मंगळवार, २८ मार्च, २०२३

पेन्शन योजना बंद झाली तेव्हा राष्ट्रीय ट्रेंड युनियन कुठे झोपल्या होत्या?.

 पेन्शन योजना बंद झाली तेव्हा राष्ट्रीय ट्रेंड युनियन कुठे झोपल्या होत्या?.


      कामगारांना न्याय देणारे कायदे प्रथम संपविले नंतर त्यांना त्याचं कायद्यानुसार मिळणारे आर्थिक फायदे बंद करण्यात आले,तेव्हा भारतीय कामगार कायद्यानुसार कामगारांना संघटित होऊन न्याय हक्क अधिकारासाठी अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी कामगारांची नांव नोंदणी करून कामगार संघटना स्थापनेचा अधिकार भारतीय कामगार कायदा 1926 नुसार मान्यता दिली जाते.त्या कामगार कायद्याला 2026 मध्ये शतक पूर्ण होणार आहे, त्याला सुरुंग लावण्याचे काम आर एस एस प्रणित भाजपाने 2005 ला सुरवात केली होती. आता केंद्रात भाजपा बहुमताच्या जोरावर कामगार कायदे व कामगारांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या सरकारी कंपन्या बेधडक विक्री करत आहे. त्याला राष्ट्रीय पातळीवरील बारा राष्ट्रीय ट्रेंड युनियन महासंघ प्रामाणिकपणे विरोध करतांना दिसत नाही.१९२६ ला कामगारांच्या संघटनांना कायदेशीर मान्यता देऊन त्यांना विशिष्ट दर्जा मिळवून देण्यासाठी आणि अशा कामगार संघटनांच्या सभासदांना संरक्षण देण्यासाठी १९२६ साली कायदा तयार करण्यात आला होता. त्याला कोणी कोणी हरताळ फसला यांचा कामगारांनी अभ्यास केला पाहिजे.

    नोंदणीकृत कामगार संघटनांचा निधी कोणत्या उद्दीष्टांसाठी खर्च केला जावा हे वरील कायद्याने ठरवून देण्यात आले होते. नोंदणीकृत कामगार संघटनांचे हिशेब तपासले जाऊन त्यासंबंधीची माहिती दरवर्षी नोंदणी अधिकाऱ्याकडे संघटनांनी पाठविली पाहिजे असेही या कायद्याने ठरवून देण्यात आले होते. कामगार संघटनेच्या अधिकाऱ्यांपैकी निम्म्यापेक्षा अधिक इतके अधिकारी ती कामगार संघटना ज्या उद्योगधंद्याशी संबंधित असेल अशा उद्योगधंद्यात प्रत्यक्ष काम करीत असले पाहिजेत अशी तरतूद या कायद्यान्वये करण्यात आली होती.पण अनेक संघटनाचे युनियनचे नेतृत्व कामगार,कर्मचारी नसतांना करतांना दिसतात.त्यामुळेच ते कामगारांच्या बाजूने कमी आणि मालकांचा बाजूने जास्त आग्रही असतात.त्यामुळेच जुने कामगार सेवा निवृत्त झाल्यावर त्याजागी नवीन कामगारांची भरती होत नाही.किंवा सेवानिवृत्ती जवळ आलेल्या कामगारांच्या मुलांना त्या जागेवर भरती करण्याची तरतूद कायद्याने होती.आय टी आय केलेल्या मुलांना प्रथम प्राधान्य होते ते ही बंद करण्यात आले.त्याजागी कंत्राटी कामगार नेमण्यात येत आहेत.याला या संघटीत कामगारांच्या राष्ट्रीय ट्रेड युनियन जबाबदार आहेत. त्यांचे मनुवादी विचारधारा त्यांना अशी भूमिका घेण्यास भाग पडतात.हेच कामगारांच्या लक्षात आले नसल्यामुळेच ब्राम्हणशाही आणि भांडवलशाही हातात हात घेऊन यशस्वी वाटचाल करीत आहे.हाच धोका विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १२,१३ फेबुर्वारी १९३८ ला मनमाडला रेल्वे कामगारांच्या दोन दिवशीय परिषद मध्ये सांगितला होता. 

       भारतीय कामगार कायदे असतांना जुनी पेन्शन योजना कशी खतम झाली?. शासकीय सेवेतून रिटायर झाल्यानंतर कर्मचाऱ्याला सन्मानपूर्वक जिंदगी जगता यावी.यासाठी पेन्शन योजनेचे प्रावधान करण्यात आले होते,हे राष्ट्रीय ट्रेड युनियन महासंघ कसे विसरले?. जुनी पेन्शन योजना एम्प्लॉईड प्रॉव्हिडंट फंड ॲक्ट 1952 नुसार सुरू होती.ही योजना काय आहे ते कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना समजले नाही काय?कि त्यांना माहिती असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यासाठी कामगारातील कार्यकर्ता हा प्रशिक्षित असावा असे सांगितले होते.प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वेतनामधून सहा टक्के कापत केलेला पैसा एम्पलॉइड प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) या ऑफिसला जमा होत असतो.  या जमा राशीचा उपयोग करून भारत सरकारने पब्लिक अंडरटेकिंग कंपन्या आणि गव्हर्मेंट अंडरटेकिंग कंपन्या निर्माण केल्या. ज्यामध्ये लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया एल आय सी,बाल्को कंपनी,भारतीय हेव्ही इलेक्ट्रॉनीक लिमिटेड कंपनी,(BHEL) मारोती मोटर्स कंपनी यासारख्या अनेक कंपन्या (भारत सरकारचा उपक्रम,भारतीय सार्वजनिक उद्योग उपक्रम) निर्माण केल्या. तसेच सार्वजनिक हॉस्पिटल,उडान पूल,राष्ट्रीय महामार्ग,रस्ते,  सरकारी कार्यालय इमारती,बँका कार्यालय इमारती,रेल्वे, नदीवरील धरणे अशा अनेक प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणत पैसे गुंतवले असतात.

      देशात आता पर्यंत जवळ जवळ 350 गव्हर्मेंट अंडरटेकिंग आणि पब्लिक अंडरटेकिंग कंपन्या भारत सरकारने प्रायव्हिडंट फंडाच्या राशीतून निर्माण केल्या होत्या. या प्रत्येक कंपनीचा वार्षिक टर्न ओव्हर सरासरी 25 हजार करोड रुपया मध्ये होता. या मधून भारत सरकारच्या तिजोरीत सरासरी 24.33 पर्सेंट डिव्हीडंट दरवर्षी गोळा होत होता.अशा या सोन्याचे अंडे देणाऱ्या कोबंड्या होत्या सन 2019 मध्ये ह्या कंपन्यांनी भारत सरकारला डिव्हिडंट स्वरूपात सव्वा लाख करोड रुपया दिले होते.अशी आकडेवारी नुसार माहिती मिळते.कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचे पैसे या सर्व कंपन्यांमध्ये गुंतले असल्यामुळे जुनी पेन्शन योजना यानुसार कर्मचाऱ्यांना मिळत होती. विषमतावादी मनुवादया उच्चवर्णीयांना चाकरी करणारे लाचार मजूर मिळत नसल्यामुळे त्यांना राजकीय सत्ता हाती आल्यानंतर यांची अंमलबजावणी करण्याची पूर्वपासून तयारी केली होती. याला राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन विरोध करू शकतील यांची पूर्व कल्पना पण होती.म्हणूनच त्यांनी प्रथम कामगारांचे नेतृत्व करणारे नेते निर्माण केले.म्हणजे योग्य वेळी ते सरकारच्या निर्णया विरोधात कामगारांना रस्त्यावर उतरून आंदोलने करण्याची भूमिका घेणार नाहीत.

    जुन्या पेन्शन योजनेनुसार कर्मचाऱ्याचा रिटायरमेंटचा पैसा या कंपन्यांमध्ये सुरक्षित होता मात्र या सर्व कंपन्यांचे खाजगीकरण सरकारने झपाट्याने सुरू केले.त्यामुळे भविष्यामध्ये कर्मचाऱ्याला पेन्शन कशी द्यावी ? हा प्रश्न निर्माण झाला.या समस्या निर्माण झाल्या तर काय करावे यासाठीच कामगार कायदे रद्ध करण्यात आले.म्हणून केंद्रामध्ये असलेल्या (अटल बिहारी वाजपेयी) सरकारने सन 2004 जुनी पेन्शन योजना बंद केली,तेव्हा काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय ट्रेड युनियन ने कोणताही विरोध केला नाही आणि जानेवारी 2005 पासून शासकीय सेवेमध्ये रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना (NPS) लागू केली.नवीन पेन्शन योजनेनुसार कर्मचाऱ्यांचा दहा टक्के वेतन राशी + सरकारची दहा टक्के रक्कम मिळून (शेअर मार्केट) मध्ये गुंतविल्या जाईल.या निर्णयानुसार नंतरच्या काळा मध्ये काँग्रेस सरकारने त्याची अंमलबजावणी सुरू केली.
        भारत सरकार नावाने भाजपा नावाच्या आर एस एस प्रणित ब्राम्हणांच्या राजकीय टोळीने प्रॉफिट मध्ये चालणाऱ्या कंपन्या विकल्या असल्यामुळे विजय मल्ल्या, निरव मोदी, अंबानी या सारख्या डिफॉल्टर (कर्ज बुडवे) लोकांच्या कंपन्यांमध्ये नवीन पेन्शन योजनेचे पैसे गुंतवल्या जात होते.या (डिफॉल्टर) लोकांची कंपनी प्रॉफिटमध्ये चालली तर भविष्या मध्ये (पेन्शन) मिळेल आणि ही पेन्शन सर्वस्वी (शेअर) मार्केट वर अवलंबून राहील अशी योजना होती.यामध्ये रिफंड मिळण्याची शंभर टक्के खात्री नव्हती हे त्यांना महिती असून ही पार्टीला मोठ्या रक्कमेचा फंड मिळाल्यामुळे या चोरांना परदेशात पळून जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने मदत केली हे आता लपून राहिले नाही.
     भारतीय कामगारांना धर्माच्या नांवे मूर्ख बनविता येते.हा अनुभव पाठीशी असल्यामुळेच सन 2005 च्या अगोदर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू आहे असे सांगितले जाते.मात्र त्यांचा पैसा सुद्धा शेअर मार्केटमध्ये गुंतवल्या जात होताहे राष्ट्रीय ट्रेड युनियनच्या अनुभवी नेतृत्वाला कसे कळले नाही?. कारण सरकारच्या मालकीच्या कंपन्या राहिलेल्या नाही.जुनी पेन्शन योजना कशी खतम झाली ? तर ही योजना खाजगीकरणाच्या धोरणाने खतम झाली.असे आता सर्वच बोंबलतात.पण समतावादी समाज व्यवस्था नष्ट करून मनुवादी समाज व्यवस्था निर्माण करणे हे त्यांचे प्रमुख उधिष्ट होते.त्यामार्गाने ते यशस्वी वाटचाल करतांना दिसते.
    2011 पासून कोणत्याही सरकारने नोकर भरती केलेली नाही. या काळात विविध डिपार्टमेंटचे 37% कर्मचारी रिटायर झाले. म्हणजेच शासकीय नोकऱ्यावर एक प्रकारची अघोषित बंदी आणली आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी कपात सुरू आहे.३६५ दिवसा पैकी २४० दिवस जे काम चालते ते काम कायमस्वरूपी समजल्या जाते.ते कंत्राटी पद्धतीने भरले नाही पाहिजे असा कायदेशीर नियम असतांना तो बिनधास्तपणे मोडीत काढण्याचे धाडस सरकारने राष्ट्रीय ट्रेड युनियनचे सहकार्य असल्या शिवाय केले नाही.सर्वच राजकीय पक्षाच्या ट्रेड युनियन याविरोधात पोटतिडकीने लढल्या नाहीत.कारण कामगार प्रथम हिंदू आहेत,नंतर कामगार आहेत.म्हणूनच हिंदुत्ववादी सरकारच्या विरोधात, गोवळकरवादी,गांधीवादी,लोहियावादी,समाजवादी,मार्क्सवादी एकूण बारा राष्ट्रीय ट्रेड युनियन सनदशीर मार्गाने लढल्या नाही.किंवा त्या विरोधात जागतिक पातळीवरील कामगार परिषेदत मध्ये गेल्या नाही.भारतीय संविधान संपविल्या शिवाय मनुवादी हिंदुराष्ट्र निर्माण होणार नाही त्यासाठी पेन्शन योजना खतम होणे,गव्हर्मेंट नोकऱ्या खतम होणे,उच्च शिक्षण महाग होणे,आरोग्य सुविधा महाग होणे हे सर्व खाजगीकरणाचे दुष्परिणाम असले तरी यामागे मनुवादी समाज व्यवस्था निर्माण करणे हेच प्रमुख उधिष्ट होते आणि आहे.
    जुन्या पेन्शन योजनेचा लढा उभारणाऱ्या कर्मचाऱ्यांना या गोष्टीची माहिती असायला हवी.जुन्या पेन्शन योजनेचे संसाधने केंद्र सरकारने खतम केलेले आहे!.पेन्शनची योजनाही केंद्र सरकारची योजना आहे. राज्य सरकारची नाही.निवडणुकी दरम्यान काही राजकीय पक्षा कडून काही खोटे आश्वासने दिले जात आहे.जुनी पेन्शन योजना या राज्यात लागू झाली आहे,आम्ही सत्तेत आलो तर त्या राज्यात लागू करू.हा केवळ बनवाबनवीचा कार्यक्रम आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यांनी या भ्रमाला बळी पडू नये. कारण राज्य सरकार कडे उत्पन्नाचे पुरेसे साधन नाही. त्यांना अखेर केंद्र सरकारवरच अवलंबून राहावे लागते.म्हणून सर्व कामगार,कर्मचाऱ्यांनी महात्मा फुले,रावबहादूर लोखंडे,राजर्षी शाहू महाराज, पेरियार ई.व्ही. रामसामी नायकर आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांच्या ट्रेड युनियनच्या नेतृत्वामध्ये संघटित होणे काळाची गरज आहे.
         स्वतंत्र मजदूर युनियन ही एकमेव राष्ट्रीय ट्रेड युनियन आहे.जी देशपातळीवर २२ राज्यात आणि 47 क्षेत्रात आघडीवर कामगार,कर्मचारी अधिकारी वर्गाचे नेतृत्व करीत आहे.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले होते "शासन कर्ती जमात बना!." आणि शासन यंत्रणेवर कायम दबाव निर्माण करा.हेच बहुसंख्य मागासवर्गीय कामगार विसरले म्हणूनच मनुवादी राजकीय पक्ष आणि त्यांच्या कामगार संघटना सर्व यंत्रणेवर नियंत्रण ठेऊन काम करीत आहेत.हेच आपण विसरतो आणि त्यांना दोषी ठरवतो.करीत आत्मचिंतन करा.हेच पेन्शन बंद झालेल्या कामगारांना आणि भविष्यात पेन्शन हवे असणाऱ्या कामगारांना जाहीर आवाहन आहे.मग आज पासून प्रश्न विचारा पेन्शन योजना बंद झाली तेव्हा राष्ट्रीय ट्रेंड युनियन कुठे झोपल्या होत्या?.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.

सम्राट अशोकाचा प्रबुद्ध भारत कसा निर्माण होईल ?.

 सम्राट अशोकाचा प्रबुद्ध भारत कसा निर्माण होईल ?.


 

देवनामप्रिय प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती मोठ्या उत्सवात आणि प्रमाणत का साजरी होत नाही. भारतात अनेक महापुरुषाच्या जयंती मोठया उत्साहात साजऱ्या केल्या जातात, पण दि ग्रेट अशोक सम्राटाचा सम्राट म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात साजरी केली जात नाही.तिथीनुसार तारखेनुसार,काल गणना नुसार असे अनेक वाद महापराक्रमी, राजे,महापुरुष आणि संतांच्या बाबतीत उपस्थित केले जातात त्यामुळे त्यांच्या क्रांतिकारी विचारापासून प्रेरणा घेण्यापासून रोखण्याचा हा खरा मुद्दा असतो.माननीय देवदास बानकर संपादक दैनिक मुक्तनायक कोल्हापूर यांनी सम्राट अशोकाच्या काळाचा अभ्यास करून १२ एप्रिल ही तारिक सम्राट अशोक जयंती आहे असे अकरा वर्ष ज्याचे समर्थन केले होते.त्यांनीच आता सम्राट अशोक जयंती (अशोक अष्टमी ) चैत्र महिन्याच्या अष्टमी दिनी अर्थात बुद्धाब्द शक वर्षातील येणाऱ्या तारखेप्रमाणे येत्या बुधवार दिनांक २९ मार्च २०२३ रोजी असणार असे सांगितले आहे.धम्म दायक सम्राट राजा यांचा जयंतीची अशोक अष्टमी नोंद ही सुर्याकालगणनेवर आधरित ग्रगेरीन कॉलेनडर ख्रिस्ती शकातील तारखेप्रमाणे १२ एप्रिल धरण्यात आली होती.बुद्धाब्द शकाप्रमाणे याच दिवशी सम्राट अशोक जयंती अर्थात अशोक अष्टमी साजरी करणे योग्य आहे.कारण अडीच हजार वर्षा बुद्धाब्द शक हे चंद्रकालेगणनेवर मोजले जाते.आजही ती परंपरा कायम आहे.त्यात बदल केलेला नाही आणि बदल करता येत नाही.म्हणूनच ख्रिस्ती तारखेवर न जाता बुद्धाब्द शक नुसार सम्राट अशोक जयंती साजरी झाली पाहिजे.देवदास बानकर सह अनेक अभ्यासकाचे मत आहे.
        सम्राट अशोक यांचे विशाल साम्राज्य होते ज्याला अखंड भारत म्हणतात, सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार केला.तक्षशीला,नालंदा सारखे 23 विश्व विद्यालय स्थापना केली,या विद्यालयामध्ये देश -विदेशातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी येतं असत. सम्राट अशोकचा कालखंड हा सुवर्ण कालखंड गणला जातो. भारतीय राष्ट्र ध्वजावर सम्राट अशोकाचे राजचिन्ह अशोक चक्र अंकित आहे. भारतात सम्राट अशोक पूर्वी व नंतर सम्राट अशोक सारखा सम्राट झाला नाही. तरीही या देशात सम्राट अशोकाची जयंती किंवा त्यांच्या नावाचा प्रचार -प्रसार होत नाही, यावर्षी पासून सम्राट अशोक जयंती साजरी करण्याचा संकल्प अनेक संस्था,संघटना मंडळ पुढाकार घेणार आहेत.          
       सम्राट अशोक जयंती हा एक सण व उत्सव आहे जो चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व ३०४ बिहार व निर्वाण (निधन) इसवी सन पूर्व २३२ मध्ये झालेले आहे. हा सण मोठ्या उत्सात साजरा करतात.चक्रवर्ती सम्राट अशोक हे मौर्य घराण्यातील महान व प्रसिद्ध सम्राट होते. त्यांनी अखंड भारतावर इसवी सन पूर्व २७२ ते इसवी सन पूर्व २३२ च्या दरम्यान राज्य केले. यांना महान अशोक किंवा अशोक द ग्रेट असेही संबोधले जाते. हा भारतीय समाजातील सर्वात महत्त्वाचा लोककल्याणकारी राजा ज्याने अर्धा आशिया खंड काबीज केला होता. आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण,पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूर पर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला.अनेकांच्या मतानुसार,सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राट होते. सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासात ही सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून सम्राट अशोकाला स्थान दिले आहे.तरी त्यांच्या महान कार्यांची नोंद घेऊन जयंती उत्सव का साजरा केल्या जात नाही.हाच खरा संशोधनाचा विषय आहे.
        प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते. भारताच्या इतिहासात असे अनेक चक्रवर्ती सम्राट होउन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये रामायण,महाभारत इत्यादी आहेत प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील अशोक हा शेवटचा चक्रवर्ती सम्राट झाला त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही.म्हणूनच मान्यवर कांशीराम आपल्या कॅडरबेस कार्यकर्त्यांना नेहमी सांगत होते बहुजन समाज पार्टीला सम्राट अशोकाचा भारत निर्माण करायचा आहे.
     अशोकने भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले.बसपाला मानणारा बहुसंख्य बहुजन समाज भारताच्या कोण्या कोण्यात बसलेला आहे.उत्तर भारतातील बहुसंख्य ओबीसीनी मुंबईत व नागपुरात धम्मदिक्षा घेतली,ज्यात मौर्य समाजाचे मोठे योगदान आहे,मौर्य समाज हा सम्राट अशोकाच्या रक्ताचा वारसदार आहे असे म्हणतात पण तो मोठ्या संख्येने हिंदुत्व मानसिकतेने पछाडलेला होता आणि आहे.
लडाक,जम्मू,काश्मीर मध्ये बसपाचा आमदार,खासदार निवडून येण्या मागे सम्राट अशोकाचा भारत ही विचारधारा 
होती
.पाकीस्थान,अफगाणीस्तान पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडील केरळ पर्यंत अशोकाच्या साम्राज्याच्या सीमा होत्या. कलिंगाच्या युद्धातील महासंहारा नंतर कलिंग काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. ते सम्राट अशोकाने करून दाखविले. त्याच्या राज्याचे केंद्रस्थान ज्याला आताचे बिहार म्हणजे तेव्हाचा मगध होता, बिहारची राजधानी पाटणा म्हणून ओळखली जाणारी तेव्हाची पाटीलपुत्र ही त्याची राजधानी होती.याचे एतिहासिक पुरावे आज पटना शहरात पाहण्यास मिळतात.कलिंगाच्या युद्धात झालेल्या प्रचंड मनुष्य हानी पाहून सम्राट अशोकाने हिंसेचा त्याग केला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्याने स्वतःला बौध्द धम्मचा प्रचार आणि प्रसार करण्या करिता समर्पित केले अशोकाच्या काळातील अशोकाच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपर्‍यात सापडतात त्यामुळे अशोकाबाबतची उपलब्ध ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे.
     अशोकाने कलिंगचे युद्ध पार पडल्यानंतर जिकलेल्या रणांगणाची व शहरांची पहाणी करायची ठरवले. त्यावेळेस त्याने फक्त सर्वत्र पडलेले प्रेतांचे ढीग,सडण्याचा दुर्गंध, जळलेली शेती,घरे व मालमत्ता पाहिली. ते पाहून अशोकाचे मन उदास झाले व यासाठीच का मी हे युद्ध जिंकले,व हा विजय नाही तर पराजय आहे, असे म्हणून स्वतःला त्या प्रचंड विनाशाचे कारण मानले. हा पराक्रम आहे की दंगल, व बायका मुले व इतर अबलांचा हत्या कशासाठी व यात कसला प्रराक्रम असे स्वतःलाच प्रश्न विचारले. एका राज्याची श्रीमंती वाढवण्यासाठी दुसर्‍या राज्याचे अस्तित्वच हिरावून घ्यायचे? ह्या विनाशकारी युद्धानंतर शांती,अहिंसा, प्रेम,दया ही मूलभूत तत्त्वे असलेला बौद्ध धम्माचा मार्ग अशोकाने अवलंबायचे ठरवले. त्याने स्वतः बौद्ध धर्माचा प्रसारक म्हणूनही काम करायचे ठरवले. यानंतर अशोकाने केलेले कार्य त्याला इतर कोणत्याही महान सम्राटांपेक्षा वेगळे ठरवतात. ज्यात क्रूरकर्मा राज्यकर्त्याचे महान दयाळू सम्राटात रुपांतर झाले अशी कलिंगाचे युद्ध ही इतिहासातील एक अतिशय वेगळी घटना समजली जाते. 
     बौद्ध धर्माचा जगभर झालेल्या प्रसारास खूप मोठ्या प्रमाणावर अशोकाने केलेले कार्य जबाबदार होते असे बहुतेक इतिहासकार मानतात.तरी उत्तर भारतातील मागासवर्गीय ओबीसी बौद्ध धम्माकडे न जाता स्वतःला जास्तच सवर्ण समजत होते.जेव्हा अन्याय अत्याचार आणि भीषण हत्याकांड झाली तेव्हाच त्यांना आपण कोण आहोत आणि आपले पूर्वज कोण होते यांची आठवण होते.त्यांनी लोकसंख्येच्या बळावर राजकीय परिवर्तन घडविणे अपेक्षित असते.मान्यवर कांशीराम यांनी बौद्धधम्माची दिक्षा जाहीर पणे घेतली असती तर उत्तर भारत सम्राट अशोकाचा भारत झाला असता.त्यांची चूक उत्तर भारतातील ओबीसीनी सुधारली आता मायावतीने कोणाचा आदर्श घ्यावा हे ठरविले पाहिजे. किती दिवस आर एस एस प्रणित भाजपाला धर्मपरिवर्तनाच्या धमक्या देणार?. आणि राजकारण करणार करीत राहणार?.सम्राट अशोकाचा भारत बौद्धमय करण्यासाठी मागासवर्गीय ओबीसी तयार आहे हे देशातील धम्मदिक्षा सोहळ्यावरून दिसत आहे.
इतिहास सांगतो वैशाली (बिहार) येथील अशोक स्तंभ अशोकाच्या ह्या कार्यात त्याला देवीपासून झालेल्या मुलांची मोठी मदत झाली.अशोकाचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा ह्यांनी भारताबाहेर श्रीलंकेत जान तेथील राजाला बौद्ध धम्माची शिकवण दिली यामुळे भारतापुरते मर्यादित राहिलेला हा धम्म भारताबाहेर पसरण्यास सुरुवात झाली. असे मानतात की अशोकाने बौद्ध धर्मीयांसाठी हजारो स्तूपांची व विहारांची निर्मिती केली. त्यांतील काही स्तूपांचे अवशेष आजही पहावयास मिळतात. यातील मध्यप्रदेशात सांची येथील स्तूप प्रसिद्ध आहे, हा स्तूप अशोकाने बांधला आहे.
          मायावतीने असेच बुद्ध सम्राट अशोक,महात्मा ज्योतिबा फुले,राजर्षी शाहू महाराज डॉ भिमराव बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा सांगून ऐतिहासिक वास्तू जिल्हे, विद्यापीठ निर्माण केले. पण धम्मदिक्षा घेतली काय?.सम्राट अशोकाने आपल्या कारकिदीतील पुढील वर्षांमध्ये अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले, जंगलामध्ये चैनीसाठी होणारी प्राण्यांची शिकारीवर बंदी आणली, प्राण्यांवर होणार्‍या कोणत्याही प्रकारची हिंसकतेवर ही बंदी आणली तसेच शाकाहाराला प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षा मिळालेल्या कैद्यांना अशोकाने सहिष्णूपणे वागवले. गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक विद्यापीठे तसेच, शेतकर्‍यांसाठी पाण्याचे कालवे बांधले. त्याच्या राज्यात सर्व प्रकारच्या जातीधर्माच्या लोकांना सहिष्णुरीत्या वागवले जाई. तसेच अशोकाने आपले एकेकाळी ज्याच्यांशी युद्धे केली त्यांच्याशीही मैत्रीपूर्ण संबध वाढवले. सम्राट अशोकाने अनेक समाजोपयोगी कार्ये केली.अशोकाने आपल्या कारकीर्दीत राज्यात अनेक रुग्णालये व महामार्गाचे जाळे निर्माण केले, रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड ही अशोकाचीच कल्पना आहे,असे मानतात. 
          आपण सम्राट असल्याच्या अधिकाराचा फायदा त्याने समाजोपयोगी कार्यासाठी केला. त्यानंतर लोक अशोकाला धम्मअशोक असे म्हणू लागले. अशोकाने धम्माची प्रमुख आचारतत्त्वे विशद केली,अहिंसा,सर्व जाती धर्मांबद्दल सहिष्णुता,वडिलधार्‍या माणसांना मान देणे,संत,महात्मा,शिक्षकांना योग्य तो मान देणे, दासांना माणुसकीने वागवणे. अशा आचार तत्त्वांना जगात कोणताही समाज नाकारू शकणार नाही. अशोकाच्या इतिहासकारांनुसार त्याने कलिंगाच्या युद्धानंतर कोणतेही प्रमुख युद्ध छेडले नाही परंतु त्याला शेजारी राष्ट्रांशी ग्रीक राज्ये,चोल साम्राज्ययाच्याशी त्याला नेहमी युद्धाची शक्यता वाटत होती. परंतु अशोकाने पूर्वायुष्यातील केलेल्या मोहिमांमुळे व मगधच्या सामर्थ्यामुळे अशोकने बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्याच्या शेजारी राज्यांनी त्याला छेडण्याचे साहस केले नाही. तसेच बौद्ध धर्म स्वीकारला, अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले तरी मगधाचे सैनिकी सामर्थ्य अबाध्य ठेवले. अशोकाला ग्रीक जगताची माहिती होती असे कळते. तसेच चंद्रगुप्त मौर्याने केलेल्या ग्रीकांविरुद्धच्या मोहिमांमुळे मौर्य साम्राज्याची कीर्ती ग्रीस,इजिप्तपर्यंत पोहोचली होती असे कळते. मग सम्राट अशोकाचा भारत बौद्धमय होण्यास वेळ का लागतो. राजकीय गणिते मांडत राहिल्यास अशोकाचा भारत बौद्धमय होईल काय?. हे देशभरातील भव्य धम्मदिक्षा सोहळे केवळ ढोंग आहेत असे म्हणल्यास चूक ठरणार नाही. आज देशात लोकशाही मार्गाने सत्ता काबीज करून लोकशाहीचा सरळ खून करण्याचे कारस्थान उघड उघड होत आहे. लोकशाहीची सर्व मूल्य पायदळी तुडवुन ठोकशाही,हुकूमशाही निर्माण होतांना दिसत आहे. सम्राट अशोक ते छत्रपती शिवाजी,संभाजी महाराज यांना ज्या मनूस्मृती संपविले त्याचं पद्धतीने आज लोकशाही संपत आहे.म्हणूनच विचारावेसे वाटते सम्राट अशोकाचा प्रबुद्ध भारत कसा निर्माण होईल.सम्राट अशोकाचे समाजो उपयोगी विचार अंमलात आणले नाही.तर विषमतावादी विचारांचे लोक डोके वर काढून समाजोपयोगी विचार नष्ट केल्या शिवाय राहणार नाहीत.आज तरी भारतात हेच घडताना दिसत आहे.म्हणूनच सम्राट अशोक जयंती निमित्याने त्यांच्या विचार कार्यावर चर्चा संवाद होणे आवश्यक आहे.सम्राट अशोकाच्या जयंती निमित्याने त्यांच्या क्रांतिकारी विचारांना कार्यांना त्रिवार अभिवादन आणि सर्व प्रिय वाचक,धम्म उपासक उपासिका यांना हार्दिक शुभेच्छा.
सागर रामभाऊ तायडे भांडुप मुंबई ९९२०४०३८५९.

अपयश,अहंकार विसरा तरच सुख मिळू शकते.

 अपयश,अहंकार विसरा तरच सुख मिळू शकते.



        देशात महापुरुषाच्या नावाने काम करणाऱ्या चळवळीला साध्य अपयश येत आहे. कारण कार्यकर्त्यांचा व नेत्यांचा अहंकार सर्वांना एकत्र येऊ देत नाही. त्यामुळेच चळवळीला अपयश येत आहे.हे कोणी मान्य करीत नाही.म्हणूनच कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची अशी भावना झाली आहे की होऊ शकत नाही.स्वताचा अहंकार बाजूला ठेवत नाही पण अपयशाची करणे सांगत सुटतात.कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती भंग करते.तुम्ही कधी कधी जास्त स्पष्ट बोलता. त्यामुळे लोक तुमच्या पासून दुरावतात.पण त्यांना तुमच्या बोलण्याचा अर्थ कळेपर्यंत त्याची वेळ निघून गेलेली असते.
     समाजाला एकत्र करण्यासाठी प्रथम कार्यकर्त्यांना एकत्र केले पाहिजे.तरच समाज एकत्र येऊ शकतो.अन्यता कार्यकर्ते समाजातील लोकांत गैरसमज निर्माण करत.गेले पंधरा दिवस मी भिक्खुनी आर्या संघमित्रा,आर्या भिमकन्या आणि आर्या कल्याणी यांना घेऊन भांडूप विभागातील नगरा नगरात फिरत आहे.धम्म जाणणाऱ्या धम्म उपासक,उपासिका यांच्या घरी जाऊन भिक्खुनी संघाला बुद्ध विहार परिसरात निवास्थान बांधकामासाठी आर्थिक मदत गोळा करीत आहे.त्यावेळी भेटणारा समाज बांधव,कार्यकर्ता हा अपयश,अहंकार यावरच चर्चा करण्यावर भर देतांना दिसत होता.लोक बरोबर नाहीत,लोक स्वार्थी आहेत.ते ठीक आहे आपण काय करतो त्याला शक्य ती मदत करा एवढेच त्यांना सांगत असतांना ते दुसऱ्यांचे च सांगत होते.म्हणूनच माझे त्यांना सांगणे होते,अपयश,अहंकार विसरा तरच सुख मिळू शकते.
       प्रत्येक माणसांच्या आयुष्यात दोनच गोष्टी पाहीजेत.एक कुटूंबाचे प्रेम आणि दोन काही प्रेमळ व्यक्तींची साथ.अगदी तुमच्यासारखी,वाचका सारखी.आधाराची अपेक्षा नकळत माणसाला अपंग बनवून जाते. अंथरुणावर रात्री झोपताना उद्याची चिंता भासली की, समजून जायचं आयुष्य जबाबदारीच्या पायऱ्या चढत आहे.तेव्हा अपयश,अहंकार विसरला पाहिजे.तरच सुख मिळू शकते.अन्यता शांत झोप लागत नाही.
        शाळेतील पुस्तकातील धडा वाचून पाठ करावा लागतो,तेव्हा लक्षात राहते.पण कुटुंबातील धडा तर लहान मुलांकडून शिकता येतो, तो घेतला पाहिजे. की,जे लहान मुल आपल्या हातून मार खाते तेच मार खाऊन, परत आपल्यालाच बिलगतात. त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.म्हणूनच नाती जपत चला.कारण,आज माणूस एवढा,एकटा पडत चालला की, कुणी फोटो काढणारा पण नाही. सेल्फी काढावी लागते. ज्याला लोक फॅशन समजतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच येत असतो. कोणी आपल्याला केवळ अजमावून जाते. कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते. कोणी वापर करून जाते. तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते. 
     निसर्गाने माणसाला घागर भरून सुख दिलं. अन् एक थेंब दुःखाचा दिला. तर माणूस सुखाची नाही, तर दुःखाचीच चव सांगत बसतो. घागर भर सुखाला विसरून जातो. चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असते, त्यांची आठवण काढावी लागत नाही. ते कायम आठवणीतच राहतात. खोटेपणाचे मुखवटे घातलेली माणसं ही कधीच कुणाची नसतात. ती असतात फक्त आणि फक्त त्यांच्यातल्या स्वार्थी अन् लोभी वृत्तीची. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत,नकळत काही तरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात. तर काही कसं जगायचं ते शिकवतात. रोजचा उगवणारा नवा दिवस हा आपल्या मनाप्रमाणे रोजच उगवेल असे नाही. मात्र उगवणाऱ्या प्रत्येक नव्या दिवसात आपल्या मनासारखं काही ना काही निश्चितच ऊगवलेलं असेल.त्यासाठी अपयश,अहंकार विसरा तरच सुख मिळू शकते.
         एखादे वेळेस आपण स्वत: जरी आनंद निर्माण करु शकलो नाही. तरी हरकत नाही. मात्र दुसऱ्यांच्या आनंदात अगदी मनपासुन हसतमुखाने सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करा. तुमचा आनंद आपोआप शतपटीने निर्माण होईल. सुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असावं. जे दररोज उमलत राहावं आणि दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं. जे क्षणात निघून जावं. आयुष्यात काहीही असो  स्वकर्तृत्वावर मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण त्याची किंमत स्वतःला ही राहील, आणि इतरांना ही. प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील. पण जी माणसे तुमची वाणी विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील. ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते.म्हणूनच अपयश,अहंकार विसरा तरच सुख मिळू शकते.
       माणसाने भितीमुळे डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही. आणि संकट आल्या शिवाय माणसांचे डोळे उघडत नाहीत. प्रत्येक माणसाने राग आल्यावर थोडं थांबले आणि चूक झाल्यावर थोडं नमले. तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात. आपल्या मागे प्रामाणिक राहणारी लोक, फार कमी असतात. पण जी असतात ती आयुष्यभरासाठी आपली असतात. नुसतंच आपलं म्हणून नाही चालत. आपल्यानी आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं. निसर्गाने दिलेले दान डोळे आणि भावनिक स्पर्श,शब्दांपेक्षा छान बोलतात. अट एकच समोरच्याला ते समजुन घेण्याच्या भावना असल्या पाहीजेत. शब्दांनाही स्वतःचे असे तापमान असते. ते कोणत्या वेळी कसे वापरले जातात.यावरून,कळते की ते शब्द जळणार आहेत,की थंडावा देणार आहेत.
     आयुष्यातील काही गोष्टी कब्बडीच्या खेळाप्रमाणे असतात.तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच,काही लोक तुमचे पाय पकडायला सुरवात करतात.शांततापूर्ण आयुष्याचे दोन नियम आहेत.अपयशाचे दुःख हृदयापर्यंत पोहोचवु द्यायचे नाहीत.आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही.मग तुम्ही सर्व क्षेत्रात यशाची शिखर चडत पुढे जाता.मागे उरतात ते फक्त कष्ट,त्याग,जिद्धीने केलेल्या संघर्षाच्या आठवणी.त्यांची नोंद ठेवली तर त्यांचे प्रेरणादायी पुस्तक तयार होऊ शकते.अन्यता अपयश,अहंकार हा न विसरता विसरता येत नाही.म्हणूनच अपयश,अहंकार विसरा तरच सुख मिळू शकते. समाजात रहा समाजापासून स्वताला वेगळे मोठे समजू नका.तोच समाज सुखा दुखात सहभागी होऊ शकतो.पैसा,सोने चांदी,गाडी,बंगला कुठेच कमी येणार नाही.त्याचा वापर करून सुख आनंद घेता आला पाहिजे.म्हणूनच प्रत्येक माणसांने प्रथम अपयश,अहंकार विसरा तरच सुख मिळू शकते.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

शुक्रवार, २४ मार्च, २०२३

दोन गोष्टीपासून सावध रहा "एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा" !!

 दोन गोष्टीपासून सावध रहा "एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा!!



      भारतात सत्ताबदल कशा पद्धतीने झाला हे आता जगाला सुद्धा कळले असेल.जगातली सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असते. फक्त इतरांना हरवण्यासाठी ती कधीच नसते.आज भारत देशात आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ते बरोबर करण्याचा शहाण्या सुजान नागरिकांनी प्रयत्न करायला पाहिजे.पण आज देशात असे काही होतांना दिसत नाही.मोठ्यामोठ्या शब्दांनी देशातील नागरिकांशी नातं टिकत नसते.अच्छे दिन म्हणणे सोपी असते. घरातील चूल पेटविण्यासाठी तर छोट्या छोट्या वस्तू लागतात. त्या पेटविणाऱ्या भावना समजून घेतल्या तर ते नातं घट्ट होते.पोटभर अन्न खाण्यासाठी ते  शिजवायला लागते.आणि ते पोटात गेले कि चेहऱ्यावरील आनंद बघण्यासाठी आरशाची गरज असते.त्यावेळी आरश्याची किमंत भलेही हि-यापेक्षा कमी असेल,पण लाखभर हि-याचे घातलेले दागिने पाहायचे तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो.आज देशात आरसा बघण्याची कोणालाच इच्छा दिसत नाही.२०१४ ला दिलाला शब्द "आस" निर्माण करणारा होता.  नागरिकांना साथ देवुन "विश्वास" निर्माण करणे आवश्यकता असतांना.तसे कुठे ही होतांना दिसत नाही. आम्ही देशभक्तीचे नारे देऊन देशवाशीयांना फसवले असे बिलकुल कोणाला वाटत नसल्याचे दुख खूप मोठे आहे. म्हणूनच दोन गोष्टी सोडुन मैत्री करा "एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा!!
      जगात भीती पेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिंमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही.आज देशाच्या नागरिकात हिंमत नसल्यामुळे भीतीचे वातावरण उघड दिसते.
माणसांच आयुष्य फारच छोटसं आहे,आजच आयुष्य हे अशा लोकांसोबत घालवत आहोत. कि ज्यांना आपल्या अस्तित्वाची किंमत शून्य ठरविली आहे.कल्पना करा,तुम्ही एका घनदाट जंगलाच्या मध्यभागी उभे आहात. या जंगला मधून जाणाऱ्या प्रत्येक रस्त्याच्या शेवटी एक वेगळं शहर आणि अतिशय सुंदर जागा आहे. (२०० स्मार्ट शिटी नाही.) तुम्हाला त्या प्रत्येक ठिकाणांना भेट द्यायची इच्छा आहे. पण प्रत्येक ठिकाणी जाण्याइतका वेळ तुमच्या कडे नाही. आणि एका वेळी एकाच मार्गाने जाणे शक्य आहे.तुम्ही आसपास पाहता. ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात तिथून कुठलाच ठळक मार्ग दिसत नाही. कुठे मोठे खडक आहेत,कुठे मोठे डोंगर तर कुठे मोठी दरी,तर कुठे महाकाय जंगल व झाडे आहेत आणि कुठे झुळझुळ वाहणारा पाण्याचा झरा आहे.अश्यावेळी मार्ग शोधण्याचा एकमेव उपाय म्हणजे चालणे होय. तो मार्ग शोधत तुम्हाला कायम अवतीभवती पहात जोवर योग्य मार्ग दिसत नाही तोपर्यंत चालत राहावं लागणार आहे. जर थांबलात तर मार्ग कधीच मिळणार नाही. बऱ्याचदा तुम्ही अश्या वाटांवर जाता जिथून तुम्हाला परत येणं भाग पडतं, बरेच पर्याय सुरवातीला योग्य वाटतात पण ते पुढे जाऊन चुकीचे ठरतात. म्हंटलं तर प्रत्येक दिशेला जाऊ शकता तरी एकाच दिशेला जाण्याशिवाय पर्याय नसतो. अश्या वेळी ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी मार्ग शोधावा लागेल आणि तो एकमेव मार्ग शोधणे म्हणजे काय तर प्रथम अपयशी होणं !काही भाग्यवान लोकांना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नात मार्ग लगेच सापडेल. परंतु बहुतांश लोकांसोबत तसे घडत नाही.आपल्याला पहिल्यादा धाडसाने एक दिशा निवडावी लागते,एका मार्गावर जावे लागते,जमेल तसं adjust करावं लागतं, प्रसंगी चार पावलं मागे येऊन पुन्हा पुढे जावं लागतं.एवढं करूनही कधी कधी आपल्याला पाहिजे ते ठिकाण सापडतच नाही,वेगळेच काही हाती लागतं. त्याचाही आनंद घेऊन पुन्हा नव्याने प्रयत्न करावा लागतो.दोन गोष्टी सोडुन मैत्री करा "एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा!!
     आपण आयुष्यात असे अनेक प्रश्न हाताळत असतो. व्यवसाय कोणता करावा? करावा की करू नये ? कोणत्या क्षेत्रात करिअर करावे ? आहे ते करिअर बदलावे की नाही.असे अनेक निर्णय घ्यायचे असतात. त्यावेळी मित्रानो, लक्षात ठेवा की तुम्ही एका जंगलाच्या मधोमध उभे आहात, ज्याचा कोणताही नकाशा नाही. फक्त आपल्याला बेस्ट वाटेल त्या दिशेला एक एक पाऊल टाकत राहणे आणि वेळोवेळी आपला मार्ग,दिशा,वेग adjust करत राहणे हाच एकमेव उपाय आहे.पण तुम्हाला सांगू मित्रानो, जेव्हा आपण अशा वाटा शोधत असतो तेव्हा आपोआप मागे पाऊलखुणा ठेवत जातो. त्याच्याच पुढे पाऊलवाटा होतात. आपण आपला मार्ग स्वतः बनवत जातो. तुमचा मार्ग बेस्ट नसेल,जलद नसेल,सोपा नसेल. पण तो तुमचा स्वतःचा असेल. प्रत्येक प्रयत्नात,प्रत्येक चुकीच्या वळणावर शिकलेला धडा तुम्हाला पुढे मदत करेल आणि हीच प्रोसेस तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल ! आणि शेवटी प्रवासच अंतिम स्थानावर पोहोचण्यापेक्षा जास्त आनंद देऊन जाईल ! या प्रवासासाठी , अनोळखी वाटा शोधण्यासाठी, पुन्हा पुन्हा नव्याने प्रयत्न करण्यासाठी जो जगतो.तोच खरं जगतो !! यशस्वीपणे वाटचाल पण करतो.अपयशी झाल्यावर ज्यांनी अपमान केला तेच यशस्वी झाल्यावर गुणगौरव करतात.म्हणूनच दोन गोष्टी सोडुन मैत्री करा "एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा!!
       देशावर ज्या पक्षाने साठ वर्ष केंद्रात सत्ताधारी म्हणून राज्य केले त्यांनी देशात अनेक सार्वजनिक उद्योग निर्माण केले.आजचे सत्ताधारी देशाची संपती विकून जनतेला राज्य कसे करावे हे शिकवत आहेत.म्हणून मतदारांनी दोन गोष्टी सोडुन मैत्री करावी "एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा!! मतदारांना ५६ इंच छाती असणाऱ्या राजाचा अनुभव आला असेल तर ही गोष्ट वाचा,भल्या सकाळी एक भिक्षुक राजाच्या महाली भिक्षा मागण्यासाठी आला. राजा म्हणाला,तू पहिला याचक आहेस आजच्या दिवसातला काय हवं ते माग मिळेल!! भिक्षुक म्हणाला, माझ्याकडचं भिक्षापात्र तर फारच छोटं आहे. त्यात बसेल एवढीच भिक्षा मला पुरेशी आहे. पण,वचन देण्याआधी विचार कर. जमेल का?.भिक्षुकाच्या हातातलं अतिशय छोटं भिक्षापात्र पाहून राजा हसून म्हणाला,अरे याचका,माझ्याकडच्या संपत्तीची गणती नाही, माझ्या राज्याला सीमा नाही. हे छोटंसं भिक्षापात्र भरण्यात काय अडचण.राजाने नोकरांकरवी आपल्या खजिन्यातले उत्तमोत्तम जडजवाहीर मागवले आणि त्यांनी ते भिक्षापात्र भरायला सांगितलं.संध्याकाळ झाली तरी ते भरणं सुरूच होतं.राजाचा सगळा खजिना रिता झाला.आपल्या लाडक्या राजावर खजील होण्याची पाळी यायला नको, म्हणून प्रजाजनांनी आणलेली त्यांच्या घरची संपत्तीही त्यात टाकली पण ती पण गायब झाली.(कृपया राम मंदिर संकलन निधी चा संबध नाही.) रात्र झाली तसा राजा भिक्षुकाच्या पायावर कोसळला आणि म्हणाला,महाराज,माझ्याकडे हे पात्र भरण्याइतकी संपत्ती नाही.(आंदोलनजीवी शेतकरी,पेन्शन मागणारे सेवानिवृत्त कर्मचारी )भिक्षुक म्हणाला, अरेरे, उगाच माझा दिवस वाया गेला. सकाळीच सांगितलं असतं तर पुढे गेलो असतो.पात्र उलटे करून सगळी संपत्ती ओतून तो पुढे निघाला.राजा धावत त्याच्या मागे गेला आणि हात जोडून त्याने विचारलं,भगवन्, मला फक्त एक सांगा. या इतक्याशा भिक्षापात्रात माझा सगळा खजिना रिता झाला, तरी ते भरलं नाही. असं काय आहे या भिक्षापात्राचं वैशिष्ट्य?.  भिक्षुक म्हणाला, ते मलाही माहिती नाही हे भिक्षापात्र माणसाच्या कवटीपासून तयार केलं आहे. त्यातच माणसाचं मन असतं.आणि ते कधीही व कशानेही भरत नाही असे म्हणतात!!      भारताच्या मतदारांना काही गोष्टी आठवत असतील तर पहा हम तो फकीर है झोला उठाये चाल दिये.मै तो चौकीदार हु, मै देशका प्रधानसेवक हु, जो चाये सेवा करुंगा.मै ना खाऊगा और ना किसीको खाने दुंगा.असे जाहीर सभेत सांगणाऱ्यानी देशाची सार्वजनिक संपती कवडीमोलाने विकली.तरी म्हणतात "सब का साथ सबका विकास" आता येणाऱ्या काळात,शेतकरी,शेतमजूर,कामगार,कर्मचारी अधिकारी यांनी मतदार म्हणून देशाचा विचार करावा.देश असला तर तुम्ही आम्ही असणार आहोत.आणि देश नसेल तर आपण सर्वच मनुवादी विचारांचे गुलाम असणार आहोत.म्हणूनच भारतीय नागरिक म्हणून दोन गोष्टी पासून सावध असणे आवश्यक आहे.त्या म्हणजे दोन "एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा!!
सागर रामभाऊ तायडे ९९२००३८५९,भांडूप,मुंबई.

सोमवार, ६ मार्च, २०२३

दैनिक सम्राट ने कार्यकर्ते पत्रकार घडविले.

 दैनिक सम्राट ने कार्यकर्ते पत्रकार घडविले.


        कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्रांची आवश्यकता असते.ज्या चळवळीचे वर्तमान पत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा हा लाख मोलाचा संदेश दैनिक सम्राटचे लोकप्रिय संपादक दिवंगत बबन कांबळे यांनी पकडला आणि समाजाच्या मनावर अधिराज्य गाजविले.जे आंबेडकरी चळवळीतील उच्चशिक्षित पदवीधरांना राजकीय नेत्यांना जमले नाही.ते कोणत्या ही विद्यापीठाची पदवी नसणाऱ्या झुंझार अनुभवी पत्रकाराने करून दाखविले.दैनिक वृत्तरत्न  सम्राट वृत्तपत्रांच्या माध्यमातून फुले,शाहु, आंबेडकर यांच्या विचारांचे दैनिक घराघरात केवळ पोचविले नाही,तर लढणारा, बोलणारा आणि लिहणारा  कार्यकर्ता पत्रकार घडविला. ज्यांची दखल राजकीय जात दांडगे,धन दांडगे आणि पोलीस यंत्रणा घेत नव्हती. त्यांना दैनिक सम्राटने मोठे बळ दिले.जे क्रांतिकारी विचारांशी प्रामाणिक राहून आचरण करीत होते ते मोठे झाले.जे तोडपाणी करून पोट भरत होते.ते चारीबाजूने चीत झाले. त्यांचे अस्तित्व समाजात चळवळीत नगण्य झाले.
        दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक,मालक,मुद्रक,प्रकाशक बबन कांबळे यांचं निधन झाले आहे.दिवंगत बबन कांबळे यांनी यापूर्वी दैनिक नवाकाळ मध्ये वृत्त संपादक या पदावर काम पाहिले होते.अनेक समस्यानी ग्रस्त असलेल्या समाजातील असंतोष बाहेर काढण्याचे कला कौशल्य बबन कांबळे यांच्या पत्रकारितेमध्ये होते. दोन बलाढ्य राजकीय पक्षनेत्याच्या कार्यकर्त्यातील असंतोष समाजात जनजागृती करून सुरुंग लावण्याचे शब्द सामर्थ नवाकाळ मधून शिकून घेतले होते.त्यांच्या अनुभवामुळेच त्यांनी आंबेडकरी चळवळीसाठी वाहून घेतलेल्या दैनिक वृत्तरत्न सम्राट 2003 साली काढून राज्यातील आंबेडकरी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडून राजकीय जात दांडग्यांच्या व धन दांडग्यांच्या पोलीस यंत्रणेवर असलेल्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचे काम दैनिक सम्राटने केले.त्यातूनच असंघटित कामगार कार्यकर्ता व पत्रकार म्हणून पुढे उभा राहिला.
        दैनिक सम्राट च्या पहिल्या पानांवरील आठ कॉलम ची हेड लाईन वाचकांचे लक्षवेधी न घेत होती.त्याचं बरोबर संपादकीय व संपादकीय पानांवरील विचारपीठ वाचकांची वैचारिक भूक भागवत होती,त्यामुळेच वाचक अंक मिळवण्यासाठी अनेक स्टोलवर पायपीट करीत असत.अनेक वाचकांच्या मागणी मुळे स्टोलवाले अंक प्रती वाढवून मागवत होते. प्रमुख वितरक व प्रतिनिधी यांना अनेक वाचकांचे कॉल येत होते व कार्यालयात पत्र जात होती.कुठून किती मागणी आहे, त्या विभागातील कार्यकर्ते पत्रकार प्रतिनिधी कोण आहेत.यांची नोंद घेतली जात होती,त्याविभागातील बातमीला विशेष प्राधान्य दिले जात होते,त्यात ग्रामीण भागातील अन्याय अत्याचार आणि अपघातानां दैनिक सम्राट या वृत्तपत्र ठळकपणे प्रसिद्धी दिली जात होती.नंतरच्या काळात अनेक वैचारिक,सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय लढ्यांना दैनिक वृत्तरत्न सम्राटने मोठी प्रसिद्धी दिली त्यामुळेच खेड्यापाड्यातील समाज बांधव आंदोलनासाठी एकत्र येऊन संघ शक्ती दाखवत होते. त्यामुळेच समाजाच्या मालकीचा पेपर ही भावना समाजात मोठ्या प्रमाणात बिंबविल्या जात होती.लोक सढळ हस्ते मदत करण्यासाठी पुढे येत होते.“ज्या चळवळीला स्वतःचे वृत्तपत्र नसते त्या चळवळीची अवस्था पंख नसलेल्या पक्षासारखी असते” डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मौलिक विचारामुळे समाज नव्हे तर हजारो कार्यकर्ते व संपादक बबन कांबळे यांनी सुरू केलेल्या दैनिक वृत्तरत्न सम्राट कडे अगदी सहजपणे आकर्षित झाले होते. सम्राट हे एक वृत्तपत्र न राहता एक चळवळ होऊन गेली होती.

          आंबेडकरी चळवळीमध्ये जिल्हा पातळीवर अनेक वृतपत्रे साप्ताहिक,पाक्षिक,मासिक झाली.परंतु राज्य भरात प्रकशित होऊन प्रसिद्ध होणारे दैनिक वृत्तरत्न सम्राट हे पहिले वृत्तपत्र सुरू करण्याचा मान बबन कांबळे यांना जातो.सम्राटमुळे समाजात वैचारिक जनजागृती झाली.प्रस्थापित व्यवस्थेवरील राजकीय जात दांडगे,धन दांडगे आणि पोलिस प्रशासनावर एक दबाव  निर्माण करण्यात दैनिक सम्राट यशस्वी झाला. त्याचे श्रेय समाजातील असंख्य असंघटीत कार्यकर्ते आणि पत्रकारांना जाते. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांना घडविण्याचे काम अर्थातच संपादक म्हणून बबन कांबळे यांना जाते.माझा प्रवास दैनिक वृत्तरत्न सम्राटच्या माध्यमातून पत्र लेखक,पत्रकार म्हणून सोबत राहीला. नंतरच्या विश्व सम्राट च्या पहिल्या दिवसापासून नवीन प्रवास सुरु झाला.समाजाचा पेपर रातोरात व्यक्तीचा झाला.आणि अनेक आर्थिक घडामोडी घडल्या त्यामुळे अनेक कार्यकर्ते पत्रकार आणि समाज सम्राट पासून दूर झाला.‌ त्या विषयी लिहिण्याची ही वेळ नाही व जागाही नाही.आंबेडकरी वृत्तपत्र चळवळीमध्ये दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक म्हणून बबन कांबळे यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहल्या गेले यात काही शंका नाही.दिवंगत बबन कांबळे यांचे असे निघून जाणे मनाला एक हूरहूर लावणारी दुःखद घटना असली तरी ते शारीरिक मानसिक सामाजिक दुखातून दुख मुक्त झाले.म्हणून त्यांच्या कुशल कार्याची नोंद घेऊन त्यांना आदरांजली सभा आम्ही भांडूप येथे घेऊन त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन मंच धम्म उपासिका महिला संघांच्या वतीने दिवंगत बबन कांबळे,आणि गोविंद बुधाजी इंगळे यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.



सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

सांगा आम्हाला अदानी,अंबानी टाटा कुठाय हो?

 सांगा आम्हाला अदानी,अंबानी टाटा कुठाय हो?



भारत हा कृषिप्रधान देश होता.बहुसंख्येने लोक हे शेतीवर अवलंबून होते,शेतकरी शेतमजूर यांना शेतीच्या कामासाठी लागणारे साहित्य कोण उपलब्ध करून देत होते.वखर,नांगर, खटारा,चाक,कुदळ,फावडा,टिकाव घमेल कोण बनवीत होते तर गांवातील लोहार,सुतार यांच्याकडे मुबलक प्रमाणात हे साहित्य उपलब्ध होत नव्हते.हे सर्व साहित्य उपलब्ध करुन देणारा देशातील पहिला उद्योगपती कोण आहे?. असे आजच्या सुशिक्षित पिढीला नांव विचारले तर सांगता येणार नाही. भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत. त्यांच्यासाठी लागणारे चांगल्या दर्जाचे साहित्य उपलब्ध करून देणे हे माझ्या कंपनीचे उद्धिष्ट आहे.असा म्हणणार भारतीय उद्योगपती आपणास माहिती आहे काय?.जमशेदजी नसरवानजी टाटा ३ मार्च १८३९ पारशी कुटुंबात यांचा जन्म झाला. तो देशातील पहिला उद्योगपती होता.तो पारशी होता म्हणून त्यांच्या कामाचा खऱ्या अर्थाने गौरव कुठेही होतांना दिसत नाही,तो जर ब्राम्हण असता तर गावागावात साप्ताहिक पारायणे झाली असती. ज्याप्रमाणे रामायण,महाभारत,पांडवप्रताप,कृष्णलीला,श्री समर्थ,यांच्या कथा आणि पारायणे सप्ताह गावागावात मोठ्या उत्साहात साजरा केले जातात.आणि शेतकऱ्यांना शेतमजूरांना यांत कायमस्वरूपी गुंतवून ठेवले जाते.त्या जागी जमशेदजी नसरवानजी टाटा यांच्या देशभक्तीचे गुणगान झाले असते.तर देवा धर्माच्या देवळाच्या जागी, शाळा कॉलेज सुरू झाली असती.टाटाच्या कामाची दखल पाहिजे त्या प्रमाणात कुठेही होतांना दिसत नाही.
       बहुजन समाजाच्या एकूण चळवळीत विशेष आंबेडकरी चळवळीत लोकशाहीर वामन दादा कर्डक यांचे एक क्रांतिकारी गीत प्रत्येक कार्यकर्ताच्या तोंड पाठ असते.सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?. सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो?. हे क्रांतिकारी गीत आहे. याबाबत शंकाच नाही, हे गीत लिहतांना कोणती परिस्थिती होती माहीती नाही. पण आज टाटा उद्योग समूहाची भारतीय नागरिकांच्यासाठी विशेष बहुजन समाजातील मागासवर्गीय जाती जमातीच्या सामाजिक,शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी, कल्याणकारी योजना कुठे राबविण्यात येत आहेत त्यांची माहिती दिली जात नाही.म्हणूनच ३ मार्च ही जमशेदजी टाटा यांच्या जयंती दिनानिमित्त मी पाहिलेल्या टाटांच्या सामाजिक,शैक्षणिक,देशभक्तीच्या गोष्टीवर एक कर्मचारी म्हणून जाहीरपणे विचारत आहे.सांगा आम्हाला अदानी,अंबानी टाटा कुठाय हो?
      भारतात अनेक उद्योगपती आहेत.पण त्यांचा भारतीय म्हणून उदोउदो करावा असे त्यांचे कोणतेही ठोस कार्य नाही.केवळ पैसा कमविण्यासाठी वाटेल त्या मार्गाने भारतीय जनताचे आर्थिक शोषण करावे त्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांना भ्रष्ट मार्गाने अर्थपुरवठा करून सत्ताधारी बनवून सर्व सार्वजनिक उद्योग धंदे ताब्यात घ्यावे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. पण टाटा समूहाचा एकूण इतिहास पाहिला तर भारतीय नागरिकांना प्रेरणा देणारा आहे.ब्रिटिश सरकारच्या विरोधात आंदोलनात भाग घेण्यासाठी भरपगारी सुट्टी देणारा उद्योगपती देशात शोधला तर सापडणार नाही.अज्ञान अंधश्रद्धा यांच्यात गुरफटलेल्या बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय समाजाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ निर्माण करणारा उद्योग समूह म्हणून टाटाचे नांव गर्वाने सांगितले पाहिजे.इतर उद्योगपती काय करीत आहेत हे आज संपूर्ण जग पाहत आहे. आणि जाहीरपणे विचारत आहे.सांगा आम्हाला अदानी,अंबानी टाटा कुठाय हो?
     शेतकरी शेतमजूर यांना शेतीच्या कामासाठी लागणारे साहित्य वखर,नांगर,खटारा, चाक,कुदळ,फावडा,टिकाव घमेल व लोखंडी पत्रे स्वस्त आणि मस्त देणारा टाटा बँड सर्वांना माहिती आहे. लोक विश्वासाने सांगतात कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर टाटा कंपनीची घ्यावी उत्तम दर्जाची टिकावी असण्याची शंभर टक्के विश्वसनीय असते.याच देशात आजची जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली.तेव्हा सत्ताधारी पक्षाला आणि प्रशासनाला जाहीरपणे विचारावे लागते,सांगा आम्हाला अदानी,अंबानी टाटा कुठाय हो?
      जमशेटजी नसरवानजी टाटा यांच्या जन्म ३ मार्च १८३९ ला गुजरात मधील नवसारी येथे झाला. भारतात त्यांनी अनेक उद्योग धंद्याची सुरवात केली.त्यांच्या प्रत्येक उद्योग धंद्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यांची माहिती आजच्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे.पण ती सांगितल्या जात नाही लिहल्या जात नाही. कारण विज्ञानवादी टाटा कंपनीच्या मुख्य कार्यकारी संचालक मंडळाच्या पदावर ब्राम्हणांचे वर्चस्व प्रस्थापित आहे.म्हणून  जमशेटजी नसरवानजी टाटाच्या ३ मार्च जयंतीनिमित्त दोन शब्द बोलतांना गजानन महाराज प्रगट दिनाशी तुलना केली जाते.पण ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितल्या जात नाही. बंगळुर येथे टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांची स्थापना करून तिच्या शाखा, मुंबई,हैदराबाद,पटना,चेन्नई,दिल्ली येथे आहेत.समाजसेवक म्हणून प्रसिद्ध असणारे अनेक समाजसेवक एम एस डब्लू (MSW) मास्टर ऑफ सोशल वर्क टीस TISS मधून झाले आहेत.तसेच केंद्र व राज्य सरकारच्या कोणत्याही योजना राबविण्याचे काम एन जी ओ मार्फत म्हणजेच टिस (TISS) कडून केले जात होते.तीच कामे आता अदानी,अंबानीच्या रातोरात्र नोंदी झालेल्या एन.जी.ओ केले जाते.म्हणून जाहीरपणे विचारावे लागते.सांगा आम्हाला अदानी,अंबानी टाटा कुठाय हो?
     टाटा यांच्या जीवनात चार घटना घडल्या त्यामुळे त्यांनी चार ध्येय पूर्ण करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला. भारतीयांना लोखांडाच्या वस्तू लागतात त्या निर्माण करण्यासाठी पोलाद कंपनी जमशेदपूर येथे काढली,साची गांवात टाटाचा लोखंड व पोलाद प्रकल्प उभारला स्थानिक पातळीवरील लोकांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळाल्या.जमशेदपूर आज झारखंडमध्ये नामांकित मोठे शहर म्हणून ओळखले जाते,टाटा स्टील पूर्वीची टाटा आर्यन आणि स्टील कंपनी लिमिटेड ही आशियातील पहिली व भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी होती.तिच्या कोरस ग्रुपने दरवर्षी २.८ कोटी टन स्टील उत्पादन केल्यामुळे ती जगातील पाचव्या क्रमांकाची स्टील कंपनी ठरली.एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, बंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स विज्ञान आणि अभियांत्रिकी यामधील संशोधन व शिक्षण देण्यासाठी प्रख्यात भारतीय संस्था आहे.(TISS),हायड्रो इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी खपोली,भिरा,भिवपुरी,टाटा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी म्हणजे आताची टाटा पॉवर कंपनी आठ हजार मेगाव्हॉट पेक्षा जास्त क्षमतेची स्थापित क्षमतेची भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज निर्मिती,पुरवठा,वितरण करणारी कंपनी आहे.
     गेट ऑफ इंडिया समोर जी ताजमहाल हॉटेल आहे तिचे ३ डिसेंबर १९०३ ला उद्घाटन झाले ती भारतातील पहिली स्वतःची वीज असणारी एकमेव हॉटेल आहे.एक अद्वितीय हॉटेल ते मुंबई सह प्रत्येक देशात आहे. जमशेटजी नसरवानजी टाटा यांनी १८५३ हिराबाई दबू यांच्या सोबत लग्न केले,१८५८ शिक्षण पूर्ण करून वडिलांच्या व्यवसाया मध्ये सहभागी झाले.१८६८ ला स्वतःची कंपनी स्थापन केली.१८७४ महाराणी मिलची स्थापना केली.१९०१ ला युरोप, अमेरिका येथे स्टील उत्पादन व्यवस्थापन यांचे शिक्षण घेण्यासाठी यात्रा केली, १९०३ ताज हॉटेलची स्थापना केली. शेवटी १९ मे १९०४ ला निधन झाले. जमशेटजी नसरवानजी टाटा संपूर्ण भारताचे उद्योग क्षेत्रातील प्रेरणास्रोत म्हणून ओळखल्या जातात. त्यांची टाटा ग्रुप ऑफ कंपनी भारताचीच नव्हे तर जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखल्या जाते. त्या कंपनीचा मी एक कामगार कर्मचारी म्हणून मी अनेक प्रकल्पावर काम केले आहे.२५ वर्ष लॉग सर्व्हिस आवार्ड मला मिळाला आहे.२८ वर्ष सेवा देऊन सेवा निवृत्त झालो आहे.जमशेटजी नसरवानजी टाटा यांच्या जयंतीनिमित्त सर्व कामगार कर्मचारी वर्गांना हार्दिक शुभेच्छा.आणि भारतीय नागरिकांनी उद्योगपतींना देशभक्ती कशाला म्हणतात. जाहीरपणे विचारावे सांगा आम्हाला अदानी,अंबानी टाटा कुठाय हो?