डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची स्वतंत्र मजदूर युनियन कुठे आहे?.
भारतात कामगार,कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या सामाजिक,आर्थिक अन्याय-अत्याचाराला वाचा फोडनु त्यांना अधिकाधिक आर्थिक लाभ मिळवून देण्याकरीता आणि त्यांचे जीवनस्तर उंचविण्यासाठी कामगार चळवळ ( ट्रेड युनियन मुव्हमेंट ) औधोगिक करणाच्या कालखंडात म्हणजे अठराव्या शतकात जगभरात निर्माण झाली. भारतात या असंघटीत कष्टकरी कामगार चळवळीची सुरवात महात्मा ज्योतीराव फुले यांच्या सत्यशोधक विचारांच्या माध्यमातून रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांनी १८८४ साली केली. मुंबईतील असंघटीत गिरणी कामगारांची संघटना "बॉम्बे मिल हंड्स असोसिएशन " ही भारतातील पहिली कामगार संघटना आहे. त्यांनी उभारलेल्या कामगार आंदोलनामुळे भारतीय कामगारांना साप्ताहिक भरपगारी सुटी १० जून १८९० पासून मिळण्यास सुरु झाली.त्यांच्या क्रांतिकारी संघर्षामुळे भारतातील कामगार कर्मचारी यांचे कामाचे तास कमी झाले.स्त्रीयांना रात्रपाळीत काम करण्यास बंदी आली,बालकामगारांना शिक्षणाची संधी मिळाली.कामगारांना श्रमाचे मूल्य व सामाजिक सुरक्षितता मिळाली.म्हणूनच रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे खऱ्या अर्थाने जनक आहेत.पण जगातील कामगारांनो एक व्हा म्हणणारे तसे मानत नाही.
जगातील कामगारानो एक व्हा असे सांगणारे तेव्हा कुठे होते?. जागतिक कामगार संस्था (ILO ) १९१९ ला स्थापन झाल्या नंतर जगभरातील कामगार चळवळी मध्ये राजकीय जाणीवा निर्माण झाल्या.त्यामुळेच कॉंग्रेसने १९२० ला ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस (AITUC) ची स्थापना केली.त्यांनी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या समाज क्रांतीकारी विचाराना दूर सारून असंघटीत कष्टकरी गोरगरीब कामगारांच्या सामाजिक,आर्थिक शोषणाला तिरांजली दिली.कॉंग्रेस हे भांडवलदारांचे समर्थक असल्यामुळे देशातील सर्व कामगारांना त्यांनी गुलाम बनविले.त्यामुळे देशात आज बहुसंख्य कामगार कर्मचारी देशोधडीला लागले.ज्या कामगार कर्मचारयांना समता,स्वतंत्रता,आणि बंधुभावाच्या न्यायहक्काची जी आधारशिला आवश्यक होती,ती पद्धतशीरपणे बाजूला सारल्या गेली.त्याचा परिणाम देशातील तमाम असंघटीत कष्टकरी श्रमिक,शेतकरी, शेतमजूर, कामगार,कर्मचारी यांच्या शोषणावर ठोस उपाय आजच्या प्रस्थापित कामगार संघटना,ट्रेड युनियन आणि त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील महासंघ,फेडरेशन करू शकल्या नाहीत.त्यातून मार्ग काढण्याची इच्छा त्यांना नाही.कारण त्या ब्राम्हणशाही व भांडवलशाही चे समर्थक आहेत.
महात्मा ज्योतीराव फुले यांच्या सत्यशोधक विचारधारेचा धागा पकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित,शोषित,पिडीत,वंचित समाजातील सर्व मजूर,शेतमजूर,कामगार कर्मचार्यांना संघटीत होण्यास सांगितले होते.१९३४ ला त्यांनी मुंबईतील सफाई कामगारांना संघटीत करून त्यांची संघटना बांधली.१९३६ ला त्यांनी बृहन्मुंबई पालिकेची निवडणूक लढविली १७ उमेदवार उभे करून 13 उमेदवार सफाई कामगारांच्या बळावर निवडून आणले.असंघटीत कामगार संघटित होऊन राजकारणात उतरले तर राजकीय पक्षाचे समीकरण बदलू शकतात.हे त्यांनी दाखवुन दिले.त्यांचा तो आदर्श आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी आणि कामगारांनी घेतला नाही,
१२ व १३ फेबुवारी १९३८ रोजी मनमाड येथील अस्पुश्य रेल्वे गंगमन कामगार, कर्मचारी यांच्या परिषेद मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी ठाम पणे सांगितले होते की भारतीय कामगारांचे ब्राम्हणशाही व भांडवलशाही हे दोन शत्रू आहेत हे कायम लक्षात ठेवा.त्या करिता दलित,शोषित, पिडीत,वंचित समाजातील सर्व असंघटीत मजूर,शेतमजूर,कामगार कर्मचाऱ्यानी स्वताच्या कामगार संघटना विनाविलंब निर्माण करण्याचे सांगितले होते,त्यांच्या आदेशाचे आज पर्यंत पालन आंबेडकर चळवळीतील नेत्यांनी, बहुसंख्य मागासवर्गीय समाजातील कामगारांनी केलेल नाही. कामगाराच्या हितासाठी तुम्ही संघटन उभारले पाहिजे. यात काही किंतु नाही. परंतु तेवढेच पुरेसे नाही. तुम्ही राष्ट्रीय उद्दिष्टासाठी संघटीत झाले पाहिजे. कामगार संघटनानी राजकारणात शिरलेच पाहिजे. कारण शासन सत्तेवाचून कामगारांच्या हिताचे स्वरक्षण करणे अशक्य आहे.संघटनेच्या शक्तीला कायद्याच्या शक्तीची जोड मिळावयास हवी. तुमची संघटना उभारण्याच्या जोडीलाच तुम्ही देशाच्या राजकारणात भाग घेतल्याशिवाय हे घडू शकत नाही.स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या तत्वावर आधारलेली नवी पध्दती स्थापन करणे हे तुमचे ध्येय असले पाहिजे. याचा अर्थ समाजाची पुनर्रचना आणि अशा प्रकारची पुनर्रचना समाजात घडवून आणणे हे कामगार वर्गाचे प्राथमिक स्वरूपाचे कर्तव्य आहे. परंतु कामगार वर्ग हे ध्येय कसे साध्य करून शकेल? राजकीय शक्तीचा परिणामकारक उपयोग झाल्यास याबाबतीत ते निश्चितच एक शक्तीशाली साधन ठरते. मग त्यांनी राजकीय शक्ती साध्य केली पाहिजे.कॉंग्रेस पासून स्वतंत्र स्वतःचा असा वेगळा राजकीय पक्ष कामगारांनी स्थापन करावा, असा सल्ला देण्यास मला मुळीच हरकत वाटत नाही.जो पक्ष वर्गहिताच्या, वर्गजाणिवेच्या पायावर आधारलेला असेल, अशा पक्षामध्ये तुम्ही सामील व्हावे. ही कसोटी लावून पाहिल्यास तुमच्या हिताच्या विरोधी नसलेला, मला माहीत असलेला पक्ष, स्वतंत्र मजूर पक्ष हाच आहे. असा स्पष्ट कार्यक्रम असलेला तो एकच पक्ष असून कामगाराच्या हिताला सर्वोच्च स्थान देतो, त्याचे धोरण सुनिश्चित आहे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे, खंड १८, भाग २) डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच भाषणात म्हणतात की, ‘कम्युनिस्टांपेक्षा कामगारांचा अधिक नाश दुसर्या कोणीही केला नाही. कामगार संघटनेचा मात्र निश्चितच सर्वनाश केला. अशाप्रकारच्या निरर्थक चळवळीपासून यापेक्षा अधिक काय अपेक्षा करता येण्यासारखी आहे? आगीचा भडका उडवून देण्याच्या प्रयत्नात आपल्या स्वतःच्या घराचीही काळजी न घेणार्या आगलाव्या सारखाच कम्युनिस्ट माणूस सिध्द झालेला आहे. ”तरीही एका आंबेडकरवादी राजकीय पक्षामध्ये वरच्या पदावर काम करणारा व्यक्ती एका कम्युनिस्ट प्रणीत कामगार संघटनामध्ये वरच्या पदावर कसे काय काम करु शकतो?. पुढार्यांच्या अशा विसंगत वागणुकीला काय म्हणावे? त्यांनी पहिल्यांदा बाबासाहेबांच्या विचाराचा अभ्यास करावा.नंतरच कामगार चळवळीचे नेतृत्व करावे, तरच बाबासाहेबांच्या विचाराची खर्या अर्थाने पेरणी होऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ९ नोव्हेंबर १९४२ रोजी मुंबई आकाशवाणी केंद्रावर मजूरमंत्री या नात्याने भाषण केले. या भाषणात ते म्हणतात की, “देशाला अचूक नेतृत्व देण्याची गरज आहे. हे नेतृत्व कोण देऊ शकतो? हे नेतृत्व फक्त कामगारवर्गच देऊ शकतो, असे मला वाटते. नवी समाज रचनाच कामगारांचे आशास्थान असते. त्यासाठी कामगाराच योगदान करू शकतात आणि या दिशेनेच भारताचे राजकीय भवितव्य ते साकार करू शकतात.” तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र लिहिणारे लेखक धनंजय कीर, पान क्रमांक ३७७ वर लिहितात की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मद्रास विभागातील मराठा रेल्वे कामगारांनी मानपत्र दिले, त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय सत्ता काबिज करणे ही गोष्ट कामगार संघ स्थापन करण्यापेक्षा अधिक महत्वाची आहे असे म्हटले होते.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कारकुनां पेक्षा मोक्याची जागा हस्तगत करणारे अधिकारी वर्ग अधिक पाहिजे होते. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटीश कालीन भारताचे गवर्नरजनरल लॉर्ड लिनलिथगो यांना उच्च शिक्षणाकरीता स्कॉलरशिपची मागणी करतांना म्हणाले होते की, “मला राजवाड्याच्या टोकावर बसणारी माणसे हवीत. कारण तेथून सर्वत्र टेहळणी करता येते. आपल्या लोकांचे संरक्षण करायचे असेल तर अशी पारध करणारी माणसे निर्माण झाली पाहिजेत. कारकून काय करणार?” परंतु अधिकारी वर्गांनी याचे भान ठेवलेले दिसत नाहीत.म्हणून आज देशात उच्च शिक्षित उच्चपदाधिकारी असून ही कामगार संघटनेचे आणि राजकीय पक्षाचे नेतृत्व करणारे कुशल वक्तृत्व,नेतृत्व आंबेडकरी चळवळीत नाही. आज जे काही नेतृत्व आहे ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहे,ते केवळ समाजाची टक्केवारी सांगून टक्केवारी वसूल करून घेणारी एक टोळी आहे. तिच्या कडे स्वतःचा कोणताही कृती कार्यक्रम नाही.
एस टी, एस सी,आणि ओ बी सी समाजातील बहुसंख्ये संघटना हया ट्रेड युनियन म्हणून काम करीत नाही,तर वेल्फेयर बोर्ड, असोशिएशन म्हणून सामाजिक,धार्मिक कार्य म्हणजे जयंत्या,सहा डिसेंबर ला भोजन दान करण्याचे काम करतात,पगार वाढ, बोनस,पदउन्नोत्ती, इतर कायदेशीर लढाई करीता त्यांना दुसऱ्या मान्यता प्राप्तयुनियन ची मदत घ्यावी लागते.त्यामुळे हे नांव जरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे घेत असतील तरी सनदशिर मार्गाने यांना युनियनची वार्षिक वर्गणी त्यांना द्यावी लागते, त्या पैसावर कॉंग्रेस,कम्युनिस्ट,भाजपा ची प्रत्येक शहरात कार्यालय थाटलेली आहेत त्यात फुलटाईम काम करणारा कार्यकर्ता असतो,तो प्रामाणिक पणे चळवळी साठी काम करतो.आंबेडकरी कामगार चळवळी कडे फुलटाईम कार्यालय आणि कार्यकर्ता कुठे आहे?.लेटर हेड वर जगणारा कार्यकर्ता, नेता कामगारांना न्याय मिळवुन देण्यास असमर्थ ठरतो,
कामगारा मध्ये मागासवर्गीय समाजाचे प्रमाण सर्वच क्षेत्रात बहुसंख्य आहे तरी त्यांची स्वतःच्या विचारधारेची संघटना,युनियन नाही,राज्य,देश पातळीवर कामगारांच्या युनियनचे नेतृत्व करणारे नेते नाहीत,ज्यांना कामगार कायद्याची तोंड ओळख नाही ते राष्ट्रीय नेतृत्व कसे करतील?.ते तर भांडवलदार आणि राजकीय सत्ताधारी पक्षाची दलालीच करणार.उत्तम उदाहरण म्हणजे जॉर्ज फर्नाडिस नंतर रेल्वेच्या युनियन चे नेतृत्व हुसेन दलवाई,रामदास आठवले यांच्याकडे आल्यावर रेल्वे कामगारांचे संघटन वाढून कामगारांचे कल्याण झाले की संघटन कमकुवत झाले?.संघटित कामगारांचे हे वास्तव आहे,मग असंघटीत कामगार संघटना युनियन चे काय असेल?.
देशात कामगार दिन साजरा केला जातो,राज्यात कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा केला जातो यात आंबेडकरी चळवळीचे योगदान मोठे आहे, पण त्याचा आदर्श आज आंबेडकरी समाजाला आणि राजकीय नेतृत्वाला नाही,त्या करीता या लेखा सोबत मी तीन वेगवेगळ्या असंघटीत कामगारांच्या आंदोलनात सहभाग घेऊन मला पाठिंबा देणारे स्वतःच्या पक्ष,संघटनेच्या वतीने असंघटीत कामगारा बाबत कधी कुठे कोणती भूमिका घेतात काय?. यांचा वाचकांनी बोध घ्यावा म्हणजे यांचे आंबेडकरी चळवळीच्या नेत्याचे कामगार संघटना, युनियन बाबत काय काम आहे,हे दिसुन येईल.म्हणून म्हणतो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची स्वतंत्र मजदूर युनियन कुठे आहे?.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा