मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

मनापासून माणसा पर्यत

मनापासून माणसा पर्यत 
माणसांचे मन आता स्वतःच्या ताब्यात नाही.ते प्रत्येक वेळी ते मार्केटिंग,जाहिरातीतील उगड्या नागड्या शरीरावरुन ठरविल्या जात आहे.पायातील चप्पल,बूट ते डोक्यावरील तेल कोणते वापरावे,अंडरवेयर म्हणजे चड्डी बनियन कोणती वापरावी,अंग धुण्यासाठी साबण आणि कपडे धुण्यासाठी साबण व पावडर कोणती वापरावी हे सर्व वृत्तपत्रातील व वृत्तवाहिन्यावरील जाहिराती पाहून बाई,माणसाला,मुलामुलींना ठरवावे लागते.त्यांचा समाज मनावर किती चांगला व किती वाईट परिणाम होत आहेत. यांचा गांभीर्याने विचार कोणी करत बसत नाही. सर्व थरावरील माणसं परिणामाची पर्वा न करता एन्जॉय करीत आहेत.
हा लेख मनापासून शांतपणे वाचा आणि पहा पण निर्णय स्वतः घ्या. नात्यातील माणसासाठी किंवा मित्रमंडळी साठी तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते.​ त्याने ते समाधानी होतील ही अपेक्षा कधीच ठेऊ नये. कोणासाठी काही करा पण मनापासून समाजातील माणसा पर्यत गेले पाहिजे.जगातलं कटु सत्य हे आहे की "नाती" जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो​. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवा की,आपल्या कडे असलेल्या संपत्तीचा बडेजाव करू नका. त्याला कोणी किंमत देत नाही. जमीन,गाडी,बंगला, प्लॉट,सोने आणि एकूण किती संपत्ती आहे हे कोणीच विचारत नाही. पण मुलं, मुली किती आहेत आणि काय करतात हा प्रश्न कोणत्याही माणूस माणसाला भेटला तर निश्चितच विचारतो.तेव्हा खरा प्रश्न पडतो, मुलं आहेत पण नोकरीत नाहीत?.एकत्र राहत नाहीत?.नशा पाणी खूप करतात. त्यामुळेच सांभाळत नाही. तेव्हा संपूर्ण जीवन संघर्ष डोळ्यासमोर येतो.जमीन,गाडी,बंगला, प्लॉट,सोने एकूण खुप संपत्ती आहे. पण मनाला सुख समाधान नाही मनाला शांतपणे झोपच येत नाही. डोक्यात सतत विचारांचे किडे वळवळ करीत राहतात.भर समुद्रात भरकटलेल्या जहाजात कितीही पैसा असला तरी पिण्याचे पाणी मिळत नसते. त्यावेळी त्या जहाजाला जमिनीशी जोडल्या शिवाय पाणी पुरवठा होत नाही.माणसांचे ही असेच आहे, मनापासून माणसांशी जोडले गेले पाहिजे, समाजातील माणसांशी जोडले गेले पाहिजे.केवळ स्वार्थासाठी जोडले तर ते जास्त दिवस टिकत नाही. म्हणूनच जिथं आपली आपल्या माणसांची कदर नाही, तिथे कधीही जायचे नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो, त्यांची मनधरणी करत बसाण्यात वेळ वाया घालवू नका. 
आपले हातून एखादयाचे चांगले काम होत असेल तर ते निस्वार्थी व निसंकोचपणे करा. नेहमी गरजु माणसांना मदत करा. आपल्या मुळे दुसऱ्या माणसांना त्रास होईल असे कदापी वागू नका. त्यामुळे वरून आनंद वाटेल पण शांतपणे विचार केला तर मनाला दुःख होईल.ते कोणालाच दाखवीत येत नाही. ते लपविण्यासाठी तोंड लपविण्याची पाळी येते. म्हणूनच नेहमी स्वतः सोबत पैज लावा, जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल, आणि हरलात तर 'अहंकार' हरेल.तथागत गौतम बुद्धाचा महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कायमस्वरूपी माणसात राहाल.तर समाजाशी जोडले जाल. तोच समाज सुखा, दुःखात सहभागी होणार,तिथे पैसा, सोने,संपत्तीं काहीच कामाची नसते.
   उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा नेहमीच येतात.प्रत्येक ऋतूत वादळ येतात.वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.प्रत्येक माणसांने समूह म्हणून विचार केला पाहिजे व्यक्तिगत पातळीवर विचार केला तर सोबत कोणीच राहत नाही. माणसात संघ भावना असणे आवश्यक आहे. कारण संघ खुप मजबुत असतो,तो सर्व प्रकारचे रक्षण करण्यासाठी असतो.मधमाश्याचा पोळ बघा एकत्र राहून अप्रतिम गोड मध गोळा करून माणसाला देतो.ते करत असतांना कोणी दगड पोळावर मारला तर एकाच वेळी हजारो मधमाश्या दगड मारणाऱ्यावर हल्ला चढवतात. त्यात तो मारल्या जातो. जमिनीवर राहणाऱ्या माणसासाठी जनावरांसाठी संघ भावना कायमस्वरूपी रक्षण करते.
पाण्याने भरलेल्या तलावात.मासे किड्यांना खातात, तर तोच तलाव कोरडा झाल्यास. किडे मास्यांना खातात.संधी सगळ्यांना मिळते.फक्त आपली वेळ येण्याची वाट पहावी लागते.निसर्ग सर्वांना समान न्याय योग्य वेळी देतो. निसर्गाच्या नियमांचे पालन केले तर कोणताच यम तुमच्या समोर उभा राहत नाही, आणि नियम धाब्यावर बसवून वागला तर यम सेवा उपलब्ध करून देण्यात तत्पर आहे. म्हणूनच माणसांनी माणसासोबत मनापासून जोडले पाहिजे.
   जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाहीं तर आपल्या मनात म्हणजेच माणसांच्या मनात रुजवावे लागते.माणसांचा माणसावर विश्वास असला तर कोणतंच नातं तुटत नाही,विश्वास नसला तर कोणतंच नातं जुळून येत नाही. माणूस स्वत:च्या खांद्यावर डोके टेकुन रडू शकत नाही आणि स्वत:च स्वत:ला आनंदाने मिठीही मारू शकत नाही. आयुष्य म्हणजे दुस-यांसाठी जगायची कला आहे.त्यासाठी माणसात संघ भावना असावी लागते. चांगले काम करा आठवणीत राहणार, वाईट काम केले तरी आठवणीत राहणार पण किती प्रमाणात हे महत्त्वाचे असते.एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर.त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे.
आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस 'माणूस' राहत नाही. परतून येतं ते प्रेरणादायी चैतन्य. सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा.समुद्र हा सर्वांसाठीच सारखाच असतो. काहीजण त्यातून मोती काढतात तर काहीजण मासे काढतात तर काहीजण फक्त पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आहे. जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही.
निसर्गाने सोनं निर्माण केलं. आणि चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला?. दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने माणसाकडे पहा. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका. माणसा माणसात संघ भावना निर्माण झाल्या शिवाय राहत नाही. देश अडचणीत असेल तेव्हा आपली देशभावना देशभक्ती जागृत होते. माणूस जेव्हा अडचणीत असेल तेव्हा मनातील माणूस प्रामाणिक राहिला पाहिजे.तेव्हा जात,धर्म,प्रांत,भाषा मनात येता कामा नये. म्हणूनच माणसांनी जेव्हा आर्थिक परिस्थती चांगली असेल तेव्हा साधे राहिले पाहिजे. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहिले पाहिजे. 
नोकरीतील पदाचा,संपत्तीचा कधी गर्व करू नये.ते आज आहे उद्या नसेल.माणसं सर्वच ठिकाणी मिळतील त्यांच्यावर मनापासून माणसा पर्यत पोचला पाहिजे. माणूस असेल तर समाज असेल समाज नसेल तर माणूस म्हणून कुठे नोंद होत नाही, म्हणूनच मनापासून माणसा पर्यत ही संघ भावना असावी.
सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप मुंबई

प्रजासत्ताक चिरायू झाला पाहिजे.

प्रजासत्ताक चिरायू झाला पाहिजे.
देशभरात एन आर सी,सी ए ए विरोधात प्रचंड जनांदोलन सुरु आहेत.त्यांची दखल प्रजासत्ताक भारताचे राज्यकर्ते घेत नाही. भारत देश २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला.आज भारतीय नागरिक प्रजेची सत्ता आहे हे गर्वाने सांगु शकेल?. राजे महाराजे,भांडवलदार, सावकार यांचे संस्थान संपून जनतेने जनते मधून जनप्रतिनिधी निवडून जनतेच्या भल्यासाठी काम करणारी यंत्रणा म्हणजे प्रजासत्ता अशी घटनाकारांनी सांगितले होते.जनतेला खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करणार नाही अशी यंत्रणा म्हणजे लोकशाहीचे चार खांब न्यायपालिका,लोकसभा, प्रचार प्रसार मध्यम,प्रशासकीय व्यवस्था हया आज तरी पूर्णपणे कोसळलेल्या दिसतात.कारण तमाम भारतीयांना अच्छे दिन आने वाले है.हे सांगण्यासाठी अख्खी चॅनल, पिंट मिडियाने जीवाचे रान करून सांगितले होते.अनेक गंभीर प्रश्न चुटकी सारखे सोडवू फक्त आमच्या हाती सत्ता द्या.आणि आयुष्य भर विचार करीत राहाल. हे आपण वाचलं आणि ऐकले असेलच कारण हा आपला भारत देश प्रजासत्ताक आहे. प्रजेने निवडून दिलेले लोक म्हणजे लोकांनी लोकांच्या कामासाठी लोकामधून निवडून दिलेले लोक म्हणजे चाय वाले,दूधवाले,पूजा अर्चा करणारे लोक,समाजसेवक,देशसेवक,प्रधानसेवक, आणि कायद्यानुसार देशद्रोही कृत्य केलेले लोकप्रतिनिधी यांचे चिंतन आपल्या सर्व भारतवाशियानी केले पाहिजे तो दिवस म्हणजे २६ जानेवारी १९५०!.तेव्हा भारत प्रजासत्ताक व्हावा म्हणुन दिला होता. 
आता राज्य आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांची शासन करण्याची पद्धत पहिली तर एन आर सी म्हणजे National Register of Citizens रजिस्टर मध्ये देशाचे नागरिक म्हणून नांव नोंदणी केली जाणार नाही. कारण मूळ कागदपत्रे सादर करण्यातसर्व घटक अपयशी ठरले जातील.परंतु हे घुसखोर नाहीत तर हजारो वर्षांपासून या देशाच्या मातीशी आणि विचारांशी घट्ट नातं जोडलेल लोक आहेत.लोक आपल्याला सांगतात की आधारकार्ड ,मतदान कार्ड व रेशनकार्ड ,जातीचे दाखले हे पुरावे आहेत. पण मतदान कार्ड 1995 ला आले, आधारकार्ड 2008 आले व रेशनकार्ड हे रहिवासी पुरावा मानला जात नाही ह्या NRC व CAA मधे सर्वांचे 1971 च्या आधीचे आजोबा किंवा वडिलांचा जन्म दाखला किंवा जमीनीचा सात बारा हेच पुरावा मानला जाईल. हे मागासवर्गीय, आदिवासी, भटक्या विमुक्त जाती आणि अल्पसंख्याक समाजाकडे तर अजिबात नाही.केंद्र सरकार संविधानाच्या चौकटीत काम करतांना दिसत नाही.तर मनुस्मृती ची अंमलबजावणी करतांना दिसत आहे. म्हणूनच आज भारत खरच प्रजासत्ताक चिरायु झाला.असे गर्वाने सांगता येईल काय ?.  
२६ जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे.तो राष्ट्रीय सन आहे.त्याबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान असला पाहिजे.म्हणूनच भारतातील प्रत्येक वाडी-वस्ती, गाव, विभाग, मोहल्ला, तालुका, जिल्हा, शहर,राज्य, आणि राष्ट्रात सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते. २६ जानेवारी १९५० रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला.म्हणजे काय झाले? तर त्या दिवसापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या व देशाला अर्पण केलेल्या संविधाना नुसार देशाचा राज्य कारभार सुरु झाला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अहोरात्र बौद्धिक मेहनत करून घटना लिहली.त्यासाठी २,९६,७२९ रुपये एकूण खर्च आला दररोजचा जमा खर्च भी त्यांनी लिहून ठेवला.२५ नोव्हेंबर १९४९ ती सादर करण्यात आली त्या संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरु झाली. त्यालाच प्रजासत्ताक दिन म्हणतात. हा दिन कोणामुळे सुरु झाला? भारतीय संविधानामुळे. भारतीय संविधान कोणामुळे निर्माण झाले? तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे. मग, ज्यांनी संविधान लिहिले त्यांचे स्मरण प्रजासत्ताक दिनी या देशाला झालेच पाहिजे की नाही. त्यांना संपूर्ण देशाने वंदन आणि अभिवादन केलेच पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. प्रजासत्ताक दिनी जो संविधानाला मान, तोच मान संविधान निर्मात्याला, जन्मदात्याला, घटनेच्या शिल्पकाराला दिलाच पाहिजे. म्हणून भारतातील प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक राजकीय पक्षांनी व नेत्यांनी, प्रत्येक संस्था-संघटनांनी, शाळा-कॉलेजानी आणी मंडळांनी संविधानाच्या शिल्पकाराला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदराने आणि अभिमानाने अभिवादन केलेच पाहिजे. जेथे जेथे राष्ट्राध्वजारोहण करून प्रजासत्ताकदिन साजरा केला जातो तेथे तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन करूनच प्रजासत्ताक दिन साजरा करा,डॉ. बाबासाहेबांबद्दल शासनाला नेहमीच उशिराच जाग येते. म्हणून आपण जागे राहूया आणि शासनाला जागे करूया. 
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचे संविधान लिहून पूर्ण केले व देशाला अर्पण केले. ज्या दिवशी संविधान देशाला अर्पण करण्यात आले तो २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' आणि ज्या दिवसापसुन संविधांची अंमलबजावणी सुरु झाली तो २६ जानेवारी हा 'प्रजासत्ताक दिन '. २००८ पासून महाराष्ट्र शासनाने जीआर काढून २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्यात सुरुवात केली. तेव्हापासून संपूर्ण राज्यात २६ नोव्हेंबर रोजी शासकीय स्तरावर संविधान दिन साजरा करण्यात येतो. आता शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा करावा. असा जीआर काढावा लागतो.म्हणजेच या देशात खरेच प्रजासत्ताक चिरायु झाला.असे सांगत येईल काय?.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठेपण कालभी आजभी आणि येणाऱ्या काळात भी देशातील जातीयवाद्यांना खुपते राहणार आहे. म्हणून तर ते नेहमी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अनुल्लेख टाळतात. अनेक गोष्टींचा खोटा इतिहास सांगतात. डॉ. बाबासाहेबांबद्दल त्यांना खरा इतिहास सांगता येईना.कारण डॉ. बाबासाहेबांनी खरा इतिहास लिहून ठेवला व नवीन इतिहास रचला. त्याचे जतन करण्यासाठी जनता जागृत आहे.म्हणून तर ते डॉ. बाबासाहेबांचा अनुल्लेख टाळतात किंवा ज्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठेपण, महत्व आणि कर्तत्व सिद्ध करण्याचा दिन आहे, त्याच दिवशी  हे जातीयवादी कपट कारस्थानाणे नवीन सन किंवा नवीन धार्मिक प्रथा सुरु करतात. हेतु हाच की त्यादिवशी डॉ. बाबासाहेबांच्या मोठेपणाकडे किंवा कर्तुत्वाकडे लोकांचे लक्ष जाऊ नये किंवा लोकांना कळू नये.उदाहरण द्यायचे झाले तर २६ जानेवारीचे देवूया. गेल्या काही वर्षापासून २६ जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताकदिनी "सत्य नारायणा" च्या महापूजा घालण्यात येवू लागल्या आहेत. या पूजांचे एवडे अवडंबर माजले आहे कि, प्रत्येक गल्लीत बोळात ही पूजा होवू लागली आहे.यापूर्वी २६ जानेवारी रोजी का सत्यनारायणाची पूजा घातली जात नव्हती? आणि आताच ती का घालण्यात येते? कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्व त्यांना वाढू द्यायचे नाही किंवा कमी करायचे आहे. सत्यनारायणाच्या पूजेचा आदेश दिला कोणी? व आला कुठून? तर तो थेट नागपूरच्या हेडक्वार्टर हून आला. कुणाला कळाले नाही. कुठेही गाजावाजा नाही. पण अंमलबजावणी मात्र सर्वत्र होत आहे कोण करते तर बहुसंख्य मराठा,ओबीसी  मागासवर्गीय, आदिवासी, भटक्या विमुक्त जाती,जमाती जे स्वताला हिंदू समजतात तेच इमानदारीने अंमलबजावणी करताना दिसतात . 
विशेष मराठा बहुजन मागासवर्गीय समाजात प्रजासत्ताक दिनी सत्यनारायण पूजेचे महत्व वाढत आहे,वाढवले जात आहेत.ज्या समाजात प्रबोधन होईन जनजागृती होत आहे त्या समाजाने प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा केला पाहिजे. राष्ट्रध्वज हातात घेवून डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमांच्या मिरवणुका काढल्या पाहिजेत.जातीयवाद्यांना डॉ. बाबासाहेबांचा खोटा इतिहास सांगता येत नाही. म्हणून ते डॉ. बाबासाहेबांचे महत्व कमी करू लागले आहेत. डॉ.बाबासाहेबांनी संविधान लिहिलेच नाही असे त्यांना सांगता येत नाही. म्हणून ते आता संगु लागले आहेत कि, भारताचे संविधान हे काही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्याने लिहिले नाही. सात जणांच्य घटना समितीने लिहिले आहे. तेंव्हा आंबेडकरवाद्यांनी त्याच वेळी, तिथल्या तिथेच एका क्षणाचाही विलंब न लावता ठणकावून ठाम पणे सांगितले पाहिजे की, होय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्यानेच भारतीय संविधान लिहिले आहे. तेच संविधानाचे शिल्पकार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डी. पी. खेतान, कृष्णास्वामी अय्यर, बी. एल. मित्तल, के. एम. मुन्शी व सय्यद अहमद अब्दुल्ला हे सात विद्वान घटना मसुदा समितीचे सदस्य होते. घटना मसुदा समिती व घटना समिती या वेगवेगळ्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तर डॉ. राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. मूळ घटना समिती १९४६ साली (स्वतंत्र्यपूर्व) स्थापन करण्यात आली. त्यात एकूण ३८९ सदस्य होते तर स्वतंत्र्यानंतर १९४७ साली (स्वतंत्र्योत्तर) फाळणीनंतर स्थापन करण्यात आलेल्या घटना समितीत २९९ सदस्य होते. असे असले तरी घटना बनविण्याची अत्यंत महत्वाची पण तितकीच कठीण जबाबदारी घटना मसुदा समितीवर होती. सात विद्वानांच्या घटना मसुदा समितीतील दोघेजण परदेशात गेले. अन्य दोघे सतत आजारी असल्यामुळे बैठकांना येत नव्हते. एकचे निधन झाले व एकजण स्वत:च्या कार्यात व्यस्त होता. उरले फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर.त्यांनीच एकट्याने रात्रंदिवस राबून स्वत:च्या आजाराची पर्वा न करता भारताचे संविधान लिहिले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच संविधानाचे एकमेव शिल्पकार आहेत. म्हणून आपण कुठे ही आणि केव्हा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करताना, 'भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ', असाच उल्लेख केला पाहिजे. कारण डि.लिट. कोणी ही मिळवू शकतो किंवा भारतरत्न किताब कोणाला ही मिळू शकतो. मात्र संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरच.अन्य कोणालाही होता येणार नाही. म्हणून प्रजासत्ताक दिन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करूनच साजरा करावा ! हे सरकारी आदेश देऊन ही काही शाळा कॉलेज गजानन महाराज,गांधींचा फोटो ठेऊन झेंडा वंदन करतात.काही लोक चाळीत, सोसायटी मध्ये आज भी सत्यनारायण महापूजा घालतात.ते केवळ खोटया अहंकारा पोटी.आम्ही हिंदू आहेत आमच्या सुट्टीच्या दिवशी आमच्या सार्वजनिक महापूजा कोणी अडवू शकत नाही.असे काही तरुण खुलेआम कायदा सुव्यस्थेला आव्हान देतात. त्यांची सरकार एन आर सी म्हणजे National Register of Citizens रजिस्टर मध्ये देशाचे नागरिक म्हणून नांव नोंदणी करणार आहे काय ?. कारण मूळ कागदपत्रे सादर करण्यात हे सर्व हिंदू घटक अपयशी ठरले जातील.तेव्हा यांना कळेल भारतात प्रजासत्ताक होता म्हणजे काय होता.तरी सुद्धा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे.त्याला देण्यास कोणीच रोखू शकत नाही.म्हणूनच सर्व जागरूक वाचकास प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!.आणि प्रजासत्ताक चिरायू झालाच पाहिजे 
धन्यवाद !
जय हिंद!.जय भारत!!. जयभिम !!!
सागर रा तायडे -९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई

अज्ञान विज्ञानाने दूर करा

अज्ञान विज्ञानाने दूर करा
आज प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल, स्मार्टफोन आहे.गरीब असो की श्रीमंत, असंघटित कामगार,असो की संघटित कामगार,कर्मचारी अधिकारी प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे तो मोबाईल घेऊन वापरतो.घरात कॉम्प्युटर, वायफाय, 3 जी, 4 जी च्या पुढे दररोज वेगाने जात आहे. तरी स्मार्टफोन व कॉम्प्युटरच्या स्किनवर देवादेवीच्या फोटोची छबी ठेवतोच.नेटवर्क नसेल तर स्मार्टफोनच्या स्किनवरील देव,देवी काहीच करू शकत नाही. नेटवर्क फुल आहे आणि रिचार्ज केला नसेल तर ?. देव,देवी काई चमत्कार करून मार्ग काढू शकतो काय?.तर बिलकुल नाही.कारण नेटवर्क, स्मार्टफोन कॉम्प्युटर, हार्डवेअर, सोफ्टवेअर हे विज्ञान आहे.माणसांच्या जीवनातील दररोजच्या घडामोडींचा बारकाईने विचार केला तर अज्ञान विज्ञानाने दूर होऊ शकते. अंधश्रद्धा, अज्ञान नष्ट करण्यासाठी विज्ञान जवळ करा.देवाधिकावर, देवीमातावर किंवा कोणत्याही धर्माचा अवमान करणे,कोणाच्या धार्मिक भावना दुखावने हा लेखाचा उद्धेश नाही.तर अज्ञान विज्ञानाने दूर करा हेच सांगण्याचा मुख्य उद्धेश आहे.
भारत अनेक ऋषीमुनी, महापुरुष,महामानव,संत महंतासह तेहतीस कोटी देवांचा देश आहे. 33 कोटी देवापैकी एका ही देवाचे संपूर्ण नाव सांगता येत नाही. जन्म,शिक्षण, गांव, तालुका,जिल्हा,राज्य कोणते हे कोणीच विचारू शकत नाही. भारतीय जनतेला ते विचारण्याचा अधिकार नाही. ज्याने विचारण्याचा प्रयत्न केला तर तो नास्तिक,देशद्रोही, समाजकंटक ठरतो.प्राथमिक,माध्यमिक शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेतांना विद्यार्थी समाजशास्त्र, नागरिकशास्त्र, भौतिकशास्त्र, विज्ञानशास्त्र, आर्ट,कॉमर्स, सायन्स अनेक विषयात पदवीधर होऊ बाहेर पडतात. पदवीधर प्रमाण पत्र,एस एस सी,एच एस सी गुणपत्रिका दाखवून नोकरी मिळवितात.नंतर सत्यनारायण महापूजा घालुन किंवा शिर्डी, शेंगाव,कोल्हापूर, कोणत्याही देवस्थानाला नवस फेडून आभार मानतात.परंतु अज्ञानावर मात करून शिक्षण हे वाघिणीचे दूध प्राशन केले.
विज्ञान वापरून अज्ञानावर मात केली असे कोणी म्हणत  नाही.
कपड्याचा शोध मानवाने लावला त्या अगोदर तो झाड़पाला अंगाला बांधून राहत होता. झाडपाला खाऊन उदरनिर्वाह करीत असे, मग मानवाच्या अगोदर असलेल्या देवांकडे एवढे भरजरी कपड़े व मिठाई कसे, कुठून मिळत होते?. असा प्रश्न शंभर टक्के सुशिक्षित वर्गाला कधीच का पडत नाही.
 आपल्या देशात अतिरेकी येऊन बॉम्बब्लास्ट करुन जातात देव त्यांना का अडवत नाही ?. उलटपक्षी मंदिरातच बॉम्ब ठेवून जातात ते कसे?. मंदिरांच्या सुरक्षेसाठी लाखो पोलिसांचा बंदोबस्त का ठेवला जातो? देव स्वत:चे रक्षण करू शकत नाही तर भक्तांचे कसे करणार ?. देव दर्शनासाठी पायपीट करणाऱ्या उच्चशिक्षित वर्गाला असा प्रश्न का पडत नाही?. सर्व देवानी भारतातच जन्म का घेतला इतर देशांत एकही देव जन्माला का नाही आला?.
संत तुकाराम महाराजांना वैकुंठाला नेणारे देवांचे ते पुष्पक विमान कुठे गेले ज्या मध्ये बसून ते नेहमी पृथ्वीवर यायचे
आता का ते येत नाहीत?. विमानाचा शोध राइट बंधुनी लावला हे महाविद्यालयात शिकविले जाते. त्या अगोदर भारतात महाराष्ट्र राज्यातील देऊ,आळंदी,पुणे जिल्ह्यात तयार झाले होते. हे समाज मनावर बिनबोभाट कोरल्या जाते.
वाघ,सिंह,उंदीर,डुकरं,कुत्रा,गाय, बैल,म्हैस,रेडा अशी अनेक प्राणी देवा देवीची वाहने होती.त्यांच्या दगडी, मूर्तीची,चांदी, सोन्याची मूर्तीची मनोभावे पूजा अर्चा केली जाते. परंतु जिवंत प्राण्यांची जनावरांची पूजा अर्चा केली जात नाही. खंडोबा जर देव आहे आणि कुत्रा जर खंडोबाचा अवतार आहे तर कुत्रे चावल्यावर लोक इंजेक्शन का घेतात उलटपक्षी देव चावला देव चावला म्हणत पेढ़े का वाटत नाहीत?. खेड्यातील अशिक्षित लोकांना असे प्रश्न पडणार नाहीत, पण उच्चशिक्षित वर्गाला असे प्रश्न का पडत नाही?. हे उच्चशिक्षित लोक अशिक्षित,अज्ञानी अंधश्रद्धा असलेल्या लोकांचे अज्ञान विज्ञानाने दूर का करीत नाही.
 विज्ञान झपाट्याने पुढे जात असतांना आपण मागे का पडतो?.आपल्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्ताची सुरक्षा देव का घेत नाही?. जर मुहूर्त नक्षत्र 36 गुण पत्रिका बघुन लग्न केल्यावर नवरा बायकोचा घटस्पोट भांडनाणे का होतात?.
बहुतेक लोकांना पाप,पुण्याच्या गोष्टी सांगितल्या जातात. स्वर्ग नरक कोणी पाहून रिटर्न आलाय का?. मग स्वर्ग असा नरक असा हे हुबेहुब कसे पुस्तकात लिहल्या जाते?. बहुसंख्येने लोक म्हणतात लिहलेले खोटे असूच शकत नाही.
गोरगरिबांना दुःख मुक्त करून स्वतः ऐश आराम करणारे अशिक्षित अज्ञानी लोकांना शाप देण्याची धमकी देणारे बाबा,महाराज,संत आता देशातील वेगवेगळ्या जेल मध्ये शिक्षा भोगत आहेत. त्या काळी हवे तेव्हा जमिनीवर येणारे देव, कोणालाही शाप देऊन भस्म करणारे आता तसे का नाही करत?. त्यांची पॉवर विज्ञानामुुळे संपली आहे.
विज्ञानाच्या समोर अज्ञान जास्त वेळ टिकत नाही. 33 कोटी देवांच्या आरत्या पुजा विधी करणाऱ्या शेतकऱ्यांना गळफास लाऊन आत्महत्या का करावी लागते?.
भारतातील अनेक राज्यात प्रचंड जागृत देवस्थाने आहेत. त्यांची म्हणती माऊथ टू माऊथ होत असते.लालबागचा गणपती बाप्पा राज्यात नव्हे तर देशा विदेशात प्रसिध्द आहे. तिथे भक्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस 
सुरक्षा व्यवस्था करावी लागते. त्याचं बरोबर हे आवर्जून सांगितले जाते.आणि भितीवर लिहलेले असते मंदीरांमध्ये खिसेकापू पासून सावध रहावे. म्हणूनच ३३ कोटी देव संरक्षणासाठी असताना सुध्दा देशात हजारो कोटी रुपये सुरक्षा यंत्रणा राबविण्यासाठी खर्च का केले जातात?. तरी आपल्या देशात अज्ञान अंधश्रद्धा विज्ञानावर वरचढ आहे.
गोरगरिबांना देवांची, धर्माची भिती दाखवून आर्थिक शोषण करणारे उच्चशिक्षित किंवा उच्चवर्णीय असतात.
उच्चशिक्षित देशाचा राष्ट्रपती झाला तरी त्यांचा वर्ण विसरला जात नाही. तसेच उच्चशिक्षित देशाचा सरन्यायाधीश झाला तरी तो आपला धर्म विसरू शकत नाही. देशाचे सर्वोच्च सरन्यायाधिश दगडाच्या धातूच्या निर्जीव मूर्त्यां समोर लोटांगण घालत असेल तर बहुसंख्य लोकांनी त्यांच्या कडून कोणता आदर्श घ्यावा ?.
कस होईल आपल्या भारत देशाच! उच्चशिक्षित न्याय निवाडा करणारा सर्व लोकांणा न्याय देणारा न्यायमूर्तिच जऱ निर्जीव मूर्त्यां झोपुन समोर स्वताच शरीर जमिनीवर झोपवतो आणि पूजा करत असेल तर बहुुसंख्य लोकांत अशिक्षित,अज्ञानी अंधश्रद्धा वाढविल की कमी होईल?.

स्रिया कधी कधी देवीचं रूप असतात,त्यांची कडक उपासना केली की त्या प्रसन्ना होतात आणि संकटातून वाचवतात त्यामुळेच आपल्या देशात स्रिया देवाची देवीची  पुजा, व्रतवैकल्ये सर्वात जास्त लहानपणा पासून करतात, तरी लैंगिक अत्याचार त्यांच्यावरच का केला जातो?. सुशिक्षित महिलांना असा प्रश्न कधी पडत नाही. उच्चशिक्षित म्हणून त्या विज्ञानाच्या सर्व तत्वज्ञानांचा कॉम्प्युटर,स्मार्टफोनचा नेटवर्किंगचा वापर करून सर्व साधनांचा उपयोग घेतात.शिक्षणाची यांची देवी सरस्वती,
यांना चांगली नोकरी मिळाली म्हणूनच चांगला पगार मिळतो,तर म्हणतात लक्ष्मी आमच्यावर प्रसन्न आहे.नवरात्र उत्सवात सर्व सुशिक्षित, उच्चशिक्षित महिला नऊ दिवसात नवंरंगाची, साज शृंगारांची,सौभाग्यवतीचे उधळण करतात. आता देशात समाजात महिलांना जो मानसन्मान मिळतो.तो कोणामुळे हे पूर्णपणे विसरतात. त्यांनाही हेच सांगणे अज्ञान विज्ञानाने दूर करा. सत्य स्वीकार आणि आचरणात आना.
अंधश्रद्धा आणि अज्ञान हे सर्वच स्तरावर आहे,त्यात अशिक्षित पेक्षा सुशिक्षित जास्त आहेत.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वृत्तवाहिन्यांवर जाहिराती देतांना त्यांचा वापर जास्त होतांना दिसत आहे. त्यांचा परिणाम सर्वसामान्य माणसावर होत आहे.सर्व सामान्य लोकांना देव कोप पावला असे सांगून घाबरविले जाते मग देवाचे नारळ हार पेढ़े मागच्या दाराने पुनः दुकानात नेणारे देवाला दिसत नाहीत का?. देवळात दानधर्म कोणाला केला जातो?. यांचा विचार उच्चशिक्षित, कॉम्प्युटर स्मार्टफोन,नेटवर्किंग करणाऱ्यांना कधीच करावा असे का वाटत नाही.
अज्ञानाला कुलूप असते,ते विचारांची किल्ली असली तर खोलता येते. विज्ञानाच्या युगात कॉम्प्युटर, स्मार्टफोन प्रत्येकाला पासवर्ड असतो. तरच तो ओपन होतो. माणसांच्या मेंदूत व मनात जे लहान पणा पासुन भरले ते खाली केल्या शिवाय दुसरे बसणार नाही. अज्ञान अंधश्रद्धा हे एकाएकी निघणार नाही,पण उच्चशिक्षित लोकांनी मोबाईल, स्मार्टफोन, कॉम्प्युटर, नेटवर्किंग वापरून अज्ञान दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणूनच अज्ञान विज्ञानाने दूर करा.
सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप मुंबई

शिक्षणातील गुणवत्ता आणि समाजातील आचरण

शिक्षणातील गुणवत्ता आणि समाजातील आचरण 
भारत हा कृषिप्रधान देश होता,शेतकरी हा देशाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जात होता. देशात सर्वत्र सुजलम,सुपलम होते. शेतकरी, शेतमजूर अशिक्षित असुन सुद्धा इमानदार,प्रामाणिकहोता. कारण त्याला शिकवण तशी दिली होती,उत्तम शेती,मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, त्यामुळे शिक्षण घेऊन नोकरी करणे कमी पणाचे वाटत असे,म्हणूनच गांवात शाळा कॉलेज पेक्षा मंदिराला जास्त महत्व प्राप्त झाले होते. आज भी आहेच त्यावरच एका विशिष्ट जातीच्या लोकांचे वर्चस्व आणि उत्पन्न अवलंबून आहे. त्याला कोणीच रोखु शकत नाही. अज्ञान अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी शिक्षण काळाची गरज होती. परंतु आजचे शिक्षण खोटे बोलून कशी फसवणूक, अडवणूक करून पैसे कमवावे हेच तत्वज्ञान सांगते.त्यात प्रामाणिकपणा शिल्लक राहिला नाही. शिक्षण धंदा झाला आहे, आरोग्यासाठी हॉस्पिटल सेवा देणारा धंदा झाला आहे, रोजगार कंत्राटदाराचा धंदा झाला आहे. शिक्षणसंस्था, हॉस्पिटल, कंत्राटदारी सर्वच बाजुने सर्वच समाजाचे आर्थिकदृष्ट्या शोषण करणारी मजबुत यंत्रणा उभी राहिली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आशिर्वाद असल्यामुळे त्यांचे प्रशासकीय अधिकारी व त्यांची यंत्रणा कोणाचं काही वाकडं करू शकत नाही.त्यामुळेच शिक्षणातील, आरोग्यातील, रोजगारीतील गुणवत्ता संपली आहे. शिक्षणसंस्था चालकांना पैसे फेकले की पाहिजे त्या गुणवतेचे प्रमाणपत्र मिळते.डॉक्टर झाले तर हॉस्पिटल काढून पाहिजे त्यापद्धतीने रुग्णाच्या नातलगांना आर्थिक दृष्ट्या लुटता येते.थोडया दिवसात रुग्ण पण जातो आणि पैसे पण जातो.कोणत्या डॉक्टर वर किंवा हॉस्पिटलवर कडक कारवाई झाल्याचे आठवतं का?.मोठं मोठ्या शहरात टोलेजंग इमारती टॉवर, मेट्रो स्टेशन बांधलेली दिसतात.ते बांधणारे कुशल मनुष्यबळ असलेले असंघटित कामगार कोणाला दिसले काय?.बांधणाऱ्या कंपनीचे नांव लिहले असते,पण कंत्राटदाराकडे असलेला कामगार कोण होता कुठून आला होता यांची नोंद झाली असते काय?.त्यांचे शिक्षण किती होते?.किती मार्क मिळाले होते त्यांचे प्रमाणपत्र गुणवत्ता कोणी तपासले?. शहराचा विकास दिसतो.सर्वत सिमेंट काँक्रीटीकरण दिसते, ते करणारा असंघटित कामगार सारखा विंचवाचे बिराड पाठीवर घेऊन या साईट वरून ते साईटवर फिरत राहतो,कंत्राटदार करोडपती होत आहे.केबल टाकणारी कंपनी आणि कंत्राटदार कोणी असो कामगार आंध्रप्रदेश, तेलंंगना 
राज्यातील अण्णाच असतो मुंबईतील फुटपाथवर,आरे कॉलनीच्या रोडवर पाल टाकून राहतो. शिक्षण व आरोग्य यांच्याशी त्यांना काही घेणेदेणेच नाही. या असंघटित कामगारांच्या श्रमाची कोणी तुलनाच करू शकत नाही. ते जे काम करतात ते पाहून लोकं तोंड व नाक बंद करतात. त्यांची गुणवत्ता पाहणारा,मोजणार तपासणार एक ही अधिकारी, इंजिनिअर आज पर्यत जन्माला नाही.महात्मा फुले, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे लिहून ठेवले ते वाचून अंमलबजावणी करणारी यंत्रणा आज अस्तित्वात नाही.
बिल्डिंग बांधण्यासाठी जे साहित्य लागते ते विट, रेती,खडी, सिमेंट,दगड कुठून येते तिथे कोणते कामगार असतात. त्यांना कामगार म्हणून मान्यता तरी असते काय?. त्यांचे शिक्षण मार्कलिस्ट कोणी विचारत सुध्दा नाही.या कुशल मनुष्यबळाची गुणवत्ता आणि आचरण कोणाच्या लक्षात  येत नाही.
भारत हा कृषिप्रधान देश होता यादेशातील शेतकरी, शेतमजूर शेती काम करण्याचे कौशल्य आत्मसात  लहानपणापासून करीत होता. त्याला कोणत्याही गुणवंतेचे प्रमाणपत्राची आवश्यकता नव्हती.आज शिक्षण मोठया प्रमाणात उपलब्ध आहे. शाळा कॉलेज मध्ये शिकवलेले शिक्षण प्रत्येक्ष जीवनात कुठेच उपयोगात येतांना दिसत नाही.फस्ट क्लास मिळवूनही ज्याला सातबारा आणि ८ अ ,कळत नाही.ज्याला बँकेच्या डिपोझिट आणि विड्रॉल स्लीपमधला फरक कळत नाही.ज्याला लाईट बिलातील देयक रक्कम शोधताना प्रचंड गडबडायला होते.ज्याला लिफाफ्यावर टू आणि फ्रॉम खाली नक्की कुणाचं नाव टाकावं हे बिलकुल कळत नाही.जे आजही कॉम्प्युटर बंद करताना खाली वर दाबायचे बटनच वापरतात.जे आजही रिचार्ज मारणे याला ब्यालन्स टाकणे म्हणतात,
ज्यांना बँक पासबुकावर व्याजाचा आकडाच सापडत नाही,ज्यांना टू व्हिलरच्या पेट्रोल टाकीच्या ऑन ऑफ आणि रिजर्व्हची भानगड कळत नाही.असे उच्चशिक्षित एकीकडे मोठया संख्येने असतांना. त्या तुलनेत तलाठयाला त्याच्या घरी गाठून सातबारा घेणारे,घरातला फ्यूज उडताच वायरमनची वाट न बघणारे,बंद पडलेल्या गाडीला फार किका न मारता टाकी फुंकायला घेणारे,मापातले लाईटबीलही तालुक्याला जावून कमी करुन घेणारे,बँकेतल्या शिपायाला नमस्कार करुन कर्ज मंजूर करुन घेणारे आणि हायस्कूलमधून शाळा सोडूनही सिनीयर कॉलेजला पालक म्हणून अधून मधून भेटी देणारे,ट्रॅफिक हवालदारची ओळख काढून नुसत्या चहावर गाडी सोडवणारे, निवडणुकीच्या काळात आमदार खासदार सुद्धा गुपचूप घरी येऊन भेट घेणारे.असंघटित अशिक्षित प्रतिष्ठित मानले जातात. उच्चशिक्षित, उच्चपदस्थ असलेल्यांना नोकरीत असतांना जो मानसन्मान मिळतो.तो फक्त त्याच्या कार्यालयातच असतो. कार्यालयाच्या बाहेर समाजात त्यांची गुणवत्ता शून्य असते.
शिक्षण नावाच्या भ्रमातून लवकर बाहेर पडलेले विद्यार्थी ते जगायला सज्ज झालेले ते जीवनात यशस्वी झालेले असतात.जे शिक्षण माणसाला माणसाचे शोषण करण्याची प्रेरणा देते ते कसलं शिक्षण?. माणसाला माणसासारखं वागविण्याची प्रेरणा देते ते खरे शिक्षण असते.शिक्षण खुप असते पण वडीलधाऱ्यांशी कसे बोलावे ते माहिती नाही. शिक्षणाचा,नोकरीचा एवढा माज चढलेला असतो की स्थानिक रहिवाशात व समाजात वावरताना स्वतःला नेहमीच वेगळे समजणार.पैसा असला को सर्व सेवा विकत मिळतात. पण जेव्हा घरात लग्नकार्य असेल तर कोणी चालते.पण घरात कोणाचा मृत्यू झाला तेव्हा स्थानिक रहिवासी आणि समाजच लागतो.हे ते विसरतात त्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता कशी मोजणार?.मार्कशीट पाहून की आचरण पाहून?.थोडक्यात गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक आचरणानाच्या शिक्षणाने वाढते. शाळेच्या मार्कांनी नाही.प्रत्येक माणसांनी हे लक्षात ठेवले पाहिजे.
मी नेहमीच वेगवेगळ्या विषयावर लिहतो. लेख प्रसिद्ध झाल्यावर अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया येतात.त्यात उच्चशिक्षित आणि अशिक्षित असंघटित शेतकरी, शेतमजूर असतात.काही उच्चप्रतीची प्रतिक्रिया व्यक्त करतात.तुम्ही खुप छान लिहले,सांगितले त्याला ते पटलं की तो म्हणतो तुम्ही अगदी माझ्या मनातील लिहल,हे बोलायला लिहायला मला योग्य शब्द सापडत नव्हते एवढंच.आणि त्यातूनच एक वेगळी मैत्री सुरू होते.तुम्ही प्राध्यापक आहात काय?.कुठे नोकरी करता?.वय किती?. मुलं किती?. काय करतात?. जात,धर्म,जिल्हा सर्वच आपोआप येते.मैत्रीपूर्ण सबंध निर्माण होतात,त्यातुन जिव्हाळा तयार होतो. शिक्षणातील मार्कलिस्ट पाहून नोकरी मिळते.पण समाजातील आचरणातुन स्थानिक पातळीवर व समाजात प्रतिष्ठा प्राप्त होते. म्हणूनच प्रत्येक माणसांनी समाजाप्रती आचरणातून गुणवत्ता दाखवावी.
सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप मुंबई