असंघटीत समाजाला सुशिक्षित व संघटीत करणारे जिजा ॲड.एकनाथ आवाड.
मागासवर्गीय समाज अज्ञानी,असुशिक्षित असंघटित असह्य होता तेव्हा त्यांचे प्रबोधन करून संघटना बांधण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.तेव्हा त्यांच्यासोबत निश्चयाने,निष्ठेने आणि निमूटपणे कार्य करणारे प्रामाणिक कार्यकर्ते होते.घाण काम करणे सोडा,लाचारी जीवन सोडा कष्टाचे काम करून स्वाभिमानाने जगणे स्वीकारा. त्यासाठी "खेडे सोडा शहर गाठा" हा संदेश बाबासाहेबांनी दिला होता,त्यांची अंमलबजावणी ज्या लोकांनी केली ते आज शहरात सुखाने स्वाभिमानाने जगत आहेत.जातीप्रथा नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी काही दिशादर्शक निर्णय घेतले होते. भारत देश हा खेड्यात वसलेला असल्यामुळे आणि खेडी ही जातीप्रथेचे उकीरडे होते असे त्यांचे ठाम मत होते. त्यामुळे या उकीरड्यात जीवन कंठण्यापेक्षा "खेडी सोडा आणि शहरात या' असा संदेश बाबासाहेबांनी दिला होता.गांधी-आंबेडकर वादाचे मूळ याच मतभेदांवर उभे होते.खेड्यात जातीव्यवस्थेचे पाळेमळेे घट्ट असल्यामुळे गांधींना खेडी प्राणप्रिय होती.त्यात त्यांना रामराज्य दिसत होते. बाबासाहेबांचे अगदी उलट होते. त्यांना रामराज्यापेक्षा सुराज्य हवे होते.शंभुकाचे डोके उडविणारे,सीतेला वनवासात पाठविणारे,एकलव्याचा अंगठा मागणारे रामराज्य समजाधिष्ठित असणे शक्य नव्हते.त्यामुळे बाबासाहेबांनी ‘खेड्याकडे चला’ या भूमिकेवरच घाला घातला.बाबासाहेबांची चळवळ जातीप्रथा नाकारणारी होती.ती ज्या समाजाने विचारासह स्वीकारली ते आज खेड्यात आणि शहरात स्वभिमानाने जगत आहेत.त्यांचे परिवर्तन चळवळीत सन्मानाने नांव घेतले जाते.असे एक नांव असंघटीत समाजाला सुशिक्षित व संघटीत करणारे जिजा ॲड.एकनाथ आवाड चळवळीचे नेते आणि मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.
१४ ऑक्टोबर १९५६ ला बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौध्द धम्माची दीक्षा घेतले तेव्हा त्यांच्या सोबत फक्त महार जातीचे लोक गेले बाकी मागासवर्गीय एस.सी म्हणून घेणारे मांग,चांभार गेले नाही. महार जे गेले फक्त शरीराने गेले बाकी सर्व काम करण्याचे पोट भरण्याचे सर्व साहित्य त्यांनी मागे सोडून गेले.मांग चांभार इतर भटके काम करण्याचे पोट भरण्याचे सर्व साहित्य सोडून द्याला तयार नसल्यामुळे ते अजून ही हिंदू धर्माचे कर्मकांड,रीतीरिवाज परंपरा सोडून देण्यासाठी तयार नाहीत म्हणूनच त्यांची गावात किंवा शहरात नोंद होत नाही.ही खंत मी एकनाथ दगडू आवाड उर्फ जिजा यांच्या तोंडून ऐकली होती.मांग जातीसह भटक्या जातीच्या लोकावर नियमित होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी एकनाथ दगडू आवाड यांनी मानवी हक्क अभियानची स्थापना केली होती. मराठवाड्यात तिचे काम जोरात होते.किल्लारी महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील गाव होते.तिथे ३० सप्टेंबर,१९९३ रोजी पहाटे ३:५६ वाजता येथे रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता.त्यात सर्वात जास्त मागासवर्गीय समाजाचा संसार उध्वस्थ झाला होता.त्यावेळी मराठवाड्यातील सामाजिक संस्थांना (एन जी ओ) पुनर्वसन करण्याचे काम मिळाले होते. त्यावेळी एन.डी.(बाबा) सोनवणे यांच्या मुळेच जिजा ॲड.एकनाथ आवाड,ॲड.वाल्मिकी तात्या निकाळजे,तात्या कांबळे यांची ओळख झाली. त्यावेळी अण्णाराव सूर्यवंशी,बबन जंगले,बाळासाहेब गायकवाड,बाळासाहेब पवार,शीला तिळमुरे,विवेक पवार असा अनेक समाजसेवकांनी सत्यशोधक कामगार संघटने सोबत काम करण्याची तयारी करून पदाची जबाबदारी घेतली.त्यावेळी जिजा एकनाथ दगडू आवाड आणि मानवी हक्क अभियानशी वैचारिक नाळ जुळली.
मी असंघटीत कष्टकरी कामगार मजुरांच्या मुलभूत समस्या साठी लढत असतांना तेच काम एकनाथ दगडू आवाड यांची मानवी हक्क अभियान संघटना मागासवर्गीय भटक्या समाजातील लोकांच्या राहण्याच्या जागेसाठी म्हणजेच पालासाठी,शिक्षण,आरोग्यासाठी एकाबाजूला सनदशीर मार्गाने तर दुसरीकडे रस्त्यावर उतरून संघर्ष करीत होती.मी ट्रेड युनियन कायद्याच्या चौकटीत काम करीत होतो ते सामाजिक न्याय धर्मदाय सेवा संस्थे नुसार,एन.जी.ओ ही एक अशी संस्था असते.जी समाजातील गरीब आणि गरजू लोकांची मदत करत असते ही संस्था गैरसरकारी असते.म्हणजेच या संस्थेमध्ये सरकारचा कसल्याही प्रकारचा सहभाग नसतो ही संस्था स्वतः च्या वतीने कार्य करत असते.(एन.जी.ओ.) अशा संस्थामुळे गोरगरीब असंघटीत अशिक्षित लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम निस्वार्थीपणे एकनाथ आवाड यांनी मानवी हक्क अभियान संघटनेद्वारे राज्यात नव्हे तर देशभरात उभे केले होते.
आदरणीय रमेश रंगारी यांच्यामुळे आदरणीय जे.एस.पाटील स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना सल्लागार यांनी वार्षिक दिवार्षिक अधिवेशन आणि कामगार मेळाव्यात असंघटीत समाजाला संघटीत करणारे नेते म्हणून मी सागर तायडे,जिजा ॲड.एकनाथ आवाड आणि डॉ.रूपाताई बोधी यांना अनेक कार्यक्रमात एकत्र आणले होते.त्यामुळेच मी सी.एफ.टी.यु.आय,आयटक,इंटक आणि सिटू सोडून स्वतंत्र मजदूर युनियन (आय.एल.यु) शी जोडल्या गेलो.असंघटीत समाजाला कामगार म्हणून संघटीत करण्याचे काम जिजा सोबत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा कार्यकर्ता आज ही माझा सोबत जोडलेला आहे.
मागासवर्गीय आदिवाशी भटक्या समाजाच्या न्याय हक्क व प्रतिष्ठेसाठी लढणाऱ्या नेत्यात एकनाथ आवाड हे नांव प्रथम क्रमांकाने येते.एकनाथ दगडू आवाड यांचा जन्म १९५० किंवा १९५१ साली बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील दुकडेगावातील (डुकरेगाव) एका गरीब मातंग समाजात झाला होता. त्यांचे कुटुंब पोतराज होते. एकनाथांच्या वडिलांचे नाव दगडू तर आईचे नांव भागूबाई होते. शिक्षकांनी शाळेत दाखल करताना १९ जानेवारी १९५६ ही तारीख लिहिल्यामुळे तीच त्यांची अधिकृत जन्मतारीख झाली.घरात खायला दाणा नाही, वडील मागून आणतील त्यावर गुजराण करावी लागे. एकनाथाने पोतराजच व्हावे अशी वडिलांची इच्छा होती,पण आईने कडाडून विरोध केल्याने त्यांना शाळेत जायला मिळाले. शाळेत मागच्या बाकावर बसूनच ते शिकले.एकनाथांनी घर सोडले,अंगमेहनत करून पैसे मिळवले आणि शिक्षण घेतले.एकनाथ आवाड ऊर्फ जिजा (जीजा) यांचे शालेय शिक्षण लऊळ येथे झाले तर महविद्यालयीन शिक्षण बीड आणि अहमदनगर येथे झाले. अहमदनगर येथील कॉलेजातून त्यांनी एल.एल.बी.केले.मागासवर्गीय समाजांना न्याय हक्क व अधिकार मिळवीन देण्यासाठी त्यांनी एकीकडे एम.एस.डब्ल्यू.ही पदवी मिळवली. आणि दु्सरीकडे समाजाला प्रत्येक घटनेसाठी न्यायालयीन लढाई लढण्यासाठी वकील लागतो म्हणूनच ते वकीलही झाले.
वडिलांचे केस कापून आवाड यांनी पोतराज प्रथेवर पहिला घाव घातला.घरातूनच संघर्ष सुरू करून त्यांनी पोतराजाच्या प्रथेतून शंभराहून अधिक कुटुंबांची सुटका केली.शिकत असतानाच एकनाथ आव्हाड विद्यार्थी चळवळीत उतरले,विवेक पंडित यांच्या "विधायक संसद" नावाच्या युवकांच्या संघटनेत गेले आणि अस्पृश्यता आणि जातीभेद याविरुद्ध त्यांनी जनजागृती करून रान पेटवले.त्यांनी १९८० पासून वेठबिगार,पोतराज आदी प्रथांविरुद्ध लढा देणे सुरू केले होते. भूमिहीन दलितांना गायरान जमिनी ताब्यात घेऊन कसायची हिंमत दिली.मराठवाड्यात त्यासाठी त्यांनी गायरान परिषदा घेतल्या.भूमिहीन महिलांचे त्यांनी बचत गटाची त्यांनी स्थापना केली होती.सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट स्थापून महिलांना पतपुरवठा केला.मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत या ट्रस्टचे काम चालते. २०१५ सालापर्यंत या ट्रस्टची उलाढाल दहा कोटी रुपयांवर पोचली होती.
१९९० साली त्यांनी मानवी हक्क अभियानाला सुरुवात केली.संगम नावाच्या गावात त्यांनी मानवी हक्क अभियान संघटनेची शाखा स्थापन केली.२००१ साली युनोने आयोजित केलेल्या वंशभेदाविरोधातील परिषदेला एकनाथ आवाड यांनी हजेरी लावली होती. भारतात अजून जातिभेद नष्ट झाला नाही असे त्यांनी तेथे ठासून सांगितले होते.पुढे जिनिव्हा येथील मानवी हक्क संरक्षण संमेलनातही एकनाथ आवाड यांनी "जातिप्रथेला हद्दपार करण्याची" त्यांची आग्रही भूमिका मांडली होती. त्यांनी उर्वरित सर्व आयुष्य चळवळीसाठी वाहिले होते.'मानवी हक्क अभियान' या चळवळीच्या माध्यमातून एकनाथ आवाड यांनी मराठवाड्यातील सुमारे पन्नास हजार मागासवर्गीय एस सी,भटक्या समाजाच्या जमिनी संघर्ष करून वाचविल्या होत्या.त्यांच्या या मानव हक्क अभियानामुळे मागासवर्गीयांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळाले.गुलामीची प्रतीके असलेली गावकीची कामे दलितांनी सोडावीत आणि आत्मसन्मानाने जगावे त्यासाठी खेडे सोडा शहर गाठा हा बाबासाहेबांनी दिलेला संदेश हाच एकनाथ आवाड यांचं मानव हक्क अभियान चळवळींचा उद्देश होता. त्यासाठी त्यांनी दोन्ही पातळीवर एक सनदशीर,तर दुसरा रस्त्यावरचा सतत संघर्ष केला. या संघर्षातूनच 'जग बदल घालुनि घाव' हे त्यांचे आत्मकथन जन्माला आले. त्यांचे हे पुस्तक मागासवर्गीय समाजाच्या न्याय हक्क व प्रतिष्ठेसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यासाठी आणि चळवळीसाठी मार्गदर्शक ठरले आहे. मागासवर्गीय आदिवासी भटक्या जाती जमातीच्या समाजाच्या जातीसाठी काम केल्या पेक्षा त्यांना असंघटीत कष्टकरी कामगार म्हणून संघटीत केल्यास त्यांना शिक्षण,रोजगार आणि आरोग्य विषयी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनाचा लाभ मिळवून देता येईल. मानवाला सहा मुलभूत अधिकार मिळाले पाहिजेत.मग ते कोणत्याही जातीचा असो त्याला असंघटीत कामगार म्हणून नांव नोंदणी करून घेता येतील.पण या मागासवर्गीय लोकांची नांव नोंदणी होऊच नये अशी प्रशासकीय मनुवादी यंत्रणा गावातील ग्रामसेवक ते सचिवालयातील सचिवा पर्यंत काम करते.बाबासाहेबांनी शासन कर्ती जमात बना असे का सांगितले होते, त्याचा अभ्यास मानवाला हक्क मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे.तरच एकनाथ आवाड यांचे अपुरे कार्य पुढे नेता येईल.
एकनाथ आवाड यांच्या कामावर वेगवेगख्या संशोधकांनी ५ पुस्तके लिहिली आहेत. २७ जणांनी त्यांच्या कार्यावर पीएच.डी.साठी प्रबंध लिहिले आहेत.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या एकनाथ आवाडांनी यांनी २ ऑक्टोबर २००६ रोजी बौद्ध धम्माचा स्वीकार करून अनेकांना बौद्ध धम्मात आणण्याचे ऐतिहासिक काम केले आहे. त्यासोबतच भटक्या जाती जमातीतील पारधी आणि इतर गुन्हेगारी जमात असा ठपका असलेल्या जातीतील कुटुंबाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले.अशा असंघटीत कष्टकरी समाजाला सुशिक्षित व संघटीत करणारे जिजा.एड.एकनाथ दगडू आवाड मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या ६७ व्या जयंती दिनानिमित्याने त्यांच्या प्रतिमेला आणि कार्याला कोटी कोटी प्रणाम.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा