शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

स्वाभिमानी असंघटीत नाका कामगार

स्वाभिमानी असंघटीत नाका कामगार 
नाक्यावरील असंघटीत कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्क व प्रतिष्ठे करिता १९८२ सत्यशोधक बिगारी कामगार  संघटनेची स्थापना सिद्धार्थ नगर भांडुप येथे झाली.राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या मार्गदर्शना खाली रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांनी गिरण्या मिल मध्ये काम करणाऱ्या असंघटीत कामगारांना संघटित करून देशातील पहिली कामगार संघटना बांधून पहिला देशव्यापी संप घडवून आणला अशा क्रांतिकारी कामगार चळवळीच्या नेत्यांची परंपरा सत्यशोधक कामगार संघटनेला लाभली आहे.
भारतातील सर्वात मोठे क्षेत्र म्हणजे बांधकाम क्षेत्र आहे.या क्षेत्रात मोठं मोठ्या इमारती,धरण,बंगले आणि सर्वात मोठी दळण वळणा करिता लागणारे रस्ते,रोड हे नवद टक्के असंघटीत कामगार रक्ताचे पाणी करून बांधतात.त्यांना फक्त एकदिवसाची मजुरी मिळते. मात्र जे स्वतः कोणतेही काम करीत नाही त्यांना त्यातुन कायम स्वरूपी उत्पन्न मिळते.त्यात बिल्डर्स ठेकेदार, भांडवलदार आणि राज्य,केंद्र सरकारचा कायम स्वरूपी फायदा होतो. बांधकाम क्षेत्रातील असंघटीत कामगारांना या उत्पन्नातुन सामाजिक सुरक्षा मिळावी म्हणुन नारायण मेंघाजी लोखंडे यांनी १८८० ला संघर्ष केला.तोच आदर्श डोळ्या समोर ठेऊन सत्यशोधक कामगार संघटनेची स्थापना झाली आहे.राज्यात देशात संघटित कामगारांच्या राजकीय कामगार संघटना खूप आहेत.पण त्या असंघटीत कामगारांच्या प्रश्नावर प्रामाणिक पणे काम करीत नाही.केवळ राजकीय पक्षाच्या जाहीर सभा,बैठका आणि मोर्चा आंदोलन करीता त्यांचा वापर होत असतो.राजकीय पक्षाने किंवा त्यांच्या संघटित कामगार संघटनेच्या नेत्यांनी असंघटीत कामगारांच्या समस्या वर आवाज उचलला नाही.त्यामुळे बहुसंख्ये संघटित कामगार असंघटीत झाले.त्यावर आवाज उचलणारी सत्यशोधक कामगार संघटना ही देशभरातील असंघटीत कामगार मजुरांना संघटित करण्याचे काम करीत आहे.
मुंबई शहराच्या प्रत्येक नाक्यावर हजारो असंघटीत कष्टकरी कामगार सकाळी सात वाजल्या पासुन एक वाजे पर्यन्त कामाच्या शोधात उभे असतात.त्यांना  वाहतूक पोलीस,दुकानदार आणि फेरीवाले अनेक प्रकारचा त्रास देतात.हजारो नाका कामगार एकत्र उभे असतात पण दादागिरी करणाऱ्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत त्यात नव्हती पोलिस, दुकानदाराने एकाला मारलेले तर सर्वच पळून जातात. तेच कामगार संघटने मुळे आता छाती ठोक पणे उभे राहुन बोलतात असंघटीतावर कोणीही अन्याय करतो संघटिता वर कोणी ही अन्याय अत्याचार करतांना हजारदा विचार करतात.हे नाका कामगारांना समजले म्हणुन आज जिथे ते उभे राहतात तिथे ते संघटित आहेत.त्यांचे श्रेय हे सत्यशोधक कामगार संघटनेला जाते.एक काळ असा होता की नाक्यावरील कामगारा कडून काम करून घेतल्या जात होते आणि मजुरी देतांना ठरलेली मजुरी दिली जात नव्हती.अर्धे पैसे आज घ्या बाकी काम पूर्ण झाल्यावर असे करून त्यांच्या कामाचे पैसे बुडविण्याची योजना अनेक राजकीय ठेकेदार भाईगिरी करून करीत होते.काही वेळा पैसे नाही देत काय करायचे कर जा. पोलीस स्टेशनला तक्रार कर असी धमकी दयाचे. पोलीस स्टेशन ला गेल्या पोलीस अधिकारी दाखल घेत नव्हते त्या कामगारांना कोर्टात जाण्याचा सल्ला पोलिस देत होते.तेव्हा संघटनेचे कार्यकर्ते पोलिसांना सांगत होते आमची तक्रार घेऊ नका पण आम्ही आमच्या पद्धतीने पैसे वसूल करतो, नंतर आपण आमच्या विरोधात कोणाची ही तक्रार घेयाची नाही.कायदा सुव्यवस्था बिगडल्यास आम्ही जबाबदार नाही.त्यांची सर्व जबाबदारी आपली असेल.या नंतर पोलीस अधिकारी नाका कामगारांचे पैसे बुडविणाऱ्याला पोलीस गाडीत घालून आणून समोरा समोर बसवून तडजोड करून देत होते.मुंबई ठाणे जिल्ह्यातील अनेक काँग्रेस शिवसेनेच्या मान्यता प्राप्त नेते नगरसेवक,आमदार पदाधिकाऱ्या सोबत सत्यशोधक संघटनेने सनदशीर मार्गाने संघर्ष केला आहे.
सत्यशोधक कामगार संघटना ही एकमेव अशी संघटना आहे की ती कष्टकरी नाका कामगारांना न्याय,हक्क आणि प्रतिष्ठे साठी प्रामाणिक,निस्वार्थी पणे लढते. संघटना स्थापन करतांनाच संस्थापक अध्यक्ष विजय सातपुते,सागर तायडे,अंकुश भोळे यांनी सांगितले होते की नाका कामगार संघटनेचे रोपटे आम्ही लावतो त्याचा वटवृक्ष झाल्या वर त्याला लागणारे फळे खाण्यासाठी तुम्ही आम्ही नसू तर ती खाण्यासाठी अनेक पक्षाची डोम कावळे जमा होतील.ती आम्हीच या नाका कामगारांची संघटना बांधली असे भासवतील.तेेव्हा नाका कामगार संघटनेला विरोध करीत होते.तेच पुढे स्वतःला संस्थापक अध्यक्ष म्हणुन घेतील.आज ते सत्य झाले आहे अनेक नाक्यावर नाका कामगार संघटनेला विरोध करणारे महापुरुषाच्या विचार धारेशी गद्दारी करणाऱ्या चळवळीचे कार्यकर्ते स्वतःला संस्थापक म्हणायला लागले. ज्यांना नाक्यावर कडीया मिस्त्री,पेंटर,बिगारी, असा नांवाने ओळखल्या जात होते त्यांचे कधी कोणी आदराने नांव घेत नव्हते त्यांना सत्यशोधक कामगार संघटनेने स्वतःची ओळख निर्माण करून दिली म्हणुन ते आता अनेक पक्षात संघटनेत कार्यकर्ते म्हणुन काम करतात.ज्यांनी संघटनेच्या विचारधारेशी बेईमानी करून फंडिंगवाल्या MSW समाजसेवकाच्या संघटनेचे दलाल म्हणुन काम करतात.त्यांनी समाजाचा आणि नाका कामगारांचा विश्वास गमावला.त्यामुळे प्रामाणिक पणे नाका कामगारा करीता काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे कष्ट वाया गेले. नाक्या नाक्यावर वर्गणी गोळा करणारे पेड वर्कर कधीच संपलेले आहेत. कारण फंडिंग असेल तर फुल समाज सेवा, फंडिंग बंद तर समाजसेवा बंद.त्यामुळे सत्यशोधक संघटनेच्या क्रांतिकारी विचाराला विरोध करून काही समाजसेवी संस्था संघटनेच्या प्रलोभनाला बळी पडून नाका कामगारात फूट पडली आहे.काही कार्यकर्ते केवळ पोट भरण्याचा उधोग करीत आहेत.त्यामुळे नाका कामगारात नाक्यावर राजकीय  पक्षाच्या आणि धंदेवाईक कामगार संघटनेचे पेव फुटले आहे.नाक्या नाक्यावर संघटना निर्माण झाल्या त्यात सर्वच संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ,केंद्रीय अध्यक्ष झाले आहेत.त्यामुळे राज्य सरकार नाका कामगारांची विशेष दाखल घेत नाही.ग्रामीण भागात बांधकाम कामगारांची नांव नोंदणी होत आहे.पण मुंबई नवीमुंबई ठाणे जिह्यात नाका कामगार नांव नोंदणी पासुन वंचित आहेत.कारण त्यांना वर्षातील नवद दिवस काम करण्याचे प्रमाणपत्र कोणीच ठेकेदार देण्यास तयार नाही.नगरविकास खात्याने महानगरपालिका नगरपरिषद यांना नाका कामगारांना नवद दिवसाचे प्रमाणपत्र देण्याचा आदेश दिला पण त्यासाठी लागणारी यंत्रणा,कर्मचारी यांची व्यवस्था कोणा कडेच नाही. त्यामुळे नाका कामगारात सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष असला पाहिजे होता तो नाही.तर नाका कामगारात संघटना आणि कार्यकर्त्या बाबत असंतोष आहे.
फंडिंगवर चालणाऱ्या संस्था, संघटना वेळोवेळी मोर्चे मेळावे आंदोलन करतात.यात भाग घेण्या करीत देशभरातील संघटित कामगारांचे मान्यताप्राप्त नेते आणि राजकीय नेत्यांना असंघटीत कामगारांना मार्गदर्शन करण्यास बोलावतात.जे नेते स्वतःच्या पक्ष संघटनेच्या बॅनर खाली असंघटीत कामगारा करीता विधानसभा, लोकसभेत आवाज काढत नाही ते असंघटीत कामगारा समोर छाती फुगून न्याय मिळवुन देण्याची भाषा करतात. पण नाका कामगारांच्या नांव नोंदणी संख्या वाढताना दिसत नाही.त्यामुळे असंघटीत कामगारांना न्याय मिळवण्यासाठी देशभरातील संघटित कामगारांच्या नेत्यांना आणि राजकीय नेत्यांना मोर्चा मेळाव्यात प्रामुख्याने बोलवल्या जाते कि आपली ओळख आणि शक्ती दाखविण्याचा करीता?.असो त्यामुळे नाका कामगार व बांधकाम कामगारात प्रचंड जनजागृती झाली पाहिजे होती. आणि नाक्या नाक्या वरील संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष जमीन दोस्त झाले पाहिजे होते.पण आज नाक्यावर तसे नाही.प्रामाणिक कुशल कामगार ठेकेदार आणि स्वाभिमानी नाका कामगार यांच्या पासुन सुरक्षित अंतर ठेऊन आहेत.ते कोणत्या ही पक्षाच्या व समाजसेवकाच्या प्रलोभनाला बळी पडत नाही.म्हणून ते दुर्लक्षित आहेत असे काही लोकांना वाटते.पण तसे नाही ते जागृत आहेत.आणि सत्यशोधक आहेत.म्हणून सत्यशोधक कामगार संघटना वीस जिल्ह्यात व तीन राज्यात कार्यरथ आहे.आणि सोबत जिल्ह्यातही इतर संस्था,संघटना यांना सोबत घेऊन महाराष्ट्र असंघटीत बांधकाम कामगार संघटना समनव्य समिती द्वारे सतत कामगार मंत्री सचिव,आयुक्त यांच्या बरोबर चर्चा करून मार्ग काढण्याच प्रयत्न करीत होती.अनेक जिल्हयात सहायक कामगार आयुक्त यांच्या कडे सनदशीर मार्गाने नांव नोंदणी सुरु आहे.असंघटीत कामगारात वैचारिक जनजागृती होणे महत्वाचे आहे. राजकीय पक्ष आणि त्यांच्या कामगार युनियन यांनी सामाजिक,शैक्षणिक आणि धार्मिक शोषण कडे जाणीव पूर्वक काना डोळा केल्यामुळे संघटित कामगार केवळ स्वतःच्या पगारवाढ आणि बोनसचा विचार करतात. त्यामुळे त्यांच्या कंपनीत खात्यात असंघटीत कामगार कंत्राटी कामगार म्हणून काम करतात.त्यांचे फळ त्यांची सुशिक्षित मुलंमुली ही भोगतात.
सर्व क्षेत्रातील असंघटीत कामगारांनी व बांधकाम धंद्यातील सर्वच असंघटीत कामगारांनी संघटित होणे गरजेचे आहे.करीता कामगारांना स्वाभिमानी बनावे लागेल.देशात ९३ टक्के असंघटीत कामगार आहेत ते १४२ प्रकारात विभागलेले आहेत. आणि विशेष हे सर्व राज्यातील मागासवर्गीय,आदिवासी भटके विमुक्ते जाती जमातीतील आहेत.यातील चाळीस टक्के लोकांनी सत्यशोधक बनल्यास म्हणजे फुले शाहु,आंबेडकर विचारधारा स्विकारली तर सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक परिवर्तना सोबत राजकीय परिवर्तन झाल्या शिवाय राहणार नाही.गरज आहे संघटीत होण्याची. राजकीय नेत्यांच्या भरोशावर असंघटीत कामगार बसल्यास तो पुन्हा पुन्हा जातीच्या चक्रव्युवात अटकल्या शिवाय राहणार नाही.असंघटीत नाका कामगारांनी स्वाभिमानी बनावे.म्हणून सत्यशोधक कामगार संघटना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजदूर युनियन (ILU) या राष्ट्रीय ट्रेंड युनियन शी संलग्न झाली आहे.देशपातळीवर ज्या राष्ट्रीय ट्रेंड युनियन आहेत त्या वेगवेगळ्या वैचारिक वारसा सांगणाऱ्या राजकीय पक्षाच्या असल्या तरी त्या सर्वांचे उद्धिष्ट एकच आहे.त्या जातीव्यवस्था,वर्णव्यवस्था,हिंदुत्व मनुवाद नाकारतानां  दिसत नाही,त्यांची जनते समोर भाषा एक आणि आचरण वेगळे असते.बहुसंख्य मागासवर्गीय,बहुजन समाज समजुन घेत नाही म्हणूनच तो वर्षानं वर्ष फसल्या जातो.त्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टींचा स्वीकार करून अंमलबजावणी केली पाहिजे. मागासवर्गीय समाजाचे दोनच शत्रू एक भांडवशाही दुसरी ब्राम्हणशाही ही संपविण्यासाठी लोकशाही पद्धतीने देशातील कामगार कर्मचारी यांनी एक होऊन राष्ट्रीय ट्रेंड युनियन (आय एल यु) च्या नेतृत्वाखाली संघटीत होऊन राजकीय पक्षावर दबाव गट म्हणून काम करावे.असे बाबासाहेब सांगत होते.आता आपण त्यांचे किती ऐकले यांचे आत्मचिंतन कामगार कर्मचारी अधिकारी यांनी केले पाहिजे.संघटीत कामगाराचा कोणत्याही संघटनेवर पक्षावर विश्वास राहिला नाही.परंतु आम्ही काम करणे सोडले नाही.जुने कामगार जातात नवीन कामगार येतात. विचारधारा मात्र तशीच कायम प्रेरणादायी राहते 
सत्यशोधक कामगार संघटने मुळे ग्रामीण भागात मोठया प्रमाणात जनजागृती होत आहे.त्यामुळे
नोंदणीकृत कामगारांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे.ग्रामीण भागातील कामगारांना लाभ मिळत असतांना शहरी भागात बांधकाम कामगारांना नवद दिवसाचे प्रमाण पत्र मिळणे अवघड झाले आहे. असंघटीत बांधकाम कामगारांची नांव नोंदणी करण्यास सरकारी यंत्रणा उदासीन आहे.आमच्याकडे कर्मचारी नाहीत स्टेशनरी नाही कसे काम करावे प्रथम आमची समस्या सोडवा कर्मचारी वाढीसाठी निवेदन द्या,मोर्चे काढा सांगणारे अधिकारी खरच काम करण्यासाठी तयार असतील काय?.संघटीत कामगारांच्या ट्रेंड युनियन यांनी योग्य वेळी कामगार कर्मचाऱ्यांच्या निवृत्त झालेल्या जागा न भरल्यामुळे कंत्राटी कामगार भरल्या जात आहेत.आणि भरडल्या जात आहेत.असा परिस्थितीत सत्यशोधक कामगार संघटना महाराष्ट्रासह अनेक राज्यात किर्याशील आहे,इतर राज्यात जाण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही कारण मुंबईत असंघटीत कामगार व बांधकाम धंद्यातील बहुसंख्य कामगार हा इतर राज्यातील आहे त्याला इथे संघटनेचे महत्व समजले की तोच फुले,शाहु आंबेडकर विचारांची क्रांतिकारी सत्यशोधक संघटना आपल्या राज्यात घेऊन जात आहे.त्यामुळेच आम्ही गर्वाने सांगतो आणि लिहतो स्वाभिमानी असंघटीत नाका कामगार संघटित होत आहेत.

सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा