बुधवार, १९ जानेवारी, २०२२

नंतर करू म्हणता म्हणता सेवानिवृत्त झालो.

 नंतर करू म्हणता म्हणता सेवानिवृत्त झालो.



संघटीत असंघटीत कामगार कर्मचारी अधिकारी यांना वयाचे साठ वर्ष पूर्ण झाले की सेवानिवृत्त होवावे लागते.शेतकरी,शेतमजूर व व्यापारी यांचे ही वय वाढत गेल्या तरी त्यांना सेवानिवृत्त होता येत नाही.पण म्हातारपण आले म्हणून काम करणे जमत नाही. निसर्गाच्या नियमानुसार वय झाले कि शारीरीक ताकद कमी होते.अनेक रोगाने शरीरात प्रवेश केला असतो तो कधी शरीरात गेला हे कळत नाही.दुखल्यावर निधान, तपासणी केली तर त्या रोगाला नांव दिल्या जाते. 
सेवानिवृत्तीच्या एक वर्षा अगोदर कर्मचारी अधिकारी यांना सामाजिक,आर्थिक आणि शारीरिक कौटुंबिक संकटांना सामोरे कसे जावे यांची तज्ञा कडून माहिती दिल्या जाते.इतर ठिकाणची मला माहिती नाही.पण टाटा पॉवर कंपनीच्या टाटा उद्योग समूहाच्या सर्व कंपन्यातील कामगार,कर्मचारी अधिकारी यांना व्यवस्थापन मानसिक तणावाचे आजच्या या धावपळीच्या व धकधकीच्या जीवनात तणाव अपरिहार्य आहे. अशा तणावाचे व्यवस्थापन कसे करावे ?ह्या बद्दल मुंबईचे प्रसिद्ध Soft Skills Trainer & Psychologist श्री निलेश मंडलेचा,प्रज्ञा मंडलेचा खूप खेळीमेळीच्या वातावरणात दोन तीन दिवसाचे वैचारिक क्रांतिकारी प्रबोधन करतात.ते प्रत्येक कामगार कर्मचारी अधिकारी जे माणसात मोडतात त्या सर्वांसाठी उपयोगाचे असते. नोकरी करून सेवा निवृत्त होणे म्हणजेच म्हातारपण येणे ही एक सत्य स्थिती आहे. आणि त्याला आनंदाने सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी आधीपासूनच पावले उचलणे हे काळाची गरज आणि  आवश्यकता आहे, यानिमित्याने काय करायला पाहिजे,
वृद्धापकाळातील परिस्थितीचा संवेदनशील शोध घेण्याचा हा एक प्रयत्न आहे, तसेच वेगाने वृद्ध होणाऱ्या लोकांमधील लपलेल्या पण व्यक्त न होणाऱ्या जटिल अशा भावना उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न हे तज्ञ करीत असतात. बरेचसे वयोवृद्ध असे वागतात बोलतात की त्यांना जणू काही सगळेच माहित आहे. पण अशा उतार वयात ते लहान मुलांइतकेच अज्ञानी असतात. बऱ्याच वयोवृद्ध लोकांना आपल्यावर काय प्रसंग गुजरणार आहे, किंवा आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे हे माहित नसते व म्हणूनच त्या दृष्टीने त्यांनी काहीच तयारी केलेली नसते.
वयाची ६० वर्षे उलटल्यावर व त्यानंतर हळूहळू वय वाढत जाऊन शेवटचा श्वास घेईपर्यंतच्या काळात अशा वृद्ध व्यक्तींनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक व शारीरिक तयारी होईल व घाबरून जाण्याचे काही कारण सुद्धा राहणार नाही.जस-जसे वय वाढत जाते तस-तसे तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या जवळचे असणारे लोक हळू हळू कमी होतील. तुमच्या आई-वडिलांच्या आणि आजी-आजोबांच्या पिढीतील बऱ्याच जणांनी हे जग सोडले असेल, व समवयस्क असलेल्या तुमच्या आप्तांना व मित्रांना स्वतःकडे बघणे सुद्धा जड जाऊ लागेल. तरुण पिढी त्यांच्या कामात, त्यांच्या जीवनात व्यस्त, वाट्साप फेसबुक बोलण्यासाठी त्यांचं कडे वेळ असेल.पण तुमच्या जवळ बसून गप्पागोष्टी करण्यासठी वेळ नसेल. तुमच्या जीवनाचा जोडीदार सुद्धा कदाचित हे जग तुमच्या आधी किंवा तुमच्या अपेक्षेपूर्वीच सोडून गेलेला असेल. आणि यानंतर काय उरते तर एक नको वाटणारा एकटेपणा. अशा एकटेपणाच्या परिस्थितीत कसे जगायचे, एकटेपणाला सामोरे जाऊन उर्वरित जीवनातील आनंद कसा मिळवायचा, हे तुम्ही शिकून घेतले पाहिजे, त्यासाठी मानसिक तयारी केली पाहिजे.त्यासाठी अगोदरच आवडत्या क्षेत्रातील सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक आणि वैचारिक संस्था संघटनेत सहभागी होऊन क्रियाशील रहा.
माणसाच्या उतार वयात समाज तुमच्याकडे क्वचितच लक्ष देईल किंवा तुम्हाला दुर्लक्षित करेल. तुमच्या पूर्वायुष्यात तुम्ही कितीही मोठे पद भूषवले असेल, अथवा समाजातील कितीही प्रसिद्ध व्यक्ती तुम्ही असाल, तरीही निसर्ग नियमाप्रमाणे तुम्हाला वार्धक्य हे येणारच आणि वार्धक्यात तुमच्या आजू-बाजूला घोटाळणारे लोक, तुमची हांजी-हांजी करणारे लोक तुमच्या पासून लांबच राहतील व तुम्हाला एका कोपऱ्यात गप्प उभे राहण्याची वेळ येईल. तुमच्या समोर, तुमच्या आजूबाजूला जे काही चालले आहे त्याचे कुठलाही मत्सर न दाखवता, काहीही तक्रार न करता कौतुक करणे, त्याला पसंती दर्शवणे, हेच अशा उतार वयात तुमच्या हातात आहे.
प्रत्येक माणसांचे वय झाल्यावर पुढचा रस्ता अडचणींचा व अडथळ्यांचा असतो. हाडे कमकुवत होणे, हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार, मेंदूसंबंधी विविध विकार, कर्करोग व इतर अनेक आजार तुमचे पाहुणे म्हणून तुमच्यासमोर कधीही उभे राहू शकतात व त्यांना तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तुमचे आजार, तुमची दुखणी-खुपणी यांना तुमचे मित्र समजा, कारण यांच्या बरोबरच आता तुम्हाला उर्वरित आयुष्य काढायचे आहे. तुम्हाला कुठलाही शारीरिक त्रास होणार नाही अशा भ्रमात राहू नका. पण सकारात्मक मानसिकता ठेवणे, योग्य आहार-विहार करणे हे तुमचे आता कर्तव्य आहे. आणि यात सातत्य ठेवण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित ठेवणे तुम्हाला गरजेचे आहे.त्यासाठी समाजात समाजासोबत राहणे तेवढेच आवश्यक आहे.
एखाद्या बालकाप्रमाणे आता आपले आयुष्य बहुतांशी पलंगावरच व्यतीत होणार आहे, ह्याची तयारी ठेवा. आपण मातेच्या गर्भातून ह्या जगात आलो ते प्रथम पलंगावरच. आणि त्यानंतर जीवनातील असंख्य चढ-उतार, हेलकावे, जीवनसंघर्ष वगैरेचा अनुभव घेऊन आपण आपल्या प्रारंभ बिंदूकडे,पलंगाकडे येतो. इतरांना आपली काळजी घ्यावी लागणार ह्या अवस्थेत असा वयस्कर माणूस पुन्हा येऊन पोचतो, फरक एवढाच असतो की बालपणात आपली काळजी घ्यायला आपली आई होती, पण ह्या टप्प्यावर असे कोणी पत्नी.मुलगा,मुलगी,सून असण्याची शाश्वती नाही. असे कोणी असले तरी ते आपल्या आईसारखी काळजी घेतील अथवा नाही याची शंकाच असते. परिचारिका 'nursing staff' वगैरेंवर अवलंबून राहण्याची वेळ वृद्धापकाळात येऊ शकते, पण त्यांच्या जवळ आईची माया कुठून असणार? ती वेतना पुरते चेहऱ्यावर हास्य ठेवून उपकार केल्याच्या भावनेने,कंटाळून, त्या परिचारिका तुमची सेवा करतील. पण अशाही कठीण परिस्थितीमध्ये शांत रहा व न विसरता कृतज्ञता व्यक्त करा.त्यासाठी सकारत्मक विचारांची उर्जा मिळवत रहा.
माणसांच्या जीवनमार्गातील शेवटच्या काळात तुम्हाला त्रास देणारे, तुम्हाला फसवणारे लोक भेटतीलच. त्यातील बहुतेक जणांना माहित असेल की तुम्ही बऱ्यापैकी संपत्ती जमा केली आहे, आणि तुम्ही जमवलेले हे पैसे तुमच्याकडून हिसकावून घ्यायला काय करावे याचाच विचार असे लोक करत असतील. तुम्हाला खोटे फोन करतील, टेक्स्ट मेसेजेस पाठवतील, ई-मेल करतील. तुम्हाला विविध अन्नपदार्थ किंवा वस्तूंची प्रलोभने दाखवतील, 'लवकर श्रीमंत व्हा' यासारख्या योजना तुमच्या समोर ठेवून तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करतील, दीर्घायुष्यासाठी काही नवीन उत्पादने घेण्यासाठी तुम्हाला भाग पाडतील, थोडक्यात म्हणजे तुमच्या संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी अशी लोकं कुठल्याही थराला जातील. म्हणूनच सावध राहा, काळजी घ्या,आपल्या संपत्तीला कोणालाही हात लावू देऊ नका. शहाणपणाने वागला नाहीत तर तुमचे पैसे तुमच्यापासून दूर जायला वेळ लागणार नाही,मग खऱ्या अर्थाने एकटे पडणार.म्हणून ह्या वयात काटकसरीने व हुशारीने पैशाचे व्यवहार करा.
शेवटची घटिका येण्यापूर्वी,आयुष्यातील संधीकालात,आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर सर्वकाही अंधारून आल्यासारखे वाटेल, आणि ते साहजिकच आहे. पुढील मार्ग दिसणे कठीण होऊन जाईल व त्यामुळे पुढील वाटचाल सुद्धा सोपी असणार नाही. आणि म्हणूनच, एकदा का वयाची ६० वर्षे पार झाली की मग आयुष्य जसे आहे तसे बघण्याचा प्रयत्न करा, आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंद घ्या, शक्य असेल तोपर्यंत आयुष्याची मजा अनुभवा. समाजातील कुठलेही ओझे अंगावर घेऊ नका. मुलांमध्ये नातवंडामध्ये अडकून राहू नका. वागणूक साधी व नम्र ठेवा, आपण वयाने मोठे आहोत म्हणून आपण फार शहाणे आहोत असे समजू नका व तसे इतरांना दाखवू पण नका. उद्धटपणे इतरांशी बोलू नका कारण त्याचा त्रास इतरांना होईलच, पण तुम्हाला त्याचा त्रास जास्त होईल. आपले वय जस-जसे वाढत जाते तस-तसे आदर म्हणजे काय व त्याचे महत्व समजून घेणे अत्यावश्यक आहे. कुठल्याही वस्तूची किंवा व्यक्तीची आसक्ती न ठेवणे किती गरजेचे आहे हे लक्षात घेणे अशा उतार वयात आवश्यक आहे व तशीच आपली मानसिकता ठेवणे गरजेचे आहे. निसर्गाचा मार्ग म्हणजेच जगण्याचा मार्ग. त्याच प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करीत , जीवनातील शेवटच्या टप्प्यावरील प्रवास हसतमुखाने करा.सकारत्मक विचार करत इतरांना सकारत्मक विचाराने प्रेरित करा.
निसर्गाच्या नियमानुसार शेवटचे दिवस सुरु झाले. आणि बघता बघता संध्याकाळचे ६ वाजले.काल सोमवार होता असे वाटत होते आणि आज शुक्रवार आला सुद्धा.महिना संपत आला,वर्ष संपायला आले, आणि वयाची ५०, ६०, ७० वर्षे केव्हां निघून गेली हे कळलेच नाही.आपले आई-वडील,आपले आप्तस्वकीय,मित्र वगैरे हे जग सोडून गेले आणि मग समजेना की आता मागे कसे फिरायचे?
चला तर मग, जो काही वेळ आता आपल्याकडे उरला आहे त्याचा पूर्ण फायदा करून घेऊ.सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आता थांबायचे नाही. आपल्या आयुष्यात रंग भरुया,छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेऊया. हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करूया.उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे.तरमग कुठलीही कृती पुढे ढकलू नका.हे नंतर करेन हे नंतर सांगीन यावर नंतर विचार करेन 'नंतर' आपल्या हातात आहे असे समजूनच आपण पुढे ढकलतो ना सगळे.कारण, आपण हे समजून घेत नाही की चहा थंड झाल्यानंतर प्राधान्य बदलल्यानंतर उत्साह निघून गेल्यानंतर.आरोग्य बिघडल्यानंतर.मुले वयात आल्यानंतर.आई-वडील म्हातारे झाल्यानंतर.आश्वासन न पाळल्यानंतर.दिवसाची रात्र झाल्यानंतर.आयुष्य संपल्यानंतर.आणि ह्या सगळ्या 'नंतर' नंतर आपल्याला कळते अरे बापरे... उशीर झाला की... म्हणूनच 'नंतर' काही ठेवू नका. 'नंतर' ने 'अंतर' वाढते व चांगल्या गोष्टी, चांगले क्षण हातातून निसटून जातात.म्हणूनच जे करायचे ते चांगले कार्य वेळेवर करा.सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक आणि वैचारिक संस्था संघटनेत सहभागी होऊन क्रियाशील रहा कधीच कधीच एकटे पडणार नाही. म्हणजेच आरोग्य संपन्न व आनंदी राहणार आणि इतरांना ठेवणार ती उर्जा तुमच्यात असेल. तुम्ही कधीच म्हणणार नाही.मी सेवा निवृत्त झालो म्हणून.आणि नंतर नंतर नंतर करू म्हणता म्हणता सेवानिवृत्त झालो.असे ही म्हणणार नाहीच!.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.
अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा