रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी.

 माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी.



    माणसाच्या आयुष्यात अनेक आनंदाचे दिवस एकदाच येतात.ते परत परत येत नाही,पण त्यांचा मनापासून आनंद घेतला तर ते पुन्हा पुन्हा येऊ शकतात.पण त्यांचा आनंद घेता आला पाहिजे आणि देता आला पाहिजे.प्रत्येक माणसांचे जन्मपासून मुत्यु पर्यंत नाम करण,बारसे,लग्न,आईबाबा होणे, मुलगा,किंवा जावई होणे नंतर सासू सासरे होणे, आजीआजोबा होणे एकदाच होते.पण त्यांचा आनंद घेता व देता आला पाहिजे.म्हणूनच माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी.
     माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी नेहमीप्रमाणेच ते शब्द माझ्या मनात आणि बोटं कीबोर्ड वर फिरू लागले त्यामुळे शब्दांना शब्द जुळून वाक्य बनु लागले.कोणत्याही प्रकारच्या कामांची पोचपावती ही आपल्या व्यवहारात जितकी महत्वाची, तितकीच आयुष्यातही कां असू नये ?. आणि ही पोचपावती म्हणजे प्रत्येक वेळी कौतुकस्पद असेलच या अर्थाने नसावी.कधीतरी एखाद्या गोष्टीची घेतलेली दखल किंवा म्हणतात ना appreciation असू शकते.ह्या पोचपावतीचे प्रत्येकाच्या आयुष्यातील उत्तम उदाहरण म्हणजे आई- बाबा असतात. 
      घरात कोणताही एकत्र कार्यक्रम होवो किंवा एखादा नवीन पदार्थ केला,कोणतीही चांगली कृती केली की सुनांना ते तसे आवर्जून सांगतात "छान झाला बर का आजचा कार्यक्रम" आणि मग त्यांच्या ह्या शब्दांनी कार्यक्रमामुळे झालेली दमणूक एकदम निघून जाते आणि पुन्हा पुढचा कार्यक्रम करायला त्यांना अजून उत्साह येतो. सुनांसाठी सासु सासऱ्यांनी दिलेली पोचपावती एकत्र कुटुंबाच्या आयुष्यात मोठी जादूची कांडी असते.
       एखाद्याला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींच appreciation देऊन बघा अगदी मनापासून त्याच्या चेहऱ्यावर कस हसू फुलते.घरातील कामवाली गजरे,फुल घालून आली तर अनेकांना खूप राग येतो,पण ती तिची आवड म्हणून ती गाजर,फुल लावत असेल तर तुम्हाला राग येण्याचे काम काय?. उलट ती मोठा गजरा घालून कामांवर आली की घरातील माणसांच्या तोंडून उस्फूर्तपणे निघाले पाहिजे की काय मस्त दिसतेस ग!.चल एक फोटो काढते तुझा!" त्याच प्रकारे आपला वाहन चालक दाढी करून चांगले कपडे घालून आला तर त्याच्याकडे कौतुकाने पाहून बेस्ट म्हणा ह्याने सुद्धा ते नोकर खूप खुश होतात.त्यामुळे त्यांची काम करण्याची ऊर्जा वाढते.त्यांना  न सांगितलेले काम ते न सांगता करून जातात. हीच असते माणसांनी केलेल्या कामांची पोच पावती.
     घरातील,परिसरातील कार्यक्रमात लहानांपासून मोठ्यां पर्यन्त आणि अगदी लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींसाठी ही पोचपावती खूप मोठा परिणाम करून जाते आणि छान आठवण मनात ठेवून जाते.गांवी एक प्रसिद्ध म्हण आहे त्याला हरभऱ्याच्या झाडांवर चढवले आणि सर्व कामे करून घेतली.सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या तरुणांच्या हातून चांगले काम करून घ्याचे असेल तर त्या तरुणांची सर्वासमोर थोडी स्तुती करा त्यांच्या कामातील कला कौशल्याची कौतुकास्पद आपसात चर्चा करा.त्यामुळे त्या तरुणांचा काम करण्याचा उत्साह निश्चितच वाढतो.मग ती सहभागी असलेल्या सर्वांच्या साठी चांगली आठवण राहतो. करीता माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी.
     एखादं कामाचे मोठं प्रोजेक्ट complete केल्यावर बॉसने त्याची घेतलेली दखल असो की वर्गात "छान निबंध लिहिलंस हो" अस म्हणून बाईंची मिळालेली शाबासकी असो, हिने खपून केलेल्या पदार्थाची घरातल्यानी केलेली स्तुती असो की, कधीतरी नवीन साडी नेसल्यावर हिला न बोलता दिलेली दाद असो.ह्या पोचपावती साठी माणूस फक्त जवळचाच हवा असं काही नाही.कधीतरी आपल्याच दुकानदाराला ही म्हणावं "काका तांदूळ चांगले होते हं तुमच्या दुकानातुन घेतलेले" सामान्य माणसांपासून अगदी कलाकारां पर्यन्त ह्या पोचपावतीची गरज असतेच, ही दखल घायला आणि द्यायला ही वयाच बंधन कधीच नसाते.काही काही नाती ही पोचपावती पलीकडची असतात,पण तरीही अधूनमधून त्यांच्या आठवणी नक्की आनंद देऊन जातात. 
    बरेचदा सततच घेतली जाणारी दखल काही खरी वाटत नाही.तसं करूही नये कारण पोचपावती जितकी उस्फुर्त,तितकीच जास्त खरी असावी. माणसांची पोच पावती फक्त शब्दातूनच नाही तर कधी डोळ्यातून,कधी कृतीतून,स्पर्शातूनही व्यक्त व्हावी. जसं जसं ज्याच्याशी नातं तशी तशी ती पोचवावी असावी.कधी योग्य आदर ठेवून,कधी गळा मिठी मारून,अगदी कधी "च्यामारी भारीच काम केलंस तू भावड्या" अशी वेगळ्या भाषेतून ही यावी.माणूस जितका दिलखुलास तितकीच ही दाद उस्फुर्त,महत्वाचे म्हणजे ती स्वीकारणाराही तितकाच ह्या मुलांच्या भाषेत मस्त मित्र हवा.ह्या पोच पावती ने काम करायला दुप्पट ऊर्जा मिळते,उत्साह मिळतो, नातं घट्ट व्हायला एक छोटासा धागा मिळतो.आणि तसं म्हणाल तर ह्यासाठी काही लागत नाही फक्त मोकळं व स्वच्छ मन! हवे असते.म्हणूनच माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी.
      नारायण हरी भिडे मुक्काम पोस्ट खुमगांव बुर्ती,तालुका नांदुरा,जिल्हा बुलढाणा माझ्या साडूच्या घरा जवळ एक गाय वासरू बांधलेले होते.माझे नातु खूप दिवसांनी गांवी गेल्यामुळे ते त्या गाय वासरांना दुरून पाहत होते,आणि गाय वासरू त्यांना कान वर करून डोळे मोठे करून,शेपटी आत मध्ये घेऊन पाहत होते.मी त्यांच्या जवळ गेलो त्यांच्या अंगावरून शिंगा वरून तोंडावरून हात फिरवत गोंजारत होतो. त्यांनी त्यांची पोच पावती आनंदाने स्वीकारून दिली.हे होते स्पर्शाने व्यक्त केलेले प्रेम, त्यांच्या डोळ्यातील आनंद शब्दात वर्णन करता येत नाही. कळत न कळत हे व्यक्त झाले.म्हणूनच माणसांकडून मुक्या प्राण्याकडून माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी.हा निसर्गाचा नियम आहे.
सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप,मुंबई.

माणसांनी काय बनावे बदक की गरुड?,निर्णय तुमचा आहे.

 माणसांनी काय बनावे बदक की गरुड?,निर्णय तुमचा आहे.



     डिजिटल इंडिया बनल्याचा प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी हे गर्वाने सांगतात.त्याचा प्रधान सेवक,चौकीदार आणि अंधभक्तांसह अनेकांना आनंद वाटते.पण प्रश्न ग्राहक मालकाचा नाही.ग्राहक एक अशी व्यक्ती किंवा व्यक्तीचा गट आहे ज्याचा वस्तूची खरेदी-विक्री करण्याच्या कामकाजाशी संबंध नसून वस्तू किंवा सेवा प्रामुख्याने वैयक्तिक, सामाजिक,कुटुंब,घरगुती आणि तत्सम गरजा भागविण्यासाठी,किंवा वापरण्याच्या कामकाजाशी संबंध आहे.सुरक्षेचा हक्कः आरोग्यासाठी किंवा आयुष्यासाठी घातक असलेल्या किंवा इतर पद्धतींपासून संरक्षण करण्यासाठी आणि त्याला माहिती निवडण्यासाठी आवश्यक असलेला अधिकार असतो.डिजिटल इंडियामुळे रोजगार,महागाई भ्रष्टाचार,शिक्षण,आरोग्यात काय बदल झाला.फसवणूक करण्याचा प्रकार वाढला कि कमी झाला.सेवा देण्याच्या नांवावर कोणता धंदा जोरात आहे.कष्ट करणाऱ्यांना किंमत नाही.आणि वाताकुलीत वातावरणात आरामशीर काम करणाऱ्याचे महत्व जास्तच वाढले. असो...
         २८ ऑक्टोबरला अमरावती एक्सप्रेस रेल्वेने मुंबई ते नांदुरा प्रवास केला.नांदुरा येथे गाडी सकाळी ४.४३ वाजता पोचते.येवढा सकाळी ग्रामीण भागातील खेड्यात जाणे अशक्य असते त्यासाठी सकाळचे सात वाजे पर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो.दुसरा पर्याय असतो तीन चार पट परतीचे भाडे देऊन रिक्षा घेऊन जाणे. यात प्रचंड धोका असतो. अनोळखी माणसां बरोबर प्रवास आणि मुंबई वरून आलेले ग्राहक.अशा वेळी ग्राहक म्हणून ग्रामीण भागातील खेड्यातून थंडीच्या दिवसात ३.३० वाजता उठून नांदुरा येथून मुंबईच्या पाहुण्यांना आणायला जाणे म्हणजेच पैसासाठी ग्राहकासाठी जाणे नव्हे तर माणुसकीची बांधिलकी ठेऊन सेवा देणे होय.शंकर खराटे रिक्षा चालक मालक मुक्काम पोस्ट खुमगांव बुर्ती,तालुका नांदुरा,जिल्हा बुलढाणा यांनी आम्हाला घेऊन जाण्यासाठी साडेचार वाजताच उपस्थित राहणे,स्टेशन बाहेर पडताच समोर येऊन स्वागत करणे आमच्यासाठी अपेक्षित नव्हते.तो सुखद धक्का त्यांनी दिला,नांदुरा ते खुमगांव पर्यतचा प्रवास रोडवरील खड्डे त्यांची कोणीच दखल घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.खड्डे सांबळात चर्चा करत नारायण भिडे साडूच्या घरी त्यांनी सुखरूप पोचवले.त्याचं वेळी मला परदेशातील टॅक्सी चालक मालकांची आठवण झाली. आणि माणसांनी काय बनावे बदक की गरुड?,निर्णय तुमचा आहे.ही गोष्ट आठवली तेच तुमच्या समोर मांडत आहे.
          एकदा विमानतळावर असताना माझी एका टॅक्सी चालकाशी गाठ पडली आणि त्याच्या टॅक्सीत सर्वप्रथम माझ्या नजरेस एक गोष्ट पडली ती म्हणजे,एक पाटी जिच्यावर लिहिले होते की माणसांनी काय बनावे बदक की गरुड?, निर्णय तुमचा आहे.तुम्हीच ठरवा. दुसरी गोष्ट जाणवली ती स्वच्छ आणि चकचकीत गाडी, ड्रायव्हर अतिशय टापटीप आणि स्वच्छ आणि इस्त्रीच्या ड्रेस मध्ये होता. स्वच्छ पांढरा इस्त्रीचा शर्ट आणि पँट वर टाई.ड्रायव्हर स्वतः उतरून गाडीबाहेर आला आणि त्याने माझ्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला.आणि बोलला, माझे नाव जॉन आहे. आणि मी तुमचा वाहक आहे.जो पर्यंत मी तुमचे समान गाडीच्या डिकीत ठेवतो तोपर्यंत आपण माझे हे मिशन कार्ड वाचावे सर.त्या कार्ड वर लिहिले होते,जॉन चे मिशन माझ्या ग्राहकांना लवकरात लवकर,सुरक्षित आणि रास्त दरात त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवणे आणि तेसुद्धा आल्हाददायक आणि मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये.
         मी भारावून गेलो होतो.गाडीतील आतील बाजूही तेवढीच टापटीप आणि स्वच्छ,नीटनेटकी होती.जॉन ने मला विचारले.आपल्याला कॉफी घ्यायला आवडेल काय? मला त्याची गंमत करायची लहर आली म्हणून मी त्याला म्हणालो. नाही, मला ज्यूस हवा आहे.तात्काळ जॉन उत्तरला.काही हरकत नाही सर,माझ्याकडे तीन वेगवेगळ्या थर्मास आहेत.ह्यापैकी एकात ज्यूस,एकात डायट ज्यूस आणि एकात पाणी आहे.तुम्हाला वाचायचे असेल तर माझ्याकडे आजचे वर्तमानपत्र आणि काही मासिके आहेत.जेव्हा आमचा प्रवास चालू झाला तेव्हा जॉन मला म्हणाला की जर मला गाणी किंवा बातम्या ऐकायच्या असतील तर हा रिमोट आहे आणि ह्या वरील नंबर्स प्रमाणे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्याचा आनंद घेऊ शकता.मला अजूनही धक्का बसायचा बाकी होता. कारण पुढे त्याने अत्यंत मार्दवपूर्ण स्वरात विचारले.सर,एसी चे तापमान ठीक आहे की आपणास काही वेगळे हवे आहे?. त्यानंतर त्याने मला माझ्या गंतव्य स्थानी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता आहे हे सांगितले आणि पुढे विचारले की, तो माझ्याशी बोललेले चालेल की त्याने शांत राहावे?न राहवून मी त्याला विचारले.तू नेहमी तुझ्या ग्राहकांना अशी सेवा देतोस?त्यावर तो उत्तरला. नेहमी नाही, दोन वर्षांपासून देतो आहे. माझ्या सुरवातीच्या काळात मीही इतर टॅक्सी चालकांसारखा सतत तक्रार करीत असे.आणि असमाधानी राहत असे.पण एकदा एका डॉक्टर कडून मी व्यक्तिमत्त्व सुधारणांबाबत ऐकले. त्यांनी एक पुस्तक लिहिले होते. त्याचे नाव होते.तुम्ही जे कोणी आहात त्याने काय फरक पडतो. ज्यात पुढे लिहिले होते. जर तुम्ही सकाळी उठून असा विचार कराल की आज दिवस वाईट जाणार आहे. फक्त अडचणीच आहेत तर खरेच तसेच होईल.तुमचा तो दिवस वाईट आणि अडचणींचा जाईल.
     बदक बनू नका,गरुड बना.बदक फक्त आणि फक्त आवाज करतो. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देतो. आणि गरुड सर्व समुदायापासून वेगळा आणि उंच उडतो.आणि माझ्या लक्षात आले की मी सतत रडतो आहे फक्त तक्रारी करतो आहे.म्हणून मी स्वत:ला बदलण्याचे ठरविले. माझ्या दृष्टिकोनात बदल करून गरुड बनण्याचे ठरविले.मी इतर टॅक्सी चालकांकडे बघितले. अस्वच्छ,गलिच्छ टॅक्सीज आणि आडमुठे चालक आणि म्हणून असमाधानी ग्राहक. असे चित्र होते ते.मी काही बदल करायचे ठरवले. आणि माझ्या ग्राहकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे नंतर आणखी काही बदल करीत गेलो. आणि गरुड बनण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी माझा व्यवसाय दुप्पट झाला आणि ह्यावर्षी आत्तापर्यंतच्या चौपट झालेला आहे. 
          तुम्ही सुदैवी आहात की आज मी तुम्हाला इथे सापडलो. अन्यथा आजकाल माझे ग्राहक माझ्याकडे आगाऊ रिझर्व्हेशन करून माझी टॅक्सी सेवा घेत असतात.किंवा मला मेसेज करून माझी टॅक्सी बुक करतात. मला शक्य नसेल तेव्हा मी अन्य गरुड बनलेल्या टॅक्सीचालक द्वारे ती सेवा ग्राहकाला पुरवतो.जॉन बदलला होता. तो साध्या टॅक्सीतून लुमोझीन कार सर्व्हिस पुरवत आहे.जॉन ने बदका सारखे सतत आवाज करत,सतत तक्रार करणे सोडून दिले आहे.आणि गरुडासारखी भरारी मारायला सूरूवात केली आहे.तुम्ही कुठे आणि काय काम करता याने काहीही फरक पडत नाही तर तुम्ही ते कसे आणि  कोणत्या मनोभूमिकेतून करता याने नक्की फरक पडतो.
 तुम्ही काय ठरवले आहे?.बदकासारखे सतत आवाज करत (रडत) तक्रार करत राहणे की गरुडासारखे सगळ्यांपेक्षा वर उडण्याचे?.लक्षात ठेवा.निर्णय तुमचा आहे.हे कुलूप फक्त आतून उघडते.म्हणूनच माणसांनी काय बनावे बदक की गरुड?,निर्णय तुमचा आहे.असतो, ग्रामीण भागातील खेड्यातील शंकर खराटे याने थंडीचे कारण देऊन येणे टाळले असते तर आम्हाला थंडीत दोन तीन तास रिक्षाची वाट पाहण्या शिवाय पर्याय नसता.तर दुसरा पर्याय निवडला असता तर अनोळखी रिक्षावाला आणि त्यांच्या अनोळखी रोडमुळे त्याला खाड्याचा अंदाज आला नसता.त्याला जास्त पैसे देऊन ही त्यांचा साहजिकच शारीरिक त्रास आम्हाला झाला असता.म्हणूनच माणसांनी काय बनावे बदक की गरुड?, निर्णय तुमचा आहे. आम्हाला शंकर खराडे चालक मालक गरुडा सारखा वाटला तसेच आम्ही शंकर ला ग्राहक प्रवासी निश्चितच गरुडा सारखे वाटले असणार.
सागर रामभाऊ तायडे, 9920403859,भांडुप,मुंबई.

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

दिवाळी असंघटीत शेतकरी शेतमजुरांची आणि कामगारांची

 दिवाळी असंघटीत शेतकरी शेतमजुरांची आणि कामगारांची 



      देशातील सर्वात मोठा सण दिवाळी काही दिवसावर आला.प्रत्येक माणसांना दिवाळीत काही तरी कोणा कडून बक्षीस बोनस मिळावे अशी अपेक्षा असते. ग्राहकाला दुकानदार कडून,दुकानदाराला होलसेल विक्रेत्या,विक्रेत्याला कंपनी कडून,वाहन चालकाला गाडी मालका कडून,घर कामगार महिलेला घर मालका कडून,ग्रस सिलेंडर घरोघरी पोचविणाऱ्या त्या माणसाला प्रत्येक घरी दिवाळी बक्षीस वीसतीस रुपये मिळावे असे एकूण ९४ प्रकारच्या असंघटीत कामगारांना दिवाळीला काही रोख रक्कम,मिठाई पुढा मिळावा ही अपेक्षा असते.   अनेक ठिकाणी दिवाळीला काही द्यावे लागेल.या भिती मुळे आठ,दहा महिने झालेल्या कामगारांना काही भांडण तंटा शाब्दिक तक्रार करून कामावरून काढले जाते.त्यामुळे नवीन कामगार कमी पगार मिळतो.आणि त्याला पाहिजे त्या पद्धतीने राबवून घेता येते.अशा अनेक तक्रारी या महिन्यात माझ्याकडे आल्या आहेत.त्या विरोधात काहीच करता येत नाही.त्यांना कोणतेही कायदेशीर स्वरक्षण नाही.म्हणूनच ते असंघटीत कामगार म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत असते.

 सुरक्षित ठिकाणी सुरक्षित काम करणारा कामगार,कर्मचारी,अधिकारी दिवाळी बोनस सानुग्रह मिळण्यासाठी धमक्या इशारे द्याला लागला.त्याच बरोबर देशातील ९३ टक्के असंघटीत कामगार ही बोनस ची मागणी करायला लागला. विशेष राज्यातील महानगरपालिका,नगर पालिका,नगर परिषद,नगर पंचायत आणि पंचायत मध्ये काम करणारा कामगार बहुसंख्याने कंत्राटी,रोजंदारी कामगार असतो.ज्या कंत्राटी कामगारांना नियमित काम नाही,वेळेवर पगार नाही.किमान वेतन सुविधा नाही.ज्यांची एक मजबूत विचारांची संघटना,युनियन नाही.ज्यांचा जिल्ह्यात,राज्यात एक नेता एक विचारधारा नाही ते ही कामगार नगर परिषद,नगर पंचायत मध्ये आंदोलने करीत आहेत.काही ठिकाणी बोनस मागण्यासाठी युनियन बनवली म्हणून मारहाण करून कामावरून काढून टाकले. त्याच ठिकाणी दुसऱ्या कामगारांना कामावर घेतले.अशा अनेक समस्या असंघटीत कामगारांच्या असतांना काही नेते त्यांना दहा हजर,पंधरा हजार रुपये बोनस मिळावे यासाठी पत्रकाद्वारे सरकारला,प्रशासनाला धमक्या इशारे देतात.शेतकऱ्यांचा कष्टकरी कामगार,कर्मचारी अधिकारी यांचा दिपावली एकच सण मोठ्या उत्सवात साजरा होतो,शेतकऱ्यांच्या घरात विविध प्रकारचे अन्न धान्य फळ फराळ येतात त्यामुळे घरात आनंद असतो,तसाच कामगार कर्मचारी अधिकारी यांना दिवाळीला बोनस सानुग्रह,बक्षीस मिळतात.यांचा पगार,वेतनवाढ हे दरवर्षीप्रमाणे निश्चितपणे ठरलेले असते.शेतकऱ्यांना मात्र दरवर्षी कधी निसर्गाकडून तर कधी सरकार कडून तोंड बांधून मार खावा लागतो. शेतकऱ्यांच्या घरात शेतीतील माल येतो तेव्हा नेमका बाजारभाव पाडला जातो.कारण येथे ब्राह्मण वैश्य क्षत्रियांची दोस्ती युती आघाडी शेतकऱ्यांचे योग्य वेळी शोषण करण्याचे काम कृषिउत्पन्न समिती द्वारे चोख केले जाते. देशभरात दिवाळी कामगार,कर्मचारी अधिकारी आणि असंघटीत शेतकरी, शेतमजूर इमारत बांधकाम कामगार,फेरीवाले सर्व समाजाच्या लोकांची कशी साजरी होत असते.याबाबत विचार मंथन आपल्या देशात होत नाही.पण इतर देशात होते असे मला वाटते.मी अनेक देशाचे वर्ड सोशल फोरम मध्ये भाग घेऊन अनुभवला.म्हणूनच मी यावर नियमितपणे लिहत असतो.

    दिवाळीत दरवर्षी दारात कंदील आणि दिव्याची माळ लावुन कोणता उत्सव साजरा करतो.हे कोणत्याही जाती धर्माचा माणूस शंभर टक्के सत्य सांगु शकत नाही. प्रत्येकांचे उत्तर एकच वाड वडिलोपार्जित परंपरा रितीरिवाज आहे.त्यांचे पालन केले पाहिजे.ती संघटित असंघटित कामगार,कर्मचारी अधिकारी करतात तसेच मजूर,शेतमजूर कष्टकरी गोरगरीब आपल्या परीने दिवाळी साजरी करतात. दिवाळी सण एक आहे,बाकी उत्सव पर्व समता स्वातंत्र्य बंधुभाव कुठेही दिसत नाही.प्रचंड प्रमाणात विषमता घराघरात भरली आहे.म्हणजेच एकत्र आनंद उत्सव नाहीच.महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचाराची कोणतीही झळ न पोचता साजरी होणारी दिवाळीत जात,धर्म,प्रांत,राज्य,वर्ण काहीच नसते फक्त मार्केटिंग असते.हे हजारो वर्षापासून सुरु आहे. भारताचे बहुतेक सण हे जमिन मालक आणि मजुरांवर आधारीत आहेत.या बाबतीत दिवाळी कामगार आणि शेतकऱ्यांची कशी साजरी होते.हा संशोधनाचा विषय आहे.

भारतातील दिवाळी हा मोठा उत्सव उत्स्पुर्तपणे साजरा होतो.तिला महागाई, बेरोजगारी,भ्रष्टाचार,अतिरेकी कारवाई कोणीच रोखी शकत नाही. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओहाळी हे बळीराजा म्हणजे शेतकऱ्यांच्या घराघरात म्हटले जाते. म्हणूनच दिवाळी खऱ्या अर्थाने शेतमजूर आणि शेतकऱ्यांची असते त्यावर अवलंबून असलेल्या उद्योग धंद्याची वर्ष भराची कमाई दिवाळीच्या दिवशी मोजल्या जाते.तोच खरा आनंद सर्व समाजातील कुटुंबात उत्स्फूर्तपणे साजरा केला जातो. म्हणूनच सर्वच सर्वांना म्हणतात दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!.ही दिवाळी तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुखाची समृद्धी ची जावो.

सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप मुंबई,

दिवाळीत इमारत कामगार उपासी,अधिकारी दलाल तुपाशी

 दिवाळीत इमारत कामगार उपासी,अधिकारी दलाल तुपाशी 



        देशातील सर्वात मोठा सण दिवाळी,दीपावली,दीपोत्सव काही दिवसावर आला.सुरक्षित काम करणारा कामगार,कर्मचारी,अधिकारी दिवाळी बोनस सानुग्रह मिळण्यासाठी धमक्या इशारे द्याला लागला.त्याच बरोबर देशातील ९३ टक्के असंघटीत कामगार ही बोनस ची मागणी करायला लागला.ज्या कंत्राटी कामगारांना नियमित काम नाही,वेळेवर पगार नाही.किमान वेतन सुविधा नाही.ज्यांची एक मजबूत विचारांची संघटना,युनियन नाही.ज्यांचा जिल्ह्यात, राज्यात एक नेता एक विचारधारा नाही ते ही नगर परिषद,नगर पंचायत मध्ये आंदोलने करीत आहेत.काही ठिकाणी बोनस मागण्यासाठी युनियन बनवली म्हणून मारहाण करून कामावरून काढून टाकले.त्याच ठिकाणी दुसऱ्या कामगारांना कामावर घेतले.अशा अनेक समस्या असंघटीत कामगारांच्या असतांना काही नेते त्यांना दहा हजर,पंधरा हजार रुपये बोनस मिळावे यासाठी पत्रकाद्वारे सरकारला,प्रशासनाला धमक्या इशारे देतात.
        देशात सर्वात मोठा इमारत बांधकाम धंदा आहे.त्यात इमारत बांधकाम करणाऱ्या कामगारांची संख्ये लक्षवेधी आहे.ती आपणास कधी दिसत नव्हती पण २०२० ला देशाचे प्रधानसेवक देशभक्त इमानदार चौकीदारांनी बावीस मार्चला लॉक डाऊनची घोषणा केली. आणि तेवीस मार्च ला देशभरातील शहरातुन वाळूलातून ज्याप्रमाणे मुंग्या बाहेर पडतात त्याप्रमाणे कामगार,मजूर बाहेर पडले,बाहेर गावी जाणाऱ्या मेल एक्सप्रेस रेल्वे, बस,ट्रॅव्हल एस टी सर्वच बंद करण्यात आल्या असतांना एवढ्या मोठ्या संख्येने कामगारांना मजुरांना बिल्डर,ठेकेदार,लेबर सप्लायर यांनी राहत्या जागा खाली करण्यास भाग पाडले. तेव्हा परप्रांतीय लोकांचा तिरस्कार करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे मराठी हृदय सम्राट गळा आवळून बोबळत होते.लाखोंच्या संख्येने परराज्यातील लोक मुंबईत कोणती अधिकृतपणे नांव नोंदणी न करता कामे करतात. बिल्डिंगच्या आजूबाजूला,गटार,नाल्याच्या बाजूला,कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या जागेवर झोपड्या बनवुन राहतात.त्यांची मतदार यादीत नांव नोंदणी केली जाते. पण बाकी इतर नागरी सेवा सुविधा देण्यासाठी योग्य दखल योग्यवेळी घेतली जात नाही.बिल्डिंग पूर्ण होईपर्यंत त्या कामगारांच्या झोपडीचा,व झोपडपट्टीचा कोणालाच त्रास होत, त्यावेळी त्यांना लाईट,पाणी जाहीर पणे चोरून विकत मिळते. अशा असंघटित कामगारांसाठी दि बिल्डिंग अँड अदर कॉन्स्ट्रुकॅशन ओरकर्स १ ऑगस्ट १९९६ हा  (The Building and other construction workers (Regulations of Employment and Conditions of Service) Act 1996 ) कायदा अस्तित्वात आला होता, त्यांची अंमलबजावणी काही राज्यांनी केली तर काही राज्यांनी असंघटित इमारत बांधकाम कामगारांची नांव नोंदणी केलीच नाही.त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रचंड आंदोलने करावी लागली,आंदोलने करणाऱ्या संस्था,संघटना त्याचे कार्यकर्ते,नेते आज खूप मागे पडले आणि पोटभरणारे कार्यकर्ते नेते संघटनांचे भरपूर पीक आले आहे. त्यामुळेच दलाली,बोगस नांव नोंदणी रोख कमिशन मिळणाऱ्या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. म्हणूनच इमारत कामगार उपासी,अधिकारी दलाल तुपाशी झाला आहे.
             मुंबई ही भारताची औद्योगिक राजधानी आहे.या महानगरीत जेवढे इमारत बांधकामे व इतर दुरुस्तीचे कामे चालतात तेवढे कोणत्याही शहरात नसावेत.पण त्या कामाची आणि कामगारांची नोंद कोण घेते?. हे २३ मार्च २०२० ला सर्वांनी अनुभवले असेलच.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचे कडून बांधकाम कामगारांसाठी २८ कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्यात प्रामुख्याने १८ ते ६० वयाचे कामगार आपल्या व आपल्या कुटुंबासाठी विविध योजनाचा लाभ घेऊ शकतात. त्यांचा लाभ घेण्यासाठी अंशदान स्वरुपात शुल्क घेण्यात येते आज बांधकाम कामगार नोंदणी होण्यासाठी ९० दिवसांचा इंजिनिअरचा,किंवा ठेकेदारांचा दाखला गरजेचा आहे. त्यात प्रामुख्याने वर्षात ९० दिवस किंवा त्या पेक्षा जास्त काम केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. पण जे एका जागेवर एकाच इमारतीच्या साईटवर बांधकाम कामगार म्हणून काम करतात त्यांना हे सोयीचे आहे. परंतु त्यांनी संघटना,युनियन म्हणून नांव नोंदणीचा आग्रह केला तर त्यांना ताबडतोब कामावरून काढले जाते. बिल्डर, ठेकेदार लेबर सप्लायर या कामगारांची अधिकृतपणे नांव नोंदणी न करता काम करून घेतात. त्यामुळेच मुंबईत इतर शहरात सर्वात जास्त इमारत बांधकामे सुरू असतांना ही इमारत बांधकाम कामगारांची नांव नोंदणी नगण्य आहे. याला कोण कोण जबाबदार आहे?.मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्यांनी कोणत्या बिल्डर ठेकेदाराच्या कानाखाली जाल काढल्याचे पाहिले,वाचले आहे काय?.
             मुंबईसह प्रत्येक शहरांच्या नाक्या नाक्यावर हजारोंच्या संख्येने सकाळी कामगार एकत्र येतात व मिळेल तिथे कामासाठी निघून जातात.त्यांची अधिकृतपणे नांव नोंदणी कुठेच होत नाही. कारण त्यांना वर्षभरातुन ९० दिवसांचे प्रमाणपत्र कोणीच लिहून देण्यास तयार नसते.या नाका कामगारांचा मालक व कामाची जागा दर दोन तीन दिवसांनी बदली होत असते.अशा कुशल कारागीर कामगार,बिगारी कामगारां कडून काम करून घेतल्या जाते,पण कोणताही इंजिनिअर ठेकेदार,बिल्डर दाखला देत नाही. मग अशा बांधकाम कामगारांनी मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ कसा घ्यावा.यांचा सरकारी कामगार विभागांचे अधिकारी गांभीर्याने विचार करीत नाही. म्हणूनच इमारत कामगार उपासी,अधिकारी दलाल तुपाशी खात आहेत.
           नाका कामगार असंघटित आहे,बिल्डर ठेकेदार संघटित आहेत कामगार अधिकाऱ्यां सोबत त्यांचे साटेलोटे असल्यामुळेच मुंबईत बिनबोभाट इमारतीचे बांधकामे सुरू आहेत. शासनाने दिनांक ०६/नोव्हेंबर २०१५ रोजी शासन परिपत्रक क्रमांक २०१४/ प्र क्र ३५०/नवि २० यानुसार बांधकाम कामगारांची नोंदणी साठी धडक मोहीम घेण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात फक्त तीन लाख बांधकाम कामगार नोंदणी झाल्याचे सांगितले जाते. यात राजकीय पक्षाचे बोगस कामगार किती आहेत,हे अनेकदा उघड होऊन ही कोणतीही कारवाई झाल्याचे दिसत नाही.कारण तेव्हा ते सत्ताधारी होते आज ते विरोधी पक्षात आहेत.खरा इमारत बांधकाम कामगार नांव नोंदणी पासून वंचित आहेत.साहजिकच बांधकाम कामगारांची नोंदणी न झाल्याने बहुतांशी कामगारांना मंडळाच्या योजनेचा लाभ मिळत नाही. यासाठी इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार सेवाशर्ती नियम २००७ च्या नियम ३३(३)(c) मध्ये सुधारणा करण्यासाठी उधोग उर्जा व कामगार विभागाने दि १३/८/२०१४ रोजी पुढील अधिसूचना जारी करण्यात आली होती.पोट कलम (३) मध्ये  (आ) खंड ऐवजी पुढील खंडाचा समावेश करण्यात येत आहे.(१) नियुक्त मार्फत देणेत आलेले प्रमाणपत्र ज्या बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगारांचे सातत्य नसलेले अस्थायी/दैनंदिन स्वरुपाचे काम आहे आणि ज्यामुळे कामगारांना एकापेक्षा जास्त मालकाकडे काम करावे लागते अशा बांधकाम कामगारांना संबंधित ग्रामपंचायतींचे,ग्रामसेवक किंवा संबंधित नगरपरिष,नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांनी प्राधिकृत अधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी यांनी निर्गमित केलेले (प्रमाणपत्र) उपरोक्त अधिसूचनेनुसार महानगरपालिका,नगरपरिषद,नगरपंचायत बांधकाम कामगारांना नोंदणी प्रमाणपत्र देऊ शकतात. याप्रमाणे दि ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत प्रत्त्येक महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रात स्थानिक नाका कामगार यांना प्रमाणपत्र देण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्याबाबत आवश्यक कारवाई तात्काळ निर्णय जारी करण्यात आला होता. त्यांचे काय झाले?. 
          कोणत्या जिल्ह्यात किती इमारत कामगारांची नांव नोंदणी झाली.मुंबईत किती झाली?. का मुंबईत इमारत बांधकामे नाहीत.मग बिल्डर ठेकेदार कामगार कुठून आणतात?. कामगार अधिकारी कर्मचाऱ्यांना हे दिसत नाही. सरकार,अधिकारी कर्मचारी आंधळे,बहिरे झाले आहे काय?. कारण इमारत कामगार उपासी, अधिकारी दलाल तुपाशी खात आहेत.ग्रामीण भागात काही प्रमाणात अंमलबजावणी झाली पण आता शासन निर्णय जारी करण्यात येवून आज ६ वर्ष झाली तरी शहरी भागात कोठेही शासन निर्णयानुसार काम झालेले नाही. याला कारण म्हणजे इमारत बांधकाम कामगार मोठया प्रमाणात असंघटित आहे.त्यातही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी संघटना स्थापन करून कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष करण्या ऐवजी अधिकाऱ्यांना हाताशी धरून दलालीच जास्त वाढवून ठेवली आहे. त्यामुळेच इमारत बांधकाम कल्याणकारी महामंडळ म्हणजेच इमारत कामगार उपासी,अधिकारी दलाल तुपाशी झाले आहे.
      बांधकाम कामगारांना नोंदणी प्रमाणपत्र देऊन त्यांची जबाबदारी कोण घेणार ही मानसिकता आज शासनाने निवडलेल्या अधिकारी वर्गाची आहे. एसीत बसून पन्नास हजार रुपयांच्या पुढे पगार घेणारे अधिकारी कर्मचारी बेजबाबदार पणे वागतांना उघड दिसत असतांना त्यांच्या विरोधात असंघटित कामगार संघटितपणे संघर्ष करीत नाहीत.म्हणूनच असंघटित कामगारांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या संघटनांनी एकत्र येऊन शासन निर्णयानुसार अधिकारी कर्मचाऱ्यांना काम करण्यास भाग पाडणे अन्यता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजे.
       इमारत बांधकाम कामगारांना ९० दिवसांचे प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय असतांना महानगरपालिका,नगरपालिका,नगरपंचायत,नगरपरिषद अधिकारी कामगार नोंदणी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत असतात.त्यांच्या विरोधात संघटनांनी शासन निर्णायाचा अवमान केला म्हणून अधिकारी व कर्मचारी यांचे वर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढे आले पाहिजे.परंतु पोटभरण्यासाठी संघटना चालविणारे कार्यकर्ते नेते तसे करती ही असंघटित कामगारांनी अपेक्षा ठेऊ नये,आजच्या घडीला ऑन लाईन नांव नोंदणी होत आहे.तो खरा कामगार आहे की नाही हे तपासणारी यंत्रणा सरकार कडे नाही.त्यामुळेच बोगस नांव नोंदणी मोठ्या प्रमाणत झाली आणि होत आहे.आता त्यांना दहा हजार रुपये बोनस देण्याची मागणी जोर धरत आहे.म्हणजेच बोगस नांव नोदणी करणारा अधिकारी आणि दलाल पुन्हा त्यात आपला वाटा घेऊन दिवाळी साजरी करणार.यावर उपाय म्हणजे जे स्वता खरे इमारत बांधकाम कामगार आहेत.त्या  असंघटित कामगारांनी स्वतःच कार्यकर्ता व नेता बनावे,त्यासाठी योजनेचा आणि कायद्याचा अभ्यास करावा नंतर सनदशीर मार्गाने पत्रव्यवहार करावा जर न्याय मिळत नसेल तेव्हा आंदोलन हा शेवटचा पर्याय उपलब्ध असतो.दिवाळीत इमारत कामगार उपासी,अधिकारी दलाल तुपाशी याला उलटे करता येईल,अधिकारी दलाल उपाशी इमारत कामगार तुपाशी.यासाठी संघटीत होऊन संघर्ष करणे हाच एकमेव पर्याय आहे.
 
सागर रामभाऊ तायडे,9920403859,
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२

इतिहास घडविणारे कामगार नेते रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे

 इतिहास घडविणारे कामगार नेते रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे 



रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे (जन्म १३ ऑगस्ट,१८४८, मूत्यू ९ फेब्रुवारी,१८९७ ) हे एक भारतीय कामगार पुढारी होते.नारायण मेघाजीं लोखंडे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरुनगर) जवळचे कन्हेरसर होते. ते माळी समाजाचे शेतकरी कुटुंबात जन्मले होते. त्यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पुरे केले. सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर, लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली होती. तेथे त्यांना कामगार दहशतीच्या वातावरणात काम करतांना दिसले.दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार पाहिले. त्यांना आठवडयाची सुटीही मिळत नसे,वेळेवर पगार मिळत नव्हता तेव्हा त्यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले. त्यांनी बॉबे मिल हंड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना २३ सप्टेंबर १८८४ रोजी स्थापन केली. ही कामगार संघटना भारतातील संघटित कामगार चळवळीची सुरुवात मानली जाते. भारतातील स्वाभिमानी कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे ओळखले जातात. ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजा मुंबई शाखेचे अध्यक्षही होते. तसेच सत्यशोधक चळवळीतली त्यांची कामगिरीही लक्षवेधी व महत्त्वपूर्ण मानली जाते. मुंबईत १८९६ मध्ये प्लेगची मोठी साथ उसळली. या साथीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्यावेळी नारायण मेंघाजी लोखंडे पुढाकार घेऊन  सरकारी मदतीने प्लेगग्रस्तांसाठी एक ‘मराठा इस्पितळ’ काढले होते. परंतु दुर्देवाने लोखंडे यांनाच प्लेगने पछाडले व त्यातच त्यांचा ९ फेब्रुवारी,१८९७ अंत झाला. असे इतिहास घडविणारे कामगार नेते रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे होते. त्यावेळची कामगार चळवळ आणि आजची कामगार चळवळ मोठा फरक आहे. 

भारतात आज कामगार संघटना ट्रेड युनियन राजकीय पक्षाच्या बटीक झाल्या आहेत. त्यामुळे भांडवलदार मालक वर्ग राजकीय पक्षाला भरपूर निवडणूक निधी देऊन नेत्यांनाच विकत घेत आहेत.म्हणुन सर्वच क्षेत्रातील संघटीत कामगारांचे जिंवन उध्वस्त झाले आणि होत आहे. भांडवलदार आणि उच्चवर्णीयांच्या गुलामगिरीतून असंघटीत कष्टकरी कामगार,मजुर,शेतमजुरनां मुक्त व्हायचे असेल तर त्यांनी सर्व प्रथम स्वबळावर संघटीत झाले पाहिजे.राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली संघटीत झाल्यामुळे आज कामगार,कर्मचारी देशोधडीला लागले आहेत.हे कोणी नाकारू शकत नाही.सेवा निवृत्त झालेल्या कामगारांच्या रिकाम्या जागा न भरता ठेकेदारी पद्धत सुरु होण्यास संघटीत कामगारांच्या ट्रेड युनियन जबाबदार आहेत.म्हणुन सर्वच क्षेत्रात ठेकेदारी पद्धतीने असंघटीत कामगारांचे शोषण मोठया प्रमाणात होत आहे.जे काम कायम स्वरूपी चालते,असते त्या कामासाठी ठेकेदारी देण्याचा प्रश्नच येत नाही.ते काम ठेकेदारी वर देणे म्हणजे भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीचे उघड समर्थन करणे होय!.यालाच महात्मा फुले यांच्या नेतृत्वाखाली रावबहादुर नारायण मेंघाजी लोखंडे यांनी विरोध करून देशव्यापी संप घडवुन आणला होता.हे आजच्या सर्व ट्रेड युनियन चालविणारे नेते विसरले आहेत.कारण आजच्या ट्रेड युनियन मनुवादी,हिंदुत्ववादी विचाराचे खंबीर समर्थक आहेत.त्यांना कामगार कर्मचाऱ्यात समानता नको आहे.तर मनुवादी जातीची विषमता म्हणजेच जातीव्यवस्थाच हवी आहे.यालाच बहुसंख्य पुरोगामी समाजवादी, आंबेडकरवादी कामगार कर्मचारी साथ देतात.यांचे जिवंत उदाहरण म्हणजे सर्वात मोठे कामगार कर्मचारी असलेलं सार्वजनिक क्षेत्र रेल्वे उधोग धंद्यामधील नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (NRMU )आणि सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (CRMS). यात बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकृत सभासद आहेत.त्यांना १२ व १३ फेब्रुवारी १९३८ मनमाड येथे रेल्वे गॅंगमन कामगारांच्या दोनदिवशीय कामगार परिषद मध्ये डॉ बाबासाहेबांनी सांगितलेले आजही त्यांना मान्य नाही.मग कामगार कर्मचाऱ्यांवर अन्याय अत्याचार होणारच !.

सुशिक्षीत व सुरक्षित नोकरी करणारे संघटीत असतात. म्हणून त्याच्या वर कोणी कधीच अन्याय, अत्याचार करीत नाही. तशी हिंम्मत कोणी ही करीत नाही.कुटूंबातील एक व्यक्ती सुशिक्षीत झाला तर त्याला सुरक्षीत नोकरी मिळते. नोकरी मिळाली की आर्थिक प्रश्न सुटतो. त्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक समस्यावर मात करता येते. असंघटित कष्टकरी गिरणी कामगारांना कामाचे तास नव्हते, आठवडयाची साप्ताहिक सुट्टी नव्हती. गिरणीत काम करताना गंभीर दुखापत झाली तर दवाखाण्याचा खर्च मिळत नव्हता.कामावर नाही तर पगार नाही. काम करून महिना झाला तरी कोणत्या तारखेला पगार मिळेल याची हमी नाही.या सर्व समस्यांवर असंघटित कष्टकरी गिरणी कामगाराचे नेते नारायण मेंघाजी लोखंडे यांनी गिरणी कामगारांना संघटीत करून गिरणी मालक संघा विरोधी संघर्ष करीत होते. मालक दाद देत नव्हते.तेव्हा त्यांनी ५५०० गिरणी कामगारांच्या सहया घेऊन फँकटरी कमीशनचे अध्यक्ष डब्ल्यु.बी. मुलक यांच्याकडे १५ ऑक्टोबर १८८४ रोजी पिटीशन दाखल केले होते.त्याचे फळ सहा सात वर्षाच्या संघर्षा नंतर १० जून १८९० ला मिळाले. त्यावेळी गिरणी मालक संघाने जाहीर सभा घेऊन त्यात नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुचविलेल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून मान्य केल्या.तेव्हा पासून म्हणजे १० जून १८९० पासून सर्व सार्वजनिक सरकारी कार्यालयांना कंपन्यांना उपक्रमांना रविवार ही साप्ताहिक हक्काची सुट्टी मिळत आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार मंत्री असताना कामगार कायदयात तशी कायमची तरतुद करून ठेवली. पण त्याची अंमलबजावणी आजही कुठेच होताना दिसत नाही.मग इंटक,आयटक,सिटू,बीएमएस,एच एम पी,सारख्या राष्ट्रीय ट्रेड युनियन काय करतात?.आजच्या अनेक सुशिक्षित व सुरक्षित नोकरी करणार्‍यांना नोकरदारांना याची माहिती नसेल?. असे म्हणता येईल काय?. त्यांनाच काय त्यांच्या कामगार संघटना, युनियन चालविणाऱ्या नेत्यांना सुध्दा रविवारची सुटटीचे जनक हे असंघटित कष्टकरी गिरणी कामगारांना संघटीत करणारे सत्यशोधक चळवळीचे माळी समाजाचे कुशल संघटक व कुशल वक्ते रावबहादुर नारायण मेंघाजी लोखंडे होते हे माहित नसावे?. असले तरी त्यांची कधीच वाच्यता करायची नाही.म्हणजे नोंद न घेता कमी लेखने नाही काय?.
आज देशातील अंसघटीत कष्टकरी कामगार, मजूरांनी त्यांच्या संस्था संघटना, चालविणार्‍यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्यापासून प्रेरणा घेवून संघटीत शक्ती निर्माण करण्याकरिता प्रयत्न केले पाहिजे.कामगाराच्या एकजुटीमुळे देशातील मोठयातमोठा भांडवलदार व उच्चवर्गीय प्रशासकीय अधिकारी संघटित शक्तीपुढेही झुकतो.हा इतिहास विशेष करून असंघटित कष्टकरी कामगार,शेतमजूर,नाका कामगार,घरकामगार व सर्व क्षेत्रातील कामगारांनी वाचला पाहिजे.

कारण देशात सर्वांत जास्त देशात ९३ टक्के असंघटीत कष्टकरी कामगार आहेत. त्यांनी १० जून १८९० हा असंघटित कष्टकरी कामगाराचा पहिला विजय दिवस म्हणून साजरा केला पाहिजे. महात्मा ज्योतीराव फुले यांची सत्यशोधक चळवळ ही देशातील तमाम ब्राम्हणेत्तर म्हणजे आजचे बहुजन,आदिवासी,मागासवर्गीय जाती जमातीतील कष्टकरी समाजाकरीता होती सर्व समाजाचे नेते विसरले आहेत.विशेष आंबेडकरी चळवळीतील बुध्दीजीवी साहित्यिक, कामगार नेते बहुजन, आदिवासी, भटक्यांना मागासवर्गीयांना कामगार मानत नाही. फक्त त्याची जात पाहतात.कामगार संघटना बांधताना त्यांना विशिष्ट विचारधारा पाहिजे. त्या शिवाय कामगारांना संघटीत करता येत नाही. कामगार म्हणून त्यांचे प्रश्न,समस्या, जाणून न घेता त्याची जात पाहून संघटना बांधू पाहणारे नेते न्याय मिळवून देतील काय? म्हणून आंबेडकरी चळवळीची विचारांची केंद्रस्थानी एकही संघटना मान्यताप्राप्त होऊ शकली नाही. ज्या असोसिएशन आहेत त्याचेही वैचारीक पातळीवर एकमत नाही.सर्व क्षेत्रातील संघटीत कामगारांची ही स्थिती असेल तर असंघटीत कामगारांची काय परिस्थिती असेल?. आज पर्यंत संघटीत कामगरांनी असंघटीत कामगारांना कामगार म्हणून पाहिले नाही. जो असंघटित कामगार नेहमीत काम नसल्यामुळे वार्षिक वर्गणी भरू शकत नाही तो आपली संघटना कसा चालवत असतील ?. त्याचे नेते बनण्याचे कोण धाडस करले? हे आज आपण पाहतो. ते धाडस नारायण मेंघाजी लोखंडे यांनी त्याकाळी केले.आज कष्टकरी कामगारांना अन्न,वस्त्र,निवारा,रोजगार,शिक्षण आणि आरोग्य हया माणसाच्या सहा मुलभूत गरजा भागविताना बहुजन समाजाचे खुप मोठया प्रमाणात शोषण होत आहे.या सर्व शोषित पिडीत समाज घटकाला संघटीत करून न्याय हक्क व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी महात्मा ज्योतीराव फुले यांचे सर्वोत्तम… शिष्य नारायण मेंघाजी लोखंडे अहोरात्र झगडत होते.ती सत्यशोधकाची चळवळ अनेक अंगाने देशातील कानाकोपर्‍यात पोहचली आहे.

गिरणी कामगारांना रविवार सुट्टी मिळू नये यासाठी गिरणी मालकांनी या देशातील भटा ब्राम्हणंना उच्चवर्णीयातील बुध्दीजींवीना कामगारात बुध्दीभेद करण्याच्या कामावर लावले होते.त्यानुसार गिरणी कामगारांना रविवार हा ख्रिश्चन धर्मियांचा दिवस आहे. त्यामुळे हिंदू असलेल्या गिरणी कामगारात चुकीचा प्रचार व प्रसार चालला होता. तेव्हा सरकार पुढे मोठा पेच निर्माण झाला होता.तेव्हा सरकारने बॉम्बे मिल हँडस मिल असोशिएनचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे यांना रविवार हा सुट्‌टीचा दिवस ठेवण्यामागची भक्कम कारणे व आवश्यकता याबाबत मत विचारले होते.सत्यशोधक चळवळीत काम करणारे लढाऊ नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी रविवार हा केवळ ख्रिश्चन धर्मियाचा दिवस नाही तर तो हिंदूचा ही धार्मिक दिवस आहे याचे ठोस पुरावे म्हणजे बहुजन समाजातील प्रसिध्द कुळ दैवत खंडोबा व कुलस्वामिनी या देवताचा रविवार हाच दिवस मानला जातो.बहुसंख्य गिरणी कामगार हे खंडोबाचे भक्त आहेत. परंतु केवळ या कारणाकरीता म्हणून रविवार संबध नाही. कारण भारतात ही चाल फार पुर्वी पासून आहे.ब्रिटीश प्रशासनाने सुरवातीपासून सर्व समाजाला सर्व वर्गाना, सर्व धर्मिंयाना सोयीचा सुट्टीचा दिवस म्हणून रविवार मानला असल्याने तोच दिवस कामगाराना सुट्टीचा दिवस असावा असे ठासून सांगितले.कार्यालयीन काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना रविवार सुट्टी तर कष्टकरी कामगारांना वेगवेगळया दिवशी सुट्टी.आजही आपल्या देशातील कंपन्या कारखाने व इंडस्ट्रीयल इस्टेट मधील गाला खात्याचे मालक आपल्या सोईने कामगार मजुरांना सुट्टी देतात.असंघटीत कष्टकरी कामगारांना तर हक्कांची सुट्टी नाही. ज्या दिवशी काम नसेल तोच त्याचा सुट्टीचा दिवस.आता पुन्हा १८८० सारखी परिस्थिती संघटीत असंघटीत कामगारांची होत आहे.याला केवळ राष्ट्रीय ट्रेड युनियन जबाबदार नाहीत. तर तो सर्व जाती धर्माचा कामगार कर्मचारी जो स्वतःला बहुजन,मागासवर्गीय समाज म्हणुन फक्त राजकीय आरक्षण घेण्यासाठी राजकीय पक्षाची गुलामी पत्करतो. पण पक्षाची ट्रेड युनियनची वैचारिक मांडणी, विचारधारा पाहत नाही. म्हणुन महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्य शोधणारी,सांगणारी व अंमलबजावणी करण्या करीता संघर्ष करणारी चळवळ उभी केली होती तीच स्विकारली पाहिजे होती.पण ती विस्कळीत का झाली.त्यांचे आत्मचिंतन करून काम केले.तर भारतातील बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांचे भविष्य उज्वल राहील.ज्यानी भारतात पहिली असंघटीत संघटीत कामगारांची संघटना काढून संघर्ष केला. इतिहास घडविणारे कामगार नेते भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादुर "नारायण मेघाजी लोखंडे" या थोर कामगार नेत्याच्या महान कार्यास, आजच्या (९ फेब्रुवारी) स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम !!!.

आपला
सागर रामभाऊ तायडे..९९२०४०३८५९.

निसर्ग कोणालाच माफ करत नाही सर्वांना समान न्याय देतो.

 निसर्ग कोणालाच माफ करत नाही सर्वांना समान न्याय देतो.


उन्हाळा सुरु झाला सरकार दररोज उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासापासून सावध राहण्याचे आवाहन करीत आहे.आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्वच सल्ले देतात.पण घरात बसून पोट कसे भरेल यावर कोणाकडे उतर नाही.कामाला गेल्या शिवाय पैसे मिळणार नाही.आणि पैसा नाही तर काहीच नाही.मग आरोग्याची काळजी कशी घेणार?. निसर्गाचे नियम कोणीच पाळले नाही. माणसांनी स्वार्थासाठी झाडे तोडली सरकारने म्हणजेच त्यांच्या प्रशासकीय अधिकारी वर्गाने स्वार्थासाठी नियम बाजूला ठेऊन झाडे तोडण्याची परवानगी दिली. त्यामुळेच निसर्गाचे पर्यावरण बदलले आता उष्णतेच्या झळा लागतात म्हणून कोण कोणाला दोष देत आहेत.
इमारती बांधण्यासाठी वीट,दगड,खळी सिमेंट लागते.कॉंक्रिट साठी खळी लागते खळीसाठी दगड लागतो.दगड खाण डोंगरात असते,त्यामुळे दगडखाणीसाठी डोंगर तोडले जातात. त्यामुळे साहजिकच झाडे नष्ट होत चालली.नदीतील रेती,वीटभट्टीसाठी माती यामुळे होणारे पर्यावरण समतोल असलेला निसर्गाचा नियम मोडल्या गेला.त्याचे परिणाम सर्वच भोगत आहेत.निसर्ग कोणालाच माफ करीत नाही.निसर्ग सर्वांना समान न्याय देतो. 
दगडात नको असलेला भाग काढून टाकला तर दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने निसर्गातील इतर गोष्टींकडे पहा.झाडे,नद्या,वारे,आकाश,जमीन आणि शेवटी माणूस. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.अडचणी समस्या कुणाला नसतात?.जन्मा पासून ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक अडचणीला,समस्येला उत्तर असतेच.ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसे. या तिन्ही गोष्टीं पालिकडचा समस्या अस्थित्वात नसतात.निसर्ग कोणालाच माफ करत नाही.निसर्ग सर्वांना समान न्याय देतो.
माणसांच्या दुःखाचे समाधान समोरच्या दुःख सांगणाऱ्या माणसाचं जर समाधान करायचं असेल, तर त्याला दिलासा द्यायची इच्छा ठेवा. पण तो जे बोलतो त्यातलं सत्तर टक्के तुम्हाला ऐकू येता कामा नये. कारण त्याच्या आयुष्यातल्या दुःखाला पुष्कळदा त्याचा मूर्खपणाच कारणीभूत असतो. तो जेव्हा ऐकू येत नाही तेव्हाच सहानुभूती दाखवणं शक्य होतं. तो जे बोलतो ते जर सगळं ऐकू आलं तर त्यालाच एक झापड मारावीशी वाटते.अनेक समस्या त्यावेळी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा लागतो. दुध गरम करतांना अचानकपणे म्हणजे आपण तंद्रीत असताना, कोणत्यातरी क्षणी लाट अंगावर यावी त्या वेगाने वर काठापर्यंत येते. तेव्हा चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचे सुचले पाहिजेदुध काठा बाहेर जाणे थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेवून ते खाली उतरवावे. तसच काही नाही तर अनेक समस्यांचे असते.
पशू माणसांपेक्षा श्रेष्ठ, पशू माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत कारण ते INSTINCT वर जगतात.वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही, किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का? आयुष्याचे "सुयोग्य व्यवस्थापन" असायला हवे.त्यासाठी जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेव्हा आर्थिक परिस्थती चांगली असेल तेव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा. यालाच आयुष्याचे "सुयोग्य व्यवस्थापन" असे म्हणतात.
उत्पन्ना पेक्षा खर्च जास्त झाला.तर हिशोब खर्च झाल्याचं दुःख नसतं. हिशोब लागला नाही कि भरून कसा काढावा याचा जास्त त्रास होतो.म्हणूनच खर्च करतांनाच विचार करून केला तर?.त्रास होणार नाही अडचण किंवा समस्या निर्माण होणार नाहीच.निसर्ग नियमांचे पालन करा,निसर्ग कोणालाच माफ करत नाही.निसर्ग सर्वांना समान न्याय देतो.
अडचणी समस्या किंवा प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी न कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. पळवाटा मुक्कामाला पोहचत नाहीत.मुक्कामाला पोहचतात ते सरळ रस्तेच.
नैसर्गिकरीत्या पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी,आपला हात वर पोहचत नाही व दुसऱ्याला नक्की जागा सापडत नाही अशी अवस्था जीवनात ही बऱ्याचदा होते.माणसांच्या मनातील गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला पोहचल्यावर तो आपलं स्वरूप प्रगट करतो.शस्त्रक्रिया होण्यापूर्वी प्रत्येक रोगी घाबरलेला असतो.आणि चांगला  झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो. म्हणजेच निसर्ग नियमांचे पालन न केल्यास निसर्ग कोणालाच माफ करत नाही.निसर्ग सर्वांना समान न्याय देतो.
भारत हा एकेकाळी कृषिप्रधान देश होता.आता तो स्मार्ट कॉंक्रीटच्या लादी स्टाई संगमवरी दगडाच्या सुंदर भव्य दिव्य देखाव्याचा देश झाला.त्यामुळेच उष्णतेच्या झळा घरात दारात जाणवायला लागल्या बाहेर फिरतांना प्रत्येक माणूस हा उष्णतेचा खूप त्रास होतो म्हणून निसर्गाला दोष देत असतो. स्मार्ट सिटीत राहणारे लोक भविष्यात शेती करणार नसतील तर कमीतकमी २० झाडे आजूबाजूच्या परिसरात लावण्याची व्यवस्था त्यांनी केली पाहिजे.अन्यथा हवामान बदलामुळे घरदार आणि परिसर बरबाद झाल्या शिवाय राहणार नाहीत्यासाठी झाडाचे महत्व समजून घेणे सुद्धा आवश्यक आहे.एक झाड पन्नास वर्षांत पस्तीस लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.एक झाड पंधरा लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.एक झाड चाळीस लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.एक झाड एका वर्षांत तीन किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.एक परिपूर्ण झाड एक हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.एक झाड मृत्यू नंतर तीन,चार शरीर जाळण्याचे काम करू शकते.एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान दोन अंशाने कमी करते.एक झाड बारा विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.एका झाडापासून कुटूंबासाठी लाकडी सामान तयार होते.एका झाडावर शंभर पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या पंचवीस पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.एक झाड अठरा लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.
एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते.एक झाड फळ,फुल,बिया आपल्या साठी देते.एक झाड पन्नास वर्षांत काय करते आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा मला पर्यावरणाचे फायदे आणि तोटे हे कोळसा बंदर शिवडी ला स्पेशल अधिकारी असतांना दर तीन महिन्याने सेमिनार मध्ये सांगितल्या जात होते.उष्णतेच्या झळा सोसत असतांना त्याची मुद्दामच आठवण झाली.ती वाचका समोर मांडली. झाडे का लावली पाहिजेत याचा जेणे करून प्रत्येक माणुस ह्याचा विचार करेल.आजच्या सारखी परिस्थिती राहली तर भविष्यात तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण सहा महिने पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.मग मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा कि असं कुठलं स्त्रोत्र तुमच्या कडे आहे ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो.तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट आँक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो.म्हणून तर निसर्ग नियमांचे पालन करा,निसर्ग कोणालाच माफ करत नाही.निसर्ग सर्वांना समान न्याय देतो.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.
अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना.संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य

 चिंतनशील दिपोत्सव

भारत हा कृषिप्रधान देश आहे, शेती आणि शेतीशी संबंधित सर्व आर्थिक उलाढाली त्यानाचं डोळ्यासमोर ठेवून पार पडला जातात. तरी मग देशातील शेतकरी आत्महत्या का करतो. सर्व शेतकऱ्यांचा धर्म हिंदूच आहे. सर्वांचे सण उत्सव एकच असतात. त्यात जात कधी आडवी येत नाही. शेतकऱ्यांचा कष्टकरी कामगार,कर्मचारी अधिकारी यांचा दिपावली एकच सण मोठ्या उत्सवात साजरा होतो,शेतकऱ्यांच्या घरात विविध प्रकारचे अन्न धान्य फळ फराळ येतात त्यामुळे घरात आनंद असतो,तसाच कामगार कर्मचारी अधिकारी यांना दिवाळीला बोनस सानुग्रह,बक्षीस मिळतात.देश किती ही संकटात असला तरी आमदार खासदार आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार,वेतनवाढ कधीच थांबत नाही.आणखी एक अजब प्रकार मान्यताप्राप्त आहे तो म्हणजे कांदा बाजार भावांवर ठरत असतो,कांदा महाग झाला तर वेतनवाढ मिळते,कांदा भाव कमी झाला तर वेतनवाढ कमी होत नाही तर तो स्थिर राहते.

    त्यांचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना भेटतो.कारण येथे ब्राह्मण वैश्य क्षत्रियांची दोस्ती युती आघाडी शेतकऱ्यांचे योग्य शोषण करण्याचे काम कृषिउत्पन्न समिती द्वारे चोख करते.देशभरात शेतकरी आत्महत्या का करतात त्यांचे चिंतनशील दिपोत्सव निमित्याने झाले पाहिजे.पण ते होत नाही.कारण लिहणारे साहित्यिक विचारवंत संपादक पत्रकार यांच्या वर्ण व्यवस्थेत शेतकरी व शेतकऱ्यांची जात बसत नाही.आणि माझ्या सारख्याने लिहले तरी त्याला प्रसिद्धी देणे हे त्यांच्या वैचारिकतेत बसत नाही.त्यामुळे आर्थिक वैचारिक हितसंबंधात बाधा येऊ शकते म्हणून ते प्रसिद्ध होत नाही.काही संपादक प्रसिद्धी देतात पण लगेच लेखाच्या शेवटी टीप देतात लेखकांचे हे व्यक्तिगत मत आहे त्याला संपादक सहमत नाहीत.तरी लेख प्रसिद्धीस दिला म्हणून त्याबद्ल त्यांचे हार्दिक अभिनंदन केलेच पाहिजे.

     भारतातील दिपावलीचा सबंध हिंदू धर्माच्या अनेक भाकड कथेशी जोडला जातो.कधी तो रामायण महाभारतातील वर्णसंघर्षाशी जोडला जातो तर कधी मनुस्मृती नुसार बळी राजा वामनाच्या तीन पावलाने आकाश,पातळ व्यापुन टाकतो.कधी तो संभाजी महाराजांना मनुस्मृती नुसार हलाहल करून मारतो आणि त्यांचे मुडके काठीला बांधून गांवभर मिरवणुकीत मिरवून घराघरावर आनंद उत्सव म्हणून गुढी उभारतो.दारात कंदील आणि दिव्याची माळ लावुन कोणता उत्सव साजरा करतो.हे कोणत्याही जाती धर्माचा माणूस शंभर टक्के सत्य सांगु शकत नाही.प्रत्येकांचे उत्तर एकच वाड वडिलोपार्जित परंपरा रितीरिवाज आहे,त्यांचे पालन केले पाहिजे.बाकी उत्सव पर्व समता स्वातंत्र्य बंधुभाव कुठेही दिसत नाही. प्रचंड प्रमाणात विषमता घराघरात भरली आहे.म्हणजेच एकत्र आनंद उत्सव नाहीच. चिंतनशील दिपोत्सवची ही झाली एक बाजू तर दुसरी बाजू 

         भारत देश हा फक्त आणि फक्त बौद्ध संस्कृतीचा देश होता.येथे ज्याही गोष्टी पर्वाच्या रुपात दिसतात ती फक्त बौद्ध संस्कृती आहे.हिंदू धर्मात कोणताही पर्व साजरा केलाच जाऊ शकत नाही,कारण ज्या समुहात विषमता आणि दु:ख;असते तिथे आनंद साजरा होत नसतो.पर्व तिथेच साजरे होतात जिथे समता असते.आणि समता फक्त बौद्ध धम्मात आहे. अन्य कोणत्याही धर्मात समता नाही.दिप फक्त बुद्धासमोर लावतात.मुळात दिपावली हा सण दिव्याच्या आनंदत्सोवचा आहे.हा हिंदूंचा सण नसून तो बौद्धांचा सण आहे.हिंदू धर्मात कोणताच सणच नाही.कारण हिंदु हा धर्मच नाही.हिंदू धर्मातील सण बौद्ध धर्मातील कॉपी पेस्ट आहे.हिंदू धर्मानुसार दिवाळीचे जे पाच दिवस कथा स्वरुपात दिले आहेत.त्या पूर्णत: काल्पनिक भाकड कथा आहेत.त्यातील कोणतीच गोष्ट सिद्ध करता येत नाही.लक्ष्मीपूजन, विष्णू,देव,नरकासुर या हास्यास्पद भाकड कथा आहेत.यांचा विज्ञानाशी तर्कसंगत तिळ मात्रही संबंध नाही.या भाकड कथानाच हिंदुनी त्यांचे सण मानून घेतलय. कोणतेही तर्कसंगत कारण नसतांना मराठा मागासवर्गीय ओबीसी स्वतःला हिंदू समजून हिदू धर्मीय सण साजरे करीत असतात. तिथे बौद्ध धम्मात सणांना कारण असते. विनाकारण कोणतीही गोष्ट घडत नाही. हाच बुद्धाचा प्रतीत्यसमुद्पाद सिद्धांत आहे.

        सणांची सुरवात भारतात बौद्ध संस्कृतीतून झाली आहे.सण तेव्हा साजरे केले जातात जेव्हा आनंद होत असतो आणि आनंद तिथे साजरा होत असतो जिथे सर्व बाबतीत समानता असते.हिंदू समाजात जोगोजागी विषमता असल्यामुळे तिथे सर्वानुमते आनंदोत्सव सणाच्या स्वरुपात साजरा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.म्हणूनच चिंतनशील दिपोत्सव हा सण साजरा करण्याचा उत्साहात कमी दिसत नाही. वाड वडिलोपार्जित परंपरा रितीरिवाज म्हणूनच तो पाळल्या जात असतो.आणि आहे.दिपावलीचे महत्व बौद्ध धम्मात आहे.अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यामुळे याच दिवसात तथागताच्या स्वागतासाठी जोगोजागी बुद्धाच्या अनुयायांनी लाखो दिवे लावून जनतेने आनंद साजरा केला होता.भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. इथला प्रमुख व्यवसाय शेती आहे. ग्रिष्म ऋतू नंतर शेतकरी,शेतीवर काम करणारे मजूर हे त्यांच्या पिकांना भाव देतात. तो महिना अश्विन महिना असतो. त्यामुळे शेतकरी व त्यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांजवळ जवळ अन्न धान्य पैसा येतो. त्यामुळे हे लोक दीप लावून,गोडधोड करुन,घरे सारवून उत्सव साजरा करतात त्याचे नांव दिवाळी. हे हजारो वर्षापासून सुरु आहे. भारताचे बहुतेक सण हे जमिन मालक आणि मजुरांवर वर आधारीत आहेत.या बाबतीत चिंतनशील दिपोत्सव हा सण साजरा केला जातो.

          बुद्ध काळात हा सन प्रज्ञावली म्हणुन साजरा केला जात होता. ही प्रथा राजा सम्राट अशोकानी तशीच पुढे चालू ठेवली.पुढे अशोकानंतर या पर्वावर प्रतिक्रांती झाली. या सणाची सुरवात अशोकाने इ.स. पुर्व २५७ ला केली होती. बुद्धाने ८४००० वचने प्रस्तुत केलीत म्हणुन सम्राट अशोकाने ८४००० हजार बौद्ध स्तूप बांधले असे दिपवंश म्हणतो हेच औचित्य लक्षात घेउन अशोकाने कार्तिक अमावस्येला जागोजागी दिपमाला आणि पुष्पमाला अलंकृत केले होते. रस्ते दिवे लाऊन सजविण्यात आले होते. ८४००० हजार स्तुपाप्रमाणे अशोकाने ८४००० दिप प्रज्वलीत केलेत. हा पर्व सतत सात दिवस चालला होता. भिक्कू आणि उपासकाना दान स्वरुपात धन देण्यात आले होते. म्हणुन तो दिवस दीपावलीचा धनोत्रय दिवस म्हणून साजरा केला गेला. कारण अशोकाने आपला संपूर्ण खजिना धम्मासाठी दान केला होता. (अधिक वर्णनासाठी पहा महावंश पान न. ४९) यामित्ताने प्रत्येक घर आणि विहार स्वच्छ करुन वंदना घेण्यात येत होत्या. या पर्वाच्या निमित्ताने प्रत्येक घराच्या आंगणात एक छोटे छोटे स्तुप बनविण्यात आलेत. आज आपण बहुसंख्य मराठा ओबीसी मागासवर्गीय समाजाच्या अंगणात जे वृंदावन,किल्ला,कुंडी हिंदूंच्या अंगनात पाहतो त्याचा इतिहास तोच आहे. या उत्सवाला देश विदेशची ८० करोड जनसंख्या आणि सोबत भिक्कू उपस्थित होते असे प्राचिन दिपवंश या ग्रंथात लिहिल्या गेले आहे.चिंतनशील दिपोत्सव केवळ कंदील दिवा लाऊन फटाके फोडण्यासाठी नसावा. त्यामागील सत्य इतिहास जाणून घेण्यासाठी असावा.

      श्रीलंका येथे आजही बौद्ध धम्माच्या मतानुसार दीपावली साजरी केली जाते. राजा तिष्यने याच कार्तिक अमावस्याच्या दिवसात बौद्ध धम्म दिक्षा घेतली होती आणि श्रीलंकेत आनंदोत्सव साजरा केला होता. चिंतनशील दिपोत्सव हा लेख लिहतांना खूप संदर्भ पाहिले वाचले.प्रत्येकात काळानुसार बदल जाणवला त्यातील मला जे योग्य वाटले तेच मी केला. दिवाळी म्हणजे चिंतनशील दिपोत्सव सर्व जाती धर्माच्या गरीब श्रीमंत माणसांच्या आनंदाचा सण असतो.तो निसर्गाने सर्वांना आपल्या परीने उत्सवात साजरा करण्याचा समान अधिकार दिला आहे.शेती करणारा शेत मजूर आणि शेतीचा मालक शेतकरी त्यांच्या उत्पनावर आधारित एकूण सर्व बाजार पेठ त्यातील दुकानदार कामगार मालक गिऱ्हाईक सर्वांचे हितसंबंध एकमेकात गुंतलेले असतात.त्यामुळेच प्रत्येक माणूस एकमेकाला ही दिवाळी सर्वांना आनंदाची सुख समृद्धीची जावे असे म्हणतो.म्हणजेच अज्ञान अंधश्रद्धा अंधार दिप प्रकशित करून नष्ट हो हीच कामना करून घरात दारात पणत्या लावतो.आणि उंच जागेवर कंदील लावतो.त्याचा उद्देश चिंतनशील दिपोत्सवाने प्रकाशमय हो हा असतो.असा सर्वाना समान न्याय समान अधिकार देणाऱ्या चिंतनशील दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.