सोमवार, ७ मार्च, २०२२

गर्वसे कहो हम भारतीय है,

 गर्वसे कहो हम भारतीय है,


युक्रान देशात जे विध्यार्थी वैदकीय शिक्षण घेण्यासाठी गेले तेव्हा ते हिंदुस्तानातील कट्टरपंथीयांची मुलमुली होते.त्यांचा शंभर टक्के समज आहे की एस सी,एस टी,ओबीसी आरक्षणामुळेच आम्हाला आपल्या देशात प्रवेश मिळाला नाही.पण वैदकीय महाविद्याला कोणाची आहेत?.त्याचे संचालक कोण आहेत?.सरकार कोणाचे आहे?.मग खरच एस सी,एस टी,ओबीसी यांना आरक्षणा मिळते काय?.पैसे मिळविण्यासाठी त्याचा कोटा सांगितल्या जातो आणि पैसे भरणाऱ्यांना योग्य मार्गाने वशिलेबाजी प्रवेश दिला जातो. त्यातील वशिले बाजी कोणी लक्षात घेत नाही.महत्वाचे म्हणजे सर्वच हिंदुस्थानातील कट्टरपंथीय हिंदू आहेत.प्रत्येकाचे म्हणणे आहे माझा धर्म भारी आणि माझी जात भारी म्हणून ते म्हणतात गर्वसे कहो हम हिंदू है.ते कधीच म्हणत नव्हते.गर्वसे कहो हम भारतीय है,तीच लोक आज युक्रान रशिया मध्ये भारतीय असण्याचे बोर्ड,बॉनेर,झेंडा घेऊन जीव वाचविण्यासाठी धडपडत जीवघेणा संघर्ष करीत आहेत.
 टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या 183 जयंतीनिमित्त मी लेख लिहला त्याबद्दल अनेकांनी कौतुक केले.पण काही चळवळीचे कार्यकर्ते विचारवंत ओबीसी लेखकाच्या पोटात दुखले,त्यांना माझ्या बद्दल वाईट वाटले की मी चळवळीतील कामगार नेता असूनही एका भांडवलदाराच्या बाबत लिहले.त्यांना ते पटले नाही,त्यांनी लिहिले की त्याटाटांनी कोणत्याही कारखान्यामध्ये एका प्रांताचे कामगार भरु नका.स्थानिक कामगार जास्त भरु नका, परप्रांतिय मजुर भरा म्हणजे कामगारांची एकी होणार नाही.ते एकमेकांशी धर्म,जात,प्रांतावरुन,भाषेवरुन लढत रहातील व मालकांना त्यांच्या मर्जीचे कायदे करता येतील,अर्थात कामगारांचे शोषण व मालकांचा नफा अबाधित राहील.अशा भांडवलशाही लोकांवर तुम्ही लेख लिहीता, त्याला काय अर्थ आहे.महिन्यातून एकच लिहा,पण अर्थपुर्ण लिहा.सगळ्याच विषयांवर लिहिले पाहिजे,असा अट्टाहास नको.असे त्यांचे म्हणणे आहे. माझ्या या मित्राला नेमके कोणते दुःख आहे हेच कळत नाही, मी जगप्रसिद्ध उद्योगपती जमशेदजी टाटा यावर लिहले यांचे दुःख आहे की मी स्तंभ लेखक म्हणून नियमितपणे विविध विषयांवर विविध वृत्तपत्रांत लिहतो त्याला खूप प्रसिद्धी मिळते यांचे दुःख आहे ते मला समजले नाही.असो ते ही शेवटी हिंदू आहेत हेच सांगतात.मी पारशी टाटा च्या कंपनीत १९८२ ते २०२१ पर्यत अनेक प्रकल्पावर जबाबदार कर्मचारी अधिकारी म्हणून काम केले पण मला कुठे असे जाणवले नाही.असो विषय आहे गर्वसे कहो हम भारतीय असण्याचा.
भारतात वैदकीय महाविद्याला कोणाची आहेत?.कोणत्या कट्टरपंथीय हिंदू उद्योगपती ने हॉस्पिटल निर्माण केली.अल्पसंख्याक समाजाच्या बाहेरून आलेल्या पारसींनी पुण्यात हॉस्पिटल्स उभारली आणि अख्खं गाव जगवलं! असा इतिहास आहे.त्यावर कधी लिहल्या जात नाही.कि चर्चा होत नाही.मुळचे पर्शियाचे म्हणून त्यांना आपण पारसी म्हणतो.पर्शिया म्हणजे आजचे इराण. तिथेच झोराष्ट्रीयन हा समाज जन्माला आला. या धर्माला हजारो वर्षांची परंपरा आहे.पारसी भारतात कसे आले याची एक कथा सांगितली जाते.शेकडो वर्षापूर्वी मुस्लीम अरब टोळ्यांनी पर्शियावर आक्रमण केले. धर्मांतर करू लागले. जुलमी आक्रमकांना तोंड देण्याएवढी ताकद या झोराष्ट्रीयन समाजाकडे नव्हती.यातूनच मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले.अशीच एक जहाजात भरून निघालेल्या पारशी कुटुंबांची नौका गुजरातला नवसारी इथल्या किनाऱ्यावर येऊन पोहचली. तिथल्या राजा समोर त्यांना उभं करण्यात आलं. त्यांचा म्हातारा प्रमुख समोर आला. राजाला व त्याला एकमेकांची भाषा येत नव्हती.राजाने एक दुधाने काठोकाठ भरलेला पेला मागवला आणि त्या पर्शियन लोकांच्या प्रमुखाला सुचवलं की आमचा देश असा काठोकाठ भरलेला आहे आता आम्हाला आणखी माणसे नकोत.तेव्हा तो पारसी माणूस हसला. त्याने त्या दुधात चिमुटभर साखर टाकली. त्याचा अर्थ होता की आम्ही इथे दुधात साखर मिसळल्या प्रमाणे राहू व या देशाची गोडी वाढवू. राजा खुश झाला. त्याने पारसी लोकांना भारतात राहण्याची परवानगी दिली. पारसी लोक बुद्धिमान होते,उद्यमी होते.ते गुजरात बाहेर पडले, देशभर पसरले. इथल्या मातीशी एकरूप झाले.
ब्रिटीश भारतात आले तेव्हा पारसी लोकांनी त्यांची भाषा शिकून घेतली. याचा त्यांना प्रचंड फायदा झाला. ब्रिटीशांच्या मुंबईसारख्या महानगरात त्यांनी बस्तान बसवलं. आधुनिक शिक्षणपद्धतीचा स्वीकार केला.अनेक पारसी कुटुंबांनी आपल नाव कमवले व पैसा कमावला.पण पारसी फक्त पैशांच्या मागे लागलेले नव्हते. हजारो वर्षांपूर्वी आपल्यावर झालेला अन्याय, हालअपेष्टा ते विसरले नाहीत. आपल्या इतिहासाची जाणीव ठेवली त्यामुळे जिथे जातील तिथे आपल्या कमाईतला वाटा समाजाला काही तरी देण्यासाठी वापरला.पुण्यात ब्रिटीशांनी लष्करी छावणी उभारली तेव्हा त्यांच्या मदतीसाठी इंग्रजी भाषा जाणनारे स्थानिक कर्मचारी लागणार होते. त्यांनी उच्चशिक्षित पारसी लोकांना पुण्यात आणलं. बऱ्यापैकी कॅम्पच्या भागात हे पारसी वसले. इथले आल्हाददायक हवामान त्यांना मानवल.त्यामुळे अनेक पारसी कुटुंबांनी आपले बिऱ्हाड पुण्यात कायमच हलवलं.
पारसीप्रमाणेच आपला देश सोडून परागंदा झालेले बगदादचे ज्यू डेव्हिड ससून हे देखील भारतात आले होते. व्यापारात त्यांनी व त्यांचे पारसी पार्टनर जमशेदजी जीभॉय यांनी प्रचंड पैसा कमावला होता. यातूनच पुण्यात पहिले हॉस्पिटल उभे राहिले. त्याला त्यांचे नाव देण्यात आले, डेव्हिड ससून रुग्णालय.हा इतिहास मनुवादी भांडारकर संशोधन करणारे सांगणार नाहीत.म्हणूनच तो आपण वाचला पाहिजे.
पुण्यात १८६७ साली डेव्हिड ससून रुग्णालय उभे राहिले. हे हॉस्पिटल उभे राहत असताना एक पारसी उद्योजक बैरामजी जीजीभोय हे मुंबईहून पुण्याला आले होते. त्यांनी मुंबईत अनेक शिक्षण संस्था उभारल्या होत्या.जीजीभोय यांनी पुण्यात ससून रुग्णालयाच्या शेजारी एक छोट वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र उभ केलं. त्याला त्यांचच नाव देण्यात आलं.
१८७१ साली स्थापन झालेलं हे वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र पुढे जाऊन पुण्याचे सुप्रसिद्ध बी.जे.मेडिकल कॉलेज बनलं.एकोणिसाव्या शतकात पुण्याला प्लेग सारख्या रोगराईने चांगलंच सतवलं होत. इंग्रजांच्या राज्यात पुण्यात आरोग्य सेवा म्हणाव्या तशा सुधारलेल्या नव्हत्या. अजूनही लोक वैद्य, हकीम यांच्यावर अवलंबून असायचे. ससून सोडले तर मोठे रुग्णालय नव्हते.याकाळात छोटी छोटी पारसी रुग्णालये उभी राहत होती. असाच एक दवाखाना चालवणाऱ्या एडलजी कोयाजी यांनी एक हॉस्पिटल बांधायचं ठरवलं. पारसी समाजातील उद्योगपती पुढे आले. वाडियांनी त्यांना पैशांची मदत केली. तर सर कोवासजी जहांगीर व लेडी हिराबाई या दांपत्याने जागा दिली अत्याधुनिक हॉस्पिटल उभारून दिल.या हॉस्पिटलला त्यांच्या मुलाचं जहांगीरच नाव देण्यात आलं.१९४६ साली त्या काळच्या सर्वोत्तम सेवा सर्वसामान्य रुग्णांना अत्यल्पदरात उपलब्ध करून देण्याचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये प्रयत्न करण्यात आला होता.याच जहांगीर हॉस्पिटलमध्ये हृद्यरोगावर उपचार करायला केकी बैरामजी हे सुप्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांनी अमेरिकेतून हृद्यरोगावरील विशेष उपचाराचा प्रशिक्षण घेतलं होतं. पण तिथेच स्थायिक होण्याऐवजी आपल्या मूळ गावी पुण्याला परत आले. जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांचे काही कारणांनी एडलजी कोवासजी यांच्याशी मतभेद झाले. यामुळे केकी बैरामजी यांनी स्वतःच फक्त चार खाटांच एक हॉस्पिटल सुरु केलं. त्यावेळच्या गव्हर्नरने त्यांना जागा दिली होती. या गव्हर्नरच्या बायकोच्या स्मरणार्थ हॉस्पिटलचं नाव रुबी हॉल क्लिनिक असे करण्यात आले. एकेकाळी ४ बेडचे हॉस्पिटल पुढे जाऊन ७५० बेडचे पुण्यातले सर्वात अत्याधुनिक रुग्णालय बनले. गर्वसे कहो हम हिंदू है मानणाऱ्या सर्वांनाच हे वैदकीय महाविद्याला सेवा देतात.त्याची मुलमुली आणि पालक मंदिर बांधायला जास्त प्राधान्य देतात.म्हणूनच नवीन वैदकीय महाविद्यालय निर्माण होत नाही.आणि जी झाली त्याचे मुख्य उदिष्ट पैसे कमविणे आहे आरोग्य सेवा देणारे डॉक्टर निर्माण करणारे नाही.
मुंबईतील प्रसिद्ध के ई एम हॉस्पिटलची कथा ही प्रेरणादायी आहे.तिची आरोग्य सेवा आणि सेवा देणारे डॉक्टर कौतुकास पात्र आहेत.पुण्याच्या रास्ता पेठेत सरदार मुदलियार यांचं एक छोट प्रसूतीगृह होतं. सर्वसामान्य गरीब रुग्णांचा आधार असलेले हे हॉस्पिटल चालवणे सरदार मुदलियार यांना अवघड चालले होते. त्यांनी जहांगीर हॉस्पिटलच्या एडलजी कोयाजी यांना एखादा तज्ञ डॉक्टर व चांगला प्रशासक मिळवून देण्याची मागणी केली. त्यावेळी एडलजी यांनी प्रसूती शास्त्रात उच्च पदवी घेतलेल्या आपल्या वहिनीकडे म्हणजेच बानू कोयाजी यांच्याकडे ही जबाबदारी दिली.काही महिन्यांसाठी लक्ष द्यायचं म्हणून डॉ.बानू कोयाजी यांनी ही जबाबदारी उचलली खरी मात्र के..एम हे पुढच्या आयुष्यभराच हे मिशन बनलं.बानू कोयाजी यांनी केईएमचा कार्यक्षेत्र पुण्याच्या ग्रामीण भागापर्यंत वाढवल. त्यांचं कार्य फक्त वैद्यकीय सेवेपुरत मर्यादित राहिलं नाही तर कुटुंब नियोजनासारखे समाजहिताचे कार्यक्रम जनजागृती अशा अनेक उपक्रमांची जोड दिली.डॉ.बानू कोयाजी हे पुणेकरांसाठी एक आदराच आणि आपलेपणाचं नाव बनलं. आजही ही जहांगीर पासून ते केईएमपर्यंत अनेक रुग्णालये पुंण्यात तितक्याच कार्यक्षमतेने कार्य करत आहेत.वेळोवेळी येणाऱ्या संकटात मेडिकल इमर्जन्सीमध्ये या हॉस्पिटलनी पुण्याला जगवल आहे.सायरस पूनावाला यांच्यासारखे उद्योगपती औषधनिर्मितीच्या क्षेत्रात जगभरात ओळखले जातात.प्रत्येक समाज पिढ्यानपिढ्या आपापल्या परंपरा जपत असतो पण पुण्याच्या पारसींनी वैद्यकीय क्षेत्रात छाप पाडून एक वेगळीच ओळख निर्माण केली एक अजरामर पायंडा पाडला.
मुंबईतील आचार्य दोंदे मार्गावर परळ येथे एक वैद्यकीय महाविद्यालय आहे.सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज म्हणजेच जी.एस.मेडिकल कॉलेज या नावाने ते ओळखले जाते. हे कॉलेज किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय (के.ई.एम.) या रुग्णालयाशी संलग्न आहे.हे वैद्यकीय महाविद्यालय सुमारे 2000 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर, पदव्युत्तर आणि सुपरस्पेशलिटी वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण प्रदान करते. पदव्युत्तर आणि पदव्युत्तर शारीरिक आणि व्यावसायिक थेरपी कोर्समध्ये विविध संबद्ध वैशिष्ट्यांमधील मास्टर आणि पीएचडी कोर्स. या संस्थेमार्फत एक नर्सिंग स्कूलसुद्धा चालविले जाते.त्यात सुमारे 390 स्टाफ फिजिशियन आणि 550 निवासी डॉक्टरांसह, 1800 बेड असलेल्या रुग्णालयात दरवर्षी सुमारे 1.8 दशलक्ष रूग्ण आणि 85,000 रूग्णांवर उपचार केले जातात. हे औषध आणि शस्त्रक्रिया या सर्व क्षेत्रांमध्ये मूलभूत काळजी आणि प्रगत उपचार सुविधा दोन्ही प्रदान करते. भारतातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे अनुदानीत ही संस्था अक्षरश देशभरातील रुग्णांना विनामूल्य सेवा देते. विशेष ते सर्व समाजातील वंचित घटक कष्टकरी कामगार,मजूर असतात.तेव्हा ते हिंदू नसतात तर फक्त भारतीय नागरिक असतात.
जगात जेव्हा जेव्हा युद्ध झाली तेव्हा तेव्हा माणुसकी असणाऱ्या माणसांनी काय म्हटले असेल?.युद्ध नको,बुद्ध हवा.पण तो माझ्या देशात नको दुसऱ्या देशात हवा.नुसतंच गर्व से कहो असं म्हणून माणसं जगत नसतात.प्रत्येक धर्मियांचा आदर हेच भारतीयत्व Live & Let Live रतन टाटा,आदर पुनावाला.डॉ.बानू कोयाजी,ग्र्ँट होमी भाभा अशा अनेक पारसी धर्मियांनी देशासाठी सर्वस्व अर्पण करुन भारताचा नावलौकिक वाढवला आहे.त्यांनी कधी म्हटले नाही गर्वसे कहो हम पारशी है.पारशी समाजाचे महान लोक कधीच कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करत नाहीत.तरी ते म्हणतात हम भारतीय है और भारतीय रहेंगे.आणि ८५ टक्के मराठे मागासवर्गीय ओबीसी बहुजन समाज काय म्हणतात गर्वसे कहो हम हिदू है.मंदिर वही बनायेगे.मग आता शिक्षण,आरोग्य आणि रोजगाराचे काय?.यांनी जर का ठरविले कि आम्ही भारतीय लोक तर काय होईल.बहुजन हिताय बहुजन सुखाय.पटले तर स्वीकारा नाही तर वाचा आणि विसरून जा.
सागर रामभाऊ तायडे.९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

रविवार, ६ मार्च, २०२२

आठ मार्च महिला दिन कोणत्या महिलाचा ?.

 आठ मार्च महिला दिन कोणत्या महिलाचा ?. 



भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यात महिलांचे प्रमाण पुरुषा बरोबर ८५/९० टक्क्या पर्यंत आहे.महिला वर्ग हा सर्वात अज्ञानी,असुशिक्षित,असंघटीत आहे.मुठभर महिला सुशिक्षित आहेत त्या दरवर्षी महिलादिन आठ मार्चला साजरा करतात.पण ९०% महिलांना आठ मार्च महिला दिन का साजरा करतात.ते सांगता येत नाही. जगातील महिला एकत्र येऊन त्यांनी मोठा संघर्ष केला म्हणून आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो असे म्हणतात.पण त्या कोण महिला होत्या त्यांनी कोणा बरोबर संघर्ष केला.जातीव्यवस्थे विरोधात त्या लढल्या काय?.शिक्षण घेण्या करिता लढल्या काय?. त्याकाळी त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता काय?. मग त्यांनी डायरेक मतदानाचा अधिकार कसा काय मागितला?.भारतात तो जगाचा जागतिक महिला दिन का पाळला जातो.भारतातील महिलाच्या आणि जगातील त्या महिलांचे समस्या समान होत्या काय?.या देशात सात च्या आत महिला घरात पाहिजे शिक्षणात,संपतीत,मालमतेत,आर्थिदृष्ट्या तिला आजही किती अधिकार आहेत.हे त्या महिला दिना निमित्य कोणी किती ऐतिहासिक कार्य केले.भारतातील बहुसंख्य असंघटीत महिलांना आठ मार्च महिला दिन कशाचा  समजले पाहिजे.
भारतात महिला दिनाची सुरुवात मुंबई येथे ८ मार्च १९४३ रोजी पहिला महिला दिन साजरा करून झाली. त्यानंतर ८ मार्च १९७१ ला पुण्यातील काही संघटना नी मोर्चा काढला.त्यानंतर १९७५ ला युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले.  त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजा समोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया "बोलत्या" व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक,आर्थिक,राजकीय,सांस्कृतिक परिस्थिती नुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका,रेल्वे सरकारी,निमसरकारी कार्यालये तसेच काही राजकीय घरा मधूनही ८ मार्च महिला दिन साजरा व्हायला लागला.
भारतात ज्या महिलेने पहिले स्वत शिक्षण घेऊन मुलीना शिक्षण देण्यासाठी पाहिली शाळा काढली. ती १ मे १८४७ रोजी.सावित्रीबाई फुले (जन्म ३ जानेवारी १८३१,जन्म स्थळ-नायगाव,सातारा- मृत्यू- १० मार्च १८९७ पुणे येथे झाला.) त्या पहिल्या महिला शिक्षिका, शिक्षण प्रसारक, समाज सुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची सुरुवात महात्मा ज्योतीराव फुले यांनी आपल्या पत्नीला शिक्षण देऊन केली. तो खरा महिला दिन किंवा महिला शिक्षण दिन असायला पाहिजे होता.पण.....हळदकुंकू,मंगल गौरी साजरा करणाऱ्याचा महिला दिन मोठ्या उत्स्पुर्तपणे साजरा होतांना दिसत आहे.
संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळ जवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. हे सांगितल्या जाते पण त्यांना शिक्षणाचा अधिकार होता काय हे सांगितल्या जात नाही.पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण देण्यात येते. या अन्याया विरुद्ध स्त्रिया (कोणत्या) आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्का संदर्भात "द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन" स्थापन झाली.परंतु ही असोसिएशन सुद्धा वर्णद्वेषी आणि स्थालांतरीत पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणे कडील देशांना काळया मतदात्यां पासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरीत मतदात्यां पासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्या साठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे. अशी घोषणा केली. 
८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यां बरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली.१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय  समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा "जागतिक महिला-दिन" म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो प्रसार झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले. तो महिला दिन डावे समाजवादी पुरोगामी भारतात साजरा करतात.त्यांना भारतातील १८३१ ला जन्मलेली आणि १८४७ ला मुली करिता म्हणजे महिला करिता पाहिली शाळा काढलेली सावित्रीबाई फुलेचे कार्य आणि कर्तुत्व दिसत नाही. ज्या महिला आणि शिक्षणसंस्था सरस्वती शिक्षणाची देवी मानतात त्याच महिला आठ मार्च महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
त्याच बरोबर ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यां बरोबरच लिंग,वर्ण,मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागनीने अमेरिका न्यूयार्क हालविला सांगितल्या जाते. तेच काम भारतातील मुंबईच्या असंघटीत गिरणी कामगाराना संघटीत करण्याचे काम महात्मा ज्योतीराव फुले यांचे शिष्य रावबहादूर नारायण मेघांजी लोखंडे यांनी १८६० ते १८९० पर्यंत केल. त्याची नोंद मात्र डावे समाजवादी पुरोगामी घेत नाही.
रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांनी सप्टेंबर १८८४ मध्ये मुंबई येथे पहिली मोठी कामगार परिषद भरवून कारखाना आयोगाकडे ५,५०० कामगारांचे लेखी निवेदन पाठविले. त्यात दर रविवारी पगारी सुटी, दररोज नियमित कामाच्या १४ तासांऐवजी आठ तास, मुलांचे नोकरीचे वय ७ वर्षांवरून ९ वर्षे करावे, दर महिन्याच्या १५ तारखेच्या आत वेतन मिळावे,कामगाराला दुखापत झाल्यास पगारी रजा मिळावी, तसेच फार मोठी शारीरिक इजा होऊन कामगार कामासाठी अपात्र ठरल्यास त्याच्या भावी जीवनासाठी आर्थिक तरतूद केली जावी.इत्यादी. मागण्यांचा समावेश करण्यात आला होता. या मागण्यांचे निवेदन कलकत्त्यास गव्हर्नर जनरलकडेही पाठविण्यात आले होते (१८८९).रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांनी १८९०  मध्ये "मुंबई गिरणी कामगार संघ" (बॉम्बे मिलहँड्स असोसिएशन) नावाची भारतातील पहिली कामगार संघटना स्थापिली. एप्रिल १८९० मध्ये दहा हजार स्त्री-पुरुष कामगारांची मोठी परिषद रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांनी मुंबईत भरविली. या परिषदेत स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. मुंबईतील औद्योगिक संघटनांच्या चळवळीतील ही महत्त्वाची घटना समजली जाते. त्यानंतर लगेचच १० जून,१८९० रोजी शासनाने,कामगारांना दर रविवारी पगारी सुटी देण्याचा निर्णय जाहीर केला. १८९० मध्ये कामगार कायदा संमत करण्यात येऊन लोखंडे यांच्या काही सूचनांचा त्यात समावेश करण्यात आला. सरकारने त्यांच्या कामगिरीची दखल देऊन त्यांना 'जे.पी.' हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.हा इतिहास महिला दिन साजरा करणारे का विसरतात?. फुले लोखंडे याचे कार्या पेक्षा जात महत्वाची वाटते म्हणून का???.
भारतातील स्रीमुक्ती चळवळीच्या महिला नेत्यांना आणि त्याच्या आदर्श नेत्यांना भारतातील सावित्रीबाई ज्योतीराव फुले डोळ्या समोर ठेऊन महिला दिन साजरा करावा असे का वाटत नाही.कारण काल त्या होत्या म्हणून तुम्ही आज सन्मानाने या ठिकाणी आहेत भारतातील सावित्रीमाई फुले कुठे कमी पडतात. ते भारतातील महिला दिनाचे गोडवे गाणाऱ्या महिला पत्रकार,थोर विचारवंत,महिला साहित्यिक, लढाऊ महिला नेत्या आणि सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्या महिलांनी जाहीर पणे सांगावे.महिला दिन जरूर साजरा करा पण त्या भारतातील राष्ट्रमाता जिजाऊ,अहिल्याबाई होकार,ताराराणी,सावित्रीबाई फुले,भिमाबाई,माता रमाई,इंदिरा,प्रतिभाताई,मायावती,जयललिता,ममता,ज्यांनी जीवनात खऱ्या अर्थाने संघर्ष करून इतिहास घडविला त्यांच्या आई बापाचे नांव गांव,तालुका, जिल्हा,राज्य माहित होते आणि आहे.त्या महिलांचा आदर्श आजच्या सुशिक्षित महिलांनी घेऊन महिला दिन साजरा करावा हीच अपेक्षा.शेवटी मान्य नसलेल्या व मनुवादी विचारांच्या राजकीय लोकांनी लादलेल्या महिला दिनाच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद!.


आपल
सागर रामभाऊ तायडे. ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई
अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,स्वतंत्र मजदूर युनियन,महाराष्ट्र राज्य,
(महिलांच्या समस्यावर वेळोवेळी माझ्या नेतृत्वाखाली आंदोलने केली त्याची आठवण देणारी छायाचित्र सोबत दिली आहेत.योग्य ती घ्यावी.)

शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२

संघटित असंघटित कामगार का भरडल्या जातात?.

 संघटित असंघटित कामगार का भरडल्या जातात?.



जगातील कामगारांनो एक व्हा म्हणणारे कम्युनिस्ट मार्क्सवादी,जाती धर्माच्या नावावर होणाऱ्या शोषणाच्या विरोध बोलत नाही,गांधीवादी,गोळवलकरवादी यांना कामगार दिसत नाही. त्यांना शूद्र समाज वाटतो म्हणूनच ते मागासवर्गीय ओबीसी,आदिवासी अल्पसंख्याक समाजाला कामगार म्हणून "समान न्याय समान वेतन" मिळावे असे वाटत नाही. तरी बहुसंख्य कामगार विशेष शूद्र समाजाचे कामगार,कर्मचारी अधिकारी त्यांच्या संघटनेचे सभासद होऊन त्यांच्या उच्चवर्णीय नेतृत्वाखाली मुकाटपणे काम करतात. म्हणूनच संघटित असंघटित कामगार भरडल्या जातात?.
महात्मा ज्योतिबा फुले,रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांनी संघटित असंघटित कामगारांना मानसन्मान मिळवून दिला,त्यांची कामगार चळवळ तिला भारतीय संविधानात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी न्याय हक्क व अधिकार मिळवूण दिला.कामगार कायदे बनविले. आणि तेव्हाच त्यांनी धोक्याची सूचना दिली होती. ते म्हणजे कामगार वर्गाचे दोन दुष्मन एक भांडवलशाही दुसरी ब्राह्मणशाही हे कामगार विसरले म्हणून मोठ्या प्रमाणात सरकारी सार्वजनिक उद्योग धंद्याचे खासगीकरण होत असतांना कम्युनिस्ट मार्क्सवादी, समाजवादी,गांधीवादी,गोळवलकरवादी विचारांच्या राष्ट्रीय ट्रेंड युनियन पोटतिडकीने लढतांना दिसत नाही.एकतर सनदशीर मार्गाने दुसरे रस्त्यावर उतरून तीव्र जन आंदोलने आवश्यक असतांना गांभीर्याने कोणीच लढतांना दिसत नाही. त्यात संघटित असंघटित कामगार भरडल्या जात आहे.
देशातील विविध क्षेत्रातील कामगारांवर सरकारने सुलतानी कायदे लादले आहेत.कष्टकरी कामगारांच्या श्रमाची किंमत कमी केली आणि अन्न धान्याची किंमत वाढवली त्यामुळेच एका भाकरीचे अनेक तुकडे केले जेणेकरून कष्टकरी कामगारांना पोटभर जेवण मिळु नये किंवा तो सतत अडचणीत राहिला पाहिजे.म्हणजे तो बंड करून उठण्याची हिंमत करणार नाही. हे आर एस एस प्रणित मोदी सरकारने ठरविले आहे. त्याची अंमलबजावणी राज्य सरकार ला करावीच लागेल.सर्व प्रथम एक लक्षात घ्या कामगार कर्मचारी अधिकारी मित्रांनो सरकार कुठल्याही पक्षाचे असो गोरगरिबांना कधीही न्याय मिळणार नाही.अशी ब्राम्हणी प्रशासकीय व्यवस्था मोक्याच्या ठिकाणी बसलेली आहे. म्हणूनच संघटित असंघटित कामगार भरडल्या जातात?.
शेतकरी हा शेतकरीच असतो त्याला जात,धर्म,प्रांत राज्य नसते.पण अलीकडे शेतकरी हा जात,धर्माच्या आणि पक्षाच्या चौकटीत अटकलेला दिसतो.मग त्यामुळेच त्याच्या आंदोलनला जात,धर्म आणि पक्षाचे लेबर लागते.दिल्लीच्या सीमेवर शेतकरी जवळपास एक वर्षे आंदोलन करीत होते, त्यांची संविधानाच्या चौकटीत नोंद घेतल्या गेली नाही. मनुवादी विचारांच्या केंद्र सरकारने आणि त्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेने त्यांना देशद्रोही,अतिरेकी ठरविले.त्यांना भारतीय संविधानिक सर्वोच्य न्याय व्यवस्था म्हणजेच न्यायालयाने न्याय देण्यास असमर्थता दाखविली. म्हणजेच न्यायव्यवस्था अपंग होऊन हॉस्पिटल मध्ये विकलांग व्यवस्थेत खाटीवर पडली होती.आणि आज ही आहे. ती भारतीय संविधानाच्या चौकटीत न्याय देत नाही तर मनुवादी वर्ण व्यवस्थेनुसार न्याय देतांना दिसत आहे.म्हणूनच काही ठिकाणी शेतकरी (निवडणुकीत) शेतकरयांचा आसूड हातात घेऊन उभा राहतांना दिसत आहे.
बहुजन हिताय बहुजन सुखाय ब्रीदवाक्य असलेले एस टी महामंडळ. एसटी कर्मचारी पाच महिन्या पासून आंदोलन करीत आहेत त्यांना न्याय का मिळाला नाही?.कम्युनिस्ट मार्क्सवादी,समाजवादी,गांधीवादी,गोळवलकरवादी विचारांच्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय ट्रेंड युनियनच्या या बाबत ठोस भूमिका का नाहीत.कारण कामगारांचे नेतृत्व कामगार संघटनांनी ट्रेड युनियन यांनी केले पाहिजे असते.ज्यांचा कामगार चळवळीशी संबध नाही असे लोक कामगारांचे नेतृत्व करणार असतील तर त्यांचे उदिष्ट कामगारांना न्याय मिळवून देणे नसतेच तर खरेदी,विक्री करणे हेच असते.हे कामगारांनी लेक्षात ठेवले पाहिजे.म्हणून राजकारणी लोक कामगारांचे नेतृत्व करायला लागले तर सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी विरोधीपक्ष महत्वाची भूमिका बजावत असते.त्यांचे एकच उदिष्ट असते मी पुन्हा येईल.त्यात संघटित असंघटित कामगार भरडल्या जातात?.
कम्युनिस्ट मार्क्सवादी,समाजवादी,गांधीवादी,गोळवलकरवादी विचारांच्या राष्ट्रीय ट्रेंड युनियन शा कर्मचारी,बालवाडी कर्मचारी,अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्या करिता गेली अनेक वर्षे देशभरात आंदोलन करीत असतात. अजून पर्यंत त्यांना न्याय का मिळाला नाही.यांच्या विचारांच्या पक्षाचे आमदार,खासदार सभागृहात आवाज का उचलत नाही.कारण विषमतावादी विचारांच्या नेतृत्वाला समतावादी विचारांची न्याय व्यवस्था कशी चालेल?.म्हणूनच मनुवादी वर्णव्यवस्था यांना मरू ही देत नाही आणि जगू ही देत नाही.
बहुजन समाजाचे म्हणजेच बहुसंख्य कामगारांचे मुलमुली सरकारी शाळा महाविद्यालयात शिकत होती.जिल्हापरिषद शाळेच्या शिक्षकांना वेगवेगळी कामे लावली शाळेचे अनुदान कमी केले.परिणामी जिल्हापरिषद शाळा बंद करण्याचे नियोजन करण्यात आले.तर दुसरीकडे जात दांडगे,धन दांडगे आमदार,खासदारांना विना अनुदान शाळा महाविद्यालय काढण्यासाठी विशेष जागा,पाणी,लाईट देऊन शिक्षणाचे व्यापारीकरण करुन ठेवले. त्यामुळेच विध्यार्थी त्यांचे पालक आणि शिक्षक हे विना अनुदान दिल्या शिवाय शिक्षण व नोकरी करू शकत नाहीत. त्यामुळेच विना नुदानीत शिक्षक गेली अनेक वर्षे सरकारच्या दारात आंदोलन करीत आहेत.त्यांना न्याय का मिळाला नाही.कारण सरकार हे त्याच संस्था संचालक संस्थापक अध्यक्ष आमदार खासदारांचे आहे.ते काल विरोधी पक्षात होते,आज सत्ताधारी पक्षात आहेत.आज सत्ताधारी असले तरी येत्या पाच वर्षांनी विरोधी पक्षात असतील.त्यांना काहीच फरक पडणार नाही.कम्युनिस्ट मार्क्सवादी,समाजवादी,गांधीवादी,गोळवलकरवादी विचारांच्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय ट्रेंड युनियनच्या या बाबत ठोस भूमिका कधीच का घेत नाहीत.कारण कामगारांचे नेतृत्व कामगार संघटनांनी ट्रेड युनियन यांनी केले पाहिजे, राजकीय नेत्यांनी नाही. म्हणूनच शिक्षक संघटित असंघटित कर्मचारी म्हणून भरडल्या जातात?.
देशभरातील बहुजन समाजाचे कामगार म्हणजेच मागासवर्गीय ओबीसी,एस सी,एस टी,व्ही जे एन टी,आदिवासी,अल्पसंख्याक समाजाचे कामगार गोरगरीब कष्टकरी असंघटीत लोक गेली अनेक वर्षे कम्युनिस्ट मार्क्सवादी,समाजवादी,गांधीवादी,गोळवलकरवादी विचारांच्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय ट्रेंड युनियनच्या आंदोलने करीत आहेत.पण न्याय का मिळत नाही.कामगार,कर्मचारी अधिकारी तसेच विद्यार्थ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. परंतु लवकर न्याय मिळत नाही.असंघटीत कष्टकरी कामगारंना न्याय हक्का व प्रतिष्ठा मिळविण्यासाठी आंदोलन करावेच लागते.कारण मागितल्याने मिळत नाही आणि संघर्षा शिवाय पर्याय नाही. यात तिळमात्र शंका नाही, उतावळेपणाणे आंदोलन करता येत नाही कारण ते हानिकारक असु शकते.
कामगारांनी सकारत्मक विचारांची उर्जा कमी होऊ देऊ नये. परंतु लक्षात घ्या अतिघाई संकटात नेई असे होता कामा नये. असंघटीत कष्टकरी कामगारंना न्याय हक्का व प्रतिष्ठा मिळविण्यासाठी त्यांना त्यांच्या प्रश्नाची जाणीव करून द्यावी लागेल.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल." उठसूट बाबासाहेबाच्या नावाचा जयजयकार करणारेच कम्युनिस्ट मार्क्सवादी,समाजवादी,गांधीवादी,गोळवलकरवादी विचारांच्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय ट्रेंड युनियन मध्ये जास्त संख्येने दिसतात.घरात नगरात जयजयकार करतात आणि कामाच्या ठिकाणी आंबेडकरी विचारांच्या शत्रुना आर्थिकदृष्ट्या वर्गणी,देणगी देऊन मोठे करतात. ही खूप मोठी खेदाची गोष्ट आहे.म्हणूनच संघटित असंघटित कामगार भरडल्या जातात?.देशभरातील बहुजन समाजाचे कामगार म्हणजेच मागासवर्गीय ओबीसी,एस सी,एस टी,व्ही जे एन टी,आदिवासी,अल्पसंख्याक समाजाचे कामगार,कर्मचारी अधिकारी यांनी क्रांतिकारी आंबेडकरी विचारांच्या स्वतंत्र मजदूर युनियन (Independent Labour Union - ILU ) राष्ट्रीय ट्रेड युनियन मध्ये सभासद म्हणून सहभागी होऊन मान्यताप्राप्त झाले पाहिजे. तरच संघटित असंघटित कामगार भरडल्या जाणार नाहीत. करिता सर्व संघटीत असंघटीत कामगार,कर्मचारी अधिकारी यांनी संघटीत व्हावे हीच त्यांच्या कडून अपेक्षा.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

आंबेडकरी विचारधारेच्या ट्रेंड युनियनची बांधणी

 

तिथी नुसार शिवजयंती सन्मान की अपमान?

 (छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२ व्या जयंती निमित्याने विशेष लेख.)

तिथी नुसार शिवजयंती सन्मान की अपमान?  


भारत हा विविध जातीधर्माच्या लोक समूहाचा देश आहे,प्रत्येकाची जात,धर्म,भाषा वेशभूषा वेगवेगळी असली तरी सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि समानन्याय मिळत असतो. ज्यांना भारतीय राज्य घटना "संविधान" मान्य नाही ते वेळोवेळी मनुस्मृती नुसार आचरण करून देशाच्या सार्वभौम धर्मनिरपेक्षतेलाचा आव्हान देण्यासाठी उभे राहतात.यांचे उत्तम उदाहरण म्हणजेच तिथी नुसार शिवजयंती व सत्यनारायण महापूजा आहे.
कायदा सुव्यवस्था बिघडविणे समाजात तेड निर्माण होईल असा कार्यक्रमाचे आयोजन करणे म्हणजे कलम १४२ ते १५२ नुसार गुन्हा केला आहे. पण मुंबईसह महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन या घटना कडे संपूर्ण दुर्लक्ष करीत असते.ती धर्मनिरपेक्ष,निःपक्षपाती निर्भीड पणे कायद्याची अंमलबजावणी करीत नाही हे यावरून सिद्ध होत आहे.शिवजयंती साजरी करणारी मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोणता आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिथी नुसार जयंती साजरी करते?.म्हणूनच तिथी नुसार शिवजयंती सन्मान की अपमान?.हे मराठी माणसाना व एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या मराठ्यांना कळत कसे नाही.
 शिवाजी महाराजाच्या नांवाचा व्यापार करून काही संघटना राज्यात सत्ताधारी झाल्या पण त्यांनी शिवाजी महाराजांचा खरा आदर्श कधीच घेतला नाही,केवळ नांवा पुरती प्रतिमा आणि मूर्तीचा वापर केला.शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चरित्रावर शिंतोडे उडवण्याचे काम ज्यांनी केले त्यांच्या समर्थनात आपली शक्ती खर्च केली. त्याचं पद्धतीने शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा वाद बुद्धिजीवी विचारवंत्यांच्या समितीने सोडविल्यावर ही त्यांनी आपली भूमिका सोडली नाही. त्यामुळे राज्यात शिवरायांचे मावळे कमी आणि कावळे जास्त झाले.म्हणून त्यानी जयंती बाबत ही समाजात गैरसमज कसे निर्माण होतील यांची जास्त काळजी त्यांनी घेतली. शाळा,कॉलेजच्या विद्यार्थीदसे पासूनच त्यांना अभ्यासक्रमात एक आणि बाहेरच्या जगात एक शिवाजी महाराज दिसतात,त्यांना कोणता शिवाजी अभिप्रेत आहे हे दरवर्षी ते कायद्याला आव्हान देऊन दाखवून देतात.
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी १८६९ साली रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढली व शिवरायांच्या जीवनावर जगातील पहिला आणि प्रदिर्घ असा खरा पोवाडा लिहिला. शिवरायांचे जगविख्यात कार्य घराघरात पोहचावे यासाठी जोतीराव फुले यांनी १८७० साली शिवजयंती सुरु केली. शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. तेंव्हा पासून शिवजयंती मोठया धुमधडाक्यात सुरु झाली. याप्रसंगी टिळक १२-१३ वर्षाचे ‘बाळ' होते. शिवजयंतीचा वाढता लोकोत्सव पेशवाईच्या समर्थकांना खुपत होता. कारण पेशव्यांनी शिवशक बंद करुन मुस्लिमांचा फसली शक सुरु केला होता.म्हणून ही तिथी नुसार शिवजयंती साजरी होते. हा सन्मान आहे की अपमान?.हे मराठी माणसाना व स्वताला शिवसैनिक मनसे सैनिक समजणारयांना कळत नाही.

शिवरायांचा रायगड उध्वस्त करुन दप्तरखाना जाळला होता. त्याला पेशवाईचे समर्थन होते.म्हणुन ब्राह्मणांचे जेष्ठपुढारी बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंती बंद पाडण्यासाठी गणेशोत्सव सुरु करुन शिवभक्तात शिवजयंती बाबत संभ्रम निर्माण केला.आणि करणारे टिळक हे आद्य ब्राह्मण होते.पुढे ब्राह्मणांनी शिवजयंती निश्चित होऊ नये यासाठी ‘वाद' कायम ठेवला. कारण शिवजयंतीच्या निमित्ताने प्रजा एकत्र येईल. ख-या शिवचरीत्रातून हक्क-अधिकाराची मागणी करणारे शिवभक्त मावळे निर्माण होतील, हे रोखण्यासाठी ब्राह्मणांनी शिवजयंतीचा वाद चालू ठेवला.हा वाद संपावा यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६६-६७ साली 1) वा.सी.बेंद्रे, 2) न.र.फाटक 3) ग.ह.खरे, 4) द.वा. पोतदार, 5) डॉ.आप्पासाहेब पवार, 6) ब.म.पुरंदरे यांची एक समिती स्थापन केली.वादग्रस्त बाबीं साठी शासन समिती स्थापन करते, उदा.श्रीकृष्ण आयोग, न्या.सावंत आयोग बापट आयोग.सराफ आयोग किती तरी आयोग आहेत.त्याप्रमाणे शिवजयंतीची तारीख निश्चित करण्यासाठी शासनाने शिवचरित्र संशोधकांची समिती स्थापन केली.
इतिहास तज्ञा बुद्धिजीवी विचारवंताला या कामाला २ वर्ष लागतात, तेथे त्यांना ३० ते ३३ वर्षे लावले, म्हणजेच हा वेळकाढूपणा होता कि नाही?.यासमितीने १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख शासनाला सादर केली.१९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख जाहीर झाल्याबरोबर कालनिर्णय कॅलेंडरवाले जयंत साळगांवकर यांनी तिथि प्रमाणे शिवजयंती साजरे करावी असे आव्हान केले. त्यासाठी वर्तमानपत्रात जाहीराती दिल्या.या पाठीमागे जयंत साळगांवकरांचे शिवरायांबाबत प्रेम नसून वाद निर्माण करणे ही भूमिका होती. जयंत साळगांवकरांनी तिथीचा आग्रह धरताच त्यासाठी 1) पुरंदरे, 2) बेडेकर, 3) मेहंदळे यांनी तिथी समर्थनार्थ साळगांवकरांना पत्र दिली.
शासनाच्या समितीत असणारे पुरंदरे तिथीच्या म्हणजेच ब्राह्मणांच्या कळपात घुसले. म्हणजे पुरंदरे हे शिवाजी प्रेमी नसून जयंत साळगांवकर इतर ब्राह्मणप्रेमी व विघ्नसंतोषी टिळक प्रेमी आहेत हे सिद्ध झाले.
1) जयंत साळगांवकर, 2) पुरंदरे, 3) बेडेकर आदि ब्राह्मणांनी शिवजयंती तिथीप्रमाणे व्हावी हा आग्रह धरून आपला ब्राम्हणी कावा दाखविला,त्याला बाळ कडू आणि बाळकडू पिलेले कावळे जोमाने कामाला लागले,शासन प्रशासनाने दिलेले निर्णय आम्ही मानत नाही हे दाखवून दिले,खरे तर लोकशाहीच्या चौकटीत यांच्या वर राष्टपुरुषाचा अवमान केला म्हणुन देशदोहाचा गुन्हा दाखल होऊ शकला असता,पण राज्यकर्ते मनुवादी हिंदुत्व मानणारे असल्या मुळे कोणीच कोणावर कारवाई केली नाही,
शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद कोणत्याही राजकीय पक्षाने निर्माण केलेला नसून पुरुरंदरे, बेडेेकर आणि जंयत साळगांवकर यांनी निर्माण केलेला आहे.पण हा वाद सर्वत्र व्हावा यासाठी ब्राह्मणांनी याला राजकीय स्वरुप दिले.अनेक राज्यकर्तांना माहित नाही की हा वाद ब्राह्मणांनी निर्माण केलेला आहे.यासाठी ब्राह्मणांनी नेहमीप्रमाणे धर्म-संस्कृतीचे हत्यार पुढे केले.ब्राह्मणांनी शिवजयंतीच्या तारखेला विरोध तर तिथीचा आग्रह धरला. या मागील षडयंत्र काय? तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाली तर वाद संपून देशात व जगात शिवजयंती होईल, कारण देशातील ग्रामपंचायत, शाळा, कॉलेजेस् पासून न्यायालय, संसद इ.सर्व कारभार तारखेप्रमाणे चालतात. तारीख वर्षातून एकदाच आणि एकाच महिन्यात येते. त्यामुळे वाद संपतो. सरकारी बँका, कार्यालये,शाळा, महाविद्यालयात शिवचरित्रावर भाषणे होतात. त्यामुळे शिवरायांचे खरे शिवचरित्र जनतेला समजते. खरे शिवचरित्र समजले तर बहुजनसमाज ब्राह्मणाला माफ करणार नाही, ही भीती ब्राह्मणांना होती. म्हणून ब्राह्मण शिवचरित्रात, जयंतीत वाद निर्माण करतात. म्हणजे प्रतिक्रिया देण्यातच बहुजन समाजाची शक्ती खर्च व्हावी हा ब्राह्मणांचा ब्राम्हणी कावा आहे.
इंग्रजी कॅलेंडर म्हणून तारखेला विरोध करणारे ब्राह्मण मात्र स्वत: इंग्रजी शिकतात. इंग्रजी संगणक, मोबाईल वापरतात. जयंत साळगांवकर कॅलेंडर जानेवारी ऐवजी चैत्र (एप्रिल) महिन्यात का बाजारात आणीत नाहीत? कॅलेंडरमध्ये तारखेचे आकडे मोठे व तिथीचे लहान का टाकतात? ब्राह्मणांना आज इंग्रजी आणि पूर्वी इंग्रजांशिवाय करमत नव्हते ते आज शिवजयंतीच्या तारखेला विरोध करतात. ब्राह्मण शिवजयंतीसाठी तिथीचा आग्रह का धरतात? तिथीप्रमाणे देशातील कोणताही कारभार चालत नाही. आपले गांव, शाळा, देश तिथीप्रमाणे नाही तर तारखेप्रमाणे चालतो. मग तिथी प्रमाणे वाद कायम का राहत?. कारण तिथी कधी मार्चमध्ये तर कधी एप्रिल-मे मध्ये येते. तिथीप्रमाणे ग्रामपंचायत किंवा प्राथमिक शाळा देखील चालत नाही.शिवाजीराजे जर,राष्ट्रपुरुष, युगपुरुष आहेत.तर तिथीत अडकविण्या इतके राजे लहान का करता?. शिवरायांना लहानपण देऊन राजे कायम वादात रहावेत यासाठी जयंत साळगांवकर यांनी तारीख-तिथीचा वाद निर्माण केला.कारण तिथी आली की पंचांग आले, पंचांग आले की भटजी आला. भटजीची रोजगार हमी आली व ती चालावी या करीतच हा वाद आहे, तारीख तिथीचा वाद लावून ब्राह्मणांनी शिवभक्तात दोन गट पाडले तारखेचे आणि तिथीचे शिवभक्त असा संघर्ष ब्राह्मणांनी निर्माण केला.त्यामुळे कावळे आणि मावळे संघर्ष अटळ आहे.  त्यात हे मराठी माणस व एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या मराठे अपोआप पुढाकर घेऊन वाद पेटवितात.हेच ब्राम्हणांना चांगले कळते.
शिवरायांची दोन वेळा जयंती करुन ब्राह्मणांनी एका महान राजाची टिंगल लावलेली आहे. ब्राह्मण कधी गुरुनानक, महावीर,बुद्ध,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी तिथीचा आग्रह धरतात का?.कारण तो समाज जागा असल्यामुळे ब्राह्मण हे धाडस करत नाहीत.मग शिवरायांचे मावळे कोण?.शिवचरित्रावर विचार करण्याऐवजी जयंतीचा वाद कार्यकर्ते करत होते.यामागे बहुजनांचे अज्ञान तर ब्राह्मणांचा क्रूरपणा होता व आज ही आहे. म्हणूनच बाळकडू पिलेले जेजे कावळे आहेत ते शिवजयंती निमित्ताने सत्यनारायण महापूजा ठेवतात.ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन सन्मान करण्यासाठी नव्हे तर मनुस्मृती नुसार शूद्र राजाने शौर्य दाखवुन स्वराज निर्माण करून बहुजन समाजाला न्याय हक्क अधिकार मिळवून दिला यांचा बदला म्हणून अवतारी पुरुष बनविले.छत्रपती शिवाजी महाराजांना देवीचा आशीर्वाद होता त्यामुळेच त्यांनी लढाया जिंकल्या असा भ्रम निर्माण केल्या जातो.त्याकरिता सत्यनारायण महापूजा घातली जाते. पण हे करतांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी कोणत्या गड किल्ल्यावर सत्यनारायण महापूजा घातल्याचा इतिहास आहे काय?. मग तिथी नुसार शिवजयंती साजरी करणारी ही मंडळी महाराजांचा सन्मान करीत नसुन घोर अपमान करीत आहेत. हे मराठी माणसाना व एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या मराठ्यांना कळत कसे नाही.हा इतिहास माहिती असणारे एक मराठा लाख मराठा म्हणणारे कुठे झोपेत त्यांना हा अपमान दिसत नाही काय?.भारत सरकार व राज्य सरकार हे भारतीय राज्य घटने नुसार म्हणजेच संविधानानुसार चालविल्या जाते.आज राज्यात सत्ताधारी पक्ष शिवसेना आहे.आणि शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री आहेत.त्यामुळेच शिव जयंती कशी साजरी झाली पाहिजे.शासनाने शिवचरित्र संशोधकांची समिती स्थापन केली होती.तिच्या निर्णयानुसार कि मनुस्मृती नुसार?. हे मराठी माणसाना व एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या मराठ्यांना कळले पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२ व्या जयंती निमित्याने सर्व रयतेला हार्दिक शुभेच्छा.

सागर रामभाऊ तायडे, भांडुप मुंबई, 9920403859,

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

बाबासाहेबांचा ३१ जानेवारी १९२० चा मूकनायक १०२ वर्षाचा झाला.

 बाबासाहेबांचा ३१ जानेवारी १९२० चा मूकनायक ०२ वर्षाचा झाला.


इतिहास वाचला तर इतिहास घडविता येतो असे सांगणारा सर्वात जास्त जागृत समाज आज स्वताच इतिहासाच्या आठवणी आचरणाने मोडून काढत आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तूटलेल्या पक्षाप्रमाणे होते." हे वाक्य वापरून ज्यांनी ज्यांनी पत्रकारिता केली त्यांनी स्वताचे दुकान मांडून धंदा केला. त्यांचे क्रांतिकारी विचारांची चळवळ उभी करणे हे उदिष्ट कधीच नव्हते. तर स्वताच खूप मोठे थोर विचारवंत आहोत,ते सिद्ध करण्याचा कला कौशल दाखवण्याचा धंदा होता. म्हणूनच त्यांनी चळवळीतील नेत्यांना इतरांना कमी लेखले. त्यामुळेच बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मध्यम मार्ग त्यांनी स्वीकारत नाही.मग सर्वच विश्वरत्न सम्राट, बहुजन लोकनायक, जनतेचे महानायक बनण्याचे स्वप्न पाहता पाहता क्रांतिकारी विचारांच्या चळवळी पासून वेगळे पडले.यांच्या जन्मा पासून शेवट पर्यंत मी बिनपगारी फुल पत्र लेखक,पत्रकार ते स्तंभ लेखक म्हणून राज्यात परिचित झालो त्याकरिता मी त्यांचे जाहीर आभार मानतो. असे असले तरी माझी असंघटीत कामगार नेता म्हणून ओळख कायम आहे. असंघटित कष्टकरी नाका कामगार,घर कामगारांच्या न्याय हक्क व प्रतिष्ठेसाठी मी स्वता मासिक,पाक्षिक साप्ताहिक संपादित करून प्रकाशित केले आहेत.ते माहिती करिता सोबत दिले आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक या पाक्षिकाने अस्पृश्य वर्गात जागृती निर्माण केली व त्यांना आपल्या अधिकारांची जाणिव निर्माण करून दिली. मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर बिरुदावली म्हणून संत तुकाराम महाराजाच्या खालील ओव्या छापल्या जात असतं.

काय करुन आता धरुनिया भीड | नि:शक हे तोड वाजविले ||१|| 

नव्हे जगी कोण मुकियाचा जाण |सार्थक लाजोनी नव्हे हित ||२||

पहिल्या अंकाच्या संपादकीयामध्ये खालील जन्मप्रतिज्ञा अशी व्यक्त केली होती.

आमच्या या बहिष्कृत लोकांत होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या इतर वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हिताची त्यांना पर्वा नसते इतकेच नव्हे तर, केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा इशारा एवढाच की, कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चटका इतर जातीत बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीतून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार यात बिलकूल शंका नाही. म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करुन आपले हित करावयाचे पढतमूर्खाचे लक्षण शिकू नये.

मूकनायकाच्या पहिल्या अंकातील हा ही मजकूर पुढीलप्रमाणे होता. "हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजला होय. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, या मनोऱ्याला शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची प्रज्ञा नाही." असा हा हिंदू आणि त्याचा धर्म आहे.

मूकनायक हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईतून प्रसिद्ध होत असे.पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या महार जातीच्या शिक्षित तरुणाने या पाक्षिकाचे संपादक केले. कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते. त्यामुळे त्यांना उघडपणे संपादकपदावर कार्य करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी मूकनायकाच्या व्यवस्थापकपदी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नेमणूक केली होती. पहिल्या अंकातील 'मनोगत' नावाचा अग्रलेख डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहिला होता. पुढील तेरा अंकातही त्यांनी लेख लिहिले. मूकनायकासाठी कोल्हापूरच्या छत्रपती राजर्षी शाहूमहाराज यांनी त्याकाळी २,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली होती. ज्या समाजाच्या समस्या वेदना बाबासाहेब मांडत होते.तो समाज आजच्या सारखा सुशिक्षित नव्हता तर मोठ्या प्रमाणत अक्षर ओळख नसलेला होता.आजच्या अशिक्षित माणसांना अक्षर ओळख आहे.तेव्हा ही हा समाज असंघटीत कष्टकरी कामगार,मजूर,शेतमजूर होता.आज इमारत बांधकाम कामगार,नाका कामगार,घरकामगार,वाहन चालक,सुरक्षा रक्षक,फेरीवाला,अनेक धंद्यातील कुशल कारागीर आहे.

मुकनायक या पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित,गरीब व शोषित लोकांच्या व्यथा त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हा होता. त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालिन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी अस्पृश्यांनी राजकिय सत्ता व शैक्षणिक ज्ञान मिळवणे गरजेचे आहे, असे त्यांना नेहमी वाटत असे. ५ जुलै १९२० रोजी आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. त्यानंतर ३१ जुलै १९२० पासून मूकनायकाचे संपादक पद ज्ञानेश्वर ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे होते.सध्या मूकनायकाचे १९ अंक उपलब्ध आहेत. त्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेले वैचारिक लेख आज ही प्रेरणादायी आहेत. मूकनायक या पत्राने सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी बलवत्तर स्थान निर्माण केले पाहिजे ही जाणीव निर्माण केली होती.   'मूकनायक' पत्रात विविध विचार,वर्तमानसार,निवडक पत्रातील उतारे, क्षेम,समाचार, कुशल प्रश्न, शेला पागोटे ही सदरे होती. 'मूकनायक' एप्रिल १९२३ मधे बंद पडले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक ३ एप्रिल १९२७ ला सुरु केले होते.ते स्वतः या पाक्षिकाचे संपादक होते. दुसऱ्या‍ अंकापासून ‘बहिष्कृत भारता’ वर बिरूदावली म्हणून ज्ञानेश्वर महाराजाच्या पुढील ओव्या उद्धृत केलेल्या होत्या.

आता कोंडद घेऊनि हाती। आरूढ पांइये रथी। देई अलिंगन वीरवृत्ती। समाधाने। जगी कीर्ती रुढवी। स्वधर्माचा मानु वाढवी। इया भारापासोनि सोडवी। मेदिनी हे। आता पार्थ निःशंकु होई। या संग्रमा चित्त देई। एथ हे वाचूनी काही। बोलो नये। आता केवळ संग्राम।संग्रामाशिवाय दुसरे काहीही नाही।  

डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशी युद्धप्रेरणा अस्पृश्यांत चेतवीत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र राज्य होते आणि मराठी ही मातृभाषा लोकभाषा होती. सर्वांना माहिती आहे की, बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड पंडित विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील अस्पृश जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समजू शकत होती. मात्र त्याच वेळी महात्मा गांधी आपले एक वृत्तपत्र "हरिजन" इंग्रजी भाषेत प्रकाशित करत होते. मात्र त्यावेळी अस्पृश जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती.

डॉ.बाबासाहेबांनी जनता हे पाक्षिक सुद्धा सुरू केले होते. या वृत्तपत्राचा पहिला अंक २४ नोव्हेंबर १९३० रोजी प्रकाशित झाला होता.त्यांचे संपादक देवराव विष्णू नाईक होते. त्यानंतर गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे हे पाक्षिक जनताचे संपादक झाले. पाक्षिक जनताचे पुढे ३१ ऑक्टोबर १९३० ला जनता साप्ताहिक झाले. साप्ताहिक जनता वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून ‘गुलामाला तु गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करून उठेल’ हे वाक्य होते. या वृत्तपत्रातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व निकडीचे प्रश्न चर्चिलेत तसेच जनतेतून विशेष म्हणजे त्यांनी विलायतेहून पाठवलेली पत्रे प्रकाशित झाली होती.१९५५ पर्यंत साप्ताहिक जनता सरू होते. या वृत्तपत्राचे संपादक वेळोवेळी बदलले. कारण त्यात अनियमितपणा निर्माण झाला होता. परंतु तरीही ते खूप दिवस टिकले. ४ फेब्रुवारी १९५६ रोजी साप्ताहिक जनताचे नामकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आले होते.१४ ऑक्टोबर,१९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.  बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हे पाक्षिक बंद पडले. 




११ एप्रिल २०१७ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधीत बाबासाहेबांचे नातू प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत हे पाक्षिक नव्या स्वरूपात पुन्हा प्रकाशित करण्याचे जाहिर केले व १० मे २०१७ रोजी याचा पहिला अंक प्रकाशित झाला.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीय अस्पृश समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी अनेक वृत्तपत्रे व पाक्षिकांचे प्रकाशन आणि संपादन केले होते. त्यांना या वृत्तपत्र-पाक्षिकांनी बहुजन चळवळीला पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. खरे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच बहुजन समाजाच्या पत्रकारितेचे आधार स्तंभ आहेत.हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक संघटना,पक्षाने स्वताचे मुखपत्र प्रकशित करणे आवश्यक असते. असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तूटलेल्या पक्षाप्रमाणे होते." आज आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र नाही तर प्रत्येक संघटना, पक्षाचे मुखपत्र आहे.सर्वांची विचारधारा एक असली तरी प्रत्येकाचे धेय्य उदिष्ट वेगवेगळे आहेत.त्यामुळेच हजारो पत्रकार,संपादक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांतिकारी विचारधारा स्वीकारून एकत्र येऊन चळवळीला योग्य दिशा दाखवू शकत नाही.यांची खंत वाटते.बाबासाहेबांचा ३१ जानेवारी १९२० चा मूकनायक १०२ वर्षाचा झाला तो आज ही प्रेरणादायी ठरावा असा आहे.इतिहास वाचला तर इतिहास घडविता येतो असे सांगणारा सर्वात जास्त जागृत समाज आज स्वताच इतिहासाच्या आठवणी आचरणाने मोडून काढतात असे लिहावे लागते. 

सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.

भिमसैनिक असते तर प्रबुद्ध भारत दैनिक असते.