चला तर एक नवा इतिहास घडवू या.
आंबेडकरी चळवळीतल्या आजवरच्या नेत्यांनी आजवर बहूजनांसाठी कुठलीही ठोस भुमिका घेतली नाही,फक्त आंदोलन मोर्चापुरता कार्यकर्त्यांचा फक्त वापरच केला, कार्यकर्त्यांना सामाजिक व आर्थिक सक्षम करायचे सोडून स्वार्थापलिकडे कुठलेही राजकीय संरक्षण दिले नाही तथा सत्तेत सहभागी केले नाही,उलट कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्याचा एक कलमी कार्यक्रम आखून चळवळीबरोबर तमाम कार्यकर्त्यांचे आयुष्य उध्वस्तच केलेले पहायला मिळाले,याचाच परिणाम म्हणून रिपब्लिकन पक्षाचे अनेक गटतट तयार होऊन त्या गटाचे हे स्वार्थी नेते गटाधिपती झाले,आज ना उद्या काहीतरी हाती लागेल या आशेने चळवळीतले काही कार्यकर्ते नेत्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहीले,परंतू आतल्या आत तीळतीळ जळतही राहीले,आणि आजमितीला तेच कार्यकर्ते उध्वस्त होतांना दिसत आहे,
स्वार्थी नेत्यांनी लढवय्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घालून तर विविध सोशल इंजिनिअरींगचे प्रयोग करून फक्त लढतच ठेवलं अन् झुलतच ठेवलं,काहींचे आयुष्य आजही कारागृहात तर काहींचे आयुष्य न्यायालयाच्या पाय-या झिजविण्यात उध्वस्त झाले,परंतू स्वार्थापलिकडे लक्ष नसलेल्या कुठल्याच नेत्यांना कार्यकर्त्यांच्या वेदनेची जाणिव झाली नाही,कार्यकर्त्यांनी बेंबीच्या देठातून ओरडत नेत्यांचा जयघोष करायचा अन् नेत्यांना नेतृत्वाच्या नि आर्थिक यशाच्या उच्च शिखरावर नेऊन बसवायचं आणि स्वत: मात्र डोळ्यातून घळाघळा गळणा-या वेदनेचे अश्रू गिळत नौटंकी करत समाधानी असल्याचा अभास निर्माण करत समाजात उधारीवरच्या कडक कपड्यात मिरवायचं,बस्स करा की आता,
जुन्या खोडांना पाणी घालून पालवी फोडण्याचा किती केविलवाणा प्रयत्न करणार, भावनिक होवून खोटारडे चेहरे किती दिवस पुजत बसणार रोजचं जगणं आम्ही पोटाला चिमटा देऊन जगतो,तरी कुणाला न दाखवता उधारी करून का होईना परंतू बड्या बड्या बाता करीत तहसिल कचेरीच्या दारोदारी भटकंती करतो,काही मिळेल याच आशेवर,रात्री झोपतांना मात्र कुढत कुढत झोपतो,कुठवर जगायचं रे असं कुढत कुढत आशेवरचं जगणं,कधीतरी नवीन पर्यायांना वाव देऊ या ना,जो स्वत: स्वत:च्या सत्तेची वाट बंद करून बहूजनातील तरूणाईसाठी सत्तेची वाट खुली करून देतो,अशा पर्यायाला साथ देऊ या ना,आजवर अनेकांवर विश्वास ठेवून अनेक प्रयोग केलेत,
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पक्षाच्या उद्देश पत्रिकेत नमूद केलेल्या तत्वांच्या पुर्तीसाठी अर्थात,अनुसुचित जाती जमाती व अन्य मागासल्या वर्गांना,शेतमजूर,भुमिपुत्र,कारखान्यातील मजूर,व इतर मजूर,यांना संघटीत करून,शाळा संचालन,कला व हस्तकला इत्यादी शैक्षणिक कार्य करून,भारतीयांच्या नैतीक व अध्यात्मिक विकासासाठी दुर्लक्षित,शोषित वर्गावर अत्याचारीत समुहासाठी ठोस असे काम व्हायला हवे होते,परंतू तसे झाले नाही,काही मुठभर लोकांनी प्रस्थापीतांना हाताशी धरून स्वत:ची घरं भरली,आता त्यांनाच शोषीत पिडीत तथा दुर्लक्षीत असलेल्या समाज बांधवांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.जो तो राजकीय स्वयंघोषीत राष्ट्रीय नेता व कार्यकर्ता उठतो अन् मीच बाबासाहेबांच्या संकल्पनेतला पक्ष संघटन चालवित आहे असे दाखवतो,परंतू वस्तुस्थिती फार वेगळी आहे,बाबासाहेबांच्या संकल्पनेला याच स्वयंघोषीत पुढा-यांनी गुळगुळीत केले आहे,
म्हणुन सांगावसं वाटतं,
सालाबादाप्रमाणे यंदाही विश्वरत्न महामानव डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती जगभरात उत्साहाने आणि थाटामाटात साजरी होत आहे.महामनवाची जयंती म्हटलं की हा उत्साह काही वेगळाच असतो,अंगात एक वेगळीच उर्जा संचारते,आणि दिवसेंदिवस ही जयंती एक नवी प्रेरणा घेऊन येते अन् दिशा देऊन जाते.असे असले तरी त्या दिशेने माझा आंबेडकरी बांधव जातो का? हा एक संशोधनाचा अन् चिंतनाचा विषय बनला आहे.
विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी जीव ओतणारे आम्ही,अर्थातच जीवाचीही पर्वा न करणारे आम्ही,मग,बाबासाहेबांच्या महापरीनिर्वाणाला आज ६६ वर्ष उलटून गेली तरी,बाबासाहेबांना अपेक्षीत असे काम कुठेही झालेले दिसत नाही,मग पुन्हा पुन्हा तोच प्रश्न डोळ्यासमोर आ वासून उभा राहतो,की,जयंतीदिनी येणारी उर्जा अन् त्यातून मिळणारी प्रेरणा जाते कुठे?.बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही चालत का नाही ?.बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग तरी आम्हाला समजलाय का?.आमच्या आंबेडकरी बांधवांना राजकारण,समाजकारण,धम्मकारण,याची तरी स्पष्टता आलीय का?.याची मनात सारखी घुसळण होत असते,मनाला प्रचंड वेदना होतात की,महामानवाने तुमच्या आमच्यासाठीच नव्हे तर तमाम भारतीयांच्या कल्याणासाठी जीवाचे रान केले,आपलं संपुर्ण कुटूंब मातीत गाडल्या गेले तरी त्या वेदना उराशी दाबून माझ्या शोषीत पिडीत दुर्लक्षीत समाजबांधवांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी उभं आयुष्य वेचलं,आज त्याच महामानवाला अभिवादन तथा मानवंदना देतांना आपण कोणतं अभिवादन करतोय किंवा मानवंदना देतोय,की नुसताच दिखावा करतोय याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
एकीकडे देशावर संविधान बदलाचे मोठे संकट उभे आहे,आणि दुसरीकडे आम्ही आपल्याच समाज बांधवांच्या उरावर बसून कुरघोड्यांचं राजकारण,समाजकारण किंवा धम्मकारण करत आहोत,प्रत्येक गोष्टीत आम्ही राजकारण घुसवलं आहे,आम्ही ना राजकीय,सामाजिक,धम्म चळवळ यशस्वीपणे पुर्ण क्षमतेनं उभी करू शकलो नाही,प्रत्येक गोष्टीत स्वार्थ अन मीपणा आडवा आला,आम्ही सातत्याने हवेतच उडत राहीलो,एकमेकांच्या उरावर बसत कुरघोड्या करण्यातच आमच्या समाजातल्या पुढा-यांचा व कार्यकर्त्यांचा वेळ गेला.स्वयंघोषीत पुढा-यांचे व उध्दवस्त कार्यकर्त्यांचे संपले आयुष्य तरी नवनेतृत्वाला पुढे येऊच दिले नाही.
अशावेळी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्ष संघटनेत जाऊन हाती काही लागेल यासाठी आसरा घेतला.आणि इथला निराश कार्यकर्ता तिथेही हताश असतो,परंतू आंबेडकरी चळवळीकडे काही आशावाद दिसत नाही,म्हणून नाईलाजाने लाचारी पत्करतो, एवढं सगळं असूनही आंबेडकरी चळवळीची कुस बदलायला कुणीच तयार नाही.कुणालाच चळवळीच्या भवितव्याचं गांभीर्य उरलेलं दिसत नाही,दिखाव्यात जगणारे सगळे पुढारी व कार्यकर्ते कसे हवेत आहेत,म्हणून म्हणावसं वाटतं,कुणाला काय करायचे ते करू द्या,आता आपणच स्वत:पासून परिवर्तनाला सुरूवात करू या, दोषारोप करत बसण्यापेक्षा विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर आपणच आरूढ होऊ या अन् बाबासाहेबांच्या उज्वल संकल्पनेला गतीशील बनवू या.यातच आपलं अर्थात समाजाचं आणि देशाचं सौख्य सामावलं आहे..
विकास साळवे,पुणे,9822559924..