असंघटित कामगारांचा नायक - अण्णाभाऊ साठे
अण्णाभाऊ साठे हे क्रांतिकारी विचार व व्यवहार आत्मसात केलेले महान साहित्यिक होते.त्यांची बांधिलकी या देशातील असंघटित कष्टकरी समाजाची जातीव्यवस्था व भांडवलशाहीने चालविलेल्या अमानुष शोषण विचारा विरोधी होती.म्हणून त्यांची लेखणी असंघटित कामगार वरील अन्याय करणाऱ्या सावकार,शेटजी,भटजी वर तलवारी सारखी चालायची. गोरगरीब वंचित मागासवर्गीय शोषित कष्टकरी कामगार मजुरांना कथा, कादंबऱ्यात नायक बनविण्याची त्यांची जाणीव आजच्या असंघटित कामगारांना व मातंग समाजाला त्यांचे शोषण करणाऱ्या नेत्यांना नाही.
अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी साजरी करतांना भांडवलदार विरोधात सतत लेखणीची तोप चालविणारा गोरगरीब वंचित मागासवर्गीय शोषित कष्टकरी कामगार मजुरांच्या शोषणा विरोधात प्राणपणाने लढणारा कॉम्रेड अण्णाभाऊ साठे गेल्या साठ वर्षात कॉग्रेस राष्ट्रवादी, भाजप शिवसेना यांनी मातंग समाजातील सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरसेवक,आमदार आणि खासदार बनवून अण्णाभाऊ साठेचे क्रांतिकारी विचार गाडून त्यांच्या पुतळ्यात उभा केला आहे. ज्या भांडवलदारांच्या हितसंबंधावर अण्णाभाऊ आसूड ओडत होते तेच भांडवलंदारांचे चमचे,दलाल आणि एजंट असंघटित कामगार,मजूर मातंग समाजांचे मेळावे भरविण्यासाठी पैसा पुरवू लागले. नेते असंघटित कामगार मजुरांच्या अज्ञानाचा फायदा घेत आहेत. मातंग समाजातील असंघटित कामगार मजुरांची व्होट बँक बनविण्यासाठी स्वार्थी पुढारी नेते अण्णाभाऊ साठे यांचे क्रांतिकारी विचार ,प्रतिक विकृतीकरण करून वापरत आहेत.
अण्णाभाऊ तुम्ही डफावर थाप मारली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे मानकरी ठरतात. लाल बावटा कला पथकातून गोरगरीब वंचित मागासवर्गीय शोषित कष्टकरी कामगार मजुरांच्या श्रमावर अनेक कवने लिहली.त्यां कष्टकरी समाजाला स्वाभिमानाने लढण्याची प्रेरणा दिली. आज मातंग समाजातील अनेक नेते काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप शिवसेना यांचे प्रतिनिधी म्हणून सरपंच ,पंचायत समिती, जिल्हा परिषद, सदस्य, नगरसेवक, आमदार आणि मंत्री झाले पण त्यांची लायकी फक्त मुजरा घालण्या एवढीच राहिली. काँग्रेस पक्षाच्या राजपुत्रांचे जोडे उचलणारा गृहमंत्री गेल्या पन्नास वर्षात झाला नसेल.कॅबिनेट मंत्री असुनही त्यांच्या खात्याचा पैसा वापरण्याचा अधिकार ज्यांना नाही त्या विरोधात पक्षाच्या बैठकीत किंवा मंत्रिमंडळाच्या मिटिंग मध्ये बोलण्याची हिंमत त्यांच्यात नाही त्यांना आपण अण्णाभाऊचे अनुयायी, शिष्य कसे म्हणायचे?. हे सांगण्याचे लिहण्याचे धाडस त्यांच्यात नाही ते बेशरम पणे आंबेडकरी चळवळीतील विचारपीठा वर सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आपल्याला कशी वागणुक ते जाहीरपणे मांडतात.हे अण्णाभाऊ साठे यांचे क्रांतिकारी विचार समाजाला कसे सांगतील?.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणा नंतर अण्णाभाऊ साठेनी आंबेडकरी चळवळीतील कष्टकरी समाजाचे नेतृत्व आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट चळवळीचे नेतृत्व करणाऱ्यांचा समनव्य घडवून आणण्यासाठी व ब्राम्हणी शक्तीला उलथवून टाकण्यासाठी गोरगरीब वंचित मागासवर्गीय शोषित कष्टकरी कामगार मजुरांना हाक देतात. "एकजुटीच्या ह्या रथावरती !. आरूढ होऊन चल बा पुढती!. मिळून महाराष्ट्र बा जगती!. करी प्रकाश निजनांव!. जग बदल घालुनी घाव!. सांगुनी गेले मज भिमराव!." हे आजही मातंग समाजाला एकूण गोरगरीब वंचित मागासवर्गीय शोषित कष्टकरी कामगार मजुरांना माहिती नाही.
मातंग समाजाच्या सुशिक्षित लोकांना कार्यकर्ते,नेते यांना माहिती नसेल असे समजणे चुकीचे ठरेल. अन्यता हे हा सर्व समाज मोठ्या संख्येने अण्णाभाऊच्या विचारांची प्रेरणा घेऊन कम्युनिस्टाकडे गेला असता.किंवा आंबेडकरी विचारांच्या चळवळीत विलीन झाला असता. पण ज्या अर्थी मातंग समाज मोठ्या संख्येने कॉग्रेस, राष्ट्रवादी, भाजप शिवसेनेकडे गेला त्या अर्थी त्यांचा मानसिक लाचार गुलामांची फौज झाला असे म्हणतात.कारण क्रांतिकारी विचारांच्या नेत्यांचे अनुयायी शिष्य क्रांतिकारी विचारांच्या संघटना चळवळीत सहभागी होत असतात. सर्वच गोरगरीब वंचित मागासवर्गीय शोषित कष्टकरी कामगार मजुरांचे नेतृत्व करणारे कार्यकर्ते नेते लाचार,दलाल,एजंट झाले आहेत. जे स्वाभिमानी आहेत ते स्वबळावर आज ही मनुवादी हिंदुत्ववादी ब्राम्हणशाही भांडवलशाही विरोधात वैचारिक आणि रस्त्यावर संघर्ष करतात.
कारण बळी शेळ्या,मेंढ्या कोंबड्याचा दिला जातो वाघाचा नाही.मातंग समाज आंबेडकरी विचारांच्या चळवळीकडे वळला असता तर तो बौद्ध धम्मात जुळल्या गेला असता. त्यांचे जगाशी नाते जुळले असते.तो कम्युनिस्ट विचारांकडे झुकला असतात तर कष्टकरी कामगार म्हणुन जागतिक पातळीवर नोंद झाली असते.कारण अण्णाभाऊ साठे जागतिक पातळीवर कष्टकरी कामगारांना जागरूक, प्रबोधन करणारा कुशल नेता लोकशाहीर म्हणून ओळख निर्माण झाली होती.
भाजप सेने कडे गेलेला मातंग चर्मकार समाज आंबेडकरी विचारांचा व बौद्ध धम्माचा विरोधक कट्टरपंथी हिंदुत्ववादी झाला.त्यांना सरपंच ,पंचायत समिती, जिल्हा परिषद, सदस्य, नगरसेवक, आमदार आणि मंत्री बनविले,काहींना महामंडळाचे अध्यक्ष पद दिले. दुसरीकडे जातीव्यवस्था वर्णव्यवस्था नुसार त्यांना ब्राम्हणांच्या पुढे मंत्री असूनही लोटांगण घालण्यास भाग पाडले.(माजी सर संघचालक बाळासाहेब देवरस समोर कांबळे नांवाच्या राज्यमंत्र्यांना धर्मानुसार लोटांगण घालावं लागले हा इतिहास वाचा)
मातंग चर्मकार नेत्यांनी जातीची व्होट बँक बनवून कधी सेनेला तर कधी भाजपला सत्ताधारी बनविले त्यामुळे काही बोटावर मोजता येतील एवढ्या नेत्यांचा आर्थिक विकास झाला असेल.तरी त्यांची जात व लायकी कोणताही समाज विसरत नाही. शिवसेनेचे आमदार उपनेते माजी सामाजिक न्याय मंत्री बबनराव घोलप यांच्या गांवात त्यांना कशी शिवीगाळ मारहाण झाली हे गेल्या महिन्यातले ताजे उदाहरण आहे.
महाराष्ट्रातील मांगवाडे आज ही भकास आहेत तर शहरातील अण्णाभाऊ साठे, लहुजी नगर मध्ये राहणारा समाज लसुण विकणारा,प्लास्टिक,जुने कपडे गोळा करून विकण्याचे काम करून पोट भरतो आहे.काही सफाई कामगार म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कामे करतात. ग्रामीण भागात आठवडी बाजारात म्हातारे माणसं दोरखंड, सूप,टारले, विकत आहेत,मांगवाड्यात अंधार आहे,पोरं फाटक्या कपड्यात शाळा सोडून येत आहेत. तरुण डफली वाजविण्यात त्यांच्या बेंजो पार्ट्या बनवुन लग्नात राजे,प्रधानाचा पोशाख घालून मिरवीत आहेत.जुगार व दारू हे मांग महारांच्या (सॉरी राजवाडे,बौद्ध वाड्या) पाचवीलाच पुजले आहे.हे भीषण सत्य अण्णाभाऊ साठेनी त्यांच्या कथा, कादंबऱ्यात प्रखरपणे मांडले.हे सत्य आज समाज स्वीकारण्यास तयार नाही. सुधारण्यासाठी प्रयन करणे आवश्यक असतांना राजकिय पक्षांची पोट भरण्यासाठी लाचारी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी पत्करली असल्यामुळे समाज सुद्धा अपंग बनत चालला आहे. समजाचा विकास आणि कल्याण करण्यासाठी अण्णाभाऊ साठे महामंडळ स्थापन झाले होते. आज पर्यंत किती निधी आला आणि कोणाचा विकास,समाज कल्याण झाले.कोणताही पक्ष हिशेब मागू शकत नाही.एक रमेश कदम एक संचालक जेल मध्ये गेला बाकीच्यांचे काय?.
अण्णाभाऊ साठे यांचे विपुल साहित्य आहे. ३२ कादंबऱ्या,३५ कथा संग्रह मी वाचल्या आहेत. कॉम्रेड शरद पाटील,विजय सातपुते यांनी वाचण्यास भाग पाडले.असंघटीत कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढायचे असेल तर अभ्यास वाचन खूप महत्वाचे आहे.त्यामुळे चिराग नगरची भुते माझा मनावर कोरली आहेत.कारण चर्चगेट ते विरार आणि कुलाबा गीता नगर ते कर्जत,कसारा रेल्वे स्टेशन जवळचे नाके व नाक्यावर उभा राहणारा असंघटित कामगार आणि प्रत्येक शहरातील चौकात कामाच्या शोधात उभा राहणार असंघटित कामगार हा चिराग नगरांच्या भुता पेक्षा सुतभर ही वेगळा नाही.
अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी कम्युनिस्ट विचारांचे शाहीर होते.तसेच ते लोकशाहीर म्हणूनही जग प्रसिद्ध होते.अण्णाभाऊ जातीने मांग असल्यामुळे त्यांच्या साहित्याची दखल घेतल्या गेली नाही.कामगार मजुरांच्या प्रत्येक जन आंदोलनात,संघर्षात त्यांचे गाणे कवने,वगनाट्य,लावणी होत असल्यामुळे त्यांना लोकशाहीर म्हणून विशेष महत्व होते.
कम्युनिस्ट चळवळी ते वाढले व त्यांच्या सोबत लढले ते ब्राम्हणी जातिव्यवस्था वर्णव्यवस्था मानणारे होते.त्यांनी अण्णाभाऊ साठेनां विमानाने रशियाला नेले परंतु उच्च जाती वर्चस्व असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात आल्या नंतर अण्णाभाऊ नां अन्नाला मोहताज केले.एवढा मोठा महान क्रांतिकारक साहित्यिक शेवटी भाकर भाकर करून बाजेवर मुत्यु मुखी पडला असा इतिहास वाचून जातीव्यवस्थेची प्रचंड चीड येते.
ब्राम्हणी लावणीला ज्यांनी ज्यांनी तडा देऊन विद्या विशेष कौशल्य संपादन केली त्या सर्वांचा मुत्यु अटळ होता.शंभूक,एकलव्य आणि अण्णाभाऊ (म्हणजेच महार,आदिवासी, मांग) यांच्या मुत्युचा इतिहास भूगोल प्रत्येक जातीच्या माणसांना माहिती असला पाहिजे. मातंग समाजाचे राजकीय मेळावे भरवत असतांना स्मृतिदिन,जयंतीनिमित्त कार्यक्रम घेतांना त्यांनी जातीव्यवस्थे विरोधात जो संघर्ष केला त्यांचे प्रबोधन आजच्या पिढीला करून देणे ही काळाची गरज आहे.
अण्णाभाऊ साहित्यिक व कॉम्रेड म्हणून प्रसिद्ध होते, पण त्यांनी जातीअंताची लढाई करून जातिव्यवस्थेचे डोकेच कायमचे कापुन काढलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरापुढे नतमस्तक झाले. जातिव्यवस्था विरोधी प्रबोधनाच्या आघाडीत पुढे आले. अण्णाभाऊ च्या प्रत्येक कथा, कादंबऱ्यात हा संघर्ष त्यांनी जिवंत पणे मांडला आहे. ते वाचून माणूस पेटून उठलाच पाहिजे.एवढे प्रचंड शब्द भंडार त्यांच्या साहित्यात आहे. मातंग समाजातील तरुणांनी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ते वाचून त्या पासून प्रेरणा घ्यावी, म्हणून आम्ही म्हणतो अण्णाभाऊ साठे म्हणजे असंघटित कष्टकरी कामगार मजुरांचा खरा नायक. ज्यांनी जगातील विचारवंतांना (विशेष मनुवाद्यांना ) ठासून सांगितले की पुथ्वी शेष नागाच्या फण्यावर तरली नसुन कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरली आहे.त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० ला, आणि मुत्यु १८ जुलै १९६९ ला झाला.१ ऑगस्ट २०२० एक शतक पूर्ण होत आहे. या शताब्दी वर्षात आपण काय प्रेरणा घेतली. यांचे वस्तीपातळीवर आत्मपरीक्षण झाले पाहिजे, कारण निसर्गाचा नियम जे पेरले तेच उगवणार,आणि विहिरीत नसेल तर पोहऱ्यात कुठं येईल.अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचारांना व प्रतिमेला त्रिवार वंदन
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९, भांडुप मुंबई,
(अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना)
संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन (ILU)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा