मनापासून माणसा पर्यत
माणसांचे मन आता स्वतःच्या ताब्यात नाही.ते प्रत्येक वेळी ते मार्केटिंग,जाहिरातीतील उगड्या नागड्या शरीरावरुन ठरविल्या जात आहे.पायातील चप्पल,बूट ते डोक्यावरील तेल कोणते वापरावे,अंडरवेयर म्हणजे चड्डी बनियन कोणती वापरावी,अंग धुण्यासाठी साबण आणि कपडे धुण्यासाठी साबण व पावडर कोणती वापरावी हे सर्व वृत्तपत्रातील व वृत्तवाहिन्यावरील जाहिराती पाहून बाई,माणसाला,मुलामुलींना ठरवावे लागते.त्यांचा समाज मनावर किती चांगला व किती वाईट परिणाम होत आहेत. यांचा गांभीर्याने विचार कोणी करत बसत नाही. सर्व थरावरील माणसं परिणामाची पर्वा न करता एन्जॉय करीत आहेत.
हा लेख मनापासून शांतपणे वाचा आणि पहा पण निर्णय स्वतः घ्या. नात्यातील माणसासाठी किंवा मित्रमंडळी साठी तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते. त्याने ते समाधानी होतील ही अपेक्षा कधीच ठेऊ नये. कोणासाठी काही करा पण मनापासून समाजातील माणसा पर्यत गेले पाहिजे.जगातलं कटु सत्य हे आहे की "नाती" जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवा की,आपल्या कडे असलेल्या संपत्तीचा बडेजाव करू नका. त्याला कोणी किंमत देत नाही. जमीन,गाडी,बंगला, प्लॉट,सोने आणि एकूण किती संपत्ती आहे हे कोणीच विचारत नाही. पण मुलं, मुली किती आहेत आणि काय करतात हा प्रश्न कोणत्याही माणूस माणसाला भेटला तर निश्चितच विचारतो.तेव्हा खरा प्रश्न पडतो, मुलं आहेत पण नोकरीत नाहीत?.एकत्र राहत नाहीत?.नशा पाणी खूप करतात. त्यामुळेच सांभाळत नाही. तेव्हा संपूर्ण जीवन संघर्ष डोळ्यासमोर येतो.जमीन,गाडी,बंगला, प्लॉट,सोने एकूण खुप संपत्ती आहे. पण मनाला सुख समाधान नाही मनाला शांतपणे झोपच येत नाही. डोक्यात सतत विचारांचे किडे वळवळ करीत राहतात.भर समुद्रात भरकटलेल्या जहाजात कितीही पैसा असला तरी पिण्याचे पाणी मिळत नसते. त्यावेळी त्या जहाजाला जमिनीशी जोडल्या शिवाय पाणी पुरवठा होत नाही.माणसांचे ही असेच आहे, मनापासून माणसांशी जोडले गेले पाहिजे, समाजातील माणसांशी जोडले गेले पाहिजे.केवळ स्वार्थासाठी जोडले तर ते जास्त दिवस टिकत नाही. म्हणूनच जिथं आपली आपल्या माणसांची कदर नाही, तिथे कधीही जायचे नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो, त्यांची मनधरणी करत बसाण्यात वेळ वाया घालवू नका.
आपले हातून एखादयाचे चांगले काम होत असेल तर ते निस्वार्थी व निसंकोचपणे करा. नेहमी गरजु माणसांना मदत करा. आपल्या मुळे दुसऱ्या माणसांना त्रास होईल असे कदापी वागू नका. त्यामुळे वरून आनंद वाटेल पण शांतपणे विचार केला तर मनाला दुःख होईल.ते कोणालाच दाखवीत येत नाही. ते लपविण्यासाठी तोंड लपविण्याची पाळी येते. म्हणूनच नेहमी स्वतः सोबत पैज लावा, जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल, आणि हरलात तर 'अहंकार' हरेल.तथागत गौतम बुद्धाचा महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कायमस्वरूपी माणसात राहाल.तर समाजाशी जोडले जाल. तोच समाज सुखा, दुःखात सहभागी होणार,तिथे पैसा, सोने,संपत्तीं काहीच कामाची नसते.
उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा नेहमीच येतात.प्रत्येक ऋतूत वादळ येतात.वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.प्रत्येक माणसांने समूह म्हणून विचार केला पाहिजे व्यक्तिगत पातळीवर विचार केला तर सोबत कोणीच राहत नाही. माणसात संघ भावना असणे आवश्यक आहे. कारण संघ खुप मजबुत असतो,तो सर्व प्रकारचे रक्षण करण्यासाठी असतो.मधमाश्याचा पोळ बघा एकत्र राहून अप्रतिम गोड मध गोळा करून माणसाला देतो.ते करत असतांना कोणी दगड पोळावर मारला तर एकाच वेळी हजारो मधमाश्या दगड मारणाऱ्यावर हल्ला चढवतात. त्यात तो मारल्या जातो. जमिनीवर राहणाऱ्या माणसासाठी जनावरांसाठी संघ भावना कायमस्वरूपी रक्षण करते.
पाण्याने भरलेल्या तलावात.मासे किड्यांना खातात, तर तोच तलाव कोरडा झाल्यास. किडे मास्यांना खातात.संधी सगळ्यांना मिळते.फक्त आपली वेळ येण्याची वाट पहावी लागते.निसर्ग सर्वांना समान न्याय योग्य वेळी देतो. निसर्गाच्या नियमांचे पालन केले तर कोणताच यम तुमच्या समोर उभा राहत नाही, आणि नियम धाब्यावर बसवून वागला तर यम सेवा उपलब्ध करून देण्यात तत्पर आहे. म्हणूनच माणसांनी माणसासोबत मनापासून जोडले पाहिजे.
जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाहीं तर आपल्या मनात म्हणजेच माणसांच्या मनात रुजवावे लागते.माणसांचा माणसावर विश्वास असला तर कोणतंच नातं तुटत नाही,विश्वास नसला तर कोणतंच नातं जुळून येत नाही. माणूस स्वत:च्या खांद्यावर डोके टेकुन रडू शकत नाही आणि स्वत:च स्वत:ला आनंदाने मिठीही मारू शकत नाही. आयुष्य म्हणजे दुस-यांसाठी जगायची कला आहे.त्यासाठी माणसात संघ भावना असावी लागते. चांगले काम करा आठवणीत राहणार, वाईट काम केले तरी आठवणीत राहणार पण किती प्रमाणात हे महत्त्वाचे असते.एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर.त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे.
आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस 'माणूस' राहत नाही. परतून येतं ते प्रेरणादायी चैतन्य. सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा.समुद्र हा सर्वांसाठीच सारखाच असतो. काहीजण त्यातून मोती काढतात तर काहीजण मासे काढतात तर काहीजण फक्त पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आहे. जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही.
निसर्गाने सोनं निर्माण केलं. आणि चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला?. दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने माणसाकडे पहा. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका. माणसा माणसात संघ भावना निर्माण झाल्या शिवाय राहत नाही. देश अडचणीत असेल तेव्हा आपली देशभावना देशभक्ती जागृत होते. माणूस जेव्हा अडचणीत असेल तेव्हा मनातील माणूस प्रामाणिक राहिला पाहिजे.तेव्हा जात,धर्म,प्रांत,भाषा मनात येता कामा नये. म्हणूनच माणसांनी जेव्हा आर्थिक परिस्थती चांगली असेल तेव्हा साधे राहिले पाहिजे. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहिले पाहिजे.
नोकरीतील पदाचा,संपत्तीचा कधी गर्व करू नये.ते आज आहे उद्या नसेल.माणसं सर्वच ठिकाणी मिळतील त्यांच्यावर मनापासून माणसा पर्यत पोचला पाहिजे. माणूस असेल तर समाज असेल समाज नसेल तर माणूस म्हणून कुठे नोंद होत नाही, म्हणूनच मनापासून माणसा पर्यत ही संघ भावना असावी.
सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा