शुक्रवार, २६ मे, २०२३

बाबासाहेबांच्या जिवनातील माता रमाई आणि माईसाहेब यांचा स्मृतिदिन

 बाबासाहेबांच्या जिवनातील माता रमाई आणि माईसाहेब यांचा स्मृतिदिन 



रमाबाई भीमराव आंबेडकर (जन्म ७ फेब्रुवारी १८९८ मृत्यू २७ मे १९३५) या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या.आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात.त्यांच्या जीवन संघर्षावरील एक प्रेरणादायी गीत आजकाल सर्वच ठिकाणी आणि सर्वच वयाच्या लोकांना तन,मन,धनाने आकर्षित करते.नांदण नांदण होत रमाचा नांदण ११ फेब्रुवारी २०२१ पासून आज पर्यंत ३७ लाख लोकांनी हे गीत लाईक केले आहे.तर ४५ लाख १९ हजार ६९३ लोकांनी ते पहिले आहे.हे गीत प्रकाश पवार यांनी लिहले होते. हर्षद शिंदे यांनी संगीत दिले देऊन आनंद शिंदे यांनी ते गायिल्या मुळेच अजरामर झाले आहे.कडूबाई खरात डी जे च्या तालावर आता युट्युब वर अनेक गायकांनी ते परत परत गाऊन लाखो लोकांना गुणगुणायला व शरीर हलव्याला मजबूर करते.

     शाळेत असतानाच १९०६ मध्ये १४-१५ वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची कन्या रामीबाई उर्फ रमाबाई  ८-९ वर्षाची असतांना झाले. रमाबाई ह्या बाबासाहेब याच्या प्रत्येक आंदोलनात मनाने सहभागी होत्या पण शरीराने नाही.मुलगा आजारी आहे घरात पैसा अदला नाही.नवरा तिकडे समाजसेवा करतो. असे सहन करणारी महिला आज शोधून सापडणार नाही. त्या आजारात मुलगा मरण पावतो तरी ती महिला विचलीत होवुन नवऱ्या बाबत राईचा पर्वत बनवित नाही.परिस्थिती समजुन घेते.याला भावनिक मुद्दा कसा म्हणता येईल?.हा समंजस पणा,दूरदृष्टिपणा होता.त्याला दुरदुष्टी म्हणता येईल.हा मंत्र आज महिलांनी घेणे गरजेचा आहे.आज समाज ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत त्याचे (बाबासाहेबाचे) कुटुंब आहे.त्याकाळी बाबासाहेब आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलावी यासाठी शिकत नव्हते तर समाजाची एकूण सर्व परिस्थिती बदलण्या करीता शिकत होते.हे माता रमाबाई समजू शकत होती. आजची एकही माता असा विचार करणारी दिसणार नाही.संपूर्ण देश बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात होता.गांधी पुण्याला उपोषणाला बसले तेव्हा ते त्यात मरणार. त्याचा संपूर्ण राग माझ्या समाजावर निघणार याची कल्पना बाबासाहेब यांना होती.पण रमाबाईची मानसिक परिस्थिती काय असेल.घरात आणि बाहेर होणाऱ्या चर्चा पेपरात येणारया बातम्या रमाबाईला अस्वस्थ करीत होत्या. काय वर्णन करून ठेवले आपल्या थोर विचारवंतांनी?.

   रमाबाईचा जन्म कुठे झाला, आईवडील काय करता होते,घरची गरीब परिस्थिती तिचे,दुःख आजार यांचे वर्णन करणारे लेखक समाजाला काय संदेश देण्यासाठी लिहतात. बाबासाहेबांना रमाबाई ची कशी साथ होती त्यावर लक्ष केंद्रित करून लिहले पाहिजे, ते प्रेरणादायी होईल. नवरात्रात शारदा,सरस्वती,अंबिका,लक्ष्मी श्रीदेवी यांचावर लिहणारे कधी जन्म,आईबाप,भाऊ बहीण,शिक्षण, संसार, नवरा,मुलगा मुलगी,सासु सासरे, त्याने गांव तालुका जिल्हा, राज्य यांचा उल्लेख कुठेच येऊ देत नाही. हिंस प्राणी वाहन कसे होते. यावर कधीच लिहल्या जात नाही.सर्व भर नवस,कडक उपवास,मनोभावे पूजा नेवैद्य यातुन होणार चमत्कार साक्षातकार प्रसन्नता यांचा किती मोठा प्रभाव आजच्या उच्च शिक्षित महिलांच्या वर आहे.हे सिद्ध होत आहे. आपण बाबासाहेबांची रमाई कशी सांगितली पाहिजे,कष्ट,त्याग आणि जिद्दीने पती मागे उभी राहणारी.म्हणूनच गीतकार प्रकाश पवार यांचे नांदण नांदण होत रमाचा नांदण गीत खूपच अर्थ पूर्ण आहे.२७ मे १९३५ ला रमाबाई चे दुखद निधन झाले.तो काळ १९०७ ते १९२७ भिमराव आंबेडकर आठरा अठरा तास अभ्यास करून वेगवेगळ्या विषयांच्या पदव्या घेत होते.नंतर १९२७ ते १९३५ चा बाबासाहेबांचा जनसंघर्ष डोळ्या समोर आणा तेव्हा रमाबाई आपल्या पती कडून काय अपेक्षा करीत होत्या.आणि बाबासाहेबांना काय करत होते. 

     माता रमाई २७ मे १९३५ ला गेल्या नंतरचा बाबासाहेबांच्या जीवन संघर्षाचा अभ्यास करा. डॉ.सविता भीमराव आंबेडकर (जन्म : मुंबई, २७ जानेवारी १९०९; - मुंबई, २९ मे २००३) ह्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्‍नी व व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर होत्या. आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत त्यांना माई किंवा माईसाहेब नावाने संबोधतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधान लिखाणाच्या काळात,हिंदू कोड बिल आणि त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयाच्या वेळी, माईसाहेब बाबासाहेबांच्या साथीला होत्या. 

    सविता आंबेडकर यांचा जन्म २७ जानेवारी १९०९ रोजी मुंबईत रोजी एका मराठी सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांचे माहेरचे नाव शारदा कबीर होते. त्यांचे घराणे रत्नगिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील दोरला गावचे होते. त्यांचे वडील कृष्णराव कबीर इंडियन मेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रार होते. कृष्णरावांना पाच मुली व तीन मुले होती. या एकूण आठ मुलांपैकी ६ भावंडांचा विवाह आंतरजातीय झाला. त्यांच्या त्या काळातही पुरोगामी विचारांचा त्यांच्या कुटुंबावर प्रभाव होता.आणि माईसाहेबांना त्याचा मोठा अभिमान वाटे.शारदा ह्या विद्यार्थिदशेत अत्यंत हुशार होत्या. त्यांनी आपले शालेय शिक्षण पुण्यात घेतले व नंतर मुंबईच्या ग्रंन्ट मेडिकल कॉलेज मधून डॉक्टरीसाठी एम.बी.बी एस ही पदवी ही पदवी मिळवली होती. त्या महाविद्यालयाच्या वसतिगृहात असतांना अभ्यासनी आपण एवढीच त्यांची दिनचर्या होती. या वसतिगृहासमोरच असलेल्या ‘मणिभवन’ येथे १४ ऑगस्ट १९३१ रोजी बाबासाहेब आंबेडकरांची महात्ना गांधीशी मोठी खडाजंगी झाली होती. पण त्या भेटीसंबंधी त्यांना वसतिगृहात असूनही काहीच माहिती नव्हती. त्यांचे एम.डी.च्या परीक्षेचे पेपर्स अत्युत्तम गेले. पण ऐन प्रॅक्टिकल परीक्षेच्या वेळी त्यांना टायफाॅईड, डिहायड्रेशन, बॉईल्स असे आजार झाले व त्यांचे एम.डी. होणे राहून गेले. याच काळाच त्यांनी वैचारिक पुस्तकांचे वाचन केले.

   शारदा कबीर यांनी गुजरात मध्ये काही काळ चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून एका हॉस्पिटलमध्ये काम केले, नंतर त्या मुंबईत आल्या आणि निष्णात फिजिओथेरपिस्ट, नामवंत सल्लागार व तज्ज्ञ डॉक्टर अशा मालवणकरांबरोबर काम करू लागल्या. तेथे इ.स. १९४७ साली त्यांची आणि रक्तदाबाच्या आणि मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली. त्यापूर्वी डॉ. राव यांच्या घरी त्यांची भेट झाली होती. डॉ. आंबेडकरांची पहिली पत्‍नी रमाबाई आंबेडकर यांचे २७ मे १९३५ रोजी निधन झाले होते. त्यानंतर बाबासाहेबांनी प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टर असलेल्या शारदा कबीर यांचेकडून वैद्यकीय सेवा घेतली.मुंबईच्या विलेपार्लेमध्ये राहणारे डॉ.एस.राव आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे घनिष्ठ संबंध होते. तसेच डॉ.शारदा कबीर यादेखील डॉ.राव यांच्या घरी येत जात असत. कारण त्यांच्या मुली आणि शारदा मैत्रिणी होत्या. त्यांच्याच घरी इ.स.१९४७ मध्ये शारदा कबीर आणि बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट झाली, त्यावेळी राव यांनी त्या दोघांची एकमेकांशी ओळख करून दिली.

    आंबेडकर जेव्हा जेव्हा मुंबईला येत तेव्हा ते डॉ.मालवणकरांच्या कन्सल्टिंग रूमवर प्रकृतीच्या तपासणीसाठी जात. मालवणकरांनी आंबेडकरांना अनेक पथ्ये आणि औषधांबाबत अनेक सूचना दिल्या होत्या. आंबेडकरांना या गोष्टी जमण्यासारख्या नसल्याने डॉ.कबीर यांनी ‘एखादी नर्स ठेवा किंवा मी तुमच्याकडे काही दिवस राहून बाईंना (सौ.आंबेडकरांना) सर्व समजावून सांगेन’, असा सल्ला दिला. डॉ.शारदा कबीर यांना तेव्हा रमाबाईंच्या निधनाबाबत माहिती नव्हती. पुढे बाबासाहेब आंबेडकर एकदा डॉक्टर मालवणकरांच्या कन्सल्टिंग रूमवर आले असताना डॉ.कबीर त्यांना पथ्यपाण्याबाबत सांगू लागल्या. अखेर त्यांना बाबासाहेब म्हणाले, ‘अहो पण माझ्या घरात बाईमाणूस नाही, मी अगदी एकटा आहे, हे सर्व कोणाला सांगू?’. त्यावेळी डॉ.शारदा यांना आंबेडकरांच्या एकाकीपणाबाबत समजले. त्यानंतर दोघांची पुन्हापुन्हा भेट होऊ लागली. डॉक्टर आणि पेशंट म्हणून डॉ.आंबेडकरांशी त्यांचे नाते घट्ट झाले होते. त्यावेळी ‘कोणी मला माझे बाबासाहेबांशी लग्न होईल, असे सांगितले असते, तर मी ते कधीही मान्य केले नसते’, असे डॉ. माईसाहेब स्पष्टपणे कबूल करतात. मात्र त्यांच्या मनात बाबासाहेबांविषयी अत्यंतिक आदर आणि सहानुभूती होती.

एकदा इ.स. १९४७ च्या डिसेंबरमध्ये बाबासाहेब डॉ. मालवणकरांच्या कन्सल्टिंग रूमवर गेले असताना बाबासाहेबांनी शारदा यांना म्हणाले, ‘चला, मी तुम्हाला घरी सोडतो, मलाही राजगृहाला जायचे आहे.’ त्यापूर्वीही अनेकदा आंबेडकर आणि शारदा कबीर एकत्र बसून बोलायचे. अनेक विषयांवर त्यांच्या चर्चा व्हायच्या. या भेटींमुळे बाबासाहेबांबद्दल सविता यांना बरीच सखोल माहिती मिळाली होती. त्यातून त्यांच्या मनातील आदर अधिकच वाढला होता. एक दिवस आंबेडकर डॉ.सविता यांना म्हणाले. “माझे सहकारी मला पुन्हा लग्न करण्याचा आग्रह करत आहेत. पण मला माझ्या आवडीची, योग्यतेची स्त्री मिळणे फार कठीण आहे. तरीही माझ्या कोट्यवधी बांधवांसाठी मला जगायला हवे. त्यामुळे माझी काळजी घ्यायला कोणीतरी असायला हवे. त्यामुळे माझ्यासाठी सुयोग्य स्त्रीचा शोध मी तुमच्यापासून सुरू करतो.” अशा प्रकारे बाबासाहेबांनी त्यांना लग्नाची मागणी घातली. पण त्यावर तेव्हा काय उत्तर द्यायचे हे न समजल्याने डॉ.कबीर गप्पच राहिल्या. त्यानंतर डॉ.आंबेडकर दिल्लीला निघून गेले आणि शारदाही त्यांच्या कामात गुंतल्या. त्या दिवसाबाबतही त्या विसरून गेल्या. पण एक दिवस अचानक शारदा यांना एक पार्सल मिळाले. पार्सलसोबतच्या पत्रात बाबासाहेबांनी डॉ.शारदा यांना मागणी घातली होती. पत्रात लिहिले होते, ‘अर्थात तू तयार असशील तरच. तरी तू विचार करून मला कळव. तुझ्या आणि माझ्या वयांतील फरक आणि माझी प्रकृती या कारणांनी तू मला नकार दिलास तरी मला बिलकुल दुःख होणार नाही’. पत्र वाचल्यानंतर मात्र डॉ.सविता यांना बाबासाहेबांच्या मनातील भावना समजल्या. त्या बाबासाहेबांच्या मोठेपणाने दिपून गेल्या. त्यांच्याबाबत आदर असला तरी त्यांची जीवनसाथी होण्याचा विचार त्यांच्या मनात नक्कीच नव्हता. त्यामुळे या विषयावर त्यांच्या मनात बराच खल झाला. 

        एवढ्या मोठ्या महापुरुषाला नकार कसा द्यायचा आणि होकार तरी कसा द्यायचा असे द्वंद्व त्यांच्या मनात सुरू होते. अखेर डॉक्टर मालवणकरांचा सल्ला घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दुसऱ्याच दिवशी डॉ.सविता डॉ.मालवणकरांशी या विषयावर बोलण्यासाठी गेल्या. धैर्य एकवटून त्यांनी मालवणकरांना बाबासाहेबांनी लिहिलेले ते पत्र दाखवले. त्यावर क्षणभर विचार करत मालवणकर म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी प्रस्ताव ठेवला आहे. त्यांनी काही जबरदस्ती केलेली नाही. त्यामुळे सर्व गोष्टींचा शांतपणे विचार करा आणि योग्य काय तो निर्णय तुम्हीच घ्या. डॉ. मालवणकरांच्या सल्ल्यानंतर डॉ.सविता अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत घरी आल्या. त्यांनी त्यांच्या मोठ्या भावांना विश्वासात घेऊन काय करावे असे विचारले. त्यांना मोठा भाऊ म्हणाला “म्हणजे तू भारताची कायदेमंत्रीण होणार. अजिबात नकार देऊ नकोस. एक भाऊ तर त्यांना चिडवू लागला. डॉ. आंबेडकरांचे अनुयायी आंबेडकरांवर जीवापाड प्रेम करतात. ही डॉक्टरीणबाई नकार देते आहे हे कळलं तर तुझी खैर नाही”, असे तो गमतीत बोलला. अखेर रात्रभर विचार करून डॉ.सविता यांनीही होकारच द्यायचा निर्णय घेतला. त्यामागे दोन कारणे होती, एक तर डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे व सेवा करण्यासाठी त्या प्रवृत्त झाल्या आणि शिवाय त्यांच्या भावनांनीही होकार दिलेला होता. एवढ्या मोठ्या माणसाला त्यांना नकार देताच आला नाही. त्यांनी पत्र लिहून आंबेडकरांना होकार कळवला. कोणत्याही परिस्थितीत आंबेडकरांची प्रकृती सुधरवायची म्हणजे त्यांना देशाची राज्यघटना लिहिण्याचे ऐतिहासिक काम करता येईल असे त्यांनी ठरवले होते.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ.शारदा कबीर यांच्या लग्नासाठी १५ एप्रिल १९४८ ही तारीख ठरली. दिल्लीला विवाह उरकणार होता. त्यानंतर मधल्या काळात बाबासाहेब आणि सविता यांच्यात बराच पत्रव्यव्हार झाला. त्यातून त्यांचे नाते अधिकच खुलत गेले. बाबासाहेबांनी विवाहासाठी डॉ.मालवणकरांसह अगदी मोजक्या लोकांना आमंत्रित केले होते. कारण तेव्हा देशात दंगली, तणावाचे वातावरण होते. यावेळी डॉ आंबेडकर दिल्लीच्या १ हार्डिंग्ज ॲव्हेन्यू या सरकारी बंगल्यात राहत होते. १५ एप्रिलला विमानतळावरून डॉ.शारदा कुटुंबीयांसह बाबासाहेबांच्या बंगल्यावर गेल्या. बंगल्यावर जाताच बाबासाहेबांनी सर्वांची विचारपूस केली. सर्वांच्या ओळख भेटीचा कार्यक्रमही झाला. त्यानंतर त्याठिकाणी असलेल्या श्री.चित्रे यांच्या सूनबाई शारदा यांना आत घेऊन गेल्या. त्यांनी शारदा यांना साजशृंगार करण्यास मदत केली. रजिस्ट्रार ऑफ मेरेजेसचे अधिकारीही त्याठिकाणी उपस्थित होते. मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आणि डॉ.शारदा यांच्या वतीने त्यांचा भाऊ वसंत कबीर आणि कमलाकांत चित्रे यांनी तर डॉक्टर साहेबांच्या वतीने नागपूरचे रावसाहेब मेश्राम यांच्यासह आणखी एकाने सही केली. १५ एप्रिल १०४८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध होऊन त्या शारदा कबीरच्या सविता आंबेडकर झाल्या. लग्नानंरच त्याचे नाव 'शारदा'चे 'सविता' झाले, परंतु बाबासाहेब आंबेडकर त्यांना 'शारू' (शारदा) असेच म्हणत असत.त्यांनी ६ डिसेंबर १९५६ला बाबासाहेब गेल्या नंतर अनेक संकटांना तोंड देत संघर्ष केला.२९ मे २००३ रोजी त्यांचे मुंबई येथे निधन झाले.बाबासाहेबांच्या जिवनातील माता रमाई याचं २७ मे आणि माईसाहेब यांचा २९ मे हा स्मृतिदिन आहे.अशा या महापुरुषांच्या जिवनातील संघर्षात सहभागी असणाऱ्या कष्ट,त्याग आणि जिद्धीने सहकार्य करणाऱ्या माता रमाई आणि माईसाहेब यांच्या स्मृतिदिन दिनास विनम्र अभिवादन.

सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा