सोमवार, २३ जानेवारी, २०२३

प्रजासत्ताक दिन सत्यनारायण महापूजेसाठी योग्य का वाटतो?.

 प्रजासत्ताक दिन सत्यनारायण महापूजेसाठी योग्य का वाटतो?.



           भाजीपाला विकणाऱ्या लोकांच्या संघटनेला दरवर्षी २६ जानेवारी ला म्हणजेच प्रजासत्ताक दिन सत्यनारायण महापूजेसाठी योग्य का वाटतो?. अनेक चाळीत इमारती मध्ये राहणाऱ्या मागासवर्गीय ओबीसी मराठा समाजांच्या तरुणांना भट ब्राम्हणा २६ जानेवारीचे मुहूर्त खूप चांगले आहे असे का सांगतो.कारण भारत देश २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला.म्हणूनच भारतीय नागरिकांना धर्माची सत्ता जाऊन प्रजेची सत्ता आली हे मनुवादी विचारांच्या तीन टक्के असलेल्या समाजाला ते मान्य नाही म्हणूनच ते ८५ टक्के मागासवर्गीय बहुजन समाजाला भाजीपाला मार्केट,चाळीतील,इमारतीतील सरकारी छोट्या छोट्या कार्यालयात सार्वजनीक  सत्यनारायण महापूजा घालण्याचे सांगतात.आणि त्यांची अंमलबजावणी हा समाज न चुकता दरवर्षी करतो.२६ जानेवारी दिवशी प्रजासत्ताक दिनाचे महत्व समजवून सांगण्या ऐवजी पाण्यात डूबलेली बोट वर कशी आणली ही कथा सांगितल्या जाते.आज ही उच्च सुशिक्षित लोक प्रजासत्ताक दिनाचे,स्वातंत्र्य दिनाचे महत्व समजून न घेता सार्वजनीक सत्यनारायण महापूजा घालण्याचे समर्थन करतात.आणि या देशातील कायदासुव्यवस्था ठेवणारी पोलीस यंत्रणा यावर स्वताहून कोणतीच कारवाई करतांना दिसत नाही.हे देशाचे खूप मोठे दुर्द्व्या म्हणावे लागेल.
               राजे महाराजे,भांडवलदार,सावकार यांचे संस्थान संपून जनतेने जनते मधून जनप्रतिनिधी निवडून जनतेच्या भल्यासाठी काम करणारी यंत्रणा म्हणजे प्रजासत्ता अशी घटनाकारांनी सांगितले होते.जनतेला खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करणार नाही अशी यंत्रणा म्हणजे लोकशाहीचे चार खांब न्यायपालिका (Judiciary), कार्यकारी मंडळ/ अधिकारी वर्ग (Executive), प्रसारमाध्यमे (Media) आणि विधिमंडळ/ संसद/ विधानसभा (Legislature) हे लोकशाहीचे चार स्तंभ मानले जातात.प्रत्येकाला स्वतःचे असे अधिकारक्षेत्र आणि साहजिकच यापैकी कोणीही दुसऱ्याच्या अधिकारक्षेत्रात ढवळाढवळ करू नये असा संकेत आहे.अर्थातच या अधिकारांच्या सीमारेषा ठळक नसल्याने त्यांचे सहजतेने उल्लंघन आज उघड पणे होताना दिसते.न्यायपालिका,लोकसभा,प्रचार,प्रसार मध्यम,प्रशासकीय व्यवस्था हया आज तरी पूर्णपणे कोसळलेल्या दिसतात.चार वर्षांत भारतीय नागरिकाने नव्हे तर जगातील नागरिकानी अनुभव घेतला आहे. कारण तमाम भारतीयांना अच्छे दिन आने वाले है.हे सांगण्यासाठी अख्खी चॅनल,पिंट मिडियाने जीवाचे रान करून सांगितले होते.अनेक गंभीर प्रश्न चुटकी सारखे सोडवू फक्त आमच्या हाती सत्ता द्या.आणि आयुष्य भर विचार करीत राहाल. हे आपण वाचलं आणि ऐकले असेलच कारण हा आपला भारत देश प्रजासत्ताक आहे. 
              प्रजेने निवडून दिलेले लोक म्हणजे लोकांनी लोकांच्या कामासाठी लोकामधून निवडून दिलेले लोक म्हणजे चायवाले,दूधवाले,पूजा अर्चा करणारे लोक समाजसेवक,देशसेवक, प्रधानसेवक,यांचे विचार आणि आचरण आपण गेल्या सात वर्षांत शंभर टक्के पाहिले आहे. त्यांचे चिंतन सर्व भारत वाशियानी केले पाहिजे.तरच तो दिवस म्हणजे २६ जानेवारी १९५० प्रजासत्ताक दिन चिरायू झाला असता.२६ जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे.तो राष्ट्रीय सन आहे.त्याबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान असला पाहिजे.म्हणूनच भारतातील प्रत्येक वाडी-वस्ती,गाव,विभाग,मोहल्ला,तालुका,जिल्हा,शहर,राज्य,आणि राष्ट्रात सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते. २६ जानेवारी १९५० रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला. म्हणजे काय झाले?. तर त्या दिवसापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या व देशाला अर्पण केलेल्या संविधाना नुसार देशाचा राज्य कारभार सुरु झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अहोरात्र बौद्धिक मेहनत करून घटना लिहली. त्यासाठी २,९६,७२९ रुपये एकूण खर्च आला दररोजचा जमा खर्च भी त्यांनी लिहून ठेवला.
           २५ नोव्हेंबर १९४९ ती सादर करण्यात आली त्या संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरु झाली. त्यालाच प्रजासत्ताक दिन म्हणतात. हा दिन कोणामुळे सुरु झाला?. भारतीय संविधानामुळे.भारतीय संविधान कोणामुळे निर्माण झाले? तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे.मग,ज्यांनी संविधान लिहिले त्यांचे स्मरण प्रजासत्ताक दिनी या देशाला झालेच पाहिजे की नाही.त्यांना संपूर्ण देशाने वंदन आणि अभिवादन केलेच पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही.प्रजासत्ताक दिनी जो संविधानाला मान,तोच मान संविधान निर्मात्याला, जन्मदात्याला, घटनेच्या शिल्पकाराला दिलाच पाहिजे. म्हणून भारतातील प्रत्येक नागरिकांनी,प्रत्येक राजकीय पक्षांनी व नेत्यांनी,प्रत्येक संस्था-संघटनांनी,शाळा-कॉलेजानी आणी मंडळांनी संविधानाच्या शिल्पकाराला,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदराने आणि अभिमानाने अभिवादन केलेच पाहिजे. जेथे जेथे राष्ट्राध्वजारोहण करून प्रजासत्ताकदिन साजरा केला जातो तेथे तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन करूनच प्रजासत्ताक दिन साजरा करा,डॉ. बाबासाहेबांबद्दल शासनाला नेहमीच उशिराच जाग येते. म्हणून आपण जागे राहूया आणि शासनाला जागे करूया. 
           २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचे संविधान लिहून पूर्ण केले व देशाला अर्पण केले. ज्या दिवशी संविधान देशाला अर्पण करण्यात आले तो २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' आणि ज्या दिवसापसुन संविधांची अंमलबजावणी सुरु झाली तो २६ जानेवारी हा 'प्रजासत्ताक दिन '. २००८ पासून महाराष्ट्र शासनाने जीआर काढून २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्यात सुरुवात केली. तेव्हापासून संपूर्ण राज्यात २६ नोव्हेंबर रोजी शासकीय स्तरावर संविधान दिन साजरा करण्यात येतो. आता शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा करावा.असा जीआर काढावा लागतो.म्हणजेच या देशात खरेच प्रजासत्ताक सार्वजनीक  सत्यनारायण महापूजा घालण्यासाठी शुभ झाला काय?. मग प्रजासत्ताक दिन सत्यनारायण महापूजेसाठी योग्य का वाटतो?.त्यांच्यावर आज पर्यंत कारवाई न झाल्यामुळेच.
         डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मोठेपण काल भी आज भी आणि येणाऱ्या काळात भी देशातील जातीयवाद्यांना खुपते राहणार आहे. म्हणून तर ते नेहमी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अनुल्लेख टाळतात. अनेक गोष्टींचा खोटा इतिहास सांगतात. डॉ. बाबासाहेबांबद्दल त्यांना खरा इतिहास सांगता येईना.कारण डॉ.बाबासाहेबांनी खरा इतिहास लिहून ठेवला व नवीन इतिहास रचला. त्याचे जतन करण्यासाठी जनता जागृत आहे.म्हणून तर ते डॉ.बाबासाहेबांचा अनुल्लेख टाळतात किंवा ज्या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मोठेपण, महत्व आणि कर्तत्व सिद्ध करण्याचा दिन आहे, त्याच दिवशी हे जातीयवादी कपट कारस्थानाणे नवीन सन किंवा नवीन धार्मिक प्रथा सुरु करतात. हेतु हाच की त्यादिवशी डॉ. बाबासाहेबांच्या मोठेपणाकडे किंवा कर्तुत्वाकडे लोकांचे लक्ष जाऊ नये किंवा लोकांना कळू नये.उदाहरण द्यायचे झाले तर २६ जानेवारीचे देवूया. गेल्या ८ ते ९ वर्षापासून २६ जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताकदिनी "सत्य नारायणा" च्या महापूजा घालण्यात येवू लागल्या आहेत. या पूजांचे एवडे अवडंबर माजले आहे कि, प्रत्येक गल्लीत हि पूजा होवू लागली आहे. यापूर्वी २६ जानेवारी रोजी का सत्यनारायणाची पूजा घातली जात नव्हती? आणि आताच ती का घालण्यात येते? कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महत्व त्यांना वाढू द्यायचे नाही किंवा कमी करायचे आहे. 
          सत्यनारायणाच्या पूजेचा आदेश दिला कोणी? व आला कुठून? तर तो थेट नागपूरच्या हेडक्वार्टर हून आला.कुणाला कळाले नाही.कुठेही गाजावाजा नाही. पण अंमलबजावणी मात्र सर्वत्र होत आहे.प्रशासकीय इमारतीत प्रशासकीय अधिकारी वर्ग कामगार कर्मचारी सत्यनारायण महापुजा घालत आहेत.त्यामुळेच प्रजासत्ताक दिनी सत्यनारायण पूजेचे महत्व वाढत आहे, वाढवीत आहेत. म्हणून प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा केला पाहिजे. राष्ट्रध्वज हातात घेवून डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमांच्या मिरवणुका काढल्या पाहिजेत.जातीयवाद्यांना डॉ.बाबासाहेबांचा खोटा इतिहास सांगता येत नाही. म्हणून ते डॉ.बाबासाहेबांचे महत्व कमी करू लागले आहेत. डॉ.बाबासाहेबांनी संविधान लिहिलेच नाही असे त्यांना सांगता येत नाही. म्हणून ते आता संगु लागले आहेत कि, भारताचे संविधान हे काही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्याने लिहिले नाही. सात जणांच्य घटना समितीने लिहिले आहे. तेंव्हा आंबेडकरवाद्यांनी त्याच वेळी, तिथल्या तिथेच एका क्षणाचाही विलंब न लावता ठणकावून ठाम पणे सांगितले पाहिजे की, होय,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्यानेच भारतीय संविधान लिहिले आहे. तेच संविधानाचे शिल्पकार आहेत. 
        डॉ.बाबासाहेब आंबेडकर,एन. गोपालस्वामी अय्यंगार, डी.पी.खेतान, कृष्णास्वामी अय्यर, बी.एल.मित्तल,के.एम. मुन्शी व सय्यद अहमद अब्दुल्ला हे सात विद्वान घटना मसुदा समितीचे सदस्य होते. घटना मसुदा समिती व घटना समिती या वेगवेगळ्या होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तर डॉ. राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. मूळ घटना समिती १९४६ साली (स्वतंत्र्यपूर्व) स्थापन करण्यात आली. त्यात एकूण ३८९ सदस्य होते तर स्वतंत्र्यानंतर १९४७ साली (स्वतंत्र्योत्तर) फाळणीनंतर स्थापन करण्यात आलेल्या घटना समितीत २९९ सदस्य होते. असे असले तरी घटना बनविण्याची अत्यंत महत्वाची पण तितकीच कठीण जबाबदारी घटना मसुदा समितीवर होती. सात विद्वानांच्या घटना मसुदा समितीतील दोघेजण परदेशात गेले. अन्य दोघे सतत आजारी असल्यामुळे बैठकांना येत नव्हते. एकचे निधन झाले व एकजण स्वत:च्या कार्यात व्यस्त होता. उरले फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर.त्यांनीच एकट्याने रात्रंदिवस राबून स्वत:च्या आजाराची पर्वा न करता भारताचे संविधान लिहिले. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच संविधानाचे एकमेव शिल्पकार आहेत. म्हणून आपण कुठे ही आणि केव्हा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करताना, "भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर" , असाच उल्लेख केला पाहिजे. 
         कारण डि.लिट. कोणी ही मिळवू शकतो किंवा भारतरत्न किताब कोणाला ही मिळू शकतो. मात्र संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरच. अन्य कोणालाही होता येणार नाही. म्हणून प्रजासत्ताक दिन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करूनच साजरा करावा ! हे सरकारी आदेश देऊन ही काही शाळा कॉलेज गजानन महाराज,गांधींचा फोटो ठेऊन झेंडा वंदन करतात.काही लोक चाळीत,सोसायटी सरकारी कार्यालयामध्ये आज भी सत्यनारायण महापूजा घालतात.ते केवळ खोटया अहंकारा पोटी.आम्ही हिंदू आहेत आमच्या सुट्टीच्या दिवशी आमच्या सार्वजनिक महापूजा कोणी अडवू शकत नाही.असे काही तरुण खुलेआम कायदा सुव्यस्थेला आव्हान देतात. म्हणजेच प्रजासत्ताक दिन सत्यनारायण महापूजेसाठी योग्य का वाटतो?.हे आम्हीच दरवषी लेखी लिहून विचारतो.बाकीच्या तोंडाला हाताला काय महारोग लागला कळत नाही.
भारताततील प्रत्येक नागरिक जागृत झालाच पाहिजे तर प्रजासत्ताक दिन चिरायू होईल.तरी सुद्धा जागरूक वाचकांना माझ्या कडून माझ्या दैनिका कडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!. 
धन्यवाद !
जय हिंद!.जय भारत!!. जयभिम !!!
सागर रामभाऊ तायडे -९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

देशाची निपक्ष निवडणूक आयोगाची न्यायव्यवस्था?.



 देशाची निपक्ष निवडणूक आयोगाची न्यायव्यवस्था?.

     देशात अनेक राजकीय प्रादेशिक पक्षाची स्थापना होत असते,त्यांची स्वतःची एक लिखित घटना विधी असते,त्यात विचारधारा कार्यक्रम घेण्याची पद्धत पदाधिकारी निवड करण्याची निमावली, आणि सभासद बनविण्याची व रद्द करण्याची जबाबदारी त्यांचे निमावली असते,ती दरवर्षी निवडणूक आयोग यांना सादर करावी लागते. राज्यघटनेत दिलेले नियम आणि पक्षाने केलेले नियम यानुसार त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोग काम करीत असतो.देशात नीतिमत्ता ठेवणारी सामाजिक बांधिलकी उरली नसल्यामुळे कोणता पक्ष कधी स्थापन होईल आणि कधी फुटेल यांची खात्री कुणाला ही नसते.राजकीय पक्षाने निवडणूक लढवल्या नंतर त्यांनी किती टक्के मतदान घेतले आणि किती लोकप्रतिनिधी निवड आले या निकाल नंतर त्या पक्षाला निवडणूक आयोग मान्यता देते. या प्रक्रियेतून अनेक पक्ष गेले.त्यात नवी असे काही नाही.पण ज्यांना जो न्याय देण्यात आला तो भविष्यात एक न्यायालयीन आदर्श पुरावा म्हणून नोंदविण्यात येतो.तो सध्या महाराष्ट्र राज्यातील शिवसेना पक्षासाठी कुठे ही लागू होतांना दिसत नाही.म्हणूनच न्याय मूर्ती मजबूर होऊन तारीख पर तारीख देऊन वेळ मारून नेत आहे.देशाची निपक्ष निवडणूक आयोगाची न्यायव्यवस्था?..ही खरीच मोठी देशासाठी शोकांतिका होत आहे असे दिसते.
     एकेकाळी भारतीय संविधान न मानणारे शिवसेनाप्रमुख आणि त्यांची शिवसेना सहा वर्ष भारतीय नागरिकत्व गमाऊन बसली होती.तेव्हा त्यांनी संविधाना पेक्षा मनुवादी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे.हे मराठा ओबीसी तरुणानांच्या मनावर मेंदूवर कोरून ठेवण्यास यशस्वी झाले होते.त्यांनी देशात मनुवादी हिंदुत्व मानणाऱ्या आर एस एस प्रणित भाजपाला मोठे करण्यात सिंहाचा वाटा उचलला त्यांनीच आज हिंदू ह्र्दय सम्राट म्हणून घेणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना मुळासह नष्ट करण्याचे षड्यंत्र रचले आहे.त्याच शिवसेनेला भारतीय संविधान न्याय देण्यास समर्थ असतांना त्या न्याय व्यवस्थेला नजर कैदेत ठेऊन तारिक पे तारिक देण्यात येत आहे.त्यामुळेच देशाची निपक्ष निवडणूक आयोगाची न्यायव्यवस्था कशी आहे?. देशातील नागरिकांना नव्हे तर जगाला दाखवून देत आहे.कि न्यायमूर्ती कोणत्या विचारधारे नुसार आचरण करीत आहेत.
        एका राज्याचा कारभार असंविधानिक पद्धतीने एका पक्षाच्या मर्जीने चालू असतांना कोणते ही न्यायालय निर्णय घेण्यास असमर्थ का आहे.त्यामुळेच शिवसेना कुणाची?,उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची?. निवडणूक आयोगात सुनावणी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी जरी फेब्रुवारी महिन्यात होणार असली तरी शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कुणाचे याचा निर्णय मात्र त्या आधीच होण्याची शक्यता आहे.
कारण भारतीय राज्य घटना आणि राजकीय पक्षाची घटना यात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण यावर सुनावणी होणे अपेक्षित असतांना ते न्यायालयाने गोठून ठेवले आहेपक्षाच्या घटने नुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. हा कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. आता त्यावर काय निर्णय होतो याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
      निवडणूक आयोगाने संघटनात्मक निवडणुकांना परवानगी दिली तर याचा अर्थ शिवसेनेच्या घटनेनुसार ठाकरे गटाचं अस्तित्व मान्य केल्यासारखं होतं. त्यामुळे एकतर मुदतवाढ किंवा त्याआधीच काही मोठा निर्णय या दोन शक्यता भारतीय संविधांना नुसार होण्याची अपेक्षा आहे.पण मनुवादी हिंदुत्वाच्या चौकटीत काय होईल सांगता येत नाही.आणि त्या विरोधात कोणाकडे दाद मागावी हाही प्रश्नच आहे.
      महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षावर आणि शिवसेना पक्ष,चिन्हावरील कायदेशीर लढाई एकाच वेळी निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुरु आहे.पण सुप्रीम कोर्टात प्रकरण मनुस्मृती नुसार पुढेपुढे लांबणीवर जात असताना आयोगातली कार्यवाही मात्र प्रचंड दबावाखाली पद्धतशीर सुरु आहे.पक्षचिन्हाच्या सुनावणीत आतापर्यंत काय झालं?.10 जानेवारीला झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी या संपूर्ण केसच्या भारतीय संविधानाच्या कायदेशीर वैधतेबद्दल प्रश्न निर्माण केले.सुप्रीम कोर्टात केस सुरु असताना ही सुनावणी आयोगाला करता येते की नाही याबाबत आधी निकाल द्यावा अशी विनंती केली, पण केसच्या वैधतेसह सर्व निकाल आम्ही (मनुस्मृती नुसार) एकत्रित देऊ असं आयोगाने म्हटलं म्हणजेच कोंबडी आदी कि अंडा आदी हा प्रश्न उभे केला जातो.
त्यामुळेच अंतिम निकालासाठीचा रेशम बाग नागपुरातून मुहूर्त काढल्या गेल्यास निर्णय होऊ शकते अन्यता राम नाम सत्य है.
      एकेकाळी भारतीय संविधान न मानणारे शिवसेनाप्रमुख आणि त्यांची शिवसेना संविधाना पेक्षा मनुवादी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व मानत होती.आज हिंदू ह्र्दय सम्राट म्हणून घेणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना संविधाना नुसार न्याय मागण्याच्या प्रक्रियेत अडकलेली आहे.आणि 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे.शिवसेनेतल्या या अभूतपूर्व बंडानंतरची ही त्यांची प्रथम जयंती आहे. हिंदू धर्माच्या रीतीरिवाज परंपरेनुसार "बाप दाखव नाहीतर श्रध्द घाल" हा अलिखित नियम आहे.शिवसेनाप्रमुखाची जयंती साजरी करावी.कि ज्यांचा कुप्रसिद्ध इतिहास आम्ही भूगोल करून टाकला त्या शिवसेना बरकास्त केलेल्या हिंदू ह्र्दय सम्राटाची जयंती साजरी करावी.हा बहुसंख्य मराठा ओबीसी समाजातील तरुणांना पडलेला प्रश्न आहे.त्याचवेळी निवडणूक आयोगातली ही लढाई अंतिम टप्पात पोहोचलेली असेल.सुनावणी पूर्ण झाली तर आयोग निकाल राखून ठेवून नंतरही जाहीर करु शकतो.त्यामुळे या अंतिम निकालासाठीचा मुहूर्त नेमका कुठला असणार आणि तो सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या सुनावणी आधीचाच असणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असली तरी सर्व सामान्य नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास कमी होत चालला आहे.मात्र शंभर टक्के सत्य आहे.म्हणून देशाची निपक्ष निवडणूक आयोगाची न्यायव्यवस्था?.भविष्यात भारतीय संविधानाच्या चौकटीत ओबीसी मागासवर्गीय समाजाच्या राजकीय पक्षाना न्याय देईल काय ?.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.

बुधवार, १८ जानेवारी, २०२३

असंघटीत समाजाला सुशिक्षित व संघटीत करणारे जिजा ॲड.एकनाथ आवाड.

 असंघटीत समाजाला सुशिक्षित व संघटीत करणारे जिजा ॲड.एकनाथ आवाड.




     मागासवर्गीय समाज अज्ञानी,असुशिक्षित असंघटित असह्य होता तेव्हा त्यांचे प्रबोधन करून संघटना बांधण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.तेव्हा त्यांच्यासोबत निश्‍चयाने,निष्ठेने आणि निमूटपणे कार्य करणारे प्रामाणिक कार्यकर्ते होते.घाण काम करणे सोडा,लाचारी जीवन सोडा कष्टाचे काम करून स्वाभिमानाने जगणे स्वीकारा. त्यासाठी "खेडे सोडा शहर गाठा" हा संदेश बाबासाहेबांनी दिला होता,त्यांची अंमलबजावणी ज्या लोकांनी केली ते आज शहरात सुखाने स्वाभिमानाने जगत आहेत.जातीप्रथा नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी काही दिशादर्शक निर्णय घेतले होते. भारत देश हा खेड्यात वसलेला असल्यामुळे आणि खेडी ही जातीप्रथेचे उकीरडे होते असे त्यांचे ठाम मत होते. त्यामुळे या उकीरड्यात जीवन कंठण्यापेक्षा "खेडी सोडा आणि शहरात या' असा संदेश बाबासाहेबांनी दिला होता.गांधी-आंबेडकर वादाचे मूळ याच मतभेदांवर उभे होते.खेड्यात जातीव्यवस्थेचे पाळेमळेे घट्ट असल्यामुळे गांधींना खेडी प्राणप्रिय होती.त्यात त्यांना रामराज्य दिसत होते. बाबासाहेबांचे अगदी उलट होते. त्यांना रामराज्यापेक्षा सुराज्य हवे होते.शंभुकाचे डोके उडविणारे,सीतेला वनवासात पाठविणारे,एकलव्याचा अंगठा मागणारे रामराज्य समजाधिष्ठित असणे शक्य नव्हते.त्यामुळे बाबासाहेबांनी ‘खेड्याकडे चला’ या भूमिकेवरच घाला घातला.बाबासाहेबांची चळवळ जातीप्रथा नाकारणारी होती.ती ज्या समाजाने विचारासह स्वीकारली ते आज खेड्यात आणि शहरात स्वभिमानाने जगत आहेत.त्यांचे परिवर्तन चळवळीत सन्मानाने नांव घेतले जाते.असे एक नांव असंघटीत समाजाला सुशिक्षित व संघटीत करणारे जिजा ॲड.एकनाथ आवाड चळवळीचे नेते आणि मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. 
     १४ ऑक्टोबर १९५६ ला बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौध्द धम्माची दीक्षा घेतले तेव्हा त्यांच्या सोबत फक्त महार जातीचे लोक गेले बाकी मागासवर्गीय एस.सी म्हणून घेणारे मांग,चांभार गेले नाही. महार जे गेले फक्त शरीराने गेले बाकी सर्व काम करण्याचे पोट भरण्याचे सर्व साहित्य त्यांनी मागे सोडून गेले.मांग चांभार इतर भटके काम करण्याचे पोट भरण्याचे सर्व साहित्य सोडून द्याला तयार नसल्यामुळे ते अजून ही हिंदू धर्माचे कर्मकांड,रीतीरिवाज परंपरा सोडून देण्यासाठी तयार नाहीत म्हणूनच त्यांची गावात किंवा शहरात नोंद होत नाही.ही खंत मी एकनाथ दगडू आवाड उर्फ जिजा यांच्या तोंडून ऐकली होती.मांग जातीसह भटक्या जातीच्या लोकावर नियमित होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी एकनाथ दगडू आवाड यांनी मानवी हक्क अभियानची स्थापना केली होती. मराठवाड्यात तिचे काम जोरात होते.किल्लारी  महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील गाव होते.तिथे ३० सप्टेंबर,१९९३ रोजी पहाटे ३:५६ वाजता येथे रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता.त्यात सर्वात जास्त मागासवर्गीय समाजाचा संसार उध्वस्थ झाला होता.त्यावेळी मराठवाड्यातील सामाजिक संस्थांना (एन जी ओ) पुनर्वसन करण्याचे काम मिळाले होते. त्यावेळी एन.डी.(बाबा) सोनवणे यांच्या मुळेच जिजा ॲड.एकनाथ आवाड,ॲड.वाल्मिकी तात्या निकाळजे,तात्या कांबळे यांची ओळख झाली. त्यावेळी अण्णाराव सूर्यवंशी,बबन जंगले,बाळासाहेब गायकवाड,बाळासाहेब पवार,शीला तिळमुरे,विवेक पवार असा अनेक समाजसेवकांनी सत्यशोधक कामगार संघटने सोबत काम करण्याची तयारी करून पदाची जबाबदारी घेतली.त्यावेळी जिजा एकनाथ दगडू आवाड आणि मानवी हक्क अभियानशी वैचारिक नाळ जुळली. 
            मी असंघटीत कष्टकरी कामगार मजुरांच्या मुलभूत समस्या साठी लढत असतांना तेच काम एकनाथ दगडू आवाड यांची मानवी हक्क अभियान संघटना मागासवर्गीय भटक्या समाजातील लोकांच्या राहण्याच्या जागेसाठी म्हणजेच पालासाठी,शिक्षण,आरोग्यासाठी  एकाबाजूला सनदशीर मार्गाने तर दुसरीकडे रस्त्यावर उतरून संघर्ष करीत होती.मी ट्रेड युनियन कायद्याच्या चौकटीत काम करीत होतो ते सामाजिक न्याय धर्मदाय सेवा संस्थे नुसार,एन.जी.ओ ही एक अशी संस्था असते.जी समाजातील गरीब आणि गरजू लोकांची मदत करत असते ही संस्था गैरसरकारी असते.म्हणजेच या संस्थेमध्ये सरकारचा कसल्याही प्रकारचा सहभाग नसतो ही संस्था स्वतः च्या वतीने कार्य करत असते.(एन.जी.ओ.) अशा संस्थामुळे गोरगरीब असंघटीत अशिक्षित लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम निस्वार्थीपणे एकनाथ आवाड यांनी मानवी हक्क अभियान संघटनेद्वारे राज्यात नव्हे तर देशभरात उभे केले होते.
    आदरणीय रमेश रंगारी यांच्यामुळे आदरणीय जे.एस.पाटील स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना सल्लागार यांनी  वार्षिक दिवार्षिक अधिवेशन आणि कामगार मेळाव्यात असंघटीत समाजाला संघटीत करणारे नेते म्हणून मी सागर तायडे,जिजा ॲड.एकनाथ आवाड आणि डॉ.रूपाताई बोधी यांना अनेक कार्यक्रमात एकत्र आणले होते.त्यामुळेच मी सी.एफ.टी.यु.आय,आयटक,इंटक आणि सिटू सोडून स्वतंत्र मजदूर युनियन (आय.एल.यु) शी जोडल्या गेलो.असंघटीत समाजाला कामगार म्हणून संघटीत करण्याचे काम जिजा सोबत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा कार्यकर्ता आज ही माझा सोबत जोडलेला आहे.
     मागासवर्गीय आदिवाशी भटक्या समाजाच्या न्याय हक्क व प्रतिष्ठेसाठी लढणाऱ्या नेत्यात एकनाथ आवाड हे नांव प्रथम क्रमांकाने येते.एकनाथ दगडू आवाड यांचा जन्म १९५० किंवा १९५१ साली बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील दुकडेगावातील (डुकरेगाव) एका गरीब मातंग समाजात झाला होता. त्यांचे कुटुंब पोतराज होते. एकनाथांच्या वडिलांचे नाव दगडू तर आईचे नांव भागूबाई होते. शिक्षकांनी शाळेत दाखल करताना १९ जानेवारी १९५६ ही तारीख लिहिल्यामुळे तीच त्यांची अधिकृत जन्मतारीख झाली.घरात खायला दाणा नाही, वडील मागून आणतील त्यावर गुजराण करावी लागे. एकनाथाने पोतराजच व्हावे अशी वडिलांची इच्छा होती,पण आईने कडाडून विरोध केल्याने त्यांना शाळेत जायला मिळाले. शाळेत मागच्या बाकावर बसूनच ते शिकले.एकनाथांनी घर सोडले,अंगमेहनत करून पैसे मिळवले आणि शिक्षण घेतले.एकनाथ आवाड ऊर्फ जिजा (जीजा) यांचे शालेय शिक्षण लऊळ येथे झाले तर महविद्यालयीन शिक्षण बीड आणि अहमदनगर येथे झाले. अहमदनगर येथील कॉलेजातून त्यांनी एल.एल.बी.केले.मागासवर्गीय समाजांना न्याय हक्क व अधिकार मिळवीन देण्यासाठी त्यांनी एकीकडे एम.एस.डब्ल्यू.ही पदवी मिळवली. आणि दु्सरीकडे समाजाला प्रत्येक घटनेसाठी न्यायालयीन लढाई लढण्यासाठी वकील लागतो म्हणूनच ते वकीलही झाले.

       वडिलांचे केस कापून आवाड यांनी पोतराज प्रथेवर पहिला घाव घातला.घरातूनच संघर्ष सुरू करून त्‍यांनी पोतराजाच्या प्रथेतून शंभराहून अधिक कुटुंबांची सुटका केली.शिकत असतानाच एकनाथ आव्हाड विद्यार्थी चळवळीत उतरले,विवेक पंडित यांच्या "विधायक संसद" नावाच्या युवकांच्या संघटनेत गेले आणि अस्पृश्यता आणि जातीभेद याविरुद्ध त्यांनी जनजागृती करून रान पेटवले.त्‍यांनी १९८० पासून वेठबिगार,पोतराज आदी प्रथांविरुद्ध लढा देणे सुरू केले होते. भूमिहीन दलितांना गायरान जमिनी ताब्यात घेऊन कसायची हिंमत दिली.मराठवाड्यात त्यासाठी त्यांनी गायरान परिषदा घेतल्या.भूमिहीन महिलांचे त्यांनी बचत गटाची त्यांनी स्थापना केली होती.सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट स्थापून महिलांना पतपुरवठा केला.मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत या ट्रस्टचे काम चालते. २०१५ सालापर्यंत या ट्रस्टची उलाढाल दहा कोटी रुपयांवर पोचली होती.

      १९९० साली त्यांनी मानवी हक्क अभियानाला सुरुवात केली.संगम नावाच्या गावात त्यांनी मानवी हक्क अभियान संघटनेची शाखा स्थापन केली.२००१ साली युनोने आयोजित केलेल्या वंशभेदाविरोधातील परिषदेला एकनाथ आवाड यांनी हजेरी लावली होती. भारतात अजून जातिभेद नष्ट झाला नाही असे त्यांनी तेथे ठासून सांगितले होते.पुढे जिनिव्हा येथील मानवी हक्क संरक्षण संमेलनातही एकनाथ आवाड यांनी "जातिप्रथेला हद्दपार करण्याची" त्यांची आग्रही भूमिका मांडली होती. त्यांनी उर्वरित सर्व आयुष्य चळवळीसाठी वाहिले होते.'मानवी हक्क अभियान' या चळवळीच्या माध्यमातून एकनाथ आवाड यांनी मराठवाड्यातील सुमारे पन्नास हजार मागासवर्गीय एस सी,भटक्या समाजाच्या जमिनी संघर्ष करून वाचविल्या होत्या.त्यांच्या या मानव हक्क अभियानामुळे मागासवर्गीयांना  मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळाले.गुलामीची प्रतीके असलेली गावकीची कामे दलितांनी सोडावीत आणि आत्मसन्मानाने जगावे त्यासाठी खेडे सोडा शहर गाठा हा बाबासाहेबांनी दिलेला संदेश हाच एकनाथ आवाड यांचं मानव हक्क अभियान  चळवळींचा उद्देश होता. त्यासाठी त्यांनी दोन्ही पातळीवर एक सनदशीर,तर दुसरा रस्त्यावरचा सतत संघर्ष केला. या संघर्षातूनच 'जग बदल घालुनि घाव' हे त्यांचे आत्मकथन जन्माला आले. त्यांचे हे पुस्तक मागासवर्गीय समाजाच्या न्याय हक्क व प्रतिष्ठेसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यासाठी आणि चळवळीसाठी मार्गदर्शक ठरले आहे. मागासवर्गीय आदिवासी भटक्या जाती जमातीच्या समाजाच्या जातीसाठी काम केल्या पेक्षा त्यांना असंघटीत कष्टकरी कामगार म्हणून संघटीत केल्यास त्यांना शिक्षण,रोजगार आणि आरोग्य विषयी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनाचा लाभ मिळवून देता येईल. मानवाला सहा मुलभूत अधिकार मिळाले पाहिजेत.मग ते कोणत्याही जातीचा असो त्याला असंघटीत कामगार म्हणून नांव नोंदणी करून घेता येतील.पण या मागासवर्गीय लोकांची नांव नोंदणी होऊच नये अशी प्रशासकीय मनुवादी यंत्रणा गावातील ग्रामसेवक ते सचिवालयातील सचिवा पर्यंत काम करते.बाबासाहेबांनी शासन कर्ती जमात बना असे का सांगितले होते, त्याचा अभ्यास मानवाला हक्क मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे.तरच एकनाथ आवाड यांचे अपुरे कार्य पुढे नेता येईल.  

  एकनाथ आवाड यांच्या कामावर वेगवेगख्या संशोधकांनी ५ पुस्तके लिहिली आहेत. २७ जणांनी त्यांच्या कार्यावर पीएच.डी.साठी प्रबंध लिहिले आहेत.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या एकनाथ आवाडांनी यांनी २ ऑक्टोबर २००६ रोजी बौद्ध धम्माचा स्वीकार करून अनेकांना बौद्ध धम्मात आणण्याचे ऐतिहासिक काम केले आहे. त्यासोबतच भटक्या जाती जमातीतील पारधी आणि इतर गुन्हेगारी जमात असा ठपका असलेल्या जातीतील कुटुंबाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले.अशा असंघटीत कष्टकरी समाजाला सुशिक्षित व संघटीत करणारे जिजा.एड.एकनाथ दगडू आवाड मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या ६७ व्या जयंती दिनानिमित्याने त्यांच्या प्रतिमेला आणि कार्याला कोटी कोटी प्रणाम.

सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई 

एकदा जिजाऊ सृष्टीला भेट देऊन पाहून या.

 एकदा जिजाऊ सृष्टीला भेट देऊन पाहून या.



 मराठा ओबीसी समाजाला देशातील प्रसिद्ध मंदिरे माहिती आहेत.राज्यातील संतांची पवित्र संत भूमि माहिती असून त्यांच्या दर्शनासाठी दोनशे,तीनशे किलोमीटर पायी पदयात्रा काढून जाण्याची मानसिक तयारी दरवर्षी असते.पण उच्चशिक्षणा च्या पदव्या घेऊन आणि आधुनिक तंत्रज्ञान शिकून सुद्धा संतांचा जन्म,मृत्यू,गांव,तालुका,जिल्हा राज्य आणि आई,वडील,मुलेमुली यांची माहिती नसतांना त्यांच्या वर शंभर टक्के श्रद्धा,विश्वास ठेवतात.शेवटी ही त्यांची धार्मिक भावना आहे.ते स्वातंत्र्य भारतीय संविधाना ने दिले आहे.त्या ही अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात सर्व रयतेला धर्माने नाकारलेले न्याय हक्क,अधिकार दिले होते.त्यावेळी त्यांची माता हीच त्यांना शिकवण देणारी खरी शिक्षिका,गुरु होती.तिचा इतिहास आम्ही वाचत नाही.बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील शिवसंस्कृतीचे आदिपीठ होते. राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेडराजा येथे झाला होता. राजमाता जिजाऊने या देशात ऐतदेशीयांच्या स्वराज्याची स्थापना करण्यासाठी आपले सुपुत्र छत्रपती शिवरायाना घडविले आणि जगात एका क्रांतिकारी विचारांची प्रेरणा देणाऱ्या इतिहासाची निर्मिती केली. स्वाभाविकच शिवसंस्कृतीच्या या अति प्राचीन उगमस्थानाला म्हणजेच सिंदखेडराजाला एक आगळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले पाहिजे होते.मानुवादी हिंदुत्व मानणाऱ्यांनी त्यांचे महत्व वाढू दिले नाही.त्याला महत्व खऱ्या अर्थाने आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघ स्थापन केल्या नंतर यायला लागले.आज ते जागतिक पातळीवरचे जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ म्हणून प्रसिद्ध झाले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातृतिर्थावर जवळपास 450 एकर जागेवर 11,000 कोटी रूपयांच्या प्रस्तावित खर्चांचे एक भव्य स्वप्न मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष,सम्माननीय पुरूषोत्तम खेडेकर ह्यांनी पाहिले आहे, त्या स्वप्नाचे नांव 'जिजाऊसृष्टी' प्रकल्प असे आहे.राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्माचे वेळी ४५,००० लोकवस्तीच्या या शहरात त्या काळातील लखुजीराजाचा राजवाडा,रंगमहाल,सावकारवाडा,काळाकोट,लखुजीराजांची समाधी,पुतळा बारवा,गंगासागर,बाळसमृद्र  या नावाच्या विहिरी,चांदणीतलाव,मोतीतलाव या ऐतिहासिक वास्तू पाहण्यासारख्या आहेत. त्यांचे जास्त प्रमाणात सांगितल्या जात नाही.त्यापैकी मोती तलावाच्या बाजूच्या पठारावर जिजाऊसृष्टीची जागा निवडण्यात आली आहे. या पठार शिवारात राजमाता जिजाऊ घोडय़ावरून फेरफटका मारायच्या. याच ठिकाणी त्या युद्धकलेचे,राजकारणाचे शिक्षणघेत होत्या.त्याच तीर्थावर आज साकारणार आहे मातृतीर्थ "जिजाऊसृष्टी".

    हा 'जिजाऊसृष्टी' प्रकल्प देशाच्या स्वभिमानाचा राष्टीय प्रकल्प व्हावा व हे जगभरातील पर्यटकांचा आकर्षणाचे केंद्र व्हावे असा सर्वोच्च विचार मराठा सेवा संघाचा माध्यमातून आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर यांचा आहे. त्यानुसार 'जिजाऊसृष्टी' हा विविध विषयांना समावून घेणारा एकत्रित स्वरुपाचा प्रकल्प व्हावा तसेच ते अद्यावत तीर्थक्षेत्र व ज्ञानक्षेत्र व्हावे, ही संकल्पना आहे. जिजाऊ संग्रहालय, जिजाऊ ग्रंथालय, महिला रोजगार केंद्र, महिला मिलीटरी अकॅड्मी, सिंधु संशोधन संस्था, महिला विद्यापीठ अशा संस्थाची निर्मिती व्हावी, अशी योजना आहे. या शिवाय भारत देशाचा सुमारे 10,000 वर्षाचा सत्य सांस्कृतिक इतिहास, जिजाऊ काळातील देशातील सर्व क्षेत्रातील स्थिती,छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवनावरील महत्वाचे प्रसंग ते आज पर्यंतची देशाची वाटचाल, बहुजन समाजातील सर्व समाज सुधारक,संतांची शिकवण चित्ररुपाने,शिल्परुपाने, इलेक्ट्रॉनिक मध्यमांच्या साहाय्याने लिखीत स्वरुपात विविध प्रकारे चित्रित केल्या जातील.अशी भव्य संकल्पनेची अंमलबजावणी होत आहे.

    15 हजार स्क्वे. फुटाच्या सभागृहासह जवळपास 10 हजार स्क्वे. फुट (RCC) 3 मजली बांधकाम पूर्ण झाले आहे. 25 हजार स्क्वे. फुटाचा सुंदर बगीचा तयार करण्यात आला आहे. भव्य महाद्वाराची निर्मिती राजस्थानच्या कारागिरा कडुन केलेली आहे.सर्व प्रकारच्या सत्ता स्थानात मराठा समाजाचे वर्चस्व असतांना ही मात्र निधी अभावी कामाची गती पाहिजे तशी जलद नाही.यांची खंत आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केली आहे.संत गजानन महाराज संस्थान शेगांव,संत साईबाबा संस्थान शिर्डी,अनेक बाबा,महाराज यांच्या संस्थानाला मराठा ओबीसी समाजाकडून उद्योगपती उच्च पदस्थ अधिकारी ज्या प्रमाणे सढळ हस्ते दान देतात तेच हात मातृतीर्थ "जिजाऊसृष्टी" कडे मोकळे होतांना दिसत नाही.त्यासाठी मराठा ओबीसी बहुजन समाजात क्रांतिकारी विचारांच्या महापुरुषांच्या विचारांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड सह बामसेफ आणि फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या विचारवंत,साहित्यिक,स्तंभ लेखक,पत्रकार आपली सामाजिक जबाबदारी म्हणून बहुजन समाजात वैचारिक बदल घडविण्यासाठी सतत लिहत आणि बोलत असतात.

 मराठा सेवा संघ आणि समविचारी परिवर्तनवादी बहुजन संघटनांनी बहुजनाच्या भावी पिढ्यांसाठी अक्षय उर्जास्त्रोत असणा-या जिजाऊसृष्टीच्या उभारणीसाठी दमदार पाऊल टाकले असले तरी आपल्या स्वप्नातील मातृतिर्थाला समस्त बहुजन समाजातील उद्योगपती उच्च पदस्थ अधिकारी,शासकीय कंत्राटदार,सदन शेतकरी,कर्मचारी दानशूर समाज  बांधवांनी सढळ हस्ते मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे. इन्कमटॅक्स भरणाऱ्या सर्व प्रकारच्या उत्पादक,उत्पन्न घेणारांनी जिजाऊ सृष्टीला देणगी देऊन (देणगी करिता 80 जी नुसार इन्कमटॅक्स मध्ये सूट आहे.) विशेष सूट मिळवावी. आईवडिलांचे कष्ट,त्याग जिद्द आपल्या साठी प्रेरणादायी असेल तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आठवण म्हणून सढळ हस्ते दान करा आणि कुशल पुण्य मिळवा.त्यामुळे ही इतरांना प्रेरणा मिळू शकते.

मी कुटुंबासह जिजाऊ सृष्टी ला भेट देऊन आलो म्हणून आपणास आवाहन करतो की, आपापल्या जिल्ह्यातील दानशूर समाज बांधवाची भेट घेऊन त्यांना या प्रकल्पाची माहिती द्या, त्यांनी या मातृतीर्थ "जिजाऊ सृष्टी"ला प्रथम भेट देऊन पाहणी करावी.नंतर यथाशक्ति आर्थिकदृष्ट्या मदत करावी. देवाच्या मंदिरात न दिसणाऱ्या देवाला दिलेलं दान पुजाऱ्याला जाते.त्यांचा त्यावर मालकी हक्क असतो. पण इथे मातृतीर्थ "जिजाऊसृष्टीप्रकल्पास मदत करणा-या व्यक्तींची नावे प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ मोक्याच्या ठिकाणी नोंदविण्यात येतील.आणि वेबसाइट वर सुद्धा सुवर्ण अक्षराने नमुद केले जातील.त्यासाठी आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा ऑनलाइन डोनेशन्स वापर करू शकतामातृतीर्थ "जिजाऊसृष्टीवेबसाइट वर जाऊन "डोनेट नाउ" ची बटन दाबा आणि डेबिट / क्रेडिट कार्ड ने पैसे भरून दान करा.म्हणूनच मी जाहीरपणे आवाहन करतो मराठा ओबीसी बहुजन समाजातील बांधवानी एकदा जिजाऊ सृष्टीला भेट देऊन पाहून या.इतिहास वाचा म्हणजे इतिहास घडविता येईल.

सागर रामभाऊ तायडे -९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

राष्ट्रमाता जिजाऊ सृष्टी निर्माण करणारे युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर.

 राष्ट्रमाता जिजाऊ सृष्टी निर्माण करणारे युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर.

         शेगांवच्या संत गजानन महाराज आणि शिर्डीच्या संत साईबाबाच्या पायी पदयात्रा करणारे हजारो मराठा,ओबीसी बहुजन समाजाचे तरुण आम्ही रोडने अनवाणी पायी चालतांना पहिले. त्यांना स्वताच्या शरीराची काळजी वाटत नसते.परत आल्यावर शरीराच्या वेदना त्यांना निसर्गाच्या नियामची आठवण करून देतो.नंतर डॉक्टर व त्यांनी दिलेल्या औषधाचा तीन वेळ खाऊन शरीराची वेदना कमी करावी लागते.तेव्हा श्रद्धा सबुरी आणि उपासना कमी येत नाही.पण मनाची शांती होते आणि गर्वाने सांगितल्या जाते दिंडीत पदयात्रेत जाऊन आलो.असो ही त्यांची मानसिकता तशी बनविलेली असते.त्यामुळेच तो विज्ञान आणि तंत्रज्ञान हातात असून ही त्यांच्या मनाला जगाशी जोडण्यास तयार नसतो.
         मराठा,ओबीसी बहुजन समाजाच्या तरुणांना बारा जानेवारी किती माहिती आहे.हा माझा दरवर्षी प्रश्न असतो.कारण मराठा ओबीसी बहुजन समाजाच्या तरुणापिढीवर मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे गुरुजीचा प्रभाव जास्त दिसतो.तो त्यांना वेगवेगळा पद्धतीने राष्ट्रमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज,स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचा खोटा इतिहास सांगून नियमितपणे समाजात दंगली घडविण्याचा प्रयत्न करतो.                    परंतु मराठा,ओबीसी बहुजन समाजाचे तरुणांना मराठा बहुजन समाजाच्या सर्वांगीण प्रगती करिता सर्वार्थाने पूर्णवेळ प्रयत्नशील असणारा 72 वर्षांचा योद्धा-युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब दिसत नाही. त्यांनी लिहलेले पुस्तके ज्यांनी ज्यांनी वाचले त्यांच्या जीवनाचे सोने झाले.ते परिवर्तन चळवळीचे चक्र झाले.
         मी शिवसेना मनसे व भाजपा मध्ये काम करणाऱ्या तरुण मराठा ओबीसी कार्यकर्त्यांना विचारतो.जिजाऊ प्रकाशनाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहलेले पुस्तके कधी वाचले काय?. अनेकांचे उतर नकारत्मक असते.तेव्हा त्यांना सांगावे लागते विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात अंत्री खेडेकर या गावी ०४ जानेवारी,१९५० या दिवशी एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात पुरुषोत्तम खेडेकर यांचा जन्म झाला होता.लहानपणापासूनच ते हुशार आणि चौकस बुद्धीचे होते.पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी सिव्हील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते.पुढे त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून काम केले.नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरल्यामुळे पुरुषोत्तम खेडेकर यांना एकसंधपणे राहणाऱ्या मराठा बहुजन समाजामध्ये सांस्कृतिक-सामाजिक-राजकीय-शैक्षणिक आदी बाबतींत भिन्नता असल्याची जाणीव झाली.याच समाजाच्या सर्वांगीण उन्नतीकरता प्रस्थापित व्यवस्थेपेक्षा वेगळा प्रवाह तयार करावा लागेल या जाणिवेतून पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी ०१ सप्टेंबर,१९९० रोजी अकोला येथे आपल्या शासकीय-प्रशासकीय सेवेतील जवळपास २०० कर्मचारी-अधिकारी सहकाऱ्यांसमवेत मराठा सेवा संघाची स्थापना केली.
          माँसाहेब जिजाऊंना सर्वोच्च स्थानी ठेवून स्थापन झालेल्या मराठा सेवा संघाच्या अंतर्गत संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड,वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद यांसह विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या 33 कक्षांची निर्मिती पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी केली.जिजाऊंचे जन्मगाव असलेले सिंदखेडराजा या क्षेत्राचा विकास करून तिथे जिजाऊ सृष्टी सारखा जागतिक दर्जाचा प्रकल्प उभा करण्याचे काम पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी हाती घेतले आहे.आज ते काम पूर्णत्वास जात आहे.पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या माध्यमातून उभा राहत असणारा सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टी हा प्रकल्प येणाऱ्या काळात नक्कीच जागतिक पातळीवरचे पर्यटनाचे केंद्र झाल्या शिवाय राहणार नाही. १२ जानेवारी चा सिंदखेड राजा येथील जिजाऊ जन्मोत्सव,त्यावेळी लाखो अनुयायांची तिथे गर्दी जमणे,एका दिवसात कोट्यावधी रुपयांच्या पुस्तकांची खरेदी-विक्री होणे,मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या एका नावाखाली समस्त मराठा-बहुजन समाज एकसंध राहणे,मराठा सेवा संघाच्या आणि संभाजी ब्रिगेडच्या प्रबोधनामुळे महाराष्ट्रातील जातीय-धार्मिक द्वेष कमी होऊन दंगलीही कमी होणे या सर्वसामान्यांच्या कल्पनेतील गोष्टी पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी प्रत्यक्षात करून दाखवल्या आहेत आणि समाजामध्ये एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या अथक परिश्रमामुळे मराठा सेवा संघ केवळ एक संघटना न राहता एक व्यापक चळवळ तयार झाली आहे.भविष्याचा वेध घेत हरक्षणी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार करत तो विचार पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्णवेळ अथक परिश्रम घेण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीमुळे त्यांची समाजात आज युगनायक-युगपुरुष म्हणून वेगळी ओळख तयार झाली आहे.म्हणूनच राष्ट्रमाता जिजाऊ सृष्टी निर्माण करणारे युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब असे मी लिहित आहे.
          सरकारी नोकरी करत असतांना आणि सेवानिवृत्तीनंतर कोणताही अधिकारी समाजात सहसा मिसळतांना दिसत नाही.प्रशासकीय कामाचा अनुभव समाजातील तरुणांना मार्गदर्शन विना मोबदला घेता करतांना दिसत नाही.पण पुरुषोत्तम खेडेकर साहेब महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता असतांना मराठा सेवा संघाची वैचारिक पातळीवर मांडणी करून स्थापना केली.त्याच बरोबर ३३ वेगवेगळे कक्ष निर्माण केले.त्याचा वैचारिक मांडणी करून सतत छोटे जनजागृती प्रबोधन करणारी पुस्तके लिहणे,वृत्तपत्रात साप्ताहिक,मासिकात नियमितपणे लिखाण करून प्रचार,प्रसार करण्यासाठी आज ही वयाच्या ७२ झाली पायाला भिंगरी बांधून ही व्यक्ती फिरते.मला २३ जुलै,२०२२ रोजी खेडेकर साहेबांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्याच्या वेळी घेतलेले छायाचित्र मला सोशल मिडीयावर मिळाले होते.ते मी जपून ठेवले होते.साहेबांच्या उजव्या पायाच्या एका हाडाचे ऑपरेशन झालेले आहे.पायाची जखम ताजी आहे.पायाला पट्टी आहे.तरीही ऑपरेशन नंतर फक्त आठवडाभराच्या विश्रांतीनंतर लगेचच साहेबांनी पूर्वनियोजित दौऱ्याला सुरुवात केली.कोणत्याही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढलेला हा दौरा नाही.तर सामाजिक बांधिलकी म्हणून अविरतपणे काम करण्याची त्यांची जिद्द आणि कष्ट त्यागाची सवय त्यांना स्वस्त बसू देत नव्हती.त्यामुळेच त्यांनी समाजाच्या सामाजिक,राजकीय,शैक्षणिक, सांस्कृतिक समस्या जाणून घेण्यासाठी पूर्वनियोजित दौरा रद्द न करता पुढे चालू ठेवले.ते केवळ जागतिक पातळीवरचे वैचारिक दिशा दाखवणारे पर्यटनाचे केंद्र निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहेत.त्यासाठी मराठा,ओबीसी बहुजन समाजाच्या तरुणांनी बारा जानेवारीला मातृतीर्थ शिंदखेड राजा येथे वारी करावी.राष्ट्रमाता जिजाऊ सृष्टी निर्माण करणारे युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांचे हात मजबूत करा.राष्ट्रमाता जिजाऊ सृष्टीला मानवंदना द्या.इतिहास घडवा.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

नामांतराचा स्मृतिदिन कि नामविस्ताराचा जयंती दिन साजरा करणार?.

 नामांतराचा स्मृतिदिन कि नामविस्ताराचा जयंती दिन साजरा करणार?.



         नामांतर आंदोलनातून तयार झालेले कार्यकर्ते आणि नेते आज स्वताच्या अस्तित्वासाठी राजकीय पक्षाच्या वरचनिला कटोरा घेऊन भिक मांगतांना दिसत आहेत.त्यामुळेच आजच्या आंबेडकर चळवळीतील बहुसंख्य तरुण कार्यकर्त्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. नामांतर चळवळीतील सर्वात आक्रमक नेते व त्याचा राजकीय गट आज पेशवाई समर्थक भाजपाचा सत्ताधारी भागीदाराचा समर्थक झाला आहे.ज्या मराठा ओबीसी तरुणांना बाळकडू पाजून शिवसैनिक बनविले त्यांनीच राजकीय लोकप्रतिनिधी बनून साठ वर्षाचा अभेद किल्ला नांव चिन्हासह उध्वस्थ करून टाकला. आजची त्यांची पडझड आम्हाला पाहवत नाही.तरी सुद्धा त्यामुळे नामांतर चळवळीत पचविलेले बाळकडू कसे विसरणार?. ज्या बाळकडू ने मराठवाड्यात दलितांच्या घरादाराची राख रांगोळी करून हजारो निरपराध निष्पाप लोकांचा बळी घेतला.त्याचा तो इतिहास आम्ही कसा विसरावा हा मोठा प्रश्न सर्वच समाजाला पडला पाहिजे.जी १६ वर्ष आम्ही रात्र दिवस संघर्ष करण्यात घालविली ती कशी विसरावी त्या सोळा वर्षाच्या नामांतर आंदोलनाच्या इतिहासाचे कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचा 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद' असा नामविस्तार करण्यात आला.त्या ठरावाचे वय ४५ वर्षाचे झाले.त्या नामांतराचा स्मृतिदिन साजरा करणार कि नामविस्ताराचा जयंती दिन साजरा करणार?. 

      भारतीय इतिहासात अनेक आंदोलनाचा इतिहास हा प्रेरणादायी आहे.तर काही आंदोलनाचा इतिहास दु:खदायी असतो. तो विसरता येत नाही.२७ जुलै १९७८ मध्ये महाराष्ट्र राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नांव देण्याचा ठराव पारित झाला. हा आनंद आंबेडकरी अनुयायी आनंदोत्सव साजरा करीत असतानांच भारतीय जातीव्यवस्थेचीमुळे घट्ट असणाऱ्या माणसाच्या डोक्यातील सैतान जागा झाला.सरकारच्या निर्णयाला त्याने जातीचा रंग दिला. आणि दलितांच्या घरांची राखरांगोळी करण्यास सुरवात केली. ते १६ वर्ष ही घरादारासह जिवंत माणसाच्या रक्ताची होळी खेळत राहिले.आम्ही मांगत राहिलो. नामांतराचा लढा हा केवळ विद्यापीठाची पाटी बदलणारा नव्हता,तर तो समता, स्वातंत्र्य,बंधुभाव पुढे नेणारा लढा होता. नामांतर झालेच नाही झाला तो नामविस्तार!.

     बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली सामाजिक मूल्ये रुजली नाहीत हे आजचे आपले समाजवास्तव आहे. नामांतराची घोषणा जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली तेव्हा त्यांनी म्हटले होते, नामांतराचा उत्सव नामांतरवाद्यांनी जल्लोषात साजरा करू नये. त्याच वेळी नामांतरास नामविस्तार म्हणण्याचा फसवा शब्दच्छलही करण्यात आला होता. पुरोगामी म्हणविणारा महाराष्ट्र जातीय मानसिकतेतून मुक्त झालाच नाही.हे नामांतराचा १६ वर्षाचा संघर्ष आणि भिमा कोरेगांव १८१८ च्या संघर्षाला २०० वर्ष पूर्ण झाल्या नंतर २०१८ ला घडविलेल्या संघर्षातून सिद्ध झाले आहे. खैरलांजी,खर्डा,सोनईसारखे अनेक लक्षवेधी माणुसकीला लाजविणारे अत्याचार दलित समाजावर होत राहिले.नामांतरासाठी ‘लढा’ द्यावा लागला हे वास्तव आणि नामांतर झाल्यानंतर त्याचे श्रेय घेणाऱ्यांची राजकीय स्पर्धा, ही दोन्ही कारणे नामांतराचा हेतू निष्प्रभ करत आहेत? या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी, लढा का व कसा द्यावा लागला, यांची माहिती किती लोकांना आहे?.

     मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी २७ एप्रिल १९५७ साली शासनाने जी पळणीटकर समिती स्थापन केली होती त्या समितीने शासनाला स्वतंत्र विद्यापीठाची शिफारस करताना विद्यापीठासाठी ज्या नावांची शिफारस केली होती त्या नावांमध्ये औरंगाबाद,पैठण,प्रतिष्ठान,दौलताबाद,देवगिरी,अजिंठा,शालिवाहन,सातवाहन या स्थलवाचक नावांचा समावेश होता. याबरोबरच दोन महान महत्वपूर्ण व्यक्तींचीही नावे होती. एक होते छत्रपती शिवाजी महाराजांचे व दुसरे नांव होते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे. पण अखेर सर्व नावे मागे पडून विद्यापीठासाठी प्रदेशवाचक ‘मराठवाडा’ हे नाव स्वीकारले गेले. महाराष्ट्रात पुढे महात्मा फुले,पंजाबराव देशमुखांच्या नावाने विद्यापीठे निघाली.कोल्हापूरला शिवाजी महाराजांच्या नावाने विद्यापीठ स्थापन झाले.टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आले. परंतु १९७७ चा नामांतर लढा सुरू होई पर्यंत महाराष्ट्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विद्यापीठ सुरू करून बाबासाहेबांचे उचित स्मारक उभारावे असे ना शासनाला वाटले ना लोकांना सुचले.या पार्शवभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्यावर केलेल्या सत्याग्रहास २० मार्च १९७७ रोजी ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दलित संघटना (काँग्रेस प्रणित रिपाई) एकत्र आल्या असता, महाड सत्याग्रहाचा सुवर्ण महोत्सव व बाबासाहेबांनी १९५० साली औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालय उभारून मराठवाडय़ात उच्च शिक्षणाची रोवलेली मुहूर्तमेढ लक्षात घेता बाबासाहेबांचे नाव विद्यापीठास देण्यात यावे, अशी मागणी काही संघटनांनी केली.

     नामांतराच्या मागणीस त्यावेळी युक्रांद,युवक काँग्रेस,अ.भा.वि.प,जनता युवक आघाडी,समाजवादी,क्रांतिदल,एस.एफ.आय,पुरोगामी युवक संघटना आदी विद्यार्थी संघटनांचा पाठिंबा होता.विद्यापीठाच्या कार्यकारिणीने नामांतराचा ठराव संमत केला होता. जनता पक्ष,शेकापनेही नामांतरचा पुरस्कार करणारे ठराव संमत केले होते. पण याच वेळी दुसरीकडे स्वत:स गांधीवादी,समाजवादी,दलितांचे पाठीराखे म्हणविणाऱ्यांनी म्हणजे गोविंदभाई श्राफच्या संस्था,संघटना यांनी त्याला विरोध केला होता.आणि त्याला साथ मिळाली मुंबई ठाण्याबाहेर नसणाऱ्या शिवसेनेची. यांनी मराठवाडय़ाच्या अस्मितेच्या नावाखाली नामांतरास विरोध सुरू केला होता.पण त्यांचा विरोध मराठवाडय़ात हिंस्र उत्पात माजवेल असे मात्र वाटले नव्हते.कारण शिवसेना मुंबई ठाण्या पलीकडे कुठे ही नव्हती यांची जाणते राजे,राजकारणातील चाणक्य आदरणीय शरद पवार यांना खात्री होती.म्हणूनच २७ जुलै १९७८ रोजी तत्कालीन पुलोदचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतराचा ठराव विधिमंडळाच्या उभय सभागृहांत एकमताने संमत करून घेतल्यावर मराठवाडय़ात जो दलित विरोधी आगडोंब उसळला तो माणुसकीचा बळी घेणाराच ठरला होता. मराठा ओबीसी तरुणांना जय भवानी जय शिवाजी घोषणा देऊन हल्ले करणाऱ्याचा प्रमुख शिवसेना बाळकडू होता. ज्यांचा विद्यापीठाशी दूरान्वयाने संबंध नव्हता अशा खेडय़ापाडय़ांतील दलितांचे रक्त सांडण्यात आले. सरकारी मालमत्तेचा विध्वंस करण्यात आला. पोलिसांना लक्ष्य करण्यात आले. दलित समाज स्वाभिमानाने जगतो,शिक्षण घेतो,गावकीची कामे नाकारतो याची जी सल सवर्ण मराठा,मागासवर्गीय समाजाच्या मनात दडून होती, त्याचा स्फोट विधिमंडळातील ठरावानंतर अक्राळविक्राळपणे बाहेर आला.

     डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान,व्यासंगी असतील,त्यांचे मराठवाडा प्रेमही वादातीत असेल, हैदराबाद संस्थान भारतात विलीन व्हावे म्हणून त्यांनी निजामाविरुद्ध कडक भूमिकाही घेतलेली असेल,तरीही त्यांच्यासारख्या एका पूर्वाश्रमीच्या महाराचे नांव विद्यापीठास देणे हे सनातनी मानसिकतेला सहन होत नव्हते आणि म्हणून त्यांनी नामांतरास हिंस्र विरोध केला हे नाकारता येत नाही. नामांतराचा लढा म्हणूनच दलितविरोधी मानसिकता बदलण्याचा लढा होता. १९७७ ते १९९४ पर्यंत सलग १७ वर्षे लढून परिवर्तनवादी चळवळीने हा लढा जिंकला असे म्हणता येत नाही. १४ जानेवारी १९९४ रोजी विद्यापीठास बाबासाहेबांचे नाव जोडले गेले,पण म्हणून महाराष्ट्रातील दलितविरोधी मानसिकता बदलली, असे काही आजही म्हणता येत नाही.
      नामांतर चळवळीचा वापर दलित पुढाऱ्यांनी आपले सवतेसुभे उभारण्यासाठीही करून घेतला हे सत्य ही नाकारता येत नाही. नामांतर होऊन २९ वर्षे झाली तरीही दलित नेते नामांतराच्या बाहेर पडून दलित समाजाच्या कोणत्याही मूलभूत समस्याला,प्रश्नांना हात घालतांना दिसत नाहीत. दलितांच्या रोजीरोटीचे प्रश्न उग्र होत आहेत.पण या प्रश्नांवर आवाज न उठविता दलित नेते चारी दिशांना चार तोंडे करून नामांतर एके नामांतर करीतच १४ जानेवारीला दरवर्षी औरंगाबाद विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर आपापले सर्कसचे तंबू ठोकून नामांतराचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा हलकट खेळ खेळत असतात. याला काय म्हणावे?.त्याबाबत काय लिहावे हेच समजत नाही? नामांतरानंतर दलित चळवळीची पुढील दिशा काय असावी याचे चिंतन दलित चळवळीने केलेच नाही. म्हणून आंबेडकरी चळवळीची आज दुर्दशा झाली आहे. आंबेडकरी चळवळीला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ज्या मध्यमवर्गीय बुद्धीजीवी विचारवंत,पत्रकार,संपादक,लेखक-साहित्यिकांवर असते.ते सत्य मांडण्याची हिंमत दाखवत नाहीत. त्यांच्यापैकी बरेच जण गटबाज पुढाऱ्यांची भडवेगिरी करण्यात धन्यता मानतात,सोबत भाजप- सेना अथवा काँग्रेसचे कधी छुपेपणाने, तर कधी उघडपणे गुणगान करण्यातच धन्यता मानीत असतात.नामांतर चळवळीत काम करणाऱ्या आता आमदार खासदार बनण्याचे स्वप्न पडत आहेत.त्यासाठी आज ते कोणाशी ही युती आघाडी करण्यासाठी तयार आहेत.समाजाच्या कोणत्याही प्रश्नाचे त्यांना काही घेणेदेणे नाही.असे लिहले तर ते चुकीचे असणार नाही.कारण धनदांडगे जात दांडगे यांनी आपले पक्ष बदलले आहेत.कालचे शत्रू आजचे मित्र झाले आहेत.तर कालचे मित्र आजचे शत्रू बनून सर्वच संपायला निघाले आहेत.म्हणूनच म्हणतात राजकारणात कोणी कायम शत्रू नसतो.तर कोणी कायम मित्र नसतो.पण असंघटीत कष्टकरी कामगार,मजूर,शेतमजुर असलेल्या समाजाचे मात्र सर्वच आर्थिक शोषण करणारे असतात.ते त्यांना फक्त मतदार म्हणून हवे असतात.
     शिक्षणात नोकरीत आरक्षण घेणारा लाभार्थी आंबेडकरी विचारांच्या ट्रेड युनियन पासून चारहात लांब आहे.म्हणूनच त्यांचे पदोन्नतीतील आरक्षण गेले तरी तो पाहिजे त्या प्रमाणत जागृत होऊन मनुवादी विचारांच्या ट्रेड युनियन मधून बाहेर पडला नाही. आरक्षणामुळे मध्यमवर्गीय झालेला पांढरपेशा वर्ग तर इतका आत्ममग्न झाला आहे, की काही अपवाद वगळता मागे राहिलेल्या आपल्या बांधवांसाठी संस्था,संघटना,पक्ष, बांधणी करून जीवन समृद्ध करावे,रचनात्मक प्रकल्प योजनाबद्ध निर्माण करून राबवावेत याची जाणीव त्याला राहिलेली दिसत नाही.

    धम्म परिषदेतून पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी होणारे निवडणुकीत मात्र क्षुद्र स्वार्थाला बळी पडून प्रस्थापित राजकीय पक्षांना मते देतात तेव्हा बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन चळवळ उभी तरी कशी रहाणार? यांचे गांभीर्याने आत्मचिंतन करीत नाही,नामांतराची लढाई जिंकल्यानंतर दलित चळवळ नवे प्रश्न,नव्या आव्हानाना मुळीच भिडलीच नाही.जो-तो खोटे मानापमान,प्रतिष्ठा,कमालीचे क्षुद्र अहंकार व अप्पलपोटय़ा स्वार्थात बुडून गेला.महाराष्ट्रात खेडोपाडी जो जातीयवाद घट्ट होत चालला आहे तो पाहता दलित-दलितेतर संवाद वाढण्याची गरज प्रकर्षांने जाणवते आहे. ग्रामीण भागात दलित समाजावर अत्याचार झाल्यावर ७० च्या दशकात समाजवादी,गांधीवादी आणि डाव्या पक्ष-संघटनांचे कार्यकर्ते तिथे धावून जात असत. डॉ.बाबा आढावांनी सामाजिक एकोप्यासाठी ‘एक गाव एक पाणवठा’ सारखी चळवळ हाती घेतली होती. दलित-दलितेतर युवक एकत्र येऊन सामाजिक परिवर्तनाचे लढे लढत होते.पण हे आता ते पूर्ण थंडावून,उलट खेडोपाडी जातवर्चस्ववादी संघटनांचा उदय झाल्यामुळे दलित-दलितेतर दुरावा वाढत चालला आहे. सामाजिक सामंजस्य वाढविण्यासाठी म्हणूनच दलित-दलितेतरांचा सहभाग असणारे उपक्रम खेडोपाडी नव्या जोमाने राबविले जाणे आवश्यक होऊन बसले आहे. उदा.असंघटित कष्टकरी कामगार,मजुर,भूमिहीन शेतमजूर यांची नांव नोंदणी अभियान,आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे,असंघटीत कष्टकरी मजुरांच्या मुलामुलींना शिक्षण घेण्यासाठी शिशुवृती,वसतिगृह या प्रश्नावर,समस्यावर आताचे स्व्यमघोषित नेते तोंड उगडत नाही.पुतळा विटंबना,हत्याकांड,रेल्वे स्टेशनचे नामांतर यापलीकडे त्यांचा अभ्यासच नाही.

     डॉ.आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,शाहू महाराज,महात्मा फुले संत गाडगेबाबा आदी संत महापुरुषांची जयंती दलित-दलितेतरानी एकत्र येऊन साजरी करणे,दलित, शोषित,पीडित वर्गाच्या सामाजिक,आर्थिक प्रश्नांवर जातपात विरहित वर्गलढे उभारणे असे लक्षवेधी सामाजिक परिवर्तनाचे आणि समाजप्रबोधन करणारे उपक्रम राबविने काळाची गरज आहे.जो पर्यंत ते राबविले जाणार नाहीत,तो प्रयन्त महाराष्ट्रात सामाजिक सुसंवाद साधला जाणार नाही.मनुवादी विचारांच्या संस्था संघटना पक्ष वाढत जाणार हे उघड आहे. 
    नामांतरानंतर सामाजिक परिवर्तनाची अपेक्षित चळवळपुढे गेली नाही हे खरे असले तरी नामांतरानंतर विद्यापीठाची गुणात्मक उंची वाढली हे नाकारता येत नाही. नामांतर झाले तर हे बौद्धांचे,दलितांचे विद्यापीठ होणार, अभ्यासक्रम बुद्ध धर्माधिष्ठित होणार,दलितांनाच इथे नोकऱ्या लागणार,सर्वात नीचपणा लोकसत्ता दैनिकाचे संपादक माधव गडकरी यांनी केला होता. खरी वैचारिक फुट पडणारी आग त्यांनी लावली होती. सुवर्ण मराठा समाजातील तरुण या विध्यापीठातून पदवीधर झाला तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असणारे प्रमाणपत्र घरातील दर्शनी भागत लावावे लागेल.हा प्रचार एका मान्यताप्राप्त दैनिकाच्या मनुवादी विचारांच्या  संपादकाने केल्यामुळे कॉंग्रेस मधील मराठा समाजाचे बहुसंख्य तरुण मुले शिवसेनेकडे गेले त्यांनी बाळकडू पिऊन ग्रामीण भागात आक्रमक झाले.त्यामुळेच मुंबई ठाण्यापुरती असलेली शिवसेना खेड्यापाड्यातील गावा गावात गेली.त्यामुळेच ती आज सत्ते जवळ गेली.हा इतिहास नामांतर चळवळीतुन तालुका जिल्ह्याचे नेते झालेले नेते.आज स्वताला संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय नेते म्हणून विसरले असतील.तसेच समाज पण विसरला असेल तरी इतिहास हा इतिहास असतो.तो सोयीनुसार विसरलो म्हणून खोटा ठरत नाही.  

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद असे नामांतर झाल्यास अन्य महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नता तोडणार,विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा ढासळणार असा जो अपप्रचार करण्यात येत होता तो आज शंभर टक्के खोटा ठरून नामांतरानंतर या विद्यापीठाचा भौतिक विकास झाला, शैक्षणिक दर्जा वाढला. मुंबई-पुणे विद्यापीठानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘ए-ग्रेड’ मिळविला. पण तरीही नामांतराचे पुढचे पाऊल हे मानसिक परिवर्तनास चालना देणाऱ्या चळवळी गतिमान करणे हेच असावे, याविषयी दुमत नसावे.नामांतरामुळे जे नेते झाले तेच रिपाई पूर्वीच्या गटबाज नेत्या पेक्षा जास्त समाजासाठी चळवळी करिता नालायक धोकादायक बनले असे लिहले तर चूक ठरणार नाही,आजच्या नेत्यांनी खासदार की,आमदारकी करिता कोणा सोबत युती आघाडी केली म्हणुन आम्ही बाळकडूची कामगिरी विसरू शकत नाही. त्यामुळे आजच्या तरुणा पुढे मोठा प्रश्न आहे. नामांतराचा स्मृतीदिन साजरा करावा की जयंती दिन कारण नामांतर तर झालेच नाही,झाला तो नामविस्तार!.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव घेऊन जयजयकार करणाऱ्यांनी याचा गांभियाने विचार करून आंदोलन करण्याची मर्यादा लक्षात घेऊन मतदारसंघ आणि संविधानाच्या चौकटीत राहून वैचारिक पातळीवर पक्ष किंवा संघटना बांधणी करावी.तरच भविष्यात स्वाभिमानाने जगता येईल.

सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई,9920403858,

अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य 

प्रा.जोगेंद्र कवाडे सरांची भिमशक्ती युती कोणासाठी? कशासाठी?..

 प्रा.जोगेंद्र कवाडे सरांची भिमशक्ती युती कोणासाठी? कशासाठी?..


      देशात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची  सामाजिक,सांकृतिक,शैक्षणिक धार्मिक आणि राजकीय चळवळ आहे. तिला मानणारा ८५ टक्के समाज देशपातळीवर आहे.समाजाची संख्या मोठी आहे म्हणूनच तो असंघटीत म्हणून गणल्या जातो.परंतु ते सर्व राजकीय पक्षासाठी लक्षवेधी असतात. निवडणुका जवळ आल्या कि कार्यकर्त्याचे व नेत्याचे महत्व वाढते.कारण त्या समाजाचे काम करणारे कार्यकर्ते आणि नेते स्वार्थी असल्यामुळे ते कधीच एकत्र येऊ शकत नाही,असा त्यांना शाप आहे असे म्हणतात. 
     महाराष्ट्र राज्यातील आंबेडकरी चळवळीतील एक लढाऊ नेते जोगेंद्र लक्ष्मण कवाडे हे एक भारतीय राजकारणी,समाजसेवक,माजी प्राध्यापक व पीपल रिपब्लिकन पक्षांचे  संस्थापक व अध्यक्ष आहेत. ते चिमूर लोकसभा मतदारसंघातुन १२ व्या लोकसभेवर निवडून गेले होते. १९९८ ते १९९९ लोकसभा सदस्य होते.नंतर ते जून २०१४ ते २०२० पर्यंत महाराष्ट्र विधान परिषद सदस्य होते.त्यांची भिमशक्ती युती काही वर्ष कॉंग्रेस सोबत होती. आता ती नुकतीच नामांतर ठरावाला विरोध करणाऱ्या बाळासाहेब ठाकरेची शिवसेना चालविणाऱ्या आणि मनुवादी हिंदुत्व मान्य असणाऱ्या मराठा शिंदे शक्ती आणि त्यांच्या चाळीस साथीदारांच्या कट्टरपंथीय हिंदुत्व शिवशक्ती बरोबर प्रा.जोगेंद्र कवाडे सरांची भिम शक्तीची राजकीय युती झाली आहे.त्यामुळे राज्यात एक वैचारिक आणि स्वार्थी राजकारणाची उलथापालथ सुरु झाली आहे.
     प्रा.जोगेंद्र कवाडे सरांचा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात महत्त्वपूर्ण सहभाग होता,या दरम्यान त्यांनी काढलेल्या ऐतिहासिक लॉंगमार्चचे ते प्रणेते ठरले होते. कवाडे हे मागासवर्गीय एस सी -बौद्ध चळवळीतील एक उल्लेखनिय सामाजिक कार्यकर्ते आहेत.जन्मप्राप्त अभावग्रस्त परिस्थितीतून कवाडे यांनी सामाजिक परिवर्तनासाठी काम केले. ते आंबेडकरी चळवळीतील जहाल नेते म्हणूनच प्रसिध्द आहेत.व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते व कट्टर आंबेडकरवादी आहेत.रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर मध्ये ते वाणिज्य विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. नागपूर येथून १९७२ पासून निघणाऱ्या जय भीम या मराठी साप्ताहिकाचे ते संपादक व प्रकाशक होते, याशिवाय त्यांनी अनेक मासिकांमध्ये व दैनिक वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिलेले आहेत. १९७६ मध्ये त्यांनी बौद्धांच्या (१९५६ नंतरचे धर्मांतरित बौद्ध; विशेषतः नवबौध्द ) सवलतीसाठी आंदोलन केले होते, त्यासाठी तिहार कारागृहात त्यांना दहा दिवस कारावासाची शिक्षा झाली होती. मराठवाडा विद्यापीठाच्या (सध्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) नामांतरासाठी त्यांनी ११ नोव्हेंबर १९७९ रोजी हजारो आंबेडकरवादी तरूणांना एकत्र घेऊन दीक्षाभूमी नागपूर ते औरंगाबाद 'लॉंगमार्च' काढला होता. त्यांच्या या तीव्र आंदोलनाची दखल महाराष्ट्र सरकारला द्यावी लागली होती. १९८२ मध्ये त्यांनी दलित मुक्ती सेनेची स्थापना केली होती. अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून नेतृत्वही केले आहे. कवाडे हे माजी खासदार आहेत, ते काँग्रेस रिपब्लिकन आघाडी चे उमेदवार म्हणून १९९८ मध्ये रिपब्लिकन ऐक्याचे लोकसभा उमेदवार म्हणून चिमूर लोकसभा मतदारसंघातुन तिकिटावर निवडून आले होते. मात्र पुढे रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य फुटले आणि प्रत्येक नेत्यांनी आपला पक्ष स्थापन केला.प्रा जोगेंद्र कवाडे त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली,जो भारतीय काँग्रेस पक्षाच्या आघाडीतील एक घटक पक्ष होता.
      महाराष्ट्र राज्यात आंबेडकरी चळवळीत एकशेएक धुरंधर राष्ट्रीय नेते (स्वताचा मतदार संघ नसलेले,एक,दोन अपवादात्मक ) आहेत.ते रिपब्लिकन ऐक्यासाठी नेहमीच तयार असतात.समोर गर्दी दिसली की ते प्रत्येक वेळी काही तरी लक्षवेधी घोषणा करीत असतात.नेत्यांचे व समाजांचे ऐक्य राहण्यासाठी जीव देण्यासाठी तयार असतात,आणि ऐक्यातून कोणी फुटून बाहेर पडला तर त्याला उद्याचा सूर्य दिसू देणार नाही अशी लाखोंच्या जनसागरा समोर शिवाजी पार्क दादर मुंबई येथे भिमप्रतिज्ञा घेणारे लॉग मार्च प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे सरांची भिमशक्तीची युती असंविधानिक मुख्यमंत्री असलेल्या पक्षाच्या बरोबर राजकीय युती केली त्यानिमित्ताने आत्मचिंतन करणारा लेख लिहत आहे.
     मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नांव देण्यासाठी सरांनी जीवाचे रान केले.ऐतिहासिक लॉग मार्च काढला.नामांतर कृती समिती ते दलित मुक्ती सेना,व्हाया दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ असा सामाजिक राजकीय प्रवास झाला आहे. प्रा जोगेंद्र कवाडे सरा सारखा निर्भीड,निःपक्षपाती,प्रामाणिक लढाऊ झुंजार नेता महाराष्ट्र राज्यात नव्हे तर भारतात असूच शकत नाही, एवढा आत्मविश्वास भिम सैनिकांना वाटत होता. महाराष्ट्रात ३३ जिल्हे असतांना सरांना सतरा जिल्हे बंदी असणे म्हणजे गिनीज बुकात नोंद असणारा एकमेव नेता असावा असा माझा व भिमसैनिकांचा तेव्हा समज होता. तेव्हा त्यांचे भाषण आम्ही भिम सैनिक कान देऊन मन शांत ठेऊन ऐकत होतो. त्यांचे भाषण ऐकले की अंगावरचे केस ताठ उभे राहायचे.म्हाताऱ्यांच्या अंगातील रक्त तरुणांप्रमाणे सळसळत असे. त्यांचे भाषण ऐकून तरुण भिमसैनिक मुठी आवळून घोषणांनी आकाश पातळ दणाणून सोडत असत.तेव्हा पासुन भिमसैनिक सरांची धडा शिकविण्याची भाषा ऐकतो.आज पर्यत त्यांच्या प्रत्येक सभेत मोर्चात,सर जातीवाद्यांना सत्ताधाऱ्यांना,मायबाप सरकारला धडाच शिकवत आहेत.रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यातून बाहेर पडल्यास उद्याचा सूर्य दिसू देणार नाही,शिवाजी पार्क मधील जाहीरसभेतील एका सरसेनापतीच्या भिमप्रतिज्ञेचे काय झाले?. असे आजची आंबेडकरी चळवळीतील मुलंमुली भिम सैनिक,कार्यकर्ते विचारतात.
      नामांतराच्या लढाईत अनेकांना धडे शिकविण्याच्या भाषेनेच खेड्यापाड्यातील गोरगरीब असंघटित मजुरांचा आई बहिणीची इज्जत लुटायला लावली. अनेक गावांतील महारवाडे, बौद्धवाडे,माणसांसह जाळून टाकण्यास भाग पाडले.कारण प्राध्यापकांची भाषाचं कायम सत्यानाश करणारी होती. जातीवाद्यांच्या ढुंगणावर भीमटोले मारणारे, सत्ताधाऱ्यांचे धोतर पिवळे करणारे प्रा.जोगेंद्र कवाडे कुठेच दिसले नाही.एकीकडे ही जहाल भाषा असतांनाच दुसरीकडे नामांतरासाठी ह्या प्राध्यापक कवाडे मेला तरी चालेल, त्याचे तुकडे तुकडे केले तरी चालतील,पण नामांतर झाल्याशिवाय राहणार नाही. असे बेंबीच्या देठापासून सांगणारे प्रा.कवाडे सरांनी लाखो भीमसैनिकांना भक्त बनविले होते.पण भिमाच्या क्रांतिकारी विचारांचे शंभर सैनिक बनवू शकले नाही. भक्तांचे सेनापती होता येते.शिष्यांना सैनिकांना शिस्त लावण्यासाठी सेनापतीला शिस्त लागते.सैनिकांना शिस्तबद्ध पालन देण्यासाठी बौद्धिक शक्ती लागते.शत्रूवर हल्ला करण्याचे प्रशिक्षण द्यावे लागते. प्राध्यापक कवाडे सर आपण ते भीमसैनिकांना काहीच देऊ शकला नाही.राजकीय पक्ष स्थापन केल्यावर एकही मतदारसंघ बांधला नाही.मतदारांच्या किंवा मतदारसंघातील आपल्या मतदारांच्या मुलभूत समस्या जाणल्या नाही.त्यामुळे ते सोडविण्याचा प्रश्न आपल्याला पडला नाही.आपला समाज बांधव कसा जगतो?.काय काम करतो?.त्यांची माहिती घेतली नाही.सर नागपूर महानगरपालिकेत येवजदार कामगार कोणाला म्हणतात त्यांची माहिती घेऊन त्यांच्यासाठी आज पर्यंत कोणी काय केले.याकडे आपले राष्ट्रीय अध्यक्ष असतांना कधीच लक्ष कसे काय गेले नाही. आंबेडकरी चळवळीतील राजकीय नेत्यांना याबाबत काहीच कसे वाटत नाही.याचे मला आश्चर्य वाटते. हेच भिमशक्तीची युती आघाडी करणाऱ्या नेत्या बदल माझे चिंतन आहे.
      नामांतरासाठी लढणाऱ्यांना शेवटी प्रथम दिलेल्या जोडनांवावर म्हणजेच नामविस्तारा वरच समाधान मानावे लागले. मग एवढा रक्तपात घडविण्याची गरज काय होती?. नामांतराच्या चळवळीत मागासवर्गीय एस सी समाजाचे कोणते प्रबोधन आपण केले?. शांती, समता,बंधुभाव,निर्माण करण्या ऐवजी आपण कायम शिवीगाळ,सत्यानाश,धडा शिकवू, जाळून टाकू या शब्दांचे बॉम्बगोळे आपण भाषणांतून भोळ्याभाबड्या एस सी मागासवर्गीय समाजावर फेकत होता.त्यामुळेच तो असंघटित मजूर समाज पेटून उठायचा,त्यामुळेच गावा गावांतील वातावरण ढवळून काढले जात होते. गावा बाहेर राहणाऱ्या समाजाने गावात राहणाऱ्या समाजाला धडा शिकवला नाही तर गावांच्या आत राहणाऱ्या समाजाने जय भवानी,जय शिवाजी घोषणा देऊन गावा बाहेर राहणाऱ्या समाजाला धडा शिकवला,म्हणूनच तो सत्ताधारी झाला.हा इतिहास आपल्या जहाल भाषणांनी घडविला असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही.
      महाराष्ट्र राज्यातील ३३ जिल्ह्या पैकी सतरा जिल्ह्यात प्रवेश बंदी यांचे आम्हाला भिम सैनिकांना खूप कौतुक व गर्व वाटायचे.परंतु भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांने संविधानाच्या पाना पानांवर लिहून ठेवले होते,की ज्याच्या भाषणामुळे,वागण्यामुळे दोन समाजात शांतता भंग पावत असेल ज्या व्यक्तीमुळे दोन समाजात जातीय दंगल होण्याची शक्यता असेल अशा व्यक्तीला जिल्ह्यात सभा घेण्याची,भाषण करण्याची बंदी घातली पाहिजे. कायद्यानुसार १४४ कलम लागु करून पोलीसांना त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागते.सांगा पोलीस कोणाच्या नियमांचे पालन करीत होते. कशासाठी आपल्याला प्रवेश बंदी होती. तेव्हा आम्हाला भिम सैनिकांना कळत नव्हते, भारतीय संविधान कधी वाचलेच नव्हते.इतिहास वाचला तर इतिहास घडविला जातो.
     डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्रत्येक आंदोलन सत्याग्रह शांततेत व कायदेशीर मार्गाने होत होती.एका बाजूला समाजाचे प्रबोधन दुसऱ्या बाजूला कायदेशीर सनदशीर मार्गाने पत्रव्यवहार करून संघटित पणे लढाई असायची.रस्त्यावरच्या लढाईत ते कमी पडले असतील तरी कायदेशीर लढाईत ते कुठेही कमी पडले नाही,कारण त्यांचा मूकनायक,प्रबुद्ध भारतातील लोकांचा सरसेनापती विधाविभूषित कायदेपंडित डॉ.बाबासाहेब आंबेडकर होता.       नामांतर चळवळीतुन तयार झालेले सरसेनापतीनी दलितांना मुक्त करण्यासाठी सेना निर्माण केली होती.परंतु खेड्या पाड्यातील असंघटित शेतमजूर,वीट भट्टी कामगार,खडी फोडणारा कामगार,शहरातील झोपडपट्टीत राहणार असंघटित कष्टकरी नाका कामगार, इमारत बांधकाम कामगार,घरकामगार,कचरा वेचक,सफाई कामगार यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे तेव्हा ही कृती कार्यकर्म,योजना नव्हत्या आणि आजही नाहीत.समाजांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेकडे, नेत्याकडे अभ्यासपूर्ण योजना असाव्या लागतात. त्या सोडविण्यासाठी राजकीय पक्षा बरोबर युती आघाडी करावी लागते.म्हणूनच जाहीरपणे विचारतो प्रा.जोगेंद्र कवाडे सरांची भिमशक्ती युती कोणासाठी ?. कशासाठी आहे?.
     मागासवर्गीय समाजासाठी राज्य व केंद्रांच्या योजना फक्त कागदावर असतात. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याकडे ठोस उपाययोजना कार्यक्रम असावा लागतो.त्याचा अभ्यास आपण तेव्हा ही केला नाही आणि आज ही करत नाही.फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव घेऊन जय जयकर करून त्यांना मानणाऱ्या समाजाला भिमसैनिकाला  भावनिक करून राजकीय भांडवल करण्याची कला आपल्या कडे आहे.त्यावरच राजकीय पोळी भाजण्याचे काम भिमशक्तीच्या नांवावर युती म्हणून चालली आहे.
      डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना देऊन ठेवल्या आहेत,त्यांचा अभ्यास करून त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आपल्याला  उभी केली पाहिजे. तरच आपण रिपब्लिकन पक्षाच्या विचारधारे नुसार सर्वांना समान न्याय मिळवून देऊ शकतो.रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यातून चार महान नेते खासदार झाले,त्यावेळी रिपाईने लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के विजय मिळवला होता.असा इतिहास लिहला गेला आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीत चार नेते चार दिशेला गेले आणि इतिहास पुसून टाकला.सर आपण निर्भीड,निःपक्षपाती प्रामाणिक सरसेनापतीचा होता हा इतिहास आपणच आचरणाने पुसून टाकला आहे.असे माझे व्यक्तिगत मत आहे. 
     शरद पवार यांनी नामांतर ठराव मंजूर केला पण अंमलबजावणी केली नाही,त्यांच्या विरोधात सोळा वर्ष जनआंदोलने केली,त्यांनीच शेवटी तडजोड करून नामविस्तार केला. त्यांच्या आशीर्वादाने आपण खासदारांचे विधान परिषदेत आमदार झाला.राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना खाली तालुख्याचा नेता बनवून ठेवले.खासदार आमदार बनत नाही, मुख्यमंत्री होणार असेल तर चालते.कारण तो राज्याचे नेतृत्व करतो. विधान परिषदेत असलेला आमदार राष्ट्रीय नेता नसतो, त्याने ती संधी आपल्या पक्षातील दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नेत्या दिली पाहिजे होती. त्यासाठी गोपाळराव,रमाकांत,बाबुराव, अशांतभाई,चिंतामण,या ही पेक्षा एकशे एक तानसेन होते ज्यांनी तुम्हाला सुरवात पासून शेवट पर्यंत जीवाला जीव लावून मदत केली होती.त्यांनाच आपण धडा शिकवला.सर काल पर्यत सर्वांना धडा शिकवला पण पाठांतर घेतले नाही. म्हणूनच आज भिमसैनिकांना त्यांची शिक्षा मिळत आहे. "संघटनेची ताकद ही केवळ सभासदांच्या संख्येवर अवलंबून नसून,ती सभासदांच्या प्रामाणिकपणावर संघटनेच्या एकनिष्ठतेवर आणि शिस्तपालनावर अवलंबून असते." असे विश्वरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांनी वेळोवेळी सांगितले होते.   
      नामांतर चळवळीत ज्यांच्या घरदारांची राख रांगोळी झाली ते कोण होते?.ते तेव्हा ही असंघटित मजूर,शेतमजूर,कामगार होते आणि आज ही आहेत.त्यांचा वापर आपण फक्त राजकारणासाठी केला आणि करीत आहात.त्यांच्या करीता अनेक कल्याणकारी योजना आहेत त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काय काम केले.यांचे ताळेबंद आपण भिमशक्तीचे नेते म्हणून सरकार समोर मांडावे.मतदार संघात भिमसैनिक राहतात त्यांच्या कोण कोणत्या समस्या आहेत.कोणत्या समस्या जन आंदोलने करून सनदशीर मार्गाने पत्र व्यवहार करून सोडविल्या आणि आता कोणत्या समस्या बाकी आहेत.त्या सोडविण्यासाठी प्रा.जोगेंद्र कवाडे सरांच्या भिमशक्तीने मनुवादी हिंदुत्व मान्य असणाऱ्या मराठा शिंदे शक्तीला मतदार म्हणून मतदान करावे.म्हणूनच ही भिमशक्ती युती कोणासाठी,कशासाठी?. भिम सैनिकांनी यांचा गांभीर्याने विचार करावा. 
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,
भिम सैनिक,भांडूप,मुंबई.

परिवर्तन रथाचा सारथी एकनाथ आव्हाड

 परिवर्तन रथाचा सारथी एकनाथ आव्हाड



       पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगामी आणि परिवर्तन वादी चळवळी खूप झाल्या त्यातुन लाखो कार्यकर्ते आणि त्यांच्या हजारो संस्था,संघटना निर्माण झाल्या. त्यात मागासवर्गीय समाजा सोबत भटके,विमुकत्या,आदिवासी समाजातील सुशिक्षित लोक पुढे आले आणि त्यांनी समाजाचे नेतृत्व केले त्यातील एक लक्षवेधी नेते म्हणजे बीड जिल्हातल्या बहुजन चळवळीत नेते आणि मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ आव्हाड यांचा जन्म बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील दुकडेगावात (डुकरेगावात) एका गरीब मातंग समाजातील पोतराजाच्या घरी झाला. वडिलांचे नाव दगडू आणि आई चे भागूबाई. शिक्षकांनी शाळेत दाखल करताना १९ जानेवारी १९५६ ही तारीख लिहिल्यामुळे तीच त्यांची अधिकृत जन्मतारीख झाली. घरात खायला दाणा नाही, वडील मागून आणतील त्यावर गुजराण करावी लागे.एकनाथाने पोतराजच व्हावे अशी वडिलांची इच्छा होती, पण आईने कडाडून विरोध केल्याने त्यांना शाळेत जायला मिळाले. शाळेत मागच्या बाकावर बसूनच ते शिकले. आव्हाडांनी घर सोडले, अंगमेहनत करून पैसे मिळवले आणि शिक्षण घेतले.
एकनाथ आवाड ऊर्फ जिजा (जीजा) यांचे शालेय शिक्षण लऊळ येथे झाले तर महविद्यालयीन शिक्षण बीड आणि अहमदनगर येथे झाले.अहमदनगर येथील कॉलेजातून त्यांनी एल्‌एल.बी. केले. ते एकीकडे एम.एस.डब्ल्यू. झाले आणि दुसरीकडे वकीलही झाले.वडिलांचे केस कापून आवाड यांनी पोतराज प्रथेवर पहिला घाव घातला. घरातूनच संघर्ष सुरू करून त्‍यांनी पोतराजाच्या प्रथेतून शंभराहून अधिक कुटुंबांची सुटका केली.शिकत असतानाच एकनाथ आव्हाड विद्यार्थी चळवळीत उतरले, विवेक पंडित यांच्या ’विधायक संसद’ नावाच्या युवकांच्या संघटनेत गेले आणि अस्पश्यता आणि जातिभेद यांविरुद्ध त्यांनी रान पेटवले. त्‍यांनी १९८० पासून वेठबिगार, पोतराज आदी प्रथांविरुद्ध लढा देणे सुरू केले; भूमिहीन दलितांना गायरान जमिनी ताब्यात घेऊन कसायची हिंमत दिली. त्यासाठी गायरान परिषदा घेतल्या. भूमिहीन महिलांचे त्यांनी बचत गट स्थापले. सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट स्थापून महिलांना पतपुरवठा केला. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत या ट्रस्टचे काम चालते. २०१५सालापर्यंत या ट्रस्टची उलाढाल दहा कोटी रुपयांवर पोचली होती.१९९० साली त्यांनी मानवी हक्क अभियानाला सुरुवात केली. 

     संगम नावाच्या गावात त्यांनी मानवी हक्क अभियान संघटनेची शाखा स्थापन केली.२००१ साली युनोने आयोजित केलेल्या वंशभेदाविरोधातील परिषदेला आव्हाडांनी हजेरी लावली. भारतात अजून जातिभेद नष्ट झाला नाही असे त्यांनी तेथे प्रतिपादन केले. पुढे जिनिव्हा येथील मानवी हक्क संरक्षण संमेलनातही आव्हाडांनी ’जातिप्रथेला हद्दपार करण्याची’ त्यांची भूमिका आग्रहाने मांडली. त्यांनी उर्वरित सर्व आयुष्य चळवळीसाठी वाहिले होते.मानवी हक्क अभियान' या चळवळीच्या माध्यमातून आवाड यांनी मराठवाड्यातील सुमारे पन्नास हजार मागासवर्गीय समाजाच्या जमिनी वाचविल्या. त्यांच्या या अभियानामुळे मागासवर्गीय समाजात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळाले आणि प्रगती झाली.गुलामीची प्रतीके असलेली गावकीची कामे मागासवर्गीयांनी सोडावीत आणि आत्मसन्मानाने जगावे हा आवाडांच्या चळवळींचा उद्देश होता. त्यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला. या संघर्षातूनच 'जग बदल घालुनि घाव' हे त्यांचे आत्मकथन जन्माला आले. त्यांचे हे पुस्तक बहुजन चळवळीसाठी मार्गदर्शक ठरले आहे.मागासवर्गीय समाजातील अनेक जाती आज ही परिवर्तना पासुन दूर आहेत.चर्मकार,मांतग, भटक्या विमुकत्या समाजातील लोक परिवर्तना रथात बसलाच नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व मागासवर्गीय समाजातील लोकांना परिवर्तन रथात बसण्याची हात जोडून अनेकदा विंनती केली.पण महार समाज सोडून इतर मागासवर्गीय समाजातील लोक आपले पारंपारिक साहित्य सोडून रथात बसण्यास तयार झाले नाहीत.

     महार मात्र आपले सर्व काही सोडून रथात बसले आणि १९५६ नंतर त्या समाजाचा परिवर्तन रथ कुठे ही थांबला नाही.तो आज भी अनेक संकटांना तोंड देत संघर्ष करीत पुढे जात आहे.चर्मकार आणि मातंग कुठे आहेत.कोणत्या दिशेला चालले समजत नाही.असे जिजा सोबत काम करणारे मराठवाड्यातील अनेक समाजसेवक (MSW) पदवी घेऊन समाजात स्वयंसेवी संस्था चालविणारे कार्यकर्ते नेते सांगतात.मराठवाड्यात एन जी ओ चे मोठे जाळे निर्माण झाले होते.ते मागासवर्गीय समाजाच्या अन्याय,अत्याचारा विरोधात सतत संघर्ष करीत होते.एकनाथ आव्हाड उर्फ जिजा यांची माझी प्रत्येकश भेट कधी झाली नाही.पण एन डी बाबा सोनवणे पाटोदा,बीड आणि इंजिनीयर रमेश रंगारी साहेब मुंबई यांच्या मुळे आमच्या कामाची एकमेकांना ओळख झाली होती.नागपुर,मनमाड,नाशिक येथे रेल्वे आणि मागासवर्गीय विद्युत कर्मचारी युनियन यांनी आयोजित केलेल्या परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणुन एकनाथ आव्हाड,रूपा बोधी कुलकर्णी,आणि मी सागर तायडे योगायोग आला होता.पण तिन्ही ठिकाणी त्यांची तबेत ठीक नसल्यामुळे ते येऊ शकले नाही.पण त्यांची मागासवर्गीय समाजा करीता असलेलीं चळवळ आणि आमची असंघटीत कष्टकरी कामगार मजुरांच्या करीता चालणारी चळवळ एकाच नाण्याच्या दोन बाजुआहेत.म्हणुन एकत्र येऊन राज्यव्यापी,देशपातळीवर संघटन उभे राहिले पाहिजे ही इंडिपेंडन्ट लेबर युनियन च्या रमेश रंगारी,जे एस पाटील साहेब यांची धडपड आणि जिद्द होती.त्यात आम्ही सहभागी होऊन नेतृत्व करावे ही त्यांची इच्छा होती.यामुळेच मी आय एल यु शी जोडल्या गेलो.

         एकनाथ आवाड यांच्या कामावर वेगवेगख्या संशोधकांनी ५ पुस्तके लिहिली आहेत. २७ जणांनी त्यांच्या कार्यावर पीएच.डी.साठी 
लिहली 
आहे.
मी मराठवाडा विभागात त्यांनी घडविलेले कार्यकर्ते आज मा
झ्या
 सोबत म्हणजे सत्यशोधक कामगार संघट
ने
 सोबत काम करीत आहे
.फरक हा आहे की तेव्हा ते केवळ जातीच्या प्रश्नावर लढत होते.मी त्यांना असंघटीत कामगार म्हणून संघटीत करीत आहे.असंघटीत कामगार सर्वात जास्त मागासवर्गीय समाजातील आहेत.मागासवर्गीय समाजातील संस्था,संघटना आणि पक्ष केवळ जातीच्या प्रश्नावर म्हणजे आरक्षण यावरच जास्त भर देऊन काम करतात किंवा अन्याय,अत्याचार झाल्यावर त्याविरोधात लढण्यात आपली संपूर्ण शक्ती खर्च करतात.पण आम्ही असंघटीत कुशल कारागीर कामगार,मजूर आहेत.हे ते सर्व विसरतात.म्हणून परिवर्तन रथात बसलेले लोक शहरात येऊन आपली जात विसरण्याचे कामे करतात.पण परिवर्तन
 
रथात 
न बसले
ले
 
लोक खेडे सोडून शहरात आले तरी आपली पारंपारिक जातीव्यवस्थेने दिलेली काम सोडायला तयार नाही.ती सोडण्यासाठी एकनाथ आव्हाड यांनी स्वता पासून सुरवात केली.पोतराजाचे रूप बदलले त्यासाठी घरात वडिला बरोबर संघर्ष करावा लागला तो त्यांनी केला.आज मांतग आणि चर्मकार समाजाच्या माणसा कडे लक्ष देऊन पहा. कपाळावर मोठे उभे कुंकू लावलेले दिसेल,गळ्यात,हातात गंडा-रंगीत धागादोरा हमखास दिसेल.काही लोक दिसेल असा ठिकाणी न ठेवता.कंबरेला किंवा हाताच्या दंडाला गंडा,धागादोरा बांधतात.हा अतिशय कुशल संघटक,वक्ता असलेल्या एन डी बाबा सोनावणे यांनी परिवर्तन रथा बाबत सांगितले होते.परिवर्तन रथाचा सारथी एकनाथ आव्हाड मातंग समाजात मोठे परिवर्तन घडविण्यास शेवट पर्यंत प्रयत्नशील होते.
 
ऑक्टोबर २००६ मध्ये
 
त्यांनी 
हिंदू मातंग समाजा
चा त्याग केला आणि
 बौद्ध 
धम्माचा 
स्वीकार
 
केला
.
परिवर्तन रथाचा हा सा
रथी 
सोमवार दि २५ मे २०१५ रोजी
 
परिवर्तन रथ सोडून गेला.पण त्यांचा वारसा त्यां
चा
 
उच्च शिक्षित मुलगा डॉ.प्रा.मिलिंद आव्हाड आज समर्थपणे परिवर्तन रथाचे सार्थ करीत आहेत.असा परिवर्तनवादी परिवर्तन रथाच्या सारथी एकनाथ आव्हाड उर्फ जिजा यांच्या जयंती निमित्य त्यांच्या क्रांतिकारी विचारला आणि संघर्षाला क्रांतिकारी जयभीम.सर्व आदर्श मानणारया परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना आणि समाजाला हार्दिक !शुभेच्छा !!!.
आपला 
सागर रामभाऊ तायडे,भांडुप,मुंबई-९९२०४०३८५९.