बुधवार, १८ जानेवारी, २०२३

प्रा.जोगेंद्र कवाडे सरांची भिमशक्ती युती कोणासाठी? कशासाठी?..

 प्रा.जोगेंद्र कवाडे सरांची भिमशक्ती युती कोणासाठी? कशासाठी?..


      देशात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची  सामाजिक,सांकृतिक,शैक्षणिक धार्मिक आणि राजकीय चळवळ आहे. तिला मानणारा ८५ टक्के समाज देशपातळीवर आहे.समाजाची संख्या मोठी आहे म्हणूनच तो असंघटीत म्हणून गणल्या जातो.परंतु ते सर्व राजकीय पक्षासाठी लक्षवेधी असतात. निवडणुका जवळ आल्या कि कार्यकर्त्याचे व नेत्याचे महत्व वाढते.कारण त्या समाजाचे काम करणारे कार्यकर्ते आणि नेते स्वार्थी असल्यामुळे ते कधीच एकत्र येऊ शकत नाही,असा त्यांना शाप आहे असे म्हणतात. 
     महाराष्ट्र राज्यातील आंबेडकरी चळवळीतील एक लढाऊ नेते जोगेंद्र लक्ष्मण कवाडे हे एक भारतीय राजकारणी,समाजसेवक,माजी प्राध्यापक व पीपल रिपब्लिकन पक्षांचे  संस्थापक व अध्यक्ष आहेत. ते चिमूर लोकसभा मतदारसंघातुन १२ व्या लोकसभेवर निवडून गेले होते. १९९८ ते १९९९ लोकसभा सदस्य होते.नंतर ते जून २०१४ ते २०२० पर्यंत महाराष्ट्र विधान परिषद सदस्य होते.त्यांची भिमशक्ती युती काही वर्ष कॉंग्रेस सोबत होती. आता ती नुकतीच नामांतर ठरावाला विरोध करणाऱ्या बाळासाहेब ठाकरेची शिवसेना चालविणाऱ्या आणि मनुवादी हिंदुत्व मान्य असणाऱ्या मराठा शिंदे शक्ती आणि त्यांच्या चाळीस साथीदारांच्या कट्टरपंथीय हिंदुत्व शिवशक्ती बरोबर प्रा.जोगेंद्र कवाडे सरांची भिम शक्तीची राजकीय युती झाली आहे.त्यामुळे राज्यात एक वैचारिक आणि स्वार्थी राजकारणाची उलथापालथ सुरु झाली आहे.
     प्रा.जोगेंद्र कवाडे सरांचा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात महत्त्वपूर्ण सहभाग होता,या दरम्यान त्यांनी काढलेल्या ऐतिहासिक लॉंगमार्चचे ते प्रणेते ठरले होते. कवाडे हे मागासवर्गीय एस सी -बौद्ध चळवळीतील एक उल्लेखनिय सामाजिक कार्यकर्ते आहेत.जन्मप्राप्त अभावग्रस्त परिस्थितीतून कवाडे यांनी सामाजिक परिवर्तनासाठी काम केले. ते आंबेडकरी चळवळीतील जहाल नेते म्हणूनच प्रसिध्द आहेत.व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते व कट्टर आंबेडकरवादी आहेत.रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर मध्ये ते वाणिज्य विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. नागपूर येथून १९७२ पासून निघणाऱ्या जय भीम या मराठी साप्ताहिकाचे ते संपादक व प्रकाशक होते, याशिवाय त्यांनी अनेक मासिकांमध्ये व दैनिक वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिलेले आहेत. १९७६ मध्ये त्यांनी बौद्धांच्या (१९५६ नंतरचे धर्मांतरित बौद्ध; विशेषतः नवबौध्द ) सवलतीसाठी आंदोलन केले होते, त्यासाठी तिहार कारागृहात त्यांना दहा दिवस कारावासाची शिक्षा झाली होती. मराठवाडा विद्यापीठाच्या (सध्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) नामांतरासाठी त्यांनी ११ नोव्हेंबर १९७९ रोजी हजारो आंबेडकरवादी तरूणांना एकत्र घेऊन दीक्षाभूमी नागपूर ते औरंगाबाद 'लॉंगमार्च' काढला होता. त्यांच्या या तीव्र आंदोलनाची दखल महाराष्ट्र सरकारला द्यावी लागली होती. १९८२ मध्ये त्यांनी दलित मुक्ती सेनेची स्थापना केली होती. अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून नेतृत्वही केले आहे. कवाडे हे माजी खासदार आहेत, ते काँग्रेस रिपब्लिकन आघाडी चे उमेदवार म्हणून १९९८ मध्ये रिपब्लिकन ऐक्याचे लोकसभा उमेदवार म्हणून चिमूर लोकसभा मतदारसंघातुन तिकिटावर निवडून आले होते. मात्र पुढे रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य फुटले आणि प्रत्येक नेत्यांनी आपला पक्ष स्थापन केला.प्रा जोगेंद्र कवाडे त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली,जो भारतीय काँग्रेस पक्षाच्या आघाडीतील एक घटक पक्ष होता.
      महाराष्ट्र राज्यात आंबेडकरी चळवळीत एकशेएक धुरंधर राष्ट्रीय नेते (स्वताचा मतदार संघ नसलेले,एक,दोन अपवादात्मक ) आहेत.ते रिपब्लिकन ऐक्यासाठी नेहमीच तयार असतात.समोर गर्दी दिसली की ते प्रत्येक वेळी काही तरी लक्षवेधी घोषणा करीत असतात.नेत्यांचे व समाजांचे ऐक्य राहण्यासाठी जीव देण्यासाठी तयार असतात,आणि ऐक्यातून कोणी फुटून बाहेर पडला तर त्याला उद्याचा सूर्य दिसू देणार नाही अशी लाखोंच्या जनसागरा समोर शिवाजी पार्क दादर मुंबई येथे भिमप्रतिज्ञा घेणारे लॉग मार्च प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे सरांची भिमशक्तीची युती असंविधानिक मुख्यमंत्री असलेल्या पक्षाच्या बरोबर राजकीय युती केली त्यानिमित्ताने आत्मचिंतन करणारा लेख लिहत आहे.
     मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नांव देण्यासाठी सरांनी जीवाचे रान केले.ऐतिहासिक लॉग मार्च काढला.नामांतर कृती समिती ते दलित मुक्ती सेना,व्हाया दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ असा सामाजिक राजकीय प्रवास झाला आहे. प्रा जोगेंद्र कवाडे सरा सारखा निर्भीड,निःपक्षपाती,प्रामाणिक लढाऊ झुंजार नेता महाराष्ट्र राज्यात नव्हे तर भारतात असूच शकत नाही, एवढा आत्मविश्वास भिम सैनिकांना वाटत होता. महाराष्ट्रात ३३ जिल्हे असतांना सरांना सतरा जिल्हे बंदी असणे म्हणजे गिनीज बुकात नोंद असणारा एकमेव नेता असावा असा माझा व भिमसैनिकांचा तेव्हा समज होता. तेव्हा त्यांचे भाषण आम्ही भिम सैनिक कान देऊन मन शांत ठेऊन ऐकत होतो. त्यांचे भाषण ऐकले की अंगावरचे केस ताठ उभे राहायचे.म्हाताऱ्यांच्या अंगातील रक्त तरुणांप्रमाणे सळसळत असे. त्यांचे भाषण ऐकून तरुण भिमसैनिक मुठी आवळून घोषणांनी आकाश पातळ दणाणून सोडत असत.तेव्हा पासुन भिमसैनिक सरांची धडा शिकविण्याची भाषा ऐकतो.आज पर्यत त्यांच्या प्रत्येक सभेत मोर्चात,सर जातीवाद्यांना सत्ताधाऱ्यांना,मायबाप सरकारला धडाच शिकवत आहेत.रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यातून बाहेर पडल्यास उद्याचा सूर्य दिसू देणार नाही,शिवाजी पार्क मधील जाहीरसभेतील एका सरसेनापतीच्या भिमप्रतिज्ञेचे काय झाले?. असे आजची आंबेडकरी चळवळीतील मुलंमुली भिम सैनिक,कार्यकर्ते विचारतात.
      नामांतराच्या लढाईत अनेकांना धडे शिकविण्याच्या भाषेनेच खेड्यापाड्यातील गोरगरीब असंघटित मजुरांचा आई बहिणीची इज्जत लुटायला लावली. अनेक गावांतील महारवाडे, बौद्धवाडे,माणसांसह जाळून टाकण्यास भाग पाडले.कारण प्राध्यापकांची भाषाचं कायम सत्यानाश करणारी होती. जातीवाद्यांच्या ढुंगणावर भीमटोले मारणारे, सत्ताधाऱ्यांचे धोतर पिवळे करणारे प्रा.जोगेंद्र कवाडे कुठेच दिसले नाही.एकीकडे ही जहाल भाषा असतांनाच दुसरीकडे नामांतरासाठी ह्या प्राध्यापक कवाडे मेला तरी चालेल, त्याचे तुकडे तुकडे केले तरी चालतील,पण नामांतर झाल्याशिवाय राहणार नाही. असे बेंबीच्या देठापासून सांगणारे प्रा.कवाडे सरांनी लाखो भीमसैनिकांना भक्त बनविले होते.पण भिमाच्या क्रांतिकारी विचारांचे शंभर सैनिक बनवू शकले नाही. भक्तांचे सेनापती होता येते.शिष्यांना सैनिकांना शिस्त लावण्यासाठी सेनापतीला शिस्त लागते.सैनिकांना शिस्तबद्ध पालन देण्यासाठी बौद्धिक शक्ती लागते.शत्रूवर हल्ला करण्याचे प्रशिक्षण द्यावे लागते. प्राध्यापक कवाडे सर आपण ते भीमसैनिकांना काहीच देऊ शकला नाही.राजकीय पक्ष स्थापन केल्यावर एकही मतदारसंघ बांधला नाही.मतदारांच्या किंवा मतदारसंघातील आपल्या मतदारांच्या मुलभूत समस्या जाणल्या नाही.त्यामुळे ते सोडविण्याचा प्रश्न आपल्याला पडला नाही.आपला समाज बांधव कसा जगतो?.काय काम करतो?.त्यांची माहिती घेतली नाही.सर नागपूर महानगरपालिकेत येवजदार कामगार कोणाला म्हणतात त्यांची माहिती घेऊन त्यांच्यासाठी आज पर्यंत कोणी काय केले.याकडे आपले राष्ट्रीय अध्यक्ष असतांना कधीच लक्ष कसे काय गेले नाही. आंबेडकरी चळवळीतील राजकीय नेत्यांना याबाबत काहीच कसे वाटत नाही.याचे मला आश्चर्य वाटते. हेच भिमशक्तीची युती आघाडी करणाऱ्या नेत्या बदल माझे चिंतन आहे.
      नामांतरासाठी लढणाऱ्यांना शेवटी प्रथम दिलेल्या जोडनांवावर म्हणजेच नामविस्तारा वरच समाधान मानावे लागले. मग एवढा रक्तपात घडविण्याची गरज काय होती?. नामांतराच्या चळवळीत मागासवर्गीय एस सी समाजाचे कोणते प्रबोधन आपण केले?. शांती, समता,बंधुभाव,निर्माण करण्या ऐवजी आपण कायम शिवीगाळ,सत्यानाश,धडा शिकवू, जाळून टाकू या शब्दांचे बॉम्बगोळे आपण भाषणांतून भोळ्याभाबड्या एस सी मागासवर्गीय समाजावर फेकत होता.त्यामुळेच तो असंघटित मजूर समाज पेटून उठायचा,त्यामुळेच गावा गावांतील वातावरण ढवळून काढले जात होते. गावा बाहेर राहणाऱ्या समाजाने गावात राहणाऱ्या समाजाला धडा शिकवला नाही तर गावांच्या आत राहणाऱ्या समाजाने जय भवानी,जय शिवाजी घोषणा देऊन गावा बाहेर राहणाऱ्या समाजाला धडा शिकवला,म्हणूनच तो सत्ताधारी झाला.हा इतिहास आपल्या जहाल भाषणांनी घडविला असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही.
      महाराष्ट्र राज्यातील ३३ जिल्ह्या पैकी सतरा जिल्ह्यात प्रवेश बंदी यांचे आम्हाला भिम सैनिकांना खूप कौतुक व गर्व वाटायचे.परंतु भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांने संविधानाच्या पाना पानांवर लिहून ठेवले होते,की ज्याच्या भाषणामुळे,वागण्यामुळे दोन समाजात शांतता भंग पावत असेल ज्या व्यक्तीमुळे दोन समाजात जातीय दंगल होण्याची शक्यता असेल अशा व्यक्तीला जिल्ह्यात सभा घेण्याची,भाषण करण्याची बंदी घातली पाहिजे. कायद्यानुसार १४४ कलम लागु करून पोलीसांना त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागते.सांगा पोलीस कोणाच्या नियमांचे पालन करीत होते. कशासाठी आपल्याला प्रवेश बंदी होती. तेव्हा आम्हाला भिम सैनिकांना कळत नव्हते, भारतीय संविधान कधी वाचलेच नव्हते.इतिहास वाचला तर इतिहास घडविला जातो.
     डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्रत्येक आंदोलन सत्याग्रह शांततेत व कायदेशीर मार्गाने होत होती.एका बाजूला समाजाचे प्रबोधन दुसऱ्या बाजूला कायदेशीर सनदशीर मार्गाने पत्रव्यवहार करून संघटित पणे लढाई असायची.रस्त्यावरच्या लढाईत ते कमी पडले असतील तरी कायदेशीर लढाईत ते कुठेही कमी पडले नाही,कारण त्यांचा मूकनायक,प्रबुद्ध भारतातील लोकांचा सरसेनापती विधाविभूषित कायदेपंडित डॉ.बाबासाहेब आंबेडकर होता.       नामांतर चळवळीतुन तयार झालेले सरसेनापतीनी दलितांना मुक्त करण्यासाठी सेना निर्माण केली होती.परंतु खेड्या पाड्यातील असंघटित शेतमजूर,वीट भट्टी कामगार,खडी फोडणारा कामगार,शहरातील झोपडपट्टीत राहणार असंघटित कष्टकरी नाका कामगार, इमारत बांधकाम कामगार,घरकामगार,कचरा वेचक,सफाई कामगार यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे तेव्हा ही कृती कार्यकर्म,योजना नव्हत्या आणि आजही नाहीत.समाजांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेकडे, नेत्याकडे अभ्यासपूर्ण योजना असाव्या लागतात. त्या सोडविण्यासाठी राजकीय पक्षा बरोबर युती आघाडी करावी लागते.म्हणूनच जाहीरपणे विचारतो प्रा.जोगेंद्र कवाडे सरांची भिमशक्ती युती कोणासाठी ?. कशासाठी आहे?.
     मागासवर्गीय समाजासाठी राज्य व केंद्रांच्या योजना फक्त कागदावर असतात. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याकडे ठोस उपाययोजना कार्यक्रम असावा लागतो.त्याचा अभ्यास आपण तेव्हा ही केला नाही आणि आज ही करत नाही.फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव घेऊन जय जयकर करून त्यांना मानणाऱ्या समाजाला भिमसैनिकाला  भावनिक करून राजकीय भांडवल करण्याची कला आपल्या कडे आहे.त्यावरच राजकीय पोळी भाजण्याचे काम भिमशक्तीच्या नांवावर युती म्हणून चालली आहे.
      डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना देऊन ठेवल्या आहेत,त्यांचा अभ्यास करून त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आपल्याला  उभी केली पाहिजे. तरच आपण रिपब्लिकन पक्षाच्या विचारधारे नुसार सर्वांना समान न्याय मिळवून देऊ शकतो.रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यातून चार महान नेते खासदार झाले,त्यावेळी रिपाईने लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के विजय मिळवला होता.असा इतिहास लिहला गेला आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीत चार नेते चार दिशेला गेले आणि इतिहास पुसून टाकला.सर आपण निर्भीड,निःपक्षपाती प्रामाणिक सरसेनापतीचा होता हा इतिहास आपणच आचरणाने पुसून टाकला आहे.असे माझे व्यक्तिगत मत आहे. 
     शरद पवार यांनी नामांतर ठराव मंजूर केला पण अंमलबजावणी केली नाही,त्यांच्या विरोधात सोळा वर्ष जनआंदोलने केली,त्यांनीच शेवटी तडजोड करून नामविस्तार केला. त्यांच्या आशीर्वादाने आपण खासदारांचे विधान परिषदेत आमदार झाला.राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना खाली तालुख्याचा नेता बनवून ठेवले.खासदार आमदार बनत नाही, मुख्यमंत्री होणार असेल तर चालते.कारण तो राज्याचे नेतृत्व करतो. विधान परिषदेत असलेला आमदार राष्ट्रीय नेता नसतो, त्याने ती संधी आपल्या पक्षातील दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नेत्या दिली पाहिजे होती. त्यासाठी गोपाळराव,रमाकांत,बाबुराव, अशांतभाई,चिंतामण,या ही पेक्षा एकशे एक तानसेन होते ज्यांनी तुम्हाला सुरवात पासून शेवट पर्यंत जीवाला जीव लावून मदत केली होती.त्यांनाच आपण धडा शिकवला.सर काल पर्यत सर्वांना धडा शिकवला पण पाठांतर घेतले नाही. म्हणूनच आज भिमसैनिकांना त्यांची शिक्षा मिळत आहे. "संघटनेची ताकद ही केवळ सभासदांच्या संख्येवर अवलंबून नसून,ती सभासदांच्या प्रामाणिकपणावर संघटनेच्या एकनिष्ठतेवर आणि शिस्तपालनावर अवलंबून असते." असे विश्वरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांनी वेळोवेळी सांगितले होते.   
      नामांतर चळवळीत ज्यांच्या घरदारांची राख रांगोळी झाली ते कोण होते?.ते तेव्हा ही असंघटित मजूर,शेतमजूर,कामगार होते आणि आज ही आहेत.त्यांचा वापर आपण फक्त राजकारणासाठी केला आणि करीत आहात.त्यांच्या करीता अनेक कल्याणकारी योजना आहेत त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काय काम केले.यांचे ताळेबंद आपण भिमशक्तीचे नेते म्हणून सरकार समोर मांडावे.मतदार संघात भिमसैनिक राहतात त्यांच्या कोण कोणत्या समस्या आहेत.कोणत्या समस्या जन आंदोलने करून सनदशीर मार्गाने पत्र व्यवहार करून सोडविल्या आणि आता कोणत्या समस्या बाकी आहेत.त्या सोडविण्यासाठी प्रा.जोगेंद्र कवाडे सरांच्या भिमशक्तीने मनुवादी हिंदुत्व मान्य असणाऱ्या मराठा शिंदे शक्तीला मतदार म्हणून मतदान करावे.म्हणूनच ही भिमशक्ती युती कोणासाठी,कशासाठी?. भिम सैनिकांनी यांचा गांभीर्याने विचार करावा. 
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,
भिम सैनिक,भांडूप,मुंबई.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा