डियर फुलटायमर काॅम्रेड बुध्दप्रिय कबीर
२०१४ साली माफुआ को-कोर्डिनेशन कमिटिची बैठक होवुन सत्यशोधक जनआंदोलनाच्या वतीने वाढत्या मागासवर्गीय समाजा वरील अत्याचाराच्या विरोधात " अँटिकास्ट बाईकर्स मार्च खैरलांजी - खर्डा- मुंबईचे आयोजन करण्यात आले आणि त्याच्याच प्रचारा प्रसारादरम्यान सत्यशोधक जागर कला मंच च्या धुळे युनिटच्या कार्यकर्त्यांना औरंगाबाद, बुलढाणा, परभणी या जिल्ह्यांची प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली. तसा आमचा चळवळीतला जिल्ह्या बाहेरील हा पहिलाच प्रवास होता. ज्यामध्ये काॅम्रेड मनोज नगराळे, काॅम्रेड जितेंद्र अहिरे, काॅम्रेड विजय वाघ आणि मी औरंगाबाद शहरात पोहचलो तसं.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नाव फक्त वाचनात आणि जेष्ठ कार्यकर्त्यांकडुन नामांतर लढ्याच्या संदर्भात ऐकुन होतो , पण ह्या प्रचारा दरम्यान प्रथमच विद्यापीठ जवळून पाहण्याचा योग आला. तेथील स्थानिक कार्यकर्ते काॅम्रेड किशोर उघडे, काॅम्रेड दिपक कसाळे यांनी विद्यापीठातील पीएचडी वस्तीगृहात आमच्या मुक्कामाची सोय केली होती. वस्तीगृहात पोहचल्यावर ९ नंबरच्या खोलीत काही कार्यकर्त्यांची नियोजन संदर्भात बैठक चालु होती तसे ते त्यातले काही चेहरे हे आम्हां चौंघासाठी अनोळखीच होते. त्यातला एक चेहरा पाहुन काॅम्रेड जितेंद्र अचानक थांबला आणि माझ्या कानात येवुन "अरे राक्या मी यांना ओळखतो यांच्या बद्दल मी एका मासिकात वाचलं आहे काॅम्रेड भिमराव बनसोडे यांनी यांच्या विषयी लिहलं आहे" तसा जितेंद्र एक वाचन प्रेमीच आणि बोट दाखवुन मला लांबुन त्यांचा चेहरा दाखवु लागला. अंदाजे सहा- साडे सहा फूटाचा धिप्पाड देह,सावळा रंग, लांब सडक कुर्ता, दाढी वाढलेली, खांद्यावर शबनम, डोक्याला बांधलेले चौकटी नक्षीदार मफलर. पण जितुला नेमकं त्यांचं नावच आठवेना. बैठक संपल्यावर काही वेळात काॅम्रेड किशोर उघडे नीं आमची ओळख त्यांच्याशी करुन दिली . तसं त्यांच्या बद्दल आम्हाला एक आदरयुक्त भितीच होती. पण त्यांनी आमच्या जवळ येवुन आपुलकीने परिचय सुरु केला आणि आमचा परिचय झाल्यावर त्यांनी स्वता त्यांचा परिचय करुन दिला. एक पहाडी आवाज " मी काॅम्रेड बुध्दप्रिय कबीर , औरंगाबाद मध्ये असतो आणि चळवळीचा पुर्णवेळ कार्यकर्ता आहे" पुर्ण वेळ कार्यकर्ता हा शब्द मी पहिल्यांदा ऐकला होता. त्याच दिवशी सायंकाळ पासुन आमचं प्रचाराचं काम सुरु झालं ब्रिजवाडी, जैठंकरनगर, चिकलठाणा, भिमनगर (कांता हाॅटेल) , औरंगपुरा, अशा शहरातली विविध वस्त्या आम्ही सोबत मी पिंजुन काढल्या. काॅम्रेड मनोज नगराळेंच्या आवाजातील दलिता रं हल्ला बोल ना, हे गाणं ऐकतांच त्यांच्या जोशपुर्ण भाषणाला सुरवात व्हायची, काॅम्रेड विजु शिकणाऱ्या भावा रं गाण्याचं कडवं विसरताच त्या पुढंच कडवं स्वता बुध्दप्रिय पुढे येवुन म्हणत आम्हाला सावरुन घ्यायचे. वस्तीत त्यांची गाडी येताच त्यांच्यावर प्रेम करणारा गोतावळा जमा व्ह्यायचा. किंबहुना जेष्ठ मंडळी लांबुनच जोरात हाक द्याची *काॅम्रेड जय भीम* आणि तेव्हा कळलं कि चळवळीत पुर्ण वेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची हिच खरी संपत्ती.अशी कोणतीच वस्ती नव्हती जिथे काॅम्रेड बुध्दप्रिय यांना लोक ओळखत नव्हती. खुप गप्पा रंगायच्या विद्यापिठातील विद्यार्थी आंदोलने, मागासवर्गीय समाजा वरील अत्याचार आंदोलनातील किस्से, कोंबिंग ऑपरेशन मधील अंगावर शहारे आणणारे प्रसंग, त्यांच्यावर झालेले हल्ले. सर्व चर्चा सत्र झाल्यावर ते आम्हाला त्यांच्या नेहमीच्या खानावळीत घेऊन जायचे खानावळ तरी काय हो मिल काॅर्नर च्या बाजूला बिर्याणीची लाॅरी वाला *पच्चास रुपये में पेट भर के* पण त्यांच्या अशा वागण्यातुन एक गोष्ट प्रामुख्याने जाणवत होती कि , ते तब्येतीची अजिबात काळजी घेत नसत. कधी भुक मारण्यासाठी दिवसाला आठ- नऊ वेळा चहा पिणे, पुरेशी झोप न घेणे. पण अर्ध्या रात्री जरी त्यांना एखाद्या अत्याचाराची घटना कळली तरी तिथे तात्काळ पोहचतांना आम्ही पाहिले आहे. तसा आमचा सहवास पाच ते सहा दिवसांचा होता पण प्रचारा पासुन तर अॅन्टिकास्ट बाईकर्स मार्चच्या समारोपा पर्यंत त्यांना दिलेली जबाबदारी त्यांनी अतिशय चोख पणे पार पाडली. आम्ही चौघही आयुष्यात काॅम्रेड कसा असावा, कसा जगावा, सारच त्यांच्या कडे पाहुन जवळुन शिकलो. आयुष्यभर अविवाहित राहुन कुटुंबाची तमा न बाळगता समाजालाच आपलं कुटुंब करून चळवळीत झटणारा पुर्ण वेळ कार्यकर्ता. आज आरामाची नोकरी करुन हजार- पाचशेची नोट देणगी देवुन चळवळीत छाती फुगवून फिरणारे अनेक कार्यकर्ते आहेत. पण चळवळीत शोषणमुक्तीचे ध्येय घेऊन लढणारे आणि आपले आयुष्यपणाला लावणारे काॅम्रेड बुध्दप्रिय कबिरांसारखे कार्यकर्ते आहेत म्हणून हि चळवळ जिवंत आहे. शोकांतिका वाटते प्रत्येक बुध्दप्रिय चळवळीतुन अमर झाल्यावर त्याचे महत्त्व इतरांना कळते. काॅम्रेड बुध्दप्रिय कबीर यांना जर श्रद्धांजली द्यायची असेल तर काही भल्या मोठ्या पोस्ट लिहु नका, त्यांच्या सोबतच्या सेल्फी, फोटो टाकुन बडेजाव पणा नाही केला तरी चालेल , पण फक्त एकच काम करा आपल्या चळवळीत पुर्ण वेळ काम करणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांची कदर करा, त्यांच्या वेदना जाणुन घ्या, त्यांच्या बिकट समयी मदतीचा आणि हक्काचा हात पुढे करा, एखाद्या आंदोलनासाठी त्याच्या हातात ठेवलेल्या पैशांवर उपकाराची भावना ठेवु नका, आरोप- प्रत्यारोपाच्या काळात अफवांच्या लाटेवर विश्वास न ठेवता त्याने केलेला संघर्ष डोळ्यासमोर ठेवा , हिच खरी आपल्याकडुन काॅम्रेड बुध्दप्रिय कबीर यांना खरी श्रद्धांजली असेल....
राकेश अहिरे
(राज्य सचिव ,सत्यशोधक विद्यार्थी संघटना,महाराष्ट्र)
(राज्य सचिव ,सत्यशोधक विद्यार्थी संघटना,महाराष्ट्र)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा