शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

हिंसाचार का वाढत आहे?.

हिंसाचार का वाढत आहे?.
भारत हा ऋषि मुनींचा देश होता मग तो अचानक हिंसाचारी का झाला ?.हिंसाचार का वाढत आहे?.याचा विचार कोणी करणार आहे की नाही?.कोणत्या समस्या आहेत आणि त्या निर्माण कशा निर्माण होत आहेत?.बलात्कार व हिंसा अचानक वाढल्या नाहीत तर त्यामागे मोठे कुप्रसिद्ध प्रबोधन करणाऱ्या मालिका दिवसेंदिवस वेगवेगळ्या नांवाने समाजावर लादल्या जात आहेत.त्यांचे उत्तम उदाहरणे देता येतील.बलात्कार व थोड्याश्या भांडणातून खून हिंसा?. आज दूरचित्रवाणीवर, सिनेमा घरात राजा हरीचंद्र दाखविल्या जात नाही की ते पाहून तो व्यक्ती महान सदाचारी व्यक्ती बनुन आदर्श म्हणून ओळखल्या जाईल. आज टीव्ही चॅनल्सच्या चारशे साडेचारशे वाहिन्या चोवीस तास उघड्या नागड्या जाहिराती दाखवितात.त्यात केस तेल,साबण ते चप्पल पर्यंत जाहिराती बालवयात कोणते संस्कार व संस्कृती रुजविण्यासाठी काम करतात?. बालवयातील मुलंमुली उघड्या नागड्या अश्लील वीडियो, फोटो,अर्धनग्न फोटो फक्त पाहत नाही तर त्याचं पद्धतीने आजूबाजूला भाभी,अँटी,सिस्टर,फिरतांना पाहतात.त्यामुळे बालवयातील मुलामुलींचा पाहण्याचा दृष्टिकोन व मानसिकता बदली होतांना दिसते.मग त्या मानसिकतेला जबाबदार कोण?.प्राथमिक,माध्यमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी रेल्वे स्टेशनवर,ब्रिजवर किंवा रेल्वे ने प्रवास करतांना आजूबाजूला सह प्रवाशांची मोठी संख्या असतांना देखील अश्लील चाळे करतांना लोकलज्जा सोडून वागतात.त्या मुलामुलींना कोणाचीच भिती वाटत नाही?. तेच मग मोठे झाल्यावर बेजबाबदारीने वागतात.व हिंसक बनतात.त्यांची जबाबदारी समाजाला कायद्याला देता येत नाही.या मानसिकते मध्ये लहानाचे मोठे झालेले मुलंमुली लग्ना नंतर एकत्र कुटुंबात राहण्यास तयार नसतात. त्याला ह्या कुप्रसिद्ध प्रबोधन करणाऱ्या मालिका ते बनविणारे कलावंत,लेखक, दिग्दर्शक निर्माते जबाबदार असतात.असे लिहले तर चूक ठरणार नाही.आज देशात या बलात्कारी हिंसाचारी मनोवृत्तीने अधिकृतपणे कायदेशीर उचल खाल्ली आहे.त्यांचा योग्य फायदा राजकीय आशीर्वाद असलेले बाबा,महाराज,संत,बुवा बापु घेत आहेत.महाभारतातील शुशुपालचे शंभर अपराध पूर्ण झाल्याशिवाय त्याला मारता येत नाही.असे सांगणारी गीता सर्वाना माहिती आहे.तसेच या बाबा,महाराज,संत,बुवा बापु यांच्या अत्याचार अन्यायाला बळी पडणारी व्यक्ती जो पर्यत पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल करीत नाही,तो पर्यत भारतीय संविधानाची कायदेशीर कायदे कलम त्याला लागु शकत नाही.जेव्हा ती तक्रार दाखल होते तेव्हा त्या व्यक्तीला संविधानाची अंमलबजावणी करणारे अधिकारीच मोठे करीत राहतात.या बातम्या मसाला पध्दतीने दाखविल्या जातात.जे आई वडील नोकरी करीत असतील त्यांच्या घरात मुलगा मुलगी एकटे राहणे पसंद करतात.मग एकटा मुलगा किंवा मुलगी घरात टीव्ही, इंटरनेटचाच सहारा घेणार नां?.त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी घरात कोणी नसल्यामुळे तो ती अश्लील वीडियो आणि फोटो पाहिल्या शिवाय राहूच शकत नाही.तेच जर का एकत्र कुटुंब पद्धत असती तर मुलामुलींना घरात कायमस्वरूपी आजी, आजोबा,मग ते आईचे असो किंवा बापाचे असो घरात राहिले असते.त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याची नकळत पणे ते जबाबदारी त्यांनी पार पाडली असती.ज्यांनी स्वतःच्या आईवडिलांना सांबाळलेले नाही ते आपली मुलं आपल्याला सांबाळतील अशी अपेक्षा का करतात?.
एकत्र कुटुंबात आज आपण टीव्हीवर कोणत्या जाहिराती पाहू शकतो?.दार दहा मिनीटांनी सनी लिओन,बिपाशा बासू,अमृता अरोरा,मालिका,आलीय निरोधच्या जाहिरात काय दाखवितात?.त्याचं वेळी तो रणवीर सिंग शॅम्पू ची जाहिरात करतांना मुलगी पटविण्याचे आसन तरिके सांगणार.क्लोजप, लिम्का, थॉमशॉप हे पाहिल्यावर आपल्याला राग का येत नाही?.आपल्या लहान मुलामुली बरोबर किंवा नातवंडा सोबत मुजिकल चैनल पाहत असु तेव्हा दारू बदनाम कर दी, कुंडी मत खडकावो राजा,मुन्नी बदनाम हुई ,चिकनी चमेली, झेंडू बाम,तेरे साथ करुंगा गंदी बात या सारखे अनेक गाणे मुलामुलींना विचार करण्यासाठी मजबूर करतात.तेव्हा शब्दांच्या संगीताच्या सरमिसळीत आपल्याला राग येत नाही.तर मुलामुलींना नाचण्यास प्रोत्साहित करतो की नाही?.आईवडील, मुलसुना नातवंडां सोबत स्टार प्लस,जी टीव्ही,सोनी टीव्ही, पाहत असतांना हिरो,हिरोईन डोळ्यात डोळे घालुन किस करतात सुहाग रात ची सुरवात त्यामुळे कुटुंबातील सर्व अस्वस्थ होतात.तेव्हा कोणी लघवीला उठून जातो,कोणी किचन मध्ये पाणी पिण्यासाठी, कळत न कळत कोणीच काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही.तसेच भाभीजी घर पर है,जिजाजी छत पर है,हया सिरीयल खास त्याचं वर्गाला डोळ्यासमोर ठेऊन बनविल्या जातात.तारक मेहता का उलटा चष्मा ही तर खुप लोकप्रिय सिरीयल आहे,त्यात टप्पू चा बाप जेठालाल बबिता दिसली की कसा लालघोटे पणा करतो.ते आपण कुटुंबातील सर्वां सोबत पाहत तेव्हा कोणाला वाईट वाटत नाही.किंवा राग येत नाही.अशा टीव्ही मालिका आजच्या मुलामुलींवर कोणते संस्कार करतात?.
बलात्कार आणि हिंसा हे रोखण्यासाठी केवळ सरकारच जबाबदार म्हणजे पोलिस प्रशासकीय व्यवस्था, न्याय पालिका व्यवस्था यांची खुप महत्वाची जबाबदारी आहे. पण समाज व प्रिंट चॅनल मीडियाची काहीच जबाबदारी नाही?.अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नांवा खाली काही लिहले व दाखविले तरी चालेल ?.टीव्ही चॅनल वर मनोरंजनाच्या नांवा खाली काही दाखवा आम्ही ते चुपचाप पाहु हे भारतीय जनतेच झाले आहे?.राष्ट्रीय बातम्या सुरू असतांना ब्रेक येतो पहिली जाहिरात बॉडी स्प्रे ची त्यात मुलगी डोंगरा वरून पडते,दुसरी निरोध, तिसरी नेहा स्वाहा नॅपकिन स्नेहा चौथी गरोदर चेकअप मशीनची म्हणजे प्रत्येक जाहिरातीत नारी ती केवळ भोगाची वस्तू आहे तिचा वापर करा हेच सांगितल्या जाते. बलात्कार व हिंसा केवळ कायदे करून थांबनार नाही.त्यासाठी समाज व प्रिंट चॅनल मीडिया बदलने आवश्यक आहे.त्यामुळेच विद्यार्थी दशे पासुन मुलामुलींवर संस्कार ही मोठी माध्यमे करतात त्यातील सामाजिक,शैक्षणिक बदल अति आवश्यक आहे.तरच बलात्कार व हिंसा थांबु शकते.हिंसाचार का वाढत आहे?. यांचे मूळ माहिती असुन ही कोणी बंद करण्याचे धाडस करत नाही.कारण मार्केट,मार्केटिंग त्यातुन होणारे उत्पन्नात सर्व सहभागी झाले आहेत.भरडल्या जातात ते सर्व सामान्य जनता मग सर्वात जास्त बदल हा जनतेत अपेक्षित आहे.समाजात बदल होत नसेल तर बलात्कार व हिंसा करणाऱ्यांची संख्या वाढत जाईल म्हणूनच हिंसाचार का वाढत आहे?.या सार्वजनिक ठिकाणी चर्चा करणे आवश्यक आहे.
सागर रामभाऊ तायडे भांडुप मुंबई 9920403859,

कोराना महासंकटात असंघटीत कामगार

कोराना महासंकटात असंघटीत कामगार
देशाचे पंतप्रधान मान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शहरातील असंघटित कष्टकरी कामगार मजुरांचा विचार न करता केलेला लॉक डाऊन आज देश भरातील राष्ट्रीय महामार्गाने सैरभैर पळताना दिसत आहे.लहान मुलांना बायकांना घेऊन दोन तीनशे नव्हे तर हजारो किलोमीटर अंतर पायी चालत जाण्याचा प्रयत्न करीत आहे.
महाराष्ट्र शासन कोरोना या महासंकटाच्या विरोधात अनेक प्रकारे लढण्यासाठी सज्ज झाली आहे.त्यासाठी अनेक उपाय योजना आखत आहे. त्याची नागरिकांना माहिती देत आहे. पण राज्य व केंद्र सरकारने या 
   शहरातील इमारत बांधकाम करणाऱ्या असंघटित कामगार मजुरांचा थोडाही विचार केला नाही. राज्य सरकारने बिल्डर ठेकेदार यांना गृहीत धरून निर्णय घेतला. त्याच बिल्डर ठेकेदारांनी काम बंद आहे बाहेर निघा असा दमच असंघटित कष्टकरी कामगार मजुरांना दिला त्यामुळे त्यांना बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आत बाहेर च्या झोपड्या सोडण्यास ठेकेदारांनी भाग पाडले. सरकारने किती ही सांगितले की काम बंद असलेल्या दिवसांचा मजुरांना पगार मिळेल तरी बिल्डर ठेकेदारांनी ही जबाबदारी टाळण्यासाठी कामगार मजुरांना साईट सोडून जाण्यास सांगितले. त्यांचा परिणाम एकाच वेळी हजारोंच्या संख्येने असंघटित कामगार मिळेल त्या वाहनाने गांवी जाण्याचा प्रयत्न करीत आहे.
   मान.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री धीर गांभियाने निर्णय घेत आहेत. राज्यातील संचारबंदी आणि केंद्राचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं २१ दिवसाचे लॉक डाऊन या अचानक केलेल्या घोषणेमुळे राज्यातील लाखो असंघटीत कष्टकरी कामगार जे रोजंदारीवर काम करणारे, हातावर पोट भरणारे आहेत. इमारत बांधकामातील स्थलांतरित लाखो असंघटीत मजूर लॉकडाऊनमुळे  असुरक्षित बेरोजगार झाले आहेत. त्यांच्या समोर पुढील संकट बेरोजगारीचे व उपासमारीचे असणार आहे. ही आपत्ती कोरोना इतकीच गंभीर असणार आहे. आता रेल्वे व बसेस,एस टी वाहतूक बंद झाल्यामुळे स्थलांतरित असंघटीत कष्टकरी कामगार मजूर जागोजागी अडकून पडले आहेत. त्यांना काम नाही, राहण्यासाठी घर नाही, घरी गांवी परत जाता येत नाही व पोट भरायला अन्न धान्य कोणताही आधार नाही. म्हणूनच अशा कुटुंबांसाठी तातडीने काही मदत उपलब्ध करून आवश्यक आहे.या पार्श्वभूमीवर विविध राज्य सरकारांनी अन्नसुरक्षा व रोजगाराबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील तीन महिन्यांचे धान्य आगाऊ देणे, कांदे बटाटे रेशन दुकांनांवर उपलब्ध करणे, बायोमेट्रिक ची सक्ती न करणे आदि निर्णय घेतले आहेत. त्यांचे आम्ही स्वागत करतो परंतु 
त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा उभी नाही.मालवाहतूक करणारे वाहन चालक, गोडाऊन मध्ये गोण्याची चढ उतार करणारा माथाडी कामगार उपलब्ध नाही.हे सर्व कामगार कर्मचारी अधिकारी एकत्र आले तर कोरोनाचा संसर्ग विषाणू ला हवी असलेली साखळी आपोआप उपलब्ध होईल. त्यामुळे लॉक डाऊन चा अर्थच संपून जाईल.
असंघटित कामगार मजूर जेथे आहे तिथेच निवारा शेड उभारून त्यांना मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली तरच काही मार्ग मोकळा होऊन कोरोनावर मात करता येईल.
सर्व राज्या पेक्षा श्रीमंत व १,९१,००० दरडोई उत्पन्न असणारा महाराष्ट्र, आपल्या राज्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या असंघटीत कष्टकरी कामगारांचा व असुरक्षित मजुरांचा विचार अधिक उदारपणे का करत नाही असा प्रश्न उभा राहतो. म्हणूनच कोराना  महासंकटात अडकलेल्या असंघटीत कामगारांना  आश्वासन नको अंमलबजावणी हवी.
सागर रामभाऊ तायडे 9920403859,भांडुप मुंबई                                         

सांगा आम्हाला बिर्ला बाटा आणि टाटा कुठाय हो?.

सांगा आम्हाला बिर्ला बाटा आणि टाटा कुठाय हो?.
सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो ?.हे गाणे पुरोगामी महाराष्ट्र राज्यातील असंघटीत कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तोंडपाठ आहे. संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी भिडत आहे. देशावर देशातील माणसावर प्रेम करणारा प्रत्येक माणूस या संकटावर मात करण्यासाठी आपल्या परीने समाजसेवा करीत आहेत. पोलीस, डॉक्टर, नर्स,हॉस्पिटल,महानगरपालिका मधील सर्व कामगार,कर्मचारी आणि अधिकारी खूप महत्त्वाची सेवा देत आहेत. त्याचं बरोबर काही लोक असंघटीत कामगारांना भोजन देण्यासाठी कष्ट करून वेळ देत आहे. काही लोक आपल्या परीने अन्न धान्य देऊन आर्थिक मदत करीत आहेत.
यात बिर्ला, बाटा कुठे दिसले काय?. टाटा गोगरिबांसाठी काय करते.टाटा शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांचावर भर देते.योग्य शिक्षण मिळाले तर योग्य नोकरी, गंभीर आजार झाला तर टाटा हॉस्पिटल शिवाय पर्याय नाही. इतर आजारासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत गोरगरिबांना नियमितपणे दिली जाते. गोरगरिबांच्या मुलांना इलेक्ट्रिकल, वायरमन, प्लंबर,फिटर,टर्नल हे कॉर्सचे मोफत प्रशिक्षण दिल्या जाते. जेणेकरून त्यांना गांवात कुठेही रोजगार उपलब्ध होऊ शकते. गोरगरिबांच्यासाठी बिर्ला,बाटा काय करते ?. माहीत आहे काय?.नाही म्हणूनच असंघटित गोरगरिबांना संघटित करणारी चळवळ जाहीर पणे विचारते.सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठाय हो?.सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो ?.
कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारला मदत देण्यासाठी कोण पुढे आले. महिंद्रा,टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट, बजाज, हिरो मोटोकॉर्प या स्वदेशी उद्योगपतीच्या समूहांनी कोरोना मुक्तीसाठी भरघोस मदत देऊन आपला देश म्हणून आपली बांधिलकी जपली. टाटा सन्स व टाटा ट्रस्ट यांनी एकूण 1500 करोड ची मदत देऊन जाहीर केली. महिंद्रा इंजिन च्या प्लांट मध्ये अगदी स्वस्त दरात म्हणजे 7500 रूपया मध्ये व्हेंटीलेटर्स बनविण्याचे काम सुरु केले. बजाज आणि हिरो या कंपन्यांनी प्रत्येकी 100 करोड ची मदत केली. भारतात कार उत्पादनात अग्रेसर कंपनी मारुती सुझुकी आहे.मारुति चा इतिहास १९७० ला सुरु झाला आहे.जेव्हा खाजगीकरणाची सुरवात होती. "मारुति टेक्निकल सर्विस प्राइवेट लिमिटेड (MTSPL) १६ नोव्हेंबर १९७० ला झाली.तिचा मोठा राजकीय घोटाळ्याचा इतिहास आहे.पण मदतीचा हाथ प्रथम पुढे करायला का आली नाही.तर ती परदेशातील कंपनी आहे.मदत करायला पुढे आल्या त्या स्वदेशी कंपन्या आहेत. भारतीय नागरीकांनो टाटा,महिंद्राची कार साधी असेल पण ती माझ्या देशाची आहे. शेवटी देशाच्या रक्षणासाठी आपलेच पुढे आले आणि येतात.शेवटी रक्तांचे नाते मातृभूमी प्रेम असते. याचा विचार आपण एक देशवासीय म्हणून कधी करणार?. देशाच्या कंपन्या ज्या निर्मिती करतायत त्याकडे साफ दुर्लक्ष करून मारुती सुझुकी, ह्युंदाई, फोक्सवॅगन सारख्या गाड्या घेऊन आपण खरंच आपल्या देशातील ऑटोमोबाईल उद्द्योगाला कितपत सहकार्य करतोय ह्याचा आपण विचार करायला हवा. शेवटी अडचणीत सापडला कि आपलेच कामाला येतात हेच या स्वदेशी उद्योगांनी दाखवून दिले. पण आपण एक भारतीय देशवासीय म्हणून आपली जबाबदारी कधी ओळखणार?. असो यावर विचार नक्की करावा म्हणून हा लेखप्रपंच
साधी राहणी उच्च विचार सरणी जमशेदजी टाटा ते रतन टाटा पर्यत उद्योगातुन देशसेवा करने हेच उद्धिष्ट राहिले आहे. इतरांना ते जमणं शक्य नाही. ते आता देश विकून कमिशन मिळवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्यासाठी तयारीत आहेत, मग सांगा त्यांना उद्योगातुन देशसेवा करायची आहे काय?. त्यांना जाहीर पणे विचारले पाहिजे. सांगा बिर्ला बाटा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठाय हो?.तूर्त एवढेच......
सोबत दोन बोलके छायाचित्रे आहे.जमिनीवर बसलेला माणूस कधीच कमी पडत नाही, सतत कायदा सुव्यवस्था मोडून जातीजातीत तेढ निर्माण करण्याची भाषा बोलणारा किती नम्रपणे कोणाचे चरणस्पर्श करतो.
 
सागर रामभाऊ तायडे.९९२०४०३८५९.भांडूप,मुंबई

2 Attachments

मनाला सुन्न करणारी गोष्ट

मनाला सुन्न करणारी गोष्ट 
कोरोनाच्या भीतीमुळे इटली,स्पेन अमेरिका सारखे सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सज्ज असलेले देश कोलमडून पडले आहेत. त्यांच्या देशात सरकारने दिलेल्या सूचना तंतोतंत पाळल्या जातात म्हणून ते कोरोनाशी चिवटपणे संघर्ष करून तग धरून आहेत.या उलट भारतात आहे,कायदा फाट्यावर मारणारे सुदैव्याने राज्य व केंद्रात सत्तेवर आहेत.त्यांच्या सुचना कुठेही जनता गांभीर्याने घेतांना दिसत नाही. प्रत्येक राज्यातील शहरात पोलिसांना लाठी चार्ज करावा लागत आहे. तरी ही रोडवरील गर्दी कमी होतांना दिसत नाही हे इतर देशांच्या लोकांना मनाला सुन्न करणारी गोष्ट आहे.परदेशात असलेले भारतीय लोक आपल्या लोकांना सावधान करण्यासाठी दररोज वेगवेगळ्या भागातून व्हिडीओ क्लिप पाठवीत आहेत. तरी आपण भारतीय लोक त्या गांभीर्याने पाहत नाही आणि विचार ही करत नाही. कोरोना च्या गंभीर संकटावर चर्चा होण्या ऐवजी पोलिसांनी दंडे का मारले त्यांना हा अधिकार कोणी दिला यावर जागोजागी मात्र चर्चा होतांना दिसते. ही मनाला सुन्न करणारी गोष्ट आहे. 
 एक डॉक्टर मरण्या पुर्वी आपल्या घरी बायको,मुलांना भेटण्यासाठी जातो, बायको मुलांना गेट वर थाबूंन बाहेरून पाहतो.थोडी विचार पूस करतो. अणि निघुन जातो.हॉस्पिटल मध्ये गेल्यावर  निसर्गाच्या विज्ञानाच्या नियमानुसार या जगाचा निरोप घेऊन निघून जातोकिती दुःखाचा क्षण असेल तो की आपल्या बायकोची,मुलांची गळाभेट सुध्दा घेता आली नाही, ना प्रेम करता आले, ना पापी घेता आली आपल्या लेकरांची, ही मनाला सुन्न करणारी गोष्ट आहे कि नाही?.
 डॉक्टर हा शेवटच्या क्षणा पर्यंत मानवाचा जीव वाचविण्यासाठी विज्ञानाचा सहारा घेऊन कार्यरथ असतो पण हीच वेळ त्यांच्यावर आली तर तो सर्वच बाजूने विचार करून निर्णय घेतो,तो भावनिक होत नाही, आणि स्वता न घाबरता इतरांना घाबरून सोडत नाही.हाच आदर्श सुशिक्षित उच्च शिक्षित लोकांनी घेऊन भविष्यात वागले पाहिजे.डॉक्टर सुधीर देहरीया यांच्या सेवा भावी कार्याने जगाला एक मोठा आदर्श घालून दिला.ते नवीन पिढीला नेहमीच प्रेरणादायी ठरेल त्यांच्या या मानव सेवा मानाचा मुजरा.
दुसरी घटना अखंड मानवजात आपली कर्जदार असेल डाॅ हैदियो अली हे नांव नेहमी लक्षात ठेवा, हे मार्मिक चित्र त्यागाची प्रतिक आहे हे इंडोनेशियाचे डाॅ हैदियो अली यांचा शेवटचा फोटो आहे,जे कोराना बाधीत रूग्णांचा इलाज करता करता स्वत सक्रंमित झाले. जेव्हा त्यांना वाटलं की ते आता वाचु शकत नाही तेव्हा ते आपल्या घरी गेले, बाहेरूनच आपल्या घराच्या गेटवर थाबुंन आपल्या पतीला व दोन लहान चिमुकल्या मुलांना मन भरून पाहीले, आणि निघुन गेल्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सलाईन लाऊन ते इतर रुग्णांना तपासत होत्या डाॅ हैदियो अली हे माणसाच्या रूपात खरा सुपरहिरो ठरल्या आहेत, त्यांनी मानवजाती साठी दिलेले बलिदान व्यर्थ न जाण्या साठी आपण त्यांनी दिलेला संदेश पाळावा. कृपया आपल्या परिवाराच्या सुखी जीवनासाठी, तसेच देशासाठी,मानवजाती साठी घरीच रहा, कृपा करून बाहेर पडु नका.हीच खरी श्रध्दांजली असेल डॉक्टर सुधीर देहरीया आणि  डाॅ हैदियो अली सारख्या देवदुताला असेल.
दोनच डॉक्टर साध्य सोशल मीडियावर व्हायरल होतात पण असे शेकडो डॉक्टरनी मानवसेवा करताकरता देह त्याग
केला आहे. इटली स्पेन,इंडोनेशिया,अमेरिका आणि विशेष वुवान मध्ये असा लक्षवेधी घटना घडल्या पण त्यावर सरकारची सेन्सर शिप असल्यामुळे चर्चा नाही,फेसबुक, व वॉट्स अप असल्यामुळे ह्या घटना आपल्यास समजतात. भारतीय नागरिकांना सरकारने किती विनवण्या करून सूचना दिल्या तरी न जुमानता रोडवर फिरणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही.त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे म्हणजे परिस्थिती चिंताजनक आहे.
मनाला जे वाटल ते नियमितपणे लिहत असतो,वृत्तपत्राच्या संपादकांनी प्रसिध्द केले नाही केले तरी लिहत असतो. कृपा करून विनंती करतो काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबीयांची व देशाची!!!.
 आज संपूर्ण देश कोरोनाशी झुंज देत आहे. यात आघाडीवर आहेत अर्थातच डॉक्टर आणि त्यांचे सहकारी. तळहातावर शिर घेऊन हे योद्धे मैदानात उतरले आहेत. नोकरीचा भाग म्हणून काम करणं वेगळं आणि एक मिशन समजून त्यात स्वतःला झोकून देणं वेगळं जिथं विज्ञान थांबतं तिथं अध्यात्म सुरू होतं अशी शेखी मिरविणारे  कीडे-मकोडे-भिडे भारतात पायलीचे पंधरा आहेत. अन् अशा हॉस्पिटल बाहेर वेड्यांचे भक्त तर पावला पावलावर भेटतील.अशा बिनडोक गुरुजीच्या बडबडीने दुखी न होता विज्ञानाची कास धरत कोरोना संकटाचा हे योद्धे निडरपणे आणि समर्पित भावनेने मुकाबला करत आहेत. कारण ते जाणतात अध्यात्माचा अंतिम थांबा विज्ञानच असून आपणास थांबता येणार नाही.
संकट आल्याशिवाय माणसं देव आणि डॉक्टरांचा धावा करत नाहीत. ही मानवी प्रव्रुती होय. कदाचित म्हणूनच 'गरज सरो... वैद्य मरो...' ही म्हण रूढ झाली असावी. एकच वाटतं- कोरोनावर मात करायची असेल तर देवाचा धावा नव्हे; तर डॉक्टरात देव शोधा. त्यांचे मनोबल वाढवा.  कोरोनाला हरविण्यासाठी डोक्याला कफन बांधून लढणा-या डॉक्टर,नर्स आणि सर्व कामगार कर्मचारी वर्ग यांचा अभिमान वाटला पाहिजे. त्यांचे मानावेत तेवढे आभार कमी आहेत.
कोरोना संकाटला रोखले नाही तर मनाला सुन्न करणारी गोष्ट घटना घडेल याची कल्पना आहे काय ?.सरकारच्या सुचनाचे पालन नाही केले तर डॉक्टर आणि हॉस्पिटल बेड मिळणार नाही.भारत 135 कोटी लोकसंख्येचा देश84 हजार लोकांमागे 1 आयसोलेशन बेड, 36 हजार लोकांमागे 1 क्वारंटाईन बेड, देशात ॲलोपथी डाॅक्टर 11 लाख 54 हजार सरकारी रुग्णालयातील बेड्स 7 लाख ..आणखी तयार होत आहेत पण कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला तर नियंत्रण करणे अवघड होईल आणि डाॅक्टर, हाॅस्पिटल दोन्ही नाही मिळणार.म्हणूनच सर्वांनी 
सरकारच्या सूचना  पाळा.घरीच रहा !!  सुरक्षित रहा !!!.
जन्मापासुन ते मृत्युपर्यत माणुस जगण्यासाठी प्रत्येकाशी शर्यतीत धावत असतो आणि तिथे जो थांबला तो संपला.पण आज आयुष्यात पहिल्यांदाचं अशी शर्यत होतेय,जो थांबेल तोच जिंकेल.घरीचं थांबा,आरोग्य सांभाळा.लॉकडाऊन मुळे मला उमगलेल्या काही गोष्टी तुम्हाला पण अनुभव आलाच असेल.मी घरात बसून अत्यावशक सेवा देत आहे.निवांतपणे झोप येत नाही.सतत असंघटीत कामगारांचे मोबाईलवर कॉल सुरु असतात. मनाला सुन्न करणारया गोष्टी आहेत.सतत लिहणार आहेच.

सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.




इतिहासात विशेष पोलिस महानिरीक्षक (ना.ह.सं) विभागाचे
कैसर खालिद साहेबांचा कार्यकाल सुवर्णअक्षरांनी लिहला जाईल.
जातीच्या नांवा वर शिक्षणात व नोकरीत आरक्षणाची सवलत घेऊन उच्चपदस्थ झाल्यावर सर्व विसरतात.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते शासन कर्ती जमात बना!. म्हणजे आमदार,खासदार बना असा अर्थ नव्हता,तर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक अश्या मोख्याच्या जागी जाऊन बहुजन समाजाला न्याय हक्क व अधिकारी मिळवून द्या असा त्यांचा अर्थ होता.या परीक्षेत किती मागासवर्गीय,ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक अधिकारी पास झालेत?.
विशेष पोलिस महानिरीक्षक मा.कैसर खालिद साहेब यांनी नागरी हक्क संरक्षण विभागाची सूत्र हाती घेतल्यापासून आजपर्यंत या विभागात खुप सारे यशस्वी अमूलाग्र बदल केले आहेत.यु.पी.एस.कैसर खालिद यांचा जन्म 19 जुलै 1971 ला बिहार राज्यात झाला आहे.उर्दू भाषेवर प्रभुत्व असणारे खालिद साहेब उत्कृष्ट शायर आहेत.
विशेष पोलिस महानिरीक्षक झाल्यानंतर त्यांनी अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय व विभागीय स्तरावर कायद्याच्या प्रसार-प्रचारासाठी सर्व उपविभागीय पोलिस अधीक्षक, सहाययक पोलिस आयुक्त,पैरवी अधिकारी यांचे प्रशिक्षण स्वतः कैसर खालिद अतिशय उत्तमरीत्या घेतात. यामध्ये कायद्यातील तरतुदी,कायद्याचे समज-गैरसमज, तपासातिल त्रुटी,शासन निर्णय,परिपत्रके पावर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे शिकवतात.त्यामुळे  राज्यातील एट्रोसिटी ऍक्ट मध्ये शिक्षेचे प्रमाण वाढले आहे.
अत्याचार झालेला कोणताही पीडित व्यक्ती त्यांच्या विशेष पोलीस महानिरीक्षक ना.ह.स मुख्यालय मुंबई कार्यालयात गेला असता त्यांच्या शंकांचे निरसन करून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करायला लावणे हा त्यांच्या दिनचर्येचा एक भाग झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणताही अत्याचार पीडित व्यक्ती त्यांना भेटल्यानंतर अतिशय समाधानी दिसतो.जात,धर्म प्रांत,भाषा विसरून अन्याय,अत्याचार गस्त कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक पणे काम करणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
मंत्रालयातील प्रत्येक बैठकीत बौद्ध मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याकांच्या वरील अत्याचारात शिक्षेचे प्रमाण कसे वाढवता येईल आणि परिणामकारक अंमलबजावणी कशी होईल जलदगतीने न्याय कसा मिळवता येईल याबद्दल वस्तुनिष्ठ अहवाल सादर करून परखड मत व्यक्त करणारे खालिद साहेब अधिकारी आहेत.
त्यांच्या तीन वर्षांच्या काळात अनेक महत्वाची परिपत्रके काढलीत यामध्ये फिर्यादी व साक्षीदारांच्या अधिकारांच्या अंमलबजावणीचा तसेच शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठीचे परिपत्रकांचा समावेश आहे.महत्वाचे म्हणजे ही सर्व परिपत्रके पोलिसांच्या महापोलिस या वेबसाईटवर अपलोड केली आहेत त्यामुळे परिपत्रके सर्वांना मिळवणे सहज शक्य झाले आहे.
नागरी हक्क संरक्षण विभागात अनेक बदल केले आहेत यामध्ये जिल्ह्याच्या नागरी हक्क संरक्षन पथकाच्या अधिकाऱ्यांनी 24 तासांच्या आत घटनास्थळी भेट देऊन फिर्यादीचे सोबतचा फोटो वॉट्सअप वर पाठवणे पंधरा दिवसांनी पुनश्च भेट देऊन तपासाचा प्रगती अहवाल पाठवण्यासारखे आदेश आहेत.
या बरोबरच पोलिसांचे मानसिक आरोग्य व्यवस्थित राहावे त्यांनी ताण तनावांपासून मुक्त राहण्यासाठी कार्यशाळेत वेगवेगळे कार्यक्रम घेतात खरंच या नागरी हक्क संरक्षण खात्यात यापूर्वीही असे ऐतिहासिक काम कोणीही केलेले नाही. यापुढेही शक्य होईल असे वाटत नाही परंतु मा.कैसर खालिद साहेबांनी करून ठेवलेल्या कामामुळे नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा अशा प्रकारे काम करून दाखवावे लागेल.
हे मी अनुभवातून सांगतोय विशेष पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद हे पोलीस वर्दीतील देवमाणूस आहेत असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.त्यांचा कार्यकाल सुवर्णअक्षरांनी लिहला जाईल म्हणून कैसर खालिद साहेबांना आमचा क्रांतिकारी सलाम आहे

वैभव तानाजी गिते
राज्य सचिव
नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस महाराष्ट्र 
इमेल- vaibhav10484@gmail. com
मो.8530945857

पोलिसांना मदत करणे अत्यावशक आहे.



पोलिसांना मदत करणे अत्यावशक आहे. 
माणसांचे स्वरक्षण करण्यासाठी नेहमीच आपल्या कुटुंबापासून दूर राहून जनतेची सेवा करणारे म्हणजेच देशसेवा करणारे खाकी वर्दीतील माणसं म्हणजेच पोलीस.पोलीस हि माणसंच असतात त्यांना ही बायको,पोर, आईवडील आणि घरदार नातलग असतात.पण कोणताही सण,उत्सव,जत्रा, यात्रा,राजकीय पक्षांच्या जाहीर सभा,जनांदोलन,मोर्चे,निदर्शने, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त होणारे कार्यक्रम मिरवणूक,भव्यदिव्य शोभायात्रा,गणेशोत्सव, नवरात्र उत्सव एकूण कोणताही कार्यक्रम असो, त्याला पोलीस परवानगी आणि सुरक्षा व्यवस्था ही पाहिजेच पाहिजे,त्यांच्या शिवाय झालेला कार्यक्रम म्हणजेच गडबड, गोंधळ,चेंगराचेंगरी अनेक संकटांना आमंत्रण त्यातूनच होतात अपघात,मारामाऱ्या  खून सुध्दा शुल्क कारणावरून होतांना दिसतात. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जी संवैधानिक व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. ते पोलिस कायदा सुव्यवस्था, नागरिक हक्क न्याय मिळवून देण्यासाठी निर्भीड निर्भय निःपक्षपाती यंत्रणा सांबाळणारे माणसं म्हणजेच पोलीस आहेत.
जगात कोरोनाने प्रचंड थैमान घातला असतांना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशात जनता कर्फ्यु लागला, त्यांच्या बंदोबस्त साठी सकाळी सहा वाजता निघालेला नवरा रात्री 12.30 दमून घरी आला तर बायकोने थाळी वाजवून स्वागत केले. कारण देशातील तमाम नागरिकांनी २२ मार्चला पोलीस,डॉक्टर,नर्स,  महानगरपालिका कामगार,कर्मचारी यांचे आभार व्यक्त करण्यासाठी पांच वाजता थाळी टाळी वाजवण्याचा उपक्रम राबविला होता.पोलीस नवरा म्हणाला अग लोक झोपलीत नको वाजवू. ती थोडीशी हिरमुसली पण परत विचार केला लोक ऊठली तर ऊठली. आज माझ्या माणसासाठी मी वाजवणार. आणि तिने तस केलेही. नवरा पोलीस कुठे तरी सुखावला असणार. आत आल्यावर बायको आणि मुलाला डोळे भरून पाहत म्हणाला अग डब्यात चपाती शिल्लक आहे. तिने सकाळी थोडा जास्तीचा डबा दिला होता. आज सर्व बंद होते ना मग कोणी सहकाऱ्यांनी डबा नसेल आणला तर त्याची सोय म्हणून दिलेला डबा. बायकोने तो नवरा पोलीस अंघोळीला गेला. म्हणून तोवर हिने गरम भजी तळायला घेतली रात्री एक वाजता. होय रात्री एकला. काय भूक राहिली असेल बिचाऱ्याला पोलीस नवऱ्याची?. तसा आतून त्याने आवाज दिला. अग काय करतेस आता मला भूक नाही जास्त काही करू नकोस. मला वरण भात दे फक्त.हे ऐकून तिच्या जीवाची घालमेल झाली.दिवस भर टीव्ही वर बातम्या पाहून हीचा जीव आधीच घाबरा झाला होता. त्यांच्या काळजीमुळे अस्वस्थता वाटत होते,पण चेहऱ्यावर काही दाखविले नाही.दोन घास कसे बसे खावून तो झोपला. सकाळी लवकर जायचे सांगून.पण बायकोची झोप पळून गेली.
पोलिसांची बायको म्हणून आता पर्यंत तिने सर्व खुप बंदोबस्त पाहिले होते. पण आज तिला कधी नव्हे ती इतकी भीती वाटली. कदाचित 26/11 नंतर पहिल्यांदा.किती विचार आले मनात तिच्यात काय बदल झाला 26/11 नंतर सुद्धा. परिस्थिती आहे तशीच आहे.आणि आजही त्यांच्या कडे काठीच आहे दहशत वाद्यांच्या मशीन गण ला उत्तर द्यायला.आणि आता कोरोनाला लढा देण्यासाठी ना पुरेसे मास्क आहेत ना सॅनिटीझर ?. तसू भर ही बदल नाही झाला. चार दिवस टीव्ही वाहिन्यांनी तथाकथित तज्ञांनी आरडाओरडा केला. लोकांनी कँडल मार्च काढला. चार दिवस दुखवटा पाळला. पाचव्या दिवशी जैसे थे. नंतर साधे कोणी विचारायला ही आले नाही पोलिसांची परिस्थिती. मग त्यांचे कुटुंबाची विचारपूस तर लांब ची गोष्ट. बायकोला बाहेर जावून ओरडून सांगावे वाटले जनतेला आणि सरकारला आम्ही ही माणसे आहोत. आम्हाला ही भावना आहेत. आम्हाला ही भीती वाटते तुमच्या सारखी. आमचा माणूस गमावण्याची. या विचारात डोळ्यातून अश्रु आले कधी आले हे तिलाही नाही समजले.वाटले ऊठवावे त्यानां आणि सांगावे द्या सोडून ही नोकरी.पण लगेच तिने सावरले स्वतःला. तिला जवानांची पत्नी दिसली समोर. काय होत असेल तिचे बॉर्डर वर नवरा असताना. एकटीने सर्व सांभाळताना. आपला नवरा रोज ऊशिरा का होईना घरी येतो पण त्यांचं काय?. आणि तिला स्वताला अभिमान वाटला पोलिस पत्नी असल्याचा.सौ.सुप्रिया सुधीर तरटे पोलीस वसाहत कांदिवली चारकोप मुंबई यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.अनेक पोलीस मित्रांनी विनंती केली होती तायडे साहेब पोलीस मित्रांच्या बायकोने आपले दुःख मांडले त्यात भर घालून चांगला लेख लिहा. आम्ही माणसं आहेत हे आम्हाला का सांगावे लागते?.
भारतीय संविधानाच्या चौकटीत जनतेसाठी आम्ही तटस्थ आहोत. पोलिसांचे आदर्श वाक्य आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय एखादा गुन्हा घडल्यावर तक्रार कशी नोंदविली जाते, पोलीस गस्त घालतात म्हणजे नेमके काय करतात, ‘बीट मार्शल’ म्हणजे काय आणि ते काय काम करतात. पोलीस ठाणे व एकंदर पोलीस दलाविषयी सर्वसामान्यांच्या मनात असणारी अनामिक भीती दूर करून नागरिक व पोलीस यांच्यात सुसंवादाचा पूल बांधण्याचा प्रयत्न समाजातील सामाजिककार्य करणाऱ्या समाज सेवकांनी केला पाहिजे. पोलिस जनतेचे जवळचे मित्र आहेत.पोलीस यंत्रणेचे कामकाज, त्यांच्याविषयी असणारे गैरसमज दूर व्हावेत, जनमानसात या दलाची प्रतिमा उजळावी, नागरिक तसेच पोलीस यांच्यातील संवादाची दरी भरून निघाली पाहिजे.
पोलीस ही माणसां सारखे माणस आहेत. ते आपल्या मर्जीने कधी सुट्टी घेऊन घरी राहू शकत नाही.कुटुंबातील व्यक्ती आजारी आहे,मुलामुलीचे लग्न आहे.कुटुंबातील कुण्या नातलगाचा मूत्यू झाला तरी हि काही वेळा त्यांना सुट्टी मिळत नाही.त्यांना नेहमीच अत्यावशक सेवा म्हणून कामावर हजर राहावे लागते.आता कोरोनाच्या भिती मुळे सर्व कामगार,कर्मचारी अधिकारी यांना सक्तीची सुट्टी दिली असतांना.पोलीस मात्र जनतेच्या सेवे साठी चौका चौकात उभे आहोत.तरी ही काही लोक त्यांना सहकार्य करण्या ऐवजी हुज्जत घालतात.लोकांमुळे हा त्रास पोलिसांना सहन करावा लागत आहे.पोलीस समजावून सांगत असतांना ऐकत नसतील तर त्यांनी हात बांधून बाजूला गेले पाहिजे काय?. नंतर हेच लोक म्हणतील पोलीस इमानदारीने काम करीत नाही म्हणून लोक रस्त्यावर आले. काही लोक पोलिसांना शिव्या देतात ?मी एक पोलीस महाराष्ट्रातील तमाम जनतेला एक प्रश्न विचारतो त्यांचे जनतेने,वाचकांनी मला उतर द्यावे. काही व्यक्ती पोलिसांना आई,बाप,बहीण यांच्या वरून शिव्या देतात.त्याचा व्हीडीवो आमच्या घरातील आई,बाप,मुलगा,मुलगी,भाऊ,बहीन नातलग पाहत असतील तर त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल. जेव्हा पोलिसांची मुले विचारतील पप्पा ते तुम्हाला शिव्या का देतात, पप्पा तेतुम्हाला मारत का आहेत?. पप्पा तुम्ही तर पोलिस आहात ना?. जनतेचे रक्षक तरी अस का होतंय पप्पा?. तेव्हा मुलाला काय उत्तर द्याचे?. 
कोरोना रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉक डाऊन केले.सर्व प्रशासकीय यंत्रणा आपले कर्तव्य म्हणून सेवा देत आहे. कारण नागरिकांना कायमस्वरूपी सेवा देण्यासाठी नोकरी मिळाली होती.ते त्यांना मान्य होती म्हणूनच सेवा देत आहे.किती सहन करणार पोलीस यंत्रणा. ते फक्त आदेशाचे पालन करीत आहे. पोलीस हि माणसं आहेत. त्यांना ही माणूस म्हणून जगण्याचा मुलभूत अधिकार आहे.तुम्हीच सांगा ते जीवावर उद्धार होऊन जनतेची सेवा करण्यासाठी रस्तावर उभे आहेत.त्यांच्या कुटुंबातील लोकांना त्यांची काळजी वाटत नसेल काय ?. जनतेने म्हणजेच लोकांनी पोलिसांना सहकार्य करणे अतिशय अत्यावशक आहे.जे दोनचार लोक पोलिसांना शिवीगाळ,मारहाण करीत असतील त्यांना वेळीच आवर घाला त्या दोनचार लोकांमुळे सर्व समाजाला दोषी ठरवता येणार नाही याची काळजी त्या त्या समाजाच्या सामाजिक,राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे.पोलीस मारतानाचे व्हीडीवो जास्त शेयर होता. पण पोलिसातील माणूस आणि माणुसकी जागी आहे. ते वेळोवेळी गोरगरिबांना मदत करण्यासाठी धावून जातात हे मात्र फार कमी शेयर केल्या जाते. पोलीस नेहमी संकट समयी मदत व सहकार्य करण्यासाठी असतात. पोलिसांना नेहमी सहकार्य केले तर न्याय हक्का अधिकार मिळण्यास मदत होते.आणि कायद्यावर बोट ठेऊन वागला तर कायद्याने द्या कायद्याने घ्या ही वागणूक पोलीस देतात.आजच्या परिस्थितीत पोलिसांना मदत करणे माणसाच्या भविष्यासाठी अत्यावशक आहे. कोरोना नियंत्रणाच्या बाहेर गेला तर माणसाला वाचविण्यासाठी कोणीच पुढे येणार नाही.पोलीस हि माणूस आहे.त्यांना हि पत्नी मुल कुटुंब आहे. याची जाणीव ठेवून सहकार्य करावे.शेवटी पोलीस ही माणस आहेत.ही वाचकांना नम्र विनंती.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.भांडूप मुंबई

डियर फुलटायमर काॅम्रेड बुध्दप्रिय कबीर

डियर फुलटायमर काॅम्रेड बुध्दप्रिय कबीर
२०१४ साली माफुआ को-कोर्डिनेशन कमिटिची बैठक होवुन सत्यशोधक जनआंदोलनाच्या वतीने वाढत्या मागासवर्गीय समाजा वरील अत्याचाराच्या विरोधात " अँटिकास्ट बाईकर्स मार्च खैरलांजी - खर्डा- मुंबईचे आयोजन करण्यात आले आणि त्याच्याच प्रचारा प्रसारादरम्यान सत्यशोधक जागर कला मंच च्या धुळे युनिटच्या कार्यकर्त्यांना औरंगाबाद, बुलढाणा, परभणी या जिल्ह्यांची प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली. तसा आमचा चळवळीतला जिल्ह्या बाहेरील हा पहिलाच प्रवास होता. ज्यामध्ये काॅम्रेड मनोज नगराळे, काॅम्रेड जितेंद्र अहिरे, काॅम्रेड विजय वाघ आणि मी औरंगाबाद शहरात पोहचलो तसं.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नाव फक्त वाचनात आणि जेष्ठ कार्यकर्त्यांकडुन नामांतर लढ्याच्या संदर्भात ऐकुन होतो , पण ह्या प्रचारा दरम्यान प्रथमच विद्यापीठ जवळून पाहण्याचा योग आला. तेथील स्थानिक कार्यकर्ते काॅम्रेड किशोर उघडे, काॅम्रेड दिपक कसाळे यांनी विद्यापीठातील पीएचडी वस्तीगृहात आमच्या मुक्कामाची सोय केली होती. वस्तीगृहात पोहचल्यावर ९ नंबरच्या खोलीत काही कार्यकर्त्यांची नियोजन संदर्भात बैठक चालु होती तसे ते त्यातले काही चेहरे हे आम्हां चौंघासाठी अनोळखीच होते. त्यातला एक चेहरा पाहुन काॅम्रेड जितेंद्र अचानक थांबला आणि माझ्या कानात येवुन "अरे राक्या मी यांना ओळखतो यांच्या बद्दल मी एका मासिकात वाचलं आहे काॅम्रेड भिमराव बनसोडे यांनी यांच्या विषयी लिहलं आहे" तसा जितेंद्र एक वाचन प्रेमीच आणि बोट दाखवुन मला लांबुन त्यांचा चेहरा दाखवु लागला. अंदाजे सहा- साडे सहा फूटाचा धिप्पाड देह,सावळा रंग, लांब सडक कुर्ता, दाढी वाढलेली, खांद्यावर शबनम, डोक्याला बांधलेले चौकटी नक्षीदार मफलर. पण जितुला नेमकं त्यांचं नावच आठवेना. बैठक संपल्यावर काही वेळात काॅम्रेड किशोर उघडे नीं आमची ओळख त्यांच्याशी करुन दिली . तसं त्यांच्या बद्दल आम्हाला एक आदरयुक्त भितीच होती. पण त्यांनी आमच्या जवळ येवुन आपुलकीने परिचय सुरु केला आणि आमचा परिचय झाल्यावर त्यांनी स्वता त्यांचा परिचय करुन दिला. एक पहाडी आवाज " मी काॅम्रेड बुध्दप्रिय कबीर , औरंगाबाद मध्ये असतो आणि चळवळीचा पुर्णवेळ कार्यकर्ता आहे" पुर्ण वेळ कार्यकर्ता हा शब्द मी पहिल्यांदा ऐकला होता. त्याच दिवशी सायंकाळ पासुन आमचं प्रचाराचं काम सुरु झालं ब्रिजवाडी, जैठंकरनगर, चिकलठाणा, भिमनगर (कांता हाॅटेल) , औरंगपुरा, अशा शहरातली विविध वस्त्या आम्ही सोबत मी पिंजुन काढल्या. काॅम्रेड मनोज नगराळेंच्या आवाजातील दलिता रं हल्ला बोल ना, हे गाणं ऐकतांच त्यांच्या जोशपुर्ण भाषणाला सुरवात व्हायची, काॅम्रेड विजु शिकणाऱ्या भावा रं गाण्याचं कडवं विसरताच त्या पुढंच कडवं स्वता बुध्दप्रिय पुढे येवुन म्हणत आम्हाला सावरुन घ्यायचे. वस्तीत त्यांची गाडी येताच त्यांच्यावर प्रेम करणारा गोतावळा जमा व्ह्यायचा. किंबहुना जेष्ठ मंडळी लांबुनच जोरात हाक द्याची *काॅम्रेड जय भीम* आणि तेव्हा कळलं कि चळवळीत पुर्ण वेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची हिच खरी संपत्ती.अशी कोणतीच वस्ती नव्हती जिथे काॅम्रेड बुध्दप्रिय यांना लोक ओळखत नव्हती. खुप गप्पा रंगायच्या विद्यापिठातील विद्यार्थी आंदोलने, मागासवर्गीय समाजा वरील अत्याचार आंदोलनातील किस्से, कोंबिंग ऑपरेशन मधील अंगावर शहारे आणणारे प्रसंग, त्यांच्यावर झालेले हल्ले. सर्व चर्चा सत्र झाल्यावर ते आम्हाला त्यांच्या नेहमीच्या खानावळीत घेऊन जायचे खानावळ तरी काय हो मिल काॅर्नर च्या बाजूला बिर्याणीची लाॅरी वाला *पच्चास रुपये में पेट भर के* पण त्यांच्या अशा वागण्यातुन एक गोष्ट प्रामुख्याने जाणवत होती कि , ते तब्येतीची अजिबात काळजी घेत नसत. कधी भुक मारण्यासाठी दिवसाला आठ- नऊ वेळा चहा पिणे, पुरेशी झोप न घेणे. पण अर्ध्या रात्री जरी त्यांना एखाद्या अत्याचाराची घटना कळली तरी तिथे तात्काळ पोहचतांना आम्ही पाहिले आहे. तसा आमचा सहवास पाच ते सहा दिवसांचा होता पण प्रचारा पासुन तर अॅन्टिकास्ट बाईकर्स मार्चच्या समारोपा पर्यंत त्यांना दिलेली जबाबदारी त्यांनी अतिशय चोख पणे पार पाडली. आम्ही चौघही आयुष्यात काॅम्रेड कसा असावा, कसा जगावा, सारच त्यांच्या कडे पाहुन जवळुन शिकलो. आयुष्यभर अविवाहित राहुन कुटुंबाची तमा न बाळगता समाजालाच आपलं कुटुंब करून चळवळीत झटणारा पुर्ण वेळ कार्यकर्ता. आज आरामाची नोकरी करुन हजार- पाचशेची नोट देणगी देवुन चळवळीत छाती फुगवून फिरणारे अनेक कार्यकर्ते आहेत. पण चळवळीत शोषणमुक्तीचे ध्येय घेऊन लढणारे आणि आपले आयुष्यपणाला लावणारे काॅम्रेड बुध्दप्रिय कबिरांसारखे कार्यकर्ते आहेत म्हणून हि चळवळ जिवंत आहे. शोकांतिका वाटते प्रत्येक बुध्दप्रिय चळवळीतुन अमर झाल्यावर त्याचे महत्त्व इतरांना कळते. काॅम्रेड बुध्दप्रिय कबीर यांना जर श्रद्धांजली द्यायची असेल तर काही भल्या मोठ्या पोस्ट लिहु नका, त्यांच्या सोबतच्या सेल्फी, फोटो टाकुन बडेजाव पणा नाही केला तरी चालेल , पण फक्त एकच काम करा आपल्या चळवळीत पुर्ण वेळ काम करणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांची कदर करा, त्यांच्या वेदना जाणुन घ्या, त्यांच्या बिकट समयी मदतीचा आणि हक्काचा हात पुढे करा, एखाद्या आंदोलनासाठी त्याच्या हातात ठेवलेल्या पैशांवर उपकाराची भावना ठेवु नका, आरोप- प्रत्यारोपाच्या काळात अफवांच्या लाटेवर विश्वास न ठेवता त्याने केलेला संघर्ष डोळ्यासमोर ठेवा , हिच खरी आपल्याकडुन काॅम्रेड बुध्दप्रिय कबीर यांना खरी श्रद्धांजली असेल....
राकेश अहिरे
(राज्य सचिव ,सत्यशोधक विद्यार्थी संघटना,महाराष्ट्र)