गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

ओबीसी चळवळ ही मागासवर्गीय भारताची राष्ट्रीय चळवळ आहे.(आंबेडकरी)

 ओबीसी चळवळ ही मागासवर्गीय भारताची राष्ट्रीय चळवळ आहे.(आंबेडकरी)



दि 18 सप्टेंबर 2022 रोजी लोकशाहीर संभाजी भगत यांनी लोकनेते दि.बा.पाटील यांच्या कुटूंबियांची,पनवेल येथील,"संग्राम" या निवासस्थानी ऐतिहासिक भेट दिली.मागील दोन वर्षे सातत्यपूर्ण चाललेल्या लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण चळवळीत,लोकांना माहीत नसलेले दि बांच्या विचारांचे मूळ सत्य विचार या भेटीतून जगासमोर आले.कालपासून "सत्यमेव जयते वार्ता "या युट्युब चॅनलवर शाहीर संभाजी भगत यांनी दि बांचे चिरंजीव मा.अतुल.दि.पाटील आणि दि बांच्या सुनबाई सौ मनीषा अतुल पाटील यांची मुलाखत क्रमशः तीन भागांमध्ये प्रसिद्ध होत आहे.जिज्ञासू अभ्यासकांनी ती मुद्दामहून पहावी.
   सत्यमेव जयते वार्ता चे संपादक मा अमोल मडामे दैनिक जनतेचा महानायक चे संपादक मा सुनील खोब्रागडे, आगरी कोळी साहित्यिक गजानन म्हात्रे,सुप्रसिद्ध कवी अमोल सोनवले कामोठे,त्याचप्रमाणे आगरी कोळी कराडी संघटनेचे युवा नेतृत्व,ज्यांनी लोकनेते दि बा पाटील नामकरण आंदोलनात समस्त ओबीसी तरुणाईचे संघटन केले असे चेतन डाउर,प्रेम पाटील,किरण पवार हे यावेळी उपस्थित होते.याच वेळी दि बांच्या आंदोलनात सर्वात अग्रेसर असलेले प्रभात पर्व चँनलचे सागर राजे,कैलास गायकवाड,यासिन खान हे उपस्थित होते.ही मुलाखत जशी जशी लोक पाहतील तशी दि बा पाटील यांची वैचारिक ओळख साऱ्या महाराष्ट्राला नव्याने होणार आहे.यात शाहीर संभाजी भगत यांच्या पत्रकारितेचे प्रगल्भ रूप लोकांना पहायला मिळणार आहे.
     आतापर्यंत सिडकोने जबरदस्तीने भूसंपादन करताना इंग्रज मोघल या परकीय शत्रूंपेक्षा जास्त भयानक अत्याचार इथल्या ओबीसी आगरी कोळी कराडी शेतकऱ्यांवर केला होता. त्या लढ्याचे नेतृत्व करणारे दि बा पाटील हे लढाऊ संघर्षशील व्यक्तिमत्व सर्व पत्रकार आणि वृत्तपत्रे यांनी दाखविले होते.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथले उच्चवर्णीय क्षत्रिय मराठा मुख्यमंत्री वसंत दादा पाटील विकासाच्या नावे,सिडकोसाठी भूसंपादन करताना,आमचे पाच हुतात्मे घेतील? शेकडोंच्या रक्ताचे पाट वाहतील? हे महाराष्ट्राला अजूनही कळले नसावे.अर्थात मागासवर्गीय ओबीसी शेतकऱ्यांशी स्वतंत्र भारतातील मराठा क्षत्रिय ब्राह्मण वैश्य यांचे देशी सरकार मनुस्मृतीच्या विचारानेच राज्य करते, शोषण करते हे मी अनुभवाने महाराष्ट्रासमोर बोलतो आहे.
    वर्तमानात मराठे हे मागासवर्गीय आहेत? असे सत्याचा विपर्यास करणारे,अनैसर्गिक शोध बामसेफ सारख्या स्वतःस आंबेडकरी म्हणविणार्या संघटनांचे,राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम व इतर विद्वान पुस्तके लिहून सांगत आहेत.त्याचा फायदा घेऊन सरंजामी राजकीय मराठा क्षत्रिय नेते "आम्ही ओबीसी आहोत" म्हणून आता "आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण ध्या" अशी मागणी करत आहेत.आर्थिक निकषानुसार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्चवर्णीय जातीतील गरिबांना आर्थिक निकषानुसार आरक्षण ध्या,ही मागणी असंविधानिक होती.सामाजिक समतेच्या न्याय तत्वाला विरोध करणारी होती .अर्थात देशातील शोषित ओबीसी एससी एसटी स्त्रिया यांच्या प्रतिनिधींत्वाच्या तत्वाला नाकारणारी होती.ओबीसी मंडल आयोग समजविणारे ओबीसी नेते दि बा पाटील होते.
     डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील विषमता जी हिंदू वैदिक ब्राह्मणी धर्माचा अविभाज्य भाग होती आणि आहे, हे कटू सत्य देशाला सांगून हा विषमतावादी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी स्वीकारला होता.या वाटेवरील बुद्ध मूर्ती घरात ठेऊन त्या विचारांच्या मार्गाने प्रामाणिक नेतृत्व करणारे दीबा याच मुलाखतीत भगवान बुद्ध,छत्रपती शिवराय,महात्मा जोतिबा फुले,क्रांतीज्योती सावित्री माई फुले राजर्षी शाहू महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घरात ठेवणारे दुर्मिळ आगरी ओबीसी नेते आहेत.हे करीत असताना 1984 च्या आंदोलनात मराठा मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यमुखी पडलेल्या पाच हुतात्म्यांच्या फोटोना सन्मानित करताना, आगरी कोळी कराडी ओबीसीच्या घरांना,आमच्या साठी मरणारे कार्यकर्तेच पूजेस प्राप्त देव ईश्वर आहेत.हे नवे मानवतावादी तत्वज्ञान देणारे आमचे सद्गुरू दि बा पाटील साहेबच आहेत."हुतात्म्यांचे रक्त वाया जात नाही,वाया जाऊ देणार नाही" ही काळावर विजय मिळविणारी भाषा दि बांसारखे काळजयी नेतृत्व ओबीसी मध्ये आहे हे दाखविण्याचे काम शाहीर संभाजी भगत यांनी केले आहे.
    महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या शिवशाहीर देशमुख देशपांडे पुरंदरे यांनी आपल्या उच्चवर्णीय सडक्या मेंदूतून केवळ आरमारी आगरी कोळी भंडारी या ओबीसींना छत्रपती शिवरायांच्या इतिहासात अस्पृश्य ठेवले नाही?.तर छत्रपती शिवरायांचे रयतेचे मागासवर्गीय भूमिहीन यांचे स्वराज्य आणि सागरी आरमाराचा विचारही मनुस्मृतीच्या तत्वाने नाकारला आहे.हे महापाप करीत असताना हिंदू मुस्लिम द्वेष नवं भारतात पेरला आहे.छत्रपतींच्या आरमारात 50 टक्के सागरी सैनिक मुस्लिम होते.तर 50 टक्के आगरी कोळी भंडारी गबित कराडीओबीसी होते. दर्यासारंग दौलतखान हे आरमाराचे प्रमुख होते हे सांगताना मराठा ब्राह्मण शाहिरीची दातखिळी मनुस्मृतीच्या अर्धांगवायू मुळे बसली होती. हे सत्य सांगणारा प्रबोधनकार आज महाराष्ट्राला हवा आहे."शिवाजी अंडर ग्राउंड इन भीम नगर मोहल्ला" ही शाहीर संभाजी भगत यांनी महाराष्ट्राला दिलेली वैचारिक समतेची देणगी भारताच्या संविधानिक जगण्याची पहाट आहे.शोषितांच्या बाजूने लढणाऱ्या अशा शाहिरीच्या रत्नाना कधी सरकारी "महाराष्ट्र भूषण" पद्मश्री पुरस्कार मिळणार नाही?
त्यासाठी आमचे सरकार म्हणजे संविधानिक सरकारच हवे.तरीही दि बांचे शेतकरी पुनर्वसनातील राष्ट्रीय कार्य नाकारणाऱ्या महाराष्ट्रातील शिवसेना महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार खूर्चीसह गदागदा हलविण्याचा पराक्रम दि बांच्या प्रकल्पग्रस्त आगरी कोळी कराडी बौद्ध बारा बलुतेदार यांनी केला.
    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव महाराष्ट्र सरकारला मागे घेऊन दि बा पाटील यांचे नाव द्यावे लागले.हिंदुत्वाचा पराभव करून पुढे आलेले ओबीसी नेतृत्व दि बा पाटील यांचे नाव यापेक्षा ओबीसींचा दुसरा आणखी कोणता विजय असू शकतो.ओबीसी चळवळीवर रोज व्याख्याने देणाऱ्या नेत्यांना रायगड जिल्ह्यातील हे नामकरण आंदोलन अजूनही कळले नाही ?याचे मूळ हे कृतिशून्य बोलघेवडे पणात दडले आहे.याच मुलाखतीत सहभागी पनवेलचे पत्रकार सागर राजे हे नेहमी एक मुस्लिम कॅमेरामन एक बौद्ध बातमीदार घेऊन पत्रकारिता करतात.येथल्या आगरी कोळी कराडी ओबीसी माणसाच्या घरात वावरणाऱ्या या बौद्ध मुस्लिम बंधुत्वाचे तत्वज्ञान हे दि बांचे सर्वसमावेशक विचार आहेत.शाहीर संभाजी भगत यांचाईतकेच पत्रकार सागर राजे हे मला संविधानिक अभिमानाचे भाऊ वाटतात.
    सिडको विरोधातल्या लढ्यात समस्त ओबीसी एससी एसटी स्त्रिया मुस्लिम बौद्ध या देशातील शोषित मागासवर्गीय लोकांचे संघटन बांधून त्यांना म्हणजे आगरी कोळी कराडी या ओबीसी बांधवाना कुळ कायद्याने प्राप्त जमिनीच विकसित सिडको पुनर्वसन भूखंड देणारे दि बा पाटील हे तुम्हास माहीत असतील.परंतु भूमिहीन शेतमजूर स्थलांतरित बारा बलुतेदार मुस्लिम ईस्ट इंडियन बौद्ध यानाही चाळीस चौरस मीटरचा सिडको भूखंड देणारे दि बा पाटील हे वैदिक हिंदुत्व ब्राह्मण्यवादी मनुवादी विचारांचा भाग असतील का?.तसे असते तर महाराष्ट्रात आणि देशात जे हिंदुत्व वाढते आहे त्यात समस्त मागासवर्गीयावर अल्पसंख्याक यांच्यावर अन्याय अत्याचार वाढलाच नसता.दि बांच्या नामकरण आंदोलनात एमएमआरडीए क्षेत्र ठाणे पालघर मुंबई नवी मुंबई रायगड येथून लाखो आगरी कोळी कराडी भंडारी कार्यकर्ते स्त्री पुरुष तरुण मुले यांचा पाठींबा मिळाला.सर्वपक्षातले लोक एकत्र आले.ही किमया दि बा पाटील यांच्या स्वच्छ प्रामाणिक चारित्र्य शील प्रज्ञा करुणेची आहे.असे शाहीर संभाजी भगत म्हणतात.तर साडे बारा टक्के भूखंड योजना हीच पुढे नव्या भूसंपादन कायदा 2013 या केंद्रीय राष्ट्रीय कायद्यांची निर्मिती आहे.म्हणूनच देशातील समस्त प्रकल्पग्रस्तांना न्याय देणारे दि बा पाटील हे राष्ट्रीय नेते आहेत असे दैनिक महानायकाचे संपादक सुनील खोब्रागडे म्हणतात.असे असले तरीही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माजी खासदार आदरणीय बाळासाहेब आबेडकर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचा जाहीर पाठींबा दि बांच्या आंदोलनास मिळाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आगरी नेते नारायण नागू पाटील यांच्या अलिबागच्या घरी जिताडा बोबिल मासळी भाकरी खात ,ती अस्सल आगरी कोळी भंडारी बंधुता नव्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जपावी असे मला वाटते.दापोली पारगाव पनवेल येथील युवा कार्यकर्ते चेतन डाऊर यांच्या घरी शाहीर संभाजी भगत आणि आम्ही जेवलो यात दि बा पाटील यांच्या घरचा पाहुणचार हा मला खूप जास्त महत्वाचा वाटतो.
  प्रत्यक्ष मुलाखत आणि दि बांचे चारित्र्य विचार हे अस्सल आंबेडकरी आहेत.आज वाढते हिंदुत्व म्हणजेच आमच्यावरील अन्यायच आहे.दि बांच्या सिडको पुनर्वसन योजनेला त्यांच्या मृत्यू नंतरही 100 टक्के पुनर्वसन नाही.मच्छीमार लोकांना 2013 चा कायदा असूनही एक रुपयाचे पुनर्वसन नाही.कोळीवाडा गावठाण यांचा विस्तार आणि विकास नाही.
शेती मासेमारी रेती वीटभट्टी जलवाहतूक हे व्यवसाय उध्वस्त करण्यासच मोदी शिंदे सरकार विकास म्हणत आहेत.आरोग्य शिक्षण आरक्षण नोकऱ्या संपत आहेत.पुनः मनुस्मृतीचेच राज्य सुरू झाले आहे.
   लोकशाहीत सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणे हे विरोधी पक्ष म्हणून दि बा पाटील यांनी आम्हाला दिलेला आदर्श आहे.म्हणूनच कामोठे येथील प्रकल्पग्रस्त लोकांनी बांधून दिलेल्या घरातच साधेपणाने त्यांचे चिरंजीव अतुल दि पाटील आणि त्यांच्या पत्नी मनीषा ताई नातवंडे राहतात.अर्थात दि बा पाटील यांच्या घरातील स्त्रिया यांचे योगदान हा खरोखरच आंदोलनातील मोठा आदर्श ठरावा.तो स्वतंत्र मुलाखतीचा मातृसत्ताक विचार आहे.दि बां पाटील यांचा हा संग्राम बंगला हे आम्हा समस्त मागासवर्गीय लोकांसाठी नवे प्रेरणाकेंद्र (तीर्थक्षेत्र) ठरेल,यात कुणाला शंका नको.कुळ कायद्यांचे निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर अप्पासाहेब ना ना पाटील यांनी सुरू केलेली खोती विरोधी चळवळ हीच दि बा पाटील यांची सिडको विरुद्ध आणि ऍड दत्ता पाटील यांची सेझ विरोधातली चळवळ ही आधुनिक शेटजी भटजी याच्याविरोधातली समस्त मागास वर्गीयांची चळवळ आहे.जमीन जंगल समुद्र शिक्षण आरक्षण धर्म चिकित्सा यांची चळवळ आहे.आगरी कोळी भंडारी कराडी ओबीसी यांच्या ओबीसी चळवळीचा धर्म हा संविधानिक राष्ट्रधर्म आहे.
      मोदी फडणवीस पवार अदानी अंबानी या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या मनुवादी विषमता वादी सरंजामी सत्ताधारी उच्चवर्णीयांनी लादलेल्या गुलामगिरी विरोधात आमचे संघर्षनायक लोकनेते दि बा पाटील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मानकरी आहेतच.
समस्त मागासवर्गीय संविधानिक विचारमध्यमानी त्यांना जगासमोर आणले पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे.आंबेडकरी कार्यकर्त्यानी अशा ओबीसी कार्यकर्त्यांच्या घरी यावे ही डॉ बाबासाहेब आबेडकर यांनी दिलेली ऐतिहासिक परंपरा संभाजी भगत यांनी जपली.म्हणूनच मी या चळवळीचा भाग आहे.ही कृतज्ञता जपण्यासाठी यापुढे ओबीसी नेतृत्वाने आपले एससी एसटी अल्पसंख्यांक बांधवांना आणि एकविरा मातृसत्ताक तत्वाने समस्त स्त्रियांच्या रक्षणासाठी नवी राजकीय सामाजिक आर्थिक न्यायाची लढाई सुरु करावी, यासाठी मी महाराष्ट्र आणि देशात फिरणार आहे.कारण ओबीसी चळवळ ही हिंदुत्वाची वैदिक मनुवदाची परंपरा नाही तर भारतीय संविधानाची,समतेची खरी खुरी आंबेडकरी चळवळच आहे.जय भीम 

 राजाराम पाटील 8286031463.
केगाव खारखंड उरण जिल्हा रायगड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा