शाळा कॉलेज आणि नोकरीतील मैत्रीत गरीब श्रीमंत भेद नसावा.
बुलढाणा जिल्ह्यात जळगांव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत होतो,तेव्हाचे मित्र आणि नथीयबाई विद्यालय सूनगांव येथील मित्र यांची भेट वर्षातून एकदा लग्ना निमित्य किंवा कामा निमित्याने गांवी गेल्यावर होते. तेव्हा मित्रांच्या घरी चहा,फळाल,कधी जेवण होत असते.पण गेट टू गेदर होत नाही.मी मुंबईत नोकरीत असलेल्या मित्रांना गेट टू गेदर घेण्यासाठी तयार करतो. लोणावळा,माले बंगला मुळशी,अलिबाग येथे दरवर्षी गेट टू गेदर होत असते.त्यात पद ग्रेड,कर्मचारी अधिकारी आणि गरीब श्रीमंत असा भेद बिलकुल नसतो.तसाच शाळा कॉलेज आणि नोकरीतील मैत्रीत गरीब श्रीमंत भेद नसावा असे सर्वांना वाटले पाहिजे.
शहरात जाऊन सरकारी नोकरी करणारा कर्मचारी अधिकारी,डॉक्टर,वकील, प्राध्यापक मित्र आणि पदवीधर असूनही नोकरी न करता वडिलोपार्जित शेती करणारा मित्र.मित्राबरोबर कोणतीही चर्चा केली तर बायकोला सांगणारे मित्र आनंदी सुखी समाधानी असतात.त्यामुळेच नवऱ्याच्या वागणुकीतील बदल बायकोच्या नजरेतून सुटत नाही.असा मित्रांची ही गोष्ट आहे. मित्रांच्या बायकोला याबाबत माहिती होती.मित्राने लागवडीचं मधेच काय काढलंय? बायको ओरडली,उद्या रविवार आहे,कामाला बाया मिळणार नाहीत.आणि उद्या तुमचं गेटटुगेदर पण आहे ना?.मला गेटटुगेदरला जायचं नाही! मी शांतपणे बोललो,उद्याच्याला लागवड करून घेऊ.इतके दिवस गेटटुगेदर,गेटटुगेदर नाचत होता आणि आज काय झालं? अचानक काढलेल्या कामाने बायको वैतागली होती.मला जायचं नाही.विषय संपला!.
रविवारच्या दिवशी दिवस आणि सवयीनी बायका रोज पण जास्त मागतील.मला बाहेर जाताना बघून बायको कुरकुर करू लागली.रविवारची लागवड करायची तिची इच्छा नव्हती.बायांनी किती पण रोज घेऊ दे.लागवड उद्याच करायची!.मागच्या काही वर्षांत दहावीचं स्नेहसंमेलन घेण्याची टूम निघाली आहे.आमच्याही वर्गमित्रांनी स्नेहसंमेलन घ्यायचं ठरवलं.माझ्यासह गावातील काहीजण एकत्र आले आणि कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. स्नेहसंमेलनाच्या आयोजक समितीत मीही होतो.गावात राहणारे वर्गमित्र सोडले तर दहावीच्या बॅचमधली बरीचशी मुलं संपर्कात नव्हती.मुलींचंही तसंच.लग्न होऊन त्या सासरी नांदत होत्या. क्वचित एखाद दुसरीची भेट व्हायची."दादा, उद्या तुमचं गेट-टुगेदर आहे नां?" रविवारच्या दिवशी मालकाने कांदा लागवडीचा घाट घातल्याने गडी बावरला होता. त्या बिचाऱ्यालाही रविवारची सुट्टी हवी असते. "उद्या कार्यक्रम आहे पण मी जाणार नाही.आपली लागवड महत्त्वाची आहे." मी तिरसटपणे बोललो.माझा मूड बघून तो गप्प बसला.रविवारचं काम करणं कुणाला आवडतं? स्नेहसंमेलनाचा दिवस जवळ येऊ लागला आणि व्हाट्सअप ग्रुपवर मॅसेजचं प्रमाण वाढलं.कोण कुठे आहे,काय करत आहे याची कल्पना येऊ लागली.
गावातली म्हणजे आमच्याच वर्गातली कितीतरी पोरं-पोरी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत होती. काही पदव्यांनी मोठे झाले होते,काही अधिकारांनी तर काही पैशांनी.आमच्यातले काही कंपनीत कामगार झाले,काही नोकरदार,काही डॉक्टर,वकील,काही इंजिनियर,काही प्राध्यापक तर काही सरकारी अधिकारी. दोन वर्गमित्र तर सैन्यात भरती झाले होते. काही पोरी देखील पोरांना लाजवतील अशा पदांवर काम करत होत्या.
स्नेहसंमेलनाचा दिवस जवळ येऊ लागला तसा माझ्यातला न्यूनगंड जागा होऊ लागला.कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी,शनिवारी संध्याकाळी,आम्ही सात-आठ जण शाळेत जमलो.कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.दिलेली जबाबदारी प्रत्येकाने व्यवस्थित पार पाडली होती.आता कार्यक्रमात उपस्थित राहणं एवढाच भाग शिल्लक होता.प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी माझ्याकडे कसलीच जबाबदारी नव्हती.त्या रात्री मला झोप येईना.वर्गात माझ्या शेजारी बसणारा,अभ्यासातही कायम माझ्या मागे असणारा खराटे आता महसूल अधिकारी झाला होता.आमच्या वर्गातला साळवी, ज्याच्या घरी त्या काळात खाण्यापिण्याचे वांधे असायचे, किलोस्कर न्यूमॅटिकमध्ये सिनिअर इंजिनियर झाला होता.कायम मागच्या बेंचवर बसून धिंगाणा घालणारा जाधव आता मोठा बिल्डर झाला होता.एवढंच कशाला? केदारी नावाची मुलगी,जी कुणाला आठवतही नव्हती,झेडपीच्या निवडणुकीनंतर जिल्हा परीषद सदस्या झाली होती. ढेरंगे आडनावाचा पोरगा,ज्याला शाळेत असताना चप्पल घालायला मिळाली नाही, तो आता क्लास-वन ऑफीसर झाला होता.मला खरं कौतुक वाटलं परटाच्या मोडकाचं! आम्ही एकमेकांना आडनावानेच हाका मारायचो. तो मला लोखंडे म्हणायचो आणि मी त्याला मोडक. खालच्या आळीत त्यांची लाॅन्ड्री होती. त्या काळात कोण रोज कपड्यांना इस्त्री करत होतं? मोडकाची लाॅन्ड्री फारशी चालत नसे. त्याच्या घरी कायमची तारांबळ.ज्या दिवशी तो डबा आणत नसे, त्या दिवशी त्याला मी माझ्या घरी जेवायला नेत असे.तोच एके काळचा गरीब मोडक आता जर्मनीत नोकरी करत होता. इंग्रजीबरोबर जर्मन भाषा शिकला होता. दहावीनंतर तो शहरात मामाकडे शिकायला गेला आणि त्यानंतर आमचा संपर्कच झाला नाही. आता व्हाट्सअप ग्रुपवर पोरं-पोरी त्याचं कौतुक करत होते. खास स्नेहसंमेलनासाठी भारतात येणार म्हणल्यावर मोडक आमच्यासाठी सेलिब्रिटी झाला होता.
एकदा मला मोडकला व्हाट्सअपवर "हाय" करावसं वाटलं होतं. पण नंतर म्हणलं आता मोडक मोठा माणूस झालाय. त्याने आपल्या "हाय" ला रिप्लाय दिला नाही तर? एक मन असंही सांगत होतं की मोडक स्वतःच मला फोन करेल.पण त्याचा फोन आला नाही.वर्गातल्या बऱ्याचशा मुला-मुलींनी केलेली प्रगती बघून मला प्रश्न पडले. मला काय कमी होतं? मी का प्रगती करू शकलो नाही? वर्गात माझी गणना हुशार विद्यार्थ्यांमध्ये होत होती. आमच्या घरची परिस्थिती चांगली होती. वडील मोठे शेतकरी होते. तरीही मी एवढा मागे का राहिलो? मी शिकलो नाही असं नाही.माझं पोस्टग्रॅज्युएशन झालं.पण कॅरियर म्हणून जी जडणघडण व्हायला हवी होती ती झाली नव्हती.मला चिंता लागली. आयुष्यात यशस्वी ठरलेल्या मित्र-मैत्रिणीना उद्या तोंड कसं दाखवायचं?" सर्वजण विचारणार, "तू आता काय करतो?" त्यांना काय सांगायचं? शेवटी मी ठरवलं. गेट-टुगेदरला जायचंच नाही.त्या रात्री नीट झोप आली नाही.पहाटेच उठलो.हळूहळू उरकलं.सहा वाजता ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून शेतात गेलो. बरोबर गडी होताच.सकाळी सकाळी आम्ही कांद्याचं रोप उपटायला सुरुवात केली.आठ वाजता रोजंदारीवरच्या बायका हजर झाल्या.बायको त्यांच्यामागे होतीच.मी पाण्याच्या बाऱ्यावर तर गडी कांद्याचं रोप वाफ्यांनी टाकत होता. वावरात लागवड चालली असली तरी माझं मन शाळेतच होतं.फोन सायलेंट मोडवर ठेवलेला.आज मी कुणाचा फोन घेणार नव्हतो. दहा वाजेपर्यंत कुणाचा फोन आलाही नाही.साडेदहानंतर मात्र खिशात ठेवलेला मोबाईल थरथरू लागला. दोन-तीन वेळा तसं झाल्यावर मोबाईल चेक केला तर मित्रांचे मिस्ड कॉल. न पाहिल्यासारखं करून मोबाईल खिशात ठेवला.अकरा वाजल्यानंतर एसएमएस येऊ लागले. नेट चालू केलं तर व्हाट्सअपवर धडाधड मॅसेज पडू लागले. कार्यक्रमालाच जायचं नाही त्यामुळे मॅसेजला उत्तर द्यायचा किंवा कॉलबॅक करायचा प्रश्न नव्हता.विहिरीवरून आणलेल्या पाईपलाईनचं पाणी पाटाने खळखळत पुढे सरकत होतं.बारं दिल्यावर लोण्यासारख्या मऊ मातीचे गादीवाफे पाण्याने टरारून भरत होते. माझंदेखील मन शाळेच्या आठवणींनी भरून आलं होतं.शाळा कॉलेज आणि नोकरीतील मैत्रीतील गरीब श्रीमंत भेद माझ्या मनात सारखा घोळत होता.
पहिली ते चौथी मराठी शाळा आणि पाचवी ते दहावीतली हायस्कूलची वर्षे डोळ्यांपुढे उभी राहिली.मला माझ्या मित्र-मैत्रिणींना खरंच खूप भेटावंसं वाटत होतं.पण काय करणार? मी शेतकरी माणूस. त्यांच्यापुढे कसा जाणार? त्यांना काय सांगणार? स्वतःबद्दल सांगताना "एवढं शिकूनसुद्धा मी मातीत मरतोय" हे सांगू?.आता सर्वजण हॉलमध्ये बसले असतील.आता दीपप्रज्वलन चाललं असेल.आता प्रमुख पाहुणे सरस्वती पूजन करत असतील.आता आमची वयोवृध्द शिक्षक मंडळी व्यासपीठावर बसली असतील.आता माझे मित्र व मैत्रिणी समोरच्या खुर्च्यांवर बसून शिक्षकांची मनोगतं ऐकत असतील. सूत्रसंचालनाची जबाबदारी घेतलेला बर्वे आत्ता डायसपुढे उभा बोलत असेल.कार्यक्रमाचा आराखडा आम्हीच बनवला असल्याने ते नियोजन मला पाठ होतं. मनगटावरच्या घड्याळात बघून आता तिथे काय चालू असेल याचा अंदाज मी बांधत होतो. कांद्याची लागवड चालू असलेल्या वावरात उभा असतो तरी मनाने मी शाळेतच होतो.पुढे जाणाऱ्या प्रत्येक मिनिटाबरोबर स्नेहसंमेलनात काय घडत असेल याचं चित्र डोळ्यांपुढे उभं राहत होतं.मला मित्रांची,मैत्रिणींची आठवण क्षणोक्षणी येत होती. पण कार्यक्रमात बिझी असलेल्या मित्रमैत्रिणींना माझी आठवण येत असेल का? माझी शंका निराधार होती.जसा इथे मी त्यांना मिस करत होतो, तसं तेदेखील मला मिस करत होतेच की! त्याशिवाय का एवढे मिस्ड कॉल आणि मॅसेजेस आलेत?.अचानक विचार आला. आपला एखादा मित्र कार्यक्रम सोडून इथे आला तर? त्याने आपल्याला अशा अवतारात बघितलं तर? गावातल्या एका मोठ्या,श्रीमंत शेतकऱ्याचा मुलगा स्वतःच वावरात राबतोय! पाण्याची बारी देतोय! चिखलाने बरबटलेले कपडे घालून लागवड करतोय! या कल्पनेनेच मला कसंतरी झालं.बघता बघता दुपार उलटली.कार्यक्रम सोडून आपल्याला बोलवायला कुणी येणार नाही हा विश्वास खरा ठरला. चुकून जर कुणी आलंच तर लागवडीला माणसं कमी आहेत, बाया घेतलेल्या आहेत,मी कार्यक्रमाला येऊ शकत नाही असं सांगता आलं असतं.
लागवडीचं काम जोरात चाललं होतं.रविवार असल्याने बायांना काम उरकून घरी जायची घाई होती.तसं बघता दुपारपर्यंत निम्म्यापेक्षा अधिक काम झालं होतं. चार वाजताच लागवड उरकली तर? मग काय करायचं? बायको म्हणेल, "गेटटुगेदरला जा." पण मी तर तिथे जाणार नव्हतो. आता तिथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम चालू असेल. मुलं-मुली एकमेकांशी अनौपचारिक गप्पा मारत असतील.जुन्या आठवणी काढून हसत असतील.एकमेकांचं कौतुक करत असतील.नकळत मी माझी तुलना मोडकशी करू लागलो.तो जर्मनीत सेटल झाला असला तरी मीही गावातला एक मोठा शेतकरी होतो.आम्हाला मूळचीच जमीन जास्त.त्यात मी माझ्या कष्टाने अजून भर घातली होती. आज गावात माझ्याइतकं क्षेत्र कुणालाही नव्हतं.पण मोठा शेतकरी असूनही वावरात काम करायची माझी खोड मोडली नव्हती.स्वतःच्या वावरात काम करायला कसली लाज?
चार वाजता लागवड संपली.बायामाणसं घरी गेली.गडी संध्याकाळच्या धारांची तयारी करायला गोठ्यावर गेला. बायको "घरी चला" म्हणाली पण मी गेलो नाही.तिथेच बांधावर बसून राहिलो. डोक्यात पुन्हा एकदा तेच विचारचक्र सुरू झालं. एव्हाना कार्यक्रम उरकला असेल.चारपर्यंतचीच वेळ होती.आता पाच वाजून गेले होते.आता सगळे घरी निघाले असतील.मी सुटकेचा निश्वास टाकला.पण नंतर माझ्या विचारांची दिशा बदलली.मला स्वतःचा राग आला.आपण आपल्या आयुष्यात काही करू शकलो नाही याचं वाईट वाटून घेण्यापेक्षा आपली मित्रमंडळी 'ज्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप काही केलं आहे' त्यांचं मला कौतुक का करावं वाटलं नाही? शाळेत ज्या मित्रांबरोबर खेळलो,अभ्यास केला,मार खाल्ला,त्यांच्या यशाचा मला हेवा वाटावा? त्यांचं कौतुक करण्याचा मोठेपणा माझ्यात नाही? विचारांच्या या वेगळ्या प्रवाहाने स्नेहसंमेलनाला न जाऊन आपण चूक केल्याचं लक्षात आलं.जे नशिबात होतं,ते आपल्याला मिळालं. पण ज्यांनी स्वःतचं नशीब घडवलं,त्यांचं कौतुक मी करायलाच हवं! शाळा कॉलेज आणि नोकरीतील मैत्रीतील गरीब श्रीमंती याचा मी विचार करायला नको होता.
विहिरीवर जाऊन हातपाय धुवावेत,घर गाठावं आणि कपडे बदलून शाळेत जावं. तिथे गेल्यावर सांगता येईल की अचानक लागवडीचं ठरलं.मी धावतच विहिरीवर गेलो. मोटर चालू केली.विहिरी जवळचा एक आउटलेट खोलला.पाटात उतरून हातपाय धुवू लागलो.हातपाय धुताना मला जुने दिवस आठवू लागले.आमच्या घरापुढे पाण्याचा हापसा होता.शाळा घराजवळच असल्याने पोरं सकाळ संध्याकाळ हापशावर यायची. सकाळी पाणी प्यायला हापशावर,दुपारी डबे धुवायला हपश्यावर,संध्याकाळी हातपाय धुवायला हापशावर.घरापुढच्या बाभळीवर जशा दिवसभर चिमण्या दिसायच्या तशीच हापशावर दिवसभर पोरं दिसायची.आमचं घर माझ्या मित्रांसाठी "आओ जाओ, घर तुम्हारा" होतं.हापशाच्या आठवणींनी मी पुन्हा एकदा लहान झालो होतो. स्वतःचं देहभान हरवून बसलो होतो. माझ्यातला लहान मुलगा पाटातल्या पाण्यात खेळत होता.पाईपमधून बदाबदा पडणाऱ्या पाण्याच्या आवाजाने बांधावरून चालत येणाऱ्या बडबडीकडे माझं लक्ष गेलं नाही. मान वर करून पाहिलं तर काय दिसलं? सणवाराला घालावेत तसे खास कपडे घातलेल्या मित्र-मैत्रिणी बांधावरून चालत माझ्याकडे येत होत्या.त्या सगळ्यांना शेतावर आलेलं बघून मला गुदमरल्यासारखं झालं.आपण कार्यक्रमाला गेलो नाही म्हणून सर्वजण इकडे आले काय?
आज स्नेहसंमेलनाला सत्तर विद्यार्थी आल्याचं समजलं. त्यातले वीस जण माझ्याकडे आले होते.एवढ्या सगळ्यांत मी मोडकला लगेच ओळखला.तो माझ्याकडे बघून हसला पण काही बोलला नाही.तो वेळ काढून माझ्याकडे आला होता हेही महत्त्वाचं होतं.मला मोडकशी बोलावं वाटत होतं.पण एवढी पोरं-पोरी खास माझ्यासाठी आलेली. कोण काय बोलतंय कळत नव्हतं.एवढ्यातून एकट्या मोडकचीच चौकशी कशी करायची? तसा मोडकही फारसा बोलका नव्हता.शाळेत असताना मोडक हसतमुख चेहऱ्याचा मुलगा होता.आजही तो गालातल्या गालात हसत होता.क्षणभर वाटलं,मोडक त्याची पोझिशन दाखवायला तर आला नाही? "लोखंडे,बघ,आज मी कुठे आणि तू कुठे!"
"गेटटुगेदरला का आला नाहीस? एवढा कामदार लागून गेलास की काय?" बोरावकेने विचारलं.ही बोरावके वर्गात सुध्दा खूप बडबड करायची. "तू आम्हाला भेटायला आला नाही म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो" असं म्हणून जांभळेने मला लाजवलं.आता खरं सांगण्याशिवाय पर्याय नव्हता.शिवाय मित्रांशी खोटं बोलणं मला जमणारही नव्हतं. "तुमच्यापैकी बरेच जण नावाजलेल्या कंपन्यांत, मोठमोठ्या पदांवर काम करत असताना मी मात्र आहे तसाच राहिलो. त्यामुळे कार्यक्रमाला यायची लाज वाटली." मी खरं ते सांगितलं. "अरे राजा,आम्ही करतोय ते तर कुणीही करेल. पण तुझ्यासारखा शिकला-सवरलेला मुलगा शेती करतोय याहून चांगली गोष्ट कोणती? तू सुध्दा पोस्टग्रॅज्युएट झाला आहेस.ठरवलं असतं तर तुही हवी तशी नोकरी मिळवली असती! पण तू शेती करायचं ठरवलं.तू नुसती शेतीच केली नाहीस तर तुझ्या वडिलांच्या सातबाऱ्यातलं क्षेत्रही वाढवलं!" बर्वेने मोठं भाषणच दिलं. "मुख्याध्यापकांनी तर भाषणात तुझं आवर्जून कौतुक केलं.तू शेती करतोय याचा त्यांना अभिमान आहे." कोलतेने त्या भाषणाची आठवण करून दिली आणि इतरांनी माना हलवून माझ्याकडे कौतुकाने पाहिलं "तुला आमचा अभिमान आहे की नाही माहित नाही," शाळेत असताना वर्गात कधीच न बोललेली वरपे म्हणाली, "पण आम्हाला तुझा खूप खूप अभिमान आहे." खरं तर मी मित्रांची चौकशी, कौतुक करायचं तर तेच माझी चौकशी,कौतुक करू लागले. मी एकटा आणि ते एवढे सगळे. ते मला बोलूही देईनात. मग विचार केला,हॉटेलात नेऊन सर्वांना चहा पाजावा. तिथं सर्वांशी बोलता येईल.
"काय लोखंडे,ओळखलं का नाही?" बराच वेळ माझ्याकडे बघत असलेला मोडक शेवटी बोलला."तुला ओळखणार नाही असं कधी होईल का?" इथेसुद्धा माझा इगो आडवा आला होता.मोडक बोलल्यावरच मी त्याच्याशी बोललो होतो. "एक काम करू.इथं एक नवीन हाॅटेल झालंय.आपण तिथं चहा घेऊ." मी पुढे म्हणालो.
"दोस्ता,शाळेत असताना मला घरी नेऊन जेवायला घालायचा आणि आता इथे हॉटेलवर चहा पाजून परत पाठवणार का?" मोडकच्या प्रश्नाने मला लाजवलं.माझी त-तं-म-मं झाली.मोडकने पुढे केलेला हात मी माझ्या हातात घेतला. त्या हस्तांदोलनात तीच पूर्वीची उब होती,प्रेम होतं,आपुलकी होती. "मी मिसेसला सांगून आलोय की भारतात गेल्यावर लोखंडेच्या घरी जाऊन बाजरीची भाकर उडदाच्या आमटीत चुरून खाणार..." मोडक असं बोलताच माझे डोळे भरून आले.त्याला भाकर चुरून खायला, बुक्कीत कांदा फोडायला मीच शिकवलं होतं. मोडक अजून काही बोलला असता तर मी पोरींसारखा रडलो असतो.
"काय रावऽ तुझं आडनाव लोखंडे आणि वाफ्यात पाणी शिरल्यावर ढेकूळ विरघळावं तशी तुझी अवस्था व्हावी?" असं विचारताना घेनंदने हसण्याचा प्रयत्न केला पण तो डोळ्यांच्या खालच्या कडा बोटांनी कोरड्या करत होता. त्या क्षणी बऱ्याच जणांच्या डोळ्यांत पाणी आलेलं. आपलं रडकं तोंड दिसू नये म्हणून सर्वजण इकडे-तिकडे बघत होते.शेवटी मीच कसंबसं हसलो. खिशातला रुमाल काढून तोंड पुसण्याच्या निमित्ताने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि मित्र-मैत्रिणींना "चला,माझ्या घरी जाऊ" म्हणालो. शेवटी मित्र परिवार हाच खरा सुखदुःखात सहभागी होणारा मित्र परिवार असतो तो भेटला की अनेक वेळा मनात साठवून ठेवलेल्या वेदना मोकळ्या करता येतात.मित्राबद्दल मनात खूप काही असते पण व्यक्त होता येत नाही. कोण कसा मोठा अधिकारी किंवा पैसेवाला, त्याला समाजात मिळणारी प्रतिष्ठा,मान सन्मान यासमोर आपण स्वतःला कमी समजून भेटणे टाळतो पण रिकाम्या वेळी किंवा झोपताना त्यांची आठवण आपोआप होत जाते.
मी सतत कामगार नेता म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कामगार,कर्मचारी अधिकारी यांच्या मिटिंग सभा घेत असतो,आणि १९९४ पासून विविध वृत्तपत्रात नियमितपणे लिहत असल्यामुळे त्यांचे शब्दांकन करून ठेवतो,त्यांना एकत्र केले की उत्तम संकलन केलेला लेख तयार होतो. गेट टू गेदर हे एक औषध हा लेख प्रसिद्ध झाल्यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या,त्यात लक्षवेधी सुभाष कुलकर्णी चाळीस वर्षे भांडुपच्या दादा सावंत च्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करून सेवा निवृत्तीनंतर पुण्याला स्थाहीक झालेले त्यांनी तिथे जेष्ठ नागरिक संघ स्थापन केला,आणि १२० जेष्ठ नागरिक संघाचा महासंघ बनविला त्यांच्या वतीने ते दरवर्षी विविध कार्यक्रम राबवितात.अनेक सेवानिवृत जेष्ट नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यांनी शाळा कॉलेज आणि नोकरीतील मैत्रीत गरीब श्रीमंत,जात,धर्म प्रांत असा भेद कधीच नसावा.मैत्री खळखळ वाहणाऱ्य पाण्या सारखी निर्मल,स्वच्छ विचाराने केली तर कायम सुखादुखाच्या वेळी उपयोगी ठरते. तीच इतरांना प्रेरणा देते.काही लोक सेवानिवृतीनंतर एकटे का पडतात?. याचा विचार झाला पाहिजे.
संकलन सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा