शनिवार, २३ जून, २०१८

आंबेडकरी विचारधारा आणि ट्रेंड युनियन बांधणी

आंबेडकरी विचारधारा आणि ट्रेंड युनियन बांधणी
भारतात शोषितांच्या वंचितांच्या मानसन्मानसाठी न्याय हक्क व प्रतिष्ठे साठी झटणारा आणि संघर्ष करणारा एकच नेता होऊन गेला त्यांचे नांव डॉ बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या जीवनात त्यांनी जेवढा अन्याय अत्याचार आणि अपमान सहन केला तेवढा आज कोणीच सहन करू शकत नाही.तरी त्यांनी कधीच हार मानली नाही किंवा संघर्ष टाळला नाही.उपाशी अर्धपोटी राहून त्यांनी अभ्यास केला शिक्षण पूर्ण केले.पण नोकरी शोधली नाही.समाजासाठी संस्था, संघटना आणि पक्ष स्थापन केला.परंतु आज त्यांच्या सर्व संस्था, संघटना आणि पक्ष क्रांतिकारी विचारधारे पासुन दूर गेल्या व श्रेष्ठ कोण "व्यक्ती की संघटना" यात अडकल्या आहेत. त्यामुळे कितीही गंभीर समस्या आल्या तरी यांचा अहंकार काही कमी होताना दिसत नाही.
नेत्याला आपल्या कर्तृत्वावर आत्मविश्वास असावा लागतो.त्यासाठी गांव पातळीवर संघटना बांधणी असावी लागते.पण गांव तालुका, जिल्हा पातळीवर संघटना बांधणी नसताना आपल्याच कर्तुत्ववावर आपला आत्मविश्वास ठेऊन ते नेते आणि कार्यकर्ते आयुष्यात चळवळीला दिशा देऊ शकत नाही. सर्व समाजाला एकत्र करण्याचा त्यांचा प्रयत्न चांगला असला.तरी स्वतःच्या समाजातील गटबाजी कायमस्वरूपी ठेऊन इतर समाजा कडून अपेक्षा करणे चुकीचे आहे.संपूर्ण देशात व महाराष्ट्रात वातावरण प्रचंड असंतोषाचे विशेष मागासवर्गीय समाजा बाबत असतांना आपण एकजूट झालो नाही तर २०१९ ला कसे सामोरे जाणार?.
गोंदिया भंडारा पोटनिवडणुकीत आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटना पक्ष कागदावर एकत्र येऊन प्रचार करीत होते.त्यात दोन महा अनुभवी असलेले नेते त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रचंड ताकदीने एकमेकांना टार्गेट करीत होते.पण ग्रामीण भागातील समस्या गावात राहून सोडायच्या असतात.रोजीरोटी,उद्योग धंदे यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाठबळ लागत असते.तिथे कामगार कर्मचारी अधिकारी सरकारी निमसरकारी संघटित पणे संघटने सोबत काम करीत असतात.त्यांचे उत्तम उदाहरण खैरलांजी हत्याकांड नंतरचे प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचारी आणि अधिकारी मागासवर्गीय असूनही राजकीय दबावाखाली त्यांनी योग्य काम केले.त्या हत्यांकडातील राजकिय आशीर्वाद देणारे नेते तेव्हा पासुन विजय होत आहेत. त्यांनी पक्ष बदला तरी काही फरक पडत नाही.ते एकमेकांचे मावस भाऊ, आत्या भाऊ,सगे सोयरे आहेत. त्यामुळे त्यांचे संघटन गांव पातळीवर आहे.हे आपण विसरतो.मागासवर्गीय समाजाच्या लोक संख्येवर मतदानावर सर्व नेते हक्क सांगतात.पण त्यासाठी गांव पातळीवर कोणते काम करतात हे सांगत नाही. संत तुकडोजी महाराज यांनी ग्राम गिता या ग्रंथात दोन ओळीत संघटनेचे महत्व व्यापकतेने विषद केले आहे.ते म्हणतात,
"हत्तीस आवरी गवती दोर ! मुंग्याही सर्पास करती जर्जर !! रानकुत्रे संघटोनी हुशार ! व्याघ्रसिंहासी फाडती !! हे मी कुठे वाचले नाही.लाखनी,अडयाल पवनी येथे 78 वर्षाच्या जेष्ठ पत्रकार, अभ्यासक, यांच्या घरी व भंडारा येथे महसूल विभाग कॅन्टीनमध्ये चार जेष्टनेत्याच्या तोंडून ऐकले आहे.ज्यांनी बॅरिस्टर खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली 1978 ला जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती पद भोगून वीस वर्षाचा मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी विविध प्रकारच्या निधीचा वापर कसा झाला.मागासवर्गीय समाजाच्या सरकारी नोकरी तील जागा ग्रामसेवक, शिक्षक, कोतवाल तशिलदार ते जिल्हाधिकारी कसा भरल्या यांची तपशीलवार माहिती गोळा केली.त्यासाठी संघटना लागते. प्रत्येक क्षेत्रातील कामगार कर्मचारी अधिकारी आणि ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर हा त्या त्या पातळीवर संघटित असतो.यावरुन मानवाच्या जीवनात संघटनेचे महत्त्व किती मोठे आहे.हे आपण समजू शकतो.मनुष्य हा समाजशील प्राणी आहे असे म्हणतात.समाजात राहूनच मानवाचा सर्वांगीण विकास होत असतो.त्याच्या व्यक्तीमत्वाला विविध कंगोरे फुटून त्याचे व्यक्तिमत्त्व बहरत असते.जो माणूस समाजशील नसतो तो कितीही बुद्धिवान,पैसेवान असला तरी एका विशिष्ट मर्यादेच्या पलिकडे समाजाला त्याचा उपयोग होत नाही. म्हणूनच प्रत्येकाच्या जीवनात संघटनेचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे.जी जी व्यक्ती कोणत्या तरी संघटने सोबत जुळलेली असते. त्या त्या व्यक्तींना लोक ओळखत असतात. इतरांपेक्षा जास्त मानसन्मान मिळत असतो. काही व्यक्ती संघटनेत खूप किर्याशील असतात. त्यांना जास्त प्रसिध्दी मिळते. संघटना जर काळानुरुप मोठी होत गेली, नावलौकीकास आली तर आपोआपच कार्यकर्त्यांचेही नाव व्हायला लागते. त्यांना प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पद, पत, मिळायला लागते. काही कार्यकर्ताच्या डोक्यात मग या प्रसिद्धी व पैश्याची हवा चढायला लागते.ते स्वतःला संघटनेपेक्षा मोठे समजायला लागतात. त्यांच्यात प्रचंड अहंकार निर्माण होतो. माझ्या मुळेच ही संघटना आहे असे त्याला वाटू लागते. मीच या संघटनेला मोठे केले असा अहंगंड त्याच्यात निर्माण होतो.मग त्या व्यक्तीचे वागणे, बोलणे, चालणे पूर्णपणे बदलून जाते. ज्या कार्यकर्त्यांच्या प्रेमावर आणि श्रमावर तो "मोठा" झालेला असतो त्यांनाच तो तुच्छ समजायला लागतो. त्यांच्यासोबत बोलायला त्याला आता वेळ नसतो. त्यांचे फोन उचलण्यात त्याला कमीपणा वाटतो. आता त्याचे वागणूक "attitude" पूर्णतः बदललेले असतात.आणि इथूनच मग त्याच्या -हासाला सुरुवात होते.जगातील कोणत्याही संघटनेच्या व कार्यकर्त्या बाबतीत हे असेच घडत असते. संघटनेत काही वक्ते, लेखक, प्रचारक असतात. त्यांच्या माध्यमातून संघटनेची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहचवायची असतात. वक्ते, लेखक हे संघटनेचे वैभव असतात. परंतु सभासद संघटनेचा प्राण असतो, आत्मा असतो. त्यामुळे "या" मंडळीं पेक्षा कार्यकर्ता अत्यंत महत्वाचा असतो. म्हणून एखादा वक्ता किंवा लेखक याला विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त महत्व देवू नये. सर्वांना महत्व दिल्या गेले पाहिजे. नाहीतर "ही" मंडळी डोक्यावर चढतात आणि स्वतःला संघटनेपेक्षा मोठी समजायला लागतात.मग आता त्या व्यक्तीची महत्वाकांक्षा प्रचंड वाढायला लागते. तो आता मर्यादेच्या पलिकडेचे स्वप्न पाहतो आणि आता आपण या संघटनेतून बाहेर पडलो तर ही संघटनाच संपून जाईल असा त्याचा भ्रम होतो.मग तो संघटनेच्या विरुध्द कारवाया करायला लागतो. बोलायला लागतो.कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न करतो.आणि संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न करतो.परंतु सदस्य,सभासद  हुशार आणि निष्ठावंत असल्यामुळे त्याच्या कारस्थानाला बळी पडत नाही. उलट कार्यकर्ते त्यालाच जाब विचारतात. संघटनेने मोठे केले नसते तर तुला गावाच्या बाहेर कोणीही ओळखले नसते असे त्याला अधिकार वाणीने सांगतात. आतापर्यंत सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात त्याच्याबद्दल असलेली इज्जत झिरो होऊन जाते. मागे वळून पाहिल्यावर त्याच्यामागे कोणीच दिसत नाही. मग त्याचे डोळे उघडते,पश्चात्ताप होतो, संघटनेचे महत्व समजते. आपल्यामुळे संघटना नाही तर संघटनेमुळे आपण होतो याची त्याला जाणीव होते. पण आता वेळ निघून गेलेली असते. काही क्षणासाठी मोठे लोक सोबत असतात पण आपले संरक्षण करणारा, आपल्यासाठी जीव देणारा कोणीच जीवाभावाचा सामान्य कार्यकर्ता मात्र आपल्यासोबत नाही याची त्याला जाणीव झाल्यावर त्याची रात्रीची झोप हराम होवून जाते. तो एकाकी पडतो. पैसे कितीही मिळाले तरी कार्यकर्त्यांचे प्रेम आणि आपुलकी मात्र त्याला कधीच मिळू शकत नाही. पण जो कार्यकर्ता संघटनेसोबत प्रामाणिक असतो त्याला त्याचे फळ एक दिवस निश्चितच मिळते. "फितुर" म्हणून त्याला कोणीही हिणवत नाही. प्रामाणिक म्हणूनच सर्वजण त्याच्याकडे पाहतात. म्हणून कोणत्याही संघटनेत काम करणा-या कार्यकर्त्यांनी आपल्या संघटनेसोबत एकनिष्ठ राहावे.संघटनेत रुसवे, फुगवे, नाराजी, वादविवाद चालतच असतात.पण ज्या संघटनेमुळे आपल्याला "सर्वकाही" मिळाले त्याच्यासोबत मात्र कधीच धोकेबाजी करु नये.नाहीतर इतिहासात त्यांची गद्दार म्हणून नोंद होते. आंबेडकरी
 क्रांतिकारी विचारधारा असणाऱ्या सर्व संस्था,संघटना आणि पक्ष आज कोणत्या मार्गाने जात आहेत.या कोणत्या प्रश्नावर एकत्र येऊ शकतात?.या सर्वांना एकाच ठिकाणी आणण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1936 स्थापन केलेली स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु ) ही राष्ट्रीय ट्रेंड युनियन करू शकते. जगातील कामगारांनो एक व्हा सांगणारे जाती धर्माच्या शोषणाच्या विरोधात बोलत नव्हते म्हणून मनुवादी, हिंदुत्ववादी संघटना पक्ष आज डोके वर काढत आहेत त्यांना मोठ्या संख्येने आर्थिक पाठबळ आणि मतदान याचं कामगार कर्मचारी अधिकारी वर्गाने केले.त्यांच्या मुळेच सर्व सरकारी उद्योग धंद्याचे खाजगी कारण कंत्राटी कारण होत आहे त्याला बारा राष्ट्रीय ट्रेंड युनियनने व त्यांच्या राजकीय पक्षांनी ठोस भूमिका घेऊन जबाबदारी पार पाडली नाही.त्यांचा सर्वात मोठा बळी मागासवर्गीय समाजातील कामगार कर्मचारी अधिकारी आणि विद्यार्थी ठरत आहे.म्हणूनच आंबेडकरी विचारधारा आणि ट्रेंड युनियन,संघटना यांची बांधणी होणे आवश्यक आहे. त्याकरिता स्वतंत्र मजदूर युनियन म्हणजे आय एल यु राष्ट्रीय ट्रेंड युनियन सर्वव्यापी झाली पाहिजे तरच संविधानाच्या चौकटीत देशात बहुजन हिताय बहुजन सुखाय होऊ शकते.
सागर रामभाऊ तायडे,भांडुप, मुंबई 9920403859,

पुस्तके दान करणारे लिंमचंद आलीकने

ज्ञान वृद्धी व क्रियाशील कार्यकर्ता घडविण्यासाठी 
पुस्तके दान करणारे लिंमचंद आलीकने

जगात वाचन संस्कृती जपणारे जागरूक वाचक खूप आहेत.म्हणूनच दरवर्षी लाखो पुस्तक ग्रंथ लिहिली जातात. व विकली जातात.त्याच प्रमाणे साप्ताहिक, पाक्षिक, मासिक आणि दैनिक नियमितपणे प्रसिध्द होत असतात. त्यांचा वाचक ही मोठा जागरूक वाचक असतो.दैनिक भंडारा पत्रिका विदर्भातील पांच सहा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांच्या घराघरात जाते. त्यांचे संपादक राजेश चेटूले यांनी व त्यांच्या संपादकीय मंडळींनी गेल्या एक दीड वर्षा पासुन दर आठवड्यात माझा लेख छापून मला खूप प्रसिद्धी दिली. त्यातीलच आयुष्यमान लिंमचंद राजाराम आलीकने हे जागरूक वाचक आहेत.दार गुरुवारी किंवा शुक्रवारी लेख वाचून झाला की सकाळी साडेसात ते आठ च्या दरम्यान यांचा कॉल आल्या शिवाय राहत नाही.हे असे कसे लिहले?. ते तसे पाहिजे होते.हे माहिती कोणत्या पुस्तकातुन घेतली. अशी नियमितपणे परखडपणे प्रतिक्रिया व्यक्त करणारे लिंमचंद बाबा त्यांचे वय 78 वर्ष आहे.भद्रावती चंद्रपूरच्या ऑडनरी फॅक्टरीत काम करणारे कुशल गुणवंत कामगार होते.त्यांची शेतजमीन व घर सर्व गोसीखुर्द धरणात गेले.ते नोकरी निमित्ताने गावाबाहेर होते म्हणून त्यांची विस्थापित म्हणून नोंद झाली नाही.सर्व कायदेशीर नोंदी असलेले कागदपत्रे असतांना ही त्यांना न्याय मिळाला नाही.त्याविरोधात संघर्ष करण्यासाठी  निवृत्तीनंतर अडयाळला राहले.आज ही सनदशीर मार्गाने संघर्ष करीत आहेत. वयोमानानुसार अनेक आजार असणारच पण व्यायामाची नियमित सवय आणि विपश्यना करीत असल्यामुळे तरुणांना लाजवेल अशी जिद्द त्यांच्यात आहे.सामाजिक बांधिलकी आंबेडकरी चळवळीची दिशा आणि दशा याबाबतीत पत्रकार, लेखक, साहित्यिक विचारवंत यांना फोन करून नेहमी तळमळीने बोलतात. ते फक्त बोलत नाही तर त्यांनी या सर्व चळवळीशी बांधिलकी ठेवली आहे.त्यासाठी ते अनेक दैनिक,साप्ताहिक,पाक्षिक, मासिकाची वार्षिक वर्गणीदार बनले आहेत. "बंद दरवाज" हे मासिक कोणत्या चळवळीचे आणि कोणत्या संपादकाचे आहे आपणास माहिती आहे काय ?. विपश्यना वरील मासिक,बामसेफचे दैनिक मूलनिवासी नायक, मूलनिवासी संघटक,पैगाम,जनतेचा महानायक, प्रबुद्ध भारत यात लिहणाऱ्यां लेखकाशी मोबाईल वरून संपर्क ठेवतात.त्याच बरोबर अनेक समस्या वर अनेकांना कॉल करून प्रोत्साहन देण्यासाठी संपर्क साधतात.अशा लिंमचंद राजाराम आलीकने यांनी मला नियमितपणे कॉल करून भेटण्यासाठी येण्यास भाग पाडले.माझे वय झाले आहे. माझे कधीही निधन होईल आणि मी गेल्यावर मी जमा केलेली ही पुस्तके ग्रंथ रद्दीत विकल्या जातील. त्यापेक्षा तुमच्या सारख्यानां दिल्यास त्यांची योग्य दखल घेतली जाईल, ते तुम्ही वाचुन तुमच्या ज्ञानात भर पडेल व आणखी ताकदीने लिहणार ज्ञान वृद्धी व क्रियाशील कार्यकर्ता घडविण्यासाठी ही पुस्तके खुप उपयोगी पडतील आणि लाखो वाचकांचे प्रबोधन करणार म्हणूनच मला ही पुस्तके तुम्हाला दान करायची आहेत.ती त्यांनी मला 22 मे 2018 त्यांच्या घरी दान दिले.ती खालील प्रमाणे आहेत.
1) भारतीय इतिहासाचे साक्षीदार, लेखक डॉ कृष्णकांत कवडुजी डोंगरे,देणगी मूल्य 300 रुपये, (2) डॉ आंबेडकर जीवन और मिशन,लेखक एल आर बाली,संपादक भीम पत्रिका, देणगी मूल्य 200 रुपये, (3) भारत के आदीनिवासीयो का इतिहास, लेखक ऍड एच लाल दिल्ली हायकोर्ट देणगी मूल्य 200 रुपये, (4) बौद्ध कालिन भारत का इतिहास, लेखक मुंशी एन एल खोब्रागडे, देणगी मूल्य 50 रुपये, (5) क्रांती आणि प्रतिक्रांती,लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर देणगी मूल्य 50 रुपये, (6) अस्पृश्य मूळचे कोण?.आणि ते अस्पृश्य कसे बनले?.लेखक भिमराव रामजी आंबेडकर देणगी मूल्य 50, (7) शेतकऱ्यांचा आसूड आणि इशारा ,लेखक महात्मा ज्योतीराव फुले,देणगी मूल्य 50 रुपये, (8) इतिहास तज्ञ चंद्रनाग आणि बौद्ध स्थळाचा शोध व बोध,लेखक दीक्षित बाबुराव आवळे देणगी मूल्य 60 रुपये, (9) नाग बौद्धो की पावन धरोहर पवनी के स्तूप पर हिंदुओ का जगन्नाथ मंदिर द्वारा अतिक्रमण क्यो?.,लेखक हबीर अंगार ई, देणगी मूल्य 100 रुपये, (10) आत्मदर्शन लेखक सत्यनारायण गोयंका देणगी मूल्य 30 रुपये, (11) बौद्ध जीवन मार्ग,लेखक मधुकर ताकसांडे, देणगी मूल्य 10 रुपये, (12) जागे मंगल प्रेरणा, लेखक सत्यनारायण गोयंका देणगी मूल्य 35 रुपये, (13) समाधी मार्ग, लेखक धर्मानंद कोसंबी देणगी मूल्य 24 रुपये, (14) कल्याण मित्र, लेखक सत्यनारायण गोयंका देणगी मूल्य 35 रुपये, (15) आत्मकथन भाग 1,लेखक सत्यनारायण गोयंका देणगी मूल्य 35 रुपये, (16) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म देणगी मूल्य 60 रुपये, ही एकूण 1039 रुपयांची पुस्तके आयुष्यमान लिंमचंद राजाराम आलीकने राहणार सौंदड अडयाळ,तालुका पवनी जिल्हा भंडारा यांनी ही मला अभ्यासपूर्ण लिखाण करण्यासाठी दान दिली.
 पुस्तक काय करू शकतात.यासाठी विश्वरत्न ड़ाॅ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.1 मंदिर बांधणे म्हणजे 1000 भिकारी तयार करणे.आणि 1 ग्रंथालय बांधणे म्हणजे.लाखो विद्वान तयार करणे. म्हणूनच वाचन का आवश्यक आहे.एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद वाचनात आहे. तेव्हा रोज एक तरी पान वाचत जा !.श्रीमंत माणसेच वाचन करतात असे नसुन वाचन करणारेच श्रीमंत होतात जसे शरीरासाठी दिवसातून दोन वेळा जेवण आवश्‍यक असते तसे उत्तम मेंदूसाठी दररोज दोन तास वाचन करणे आवश्यक असते. दररोज वाचनामुळे माणूस भानावर येतो.जगाचा आतापर्यंत जो विकास झाला आहे तो वाचनामुळे.पुस्तक वाचनारा माणूस कधीही व्यसन करत नाही.वाचनामुळे ज्ञानात भर पडते. वाचनासाठी फक्त आवड पाहिजे,माणूस एसटी,रेल्वेने  प्रवासात असला तरी उभ्या उभ्याने वाचन करतो.म्हणूनच वाचन करणारी माणस विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात.वाचन करणारा माणूस शांत असतो त्यामुळे त्याला रक्तदाब वाढणे, हृदय विकाराचा झटका येणे अशा गोष्टी संभवत नाहीत.वाचनामुळे भंग झालेली मनस्थिती शांत होते.वाचन करणारा माणूस लवकर झोपतो लवकर उठतो.
वाचन करणारा पुढे उद्योजक होतो तर वाचन न करणारा नोकरीवरच थांबतो.वाचन करणारा चार तासच काम करून करोडपती होतो तर वाचन टाळणारा बारा तास काम करून गरिबीतच मरतो.काही महाभाग तर नोकरी लागली की, जगातील मी एकटाच सिकंदर. आता मलाच सारे काही कळते,अशा नंदनवनात वावरून वाचनच बंद करतात.
वाचनामुळे माणूस नम्र होतो जे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते तेच खरे पुस्तक आणि जे कृती करायला लावते तेच खरे वाचन.जिथे वाचन होते तेथे विचार होतात आणि जेथे विचारांचे स्वातंत्र्य नाही तेथे गुलामी येते.वाचनामुळे ध्येय ठरवीता येते आणि गाठताही येते.तुमच्या ध्येयावरून तुमची लायकी पारखली जाते आणि तुम्ही किती मोठे ध्येय ठरविता ते तुम्ही कोणते पुस्तक वाचता यावर अवलंबून असते.ज्यांना आयुष्यात कोणतेही ध्येय नसतं तेच लोक पुस्तक वाचत नाहीत आणि ध्येयाविना जगणे म्हणजे बिगर पत्त्याचे पत्र पोस्टात टाकणे होय. पुस्तक चाळणे वेगळे आणि वाचनं वेगळं.जगात जेवढे लोक उपास मारीने मेलेत त्यापेक्षा जास्त लोक पुस्तक वाचन न झाल्यामुळे मेलेत. पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातुन संपत्ती निर्माण होत असते. आयु लिंमचंद राजाराम आलीकने यांचा अनेक साहित्यिक विचारवंत, पत्रकार यांच्याशी संपर्क व ओळख असतांना माझी ओळख नसता, माझी ही पुस्तके दान देण्यासाठी निवड केली.आणि पुस्तके देऊन मला खूप सन्मानित केले.ते मी कोणत्याही शब्दात मांडू शकत नाही.पण त्यांनी दिलेल्या पुस्तकाचा ज्ञान वृद्धी व क्रियाशील कार्यकर्ता घडविण्यासाठी आणि जास्तीतजास्त वाचकाच्या प्रबोधनासाठी करीन.पण लिंमचंद राजाराम आलीकने सारखा विचार करणारी, दूरदृष्टी ठेवणारे माणस आंबेडकरी चळवळीत आहेत हे गर्वाने सांगावसे वाटते.
सागर रामभाऊ तायडे भांडुप मुंबई 9920403859.

राजर्षी शाहूमहाराज मराठा समाजाचे आदर्श होतील काय ?.

राजर्षी शाहूमहाराज मराठा समाजाचे आदर्श होतील काय ?.
   महाराष्ट्र राज्यात विशेष मराठा समाजात आज ही राजर्षी शाहूमहाराज यांचे महत्व पाहिजे त्या प्रमाणात नाही.मराठा सेवा संघ आणि त्याच्या ३२ कक्षा गेल्या २५ वर्षात शिवाजी शाहूमहाराज समजावून सांगत आहेत.आज 26 जून राजर्षी शाहू महाराज यांची जयंती.फुले-शाहू-आंबेडकर हे आधुनिक महाराष्ट्राचे, पुरोगामी महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणावर जातवास्तवाचा मोठा प्रभाव असल्यामुळे महापुरुषांचा नामोल्लेख करताना ही अनेकांची अडचण होताना दिसते. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत काही वर्षापूर्वी ‘फुले-आंबेडकरांचा’महाराष्ट्र असा उल्लेख करायचे. हीच मंडळी कोल्हापुरात आल्यावर त्यात शाहूंचे नाव समाविष्ट करत. म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर शाहूंना फुले-आंबेडकरांच्या बरोबरीने स्थान दिले जात नव्हते. राज्यकर्त्यांचेही यापेक्षा वेगळे काही नव्हते. परंतु कांशीराम-मायावती यांनी उत्तरप्रदेशातील सत्तेत असताना फुले-आंबेडकरांच्या बरोबरीने राजर्षी शाहूंना स्थान दिल्यामुळे, विशेष मराठा समाजातील सत्ता धारयांच्या गोटात उलटा पालट झाली.यानंतर महाराष्ट्राच्या पातळीवरही शाहूंचे नाव घ्यायला सुरुवात झाली आणि आज ते रूढ झाले. हे सगळे पुन्हा जाती-पातीच्या समाजकारणाशीच संबंधित आहे. महात्मा फुले यांना माळी समाजाने मना पासुन कधीच दैवत मानले नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व दलितांनी आपले दैवत बनविले पण किती मानले हा प्रश्न आहेच?. राजर्षी शाहू महाराज यांना स्वीकारणे मराठा समाजासाठी तेवढे सोपे नव्हते. आजही नाही. आजही मराठय़ांना शाहू महाराज अडचणीचेच वाटतात. देशात आरक्षण ही संकल्पनाच राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली,कारण मराठा समाज हा देणारा होता. आपल्या संस्थानात मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बलांसाठी 50 टक्के आरक्षण लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय 1902 मध्ये त्यांनी घेतला होता. वेगवेगळ्या नावांनी काम करणाऱ्या मराठा संघटना आज शिवाजी महाराज,जिजाऊ यांची नावे घेतात, परंतु शाहू महाराज अनेकांना अडचणीचे वाटतात. कारण शाहू महाराजांना स्वीकारले, तर आरक्षणाचे समर्थन करावे लागते. आणि आरक्षणाचे समर्थन करून मराठय़ांचे संघटन करता येत नाही.म्हणून मराठा सेवा संघ आणि त्याचे 32 कक्ष मराठा समाजाला राजर्षी शाहु महाराज जास्त सांगताना दिसत नाही.
    सामाजिक बंधुभाव, समता, दलित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला व क्रिडा, आरोग्य आदी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ज्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, ते आधुनिक भारताचे भाग्यविधाते, आरक्षणाचे जनक यशवंत जयसिंगराव घाटगे म्हणजेच छत्रपती शाहू महाराज, पारतंत्र्य, दुष्ट रूढी परंपरा, निरक्षरता, अज्ञान इत्यादी समस्यांनी ग्रासलेल्या काळात २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. शाहू महाराज नावाप्रमाणेच यशवंत राहिले. भारतमातेच्या पोटी अनेक थोरांनी, संता, महंता, राजे, महाराजे, समाज सुधारकांनी जन्म घेऊन भारतातील गोरगरीब दीन दुबळ्यांची मनोभावे सेवा केलेली आहे.पण राजर्षी शाहु महाराजा त्यांच्या पेक्षा काकन भर सरस आहेत.
    बहुजन हिताय बहुजन सुखाय हे सूत्र ध्यानात घूऊन शाहू महाराज राज्यकारभार पाहू लागले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याची फळे सर्व समाजाला चाखता यावीत म्हणून त्यांनी आपले सिंहासनच पणाला लावले. अज्ञान अंधश्रद्धा, निरक्षरता सामाजिक दुजाभाव, दारिद्रृय यात गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी महाराजांनी आपला खजिना सताड उघड ठेवला.
छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक बंधूभाव,समता,दलित,बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा, आरोग्य इ. क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी त्यांनी खूप परीश्रम घेतले. समाजातील गोरगरीब, दीनदुबळे, मागासवर्गीय, उपेक्षित व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देणारे ते एकमेव राजे होते. सुरूवातीस कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा कायदा लागू केला. समता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाने अस्पृश्यता निवारणाकरिता जातीभेद निर्मूलन, बलुतेदारी पद्धतीवर बंदी आणली. स्त्री शिक्षण, देवदासी प्रथेचे उच्चाटन, महिला संरक्षण कायदा, विधवा पूनविर्वाह कायदा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन यासारख्या परीवर्तनवादी मुद्दे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे धाडस त्यांनी केले व त्यांची अंमलबजावणी होते की नाही ते स्वत: खात्री करून घेत असत. स्त्री हक्क स्वातंत्र्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन पत्नीला त्रास देणाऱ्या पतीसाठी शिक्षेच्या कायद्याची तरतूद केली. अनिष्ठ रुढी परंपरा उच्चाटनासाठी प्रयत्न केले. १९१७ मध्ये विधवा पूनर्विवाह कायदा व विवाहनोंदणी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.शंभर वर्षापूवी शाहूराजांनी ज्या दूरदृष्टिने निर्णय घेतले, त्याच्या जवळपासही आजचे राज्यकर्ते जाऊ शकत नाहीत. मानवी जीवनाच्या विकासाचे असे एकही क्षेत्र नाही, ज्यासाठी महाराजांनी काम केले नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते असल्याचे त्यांनीच माणगावच्या परिषदेत जाहीर केले. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. राधानगरी धरण बांधून सिंचनाची सोय केली. कुस्तीला प्रोत्साहन दिले. कोल्हापुरात प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू करून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक कार्य केले. फासेपारध्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी राबवलेली बांधकाम योजना राज्यकर्त्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरणारी आहे. हे सगळे करीत असताना समाजातील विशिष्ट वर्गाशी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. संघर्ष करतानाही त्यांनी विकासाची वाट आणि तळागाळातील घटकांप्रती असलेली बांधिलकी याचा कधी विसर पडू दिला नाही. प्रस्थापितांनी त्यांच्या बदनामीच्या कहाण्या रचल्या. परंतु नव्या पिढीतल्या इतिहास संशोधकांनी त्या कहाण्या म्हणजे हितसंबंध दुखावलेल्या मंडळींनी रचलेली कुभांडे असल्याचे सिद्ध केले आहे. 
बहुजन व मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना परिपूर्ण शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा बौद्धिक, सामाजिक व आर्थिक विकास शक्य नाही हे महाराजांनी हेरले व ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावाला शाळांची निर्मिती केली व शिक्षण सक्तीचे केले, एवढे करून न थांबता त्यावरील शुल्क माफ केले. जे पालक आपल्या पाल्यांना रोज शाळेत पाठविणार नाही अशा पालकांना प्रतिमहिना एक रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतुदही केली. तसेच त्यांनी वसतीगृहे उभे केलीत, गरिब विद्यार्थ्यांसाठी तर त्यांनी आपला राजवाडाच खुला केला. यामुळे बहुजन व दलित समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणाचे दरवाजे खुले झालेत.८ सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहिरनामा काढला. २१ मे १९१९ रोजी आर्थिक दृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. १ जानेवारी १९१९ रोजी आज्ञा देवून प्राथमिक शाळा व महाविद्यालयातील अस्पृश्य मुलांना स्पृश्य मुलांसारखीच समानतेची वागणूक द्यावी म्हणून शिक्षण खात्याला आदेश दिला. ३० सप्टेंबर १९१९ रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्यात. ६ जुलै १९०२ मागास जातींना नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली. २३ पेब्रुवारी १९१८ ला कुलकर्णी वतने बंद, तलाठी सुरू. आंतरजातीय विवाह कायदा १५ एप्रिल १९२० नाशिक येथे उदोजी मराठा विद्यार्थी वसतीगृहाचा कोनशिला समारंभ केला. १९ नोव्हेंबर १९२१ मध्ये रायगड येथे शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाला. तसेच सिंधूदुर्ग जिल्ह्य़ातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार ही केला. १६ फेब्रुवारी १९२२ दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे ते अध्यक्ष होते.आजच्या बहुसंख्य मराठा समाजाला हा इतिहास माहित नाही.आमच्या सारख्या आंबेडकरी चळवळी तील लोकांनी सांगितला तर तो त्यांना पचत नाही.
 आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाच्या मराठा मार्ग मध्ये लिहले होते की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मराठा समाजाचे राजर्षी शाहु महाराज यांनी शिक्षणा साठी खुप मोठी मदत केली. म्हणून बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले.हे आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी विसरु नये.त्याकरिता आंबेडकरी चळवळी तील जाणकार बुद्धिजीवी लोकांनी अज्ञानी अंधश्रद्धा मध्ये गुंतलेल्या मराठा समाजाच्या घरी जाऊन समाज प्रबोधन करावे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आम्हाला शाहु महाराज सयाजी महाराज कबीर महात्मा ज्योतिराव फुले आणि तथागत बुद्ध कळाले. म्हणुन आमच्या सारखे लोक नेहमी मराठा समाजा बरोबर मंगल मैत्री करण्याचा प्रयत्न करतो.पण त्याचा अर्थ खेड्या पाड्या तील मराठा समाजातील लोक महार माजले त्यांना जास्त माझ आला असा काढतात.राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्य सर्व मराठा समाजाला नम्र आवहान आहे की प्रथम शाहु महाराज समजून घ्या त्यानंतर आपले खरे शत्रु कोण व खरे मित्र कोण हे समजून येईल.हीच राजर्षी शाहु महाराज जयंती निमित्य सर्व बहुजन समाजाला विशेष मराठा समाजा ला विनंती.जयंती निमित्य सर्वाना हार्दिक शुभेच्छा!!!