शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४

राज्यातील मागासवर्गीय कर्मचारी व अधिका-यांचे सर्वात मोठे आंदोलन.

 राज्यातील मागासवर्गीय कर्मचारी व अधिका-यांचे सर्वात मोठे आंदोलन.

दि.२६ फेब्रुवारी रोजी स्वतंत्र मजदूर युनियनच्यावतीने मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यव्यापी विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हे महाराष्ट्राच्या इतिहासात मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांनी केलेले सर्वात मोठे आंदोलन ठरले. १० हजार मागासवर्गीय कर्मचारी या विशाल रॅलीत सहभागी झाले. सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री नाम. मदन येरावार यांनी मुख्यमंत्री यांचे वतीने निवेदन स्वीकारले व मुख्यमंत्री यांचे ज सोबत तातडीने बैठकीचे आयोजन करण्याचे लेखी आश्वासन दिले. नाम.मदन येरावार यांना शासनाचे २९ डिसेंबर २०१७ व ११ ऑक्टोबर २०१८ चे परिपत्रक कसे आरक्षण व संविधान विरोधी आहे याची जाणिव करुन देण्यात आली. यावेळी ११ ऑक्टोबर २०१८ चे परिपत्रक जारी करणारे शासनाचे सहसचिव टि.वा.करपते हे उपस्थित होते. त्यांची संघटनेच्या शिष्टमंडळाने बोलती बंद केली. शिष्टमंडळात सागर तायडे, संजय घोडके, एन.बी.जारोंडे, डी.एम.खैरे,प्रशांत रामटेके यांचा सहभाग होता.मा.जे.एस.पाटील साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली देशातील मागासवर्गीय कामगार कर्मचारी व अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने संघटित होत आहे.
आज देशात प्रत्येक विचारांच्या संस्था, संघटना आणि पक्ष आहेत.त्या केवळ निष्ठावंत शिष्य,सैनिक आणि अनुयायीयांच्या प्रामाणिकपणे, नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध काम केल्यामुळे स्वाभिमानाने उभ्या आहेत, त्यांच्या लक्षवेधी योजना,त्यांची अंमलबजावणी प्रभावी पणे होत आहे. म्हणूनच ते त्या समाजाच्या लक्षवेधी वास्तू निर्माण करून आजच्या युवा पिढीला प्रेरणा देत आहेत. त्यातील स्वतंत्र मजदूर युनियन ही एक राष्ट्रीय ट्रेंड युनियन आहे.तिने नागपुरात सहा मजली भव्य प्रशिक्षण केंद्र उभे केले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवाचा जयजयकार करणारा मागासवर्गीय समाज अन्याय अत्याचार व अभिवादन करण्यासाठी भावनिक दृष्ट्या एकत्र येऊन देशातील इतर समाजाचे लक्षवेधण्याचे ऐतिहासिक काम करतो.पण तो निष्ठावंत शिष्य,सैनिक आणि अनुयायी नाही, तो मोठ्या प्रमाणात फक्त भक्त झाला आहे.तर आरक्षणाचा लाभधारक सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणारा निष्ठावंत शिष्य,सैनिक आणि अनुयायी म्हणून कोणत्याही चौकटीत बसत नाही.
मागासवर्गीय समाज अज्ञानी,असुशिक्षित असंघटित असह्य होता तेव्हा त्यांचे प्रबोधन करून संघटना बांधण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.तेव्हा त्यांच्या सोबत निश्चयाने, निष्ठेने आणि निमूटपणे कार्य करणारे प्रामाणिक कार्यकर्ते होते.घाण काम करणे सोडा,लाचारी जीवन सोडा कष्टाचे काम करून स्वाभिमानाने जगणे स्वीकारा.त्यासाठी खेडे सोडा शहर गाठा हा संदेश बाबासाहेबांनी दिला होता, त्यांची अंमलबजावणी ज्या लोकांनी केली ते आज शहरात सुखाने स्वाभिमानाने जगत आहेत.15 ऑगस्ट 1934 ला शहरात साफ सफाईचे काम करणाऱ्या मजुरांसाठी म्युनिसिपल कामगार संघ नांवाची संघटना युनियन स्थापन केली होती.तिचा 1941ला ब्रिटिशांनी देशातील आदर्श कामगार संघटना म्हणुन गौरव केला होता.ती कामगार संघटना युनियन आज मागासवर्गीय बहुजन समाजातील कामगार कर्मचारी यांची सर्वात मोठी ट्रेंड युनियन म्हणून मान्यताप्राप्त असायला पाहिजे होती.केवळ मुंबई महानगरपालिका नव्हे तर देशातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका मध्ये तेव्हा ही मागासवर्गीय समाजाची संख्या लक्षवेधी होती आणि आज भी लक्षवेधी आहे.मग मागासवर्गीय समाजातील कामगार कर्मचारी क्रांतिकारी आंबेडकरी विचारधारे वर विश्वास ठेवत का नाही.किंवा त्यांचा स्वार्थ,अहंकार आडवा आला.म्हणूनच तो आपल्या समाजातील कामगार कर्मचाऱ्यांच्या वैचारिक शत्रु असलेल्या विचारधारेच्या युनियनला वार्षिक सभासद वर्गणी देऊन आथिर्क दुष्ट्या मजबूत बनवतो.आणि अन्याय,अत्याचार झाला की त्यांना दोषी ठरवितात.
मागासवर्गीय समाजात एकाग्रता चित्राने काम करणारा एकही कार्यकर्ता,नेता आज वीस,पंचवीस वर्षांत दिसला नाही. कौन्सिलच्या किंवा म्युनिसिपालटीच्या एका जागे करिता १०० अर्ज तयार असतात. पण एकच काम एका मार्गाने, एकाच ध्येयाने करणारा एकही कार्यकर्ता,नेता अजून माझ्यापुढे आलेला नाही. शिक्षण, सामाजिक आणि आर्थिक अडचणी हे प्रश्न महत्वाचे आहेत.ही कामे करण्यास प्रसिद्धीची अपेक्षा न करता काम करणारी माणसे पाहिजेत.जो तो प्रसिद्धीच्या मागे धावत आहे. त्यामुळे पाहिजे तसे काम होत नाही. तात्पुरत्या कामाने महत्त्वाचे प्रश्न सुटत नाही. त्याकरिता अहोरात्र झटले पाहिजे. त्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्ता पाहिजे,त्यातुनच नेता निर्माण झाला पाहिजे.वारसा हक्काने मिळाल्या नेतृत्वात अनुभव गुणवत्ता, संघटन कौशल्य नसतो.म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की यापुढे भारतात राणीच्या पोटी राजा जन्म घेणार नाही तर तो मतदानाच्या पेटीतुन निर्माण होईल.मतदान करणारे,जर मटन, दारू आणि पैसे घेऊन मतदान करणारे असतील तर त्यांना न्याय,हक्क व सन्मान मांगण्याचा कोणत्याही अधिकार राहणार नाही.
तीन टक्के ब्राम्हण समाजाने आपल्या समाजावर अन्याय केला आहे. त्यांनी आपल्याला छळले आहे, हे सत्य आहे. पण त्यांची कामाची पद्धत इतकी चांगली आहे की, त्यांनी मिळवलेली सत्ता ते कायम टिकवून धरु शकतात. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता मूळ पायाला किंवा धोरणाला घट्ट चिकटून काम करीत राहणारे ध्येयवादी कार्यकर्ते त्याच्यांत निपजतात. त्यात खरे निष्ठावंत शिष्य, सैनिक आणि अनुयायी असतात.स्वतंत्र मजदूर युनियन च्या माध्यमातून जे एस पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटित असंघटित कामगार कर्मचारी अधिकारी घडत आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारधारेवर विश्वास ठेऊन आयु जे एस पाटिल यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र मजदूर युनियन (ILU) आज सतरा क्षेत्रात व बावीस राज्यात लक्षवेधी काम करीत आहे. म्हणूनच देशातील  महानगरपालिका नगरपालिका,नगरपरिषदा मधील कामगारांनी विचार करावा की आपण कोणाचे निष्ठावंत शिष्य,सैनिक आणि अनुयायी आहोत?.आपआपल्या नगरात गेल्यावर आपण कट्टर फुले,शाहु,आंबेडकरवादी असतो.मग कामाच्या ठिकाणी नोकरीत असतांना आपण कोणाचे निष्ठावंत शिष्य,सैनिक आणि अनुयायी असतो?. म्हणूनच मागासवर्गीय समाजाने स्वतंत्र महानगरपालिका कामगार युनियन मध्ये सहभागी होऊन आपले संघटन वाढविले पाहिजे तरच बहुजनांचे प्रश्न शासनावर दबाव टाकून मार्गी लागू शकतात असे बाबासाहेबांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन,हे एक असे कामगार संघटन आहे,जे मागील ३८ वर्षापासून सतत महाराष्ट्रात कार्यरत आहे.या संघटनेच्या २३ जिल्ह्यात कर्मचारी पतसंस्था व त्यांचे कार्यालय आहे.संघटनेचे कर्मचारी कल्याण मंडळ आहे.मुख्य कार्यालय नागपूर बर्डी येथील महाजन मार्केट मध्ये आहे.या संघटनेने ३ कोटी चे नागपूरला आंबेडकर प्रशिक्षण केंद्र उभे आहे. या संघटनेला एम.एस.ई.बी.बेकवर्ड क्लास सिनियर इंजीनिअर एंड ऑफिसर्स असोसिएशन ही मदत करीत आहे.या संघटनेने ऑल इंडिया इंडिपेंडंट विद्युत एम्लाईज फेडरेशन ची स्थापना केली व व देशव्यापी फुले आंबेडकरवादी स्वतंत्र मजदूर युनियनची स्थापना केली.त्याला MRMVKS  व AIIVEF या संघटना संलग्न आहेत. व ही युनियन असंघटित कामगारांना घेवून देशव्यापी कार्य करीत आहे. MRMVKS चे ऊर्जा श्रमिक हे साप्ताहिक निरंतर चालू आहे.व दर वर्षी क्रांती ऊर्जा या नांवाने एक डायरी प्रकाशित होते. व दर दोन वर्षानंतर संघटनेचे अधिवेशन होवून त्यात आंबेडकरवादी विचारवंताचे लेख असलेली स्मरणिका प्रकाशित केल्या जाते.हे देशव्यापी संघटन पुढे नेण्याकरिता संघटनेने इंजी.रमेश रंगारी लिखीत १) आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता २) बहुजन कामगार चळवळीची आवश्यकता व स्वतंत्र मजदूर युनियन ३) बहुजन राष्ट्र ही पुस्तके प्रकाशित केली.हे देशव्यापी संघटन पुढे नेण्याकरिता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.एस.पाटील, सत्यशोधक कामगार संघटनेचे मा.सागर तायडे, प्रसिध्दी प्रमुख मा.एन.बी.जारोंडे,रेल्वेचे विकास गौर सह अनेक 
चेहरा नसलेले प्रशिक्षित कार्यकर्ते,नेते पदाधिकारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचे निष्ठावंत शिष्य, सैनिक आणि अनुयायी घडविण्यासाठी झटत आहेत.आपण ही त्यात सहभागी होऊन आपण कोण आहोत फक्त भक्त की शिष्य हे ठरवावे लागेल.कामगार कर्मचारी आणि अधिकारी वर्ग संघटित झाला.तर असंघटित कामगार मोठया संख्येने तुमच्या सोबत येणार मग राज्यातील नव्हे तर देशातील मागासवर्गीय कर्मचारी व अधिका-यांचे सर्वात मोठे आंदोलन उभे राहिल.आणि शासन करणाऱ्या यंत्रणेवर नियंत्रण ठेवेल.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1941 साली सांगितले होते ते आपण विसरतो.व स्वतःलाच वंचित करून घेतो.हे आता थांबविले पाहिजे त्याशिवाय तुम्ही कोणत्याही मोठे आंदोलन यशस्वी करू शकत नाही.
सागर रामभाऊ तायडे, भांडुप मुंबई 9920403859,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा