आयु.बाळासाहेब उर्फ प्रकाश यशवंतराव आंबेडकर यांच्या (जन्म १० मे १९५४) वाढदिवसा निमित्य विशेष लेख
आंबेडकरी चळवळीचे राजकीय वारसदार.
आंबेडकरी विचारांची क्रांतिकारी राजकीय चळवळ राज्यातच नव्हे तर देशात दिशाहीन झाली आहे. आंबेडकरी विचारांच्या राष्ट्रीय नेत्या मायावती दलित आहेत की बौद्ध?. देशाचा राष्ट्रपती दलित आहे पण आंबेडकरी विचारांचा बौद्ध नाही.महाराष्ट्रात डॉ बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व इतरांना दिले ज्यांनी घेतली त्यांनी आपली ओळख जपली त्यानुसार आचरण केले,त्यामुळे त्यांच्यात क्रांतिकारी बद्दल झाला. मागासवर्गीय बौद्ध झाले,नंतर बहुजन नंतर मूलनिवासी २०१८ नंतर वंचित झाले त्यामुळेच राज्यातील वंचित बहुजन समाजाच्या घराघरातील माणसाच्या मेंदूत आज ही आपली ओळख कायम असावी अशी अपेक्षा आहे.गेल्या वर्षी वंचित बहुजन आघाडीच्या तुफान जाहीर सभानी सर्व बहुजन समाजातील राजकीय गटबाजी जवळ जवळ संपल्यात जमा होती. त्यामुळेच आंबेडकरी चळवळीचे राजकीय वारसदार एकमेव बाळासाहेब उर्फ प्रकाश यशवंतराव आंबेडकर ठरले होते. आंबेडकरी चळवळीचे खरे रक्ताचे वारसदार ते आहेतच. पण आपण खऱ्या अर्थाने वैचारिक चळवळीचे राजकीय वारसदार झाले पाहिजे अशी अपेक्षा आज ही कायम आहेच.
बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकीय भूमिकेमुळे राजकीय समीकरण बदलली होती. तो बदल समाजवादी, डाव्यांना जवळ धरून झाला नव्हता. केवळ प्रसिद्धी मिळत होती. तेच हवा निर्माण करीत होते. हे सर्वच मान्य करतात. तो बदल काही अर्थाने आता खऱ्या अर्थाने पूर्ण झाला असे म्हणता येईल. आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तो आणखी स्पष्ट झाला.
मागासवर्गीय समाजातील लोक बहुजन म्हणूनच जवळ आले.विशेष बुलढाणा,अकोला वाशीम जिल्ह्यातील बौद्ध समाजावर होणारे हल्ले,अन्याय, अत्याचार करणारे कोण आहेत हे पाहिल्यावर, आपले एकूण संघटन,बौद्ध महासभा,भारिप बहुजन महासंघ आणि डाव्या चळवळीशी असलेला घरोबा कुठे तरी कमी पडतो असे वाटत होते.त्याचे सत्यशोधक पद्धतीने आत्मपरीक्षण करून त्यातील काही प्रश्न आपल्या वाढदिवसा निमित्य आपल्या भक्त आणि शिष्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न मी दरवर्षा प्रमाणे यावेळी ही करतो. सत्यशोधक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून समाजाबद्दल चळवळी बद्दल जी चिंता वाटते ते शब्दबद्ध करून मांडण्याचा प्रयत्न करतो. कारण आंबेडकरी चळवळीत अनेक बुद्धिवादी,विचारवंत, लेखक, पत्रकार,साहित्यिक आहेत.पण त्याच्या मध्ये एका गोष्टीचा अभाव आहे.तो म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात नाही.सत्य मांडल्यावर समाज काय म्हणेल?. कोण काय करेल ?. बहुसंख्येने असलेला भक्त,समाज नाराज होईल.याची त्यांना भिती वाटते. म्हणून ते सत्याला सत्य म्हण्यास लिहण्यास घाबरतात. हे आपणच (विचारवंतां कडून अपेक्षा -आंबेडकर चळवळ संपली आहे.पण नंबर ३६ वर ) म्हटले आहे. त्यामुळे हा नियम मला लागू नाही.कारण मी प्राध्यापक,वकील, इंजिनियर,साहित्यिक,विचारवंत नाही. एक असंघटित कामगारांना संघटित करता करता संघटित कामगार चळवळीत काम करणारा कार्यकर्ता नेता आहे. आणि अब्राम्हणी सत्यशोधक मासिकातून लिहता लिहता वृत्तपत्रात पत्रलेखन लिहायला लागलो.क्रांतिकारी विचारांच्या चळवळीची दिशा व दशा यावर सत्य शोधक नजरेतुन चिंतन आणि परीक्षण करून लिहायला लागलो.परिणामाची पर्वा न करता.कारण नेत्या पेक्षा,पक्ष संघटना मोठी असते,पक्ष संघटना पेक्षा विचारधारा.पण आज नेता सर्वांपेक्षा मोठा झाला आहे.
प्रकाश आंबेडकर यांचा जन्म १० मे १९५४ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे प्रकाश हे नाव त्यांचे आजोबा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ठेवलेले होते. १९७२ मध्ये ते मुंबईतील सेंट स्टॅनीसलायस हायस्कूल मधून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर इ.स. १९७८ मध्ये त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालय वडाला येथे बी ए पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे इ.स. १९८१ मध्ये त्यांनी सिद्धार्थ विधी महाविद्यालयात एल एल बी पदवी मिळवली होती.समाजकारण धम्मकारण आणि राजकारण यांचे वातावरण त्यांच्या घरात कायमस्वरूपी होते. सम्यक क्रांती आंदोलन, गांव तिथे भारतीय बौद्ध महासभा आणि भूमिहीन शेतमजुरांच्या प्रश्ना साठी जनजागृती आणि आंदोलन १९८२ पासुन सुरु केले होते. गायरान,पडीत,वनविभागाच्या जमीन ताब्यात घेऊन कसायला लावून शेतमजुरांचे अल्पभूधारक शेतकरी केले. त्याच्या त्या कसलेल्या जमिनी नांवावर (सातबारा )करण्यासाठी "भूमिहीन हक्क संरक्षण समिती स्थापन" केली होती. त्यामुळे बाबासाहेबाच्या लढ्यातील एका सेनापतीच्या अर्धवट राहिलेल्या लढ्याला आपण एक वेगळी दिशा देण्याचे काम हाती घेतले होते. "कसेल त्याची जमीन नसेल त्याचे काय?." या घोषणेने राज्यच नव्हे तर संपूर्ण देश ढवळून निघाला होता.तोच धागा पकडून आपण राजकारण नको समाजकारण हवे त्याच्या समाज परिवर्तनातून राजकारण करू असाही आपला संकल्प होता. त्यामुळे राज्यातील नव्हे तर देशातील मागासवर्गीय, शोषित, पिडीत,आदिवाशी समाज तुम्हाला अंधार नष्ट करणारा नवा सूर्य प्रकाश म्हणत होती.सूर्याची किरण वरून खाली येतात. लोकसभा,विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे उगवत्या सूर्याचा प्रकाश घरात नव्हे तर मेंदूत गेला होता. त्यामुळेच इतर पक्षात काम करणारा कार्यकर्ता व मागासवर्गीय ओबीसी,शोषित,पिढीत भटक्याविमुक्त समाज जवळ आला होता.निवडणुकीतील अनुभवा नंतर तो किती सोबत राहिला यांची माहिती संघटना बांधणी मुळे होऊ शकते.
आदरणीय ऍड बाळासाहेब आंबेडकर भारिप बहुजन महासंघाचे राष्टीय अध्यक्ष झाल्यावर " माझा पक्ष,माझी सत्ता " घोषणा दिली.आणि मी आंबेडकरी चळवळीतील राजकीय निळ्या आकाशातील चमकणारे तारे आहोत.हे दाखवून दिले.ज्या डॉ बाबासाहेबाच्या रक्ताचे आपण वारसदार आहेत.त्या बाबासाहेबानी आपले आयुष्य अस्पुष्य समाजाला धार्मिक,सामाजिक,शैक्षणिक आणि राजकीय अधिकार मिळवून देण्यासाठी खर्ची केले.त्यासाठी त्यांनी अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक संस्था,संघटना, पक्ष निर्माण केल्या. त्याची सुरवात त्यांनी "बहिष्कृत हितकारणी सभा " स्थापन करून केली.पुढे त्याचा विस्तार करत "समाज समता संघ " उभा केला.राजकीय क्षेत्रात आपले हक्क प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी 'स्वतंत्र मजूर पक्ष ' स्थापन केला. भारतदेश हा कृषी प्रधान आहे ७०% लोक शेतीवर मजुरी करून जगतात.त्यातील ८५% समाज हा बहुजन समाजातील आहे. म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,विमुक्त भटक्या जाती, इतर मागासवर्गीय,आदिवाशी समाजातील लोक आहेत. हे सर्व असंघटीत कामगार मजूर आहेत.
आज संघटीत आणि असंघटीत कामगार मजूर हे गांधीवादी, लोहियावादी,गोळवलकरवादी,मार्क् सवादी कम्युनिस्ट, लाल बावटा यांच्या इंटक,आयटक,बी एम एस, सिटूचे अधिकृतरीत्या सभासद आहेत. तरी ही हे सर्व भारिप बहुजन महासंघाचे किंवा वंचित आघाडीचे जातीमुळे अधिकृत सभासद असणारच. त्याच्या साठी बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून राजकीय हक्क्चे व्यासपीठ निर्माण केले होते. तो पक्ष ते विचार आज कोणाकडेच जिवंत राहिलेला नाही. तेच अपूर्ण काम आपण नव्या दमाने नवीन समीकरण जुळवून वंचित बहुजन आघाडीच्या नांवाने नवीन दमाची दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेत्यांना कार्यकर्त्याना सोबत घेऊन दमदार घौडदौड केली होती.ते आता ही आपल्या सोबत राहिले असतील ही अपेक्षा आहे.
बाळासाहेब मागासवर्गीय बहुजन समाज हा सर्वात मोठा असंघटीत कामगार आहे.आज त्याची संख्या सरकारी ९३% आहे.त्याचा विकास आणि कल्याण करण्यासाठी अनेक योजना आहेत.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी, कल्याणासाठी विकासासाठी राज्य व केंद्रात ज्या योजना कायदेशीर रित्या बनवुन देशाला अर्पण केला आहेत.त्यांची अंमलबजावणी कुठेही प्रामाणिकपणे होताना दिसत नाही. सर्व प्रशासकीय व राजकीय दलाल त्या ओरबडून खातात त्यामुळेच प्रचंड प्रमाणात निधी येतो आणि तो कागदावर खर्च होतो. म्हणूनच मागासवर्गीय समाजाचा विकास आणि परिवर्तन कुठेही दिसत नाही.परंतु या योजनाचा लाभ घेऊन प्रत्येक मागासवर्गीय ओबीसी समाजात दलाल,चमचे कार्यकर्ते,नेते आर्थिकदृष्ट्या मजबूत निर्माण झाले आहेत.वंचित आघाडीमुळे त्यांची किंमत वाढलेली होती.
डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे स्वप्न होते की माझा समाज सत्ताधारी जमात व्हावा.महाराष्टातील आजची राजकीय वर्तमान स्थिती पाहता रिपब्लिकन पक्षातील फुट एकजातीय आहे.केवळ सर्व बौद्ध समाज एकत्र आला तर राजकीय टक्केवारी पाहता सत्ताधारी बनू शकत नाही.पण सर्व बौद्ध समाजातील आंबेडकरी गट एकत्र आले तर एकच गट मजबूत होऊ शकतो.त्याची एकी पाहून इतर मागासवर्गीय,ओबीसी,आदिवाशी, अल्पसंख्याक,भटक्या समाजातील लोक या पक्ष कडे आकर्षित होऊ शकतात. त्यासाठी एक विश्वास पात्र नेत्याची गरज होती. आणि ते फक्त बाळासाहेब आंबेडकर असु शकतात.त्यासाठी त्यांनी दूरदर्शी व धोरणी,मुत्सद्दी पणा दाखविणे अपेक्षित होते.वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत प्रभाव दाखविला.पण तो विधानसभा निवडणुकीत पाहिजे त्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही.आणि अपेक्षाभंग झाला.पुढे संघटनात्मक बांधणी अपेक्षित होती आणि आहे.
विद्यार्थी दसे पासून ज्यांनी आंबेडकरी चळवळीत अन्याय अत्याचार विरोधात संघर्ष केला.आणि सत्ते जवळ गेले ते आता एवढे लाचार झाले की त्यांनी १९५७ ते १९७२ च्या लाचार रिपाईची जागा भरून काढली.त्यांचे चिलेपिले प्रत्येक जिल्ह्यात आहेत. वंचित बहुजन आघाडी च्या झंझावातात ते समाजाला शरण आले.जे नाही आले त्यांना समाजाने बाहेर काढले. त्यामुळेच आता आंबेडकरी चळवळीतील गटबाजी संपल्यात जमा आहे.इतिहास असे सांगतो की २१ जानेवारी १९४९ रोजी औरंगाबादला झालेल्या कार्यकमात बाबासाहेब आपल्या अनुयायांना उदेशून सांगतात.जो पर्यंत तुम्ही तुमची मजबूत संघटना जगाला इतर समाजाला दाखवत नाही तो पर्यंत तुमच्यावर असे अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार होतच राहतील. म्हणून दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.स्वताची ताकद निर्माण करा.मग पहा तुम्हाला कोण त्रास देतो. तुमच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांना शंभर वेळ विचार करावा लागेल. बाळासाहेब आज जो तो नेता संस्थापक राष्टीय अध्यक्ष आहे.त्यांना त्याची मर्यादा आपण दाखवू शकता. पण त्यासाठी स्वताला लोकशाही सर्व संविधान मान्य करावे लागेल.प्रत्येक नेत्याला त्याचा मतदार संघ वाटून द्या इतर जिल्ह्यात मतदार संघात ढवळाढवळ करण्याचीही कोणालाही गरज नाही. आपण लिहता की आंबेडकरी चळवळीचा व आंबेडकरी विचाराचा माणूस मोठ्या प्रमाणत मुंबई,नांदेड,विदर्भातील बुलढाणा,अकोला,भंडारा, गोंदिया,चंद्रपूर,नागपुर, गडचिरोली असे काही आंबेडकरी जिल्हे आहेत. तिथे आंबेडकरी विचारधारेची माणस घडविण्याची गरज आहे.
(आंबेडकरी चळवळ संपली आहे,पान ४१/४२ )
ऍड बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्यावर लिहणे म्हणजे खूप मोठी जोखीम असते. त्याच्या भक्तांना त्याच्या बाबत खरे लिहणे पसंत पडत नाही.प्रकाश यशवंत आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीतील एक तरुण तडपदार नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहेत, पण त्याच बरोबर ते अत्यंत अभ्यासू, दूरदर्शी व धोरणी,मुत्सद्दी नि परिवर्तनवादी म्हणून ही त्यांची ख्याती आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू असल्यामुळे सर्व समाज त्यांचा खूप आदर करतात. पण त्या पलिकडे जाऊन त्यांनी वंचित बहुजन आघाडी मुळे एक स्वतंत्र राजकीय प्रस्थ म्हणून त्यानी स्वत:ची ओळख निर्माण केली होती. राजकारणात व समाजकारणात मोठी मजल मारली. पण ती कायमस्वरूपी टिकविता आली पाहिजे. ते कौशल्य बाळासाहेब यांच्यात नाही असे राजकीय जाणकार म्हणतात.
अकोला जिल्ह्यात राजकीय आदर्श घालून दिला होताच.एकमेव नेता असा आहे कि ज्याचा स्वताचा मतदार संघ आहे.बाकी सर्व आंबेडकरी चळवळीतील राजकीय नेते उंटावरचे शहाणे आहेत.जे स्वताला राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष म्हणून घेतात पण वीस वर्षात स्वताचा मतदार संघ बांधू शकले नाहीत. म्हणूनच बाळासाहेब आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीचे खरे राजकीय वारसदार ठरतात आणि आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचे वारसदार कोणी नाही.कारण त्यांनी आमच्या आईवडील आजोबांना १४ ऑक्टोबर १९५६ बुद्ध धम्माची दीक्षा देऊन बौद्ध बनविले होते.३ ऑक्टोबर १९५७ त्यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही राजकीय ओळख दिली होती.१९७२ ला नामदेव ढसाळ,राजा ढाले ,ज.वी.पवार यांनी दलित पँथर कडून पुन्हा दलित बनविले. मान्यवर कांशीराम यांनी १९८२ डी एस फोर आणि १४ एप्रिल १९८४ ला बहुजन समाज पार्टी ची स्थापना केली.मान्यवर कांशीराम यांनी बहुजन समाज ही ओळख निर्माण केली. बामसेफ वाल्यांनी विशेष वामन मेश्राम यांनी बहुजनांना मुलनिवासी बनविले.या सर्वांची ओळख पुसून काढून २० मार्च २०१८ ला बाळासाहेब उर्फ प्रकाश यशवंतराव आंबेडकर यांनी वंचित समाज ही राजकीय ओळख निर्माण केली .
१९५६ ते २०२० या काळातील एकूण शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक,कला क्रिडा,धार्मिक आणि राजकीयदृष्ट्या जेवढे जागृत आहेत तेवढा इतर कोणताही समाज जागृत नाही.त्यामुळे आम्ही कशाने ही वंचित आहोत आणि नाही हे सिद्ध होत नाही. आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधान नुसार वागत नाही हे मात्र वेळोवेळी सिद्ध होते.मी म्हणतो ८५ टक्के मागासवर्गीय ओबीसी बहुजन,आदिवाशी अल्पसंख्याक शेवटी वंचित ५० टक्के संघटीत झाला तर ४२.५ टक्के होते.देशातील ९३ टक्के असंघटीत कामगार मजूर ५० टक्के संघटीत झाला तर ४६.५ टक्के होतो.हा सर्व समाज असंघटित कामगार मजूर आहे हा प्रत्येक निवडणुकीत शंभर टक्के मतदान करतो.पण तो मत दान करत नाही, विकतो,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते ज्या दिवशी यांना यांच्या मतदानाची किंमत समजेल तेव्हा तो सत्ताधारी असेल. मान्यवर कांशीराम यांनी उत्तर भारतात न बिकनेवाला समाज बनविला तेव्हा लखनऊ स्टेशनवर तीन चाकी रिक्षा चालविणारा अब्दुल रहमान आमदार झाला. बाळासाहेब आंबेडकर यांनी किनवटला भिमराव केराम यांना आमदार बनविले, पक्षासाठी प्रमाणिक पणे काम करणाऱ्या गरीब कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली तर समाज त्याला एक व्होट एक नोट देतो हा इतिहास मान्यवर कांशीराम व बाळासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवला आहे. जेव्हा उमेदवारी विकली जाऊ लागली तेव्हा पासुन कार्यकर्ता ही विकला जातो तो समाजाला विक्री करण्यासाठी तयार करतो.हे आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षात थांबले पाहिजे.तरच आपण राजकीय परिवर्तन घडवून आणू शकतो.
असंघटीत कामगार मजूर यांना काय पाहिजे अन्न, वस्त्र, निवारा,शिक्षण आरोग्य आणि रोजगार भारतीय संविधान यांना हे सहा मुलभूत अधिकार देण्यासाठी कटिबंध आहे. यांच्या साठी आपण काय काम करतो?. कोरोना महामारीच्या संकटात देशभरात राज्यातील शहरात हा लाखोंच्या संख्येने सैरभैर फिरणारा कामगार कोण आहे. येणाऱ्या काळात देशभरातील असंघटीत कामगारांना संघटीत करून मतदारसंघ बांधणी करणे आवश्यक आहे.आजच्या घडीला बाळासाहेब आंबेडकर हे एकच नांव राजकीय क्षेत्रात घेतले जाते.म्हणूनच नियोजनबद्धरीत्या राजकीयदृष्ट्या काम करावे.त्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिस्तबद्धता पाळणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी.शॉटकट नेतागिरी करणाऱ्यांना सुरक्षित अंतरावर ठेवावे. आपला अनुभव खूप मोठा आहे यांची जाणीव आहे तरी ह्या सूचना आपणास करीत आहे.कारण असंघटीत कामगार मजूर आपला परम भक्त आहे.
महात्मा फुले, नारायण मेघाजी लोखंडे, राजर्षी शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव दादासाहेब गायकवाड यांचा कोणता वैचारिक वारसा आपल्या चळवळीकडे आहे?. कसेल त्यांची जमीन, नसेल त्यांचे काय?. राहील त्यांची जागा घर,नसेल त्यांचे काय?. खेडे सोडून शहरात गेलेले बहुसंख्येने लोक कोण आहेत?.त्यांची नांव नोंदणी कामगार कायद्या नुसार गांवात आणि जिथे काम करतो तिथे होणे आवश्यक असतांना यावर कोणीच बोलत नाही.
इतर बोलणार नाहीत कारण त्यांचे आर्थिकहित संबंध त्यात गुंतलेले आहेत. या समस्येवर बाळासाहेब आपण बोलणे अपेक्षित आहे, पत्रकार परिषदेत मांगणी व आवाहन केले म्हणजे जबाबदारी संपत नाही. त्यांचा पाठपुरावा करणारी कार्यकर्त्यांची प्रशिक्षण घेतलेली प्रशिक्षित फळी निर्माण झाली पाहिजे.असंघटीत कामगार मजूरांच्या दररोजच्या जीवन मरणाच्या या प्रश्नावर आपण सतत किर्याशील राहिलो तर या असंघटीत कामगार मजूरांना मतदान मागंण्याचा अधिकृतपणे अधिकार आपल्या पक्षाला असेल.आपण खऱ्या अर्थाने वैचारिक चळवळीचे राजकीय वारसदार झाले पाहिजे अशी अपेक्षा सर्वच समाजाची आज ही कायम आहेच. म्हणूनच हा लेखप्रपंच आंबेडकरी चळवळीचे राजकीय वारसदार बना!. हीच अपेक्षा, आपल्या वाढदिवसा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा,
आपला
सागर रामभाऊ तायडे- ९९२०४०३८५९.भांडूप मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा