सफाई कामगार सुरक्षित तर मुंबई सुरक्षित
देशात सर्व राज्यात कोरोनाच्या भितीमुळे असंघटीत कष्टकरी कामगार शहरे सोडून गांवाकडे पायी चालत निघाला असतांना त्याला कोणीच हिंदू लोक, हिंदू कामगार, हिंदू मजदूर म्हणत नाही.कारण हे सर्व मागासवर्गीय ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक भटक्या जाती जमातीचे आहेत. मुंबई महानगरी हे देशाची आर्थिक राजधानी येथे कोरोनाचा प्रचंड फैलाव होत असतांना सफाई कामगार मुंबईतील कचऱ्याचा नरक उपसत आहेत.घरोघरी जाऊन कचरा गोळा करणारा कंत्राटी कामगार म्हणजे कार्यालयीन भाषेत "स्वछता दूत" यांची कोणी सन्मानाने नांव घेत नाही. हाच सफाई कामगार सुरक्षित तर मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी दररोज साडे सहा हजार मेट्रिक टन कचरा उपसून त्याची विल्हेवाट लावत असतो. यात प्रतिबंधित भागातील कचऱ्याचाही समावेश आहे. कधीही आपण कोरोनाच्या संपर्कात येऊ अशी भीती सफाई कामगारांना वाटत आहे. तरीही अशा भयावह स्थितीत असंघटीत कंत्राटी कामगार संघटीत कामगारांच्या सोबत आपले कर्तव्य बजावत आहेत.
डॉक्टर,परिचारिका,पोलीस यांच्या कामाला तर तोडच नाही. त्यांच्या प्रमाणे सफाई कामगारही महत्वाची भूमिका बजावत आहे. मात्र सफाई कामगारांच्या कामाला प्रतिष्ठा नाही. कोरोनाच्या या भीतीदायक काळात जीव धोक्यात घालून काम करणारा हा कामगार अजूनही दखलपात्र नाही. या दिवसात त्याने तब्येतीचे कारण सांगुन दांडी मारली तर नोकरी गेली अशी भीती त्यांच्या मनात करून ठेवली आहे. त्यांची सन्मानजनक नोंद न घेणाऱ्या कामगारांवर केवळ फुले उधळली जात असली, तरी तो सध्या ज्या स्थितीत काम करीत आहे. त्या परिस्थितीत तो जगला पाहिजे. त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.
पालिका प्रशासनाच्या लेखी घाणीत काम करणारा हा सफाई कामगार कचराच ठरला आहे. मात्र कोरोनाच्या काळात सफाई कामगार सुरक्षित असला तर मुंबई सुरक्षित राहील. याचे भान प्रशासनाला असल्याचे दिसत नाही. सफाई कामगारांच्या मुळे स्वच्छ मुंबई,सुंदर मुंबई आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहिर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईत रोज जमा होणा-या कच-याचे प्रमाण ३० टक्क्यांनी घटले. हॉटेल्स, मॅाल्स, लॉज, मंगल कार्यालये, कॅटरर्स आदी व्यवसाय बंद असल्याने कचरा जमा होण्याचे रोजचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी झाले असे म्हटले जाते. रोज साडेसात हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक कचरा जमा होत होता, आता साडेचार हजार मेट्रिक टनावर आला असल्याचे घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व कामधंदे बंद असल्यामुळे बहुतेक माणस घरात असल्यामुळे घरातील जेवण बनविण्यासाठी लागणारा भाजीपाला, कांदा बटाटा इतर कच्चे साहित्य यामुळे होणारा कचरा?. यांची नोंद अधिकारी हिशेबात घेत नाही. कचरा विभागातील सफाई कामगारांच्या प्रत्येक चौकीत साठ कामगार काम करीत आहेत. मुंबईत अशा सुमारे 380 चौक्या आहेत. या चौक्यामध्ये कोणत्याही सुविधा नाहीत. बहुतांश चौक्यांमध्ये पाणी नाही. वीज नाही. कोरबा मिठागर मधील चौकीत बावीस वर्ष वीज नव्हती आता कुठे वीज सुरू झालीय. घाणीतून काम करून आल्यानंतर आंघोळीसाठी पाणी नाही. कामगारांना आराम करण्यासाठी जागा नाही. चौकीच्या दारात उभे राहून हजेरी लावायची आणि झाडू घेऊन नेमून दिलेले कामच्या ठिकाणी काम करायचे. काही चौक्या कंटेनारच्या आहेत. त्यात काहीच सुविधा नाहीत. शौचयालयाची व्यवस्थाही त्यात नाही. महिला कामगारांची तर अवस्था खूप वाईट आहे. त्यांना कपडे बदलण्यासाठी जागा नाही. अस्वच्छतेने त्यांना कोणतेही आजार होऊ शकतात. कोरोनामुळे सफाई कामगार हादरून गेले आहेत. त्यामुळे सफाई कामगार सुरक्षित तर मुंबई सुरक्षित असणार आहेत.
वसाहतींची दुरावस्था पंचशीलनगर कुलाबा, फलटणरोड क्रॉफर्ड मार्केट, कोचीन स्ट्रीट बीपीटी (आता धारावीत स्थलांतर), गौतमनगर, कासारवाडी दादर, शुक्लाजी स्ट्रीट कामाठीपुरा, वालपाखाडी डोंगरी, टॅंक पाखाडी भायखळा, बकरी अड्डा चिंचपोकळी, ऑर्थर रोड, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, सोळंकी मार्ग मिनर्वा, प्रभादेवी, घाटला व्हिलेज, चेंबूर स्थानक, घाटकोपर, मालाड, मुलुंड या ठिकाणी सफाई कामगारांच्या वसाहती आहेत. कामगार कामावरून आल्यानंतर या वसाहतींच्या ठिकाणी आंघोळ करण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे कामगार आणि त्यांचे कुटुंबीय यांना कोरोनाचा धोका जास्त आहे. या वसाहतीत पुरेसे पाणी नाही, स्वच्छता नाही. त्यामुळे या वसाहती रोगाचे आगारच झाल्या आहेत. त्याकडे पालिका प्रशासनाने लक्ष नाही. मान्यताप्राप्त युनियन पदधिकारी कामगारांच्या जीवनावश्यक गरजा कडे लक्ष देत नाही. सोयीस्कारपणे जातीव्यवस्था, वर्णव्यवस्थेचे समर्थन केले जाते.असे लक्षात येऊन ही कामगार युनियनला आपली कामगार शक्ती दाखवीत नाही.याचे वाईट वाटते. मुंबईत घराची समस्या असल्याने सफाई कामगारांच्या दहा बाय दहाच्या घरात 10 ते 12 व्यक्ती राहातात. येथे कोणतेही सोशल डिस्टनसिंग नाही. सोशल डिस्टनसिंग पाळता येत नाही. एका जरी कामगाराला कोरोनाची बाधा झाली तरी त्याचा फैलाव त्यांच्या कुटुंबासह वसाहतीत झपाट्याने होऊ शकतो. सफाई कामगार कामावर गेला नाही तर मुंबईचा कचरा कोण उचलणार ?. म्हणूनच सुरक्षित तर मुंबई सुरक्षित असेल.
हँडलोज मास्क नाही. कामगारांना रस्ते अंतर्गत सोसायटयांच्या गल्ल्या, दाट वस्त्याच्या गल्ल्या झाडताना खिडक्यातून लोक कचरा फेकतात. कधीकधी सफाई कामगारांच्या अंगावरही कचरा पडतो. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे गुन्हा असला तरी त्याचे पालन होत नाही. हॅन्डग्लोज, मास्क, झाडू, साबण आदी साहित्य कामगारांना दिले जात नाही. काही कामगार नाकाला रुमाल बांधून कामगार काम करताना दिसत आहेत. त्यांना कोरोनाच्या संपर्कात येण्याची भीती आता सर्वच सफाई कामगारांना सतावत आहे. त्यामुळे एकच चर्चा होते.सफाई कामगार सुरक्षित तर मुंबई सुरक्षित म्हटले जाते.
चौक्या,गाड्या आणि वसाहतींचे निर्जंतुकीकरण झाले नाही.कामगारांच्या चौक्या, वसाहती आणि गाड्यांचे नियमित निर्जंतुकीकरण करण्याची मागणी सफाई कामगार करीत आहेत. कचरा उचळणाऱ्या गाड्यांवर काम करणारे कामगारही कोरोना वाढू लागल्याने भयभीत झाले आहेत. स्वच्छतेच्या योजना प्रभावहीन स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान, क्लीन अप मार्शल या योजना पालिकेने राबविल्या मात्र त्या योजना प्रभावहीन ठरल्याचा आरोप स्थायी समिती आणि पालिका सभागृहात झाला होता. पण उपाय योजना योग्य त्या प्रमाणात झाली नाही. निर्जंतुकीकरण करण्यासाठी sanitizer सानीटीझेर किती प्रमाणत वापरले पाहिजे यांचे नियम आहेत.योग्य प्रमाणात सानीटीझेर टाकून फवारणी केली पाहिजे. चौक्या,गाड्या आणि वसाहतींचे निर्जंतुकीकरण योग्य प्रमाणात झाले तर कामगारात भिती राहणार नाही. म्हणूनच सफाई कामगारांच्या मनातील भिती प्रथम काढली पाहिजे. सफाई कामगारांना स्वच्छता दूत म्हणून आणि माणूस म्हणून वागवा, जीवाची बाजी लावून राबणारे हे कामगार घाणीमुळे अल्पायुषी ठरत आहेत. या कामगारांना सुविधा द्यावा त्यांना चौक्यांच्या ठिकाणी चांगला आहार द्यावा,या कामगारांना सामाजिक प्रतिष्ठा मिळायला हवी.कोरोना महामारीला
सर्व कंत्राटी सफाई कामगार समर्थपणे तोंड देत आहेत. लॉक डाऊन झाल्या नंतर या कामगारांना कायम करण्यात आले पाहिजे. अशी लेखी मांगणी स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य यांनी मुख्यमंत्री यांचं कडे केली होती.सदर पत्रात आपण महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत ह्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना कायम करण्याबाबत पत्र दिले आहे.सदर निवेदन मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाने नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठविले आहे.
आता आयुक्तांची बदली झाली असल्यामुळे नवीन आयुक्तांनी सफाई कामगारांच्या मनांत जी भिती निर्माण झाली आहे त्याचे समाधान करावे लागेल. नव्याने आलेल्या आयुक्तांनी सफाई कामगारांच्या समस्या कडे गांभीर्याने पाहावे आणि मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी सफाई कामगार सुरक्षित तर मुंबई सुरक्षित हे ध्येय ठेवावे.
निलेश नादावडेकर 9892847838
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा