विराज जगताप हत्याकांड :सरकारचे मनुवैदिक मानस शास्त्र?.
लोकसभेच्या मावळ मतदारसंघात विराज जगताप या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. त्या हत्येमागचे कारण साऱ्या देशासाठी अत्यन्त लज्जास्पद आहे. मी याच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीतून लोकसभा निवडणूक लढलो. उरण पनवेल ते रायगड या समुद्री हवामान ते घाटमाथा या परस्पर भिन्न भौगोलिक सामाजिक आणि राजकीय परिस्थिती ने परस्पर विरोधी वातावरणातली ही चुरशीची निवडणूक होती. या मतदारसंघात विजयी झालेल्या शिवसेना भाजपा युती चे खासदार श्रीरंग बारणे आणि कॉग्रेस राष्ट्रवादीच्या पार्थ अजित पवार यांच्यातील लढतीत मी आगरी मागासवर्गीय उमेदवार होतो. पिंपरी चिंचवड परिसरातील जनतेचा साधा भावनिक प्रेमळ पाठींबा, लोकशाहीशी प्रामाणिक नाते सांगणारा मतदार पाहून मी भारावून गेलो होतो.
विराज सारख्या विशीतल्या तरुणांची जेव्हा हत्या होते तेव्हा माता पित्याच्या पितृवत्सल काळजाच्या तुमच्या माझ्यासारख्याचे काळीज पिळवटून जाते. जी अवस्था विराजच्या आईची आहे ती माझ्यासारख्या प्रत्येकाची असावी. आई वडिलांचे आपल्या मुलांविषयी जे प्रेम असते त्याची तुलना जगात कुणाशीही होऊ शकत नाही. वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी मी स्वतः हे अनुभवतोय. आपल्याला मुलासारख्या असणाऱ्या विराजच्या हत्या ज्या कारणामुळे होतात त्याचे दुःख फार मोठे आहे.
या मतदार संघात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडून ही मोक्याची तेव्हढीच धोक्याची जबाबदारी मिळे पर्यंत आणि निवडणुकीच्या अंतिम निकाळा पर्यंत बाळासाहेब आणि प्रत्येक कार्यकर्ता मतदार बंधू भगिनींच्या सहकार्याची आठवण चिरस्मरणीय ठरली. विराजची हत्या ही संतापजनक घटना कानावर येईपर्यंत मी माझ्या सर्वच कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनींशी केवळ कौटूंबिक मायेने ममतेने बांधला गेलोय!. अर्थात या परिसरातील बांधवांचे दुःख तेच माझेही दुःख आहे.
मागासवर्गीय पाटील असतात याची जाणीव घाटमाथ्यावर बऱ्याच लोकांना नसावी! निवडणुकात सांम,दाम,दंड,भेद,पैसा,धमक्या आणि ईव्हीएम चा कल्पक वापर करून लोकांची मते लीलया घेऊन जिंकायचे पवार-मोदी (क्षत्रिय वैश्य युती) कृत्रिम राजकारण, विसरायला लावणारी प्रेमळ मागासवर्गीय माणसे मी येथे घरा घरात पाहिली.
जगाला प्रेमाने जिंकायचे, तर स्वतःला पंचशीलाने! याच कार्ला मातृसत्ताक संस्काराने शिकलेल्या सागरपुत्र आगरी कोळी कराडी भंडारी स्वभावाचा मी एक सामान्य माणूस या घटनेने प्रचंड दुःखी झालोय. सार्वत्रिक निवडणुकीत नेता म्हणून जेव्हा कुणी आपले अमूल्य मत देतो, तेव्हा त्या नेत्यांचे विचार आचार आणि व्यवहार यास दिलेली ती जाहीर मान्यता असते. आपल्या घरातही आपण आपल्या रक्ताच्या नातेवाईकांना असे मत देताना अंतर्मनात त्याचे किती कठोर मूल्यमापन करतो याची जाणीव मला स्वतःस आहे. मावळ मधले 75 हजार मतदार हे याच कौटूंबिक नात्याने मला मनातून जोडले गेलेत.
शासन कर्ता कसा असावा याचे उत्तर देताना एकविरा पुत्र बुद्ध म्हणाले होते, "शासन कर्त्याने चुकणा-या जनतेस शिक्षा करणे म्हणजे शासनकर्ता होणे नाही! तर आपण आपल्या मुलाशी जसे पित्याप्रमाणे वागतो तसे जनतेचा पिता होणे होय." मूल चुकते त्यास कोणताही पिता मृत्युदंड देत नाही. बाप झालेल्या प्रत्येक माणसाला माझे शब्द समजत असतील. यामुळेच सम्राट अशोका सारखा जगातील सर्वश्रेष्ठ लोककल्याणकारी राज्यकर्ता घडविणारा, मातृसत्ताक आई एकविरापुत्र बुद्ध हे माझे राजकीय मार्गदर्शक झाले.
विराजची क्रूर हत्या ही साऱ्या देशातील माता पित्यासाठी आता, राज्यकर्त्यांची विचारसरणी कशी असावी याचे चिंतन करायला लावणारी घटना आहे. पश्चिम महाराष्ट्र हा वारकरी विचारांचा आहे. संत तुकारामांचा एक अभंग पंडित भीमसेन जोशींनी गायला. 'जे का रंजले गांजले.. त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा..।। दया करणे जे "पुत्रासी"तेचि दासा आणि दासी।। तुका म्हणे सांगू किती? त्याची भगवंताच्या मूर्ती...।।' वारकरी साहित्याचे गाढे अभ्यासक माळी समाजाचे प्रा शंकर महाजन हे माझ्याबरोबर होते. आमच्याकडे आई एकवीरेंच्या वात्सल्याने आणि घाटावर विठू माऊलीच्या प्रेमाने वाढलेल्या महाराष्ट्राला माझी विनंती आणि प्रश्नही या लेखातून मी करत आहे. माता पित्याच्या मनाचे राजकारणी आम्ही घडवू शकत नाही का?.
मी पहिला प्रश्न मला म्हणजे राज्यकर्त्यांना विचारीन. साऱ्या देशाचे प्राण वाचविण्या साठीच लाॅकडाऊन जाहीर केलेय ना?. केंद्रीय आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना हा माझा प्रश्न आहे! सरकारच्या उद्देशा बाबत शंका येण्याचे कारण महाराष्ट्रात मागासवर्गीय तरुणांच्या हत्या जात वर्चस्वातून होणे म्हणजे शासनाची उच्चवर्णीय मानसिकता प्रकट होणे आहे! ही अत्यंत घातक स्थिती आहे. नोटबंदी आणि लाॅकडाऊन याचे पंतप्रधान मोदींचे हेतू उदात्त असले तरी 85 टक्के मागासवर्गीय जनतेच्या जगण्यावरचे मृत्यूचे नवनवे प्रयोग अशीच वास्तव स्थिती लोकांना जाणवतेय! रांगेत उभे राहून आणि नोटबंदीच्या मंदिने आलेले मृत्यू या थंड डोक्याने केलेल्या हत्याच होत्या!.
बेरोजगारी गरिबी यामुळे झालेले मागासवर्गीयांचे स्थलांतर, रेल्वेखाली चिरडलेल्या कामगारांचे मृत्यू आणि घरा घरात उपासमारीने आणि गरिबीमुळे औषध पाण्याविना मरणारे कोरोनाग्रस्त नागरिक या सरकारी हत्याच आहेत ना?. जमावबंदी असताना उच्च जातीचा विषाणूग्रस्त माथेफिरू सहाच्या संख्येने येऊन एखाद्या प्रेम करणाऱ्या तरुणास रस्त्यात मारतो ही उच्चवर्णीय मानसिकतेच्या सरकारने केलेली मागासवर्गीय नागरिकांची हत्याच आहे ना? केंद्र आणि राज्याच्या फडणवीस पवार वादात या कोवळ्या मुलांचे हत्येचे विकृत राजकारण कुणी करू नये!!.
विराज जगताप हा देशाच्या सरकारी मानसिकतेचा प्रश्न आहे. लाॅकडाऊन ही आता लोकशाही विरोधी आणीबाणी वाटू लागली आहे. त्यात मागासवर्गीय माणसाच्या हत्या अधिक ठळकपणे दिसतात. अर्थात विराज जगताप हा केंद्र सरकारचा विरोधक नव्हता ना? मोदी सरकारला लोकसभेत विरोधकच उरला नसताना विराजची हत्या होते यापाठीमागे कोणते दहशतवादी राजकारण असावे? अमेरिकेतील जॉर्ज प्लॉईड या काळ्या अमेरिकन नागरिकाच्या रस्त्यावरील गोऱ्या पोलिसाने केलेल्या क्रूर हत्येने हा प्रश्न देशाच्या अध्यक्षांच्या मानसिकतेकडे बोट दाखवू लागला. आम्हीही विराजची हत्या ज्या सरकारी मानसिकतेने घडली आहे; ते मनुवादी क्षत्रिय राजकारण आहे हे मान्यच करायला हवे!
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्ष ट्रम्पना गोऱ्या मानसिकतेची वर्णभेदी घृणास्पद शिवी ऐकावी लागते. मग मनुस्मृती समर्थक भाजपाचे केंद्रीय आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांची मानसिकता एकविरापुत्र बुद्धाच्या करुणेची निश्चितच नाही ना? मी आगरी ओबीसी जातीचा प्रतिनिधी पराभूत खासदार म्हणून देशाच्या जनतेस हा प्रश्न विचारतोय!.
आम्ही पंतप्रधानांच्या मानसिकते बाबत नोटबंदीच्या काळातच हे प्रश्न विचारायला हवे होते. 'शूद्रांना संपत्तीचे काडीचेही अधिकार नसतात'; याच मनुस्मृतीच्या तत्वाने गरीब कष्टकरी महिलांनी पिठाच्या डब्यात जपून ठेवलेल्या कष्टकऱ्यांच्या एखाद्या पाचशेच्या नोटेला बाहेर काढण्यासाठी ही कारवाई होती का?. ज्यास जन्म आहे त्यास मृत्यूही आहे हे सत्य आम्ही जाणतो. परन्तु विराज या तरुणास मागासवर्गीय जावई म्हणून स्वतःची क्षत्रिय कन्या स्वीकारत असताना, तिचा निर्णय नाकारणारी मानसिकता नक्की आहे तरी कोणती?. विराजची हत्या आमच्या मराठा मुलीवर प्रेम केले म्हणून जाहीर रित्या करण्याची मनुवादी नैतिकता ज्या मनात जन्म घेते, गुन्हा तेथे मना मनात घडलाय!!.
आपल्या देशात मनुस्मृतिस धार्मिक नैतिकतेचे अधिष्ठान सांगणारे जे लोक आहेत त्यांनी राग न मानता आता तरी पुढे यावे! त्याच प्रमाणे मनुस्मृतीच्या विरोधक लोकांनी हे लक्षात घ्यावे हत्या या प्रथम मानवी मनातच घडतात. पोलिसांनी गुन्हेगाराच्या मनाचा वेध घेणारे पुरावे शोधावेत. अॅट्रोसिटी हा कायदा मनुस्मृती च्या मागासवर्ग विरोधी उच्चवर्णीयांच्या आक्रमक हल्य्या पासून संरक्षण देणारा कायदा आहे. तो मागासवर्गीय रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये या शिवरायांच्या स्वराजनीतीचा ऐतिहासिक कायदा आहे. शिवरायांचा पराक्रमी वारसा सांगणाऱ्या मराठा महाराष्ट्राला तो समजू नये? हे आम्हा प्रबोधनकारांचे अपयश आहे. आपल्या आजूबाजूला असलेली अशी विकृत मने ओळखून आम्ही अत्यंत अमूल्य असे जीवन वाचविण्याची एकविरापुत्रांची जीवनविद्या समजून घेतली पाहिजे.
विराजची हत्या ही मला देशाची मानसिक फाळणीचा परिणाम म्हणून अधिक भीतीदायक वाटते. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना मा अनिल देशमुख यांना संशयाच्या नजरेने पहायला लावते! अर्थात माझेही आडनाव पाटील असल्यामुळे याचा देशमुख पवार काटे पाटील आडणावाशी संबंध जोडणे चुकीचेच आहे. केंद्र आणि राज्याच्या सरकारने आज जो धर्म वंश जात संघ सेना आणि राष्ट्रवादी उपाध्या धारण करतात तरीही जनतेच्या मनातून उतरलेल्या राजकीय पक्ष संघटनांनी,याच्यापेक्षा अधिकचा विश्वास मागासवर्गीय जनतेला देणे गरजेचे झालेय! जनमानसात आज सरकारविषयी संशयाचे वातावरण निर्माण झालेय याची कबुली मी देत आहे.
विराजची हत्या झालीय त्याचा गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये नोंदला गेलाय. मला पूर्ण विश्वास आहे मावळ मतदार संघ भीमा कोरेगावमुळे अत्यन्त संवेदनशील झालाय सरकारला न्याय देण्याऐवढं संविधानिक वातावरण येथे आहे. अर्थात उरण पनवेल रायगडचा कोकणातील मातृसत्ताक मानसिकतेचा प्रदेश हे पुरुषसत्ताक मानसिकतेच्या मागासवर्ग विरोधी मानसिकतेच्या प्रदेशावर नैतिक दबाव निर्माण करीलच!
प्रेम हे आंधळे असते हे मानवी मनाच्या निर्णय स्वातंत्र्याला नाकारणारे वाक्य आहे. प्रेम म्हणजे मालकीची भावना नव्हे. माझ्या मुलीने कुणावर प्रेम करावे हा मुलीच्या स्वातंत्र्याचा विषय आहे असे हुंडा नाकारणारे मातृसत्ताक कोकण मानते. आईच्या मानसिक स्वातंत्र्या सह शारीरिक हत्या करणाऱ्या परशुरामाची ही भूमी नाही. ती लग्नात हुंडा नाकारणाऱ्या ,महिलांना धार्मिक आर्थिक आणि शस्त्रास्त्रांचे अधिकार देणाऱ्या सागरपुत्र एकविरापुत्र बुद्धाची भूमी आहे!! म्हणूनच विराजला मनाने वरणाऱ्या मुलीची मानसिक हत्या विराजला मारणाऱ्या लोकांनी केलीय. हे हत्या प्रकरण बौद्ध एससी एसटी या अत्याचार प्रतिबंधक अर्थात अट्रोसिटी कायद्याची सुरक्षा दिलेल्या अतिशूद्र जातींचेच नाही. तर शूद्र ओबीसी जातीच्या तरुणांना उच्चवर्णीय जातीची मुलगी नाकारणाऱ्या त्यासाठी हत्या करणाऱ्या हत्या-यांचे आहे. ओबीसींना हे माहीत असावे!.
आम्ही अंदाजे 85 टक्के मागासवर्गीय आणि 15 उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या जन्माने श्रेष्ठ लोकांचा उल्लेख अशा शोषण, हत्या आणि मागासलेपण आरक्षण समजण्यासाठी करतो. प्रेम प्रकरणातून कायदा हातात घेण्याची परंपरा पाहता अशा उच्चवर्णीय वस्त्या दहशतवादी घोषित करणे मागासवर्गीय जातीसाठी अतिशयोक्तीचे ठरू नये. अर्थात मुस्लिम आतंकवादी असे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा विराजची हत्या हा वैदिक क्षत्रिय आतंकवाद आहेच ना?. गांधीहत्या ही ब्राह्मणी आतंकवाद आहे. समाजात दहशत पसरविणे हाच तर जाहीर हत्याकांडात हेतू असतो. माझ्यासारख्या उमेदवारास पुण्याकडे लोकसभा लढविताना याचा विचार यापुढे करावाच लागणार कारण मी ही विराजसारखाच मागासवर्गीय आहे. विराजने फक्त प्रेम केले. मी तर सर्व सत्ताधारी जमीनदार जातींची सत्ता घेण्याची मानसिकता ठेवतोय!.
प्रश्न आहे प्रत्येक घरात जन्मणा-या मुलींचा ज्या प्रेम करताना जात नाही तर मुलांचे कर्तृत्व आणि प्रेमच पाहून निर्णय घेतात. आमच्या ठाणे, रायगड, मुबंई या अपरांत प्रदेशात मुलींचा निर्णय अंतिम असतो बंधनकारक असंतो. माझा प्रश्न माझ्या मतदार संघातील सर्वच निवडणूक लढलेल्या जिंकलेल्या हरलेल्या खासदार आमदार आणि नगरसेवक सरपंच सदस्य यांना आहे. हत्या केवळ विराजची दिसतेय; परंतु विराजच्या प्रेमिका मुलींचीही झालीय! तिच्या मनाचा विचार कोण करणार?.
गोऱ्या मानसिकते विरोधात एका जॉर्ज साठी अमेरिका हलवून सोडणाऱ्या काळ्या लोकांपेक्षा एकविरापुत्र बुद्धाच्या देशातील आम्ही सारे लोक प्रेम प्रकरणात आपल्या प्रियकराची भावी पतीची हत्या करणारे जन्मदाते, रक्ताचे भाऊ यांच्याबद्दल ती मुलगी काय विचार करीत असेल? वंचित बहुजन आघाडीचे आमचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या सुविध्य पत्नी अंजलीताई आंबेडकर यांच्या मनात विराजच्या आईला समजाविताना सांत्वन करताना, विराजच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या मुलीच्या दुःखाची जाणीव निश्चितपणे झाली असावी!.
सावित्री माई या शूद्र ओबीसी महिलेच्या आग्रहाने शिकलेल्या सर्वच भारतीय महिलांनी पुरुष प्रियकर मारण्याची कृती ही स्त्री विरोधी आहे हे समजून घेण्याची वेळ आलेली आहे. जाती बाहेर जाऊन लग्न केलेल्या स्त्रिया या बंडखोर स्त्री स्वातंत्र्याचे महत्व माझ्यापेक्षा अधिक सांगू शकतील! मी विराजची हत्या ही माझ्या मानसपुत्र आणि मानस कन्येची हत्या समजतो!!. या मावळ मतदार संघात आई एकवीरेंच्या बलशाली मातृसत्ताक विचारांची गौरवशाली परंपरा घेऊन कोकणच्या महिला स्वातंत्र्याचे गीत धार्मिक आर्थिक सामाजिक स्वातंत्र्याचे आगरी कोळी पद्धतीचे काती कोयते घेऊन स्वतःच्या शिलाचे रक्षण करण्याचे जीवन कौशल्य अभ्यासण्याची विनंती करीन. ही लढाई पुरुषसत्ताक पुरुषांपेक्षा कोळीवाड्यातील मातृसत्ताक महिला लढतील. भेटूया कार्ला बौद्ध लेण्यात आई एकवीरेंच्या विचारासोबत. लढाई सुरू झालीय विराजच्या तुमच्या माझ्या प्रेमाची.....! मानवी हक्कांची ..!!
राजाराम पाटील 8928452112,माजी खासदार (पराभूत)
मावळ मतदार संघ,वंचीत बहुजन आघाडी,
(विशेष विनंती लेख प्रसिद्ध केल्यास pdf पाठवावी.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा