आमचा वंश,आमची धर्म,आमची संस्कृती आणि आमचा नाग लोकोत्सव!
प्राचीन तथागत महामानव गौतम बुध्दांच्या मुर्तीमागे फडी काढलेल्या नागाचे शिल्प दिसते. विशेषतः अनेक तोंडाचाही नाग दाखवला आहे. यामध्ये सात तोंडाचा म्हणजेच फडीचा नाग बुध्दांच्या डोक्यावरील बाजूस दिसतो. जेव्हा सिध्दार्थ गौतम दुःखाचा शोध घेण्यासाठी ध्यान साधनेला जंगलात बसले होते, तेव्हा सात नागलोकांनी त्यांचे संरक्षण करण्यासाठी पहारा दिला होता,असा इतिहास सांगितला जातो.प्राचीन काळी मनुष्यप्राणी आजच्या धर्म,पंथ,जातीत विभागायच्या अगोदर त्यांची ओळख पशु व प्राण्यांच्या वर्तवणुकीतून निश्चित केली जात होती. त्यास वंश म्हटले जात. शाक्य कुलवंतस गौतम बुध्द यांच्या घराण्याला हत्तीकुळातील किंवा हत्तीवाणातील म्हटले जात होते. म्हणूनच त्यांच्या घराण्यात हत्तीला सर्वोच्च मान दिला जात होता. जेथे शाक्यांची पवित्र वारसास्थळे,स्मूतिस्थळे होती तेथे हत्तीची मुर्ती दिसते.काही इतिहासकारांच्या मते, बुध्दांच्या डोक्यावर नाग शिल्प असल्याने ते नागवंशीय होते.पण त्यांच्या राजवाड्यात पांढर्या हत्तीचे शिल्प रेखाटले होते. ते घराणे हत्तीची आदरपुर्ती पूजा करत होते.बुध्दांची आई महामाया यांच्या मुर्तीच्या डोक्यावर नाग शिल्प नाही,पण दोन हत्ती दिसतात. बुध्दांच्या डोक्यावर नाग शिल्प असणे हे अपवाद असू शकतो.बुध्दवंशातील हे हत्ती की नागवंशातील हा मुद्दा कायम वादातीत राहणार आहे.
ज्या वारसा स्थळे,स्मृतिस्थळात व्यक्ती मुर्तीच्या डोक्यावर नाग हे शिल्प दाखविण्याच्या मागचे कारण म्हणजे ती व्यक्ती नाग समाजातील असल्याची ओळख दर्शवते.ती व्यक्ती म्हणजेच नागलोकांचे संरक्षण,दैवत होते.म्हणूनच नागलोक त्यांना वंदन करणेसाठी त्यांच्या पवित्र स्थळांना भेटी देत असत.तिर्थाटणे करत असत.कोल्हापुरात अंबाबाईचे वारसास्थळ/स्मृतिस्थळ आहे.तिच्या मुर्तीवर नागाचे शिल्प आहे.यावरून अंबाबाई नागवंशीय आहे हे स्पष्ट होते. म्हणजेच अंबाबाई ही कोणी देव नाही.वीरमाता आहे. म्हणूनच नागलोकांनी उपकारप्रित्यर्थ तिचे स्तृतिस्थळ/वारसास्थळ उभारले. आज अंबाबाईवरून जैन व बौध्दांच्यामध्ये श्रेयवाद आहे. मनुष्याला विविध पशु व प्राण्याची ओळख दिली गेली ती ओळख पुढे ती धर्म,पंथ व जाती विभागल्यानंतरही ओळख पुसली गेली नाही. म्हणूनच जैन धर्मातील मंदिरामध्येही व्यक्ती मुर्तीच्या डोक्यावर नाग हे शिल्प दिसते. विविध धर्म,पंथ व जातीत विभागलेल्या मूळनिवासी व्यक्ती डोक्यावर नाग दिसतो. पुर्वीचे नागवंशीय असलेला महार समाज ज्या ठिकाणी राहतो तिथवर महाराष्ट्र. म्हणजेच महाराष्ट्राची सीमा मानली जाते. तसे जम्बुद्विप भारताची सीमा हे नागवंशीयांच्या वस्ती ठिकाणावरून ओळखली जाते. परकीय आर्य हे गायवंशीय म्हणून ओळखले जातात. म्हणूनच त्यांना गाय प्राणी पूज्यनिय असावी. जे आपल्याला प्रिय ते दुसर्यालाही प्रिय असले पाहिजे, अशा मानसिकतेचा मनुष्य असतो. कदाचित परकीय आर्य नेहमीच ऐनकेन प्रकारे गाईला इथल्या मूळनिवासींच्या माथी मारताना दिसतो. गाईच्या पोटात 33 कोटी देव असल्याची कथा परकीय आर्यांनी रचली. देवताळे बहुजनातील पुरूषसह व महिला गाईचा मुत्र हे द्रव्य तिर्थ म्हणून पितात. गाईचेच मुत्र का? ज्या गाईचा जन्म बैलामुळेही झाला असताना त्याचे मुत्र का चालत नाही? या पृथ्वीतलावर मनुष्य हे स्वतःचाही मुत्र प्राशन करणारे आहेत. पृथ्वीवरील मनुष्यासह प्रत्येक पशु व प्राण्यांच्या मुत्रामध्ये औषधी गुणधर्म आहे. जे कुणाच्या तरी विशिष्ट आजारावर जालीम ठरलेले आहे. सांगण्याचे तात्पर्य की, गाय कुळातील परकीय आर्यानी आपली गाय इतरांना स्वीकारायला लावली असल्याचे दिसून येईल.
मूळनिवसींना आपल्याा नागवंशीय नागलोकांच्या शौर्याचा जाज्ज्वल इतिहास समजून घेवून नागलोकांची संस्कृती स्वीकारली पाहिजे. नागलोकांचा इतिहास परकीय आर्यांच्या रामायण,महाभारत ग्रंथातूनही सांगितला आहे.रामायणातील राजा रावणाचा पुत्र मेघनाथ याची पत्नी सुलोचना ही नागराजा वसू याची मुलगी असल्याचा उल्लेख आहे. महाभारत ग्रंथातील भीमाला त्याचे सावत्र बंधू कौरव बेशुध्द करून पाण्यात फेकतात तेव्हा नागलोक भीमाला वाचवतात.जेव्हा कौरव बंधू पाच पांडवाना जमीन देण्यास नकार देतात,तेव्हा पांडव इंद्रप्रस्थ जमीनीचे मालक असलेल्या नागलोकांच्या जमीनीवर कब्जा करतात.तेव्हा नागलोक व पांडवामध्ये युध्द झाले होते. कौरव व पांडवाच्या युध्द हे अंतर्गत वाद असल्याने परकीयांनी भावाच्या भांडणात पडू नये असे कर्णाने नागलोकांना सांगितल्याचाही उल्लेख महाभारत ग्रंथात आढळतो. ईशान्य भारतातील जी प्रदेश आहेत त्यातील अनेक प्रदेश स्वतंत्र भारतात नव्हती. मणिपूर,सिक्कीम ही स्वतंत्र राष्ट्रे होती. नंतर भारतात विलिन झाली आहेत. या राज्यातही नागवंशीय समाज आहे. नागालँड (नागवस्ती) नावाचे स्वतंत्र राज्यच ईशान्य भारतात आहे. महाराष्ट्राचे दोन टोक आहेत. त्यातील एक कोल्हापूर व दुसरे टोक नागपूर. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी नागपूर हे नागवस्तीचे ठिकाण आहे म्हणूनच त्या ठिकाणी 1956 ला आपल्या धम्म दीक्षाचा कार्यक्रम घेतला. नागपूरप्रमाणे कोल्हापूरची राजधानी ही नागभूमी होती. नागभूमीमध्ये कोल्हापूर येत होते. ‘करवीर महात्म’ या प्राचीन ग्रंथात त्याचे उल्लेख आहेत. आजच्या पन्हाळ्याचे मूळ नाव पन्हघालय होते. ‘पन्ह’ म्हणजे नाग आणि ‘आलय’ म्हणजे वस्ती किंवा भूमी. म्हणजेच नागभूमी. हिच नागभूमी राजधानी होती. दुसर्या शतकात राजा भोज व नंतर राजा शीलाहार यानी नागभूमीत किल्ला बांधला. त्या किल्ल्याचे नावच ‘नागकिल्ला’ आहे. त्यालाच आज ‘पन्हाळा किल्ला’ म्हणून ओळखला जातो. किल्ल्याची देखरेख नागलोक करत असल्याचे करवीर महात्ममध्ये उल्लेख आहे. कोल्हापुरात अनेक ठिकाणी बौध्द संस्कृतीची ओळख असलेल्या लेणी व गुहा आहेत. नागठाणे सारखी गावांची नावे ही नाग लोकांची वस्ती असल्याचा पुरावे देतात. प्रसिध्द ब्राम्हण लेखक-इतिहासकार वि का राजवाडे यानीही महाराष्ट्रात नागवंशीयांची सर्वाधिक वस्ती असल्याचे म्हटले आहे. अजंठा व वेरूळमधील बौध्द लेण्या सातवाहन राजानी बांधल्या. सातवाहन घराण्याचे 23 बौध्द राजा होवून गेल्याचे सांगितले जाते. हे सर्व राजे नागवंशीय बौध्द होते.
नागलोकांची आणखीन महत्वाची एक ओळख म्हणजे त्यांच्या नावापुढे किंवा मागे नाग हा शब्द जोडला आहे. ‘नाग’ या शब्दाचा अपभ्रंश होवून ‘नाक’ असाही शब्द प्रचलित झाला. पण ‘नाक’ म्हणजेच ‘नाग’ हे ध्यानात घेतले पाहिजे. नागलोक हे अत्यंत कर्तृत्वान व शौर्यवान असल्याचे ब्रिटीश काळातही पहावयास मिळाले आहे. 21 सप्टेंबर 1810 रोजी फ्रेंचच्या लढाईत शौर्य गाजवलेल्या धोंडनाक पुंडनाक या नागवंशीय शूरास चांदीचे पदक देवून गौरवले होते. 13 जानेवारी 1897 ला ‘व्हिजीयंट’ या ब्रिटीशांच्या जहाजावर गल्फ ऑफ कच्छ हे भूशीर पार करताना शत्रूंच्या चार जहाजांनी हल्ला केला होता. तेव्हा हवालदार मंदनाक एसनाक यानी तो हल्ला परतावून लावण्याचा पराक्रम केला होता. त्यांच्या पराक्रमाबद्दल ब्रिटीशांनी त्यांचा चांदीचे पदक देवून उचित सन्मान केला होता. तत्पुर्वी छ.शिवाजी महाराज यांच्या रियासतमध्ये नागलोकांनी (आजचे महार जातीचे लोक) त्यांच्या किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेल्या चौक्यांची जबाबदारी चोखपणे सांभाळली होती. चौकीचा प्रमुख रामनाक होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानीही शुद्र पुर्वीचे नागवंशीय असल्याचे सांगितले आहे. नागवंशीयांच्या शौर्याचा अलिकडचा इतिहास म्हणजे 1 जानेवारी 1818 रोजीचा. ज्या परकीयांनी मूळनिवसींना गुलाम करून त्यांच्या गळ्यात लोटकं व ढुंगणाला खराटा बांधण्याइतपत घृणास्पद अमानवी जुलून, अत्याचार केला, त्या परकीय आर्यवंशीय पेशव्यांच्या विरोधात 500 नागवंशीय शूर सैनिकांनी (हे शूर नंतर हिंदू धर्मातील महार जातीत आढळतात) परकीय ब्रिटीशांची बाजू घेतली आणि भीमा कोरेगाव येथे 28 हजार पेशवा सैनिकांचा पराभव करून पुण्यातील विषमतावादी परकीय आर्यांची सत्ता उलथून टाकली. विजयाप्रित्यर्थ ब्रिटीशांनी सन 1923 ला भीमा कोरेगावात 75 फूट उंच विजयस्तंभ उभारला. त्या स्तंभावर विजयी नागलोक शूर सैनिकांची नाव कोरली आहेत.
सम्राट अशोक मौर्य यानी उभारलेले बौध्दांचे राज्य सम्राट अशोकांचे आठवे वंशज बृहद्रथ मौर्य यांचा खून करून परकीय आर्य शृंगवंशीय पुष्पमित्र शृंगाने ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्याने जम्बुद्विप भारतमुक्त बौध्द करण्याची मोहिम चालवली. त्यासाठी भिक्खूंची मुंडकी छाटणार्यांना भरघोस इनाम जाहीर केले. शृंगाने आपल्या धर्माचे शंकराचार्य पीठ उभारले. मनुस्मृती आणली. चातुर्वर्ण्यव्यवस्थेवर शिक्कामोर्तब केले. परिणामी नागवंशीय शृंगाच्या आजच्या नामांतरित झालेल्या हिंदू धर्मातील सुमारे साडे सहा हजार जातीत विभागले गेले. त्यातील एक जात म्हणजे महार. सम्राट अशोक काळात महार जातीचा कुठेच उल्लेख सापडत नाही. बौध्द काळात राजा मातंग होवून गेला. आज-कालचे काही लेखक त्या मातंग राजाला आजच्या मातंग/मांग जातीला जोडून तो राजा मांग/मातंग होता म्हणून आजही मातंग/मांग समाज आहे असे लिहितात. पण ते अक्षम्य चुकीचे आहे. 12 व्या शतकाच्या दरम्यान एक संत मातंग होवून गेले. त्या संताचे अनुयायी म्हणजेच आजचे मातंग. हा सांगितलेला इतिहास सत्य वाटतो. बौध्द काळातील राजांची नावे आजही बौध्द आपल्या वंशजांना देताना दिसतात. कदाचित बौध्द काळातील मातंग राजाचे नाव संत मातंगच्या आई वडीलांनी दिले असावे. तेव्हा महार समाजासह बहुजनातील इतर समाजानी जातीला चिटकवून राहू नये. जातीचा अभिमान बाळगता कामा नये. इतर अस्पृश्य जाती, भटके, भटके विमुक्त, ओबीसी, एसबीसी प्रमाणे महार जात ही देखील बाटलेली जात आहे. महार जातीवरही न पुसून येणारा गुलामाचा शिक्का बसलेला आहे. महार जातीच्या लोकांनी कितीजरी कर्तृत्व व शौर्य गाजवले तरी हिंदू धर्मातील उच्च जातीचे लोक त्याना कसलाच मान-सन्मान देणार नाहीत. उच्च जातीत घेणार नाहीत. ‘तुम्ही आमचे गुलाम आहात’ असेच म्हणणार. हे त्याचे म्हणणे काहीच गैर नाही. डॉ.बाबासाहेब गुलाम जातींच्या वस्ती नष्ट झाल्या पाहिजेत या मताचे होते. दि. 3 जानेवारी 1940 रोजी सातारा जिल्हयातील मेढे या गावी बाबासाहेबांची सभा झाली. त्या सभेत म्हणाले, ‘गावोगावचे महारवाडे आपण नष्ट करून टाकले पाहिजेत. प्रत्येक महारवाडा हा माणसांचा कोंडवाडा व गुलामवाडा होय.महार वतन व महारवाडा या दोन गोष्टी सनातन गुलामगिरीच्या द्योतक आहेत. त्या नष्ट झाल्याच पाहिजेत. स्पृश्यांनी या गोष्टी नष्ट करण्यास कितीही आडकाठी केली तरी त्या गोष्टी नवीन स्वराज्यात मी नष्ट केल्याशिवाय राहणार नाही.’ बाबासाहेबांना महार जातीचा अभिमान वाटत नव्हता. 12 जानेवारी 1936 रोजी पुण्यात झालेल्या कार्यक्रमातील भाषणात बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे म्हणतात, ‘मला स्वतःला महार जातीचा विशेष अभिमान वाटत नाही. मी केवळ त्या जातीत जन्मलो आणि माझ्या शिक्षणाचा व ज्ञानाचा फायदा आपल्या अज्ञ बांधवांना द्यावा म्हणून त्या जातीत प्रथम कार्याला सुरवात केली.’ म्हणून त्यानी तत्पुर्वी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे नामांतरित हिंदू धर्म सोडण्याची घोषणा करताना म्हणाले, ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही.’ याचा समान अर्थ असा ‘मी महार म्हणून जन्माला आलो असलो, तरी महार म्हणून मरणार नाही.’ बाबासाहेबांनी आपले बोल खरे करून दाखवले. सन 1956 ला त्यानी बौध्द धम्माची दीक्षा घेवून आपली मूळओखळ नागवंशीय असल्याचे कायमस्वरूपी रजिस्टर केली.
तेव्हा केवळ महारानीच नव्हे तर मांग,संत मातंग समाज,चांभार,चर्मकार,संत रोहिदास समाज,भंगी,संत म्हेत्तर समाज,ढोर,वीर ककय्या समाज, सर्व भटके जाती,जमाती समुह, आदिवासी जाती,जमाती समुह,कुणबी,लोहार,सुतार,कुंभार, लोणार,सोनार,कासार,धनगर, सनगर,न्हावी,शिंपी,परिट,धोबी,को ष्टी,कोळी,साळी,माळी,तेली,वाणी, तांबोळी या जातीतील लोकांनी आपण नागवंशीय आहोत हे ध्यानात घेतले पाहिजे. कामावरून जाती पाडल्या हे ध्यानात घेतले पाहिजे. नाग समाजाचा इतिहास शौर्याचा, कर्तृत्वाचा व स्वाभिमानाचा, देणेवालाचा आहे. जातीचा इतिहास अवमानकारक, दुराभिमानाचा, मागनेवालाचा आहे. जात ओलांडू नये असा दंडकच केला. त्यामुळे बहुजनांची प्रगती कुंटली. भारतीय संविधानातील कलम 15 मुळे धर्मातील मनुस्मृतीने लादलेली जातीवरील बंधने उठली गेली असली, तरी या जातीचे लोक हे मूळचे नागवंशीय आहेत हे ज्या काळात जाती नव्हत्या त्यावरून स्पष्ट होते. नागलोकांची स्वतंत्र द्विप होती. संस्कृती स्वतंत्र होती. राहणीमानी सुसंस्कृत होती. बुध्दांच्या धम्मामुळे निसर्गाला मानणारे व विज्ञानवादी उपासक होते. उत्सव/सण वेगळे होते. या उत्सवांपैकी पाच राजांचा नागलोक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात होता. ते पाच नागराजे म्हणजेच राजा अनंतनाग, राज वासुकीनाग, राजा तक्षकनाग, राजा करकोटकनाग व राजा ऐरावतनाग हे होय. या पाच नागराजानी नागवंशीय मूळनिवासींबरोबरच इतर प्रजेचे शत्रूपासून संरक्षण केले, त्यांच्यासाठी विविध योजना राबविल्या. धर्मनिरपेक्ष धोरण राबविले. म्हणूनच त्या पाच राजांचा नाग लोकोत्सव जम्बुद्विप भारतात साजरा होत होता. काही भागात विशेषतः महाराष्ट्रातील नागलोक या उत्सवाचा उल्लेख नागपंचमी म्हणून करत. आजही नागपंचमी उत्सवाच्या मंगलदिनी आपल्या दारात नागलोकांचे वाण असलेल्या नागाचे चिखल मातीने शिल्प काढून त्याची आदरपुर्ती पूजा करतात. बहुजन महिला पाच दिवस रात्रभर प्रबोधनात्मक गाणी म्हणत, झिम्मा-फुगडी इतर खेळ खेळतात, झाडाला दोर बांधून पाळणा करून झोके घेतात, नागपंचमीला सुजाता खीरसह, पुरण पोळी केली जाते. नागपंचमी उत्सव ब्राम्हण करत नव्हते. विरोध करत होते. म्हणूनच नागाच्या शिल्पाजवळ शेेंडी व जाणवेधारी ब्राम्हणाचे विडनात्मक शिल्प करून तो बिडी फुकत असल्याचे दृश्य दाखवण्याची परंपरा आजही जपली जाते.
नागराजा लोकोत्सव म्हणजेच नागपंचमी उत्सवाचा इतिहास मनुवाद्यांनी सापाशी जोडून बरोबर नाग लोकोत्सव दिवशीच सुरू केला.‘शेतात राहणारा साप हा प्राणी शेतकर्यांचा मित्र आहे,’ असे सांगून नागपंचमी उत्सव हा मौसमी ऋतुमध्ये येत असल्याने शेतकरी श्रावण पौर्णिमाच्या पंचमी दिनी नागपंचमीला नाग पूजा करतो अशी अख्यायिका रंगवली गेली. नाग दूध पितो असे सांगून नाग शिल्पावर दूग्धाभिषेककाची परंपरा सुरू केली. पण कोणताच साप गाई, म्हैशीचे दूध पित नाही. ते दूध त्याना विष ठरते. हा इतिहास अत्यंत चुकीचा आहे. नागलोक हे सापाची नव्हे, तर त्या लोकराजे पाच नागराजाच्या माध्यमातून नागलोकांचा उत्सव होत असल्याचा सत्य इतिहास आहे. परकीय आर्यांनी नाग लोकोत्सवाला पर्याय म्हणूनच गणपती उत्सव पुढे आणल्याचे वाटते. नागलोक नागाचे शिल्प करतात, तिकडे गणपतीचे शिल्प. नाग शिल्पाची मिरवणूक काढली जाते. येथे गणपतीची मिरवणूक काढली जाते. नागलोक उत्सव पाच दिवस साजरा केला जात होता. गणपती उत्सवही पाच दिवसचा केला आहे. नागवंशीय महिला जो आनंद घेतात तोच आनंद गणपती उत्सवात महिला बाहेर येवून गाणी म्हणणे, महिलांचे खेळ खेळतात. गणपती उत्सवातही खीर व पुरणपोळी केली जाते. आज जरी बहुजन गणपती उत्सव करत असले तरी हेच नागलोक गणपती उत्सव करू लागल्याने गणपतीची विटंबना होवू लागली, ब्राम्हणांचा गणपतीदेव बाटला गेला म्हणून गणपती मुर्ती पाण्यात टाकण्याची प्रथा सुरू केल्याचे सांगितले जाते. सद्या बहुजन जितकेही सण साजरे करतात ते ब्राह्मणी धर्मातील आहेत. त्यांनी त्याचे मूळ सणच विसरले आहेत, किंबहुना पर्याय सण आणून त्याना विसरणे भाग पाडले आहे. नागालाही गद्दार केले. आजही एक म्हण आहे सापाला दूध पाजू नये. तो त्या दूधाचे उपकार मानत नाही. तो दूध पाजणार्यांवरच उलटतो. संक्षिप्तामध्ये गद्दार असतो. म्हणजे ते सापाला नव्हे तर नागवंशीयांना म्हटले आहे. जर नागलोकांना आसरा दिला, मदत केली तर ते त्यांच्या लढण्याची बळ येईल आणि पुन्हा ते आपले वैभव प्राप्त करतील हेच सापाला दूध पाजू नये यातून सांगण्याचा प्रयत्न झाला आहे.
आता बदलण्याचे संविधान-लोकशाहीने अधिकार दिले आहेत. आपला वंश, आपला धर्म आणि आपली संस्कृती जपली पाहिजे. त्यासाठी आपल्या धर्मातील पारंपारिक उत्सव/सण साजरे केले पाहिजेत. देव ही भ्रामक कल्पना आहे. जे कोणी उध्दार केला तो आई-बापाच्या पोटी जन्म घेतलेल्या मानवानीच. अलिकडचे उदाहरण म्हणून छ.शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर ही महामानव समोर आहेत. तरीही लोक गद्दारासारखी वागतात. डॉ.बाबासाहेबांनी जे करू नका म्हणून सांगितले तेच करतात. ब्राह्मणी सण साजरे करतात. पुढील महिन्यात गणपती उत्सव साजरा करतील. त्यानंतर नवरात्र करतील, मग दसरा, नंतर दिवाळी साजरा करतील. पण आपल्या बौध्द नाग संस्कृतीचे सण साजरे करणार नाहीत. हे उद्या सोमवार दि.21 ऑगस्ट रोजी दिसून येईल. बहुजन ब्राम्हणी धर्मातील संस्कृतीप्रमाणे नागपंचमी करतील पण बौध्द संस्कृतीप्रमाणे नाग लोकोत्सव साजरा करणार नाहीत. कदाचित नागवंशातील डीएनए बदलला असला पाहिजे.आज बाबासाहेब आंबेडकर असते तर त्याना वेड लागण्याची वेळ आली असती. इतकी लोक कृतघ्न आहेत. करा गणपती उत्सव, जावा नाग मंदिरात दूध नासवायला. नागपंचमी साजरी करायला... पण आपण कुणाची नागपंचमी करतो त्याचा तरी इतिहास वाचा किंवा आम्ही सांगितल्याप्रमाणे वागा. कृती करा.
देवदास बानकर ९२२५८०६९९०,
संपादक दैनिक मुक्तनायक (कोल्हापूर)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा