकसंख्या सर्वाधिक आहे. पृथ्वीच्या चारी बाजूला या तीन धर्माचेच अनुयायी, उपासक दिसतात. इ स.399 ते 414 या काळात बौध्द धम्माचा अभ्यास करण्यासाठी भारत भेटीवर आलेले फा हियान (चीन) यानी बुध्दगयाला भेट दिली. तेथील काही आठवणी त्यानी आपल्या प्रवास वर्णनात करताना ते लिहितात, ‘ज्या ठिकाणी बुध्दांना बुध्दत्व प्राप्त झाले, त्या ठिकाणी तीन संघाराम आहेत. त्या सर्वांत भिक्खू राहतात. त्या भिक्खूंना स्थानिक लोक आश्रय देतात आणि त्याना काहीही उणे पडू नये अशारितीने सढळ हाताने दान करतात. तेथे धम्मातील विनयाच्या नियमाचे कडकरित्या पालन केले जाते आणि बुध्दांच्या काळी जसे आदरणीय भिक्खू शिष्टाचार पाळीत त्याचप्रमाणे बसण्या-उठण्यात आणि सभेत पाळावयाचे शिष्टाचार हे भिक्खू पाळतात.’ याच भिक्खूंकडे महाबोधी विहाराच्या देखभालाची जबाबदारी असावी. तसेच तेथील लोक हे भिक्खूना सढळ हाताने मदत करतात याचा अर्थ ते बौध्द अनुयायी असले पाहिजेत.  चौथ्या शतकात गया हा परिसर बौध्दमय होता. मग आता तेथे ब्राम्हणी धर्माचे वर्चस्व कसे? महाबोधी महाविहार ब्राम्हणांच्या ताब्यात कसे? हे प्रश्‍न सहाजिकच पडणार.
   सम्राट अशोक राजा यांच्या महानिर्वाणानंतर पुढे त्यांच्या मौर्य घराण्यातील सात राजानी मगधचे सिंहासन सांभाळले. शेवटचा राजा बृहद्रथ मौर्य हे फारच दयाळू, मायाळू व धम्माबाबत संवेधनशील होते. कदाचित त्यामुळे व ब्राम्हणांचा राग हा सम्राट अशोकांवर असावा. दि. 6 जून 1950 रोजी श्रीलंकाची राजधानी कोलंबो येथील कार्यक्रमात बोलताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘सम्राट अशोकाच्या काळात कुलदेवतापूजेची निंदा करण्यात आली. अशोक म्हणतो, मी बौध्द धर्माच्या मार्गाचे अनुकरण करीत असल्यामुळे मला दुसर्‍या कोणत्याही देवी देवतांची पूजा करण्याची गरज नाही आणि त्याने आपल्या प्रशासनाधिकार्‍यांना आदेश देवून कुलदेवतांच्या मुर्ती काढून टाकल्या. हा ब्राम्हणांवर फार मोठा प्रहार होता. कारण यामुळे त्यांच्या उपजिविकेला व धूर्त प्रचाराला फार मोठा धक्का बसला आणि ते त्याचा बदला घेण्यास सिध्द झाले.’ दिडशे वर्षापुर्वी ब्रिटीशांनी ब्राम्हणी धर्मातील रूढी परंपरा विरोधात कायदे करण्यास सुरूवात केली, प्रबोधनासाठी शैक्षणिक संस्था उघडल्या, प्रसार माध्यमांना चालना दिली तेव्हा ब्राम्हण्यवाद्यांनी राष्ट्र स्वातंत्र्याच्या नावाखाली धर्मावर आलेले ब्रिटीशरूपी संकट दूर करण्यासाठी हाती शस्त्र घेवून मैदानात उतरले. हे अलिकडचे उदाहारण. मौर्यांच्या सैन्य दलात सेनापती असलेल्या पुष्यमित्र शुंगाने राजा बृहद्रथ याना कपटकारस्थान करून ठार मारले आणि सत्ता आपल्या हातात घेतली. हयू-एन-त्सँग हे राजा शशांक याने बोधीवृक्षाचे नुकसान केल्याचे सांगतात.याचा अर्थ 6 व्या शतकात होवून गेलेला राजा शशांक हा ब्राम्हणी धर्माचा समर्थक होता.पण त्याला बौध्द धम्माचा र्‍हास करता आला नाही. मात्र पुष्यमित्र शुंग त्याचा बाप निघाला.या पृथ्वीतलावर एक बौध्दच काय पण भिक्खूही दिसता कामा नये यासाठी भिक्खूंची मुंडकी तोडून आणणार्‍यांना घसघशीत रोख इनाम जाहीर केले. त्याने शस्त्राच्या धाकानेच बौध्दांना आपल्या धर्मात ओढले. जे कट्टरवादी होते त्याना ठार मारले, तर काहींना आपल्या धर्मात गुलाम केले.जे आज अस्पृश्य,भटके,आदिवासी,बलुतेदार म्हणून जगत आहेत. ज्यांची वस्ती आजही गावकुसाबाहेर आहे. शुंगाच्या काळातच ब्राम्हणी धर्माचे शंकराचार्य पीठ निर्माण झाले. सम्राट अशोक राजा यानी  धम्म प्रसारासाठी चार धम्म पीठांची स्थापना केली,तसे जम्बुद्विप भारतात चार शंकराचार्य पीठ उभारलीत.चार शंकराचार्य पीठानी आपल्या धर्माचे देवालयं उभारणीसाठी बौध्द स्तूपांचा वापर केला.आजही बहुतांशी प्राचीन हिंदू देवालयं आहेत,ती बौध्द विहारं असल्याचे दिसते.त्यातील बुध्द मुर्तींचे स्त्री देविकामध्येही रूपांतरित केल्याचे दिसते. अन्यथा 84 हजार बौध्द स्तूपांपैकी बहुतांशी स्तूपं कुठे गेली? जमीनीत तर गाडली नाहीत. 
   आजच्या विषयाकडे जावूया,वरील वाचन केले तर महाबोधी महाविहार हे बौध्द धम्मीयांच्य मालकीचे आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही.पण शंकराचार्याच्या पीठानंतर महाबोधी विहार विदेशी आर्यांनी म्हणजेच ब्रामहवृंदांनी आपल्या ताब्यात घेतले. महाविहारात जगभरातील बौध्द आदरपुर्ती पूजासाठी येत होते हे आठराशे वर्षापुर्वी ह्यू-एन-त्सँग सांगत असतील तर त्या बौध्द उपासकांकडून महाविहारात मोठ्या प्रमाणात दान केले जात असावे.आजही महाबोधी विहारात देश-विदेशातील बौध्द मोठ्या प्रमाणात दान करतात.बौध्द धम्मात दहा पारमितामध्ये दान पारमिता असल्याने बौध्द अनुयायी दान पारमिताला अन्ययसाधारण महत्व देतात. ‘दान जेथे ब्राम्हण तेथे’ हे सूत्र आजही हिंदू देवालयामध्ये दिसून येते.पंढरपुरातील विठ्ठल मंदिर असो,आंध्रातील तिरूपती मंदिर असो अथवा ओडिसा राज्याच्या पुरीतील जगन्नाथ मंदिर असो अथवा उत्तराखंडातील केदारनाथ मंदिर असो ही सारी मंदिर बौध्द विहार म्हणून प्रसिध्द होती.तेथे हजारोच्या संख्येने बौध्द वंदनासाठी येत होते.दान करत होते.त्या विहाराचं मंदिरात रूपांतर केल्याचे पुरावे बौध्द असतात.
     भारतात ब्रिटीश साम्राज्य होते तेव्हा काही ब्रिटीश अधिकार्‍यांनी धम्माच्या संस्कृतीची ओळख असलेल्या अनेक विहार,स्तूप, शिलालेखांची खोज केली.त्यापैकीच एक अजंठा वेरूळची लेणींचा शोध घेतला.ब्रिटीश अधिकारी अलेक्झांडर कलिंघम यानी महाबोधी महाविहार हे बौध्दांचे असल्याचे सांगितले.कलिंंघमच्या काळी बिहार राज्यासह बहुतांशी भारत हा बौध्द धम्माच्या दृष्टीने शून्यवत होता.त्यामुळेच महाबोधी विहाराच्या मालकीसाठी संघर्ष करण्यासाठी बौध्द कमी होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी 1956 ला धम्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या बरोबर लाखो बहुजनांनी धम्म दीक्षा घेतली आणि त्यानंतर आजपर्यंत भारतात रोज कुठे ना कुठे धम्म दीक्षा समारंभ होताना दिसतात.भिक्खूंच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे.त्यामुळे भिक्खू व बौध्दांना भारतातच नव्हे,तर जम्बुद्विप भारतात धम्माची वारसास्थळं असून ती आपणासकडे यावीत अशी मागणी करत आहेत.त्यापैकीच एक असलेले महाबोधी महाविहार. 
    स्वतंत्र भारत झाल्यानंतर महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात दिले पाहिजे अशी मागणी केली जात आहे.संविधान लिहिले बौध्द महाउपासकाने.पण बौध्दांच्या हाती सत्ता नसल्याने संविधानाची अंमलबजावणी करणारे निघाले कर्मठ सनातनी.बुध्दगया मंदिर कायदा-1949 कायदा झाला.त्या कायद्यामध्ये महाबोधी महाविहाराल मंदिर असे संबोधले.तसेच त्या कायद्यानुसार महाबोधी महाविहाराच्या देखभालीसाठी एका समिती असण्याची तरतूद केली.त्या समितीमध्ये एकूण 9 सदस्यांपैकी पाच सदस्य हिंदू व चार बौध्द असतील. म्हणजे सर्वाधिक सदस्य हिंदूच असल्याने तेच संख्येच्या जोरावर निर्णय घेणार.चार बौध्द देखील त्यांचीच आहेत. ते केवळ नावालाच बौध्द आहेत. हे लक्षात घेवून भिक्खू संघाने गेल्या काही दिवसापुर्वी महाविहाराच्या आवारातच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू केले.17 दिवस आंदोलन सुरू राहिल्यानंतर बिहार पोलीसांनी रात्री अपरात्री येवून आंदोलन करणार्‍या भिक्खूंना जबदरस्तीने उचलून गाडीत घालून अज्ञातस्थळी नेले.बिहार राज्यातील सत्तेत भाजपचीही भागिदारी आहे.सद्या भाजपला या देशाला हिंदु राष्ट्र करायचा आहे.मग बिहारमधील भाजप सत्ताधीश महाबोधी विहार बौध्दांकडे देणे शक्य नाही.कारण ब्राम्हण्यवादी लोक एखाद्याचा धर्म कसा हायजॅक करण्यात, इतर धर्म कसे नालायक आणि आपलाच धर्म कसा लायक हे सांगण्यात पटाईत आहेत. 
      बौध्द धम्माला संपविण्यासाठी नानाविध षडयंत्र केलीत. पहिल्यांदा त्यानी बौध्द धम्मातील उत्सवावर आघात केला. धम्मातील उत्सव जेव्ह आहेत तेव्हा आपले उत्सव सुरू केले. दोन्ही उत्सवामध्ये 180 अंशाचा फरक राहणार नाही याची काळजी घेतली.त्यानंतर त्यानी बुध्दांना ब्रम्हदेव विष्णूचा नववा अवतार केला.अवतार पॅटर्न हा ब्राम्हण्यवाद्यांचाच. बौध्द स्तूप व विहारांचे मंदिरात रूपांतर केले.बौध्द लेण्याना पांडव लेणी करून टाकले व त्या ठिकणी पिंड बसवून शंकराचं ध्यानस्थ ठिकाण केले. ब्राम्हण्यवाद्यांनी जरा देखील बौध्द धम्माबद्दल सहानुभूती दाखवली नाही. परकीय मुस्लीमांना बुध्द मुर्ती फोडण्यास प्रोत्साहन दिले. सम्राट अशोक काळातही ते कुरघुड्या करत होते. पण सम्राट अशोक राजा यानी त्याना आसरा दिला. त्यांना बरोबरची स्थान दिले. त्याना संरक्षण दिले. हेच अंगलट आले. आजच्या राजकारणातीलही उदाहरण घेतले, तर काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता येत होती. तेव्हा काँग्रेस सत्ताधार्‍यांनी आपल्या धर्माचे म्हणून आरएसएसने स्थापन केलेल्या भाजप,विश्‍व हिंदू परिषदच्या लोकांना जवळ केले.पण आता भाजपची सत्ता येताच भाजप नेत्यांकडून ‘काँग्रेसमुक्त भारत’ ची घोषणा केली आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात ईडी,सीबीआय, इन्कम टॅक्स लावून त्याची तोंडे बंद केली जात आहे. विरोधकांची ताकद कमी करायची हाच नियम सर्व क्षेत्राासठी लागू आहे. सम्राट अशोक राजा यानी सम्यक ऐवजी टोकाचा मानवतावाद दाखवला. दि. 6 जून 1950 रोजी श्रीलंकाची राजधानी कोलंबो येथील कार्यक्रमात बोलताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘सम्राट अशोक वाजवीपेक्षा जास्त सहनशील होता. यामुळे मी त्याला दोष देत आहे.सम्राट अशोकांने आपल्या कारकिर्दीत बौध्द धर्माशिवाय अशा अनेक धर्माना प्रचाराची मुभा देवून ठेवली होती की,जे बौध्द धर्माचे कट्टर दुश्मन होते. यामुळे बौध्द धर्माच्या विरूध्द असणार्‍या अधर्मांना आपली शक्ती वाढविण्याची पुरेपूर संधी प्राप्त झाली व हाच बौध्द धर्माला पहिला आघात होय असे मला वाटते.’ पुंद्रवर्धन या जैन साधकाने महावीर समोर भगवान बुध्द नतमस्तक झालेले चित्र काढले होते ते सम्राट अशोक राजा याना समजल्यावर त्यानी पुंद्रवर्धनला पकडण्याचा हुकूम काढला. इतकेच नव्हे तर त्याच्या पंथातील सुमारे 18 हजार आजीवकांना ठार करण्यचे फर्मान काढले. काही काळाने पाटलीपूत्र येथे आणखीन एका जैन साधकाने असेच चित्र काढल्यानंतर त्या साधकाला व त्याच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याची आज्ञा केली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्यात तथ्थ असेल, तर हाच कठोरपणा सम्राट अशेक राजा यानी ब्राम्हण्यवाद्याबद्दल ठेवला असता तर आज एससी,एसटी एनटी, व्हीजेएनटी,ओबीसी, एसबीसी या प्रवर्गात जितक्याही जाती आहेत त्या जातीचे लोक बौध्द असते. त्याना सनातनी धर्मात जाण्याचा प्रसंगच उदभवला नसता,त्यांच्या डोक्यात काल्पनिक व अवतारी देव नावाची कल्पनाच मान्य झाली नसती,असे म्हणावे लागेल.सम्राट अशोक राजाशिवाय इतर बौध्द राजा म्हणजेच 6-7 शतकापर्यंत राजा हर्षवर्धन पर्यंत राजांनी देखील विदेशी आर्यांचे लाड केले असावेत तसेच त्यांच्या सनातनी धर्माला आश्रय दिला असावा.त्याशिवाय त्यांचे बळ वाढले नसावे.
    गेल्या दहा वर्षापासून देशात पुन्हा ब्राम्हण्यवादाने उचल घेतली आहे. महाबोधी विहार हे बौध्दांचे आहे आणि राहणार आहे.आयोध्यातील राम मंदिराची देखभाल करण्यासाठी जसा हिंदूंना जैन,मुस्लीम,ख्रिश्‍चन, शीख,बौध्द चालत नाही,तर मग महाबोधी विहारात ब्राम्हण कसे? विहाराच्या आवारात श्राध्दपक्ष, होमहवन विधी का केला जात आहे? याला काँग्रेस पक्षाचे सरकार जबाबदार आहे. सन 2014 पुर्वीपर्यंत 1999 व 1977 चे काँगे्रसत्तर सरकार वगळता स्वतंत्र भारतात काँग्रेस पक्षाचेच सरकार केंद्रात होते. काँग्रेसचे सरकार असतानाही बौध्द भिक्खूंनी महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात देण्याची मागणी केली.पण काँग्रेसमध्येही ब्राम्हण्यवादी होते. आता तर ब्राम्हण्यवाद्यांचीच सत्ता केंद्रात आहे. ते कदापीही महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात देणार नाहीत. त्यासाठी बौध्दांनीच एकजूठ होवून महाबोधी विहारमुक्तीचे आंदोलन हाती घेतले पाहिजे. प्रसंगी सरकारवर ‘चल हल्ला बोल’ चा नारा दिला पाहिजे. टिळक,गोडसे,आपटे,सावरकर अशी कित्येक नाव सांगता येतात की त्यानी आपल्या देव व धर्मासाठी प्राणाची तमा केली नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी बौध्द धम्म का दिला याचा प्रत्येकांनी निट विचार केला पाहिजे.जर बौध्दच असू तर घरात धम्माचेच संस्कार घडवून पाहिजे.सर्व घरांतील धम्म संस्काराची मिळून संस्कृती होते आणि त्या संस्कृतीचा समाज होतो.अर्थात बौध्द समाज.डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना मारणार्‍या वस्तीच्या दर्शनी बाजूला बौध्दवाडी,बौध्द समाज डॉ.आंबेडकर नगर भीमनगर,बुध्द नगर,सिध्दार्थनगर,पंचशील नगर वगैरे पाट्या वाचायला मिळतात, पण त्या वस्त्यां खर्‍याच बौध्द संस्कारमय झाल्या आहेत का? नसतील तर महाबोधी महाविहार ब्राम्हण्यवाद्यांच्या ताब्यातून मुक्त होण्याचेही कोणी स्वप्न पाहू नये.वल्गना करू नये.बौध्द पध्दतीने केवळ लग्न,गृहप्रवेश,मरणोत्तर विधी वगैरे घरातील समारंभ केले आणि इतरवेळी हिंदू धर्मातील सणवार,रूढी, परंपरा जपण्याने म्हणजे कोणी बौध्द होवू शकते का?
देवदास बानकर ९२२५८०६९९०,संपादक दैनिक मुक्तनायक
मधील ‘जे आहे ते’ या सदरातील संपादकीय लेख.कोल्हापुरातून गेले 17 वर्षे अखंडपणे नियमित सुरू असलेले पश्‍चिम महाराष्ट्रातील एकमेव सर्वाधिक खपाचे व लोकप्रिय दैनिक मुक्तनायक.