रविवार, १६ एप्रिल, २०२३

जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल”

 

जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल”

            देशभक्त आणि देशद्रोही हे दोन शब्द आहेत.शब्द जपून वापरा जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात.नव्हे संपवितात.शब्द  प्रेम देतात,शब्द प्रेरणा देतात,शब्द यश देतात,शब्द नातं देतात.शब्द आयुष्यभर आणि  आयुष्यानंतर ही मनामनात जपणारी भावना देतात.शब्दांचं मोल जपलं की आपलं  आयुष्यही अनमोल होतं.शब्दांना कोणी स्पर्श करू शकत नाही, मात्र ते आपल्या मनाला थेट स्पर्श करतात. मग ते निंदेचे असो की स्तुतीचे,वाईट असोत की चांगले.शब्द थट्टेचा असावा, टिंगलेचा नसावा.शब्द विनोदी असावा,खोचक नसावा.आणि हे जाणणारा जाणकार शब्दवेडा असावा लागतो.कौतुकाचे शब्द हे खरोखरच अप्रतिम असतात. "दुसऱ्यांमध्ये असलेल्या गुणांचे कौतुक करताना आपण आपल्यामध्ये असलेल्या महान गुणांचेच कौतुक करत असतो". कौतुक करणे हा एक महान गुण आहे.म्हणूनच दोन गोष्टी सोडुन मैत्री करा "एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा!!
         शब्द हे वेदनांचे,स्तुतीचे,बौद्धिकतेचे,मानसिकतेचे,भावनिकतेचे,आनंदाचे,दुःखाचे, कठोरतेचे,मायेचे,निंदेचे असू शकतात.बोलण्याच्या उच्चारावरून आपल्याला त्या शब्दांची अचूक रूपे कळतात.नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या तोंडातून उच्चारलेला पहिला शब्द आपल्याला स्वर्गीय आनंद देतो.मरणासन्न अवस्थेत असलेल्या आपल्या माणसाकडून निघालेला एखादा शब्दही आपल्याला त्याच्या जगण्याची आशा देऊन जातो.माणूस गेल्यावर त्यांनी बोललेल्या अखेरचा शब्दांची किंमत खूप असते आणि त्याची सर्वच जण उजळणी करत असतात.नाटकामध्ये उत्कृष्ट तऱ्हेने शब्दफेक करता आली तरच प्रेक्षकांशी संवाद साधता येतो. रसिक प्रेक्षकालाही तो शब्द झेलता आला पाहिजे.शब्दांचे अर्थ,अनर्थ, भावार्थ,लोकार्थ,रूढार्थ,मतितार्थ यांची समज ज्याला असेल तोच एक योग्य संवाद घडवू शकतो. Be careful with your words. Once they are said, they can only be forgiven, not forgotten.शब्दांची फेक जमली तर अभिनय तयार होतो.शब्दांचे सूर जुळले तर गाणे तयार होते.शब्दांची जडणघडण जुळली तर संवाद तयार होतो.शब्दांनी एकत्र आवाज उठवला तर शक्ती तयार होते.शब्दांची देवाण-घेवाण झाली तर मैत्री तयार होते. आपले शब्दच आपले कर्म बनवतात. म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल”
     जगात फक्त मानव हा असा प्राणी आहे की त्याच्या हातात नाही तर जिभेत विष आहे.म्हणून शब्दांबरोबर खेळू नका,विचार न करता बोलू नका. आयुष्यात इतरांना सुखावता येईल,वातावरण प्रसन्न राहील,नाती हिरवीगार ठेवता येतील असे शब्द आपण दुसऱ्याला बहाल करावे शब्दांनीच शिकवलय पडता पडता सावरायला, शब्दांनीच शिकवलय. रडता रडता हसायला,शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ,शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा,शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी, आणि शब्दांमुऴेच तरऴते कधीतरी डोऴ्यात पाणी “म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल” माणुसकीच्या खेळात नेहमी त्याच माणसाच्या भावनांचा खेळ होतो. जो माणूस जीवनात स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याच्या भावनांचा विचार करतो.असामान्य माणसाची 3 लक्षणे असतात ते "चुकीचे" काम करत नसल्याने त्यांना चिंता नसते.त्यांच्याकडे ठाम "विचार" असल्याने त्यांच्या मनात गोंधळ नसतो. आणि ते "प्रामाणिक" असल्याने त्यांना कशाचीही पर्वा,भीती,नसते.प्रयत्न करून चुकलात तरी चालेल पण प्रयत्न करण्यास चुकू नये.हिंमत नाही.तर प्रतिष्ठा नाही.विरोधक नाही. तर प्रगती नाही.म्हणूनच दोन गोष्टी सोडुन मैत्री करा "एक खोटेपणा आणि दोन" मोठेपणा!!
      निसर्ग न जाणो कोठून कसे नाते जुळवितो.अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो.ज्यांना कधी ओळखत ही नसतो,त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो..!!.सगळं जग आपले होईल अशी मैत्री करा.माणुसकी देखिल नतमस्तक होईल असे माणुस बना.संपुर्ण जग प्रेमळ होईल असे प्रेम करा.कारण "मनुष्यजन्म" फक्त एकदाच आहे..!!.दोरीला पीळ पडला की दोरी आणखीन मजबूत होते पण नात्याचं उलट आहे नात्यात पीळ पडला की नातं कमकुवत होतं ज्या दिवशी माणूस समजेल कि,समोरचा माणूस चुकीचा नाही.फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत.त्या दिवशी जीवनातील अनेक गैरसमज दुर होतील.म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल”
सागर रामभाऊ तायडे ९९२००३८५९,भांडूप,मुंबई.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा