पुरुषप्रधान समाज व्यवस्थेचा बळी
भारत हा पुरुषप्रधान समाज व्यवस्था असणारा देश आहेच त्यांचे बरोबर तो जातीव्यवस्था मानणारा मनुवादी मानसिकता असणारा देश आहे,म्हणूनच स्त्री जातीच्या महिलेवर लैंगिक शोषण, अत्याचार, बलात्कार करणारे खुलेआम फिरतात. त्यांना कायद्याची समाजाची कोणतीच भिती वाटत नाही. पैसा असेल आणि राजकीय आशीर्वाद असला तर सर्वच न्याय विकत घेता येतो. त्यामुळे अत्याचार, बलात्कार करणाऱ्या पुरुषांची जात पाहून न्याय दिला जातो.किंवा स्त्री जातीच्या महिलेची जात पाहून शिक्षा दिली जाते. भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी, अहमदनगर जिल्ह्यातील खेरडा, जवखेडा, सोनईच्या स्त्री जातीच्या मुलीवर बलात्कार करून तिला मारून टाकले तर तिला ऍड उज्जवल निकम सारखे विधितज्ञ न्याय मिळवून देण्यासाठी परिस्थिती जन्य पुरावे गृरहीत धरत नाही.पण कोपर्डीच्या स्त्री जातीच्या मुलीवर अत्याचार बलात्कार झाला. तर परिस्थिती जनक पुरावे ग्रहाय धरून न्याय मिळवून देण्यासाठी विशेष कौशल्य दाखविल्या जाते.आणि न्यायालय ते मान्य करून न्याय देते.त्यांचे राज्यभरात स्वागत केले जाते.तो नियम,कायदा,कलम खैरलांजी, खेरडा,सोनाई ला का लागु होत नाही.
हैदराबादच्या प्रिया रेड्डी अत्याचार, बलात्कार घटना,पोलीस चौकशी, न्यायालयीन चौकशी आणि शिक्षा तर गिनीज बुकचे रिकार्ड तोडणारे आहेत.प्रिया रेड्डीचा खरा मारेकरी, सूत्रधार समोर येण्याचे सर्व दरवाजे बंद झालीत. मनुवादी ज्वलंत हिंदुत्ववादी राजकिय यंत्रणा कशी अश्वगतीने काम करते. त्यासाठी मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाला गुन्हेगार ठरवुन शिक्षा दिली जाते. त्यांचे अनेक लक्षवेधी उदाहरणे आहेत. अन्याय,अत्याचार आणि शोषण जात पाहूनच होतात. बलात्कार, हत्याकांडात सुध्दा जात धर्म पाहूनच होतात असे म्हणतात.राजकारण आणि धर्मकारण यात प्रत्येक समाज कुठेतरी स्वार्था पोटी भरडला जात आहे. त्यामुळेच अन्याय,अत्याचार व बलात्कारा नंतर च्या हत्याकांडा विरोधात समाज संघशक्ती म्हणून रस्त्यावर उतरून सनदशीर मार्गाने संघर्ष करीत नाही. काही राजकीयदृष्ट्या तर काही धार्मिकदृष्ट्या स्वार्थासाठी जनआंदोलन करून "लोहा गरम है मार दो हथोडा" या स्वार्थी वृत्तीने आंदोलने केली जातात.
हिंगणघाट शहरांत जळीत हत्याकांड प्रकरण घडले.त्यात अजूनही कोणत्याही जातीचा रंग लावल्या गेला नाही. अशा घटना आपल्या देशात कुठे ही घडू नये. त्यासाठी सर्व विद्यार्थी, माता भगिनी. समाजातील सर्व समाजाचे असंख्य लोक जे भारताचे नागरिक आहेत.त्यांनी सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्ते,नेते नागरिक, एकत्रित येऊन अश्या घटनेचा कडकडीत विरोध केला पाहिजे. केंद्र व राज्याचे कायदे किती ही कडक असुन चालत नाही. त्या कायद्याची निःपक्षपाती, निर्भीडपणे निस्वार्थी अंमलबजावणी करण्यासाठी कर्तव्यदक्ष, कर्तव्यनिष्ठ प्रशासकीय यंत्रणा पाहिजे.आज देशात ती कुठेही पूर्णपणे नाही. शंभरात काही वीस टक्के जागरूक आहे.म्हणून आसाराम,रामराहिम सारखे महा बलात्कारी जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत.
पुरुषांच्या लैंगिक शोषणाला बळी पडणारी स्त्री जातीची मुलगी,महिला कोणाची मुलगी,बहीण,आई,पत्नी, कोणी तरी आहे. प्रत्येक समाजाने ती माझी आहे.हे गृहीत धरून दररोजच्या जीवनात आचरण केले.तर कुठेही अशी घटना घडणार नाही. समाजातला परिवार कुठे तरी मोठा स्वार्थी झाला आहे. प्रत्येक वेळी सरकारला व प्रशासनाला दोषी ठरवुन चालणार नाही.राजकीय नेत्यांच्या भ्रष्ट नितीमुळे प्रशासकीय अधिकारी पंचनामे, साक्षीदार, व पुरावे खाऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करून फाईल न्यायालयात सादर करतात. पोलीस अधिकारी, न्यायालयातील कार्यालयीन कर्मचारी न्याय मागणाऱ्या लोकांचे आर्थिक शोषण खुलेआम करतात.त्यामुळेच अन्याय,अत्याचार, बलात्कार आणि हत्याकांडात गोरगरीब कष्टकरी समाजाचा मोठया प्रमाणात बळी जातो.नितीन आगे या कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलांचे कोणत्या मुली बरोबर प्रेम होते?. केवळ संशयास्पद वागणुकीमुळे शाळा, कॉलेजच्या वर्गातून शेकडो विद्यार्थी व शिक्षकांच्या समोर शाळेतुन गांवातून गावकऱ्यांच्या साक्षीने निर्दयपणे हालहाल करून मारले. तेव्हा समाज जातीव्यवस्थेचा चष्म्यातून पाहत होता. तो समाज स्वार्थी होता.त्याला काय शिक्षा झाली कोणी सांगु शकेल काय?.
एक प्राध्यापक (अंकिता पिसुड्डे )मुलीला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याची हिंमत एक (विकेश नगराळे) मुलगा करतो आणि समाजातील लोक आंधळ्या सारखे ते पाहतात.मुलगा सहीसलामत निघून जातो.मुलगी जिवाच्या आकांताने हंबरडा फोडते समाजातील माणूस पुढे येत नाही.स्मार्टफोन ने फोटो काढतो.सोशल मीडियावर टाकतो.ती मुलगी अखेरपर्यंत हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत हारली. स्वार्थी समाज व्यवस्थेने अखेर तिचा बळी घेतला.
स्त्री म्हणजे घर आणि मूल, स्त्री ही दासी, नवऱ्याची सेवा करणारी, घर -संसार करणारी, हेच तिचे आयुष्य, स्वतंत्र विचार तिने करायचाच नसतो अशी मानसिकता वर्षानुवर्षे या भारत भूमीवर सुखनैव नांदत होती, तिची इच्छा असो या नसो, तीला नवऱ्याच्या चितेवर "सती" जावे लागत होते, असा तो काळ होता. आणि आज असा काळ आला आहे. त्या काळात ज्योतिबा फुले याच्या पत्नीने सावित्रीबाई ने मुलींची शाळा काढावी हे तर प्रस्थापित पुरुषप्रधान संस्कृतीला धक्कादायक होते. तरीही शिकलेली, सुशिक्षित झालेली महिला आज सुरक्षित आहे का?. तर नाही!. गाडीमध्ये 'पॅनिक' बटण देण्याची आवश्यकता लागली नसती, तसेच रात्री कामावरून घरी जाताना कुणा पोलिसांची अथवा कायदेशीर लोकांची जरूर लागली नसती. कॉर्पोरेट कंपन्या मध्ये कायद्याने महिला सुरक्षा सेल स्थापित करणं सक्तीचं करावं लागलं नसतं...
पण तरीही "निर्भया" निर्माण होते, का? आपण शिक्षण घेऊन एवढं मागास कसे, याची कारण मीमांसा करण्याची वेळ आली आहे. लैंगिक शिक्षणाची गरज यामुळे अधोरेखित होते, लैगिंक शिक्षण नसल्याने. कुतूहलापोटी या बाबतची तीव्र इच्छा मुला-मुलींना होते आणि नेमके हेच कारण टोकाच्या हिंसेकडे जाण्यात होते. त्यामुळे पुरुषप्रधान समाज व्यवस्थेचा बळी जात आहे.
औरंगाबाद, लातूर, नागपूर, मुबंई या क्रमाने दररोज स्त्री अत्याचाराच्या घटना सतत कानावर आदळत असतात, पण आपण फक्त ऐकतो व सोडून देतो पण मनाने, गांभीर्याने विचार करत नाही. एक कळत नाही या सर्व घटनां वृत्तपत्रातून, मीडियातून, मुलीच्याच नावाने का ओळखल्या जातात?. का हे ही जाणीवपूर्वक पुरुषप्रधान संस्कृतीचं लक्षण आपण मान्यच करून चाललो आहोत? खरं, तर जो मुलगा, पुरुष या हिंसेला जबाबदार आहे त्याच्या नावाने ही केस ओळखायला जावी, म्हणजे त्यांची त्यांच्या कुटुंबाची,समाजाची मान,सन्मानाची,प्रतिष्ठेची ही लक्तरे चव्हाट्यावर यायला नकोत का?.
परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी रिक्षा, टॅक्सी इतर वाहनावर मुलगी शिकली,प्रगती झाली ही टॅग लाईन लिहण्यास बंधनकारक ठेवले होते. मोदी सरकारचे "बेटी पढाव,बेटी बचाव" धोरण त्यांच्या पक्षांच्या नेत्यांनी खुलेआम उध्वस्त करून टाकले. आता यांच्या पासुन "बेटी बचाव" हाच समाजापुढे मोठी समस्या झाली आहे.
यांनी केलेल्या अन्याय,अत्याचार, बलात्कार आणि हत्याकांडात न्यायाला विलंब होऊन सुद्धा न्याय मिळत नाही. लैगिंक हिंसाचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी आता वेगळी न्यायालय असावी व या प्रकारची सर्व प्रकरणे प्राध्यान्याने हाताळावी अशा सूचना दिल्या जातात. पण अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा कुठे उभी राहते?. ती उभी राहत नसल्यामुळे आरोपीवर दबाव राहत नाही. आणि जबरदस्त शिक्षेची भीती निर्माण होत नाही.समाजातील लोक एका महिन्यात सर्व विसरून या अपराध्यांना सन्मानाने वागवितात. पोलीस त्यांची सहानुभूतीने चौकशी करतात. त्यामुळेच अन्याय,अत्याचार, बलात्कार आणि हत्याकांडातील आरोपी त्यांच्या कुटुंबातील लोक तोंड लपवून राहण्या ऐवजी ताट मानेने समाजात वावरताना दिसतात. त्यात राजकीय पक्ष त्यांना समाजसेवक म्हणून पुढे करतात. समाजातील लोक स्वार्थी,मतलबी झालेत. त्यामुळेच पुरुषप्रधान व्यवस्था मजबूत होऊन स्त्री जातीच्या मुलींचा महिलांचा बळी जात आहे.
सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप मुंबई,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा