अंधभक्तीतून भुमिकाहीन कार्यकर्त्यांचा उदय..
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमाने जीवाचे रान करून बुध्दीच्या कसोटीला उतरले व संविधानाच्या माध्यमातून समाजाच्या नव्हे तर संपुर्ण मानव जातीच्या प्रगतीची दारे खुली केली.परंतू विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर आंबेडकरी चळवळीत काम करणा-या सगळ्याच कार्यकर्त्यांचा स्वार्थ जागी झाला, आणि अंधभक्तीतून भुमिकाहीन झालेले व सोशल मिडीयावर भान हरपलेल्या कार्यकर्त्यांचा उदय झाला.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर मीच इथल्या समाजाचे नेतृत्व करू शकतो,ही भावना वाढीस लागली,माझ्याइतके सक्षम नेतृत्व देणारा दुसरा कुणीच नाही हा समज वाढीस लागून सर्वसामान्य कार्यकर्त्याला हिन समजल्या जाऊ लागलं, नेत्यांचा आपसांत दुजाभाव तयार होऊन वाढीस लागला,त्याचा परिणाम म्हणून पुढील काळात पक्ष संघटनेचे अनेक तुकडे होऊन गटतट निर्माण झाले व स्वत:ला प्रती बाबासाहेब समजून गटाधिपती झाले,त्यामुळेच अंधभक्तीतून भुमिकाहीन झालेले व सोशल मिडीयावर भान हरपलेल्या कार्यकर्त्यांचा उदय होत आहे.
१९५९ ते १९७९ या वीस वर्षांच्या काळ जर बघितला तर एक गोष्ट लक्षात येते की,रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट तयार झाले.प्रत्येक गट स्वतःला अखिल भारतीय स्तरावरील रिपब्लिकन पक्ष असल्याचा खोटा दावा करू लागला.कुणी कॉंग्रेससोबत सख्य साधून; तर कुणी जनसंघाशी सख्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर समाजाला भावनिक करून दलितांच्या मतांची सौदेबाजी करून जास्तीत जास्त राजकीय लाभ मिळविण्याच्या प्रयत्नात तथाकथित नेते मशगुल झाले.त्यामुळे १९५७ च्या यशासारखे घवघवीत यश पुढे पक्षाला कधीच मिळाले नाही.फाटाफुटीच्या या काळात रिपब्लिकन पक्ष ऐक्याविषयी जे प्रयत्न झाले,ते निरुपयोगी ठरले व पक्षाची वाताहत झाली.रिपब्लिकन पक्षाच्या या वाताहतीचा परिणाम म्हणून पुढे ‘दलित पॅंथरचा उदय झाला. परंतू तो काळ बघता ती काळाची गरज बनली, त्यामुळे प्रचंड ताकदीने पँथरने वेग घेत अन्यायाविरूध्द झेप घेत गगनभेदी डरकाळी फोडली,आणि प्रस्थापितांना हादरा बसला,पायाखालची जमीन सरकली,कोणत्या दिशेनं कधी पँथर झेप घेईल ही दहशत प्रस्थापितांच्या मनात कायम बसली,परंतु तिथेही स्वार्थाची लागन झाली,आणि पँथरची लाट हळूहळू ओसरत गेली.अंधभक्तीतून भुमिकाहीन झालेले व सोशल मिडीयावर भान हरपलेल्या कार्यकर्त्यांचा उदय पँथर म्हणून पुढे आला.
नंतरच्या काळात उठसुठ जो तो पँथर बनु पहात होता,परंतु ते शक्य झाले नाही,आणि मग जे झाले ते सर्कशीतले पँथर झाले,हेच सर्कशीतले पँथर मग पुढे मग राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मिरवू लागले,शहराच्या,तालुक्याच्या, जिल्ह्याच्या बाहेर व राज्याच्या बाहेरही पाच पन्नास कार्यकर्त्यांची फळी उभी करू न शकणारे कार्यकर्तेही स्वत: ला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषीत करू लागले,मग काय स्वयंघोषीत राष्ट्रीय अध्यक्षांच्या डरकाळ्या सोशल मिडीयांवर फुटू लागल्या,आणि या राष्ट्रीय अध्यक्षांच्या घडामोडीत चळवळीला सगळे नेतेच मिळाले,या नेत्यांमुळे चळवळीला पुढे नेण्यासाठी किंवा चळवळीला आपल्या खांद्यावर पेलवणारे कार्यकर्तेच शिल्लक राहीले नाहीत,ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल,
अन्याविरूध्दची चिड अवश्य असावी,परंतू ती चिड नियोजनात्मक असावी,नुसतीच डरकाळी फोडून विरोधकांना सावध करून त्यांचे मार्ग तथा नियोजनात्मक ढाचा बदलून सावध खेळी खेळण्यासाठी संधी देणारी नसावी,विरोधकांवर जरब बसावी म्हणून म्हणून सोशल मिडीयावर फोडलेल्या डरकाळीने कोणतीही जरब विरोधकांना किंवा इथल्या धर्मव्यवस्थेला बसणार नाही,उलट आमच्या अशा आक्रमक अनियोजनात्मक डरकाळीने आम्ही आमच्यावरचे तात्पुरते समाधान मानुन जगत राहतो,याचा फटका मात्र आमच्या पुढील पिढीला किती बसणार आहे,याची पुसटशी देखील कल्पना आम्हाला नसावी असे वाटते,निषेध मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून आक्रमक भुमिका घेऊन आम्ही काय साध्य करतो हे आजवर न उलगडलेलं कोडंच आहे,निषेध मोर्चाचे आमच्यावर गुन्हे नोंद झाले की आम्हाला खुप समाधान वाटते,परंतू त्यातून स्वत:चे व समाजाचे किती नुकसान झाले हे मात्र कधी लक्षातच येत नाही,तात्पुरत्या समाधानावरच आम्ही संपुर्ण कायमचे यश मिळविल्या सारखे गुर्मीत वावरतो,मग पुन्हा पाच दहा रूपयांसाठी एकमेकांचे खिसे तपासतो, जोपर्यंत आमच्याकडे कुठलेही राजकिय,सामाजिक,शैक्षणिक व औद्योगिक नियोजन नाही तोपर्यंत आम्हाला यश मिळणे दुरापास्त आहे. हे अंधभक्तीतून भुमिकाहीन झालेले व सोशल मिडीयावर भान हरपलेल्या कार्यकर्त्यांचा उदय झालेल्यानी लक्षात घेतला पाहिजे.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचे आमचे नियोजन अगोदरच करून ठेवले आहे,परंतु भान नसलेल्या लोकांनी ते नियोजन बाजुला ठेऊन आपली स्वत:ची अक्कल पाजळायला सुरूवात केली आणि मी खुप विद्वान असल्याचे भासवत स्वत:सह समाजाला उध्दवस्त केले व करत आहेत,जरा भानावर येऊ या,प्रत्यक्ष नियोजनात्मक कृती करू या,समाजातील तरूण आजही उच्च शिक्षणा पासून वंचित होत आहेत,जे उच्चशिक्षित झालेले आहेत ते रोजगारांच्या प्रतिक्षेत आहेत,समाजातील तरूण आजही चळवळीकडे पर्यायाने चळवळीतील नेते कार्यकर्ते यांच्याकडे मोठ्या आशेनं बघतो आहे,समाजाला देण्यापेक्षा समाजालाच लुटायचा धंदा चालू आहे,समाजाने प्रगती साधायची कशी?. हा प्रश्न तोंड वासून उभा आहे,
हे बदललं पाहीजे,कुठेतरी हे थांबलं पाहीजे,
देशात जेवढे काही पक्ष संघटना झाल्या त्यातल्या काहीजणांनी सत्ता प्रस्थापित करून त्या भोगल्या,परंतू त्यासाठी त्यांनी रिकाम्या डरकाळ्या नाही फोडल्या तर नियोजनात्मक काम करून भोगल्या,कुणी बलिदानाच्या नावावर तर कुणी धर्माच्या नावावर सत्ता भोगल्या,आमच्याकडे,विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा धोरणात्मक विचार आहे,त्या विचारांवर आपणही सत्ता प्रस्थापित करू शकतो.फक्त नियोजनात्मक बांधणीची गरज आहे.विचार करा,भानावर या,राज्य व केंद्र सरकारच्या किती विकास, कल्याणकारी योजना आहेत माहिती आहेत काय?. जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कोणते कामे कोणी केली पाहिजे त्यासाठी येणार विकास निधी कशा पद्धतीने खर्च होतो माहिती आहे काय?.प्रत्यक्ष कृती करून न्याय मिळवू या..अंधभक्तीतून भुमिकाहीन झालेले व सोशल मिडीयावर भान हरपलेल्या कार्यकर्त्यांचा उदय..हा समाजाला अंधारातुन प्रकाशाकडे नेणारा असला पाहिजे.स्वयं घोषित नेता बनणारा नसावा.
✍विकास साळवे,9822559924..पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा