शुक्रवार, ५ जानेवारी, २०२४

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला "समतेचा रथ" कुठ आहे.

 डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला "समतेचा रथ" कुठ आहे.


       समतेच्या या रथाबाबत प्रत्येक धम्म प्रचारक अनेक वेळा वक्तव्य करीत असतात.बाबासाहेबांनंतर गेल्या जवळ जवळ 70 वर्षात हा रथ आपणांस दिसला का? हा रथ आम्ही पुढे ढकलला का? बाबासाहेबांनी 1956 पर्यंत चालवलेल्या रथाने रिझल्ट काढला होता,शर्यती जिंकल्या होत्या.परंतु,जर हा रथ आम्ही चालवीत असू,तर आज रिझल्ट दिसतोय का? शर्यतीत आहोत का? किंबहुना आपला हा रथ आम्ही शर्यतीत उभा केलाय का? असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात.
      हा रथ समजून घेण्यासाठी "राजा मिलिंद आणि भन्ते नागसेन" यांचे उदाहरण अधिक महत्वाचे वाटते.एके दिवशी राजा मिलिंद भन्ते नागसेन यांची भेट घेण्यासाठी रथातून आला.रथ एक बाजूला उभा करून राजा मिलिंद भन्ते नागसेन यांची भेट घेण्यास भन्ते वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणी गेला. क्षेमकुशलची देवाणघेवाण झाल्यावर त्या दोघांमध्ये जो संवाद झाला तो ऐतिहासिक आहे.
भन्ते नागसेन म्हणाले, 'राजा तू कशाने इथपर्यंत आलास?' राजाने म्हटले, 'भन्ते मी रथातून आलो.' भन्ते म्हणाले,  'कुठे आहे रथ, 
रथ मला दाखव.' 
राजा आणि भन्ते रथाकडे चालत जातात. 
राजा रथाच्या एका चाकावर हात ठेवतो आणि म्हणतो,  'भन्ते हा बघा रथ.' 
भन्ते म्हणतात,'हे तर चाक आहे,रथ कुठे आहे?'  
मग,राजा बैठकीचे आसनावर हात ठेवतो आणि म्हणतो, 'हा बघा रथ.'  
भन्ते म्हणतात,'हे तर आसन आहे.रथ कुठे आहे?'  
 मग राजा घोड्यावर हात ठेवतो आणि म्हणतो,'हा पहा रथ.' 
भन्ते म्हणतात,हा तर घोडा आहे.रथ कुठे आहे?'  
राजा मिलिंद त्या रथाच्या प्रत्येक भागावर हात ठेवतो आणि म्हणतो,  'हा पहा रथ.' भन्ते त्या प्रत्येक भागाचे नांव सांगतात आणि म्हणतात, रथ कुठे आहे ????  
रथ समोर असूनही राजाला रथ काही दाखविता येत नाही, आणि भन्तेचा प्रश्न तसाच राहतो, 'रथ कुठे आहे?'
       अनेक  पार्ट किंवा भागातून रथ बनला आहे. प्रत्येक भागाला वेगवेगळे नांव आहे.परंतु,कोणताही एक पार्ट रथ होऊ शकत नाही.या सर्व पार्ट ची एकत्र बांधणी /जोडणी म्हणजेच "रथ" आहे.या गोष्टीतून वाचकांना बऱ्यापैकी समजले असेलच, असे मला वाटते. 
      "बाबासाहेबांचा समतेचा रथ" असाच आहे. बाबासाहेबांनी 1956 पर्यंत हा रथ उत्तम प्रकारे,काळजी घेवून चालवला.रथाचा कोणताही पार्ट वेगळा होऊ नये यांची काळजी घेतली.त्यांचे सहकारी देखील जिवापलिकडे या रथाची काळजी घेत होते.म्हणून तर हा रथ सुसाट वेगाने पळत होता. अनेक क्षेत्र काबीज केली होती.दोनच क्षेत्रे काबीज करण्याची बाकी राहिली होती.हि दोन क्षेत्रे म्हणजे,या देशाला प्रबुद्ध राष्ट्र बनविणे आणि या देशाची सत्ताच हस्तगत करणे होय.हि क्षेत्रे काबीज करण्याचे प्लानिंग,नियोजन शिस्तबद्धपणे बाबासाहेबांनी करून ठेवले होते.हे नियोजन म्हणजे,बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संघटना होत.या प्रत्येक संघटनेला वेगवेगळ्या घटना देखील लिखित करून ठेवल्या.या घटना म्हणजे,काम करण्याची कृती व दिशा होय. 
       पत्रकारिता,प्रिंटिंग प्रेस (मूकनायक,प्रबुद्ध भारत सारखे वर्तमानात पत्र चालविणे,पुस्तिका तयार करणे करीता...),दि पिपल एज्युकेशन ट्रस्ट,समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टि ऑफ इंडिया = प्रबुद्ध राष्ट्र .... प्रबुद्ध म्हणजे यांतील 'प्र' या शब्दाचा अर्थ आहे,या देशातील प्रत्येक व्यक्ती, आणि 'बुध्द' म्हणजे 'ज्ञानी' या देशातील प्रत्येक व्यक्तीला ज्ञानी बणविणारा हा समतेचा रथ. हे ज्ञानी लोक देशाच्या "शासन आणि प्रशासन"  व्यवस्थेचा भाग बनतील आणि या देशाची सत्ताच आपल्या हाती घेतील. या दिशेने प्लानिंग नुसार मार्गक्रमण करणारा हाच तो बाबासाहेबांचा "समतेचा रथ.बाबासाहेबांच्या 'समतेच्या रथाचेया संघटना म्हणजे वेगवेगळे पार्ट आहेत. या सर्व पार्टची एकत्र जोडणी केल्याशिवाय 'समतेचा रथ' तयार होणार नाही. 
       आपल्या वडिलांचे (बापाचे) निधन झाल्यावर,बऱ्याच ठिकाणी असे चित्र दिसते की,कुशलकर्मानुमोदन,शोकसभा,कार्य ... झाल्यानंतर या निधन झालेल्या बापाची जी मुलं असतात ती लगेच आपल्या बापाच्या प्रॉपर्टीच्या वाटण्या करून घेतात,  सामंजस्यने वाटण्या खूप कमी होतात. हमरा-तुमरी करून,वाद करून बळकावण्याचा प्रयत्न अधिक होतो.मग,ज्याच्या हाती जे लागेल ते घेवून पळ काढतात ही मुले.मग कधी कधी त्या एका हिश्यात अधिक वाटेकरी देखील बनतात.मग या भक्कम मोठ्या हीश्याचे लहान लहान तुकडे केले जातात.असे तुकडे काहीच कामाचे नसतात. हि मुले मोठ्या अभिमानाने सांगतात हि माझ्या बापाची प्रॉपर्टी आहे. मी वारस आहे वगैरे.... जणू काही गिधाड जसे लचके तोडतो,त्या प्रकारे हि मुलं आपल्या बापाच्या प्रॉपर्टीचे लचके तोडून,होत्याचे नव्हते करतात. बापाने जे कमावले ते मुलांनी गमावले अशी वेळ येते.
         आज घडीला अशीच परिस्थिती आपल्या सर्वाच्या सांस्कृतिक बापाने तयार केलेल्या 'समतेच्या रथाची' झाली आहे.बाबासाहेबांनी या देशाला समृद्ध करणारी,  प्रबुद्ध बनविणारी यंत्रणा या रथात फिट केली.बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संस्था म्हणजे या समतेच्या रथाचे पार्ट होत.परंतु,बाबासाहेबांनंतर बाबासाहेबांच्या अनुयायांनी या रथालाच उध्वस्त केले.सामज्यस्याने त्याचे पार्ट काढलेच नाहीत.किमान जर तसे काढले असते तर ते पार्ट तरी सुरक्षित असते.बाबासाहेबांनी हे पार्ट जोडताना चांगल्या प्रकारे नट बोल्टिंग केले होते. योग्य तिथे वेल्डिंग देखील केले होते. हे पार्ट सुरक्षित निघत नाहीत म्हणून आम्ही लेकरांनी आपापल्या पद्धतीने ताकद लावून हे पार्ट खेचून काढले.अगदी गिधाड जसे लचके तोडतो तसे. त्यामुळे पार्ट जरी वेगळे झालेले दिसत असले तरी या समतेच्या रथाचा ढाचा तसाच आहे. तो काही ढासळला नाही. हा ढाचा म्हणजे बाबासाहेबांचे साहित्य "रायटिंग ऍण्ड स्पिचेस" होय. या मध्ये या रथाच्या प्रत्येक पार्ट चे कार्य काय हे लिखित स्वरूपात नमूद करून ठेवले आहे.तात्पर्य,तुम्ही हा बाबासाहेबांचा समतेचा रथ उध्वस्त करू शकाल परंतु मुळासकट नष्ट करू शकत नाही.कारण या रथाची बांधणी जगद्ज्ञानी महामानवाने केली आहे.त्यांना माहीत होते, माझ्या पश्चात असे घडेल आणि हे देखील माहीत होते की,कोणीतरी मी बांधलेल्या समतेच्या रथाची बांधणी शोधेल व पुन्हा हा समतेचा रथ उभा करण्याचा प्रयत्न होईल. 
प्रत्येक संघटना स्वतंत्रपणे काम करते,ती त्यालाच समतेचा रथ समजते.कोणी विधी कार्य करतो.त्यालाच रथ समजून बसतो.कोणी विपश्यना करतो.त्यालाच रथ समजून बसतो.कोणी पाली भाषा वर्ग सुरू करतो.त्यालाच रथ समजून बसतो.कोणी धम्म सहली काढतो.त्यालाच रथ समजून बसतो.कोणी धम्म परिषदा, मेळावे भरवीतो. त्यालाच रथ समजून बसतो.कोणी लेणी संवर्धन करतो.त्यालाच रथ समजून बसतो.कोणी भाषणे प्रवचने करतो.त्यालाच रथ समजून बसतो.कोणी भन्ते बनून,बौद्धचार्य बनून धम्म प्रचार करतो.त्यालाच रथ समजून बसतो.कोणी राजकारणात मांडवली करतोय त्यालाच रथ समजून बसतोय.अशी अनेक उदाहरणे देता येतील ...... 
      कामे आणि कार्य होत आहेत.पण,ती स्वतंत्रपणे होत आहेत.त्या त्या पार्ट चे काम होत आहेत.परंतु 'समतेच्या रथाचे' ते काम होतांना दिसत नाही.या विविध संघटनांचे एकत्रितपणे काम होणे,किंवा कार्यरत होणे म्हणजे 'समतेचा रथ' पुढे हाकणे होय.या समतेच्या रथाची मूल्य न्याय,स्वातंत्र,समता,मैत्री आणि बंधुभाव यांच्यात सामावलेली आहेत.परंतु प्रत्येक पार्ट स्वतंत्र वेगळा झाल्याने त्याच्यात स्वातंत्र्य आहे.पण,समता, मैत्री,बंधुभाव आणि न्याय याचा अभाव आहे. मग कसा रथ पुढे जाईल? कोणताही एक पार्ट हा समतेचा रथ असूच शकत नाही.रथ बनण्यासाठी अनेक पार्ट एकत्र येणे आणि एका नियोजित विचाराने व दिशेने चालणे म्हणजे 'समतेचा रथ'.
      समता सैनिक दल अधिक भारतीय बौद्ध महासभा अधिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या प्रमुख तीन संस्था म्हणजे प्रबुद्ध राष्ट्र निर्माण करणे आणि या देशाची शासनकर्ती जमात बनण्याचा पाया आहेत.बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या या संस्थाना आपण अभिमानाने म्हणतो या आमच्या मातृसंस्था आहेत.मग,या मातृ संस्थांच्या घटना वाचल्यास,अभ्यासल्यास आपल्याला लक्षात येईल,बाबासाहेबांचा 'समतेचा रथ'.आम्ही सुरुवात केली आहे या रथाचे विखुरलेले पार्ट डागडुजी करून म्हणजे प्रॉपर मेन्टेनन्स करून व्यवस्थित जुळविण्याची.तुमचीही साथ हवी आहे लाख मोलाची.विखरु नका - विभागू नका,साथ द्या जिवा भावाची.भक्कम करू या बाजू समतेच्या रथाची.द्यालका का साथ कायमची.....? गाव तिथे शाखा,घर तिथे सैनिक.समता सैनिक दल हि आघाडीची फौज असेल धम्म संस्थेची आणि राजकीय संस्थेची.असे चित्र उभे करणार का हों....?
   बाबासाहेबांच्या रायटिंग ऍण्ड स्पिचेस या साहित्यातील बाबासाहेब प्रत्येक व्यक्तीच्या मनमस्तिष्कामध्ये पेरणे,हेच आमचे ध्येय आहे.अनेक शैक्षणिक डिग्री घेतलेल्या बापाची मुलं देखील डिग्री होल्डर असली पाहिजेत.बाबासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून मिरवायचे असल्यास साहित्यातील जिवंत बाप समजून घ्यावाच लागेल.हा बाप एकदा का मस्तकात घुसला की मस्तक सुधारेल आणि सुधारलेले मस्तक कोणापुढे कदापीही नतमस्तक होणार नाही. हा साहित्यातील बाप समजून घेण्यासाठी सच्च्या कार्यकर्त्यांला शाळेत जाऊन प्रशिक्षित व्हावे लागेल. त्यासाठी स्कूल कॉलेज किंवा ट्रेनिंग सेंटर निर्माण करून अभ्यासू असा सर्वगुणसंपन्न कार्यकर्ता घडवून धाडसी नेतृत्व उभे करावे लागेल.असे हे ट्रेनिंग सेंटर म्हणजे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अपेक्षित असणारे लीडर घडविणारा कारखाना उभा करावा लागेल.किमान एक दिवसाचे धम्म शिबिर लावून तरी बाबासाहेबांचे पुरावे आधारित नियोजन समजून घ्या.हा एक दिवस म्हणजे रायटिंग ऍण्ड स्पिचेस ची धम्म सहल समजू या. कराल का नियोजन अशा सहलीचे?.
आपला धम्म बंधू,
राजेंद्र वाघमारे-8097004802
पोली,जिल्हा रायगड. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा