शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

कोरोना आणि लोकनेते ओबीसी नेते दि बा पाटील यांचा ७ वा स्मृतिदिन!

 कोरोना आणि लोकनेते ओबीसी नेते दि बा पाटील यांचा ७ वा स्मृतिदिन!

देवांनी मैदान सोडले! अशी लढाई म्हणजे कोरोना महामारीच्या लाॅकडाऊनूची लढाई!एरवी कोणतेही संकट आल्यावर देवाचिया द्वारी उभा क्षणभरी...हे ओबीसी हिंदू माणसाचे खरे खुरे वर्णन कोरोनाच्या काळात खोटे ठरले. महाभारताची प्रत्यक्ष मैदानी लढाई घर बसल्या पाहणाऱ्या संजयाची दिव्य दृष्टी  वर्तमान काळात मोदीभक्तीने अंध झालेल्या देशात, सेनेच्या खासदार संजय राऊत यांना प्राप्त झाली. जवळ जवळ सर्वच माणसांना कोरोनाच्या काळात देवांची गरज असताना मंदिरांना आणि देवांच्या तिजो-यानांही टाळे लागले. भक्तांना देवांनी वाचविण्या अगोदरच, देव आणि देवालये यांना बेरोजगार भक्तांपासून वाचविण्याचा निर्णय कपटी पुजारी भटजी पुरोहितशाही सरकारने घेतला. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मंदिरांना टाळे लावले गेले, हे तेथे देव नाही! हे सत्य प्रकट करणारे विश्वरूप दर्शन लोकांना झाले. परन्तु मंदिरातला पैसा उपाशीपोटी जनतेसाठी खुला करण्याची मानवतेची हाक देव, देवळाचे उच्चवर्णीय ट्रस्टी आणि सरकारलाही ऐकू येऊ नये? म्हणूनच संजय राऊत याचे कौतुक आपण सर्वांनी करायला हवे.
        देव नाकारून दि बा पाटील साहेबांनी आगरी कोळी कराडी ओबीसी समाजासमोर जो मानवी कर्तृत्वाचा हिमालय उभा केला आहे, ते समजण्यासाठी वर्तमान कोरोना सारखा उपयुक्त दुसरा काळ नाही. मानवी जीवनाच्या बेरोजगारी, शिक्षण, आरक्षण, साथीचे रोग आणि जन्म मृत्यु यात देवाचा काडीचाही उपयोग नाही हे कटुसत्य कुणी स्वीकारत नाही. अर्थात देव नाकारून,पाच हुतात्मे आणि स्वतःचेही रक्त सांडून,सिडको पुनर्वसनाचे साडे बारा टक्के भूखंड देणाऱ्या ,दि बा ना स्वीकारणे अवघड काम आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सिडको भूखंड स्वीकारले! दि बा ना स्वीकारणे अजून बाकी आहे. अर्थात कठीण काम आहे.
        नेहमीच देव देवतांच्या जयंत्या साजऱ्या करणाऱ्या भारतीय समाज मनाला मानवी जयंती साजरी करण्याचा संस्कार अजूनही नीट झालाय असे म्हणणे धोक्याचे ठरेल. देवापुढे माणूस पालापाचोळा आहे अश्या विचारामुळे माणसाचे कर्तृत्व नाकारले गेले आणि देवपूजेची अपरिहार्य स्थिती माणसासमोर आणली गेली. 2500 वर्षांपूर्वी बुद्ध महावीर यांनी देव नाकारला. अर्थात देव नाकारून माणसाची पूजा करा असेही सांगितले नाही.तर देव आणि मानवी व्यक्तिपूजा माणसाला गुलामीकडे घेऊन जाते,पूजा आदर्शाची सद्गुणांची आणि जीवनमूल्यांची करावी. आम्ही देव नाही. देवपूजा आणि मानवी व्यक्तिपूजाही नाकारली. जमिनीवरची संकटे जमिनीवरचा माणूसच सोडवू शकतो, आकाशातला देव नाही. असे तत्वज्ञान स्वीकारून ते जगण्याचा यशस्वी प्रयत्न करणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्यात जो आदर्श आगरी कोळी कराडी भंडारी ओबीसींना दिला त्याच विचारांनी दि बा पाटील जगले. रायगड जिल्ह्यातील खोती जमीनदारी विरोधातील आंदोलन आदरणीय नारायण नागु पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली केले ते खऱ्या अर्थाने देवाचे मालक असलेल्या शेटजी भटजी या उच्चवर्णीय जमीनदारी विरोधात होते. 
        लोकमान्य टिळक हे ब्राह्मणी खोतशाहीचे समर्थक होते. राष्ट्रीय  स्वयंसेवक संघाचे दुसरे संघचालक हे स्वतः खोत सावकारी कुप्रेथेचे लाभार्थी होते. आठवले, बिवळकर,धर्माधिकारी जोशी ही आज गाजलेली आडनावे खोत लोकांचीच आहेत. अर्थात रायगड जिल्ह्यातील  अॅड दि बा पाटील आणि अॅड दत्ता पाटील ही महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधीपक्ष नेतेपदी पोहचलेली दोन महान ओबीसी माणसे, भूमिहीन कुळे विरुद्ध जमीनदार खोत सावकार संघर्षातून मानवी कर्तृत्वातून पुढे आलेली माणसे होती. दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री सांगतात "ब्राह्मण म्हणून लोक त्यांना विरोध करतात याचे वाईट वाटते. माझे कर्तृत्व पहा." देवेंद्रजी आपले वडीलही जमीनदार होते. त्या खानदानी श्रीमंतीचा फायदा निवडणुकीत घेऊनच आमदार मुख्यमंत्री झालात, नव्हे विधान सभेतील दोनशे आमदार असेच पिढीजात धर्मसत्ता जमीनदारी आणि सावकारी यातूनच पुढे आलेत! यात भूमिहीन ओबीसी एससी एसटी यातील दि बा पाटील यांच्यासारख्या गरिबीतून पुढे आलेल्या आगरी ओबीसींचे कर्तृत्व हे पहायचे असते. तुमच्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्चवर्णीय जातीतून जे जे मुख्यमंत्री महसूलमंत्री गृहमंत्री आजही झालेत , त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा ही मनुस्मृतीच्या जुन्या परंपरागत लोकशाही विरोधी मार्गे निघाल्याचे अधोगतीचे संकेत आहेत. आपण विरोधीपक्ष नेतेपदी असताना ,निसर्ग वादळाने बंद पडले कोकणाचे दिवे पंधरा दिवसात पेटवू शकत नाहीत, मागासवर्गीय तरुणांच्या हत्या थांबवू शकत नाहीत. यात आपण आणि शरद पवार हे उच्चवर्णीय महायुतीचेच सरकार चालवताय हे आम्हा आगरी कोळी भंडारी ओबीसींना समजते. 
        दि बा पाटील यांनी विरोधीपक्ष नेतृत्वाची उंची जी महाराष्ट्राला प्राप्त करून दिली ती पहाता देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विधानसभेतील दि बा पाटील यांची छापील भाषणे अभ्यासावीत आणि मगच बोलावे.माझी जात न पाहता कर्तृत्व पहा. खऱ्या कर्तृत्वाने पुढे येण्यासाठी कोकणातील ओबीसींना केवढा संघर्ष करावा लागतोय.?हे नवी मुबंई विमानतळ,कोळीवाडा गावठाण प्रश्न ,मच्छिमार बांधवांचे नाकारलेले पुनर्वसन हे तुमच्या आणि विद्यमान सरकारने प्रलंबित ठेवलेले प्रश्न आहेत.सत्ताधारी ठाकरे पवार सरकार आणि विरोधी पक्ष नेते म्हणून देवेंद्रजी आपणही या महापापाचे वाटेकरी आहात.महाराष्ट्राच्या सत्तेत कायम ब्राह्मण मराठा मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाचे वर्चस्व राखण्यात देवांचे देवालय आणि कोकणातल्या दादा बापू नाना यांचेच आशीर्वाद लाभलेत. म्हणूनच दि बा ना कोणत्याही सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने पुरस्कृत केले नाही. ते ओबीसी मागासवर्गीय आहेत म्हणूनच ना?
         शेतकऱ्यांना न्याय देव आणि देव समर्थक जमीनदार देऊ शकत नाहीत म्हणून दि बा पाटील साहेबांनी देव नाकारला. अर्थात मी सांगितलेल्या मार्गानेच चला ,असा दुराग्रह कधीच धरला नाही! कारण हा मार्ग विवेकाचा ,प्रज्ञा, आणि स्वतः च्या शहाण्या अनुभवाने स्वीकारण्याचा विषय आहे. हजारो वर्षे मनुस्मृतीच्या वैदिक हिंदू कायद्याने शंभरच्या शंभर नोकऱ्या आणि राजसत्तेच्या जागा १५ टक्के ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनाच देणाऱ्या अन्याया विरोधात जाऊन ५२ टक्के आगरी कोळी कराडी माळी भंडारी ओबीसींना तसेच एससी एसटी या मागासवर्गीय भावांसहित ८५ टक्के लोकांना किमान ५० टक्के जागा मिळाव्यात यासाठी मंडल  आयोगाचे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर करणारे दि बा पाटील वैदिक हिंदू मानसिकतेच्या ओबीसी आगरी कोळ्यांना जेव्हा कळतील तेव्हा कदाचित आरक्षणाचा अधिकार संपविण्याच्या मार्गात पवार फडणवीस मोदी युती यशस्वी झालेली असेल. शरद पवार हे पुरोगामी नाहीत हे ब्राह्मण फडणविसच सांगू शकतात. अर्थात मनुस्मृती धर्मात क्षत्रिय सत्तेपेक्षा परशुधारी पुरोहित श्रेष्ठ आहेत.महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते  नागपूर, पुणे, खालापूर, रायगड येधे मागासवर्गीयाची जी अन्याय अत्याचाराची हत्याकांड घडवीत आहेत त्यामुळे पवारवादी राष्ट्रवादीचे पुरोगामीपण उध्वस्त झाले आहे.     
        दि बा पाटील याचा स्मृतिदिन साजरा होणे ही ओबीसी आगरी कोळी कराडी समाजासाठी खूप मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती ज्या पद्धतीने जपल्या जातात तोच आदर्श ओबीसी समाजाने घेतला पाहिजे. तो भव्यपणा, पुस्तके वैचारिक साहित्याची करोडो रुपयांची विक्री,विदवत्तापुर्ण भाषणे,हे स्मृती जपण्याचे संस्कार साऱ्या देशासाठी आदर्श आहेत. साडेबारा टक्के घेतलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या आजोबासारख्या होणाऱ्या पारंपरिक पुण्यतिथीच्या पद्धतीने दि बा सारख्या विचारवन्त नेत्यांच्या आठवणी स्मृती न जपता त्यांच्या समाज हक्कांसाठीचा संघर्ष, राजकीय सामाजिक जीवन,सिडको विरोधात कधीही न संपणारा संघर्ष, धर्म देव देवळे यांच्याकडे पहाण्याचा खरा वास्तववादी आदर्श दृष्टिकोन,आचरणात आणणे गरजेचे आहे. नवी मुबंई विमानतळ प्रश्न, नवी मुबंई गावठाण प्रश्न, मुबंई गावठाणे कोळीवाडे, ओबीसी आरक्षण यात तरुण मोठया संख्येने भाग घेताहेत ही आशादायक दिलासा देणारी बाब आहे. तरीही देव नाकारून विज्ञाननिष्ठ मागासवर्गीय भारतासाठी काम करणाऱ्या बुद्ध ,सावित्री जोतिबा फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर नारायण नागु पाटील दि बा पाटील दत्ता पाटील यांना अजूनही आपल्याच ओबीसी भावाच्या नजरेतील उपेक्षेतून किती काळ जावे लागणार ?. याचे शल्य आजच्या या स्मृतिदिनी जाणवतच राहील!

राजाराम पाटील 8928452112
ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र
 (विशेष विनंती लेख आपल्या वैचारिक,राजकीय अडचणीचा असेल तर प्रसिद्ध केला नाही तरी हरकत नाही. आणि लेख प्रसिद्ध केल्यास कृपया pdf पाठवावी.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा